बिबट्याच्या कातड्याची पिलबॉक्स टोपी

#अंकाविषयी #ललित #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

बिबट्याच्या कातड्याची पिलबॉक्स टोपी

मूळ लेखक - डग्लस अ‍ॅडम्स

- अनुवाद -आदूबाळ

मूळ कथा : 'Last Chance to See'

.

झाईरमध्ये1 येण्यासाठी मिशनऱ्यांच्या विमानात शिरकाव करावा लागेल असं आम्हांला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. किन्शासाला जा-ये करणाऱ्या विमानसेवेने मान टाकली होती. झाईर आणि त्यांच्या भूतपूर्व वसाहतीय मालकांच्या (म्हणजे बेल्जियनांच्या) भांडणांमुळे हा त्रास नशिबी आला होता. पण आमच्या मार्कने टेलेक्स करून केलेल्या काही कुशल आंतरराष्ट्रीय काड्यांमुळे आम्हांला परसदाराने - म्हणजे नैरोबीमार्गे - झाईरमध्ये प्रवेश मिळू शकत होता.

आम्ही झाईरमध्ये गेंडे बघायला निघालो होतो. उत्तरी सफेद गेंडे (northern white rhinoceroses). झाईरमध्ये असे २२ गेंडे आहेत आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये आठ. पण चेकोस्लोवाकियातले गेंडे विसाव्या शतकातल्या एका सर्किट गेंडेसंग्राहकाच्या प्रयत्नांमुळे त्या देशात पोचले होते. अर्थातच ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नाहीत, प्राणीसंग्रहालयात आहेत. सॅन दिएगो प्राणी संग्रहालयातही थोडे गेंडे आहेत.

आमचं विमान लहानसं, अवघ्या १६ शिटा असलेलं होतं. त्यात आम्ही तिघे : मार्क कार्वर्डीन, ख्रिस म्यूर (आमचा बीबीसी ध्वनिसंयोजक), आणि मी असे होतो. उरलेल्या १३ जागा मिशनऱ्यांनी अडवल्या होत्या. म्हणजे मिशनरी, मिशन शाळेतले शिक्षक, आणि एक म्हातारंसं अमेरिकन जोडपं. त्या जोडप्याने 'आम्ही मिशनरी नाही हां, पण मिशनच्या कार्यात आम्हांला खूप रस आहे' असं सुरुवातीलाच ठासून सांगितलं. त्यांनी फक्त मायामीतच मिळणाऱ्या सुक्यागवती टोप्या घातल्या होत्या, गळ्यात कॅमेरे लटकवले होते, आणि एक बधिरप्रेमळ हसू ते येणाऱ्याजाणाऱ्याच्या अंगावर शिंपडत होते.

त्याआधी नैरोबीच्या कडाक्याच्या उन्हात आम्ही दोन तास विल्सन विमानतळावर कस्टम्स आणि इमिग्रेशन कचेर्‍यांच्या वाऱ्या करण्यात घालवले होते. वेळोवेळी आम्ही खिडकीतून बाहेर बघून विचार करायचो : यांपैकी कोणतं विमान आपलं असेल? आपले सहप्रवासी कोण असतील? तर भाळी आले हे मिशनरी! साध्या वेशातल्या मिशनऱ्याला बघताक्षणी ओळखणं कठीण आहे, पण हे कोण असावेत हे लवकरच आम्हांला उलगडलं. प्रतीक्षागृह ही एक पत्र्याची लहानशी खोपटवजा इमारत होती. त्यात फक्त तीन लोक बसू शकतील असं तोकडं बाकडं होतं. आमचे सहप्रवासी 'पहले आप', 'पहले आप' करत एकमेकांना त्या तीन जागा देऊ करत होते. हे आग्रह-प्रकरण इतकं झालं, की आम्ही सोळाही जण उभे होतो आणि तोकडंबाकडं रिकामं! शेवटी ख्रिसने गेलिकमध्ये काही स्तुतिसुमनं पुटपुटत तोकड्याबाकड्याचा ताबा घेतला. आपला रेकॉर्डिंगचा चंबुगबाळा उशाशी घेऊन पार अगदी विमान निघेपर्यंत भाऊ घोरत होते. ही कल्पना मला आधी सुचली असती, तर बरं झालं असतं. असो.

मार्कच्या चिडचिडीमुळे त्याला मिशनरी लोक आवडत नसत हे माझ्या लक्षात आलं. त्याला हे जीव आफ्रिका आणि आशियात अनेक ठिकाणी भेटले होते, आणि संबंध उभयपक्षी प्रेमाचे नव्हते. आम्ही लहानशा विमानातल्या इतकुश्या शिटांकडे जाताना मार्कच्या हालचालीत ताण स्पष्ट जाणवत होता. आत बसल्यावर मीही दडपलो. कारण उड्डाणापूर्वी आमच्या पायलटने आम्ही कुठून कुठे जाणार, विमानात सुरक्षा कशी बाळगायची वगैरे माहिती तर दिलीच, पण शेवटी येशूची एक प्रार्थनाही म्हटली.

