एनाराय व्हायचंय का तुम्हाला?

संकल्पना

एनाराय व्हायचंय का तुम्हाला?

- सृजन

काय म्हणता? एनाराय व्हायचंय तुम्हाला? जरूर व्हा. त्यासारखी दुसरी भारी, एक नंबर गोष्ट नाही दुसरी. पण सगळ्यात आधी तुम्ही हे ठरवा की, तुम्हाला कोणत्या देशातले एनाराय व्हायचंय. म्हणजे, त्यानुसार मी स्थल-कालानुरूप लक्षणं, वैशिष्ट्य आणि जबाबदाऱ्या सांगेन; कारण हे सगळंच दर देशागणिक वेगळं आहे. नाही कळलं? हरकत नाही, तसं कन्फ्युजिंगच आहे ते. सोपं काम नाहीच ते.

म्हणजे तुम्ही एनाराय होणार असाल तर, काही गुण आपल्या अंगी भिनवावे लागतात. जसं की, समजा तुम्ही ठरवलं की सायबाच्या देशातले एनाराय होऊया. म्हणजे आपल्या युकेमधले हो, आपल्या यासाठी; कारण मागच्या काही दशकांत तिथे इतके भारतीय गेले आहेत की, सायबाचा देश आपल्यासारखा वाटू लागला तर त्यात काही फार नवल नाही. त्यामुळे छानच आहे निर्णय हा. पण मग, तुम्ही सायबाच्या देशातले होण्याआधी तुमच्यात काही बदल घडवून आणावे लागतील.

जसं की, सगळ्यात आधी तुम्हाला ब्रिटिशांचं राज्यच कसं चांगले होतं आणि काय तो साहेब, काय त्याची शिस्त, रुबाब असलं कायकाय बोलणं भारतात असल्यापासूनच सुरू करावं लागेल. दुपारच्या चा-बिस्कुट खायच्या डेली कार्यक्रमाला उगाचच हाय-टी वगैरे म्हणायला लागेल. पोषाखीपणा म्हणजे अगदी अंगी भिनवावा लागेल. हवं तर तिथे म्हणत नसतील पण येता-जाता 'माय लॉर्ड' किंवा 'युवर हायनेस' असलं कायकाय बडबडावे लागेल. 'मास्टरपीस'चं 'डाउनटन अॅबी' कसं भारी असतं वगैरे कायकाय बोलावं लागेल. पण फार अवघड नाही सायबाच्या देशातलं होऊन जाणं, अगदी परवाच कोणीतरी सांगितलं की, आपले गवळी जसे खेड्यातून हंडे घेऊन दूध टाकायला तालुक्याला जातात, अगदी तसेच पंजाबातून बिर्याणीचे आणि कसल्याकसल्या पदार्थांचे हंडे रोजचे लंडनला जातायंत आणि गेल्यागेल्या काही तासांत संपतायत. इथपर्यंत आपल्या देशवासीयांची मजल पाहता भारतीयांचा फारच अभिमान वाटतो यात वाद नाही. बाकी नखभर तो देश, त्यात महागडा त्यामुळे कधी परतूनी मागं फिरावं लागलंच तर, तयारी असावी हो.

आता तुम्हाला अमेरिकेतलं एनाराय व्हायचंय का? मी सांगेन पुन्हा एकदा विचार करा, पण आता तुम्हाला व्हायचंच असेल तर मग पु. ल. म्हणतात तसं जायचंच असेल तर, पूर्ण तयारी करूनच मैदानात उतरा. आता स्पष्टच सांगायचं झालं तर, ट्रंपसर आल्यापासून त्यांनी सगळ्या अमरिकी एनारायांचं धाबं दणाणून सोडलंय; जणू सळो की पळो करून सोडलंय. तरीही रुबाब करावा तो अमरिकी एनाराय लोकांनीच. पण हे सगळं सोपं नाही, बरं का. म्हणजे तुम्ही अमेरिकेत येता त्याआधी पासून आणि एकदा अमेरिकेत आलात की, कायमचे राहा किंवा परतही जा पण तो बाज, तो माज कायमचा बाणवूनच घेता तुम्ही. यू सी, यु. एस. चेंजेस यू.

