हॉटेल, पदार्थ, नावे इत्यादी

कॉलेजला जायला लागल्यापासून हॉटेल नावच्या मित्रमैत्रिणींसोबत बसण्याच्या तीर्थक्षेत्रांला जाणे सुरु झाले. पॉकेटमनी जेमतेम पॉकेटमध्ये मावेल एवढाच. त्यात कटिंग चहा नक्की येई. आई नावाचा ग्रह उच्चीचा असेल तर एखादा वडासांबार बसे. टीटी एम एम पध्दत काय असते, ते कॉलेजमध्ये गेल्यावर कळले. सर्वांना तेच परवडे. दर आठवड्याला कुणीतरी खायला घालायचं, हे फार नव्हतं. (आमच्यावेळी असं नव्हतं, च्या चालीवर आधीचे वाक्य म्हणावे.). एखादा जास्त फिरस्ता मुलगा म्हणे, रोज काय तेच तेच हॉटेल. अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ पुढच्या वेळेस. त्याचे हे बोलणे ऐकून अनुभवाची क्षितिजे हळुहळू रुंदावतायत, असे वाटे. कोणतेही हॉटेल घ्या. पोहे हा ठरलेला पदार्थ असतो. तो फक्त सकाळी दहापर्यंत मिळतो. दहा वाजून पाच मिनिटांनी तो संपलेला असतो. वडा सांबार, दही वडा, डोसा, उत्तप्पा हे साम्राज्य दहानंतर जे सुरु होतं ते संध्याकाळी सात- आठपर्यंत. काही ठिकाणी जेवायच्या वेळेपर्यंतही मिळते. चहा मात्र सातपर्यंत असतो. त्यानंतर मागितला तर स्पेशल मिळेल, असे सांगितले जाते. फक्त थोडा जास्त उकळवून दहा रुपये वाढवून ते पाणी स्पेशल च्या नावाखाली माथी मारले जाते. गरजवंताला अक्कल नसल्याने प्यावे लागते. हैदराबादी, जयपुरी, मख्खनवाला, मिक्स व्हेज यांची चव सारखीच आढळते. अपवाद असतीलही. हाफ बिर्याणी बरेचदा फुलसारखी दिसते. हीच फुल असेल तर खरी फुल कशी असेल ? थाळी प्रकारात दोन भाज्या ठेवण्याचे प्रयोजन काय ? असे प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे हाटीलवाल्यांनाही माहीत नसतात. अख्खा मसूर नावाचा एक पदार्थ अलीकडे दिसू लागलाय. मी एकदा मला भूक कमी असल्यने अर्धा मसूरच द्या, असे सांगण्याच्या बेतात होतो. चपाती, बोर्नव्हिटा हे प्रकार मेनूकार्डची लांबी वाढवायला लिहितात, असा माझा पक्का समज आहे. जे नाहीये ते मेनूकार्डवर लिहून ठेवायची खोड हॉटेलमालकांना असते. चपाती सांगितल्यावर चपाती नाहीये, रोटी आहे, हे ऐकायला मिळते. बोर्नव्हिटाही नसतो. घरूनच बोर्नव्हिटा न्यावा, त्यांना फक्त दूध मागावे, असे कधी कधी वाटून जाते.
वेटर हा प्रकार फार मजेदार. काही वेटर मुकाट ऑर्डर घेऊन निघून जातात. काही वेटर त्या ऐवजी हे घ्या, असा सल्लाही देतात. काही ऑर्डर आणल्यानंतर आपल्या जवळच उभे राहतात. एका हॉटेलमध्ये वेटर जवळच उभा राहिला, तेव्हा काही काम आहे का, इथे का उभे राहिलात असा प्रश्न विचारून पिटाळून लावावे लागले होते. काही वेटर्सना पदार्थांची यादी तोंडपाठ असते. ते इतक्या वेगात बोलतात की, त्यांच्या तोंडाला स्लो मोशन मशीन बसवावे का, असा विचार येतो. पाणी साधे हवे की बिसलरी हा वेटरसमाजाचा आवडता प्रश्न. तो विचारल्याशिवाय दिवस साजरा होत नाही. काही ठिकाणी मेनू कार्ड दिले जातच नाही. जवळ येऊन फक्त भुवईने विचारले जाते, काय हवंय. जणू ग्राहकाला तिथली यादी पाठ आहे.
आपल्या हॉटेलचे नाव काय ठेवायचे, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. कल्पना, अल्पना, वैशाली, विजय, विठ्ठल कृपा, माऊली कृपा ही नावे मला मोठ्या प्रमाणात दिसली. न्यू हा शब्दही बरेचदा दिसतो. हॉटेलला पन्नास वर्षे झाली तरी न्यू कायम. पूर्वीच्या चित्रपटांत अनेकदा हिंदू हॉटेल असे लिहिलेली पाटी दिसते. सध्या हॉटेलांवर अशी पाटी दिसत नाही. असा उल्लेख करण्याची पध्दत कधीपासून सुरु झाली व का, याबाबत उत्सुकता आहे.
इति हॉटेलललित.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रतिसाद नाही म्हणजे लेखन वाईट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन तितकेही वाईट नाही, परंतु, तेवढा बोल्ड फाँट जर आवरता घेतलात, तर अनंत उपकार होतील. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन वाइट नाही पण बरेच त्रोटक आहे.
हॉटेल च्या नावात न्यू लिहितात ते त्या नावाचे एखादे हॉटेल आसपास असेल तर नव्या नावात न्यू हा शब्द जोडतात.
हिंदु हॉटेल असे लिहायची पद्धत ही पूर्वी असायची. त्या काळी हॉटेल आणि बेकरी व्यवसाय हा बहुतेक वेळा मुस्लीम समाजातील लोक करायचे. त्यांच्या पासून वेगळी ओळख म्हणून हिंदू हा शब्द लिहायचे.
मुंबईत अमूक तमूक हिंदु हॉटेल अशी पाटी असलेली बहुतेक हॉटेले ही भंडारी लोकांची होती. आता तो वर्ग हॉटेल व्यवसायातून जवळजवळ नामशेष झालेला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉटेल च्या नावात न्यू लिहितात ते त्या नावाचे एखादे हॉटेल आसपास असेल तर नव्या नावात न्यू हा शब्द जोडतात.