'प्रभू आशिष दे आम्हांस या दिनी' ठीक आहे, पण 'तुझिया रे हाती आमुची जीवनी'मुळे नाही म्हटलं तरी टरकायला झालं. विमान उडवायचा दांडू हातात घेताना मुखी असली ऋचा असणं योग्य नाही. या स्थितीत शिटांच्या हातांना गच्च धरून बसलेलो असतानाच विमान गडगडायला लागलं. धावपट्टीच्या टोकाशी येणाऱ्या एका जाडजूड डाकोटा विमानाला जागा करून देण्यासाठी क्षणभर थांबलं. ते डाकोटा विमान ग्रेट रिफ्ट व्हॅलीमध्ये खराब हवामानामुळे तीसेक वर्षं अडकून राहिल्यासारखं जीर्ण दिसत होतं.

भूगोल आणि भूमितीच्या पुस्तकात काहीही लिहिलेलं असो, पण केनियाच्या माथ्यावरचं आकाश जरा जास्तच विस्तीर्ण आहे. त्या पोकळीत एकदा प्रवेश केला, की या अंतहीन गालिचावर आपण जगाच्या अंतापर्यंत सरपटत राहणार या विचाराने मनावर दडपण येतं.

इकडे विमानाच्या आत आमचे मिशनरी इतके चिकटगोड वागत होते, की ओ येईल की काय असं वाटायला लागलं. मिशनऱ्यांच्या शाळेत विशिष्ट प्रकारच्या हसण्याची तालीम घेत असावेत. सुरुवातीला संपूर्ण चेहेऱ्यावर पसरलेलं हे हसू दहाएक सेकंदांत समुद्राची लाट ओसरावी तसं हळूहळू विरत जातं. सगळ्यांना चश्मे होते. त्यांच्या काड्या वरच्या बाजूला काळ्या आणि खालच्या बाजूला पारदर्शक होत्या. असले चश्मे फक्त इंग्लिश खेड्यांतले पाद्री, रसायनशास्त्राचे शिक्षक, आणि अर्थातच मिशनरी लोक घालतात. एकंदर वातावरण सात्त्विक पवित्र होतं. या लाटा अंगावर झेलत आम्ही तिघे शहाण्या बाळांसारखे चुपचाप बसलो होतो.

मला सात्त्विक सात्त्विक वाटायला लागलं, की मी नकळत काहीतरी गुणगुणत बसतो. याचा माझ्या शेजारी बसलेल्या मिशनऱ्याला त्रास होत असावा. एक विरतं हसू माझ्याकडे फेकत तो त्याच्या वैताग मोकळा करता झाला. मी ते चुकवलं खरं; मात्र लगोलग त्याला एक रट्टा ठेवून द्यायची जबर सुरसुरी आली.

मला मिशनरी ही संकल्पना आवडत नाही. म्हणजे मिशनरी ही व्यक्ती आवडत नाही असं नाही - ती आवडू किंवा नावडू शकते. मिशनरी या संकल्पनेची मला भीती वाटते. माझा देवावर विश्वास नाही. किमान, इंग्रजांच्या खास इंग्रजी गरजा भागवणाऱ्या देवावर माझा विश्वास नाही. टक्कल झाकणारे केसांचे टोप, टेलिव्हिजन, आणि टोल फ्री टेलिफोन नंबर या अमेरिकनांच्या खास अमेरिकी गरजा पुरवणाऱ्या देवावरही नाही. माझा विरोध देवाला मानणाऱ्या लोकांनाही नाही. आपापल्या घरात काय हवं ते करावं, हरकत नाही, पण विकसनशील देशांत तुमचा देव नेण्याची काहीच गरज नाही.

मायामीच्या सुक्यागवती टोप्या खिडकीबाहेर दिसणाऱ्या विस्तीर्ण आफ्रिका खंडावर आपलं विरतं हसू बरसवत होत्या. केनिया पर्वताकडे बघून त्यांनी हस्तिदंती केली, किलिमांजारोला डोळा घातला, आणि पायाखालून सरकत जाणाऱ्या ग्रेट रिफ्ट व्हॅलीकडे एक बधिर स्मितहास्य फेकलं. टांझानियातल्या मवान्झामध्ये (Mwanza) आमचा एक थांबा असेल हे कळल्यावर त्यांच्या अकारण आनंदाला काही पारावार उरला नाही. आमच्या उरला.