अमेरिकन एनाराय ही एक फ़ितरत आहे. फ्रेंड्झ, GOT, HYMYMच्या गप्पा तर बच्चे करतात. एनाराय लेजंड्स बेसबॉल, फुटबॉल, एवढंच नव्हे तर हॉकी (एक मिनिट, आईस हॉकी असलं तरी हॉकीच म्हणायचं) आणि जमलंच तर सॉकरच्या टीम्सच्या गप्पा करतात. अख्खं बालपण वरणभातात गेलं असलं तरी आल्यावर एकदम ही मंडळी रेअर स्टेक आणि काव्हीआरचे गोडवे गातात. आपल्या गावचे देशी गुत्ते बंद पडावेत म्हणून बोंबाबोंब केली असली तरी इथे येऊन वेगवेगळ्या 'सुरां'चे सूर आळवतात. परदेशातल्या मराठी मंडळांत, मराठी शाळांत वगैरे क्लिशे लोक जातात. लेजेंड्स अशा लोकांकडे ढुंकून बघतही नाहीत. लेजेंड्स गोऱ्या लोकांमधेच वावरतात. कथक, भरतनाट्यम कसे आऊटडेटेड असून 'साल्सा, टॅप डान्सिंग कसं बेनिफिशिअल आहे' हे पटवून देतात.

अर्थात, असे लेजेंड्स काही सगळ्यांना होता येत नाही, त्यामुळे तुम्हाला चारचौघांसारखे अमेरिकन एनाराय व्हायचं असेल तर, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे समविचारी भारतीय लोक जमा करावे लागतील. चतुर लोक आधीच असलेल्या एखाद्या ग्रुपमधे स्वत:ला सामील करून घेतात. आणि हे वाटतं तेवढं सोपं नाही. मुरलेली लोणची जशी जास्त झणका देतात तशी इथली मुरलेली एनाराय मंडळी काही कमी नसतात. तुम्ही एक काम करा, अस्सल अमेरिकी एनाराय व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आधी २१ अपेक्षितांमधे पारंगत होऊन जा. हे २१ अपेक्षित म्हणजे तुम्हाला घरी-दारी, देवळांत, पार्ट्यांमधे कधीही आणि कसेही विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आहेत. एकदा का तुम्ही ही तयारी केलीत की मग, तुम्ही अर्धी शर्यत जिंकल्यातच जमा आहे. बाकी एकदा हे जमलं की मग, मराठी मंडळात जाणं, मंडळातलं लोकल पॉलिटिक्स खेळणं, संधी मिळेल तेव्हा आपल्या आणि आपल्या पोरांच्या विविध कलागुणांचं दर्शन घडवणं या गोष्टी सहजी जमतात, आणि त्या तुमचे एनारायपणही बळकट करत राहतात.

या २१ अपेक्षित प्रश्नांमधे कधी आलात, कोणकोण बरोबर आहे, मग कोणत्या व्हिसावर आलात, ग्रीनकार्ड फाईल केलंय का, प्रायोरिटी डेट कोणती (म्हणजे अंदाज घ्यायला की यांना मिळणार की नाही ग्रीनकार्ड), समजा ग्रीनकार्ड मिळायची शक्यता असेलच, तर मग अपार्टमेंटात राहता कि घर घेतलंय, घर कुठे आणि किती मोठं आहे, घरात एक जण नोकरी करतो की दोघे, या आणि अशा प्रश्नांची तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या सगळ्या प्रश्नावल्यांमधून समोरच्या माणसाच्या आर्थिक, मानसिक कुवतीचा आणि ऐपतीचा अंदाज आला की, एनाराय मंडळी जरा आपलेपणा दाखवतात, अर्थात ही कुवत दाखवणं अवघड असलं तरी अशक्य मुळीच नसतं. पण एकदा का हे तुम्हाला जमलं की अमेरिकन एनाराय होण्यासारखं सुख नाही.

अरे रुबाब करावा, माज करावा तर यांनीच. यांच्यापुढे बाकी सगळ्या देशातले एनाराय म्हणजे तसे बिचारेच वाटतात. हे बऱ्याच जणांना झोंबू शकतं पण सत्य कटू असलं तरी ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं.