बरोबर. म्हणजे, 'यॉर्क' या नावाचे प्रसिद्ध शहर जर अस्तित्वात असेल, तर (त्याच्याशी यत्किंचितही संबंध नसलेले) नवे शहर वसविताना त्याला 'न्यूयॉर्क' म्हणायचे, तद्वत. किंवा, 'दिल्ली' किंवा 'मुंबई' किंवा 'फरीदाबाद' या नावाची प्रसिद्ध शहरे जर अस्तित्वात असतील, तर त्यांच्याच आजूबाजूस नवी शहरे (किंवा जुन्या शहरांची एक्स्टेन्शने) वसविताना त्यांना 'नयी दिल्ली'/'न्यू डेल्ही', 'नवी मुंबई', किंवा 'फरीदाबाद न्यू टाउन' म्हणायचे, तसेही म्हणता येईल.

('न्यू ताजमहाल हॉटेल'!!! बसा बोंबलत.)

--------------------

हिंदु हॉटेल असे लिहायची पद्धत ही पूर्वी असायची. त्या काळी हॉटेल आणि बेकरी व्यवसाय हा बहुतेक वेळा मुस्लीम समाजातील लोक करायचे. त्यांच्या पासून वेगळी ओळख म्हणून हिंदू हा शब्द लिहायचे.

हे ठीकच आहे, परंतु कदाचित तेवढेच कारण नसावे.

कसे आहे, की, उपाहारगृहसंस्कृती जेव्हा हिंदुस्थानात रुजू लागली, तेव्हा 'हॉटेलात खाणे म्हणजे पाप' (झालेच तर 'घराची बरबादी', 'बाहेरख्यालीपणा') अशीही काही संकल्पना तत्कालीन तथाकथित 'सभ्य', 'पांढरपेशा' वगैरे धुवट समाजात एकसमयावच्छेदेकरून रुजू घातली होती. त्यातूनसुद्धा धाडस करून म्हणा, किंवा परिस्थितीजन्य नाइलाजास्तव म्हणा, त्याच तथाकथित 'सभ्य' समाजात उपजलेली काही थोडीथोडकी मंडळी तरीसुद्धा (बहुधा चोरून) उपाहारगृहांची पायरी चढू लागली होतीच. मात्र, शिवाशीव, परजातीय/परधर्मीय व्यक्तीने शिजविलेले अन्न खाणे म्हणजे जात/धर्म भ्रष्ट होणे वगैरे बुरसटलेल्या संकल्पनांचा जमाना तो! साधा एखाद्याच्या विहिरीत कोणा पाद्र्याने पावाचा तुकडा जरी टाकला (किंवा, 'आम्ही रात्री हळूच येऊन यांच्या विहिरीत पावाचा तुकडा टाकला होता' अशी अफवा जरी उठविली), तर त्या विहिरीचे पाणी पिणाऱ्या त्या आख्ख्या कुटुंबाचा धर्म बुडत असे. (हिंदू धर्मास पोहावयास शिकविले नव्हते तेव्हा!) नि मग त्या आख्ख्या कुटुंबास आमच्याच धर्माचा समाज वाळीत टाकीत असे, नि मग झक मारीत त्या कुटुंबास ख्रिस्ती धर्म स्वीकारणे भाग पडत असे. किंवा, एखाद्या हिंदू प्रतिष्ठिताने एखाद्या मिशनच्या आवारात पाऊल ठेवून तेथल्या मिशनरींशी काही साधकबाधक चर्चा केली, नि तशी चर्चा करीत असताना तेथे चहाप्राशन जरी केले, तरी त्यावर ग्रामण्याची आफत येत असे. अशा परिस्थितीत, तितकेच धाडस करून, समाजाला धाब्यावर (ढाब्यावर नव्हे!) बसवून एखादा वीर (बहुधा चोरून) उपाहारगृहाची पायरी जरी चढलाच, तरी त्याला (किंवा अशा शेकडा पन्नाससाठ वीरांना), आधीच आपण उपाहारगृहाची पायरी चढतोय, त्यात पुन्हा हे परान्नाबरोबरच परधर्मीयान्न जर निघाले, तर समाजाकडून त्रास होईल काय, अशी भीती वाटत असावीच. (किंवा, अगदी जनाची नसली, तरी मनाची तरी वाटत असणारच. बाहेरख्यालीपणा एक भाव, नि आपण होऊन आपलाच धर्म बुडविणे एक भाव!)