आमचं विमान एका एष्टी ष्ट्यांडासमोर उतरलं. हा मवान्झा विमानतळ असून अर्धा तास त्यातल्या 'आंतरराष्ट्रीय प्रवाशी संक्रमण विश्रामगृहा'त (अर्थात international transit lounge मध्ये) आमची 'सोय' केलेली असल्याची सुवार्ता श्री. पायलट यांनी दिली.

ते एक डंबेलच्या आकाराचं काँक्रीट खोपट होतं. डंबेलची दोन्ही जाड टोकं म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या खोल्या, आणि त्यांना जोडणारा अरुंद बोळ. त्या इमारतीला एक विचित्र बॉम्बहल्ल्योत्तर रुपडं होतं - खडबडीत भिंती आणि आतून डोकावणाऱ्या लोखंडी सळया. हा देखावा झाकण्यासाठी काही ठिकाणी इटालियन प्रवास कंपन्यांची जुनी पत्रकं डकवली होती. आम्ही त्यांपैकी एका खोलीत शिरलो, जड कॅमेरे असलेल्या बॅगा जमिनीवर आदळल्या आणि प्लास्टिक खुर्च्यांवर कोसळलो. मी खिशातून एक चुरगळलेली सिगारेट काढली. मार्कने आपला निकॉन कॅमेरा काढला, आणि मी झुरके मारतानाचं रोमहर्षक दृश्य टिपू लागला. यापेक्षा काही बरा चाळा त्याला मिळला नाही.

काही क्षणांतच एक खाकी गणवेश आमच्या मागे आला. त्याने दारातून आम्हांला नीट न्याहाळलं, आणि पुढे येऊन आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवाशी तर नाही याची खातरजमा करायला सुरुवात केली. आम्ही नेमके तेच असल्याचं शुभवर्तमान त्याला कळलं. त्याच्या चेहऱ्यावर जगरहाटीला कंटाळून गेल्याचे भाव आले. आम्ही इथे नाही, दुसऱ्या खोलीत जाणं अपेक्षित होतं ही माहिती त्याने दिली. आमच्यासारख्या शिकल्यासवरल्या झंटलमन लोकांना एट्ली शिंपल गोष्ट कळू नये? आलेलं नैराश्य त्याने लपवलं नाही. तो दाराला टेकून उभा राहिला आणि आम्ही सिगारेटी टाकून कॅमेरे उचलून तिथून कटेपर्यंत भुवया नाचवत बसला. एकूणच मानवी निर्बुद्धतेबद्दल आणि स्खलनशीलतेबद्दल वाटणारी अपार करुणा त्याच्या चेहऱ्यावरून निथळत होती.

नवी खोली पहिल्या खोलीसारखीच होती. एकच फरक होता - एका भिंतीत एक चौकोनी खाच होती, आणि तीत एक कंटाळलेल्या कोऱ्या चेहऱ्याच्या मुलीचं धड दिसत होतं. चेहेरा ओंजळीत धरून ती भिंतीवर चढणाऱ्या मुंग्यांच्या ओळीचं एकाग्रतेने निरीक्षण करत होती. एकाग्रता असली, तरी तिला त्यात फारसा रस दिसत नव्हता, कारण त्या मुंग्या नेहमी करतात त्यापेक्षा निराळं काही करत नव्हत्या. तिच्या पाठीमागे बिस्किटं, चॉकलेटं, कोला, आणि कॉफी ठेवलेलं एक टेबल दिसलं, आणि शमेकडे आकर्षित होणाऱ्या परवान्याप्रमाणे आम्ही तिकडे झेप घेतली.

पण ते मृगजळ हाती येण्यापूर्वीच एका निळ्या गणवेशाने आम्हांला हटकलं. त्याच्या चेहेऱ्यावरचा प्रश्न वाचून आम्ही स्पष्टीकरण दिलं, की आम्ही झाईरच्या संक्रमणाची वाट पाहणारे आंतरराष्ट्रीय प्रवाशी आहोत. त्याने आमच्याकडे दयार्द्र दृष्टिक्षेप टाकून आम्हांला पहिल्या खोलीत जायला फर्मावलं. "इथे संक्रमणवाले चालत नाहीत", तो म्हणाला. आणि आम्हांला त्या खाद्यपदार्थवाल्या खाचेकडून हाकलत पहिल्या खोलीच्या दिशेने धाडलं. तिच्या दारात तो खाकी गणवेश ठाकलेलाच होता.

त्याने आमच्याकडे पाहिलं. आम्ही त्याच्याकडे पाहिलं.

आम्हांला परतलेलं पाहून त्याचे खांदे दुःखाने झुकले, मान रागाने वर आली, अतीव घनदाट वैतागाने त्याने सैरावैरा हातवारे केले. जग मिथ्या असल्याच्या जाणीवेने त्याच्या डोळ्यांतून अश्रू पाझरले.