ही अशी वर सांगितलेली मोठमोठी धेंडं असली तरी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, बाकी युरोपीय देश वगैरे मंडळीही तशी मजेतच असतात. कसं आहे, एखादा अनुभवी कलाकार कसा आत्मविश्वासाने स्टेजवर एंट्री घेतो, तिथे एखादा नवोदित थोडासा बुजू शकतो पण म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नसतं. या बाकीच्या देशांतल्या एनाराय लोकांचं तसंच आहे. इथले एनारायदेखील चार पैसे राखून असतात. थोडक्यात काय, तर 'शांतीत क्रांती' करत असतात. या युके, युएसवाल्यांसारखा शो ऑफ जमत नाही म्हणा ना यांना. आखाती देशांततर गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानुपिढ्या आपले केरळी बांधव जातायत किंवा आपले गुर्जरभाई आफ्रिकन देशांत शेकडो वर्षांपूर्वी जाऊन वसले आहेत; पण मागच्या काही दशकांतल्या वेड्यासारख्या संख्येनं इंग्लंड-अमेरिकेत गेलेल्या लोकांनी एनाराय बनून या संकल्पनेचा चार्म असा काही वाढवलाय की त्याला तोड नाही.

आता व्याख्याच बघायची झाली तर, तसे तुम्ही एनाराय म्हणजे श्रीलंकेत किंवा नेपाळमधे राहणारेही असू शकता. तमाम एनाराय लोकांचे काही युनिव्हर्सल प्रकार असतात, मग ते कोणत्या का देशातले असेनात. त्याच त्या काही प्रकारांतच एनाराय मोडणार. जसं की, तुम्हाला आधी तुम्ही 'खरे' एनाराय व्हायचंय की 'नॉट सो खरे', ते आधी ठरवा. या दोन वर्गांत तसा फरक आहे. म्हणजे खरे एनाराय कसे, भारतात आले की, मुंजीपासून बाराव्यापर्यंत सगळ्या समारंभांना अर्धी चड्डी घालून रुबाबात हिंडतात. त्यांची पोरं आजारी पडू नै म्हणून येता-जाता त्यांना सॅनिटायझरने जवळजवळ धुवून काढतात. त्यांच्या बायका ७५००० रुपयांपासून सुरू होणाऱ्या साड्या, वारेमाप दागिने वगैरे घालून चारचौघांना चार महिने चघळायला विषय देतात.

नॉट सो खरे एनाराय म्हणजे आल्याआल्या मिसळीच्या किंवा वडापावच्या नावानं गळा काढणारे, दिसेल त्या टपरीवर कटींग मारणारे. ट्रेन किंवा बसनं तडफडत जाणारे आणि त्याचा माज करणारे. भारतातली आणि इन जनरलच आपल्या देशाची माहिती ठेवणारे वगैरे. तिथे परदेशात बसून, जमेल तसे आणि तेव्हा धडपडत ती देशी धुगधुगी जागवत ठेवणारे. आणि काही असतात ज्यांना नक्की माहीतच नसतं, आपण कोणत्या प्रकारात मोडतो. त्यामुळे ते बिचारे जमेल तिथे आणि जमेल तसे हात-पाय मारत राहतात. काय करणार, नशीब एकेकाचं.

एवढं सगळं ऐकल्यावरही, तुम्हाला अजूनही एनाराय व्हायचं असेल तर मात्र हे मान्य करायलाच हवं की, उत्साह भारी दांडगा तुमचा. असते हौस एकेकाला. तर आता एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर, तुमच्यात आणि तुमच्या एनाराय होण्यामध्ये एकच पायरी राहिली, ती म्हणजे तुम्हाला कोणता देश खुल्या दिलानं, हातानं आणि अजून कशाकशानं स्वीकारायला तयार आहे ते पहा बरं. कारण सध्याचं सगळ्याच परदेशांतलं वातावरण अनिवासी लोकांसाठी 'चले जाव', किंवा 'के तेरा यहां कोई नहीं' अशा मूडमधलं असल्यानं एकदा ते बघून घ्या, मग झालंच काम म्हणून समजा.

अर्थात यातला गंमतीचा भाग सोडला तर, खरंच सोपं नाहीये. आजकाल परदेशातल्या अगदी छोट्या-छोट्या गावांतून भारतीय लोक दिसतात. कितीही आव आणला, माज केला तरी कधीतरी 'देसमे निकाल होगा चांद' ऐकून कुठेतरी, काहीतरी हरवल्यासारखं वाटतंच. एक युनिक अनुभव आजपर्यंत सगळ्या परदेशवासियांनी परदेशी आल्याआल्या घेतला आहे, तो म्हणजे रात्री अचानक कधीतरी जाग येते, आणि त्या शांततेत अचानक आपण आपल्या घरापासून कित्ती लांब आलोय याची जाणीव होऊन एकदम काहीतरी हरवल्यासारखं, बेचैन, एकटं वाटतं. गर्दीत चुकून हात सुटलेल्या लहान पोरासारखं. मन मुर्दाड व्हायला, हे असले विचार मनात आणायचं बंद व्हायला काही काळ जावा लागतो.