अशा परिस्थितीत, 'अमूकतमूक हिंदू हॉटेल' अशी पाटी लावून, 'हे उपाहारगृह हिंदू लोकांनी चालविलेले आहे; हिंदू पद्धतीचे (तथा हिंदू माणसास खाण्यास योग्य असे) अन्न येथे बनविले जाते, तथा येथील अन्न खाल्ल्याने कोठल्याही हिंदू व्यक्तीचा धर्म बुडण्याची भीती नाही' असे काही (व्हर्च्यू?) सिग्नलिंग उपाहारगृहाची चालकमालकमंडळी करीत असावीत काय?

(ही तथाकथित 'हिंदू हॉटेले' बहुतकरून शाकाहारी असावीत, असे वाटते, परंतु खात्री नाही. (चूभूद्याघ्या.))

(या अशा 'हिंदू हॉटेलां'तून मुस्लिम, ख्रिश्चन, झालेच तर पारशी, वगैरे हिंदवेतरांना प्रवेश निषिद्ध बहुधा नसावा. (तसेही, तत्कालीन कायद्यानुसारसुद्धा असा निषेध कितपत स्वीकारार्ह असावा, याबद्दल साशंक आहे.) परंतु, कोठला हिंदवेतर अशा ठिकाणी मुद्दाम जाईल?)

----------

अतिअवांतर: उत्तरेत अनेक ठिकाणी 'फलानाढिकाना वैष्णो ढाबा' अशा प्रकारच्या पाट्या सर्रास आढळतात. यातील 'वैष्णो ढाबा'बरून, प्रस्तुत खाणावळ शाकाहारी आहे, असे ओळखावे.

'हिंदू ढाबा' तथा 'मुस्लिम ढाबा' असेही प्रकार फार पूर्वी दिल्लीत पाहिल्याचे आठवते. यावरून, प्रस्तुत आस्थापनाचा चालकमालकवर्ग कोण आहे, नि त्यात कशा प्रकारचे अन्न मिळणे अपेक्षित आहे, याबाबत काही अर्थबोध व्हावा. अशा आस्थापनांतील बहुतांश ग्राहकवर्ग कोठल्या डेमोग्राफिकमधील असावा, याबद्दलही काही अंदाज यावरून बांधता यावा. याचा अर्थ, इतरांना अशा ठिकाणी जायला बंदी असते, असा नव्हे. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे, कोण कशाला झक मारावयास जाईल? (किंवा, असे कितीसे लोक जातील?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा परिस्थितीत, 'अमूकतमूक हिंदू हॉटेल' अशी पाटी लावून, 'हे उपाहारगृह हिंदू लोकांनी चालविलेले आहे; हिंदू पद्धतीचे (तथा हिंदू माणसास खाण्यास योग्य असे) अन्न येथे बनविले जाते, तथा येथील अन्न खाल्ल्याने कोठल्याही हिंदू व्यक्तीचा धर्म बुडण्याची भीती नाही' असे काही (व्हर्च्यू?) सिग्नलिंग उपाहारगृहाची चालकमालकमंडळी करीत असावीत काय?