'तुम्ही - चुकीच्या - खोलीत - आला - आहात,' त्याने एक एक शब्द तोडून आम्हांला 'पष्ट' सांगितलं. 'तुम्ही आंतरराष्ट्रीय संक्रमणवाले आहात. कृपया दुसऱ्या खोलीत जा.'

अशा वेळी आपल्या मनावर एक चिरशांतीचा तवंग येतो. गोष्टी पावसाने धुतल्यासारख्या स्वच्छ स्वच्छ दिसायला लागतात. आम्ही कुठल्याच खोलीतल्या गणवेशाला नको होतो. म्हणजे आम्ही कुठेही जाऊ शकत होतो. निर्णय आमचा होता. आणि कुठली खोली निवडायची हा निर्णय भिंतीतल्या खाचेमुळे सोपा झाला होता. झेन बौद्धाच्या थाटात आम्ही शांतपणे आमचं सामान उचललं आणि दुसऱ्या खोलीत गेलो. तिथे निळा गणवेश परत सामोरा आला, आणि त्याने संयम राखत आम्हांला पहिल्या खोलीत जायला सांगितलं. आम्ही तितकाच संयम राखत त्याला कृपया बोच्यात जायला सांगितलं. आम्हांला चॉकलेट, कॉफी, एखादं चुकार बिस्कीट खुणावत होतं. पण खाचेकडे जाताच आणखी एक माशी शिंकली.

खाचेतल्या ताई आम्हांला काही विकायला राजी नव्हत्या. किंबहुना आम्ही असा काही प्रस्ताव घेऊन आलो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. ओंजळीत रुतवलेला चेहेरा आडवा आडवा हलवत तिने आपलं मत प्रदर्शित केलं. भिंतीवरच्या मुंग्यांना खळ नव्हता.

ताईंशी संवाद साधणं हे चिकट डिंकाचा लाडू काट्याचमच्याने खाण्याइतकं वेळखाऊ काम होतं. अंती आम्हांला ज्ञान झालं ते येणेप्रमाणे : तिला फक्त टांझानियन चलन स्वीकारायची परवानगी होती. आणि आमचे चेहेरे पाहूनच 'असल्या' लोकांकडे ते चलन नसणार याची तिला खात्री पटली होती. किंबहुना तिने शेवटची विक्री करून भरपूर दिवस लोटले होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशी संक्रमण विश्रामगृहात परकीय चलन बदलून मिळायची सोय नव्हती. त्यामुळे कोणाकडेच टांझानियन चलन असणं शक्य नव्हतं, आणि म्हणूनच ती कोणालाच काहीही विकू शकत नव्हती.

काही मिनिटं निष्फळ वाद घालून झाल्यावर तिच्या अभेद्य तर्कशास्त्रातलं सौंदर्य आमच्या लक्षात आलं. उरलेला वेळ आम्ही कॉफी आणि चॉकलेटांकडे आशाळभूत नजरेने पाहत घालवला. आमच्या खिशातल्या डॉलर, पौंड, फ्रेंच फ्रँक्स, आणि केनिया शिलिंगांत वावरणारी लक्ष्मी निरुपायाने जिथल्या तिथे राहिली. ताई मुंग्यांकडे पाहत राहिल्या. थोड्या वेळाने आम्हीही थोडा मुंगीअभ्यास केला.

आमचं विमान तयार असल्याचा सांगावा एकदाचा आला आणि आम्ही आमच्या मिशनरी सहप्रवाशांकडे परतलो. आमच्या आयुष्यात इतकं सगळं घडत होतं तेव्हा हे लोक होते कुठे? आम्ही विचारलं नाही.

तासाभरात आम्ही एकदाचे बुकावूला पोचलो. विमानझोपड्यांकडे आमचं विमान घरंगळत जाताना मिशनऱ्यांना अचानक कंठ फुटला. 'अय्या कित्ती छान! खुद्द बिशप आलेत आपल्या स्वागताला!' बिशपसाहेब चांगले दांडगट होते. या उकाड्यातही त्यांनी जांभळा रेशमी झगा घातला होता, आणि डोळ्यांवर वर काळ्या - खाली पारदर्शक काड्यांचा चश्मा होताच. मिशनरी, मिशन शाळेतले शिक्षक, आणि मिशनरी नसलेलं पण मिशनकार्यात खूप रस असणारं म्हातारंसं अमेरिकन जोडपं त्यांच्या दिशेने गेलं आणि आम्ही येरू आपापल्या जड कॅमेऱ्यांच्या खोळी उचलून इमिग्रेशनच्या दिशेने निघालो.

आम्ही झाईरमध्ये पोचलो होतो.

झाईर देशाचा नेमका लोचा काय आहे हे एका टुरिष्ट हापिसराने दिलेल्या कार्डावरून स्पष्ट होईल.