पण दर पिढीगणिक हे चित्र वेगानं बदलत आहे,
आताच्या ग्लोबल नागरिकांना पंख पसरवून घरट्यातून भराऱ्या घेणं त्यांना आवडणं, नव्या वाटा, नव्या दिशा खुणावणं स्वाभाविक आहे. मोआना नावाच्या एका प्रसिद्ध
सिनेमातल्या एका गाण्यात म्हटलंय तसं,
We set a course to find
A brand new island everywhere we row,
Aue, aue, We keep our island in our mind,
And when it’s time to find home, We know the way

अगदी साची बात थोडक्यात सांगायचे म्हटले तर, कुठंही गेले, भरकटले, रमले, रेंगाळले तरी, घरी जायची वेळ आली तर, आपापली गठुडी बांधून पुन्हा आपली वेस गाठू शकतील, आणि त्या वेशीत पुन्हा नांदू शकतील, बहरू शकतील तेच खरे एनाराय.

सांगा मग, कसं जमतंय ते, आलाच इथे तर भेटूच मग मंडळात.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम विषय- पण सुरू होता होताच संपला असं वाटलं.
आणखी बरर्र्र्च काही पोतडीतून बाहेर निघू शकलं असतं, नाही? उदा. २१ अपेक्षितची आयड्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अख्खं बालपण वरणभातात गेलं असलं तरी आल्यावर एकदम ही मंडळी रेअर स्टेक आणि काव्हीआरचे गोडवे गातात.

यांना कुठे तरी जवळपासच पाहिल्यासारखं वाटतंय. कोणत्या बाजूला बरं?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणा की सरळ, अटलांटा . पण तुम्ही त्यांना पाहिलं आहेत ? अरेच्या ? एकमेव दिसता हा सन्मान मिळालेले.
आणि हो , त्यांच्याकडून काव्हिआरचे गोडवे कधीही ऐकले नाहीयेत. ष्टेक एके ष्टेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माशांची अंडी खायला कोकणी मनुष्य पाहिजे. पुण्याला कुठला समुद्रकिनारा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माशांची अंडी खायला कोकणी मनुष्य पाहिजे. पुण्याला कुठला समुद्रकिनारा?

संपादक एकमेकांशी भांडतायत आणि तिथे वेश्ट कोष्टावर एक मासेखाऊ एनाराय काका मजा बघत असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

> अख्खं बालपण वरणभातात गेलं असलं तरी आल्यावर एकदम ही मंडळी रेअर स्टेक आणि काव्हीआरचे गोडवे गातात. 

> माशांची अंडी खायला कोकणी मनुष्य पाहिजे. पुण्याला कुठला समुद्रकिनारा?

काही प्राथमिक गैरसमज दूर करण्याची इथे गरज आहे. एकतर स्टेक (मग तो रेअर असो की जळलेला) आणि कॅव्हिआर यांपैकी एकही पदार्थ थोडाही गोड नसतो. दुसरं म्हणजे गोड्या पाण्यातल्या माशांपासूनही कॅव्हिआर बनवता येतं. समुद्रच हवा असं नाही. पण गोड्या पाण्यातल्या माशांचं कॅव्हिआरही गोड नसतं.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

'गोड'चा संबंध आला कुठून?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

प्रोफेश्वर! प्रोफेश्वर!! प्रोफेश्वर!!!

तुम्ही सैद्धांतिक विषयाचा अभ्यास करता, म्हणून मुळा-मुठेचं पाणी गोडं असावं असं तुम्हाला वाटतं. मुळा-मुठेच्या पाण्यातल्या रसायनांमुळे त्या नद्यां(!)मधले मासे आतापर्यंत सस्तन झाले असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही प्राथमिक गैरसमज दूर करण्याची इथे गरज आहे. माशांपासून कॅवियर बनवली जात नाही. मासे स्वत:च कॅव्हियर बनवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0