सध्या महाराष्ट्रात बरेच ठिकाणी काही विशिष्ट चालीरीती असलेली मंडळी साई, राम, भैरव, इत्यादी हिंदू नावांचा वापर करुन खाणावळी ( तेच ते रेस्तराँ की काय ते ) चालवतात. तिथे थुंकीचा वापर केला जातो अशा कंड्या अधून मधून पिकत असतात. खरे खोटे देव अथवा असे करणारा अथवा कंडी पिकवणारा जाणे.

असे इथे होत नाही हे सुचवण्यासाठी हिंदू हे नाव वापरले जात असावे. चुभुदेघे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम, 'हॉटेल' हा शब्द (या संदर्भात) चुकीचा आहे.

'हॉटेल' हे प्रामुख्याने राहण्याचे आस्थापन असते, खाण्याचे नव्हे. खाण्याच्या आस्थापनेस 'रेस्तराँ' म्हणतात. (मराठी उच्चार: 'रेस्टॉरंट'.)

(हॉटेलाच्या अंतर्गत कधीकधी एखादे रेस्तराँ असू शकते, जेथे खाण्याची व्यवस्था असू शकते. परंतु, हॉटेलाअंतर्गत रेस्तराँ असणे अनिवार्य नाही. आणि, हॉटेलात लोक राहायला जातात, खायला नव्हे.)

'उपाहारगृह' अशा अर्थी 'हॉटेल' हा शब्द अडाणचोट मराठी/हिंदुस्थानी मंडळी निव्वळ अज्ञानापोटी वापरतात.

सबब, 'रेस्तराँ' म्हणा; अगदी घाटीचोटपणे 'रेष्टारंट' म्हटलेत, तरी चालेल. नपक्षी, (सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर चावल्यागत) 'उपाहारगृह' म्हणा, एक वेळ. परंतु, 'हॉटेल' म्हणू नका, ही कळकळीची विनंती!

एखादा जास्त फिरस्ता मुलगा म्हणे, रोज काय तेच तेच हॉटेल. अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ पुढच्या वेळेस. त्याचे हे बोलणे ऐकून अनुभवाची क्षितिजे हळुहळू रुंदावतायत, असे वाटे. कोणतेही हॉटेल घ्या. पोहे हा ठरलेला पदार्थ असतो.

आँ! हल्ली 'कॅफे गुडलक'मध्येसुद्धा पोहे मिळू लागले काय?

(एकंदरीत, तुमच्या अनुभवाची क्षितिजे पुरेशी रुंदावली नाहीत, म्हणायची!)

न्यू हा शब्दही बरेचदा दिसतो. हॉटेलला पन्नास वर्षे झाली तरी न्यू कायम. पूर्वीच्या चित्रपटांत अनेकदा हिंदू हॉटेल असे लिहिलेली पाटी दिसते. सध्या हॉटेलांवर अशी पाटी दिसत नाही. असा उल्लेख करण्याची पध्दत कधीपासून सुरु झाली व का, याबाबत उत्सुकता आहे.

या दोन्हीं मुद्द्यांबाबत विवेचन याच धाग्यावरील प्रतिसादांत अन्यत्र केलेले आहे, त्याची पुनरावृत्ती करीत नाही. एक निरीक्षण मात्र नोंदवितो.

सुप्रसिद्ध 'ताजमहाल हॉटेला'वरून प्रेरणा घेऊन बांधलेली अनेक 'न्यू ताजमहाल हॉटेले' वेळोवेळी पाहण्यात आलेली आहेत. (नक्की कोठे, ते आठवत नाही, परंतु ते महत्त्वाचे नाही. टेक माय वर्ड फॉर इट.) यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की, मूळचे 'ताजमहाल हॉटेल' हे 'हॉटेल' आहे; त्यावरून प्रेरणा घेऊन बांधलेल्या 'न्यू' आवृत्त्या मात्र बहुतेककरून केवळ 'रेस्तराँ' असतात. चालायचेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. सर्व तज्ज्ञांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतासारख्या भ्रष्टाचार नी पूर्ण बुडलेल्या देशात .सामान्य हॉटेल पासून five star hotel पर्यंत .
त्या हॉटेल मध्ये बनत असणाऱ्या अन्न पदार्थ चा दर्जा काय असेल .
ह्याचा फक्त विचार करा
मध्ये बांद्रा मध्ये चिकन च्या डिश मध्ये उंदीर मिळाला होता अशी बातमी मीडिया नी दिली होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही आपले घरीच जेवत जा ! तेवढं काळं हिट आणा झुरळांना मारायला म्हणजे चिंता नको.

हाटिलात जाऊच नका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0