कार्डाची एक बाजू टुरिस्टांसाठी होती, आणि त्यावर इंग्रजीत लिहिलं होतं :

महोदया/महोदय,

झाईरच्या संस्थापक राष्ट्राध्यक्षांच्या वतीने, त्यांच्या सरकारच्या वतीने, आणि देशातल्या तमाम नागरिकांच्या वतीने तुमचा झाईरमधला मुक्काम सुखकर होवो अशी शुभेच्छा व्यक्त करायची आज्ञा मला झाली आहे. या देशात तुम्हांला भव्य नजारे बघायला मिळतील, समृद्ध वनस्पतीसृष्टी बघायला मिळेल, आणि दुर्मीळ प्राणिसृष्टी बघायला मिळेल. या संस्कृतीचा आणि लोककथांनी समृद्ध परंपरेचा अनुभव तुम्हांला झाईरियन नागरिकांच्या आदरातिथ्याद्वारे घेता येईल.

आमचा देश तुलनेने नवा आहे. तुमच्या सूचनांचा आम्हांला उपयोगच होईल, आणि त्या सूचना अमलात आणल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांना जेव्हा इथे पर्यटनाला पाठवाल तेव्हा आम्ही त्यांचं आदरातिथ्य आणखी चांगल्या प्रकारे करू शकू.

पर्यटनमंत्री

सरकारी लेखन म्हणून हे ठीकच आहे. पण कार्डाच्या दुसऱ्या बाजूला जे लिहिलेलं होतं त्याने चिंता वाटू लागली. ही कार्डाची दुसरी बाजू स्थानिक लोकांना दाखवणं अपेक्षित होतं. त्यावर लिहिलं होतं :

झाईरियन बांधवांनो! आपल्या पाहुण्यांना मदत करा! हे कार्ड तुम्हांला दाखवणारा माणूस आपल्या देशात थोड्या काळासाठी आला आहे.

त्याला फोटो काढायची इच्छा असेल, तर संयमाने आणि सौजन्याने वागा. त्याचा मुक्काम आनंदाचा होईल याची काळजी घ्या. असं झालं, तर तो परत येईल, आणि त्याच्या चार स्नेहीमंडळींना आपला देश बघायला पाठवेल.

या पाहुण्याला केलेली मदत हे देशकार्य आहे. पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांतून आपण शाळा, इस्पितळं, आणि कारखाने बांधतो.

आपल्या पर्यटनव्यवसायाचं भवितव्य तुमच्या हातात आहे.

आता किंचित धमकावणीच्या सुरात हा उपदेश द्यावा लागावा हे जरा वाईट आहे. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे हा संपूर्ण मजकूर इंग्रजीत लिहिला आहे.

फार कमी 'झाईरियन बांधव' - खरं तर ते स्वतःला झाईरवा (Zaïrois) म्हणतात - इंग्रजी जाणतात.

पण कार्ड काहीही म्हणो, खरं तर झार्झरमधला पायंडा काही औरच आहे. प्रत्येक अधिकारी शक्य त्या मार्गांनी शक्य ती अडवणूक करतो. वट्ट यू एस डालर मोजल्याशिवाय ढिम्म हलत नाही. एकदा ते मोजलेत, की तुम्हांला पुढच्या अधिकाऱ्याकडे पाठवतो, आणि पहिले पाढे अठ्ठावन्न होतात. सगळं संपेपर्यंत ही प्रक्रिया जीवघेण्या पातळीला पोचलेली असते. त्या मानाने झाईरमध्ये आमचा पहिला प्रवेश सोपा म्हणायचा - फक्त दोनच तास उघड्या मैदानातल्या पावसात आणि बंद झोपड्यांतल्या घुसमटीत काढावे लागले.

आम्ही झाईरमध्ये पाहिलेल्या पहिल्या चित्राने आम्हांला दुर्मीळ वन्यप्राणी बघायची आमची मोहीम कशी असणार याचे संकेत दिले. पहिल्या चित्रात एक बिबट्या होता - किंवा बिबट्याच्या शरीराचा एक भाग होता असं म्हणू. त्या बिबट्याची कातडी कमावून त्याची उभट 'पिलबॉक्स' टोपी केली होती. त्या टोपीखाली होते मार्शल मोबुटू सेसे सेको कुकू ङ्बेंडू वा झा बंगा, झाईर गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष. ते त्या टोपीखालून आमच्याकडे राजेशाही कृपेचा कटाक्ष टाकत होते, आणि इकडे त्यांचे अधिकारी आमच्या पैशांच्या पाकीटावर डोळा ठेवून होते.

a

पहिला अधिकारी चांगला जाडजूड होता. त्याचा चेहेरा दयाळू होता आणि अधूनमधून तो आम्हांला सिगारेटी देत होता. दुसरा बुटका लुकडा अधिकारी दुष्ट प्रवृत्तीचा होता आणि आमच्या सिगारेटी चोरत होता. कैद्यांची जबानी घ्यायची ही हमखास वहिवाट आहे. एकाआड एक सुष्टपणाच्या आणि दुष्टपणाच्या मार्‍याने कैदी मानसिकदृष्ट्या कोलमडून पडतो. ही पद्धत ते आधीच्या नोकरीत शिकले असणार आणि आता नोकरी बदलली तरी जुन्या सवयी सुटल्या नसाव्यात. खरं तर एवढं करायची गरज नव्हती - शेवटी असं कळलं, की त्यांना आमचं नाव, पासपोर्ट क्रमांक, आणि आमच्याजवळच्या प्रत्येक यंत्राचे अनुक्रमांक हवे होते.

जाड्या अधिकाऱ्याच्या वागण्यात 'मला हे करायला आवडत नाही, पण काय करणार, मला दिलेलं कामच आहे हे, त्याला माझाही इलाज नाही' असा एक भाव होता. आमची सहानुभूती मिळवायची त्याची खटपट चालू होती. छळ करणारे आणि छळले जाणारे, किंवा अपहरण करणारे आणि अपहृत यांच्यामध्ये असा नाजूक बंध तयार होतो असं वाचलं होतं (स्टॉकहोम सिंड्रोम). आम्हांला जे अनंत फॉर्म त्याने 'निरुपायाने' भरायला लावले त्यावरची 'बेल्जियन काँगो' या अक्षरांवर पेन्सिलने काट कारून तिथे त्याच पेन्सिलने 'झाईर' लिहिलं होतं. याचा अर्थ ते फॉर्म किमान अठरा वर्षं जुने होते. पण आम्हांला खरोखर हवा होता तोच फॉर्म नेमका त्यांच्याकडे नव्हता! आम्हांला अनुभवी मित्रांनी सांगितलं होतं, की झाईरमध्ये प्रवेश करतानाच आपल्याजवळचे परकीय चलन घोषित करणारा फॉर्म भरून त्यावर सरकारी शिक्काकट्यार उमटवून घ्या. नाहीतर पुढे अडचण येईल. आम्ही पुनःपुन्हा मागूनही त्यांनी नेमका तोच फॉर्म दिला नाही. संपला होता म्हणे. ते म्हणाले, "पुढे गोमा शहरी पाहिजे तितके तसले फॉर्म आहेत, आणि तिथे भरला तरी हरकत नाही."

जाड्यारड्याने माझा केम्ब्रिज झेड८८ लॅपटॉप जप्त करावा की कसे यावर थोडा खल केला. न जाणो या इसमाने त्यावरून काही सरकारविरोधी कृत्ये केली तर? पण शेवटी ख्रिसजवळचं मोटारगाड्यांची चित्रं असलेलं मासिक जप्त करण्यावर भागलं, कारण म्हणे रड्याला मोटारगाड्यांचा छंद होता. तर आमची सुटका झाली. सध्यापुरती तरी.

आम्ही एका टॅक्सीसदृश वाहनातून बकावू शहरात जायला निघालो. विमानतळ गावापासून बराच लांब होता. किंवा किमान टॅक्सीवाल्यांच्या जगात तो तितका लांब होता. तलावाच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या एका खडबडीत खड्डेदार रस्त्यावरून आम्ही जात होतो. रस्त्यावर मजबूत गर्दी होती. मध्येच आमचा चक्रधर खाली वाकत काही खुडबूड करायचा आणि बराच वेळ काचेच्या पातळीवर परतायचा नाही.

सुरुवातीला उत्सुकतेने मी त्याचा हा उद्योग बघत होतो. पण तो काय कारणासाठी खाली वाकून बसतो आहे हे कळल्यावर माझी फाटून हातात आली. तो इसम गाडीचा क्लच हाताने दाबत होता! इतरांना ही माहिती द्यावी का हा विचार करण्यात मी काही मिनिटं घालवली. पण त्यांना उगाच काळजीत पाडून मी काय मिळवणार होतो? मार्क नंतर म्हणाला, की संपूर्ण प्रवासात त्याला एकही धडधाकट मोटारवाहन दिसलं नाही. तसे दोन ट्रक दिसले; त्यांचं धड तसं धाकट असलं तरी मागची चाकं गायब होती. हे दृश्य मला दिसलं नाही, कारण एकदा ती क्लचची भानगड लक्षात आल्यावर मी डोळे जे घट्ट मिटून घेतले ते उघडलेच नाहीत.

एकदाचे आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. धुळकट पडक्या बकावूच्या मानाने आमचं हॉटेल चांगलं प्रशस्त आणि हवेशीर होतं. एकंदर दिवसभराच्या आदळआपटपूर्ण प्रवासाची फलश्रुती म्हणून आम्हांला अनावर जांभया येऊ लागल्या. संध्याकाळचे सहाच वाजले होते तरी आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये पडी टाकण्याच्या इराद्याने दडी मारली.

झोपी जाण्यापूर्वी मी खिडकीत बसून समोरच्या किवू सरोवरावर होणारा सूर्यास्त पाहत बसलो. सरोवरात जाणाऱ्या जमिनीच्या सुळक्यावर वसलेलं बकावू इथून फार सुरम्य दिसत होतं. किवू सरोवराचं चंदेरी पाणी शांत होतं. दूरवर पाण्याचा चंदेरी रंग हळूहळू राखाडी होत पलीकडच्या पर्वतांत मिसळून गेला होता.

किवू सरोवर

उतरत्या उन्हात जुन्या बेल्जियन शैलीतल्या बंगल्यांवर पर्वतांच्या लांब छाया पसरत चालल्या होत्या. बंगल्यांभोवती देखणी रंगीबेरंगी फुलझाडं आणि पाम वृक्षांचे पुंजके होते. नव्या घरांवरचे हिडीस पत्रेही मावळत्या सूर्याच्या प्रकाशात बरे दिसत होते. सरोवरावर उडणाऱ्या घारी बघत मला शांत शांत वाटायला लागलं. आता झोपायला जायला हरकत नाही असं मनात येताच एकदम घात झाल्याची भावना आली. मी परत एकदा आधल्या मुक्कामातल्या हॉटेलात महत्त्वाच्या वस्तू विसरून आलो होतो. टूथपेस्ट. सिगारेट लायटर. आणि लिहिण्याचे कागद. बकावू शहराची सैर करायलाच लागणार होती.

एका मोठ्या टेकाडावर असलेला मुख्य रस्ता चांगला प्रशस्त होता, पण कचऱ्याने भरलेला अस्ताव्यस्त होता. दुकानं काँक्रीटची पण अंधारी होती. झाईर पूर्वाश्रमीची बेल्जियन वसाहत असल्याने एकाआड एक दुकानं 'pharmacie' होती. पण त्यातला एकाही माईच्या 'लाला'कडे टूथपेस्ट नव्हती.

बाकीची दुकानं नेमकं काय विकतात हे कोडंच होतं. एखाद्या दुकानाच्या खिडकीत रेडियो, मोजे, साबण, आणि चिकन दिसलं, तर आत जाऊन त्यांना 'तुमच्याकडे टूथपेस्ट किंवा कागद गावल का हो भौ?' असं विचारण्यात मला तरी हरकत वाटली नाही. पण असं विचारल्यावर त्यांना अपमान वाटू शकेल हे माझ्या लक्षात आलं नाही. दिसत नाय आम्ही रेडियो, मोजे, साबण, आणि चिकन विकतो? अर्धा तास अर्धा मैल तो रस्ता पालथा घातल्यावर शेवटी एक हातगाडी भेटली. त्यावर टूथपेस्ट आणि कागद यांच्याबरोबर बॉलपेनं, एअरमेल पाकिटं, आणि - अहो आश्चर्यम् - सिगारेट लायटरही होते! चक्क विकायला! त्याच्याकडे 'न्यू सायंटिस्ट'चा ताजा अंक आहे का हे विचारायची उबळ मी कशीबशी दाबली.

सगळ्या जीवनावश्यक गरजा इथे हातगाडीवरून भागतात असं माझ्या लवकरच ध्यानात आलं. उदा० छायाप्रती काढणे. इथेतिथे तकलादू फळकुटांच्या टेबलांवर भली दांडगी झेरॉक्स यंत्रं ठेवली होती. एकदोनदा रस्त्यावर हिंडणाऱ्या एका दलालाने मला कशाची छायाप्रत काढायची आहे का हे विचारलं. मी नकार दिल्यावर त्याच्या बहिणीसोबत शय्यासोबत करायची संधीही देऊ केली. या सगळ्याला टाळून मी हॉटेलवर परतलो. मला मिळालेला लिहायचा कागद - का कोण जाणे - गुलाबी होता. त्यावर थोड्या नोंदी केल्या, आणि ढाराढूर झोपलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही गेंड्यांच्या जंगलाजवळ असलेल्या गोमा शहरी जाण्याचं विमान पकडलं. गोमा विमानतळावर समजलं, की झाईरमध्ये आतल्याआत प्रवास केला, तरी परदेशी नागरिकांना इमिग्रेशन आणि कस्टम्स सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यात तुमचा पार पाडाव व्हायची शक्यता असते. आमचं जुनं दुखणं इथे परत उफाळून आलं. कडेकोट सशस्त्र बंदोबस्तात आम्हांला बदमाश दिसणाऱ्या एका धिप्पाड गणवेशाकडे नेलं.

"परकीय चलन घोषणा फॉर्म?" त्याने विचारलं.

बकावूमधले ते फॉर्म संपले होते हे तो ऐकूनच घेईना.

"पन्नास डॉलर्स." तो मान हलवत म्हणाला.

त्याच्या प्रशस्त खोलीत त्याचा आडवा विस्तार जेमतेम मावेल इतकं बारकुसं मेज होतं, आणि खणात तब्बल दोन सुटे कागद. खुर्चीवर मागे रेलत त्याने आढ्याकडे बघत तत्त्वचिंतन केलं. त्या आढ्याने असले बरेच प्रसंग पाहिले असणार. तो हळूहळू पुढे रेलला आणि तळव्यांनी स्वतःचा चेहेरा खसाखसा पुसला.

'पन्नास डॉलर. प्रत्येकी.' त्याने डेस्काच्या कोपऱ्यातली एक पेन्सिल उचलली आणि ती बोटांतून फिरवायचा खेळ तो खेळू लागला.

आम्ही मोडक्यातोडक्या फ्रेंचमध्ये आमची बाजू मांडली. तो परत पन्नास डॉलर्स म्हणाला. आम्ही परत फ्रेंच भाषेचा कोथळा काढला. हे द्वंद्व तासभर चाललं. शेवटी तो कंटाळला आणि त्याने आम्हांला सोडून दिलं.

आम्ही विमानतळाबाहेर पडताच आम्हांला विरुंगा ज्वालामुखीकडे नेणारा ड्रायव्हर आम्हांला सामोरा आला. मार्कच्या काही मित्रांनी त्याच्याशी बोलून आमच्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती.

आम्ही झाईरमध्ये गोरिले बघायला आलो नव्हतो. पण आता आलोच होतो, तर बघणं भाग होतं. गोरिला हा मानवाचा उत्क्रांतीतला सर्वांत जवळचा नातलग. पण गोरिला बघायला जायचं हे कारण नव्हतं. नवीन शहरात गेलो, तर तिथे राहणाऱ्या नातेवाईकांना सहसा फाट्यावर कोलायची माझी सवय आहे. गोरिल्यांबाबत ती भीती नव्हती. त्यांतला कोणी आम्हांला जेवायला बोलावून कोट्यवधी वर्षांचं कौटुंबिक गॉसिप सांगून सडवणार नव्हता.

गोरिला आणि आपण मानव यांचा पूर्वज एकच आहे. त्या पूर्वजाबद्दल डार्विनच्या काळापासून मतभेद आहेत. या पूर्वजाचं नाव महावानर (great ape). आपण मानव स्वतःला हल्ली वानर म्हणवून घेत नाही. एलिस बेटावर आलेल्या स्थलांतरित लोकांप्रमाणे आपण आपली नावं बदलली आहेत.2 आपल्या महावानरकुळात आपण मानव, गोरिला (तीन प्रजाती), चिंपांझी (दोन प्रजाती), आणि ओरांग उटान (दोन प्रजाती) असे आहोत. आपण मानव म्हणजे या कुटुंबातली यशस्वी श्रीमंत पाती असल्याने गरीब पातीची काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे.

गोरिला राहतात ते विरुंगा ज्वालामुखी पर्वत झाईर, रवांडा, आणि युगांडा यांच्या सीमेवर आहेत. तिथे आजघडीला २८० गोरिला आहेत. त्यातले सुमारे दोन तृतीयांश झाईरमध्ये राहतात, आणि उरलेले रवांडात. मी 'सुमारे' म्हणतो आहे कारण अजून गोरिलांना पासपोर्ट, इमिग्रेशन, परकीय चलन घोषणा फॉर्म, आणि सरकारमान्य लाचखोरीमधली गंमत लक्षात आली नाहीये. त्यांच्या अप्रगत पशुमेंदूतली लहर फिरेल तसे ते या देशातून त्या देशात मुक्त बागडतात. काही चुकार गोरिलापोरटी युगांडातही घुसतात, पण तिथे कोणी कायमची वस्ती करत नाही. एक तर विरुंगा पर्वताचा युगांडातला भाग फक्त ७५ चौरस मैल आहे, आणि तिथे ज्या प्रकारचे लोक राहतात, त्यांच्या वाऱ्यालाही उभं राहू नये हे गोरिलांना कळलं आहे.

गोमा ते विरुंगा-ज्वालामुखी प्रवासाला खुष्कीच्या मार्गाने पाच तास लागतात. आमचे अडीच तास अधिक मोडले कारण एक तिकीट एजन्ट, एक हॉटेल मॅनेजर, एक जेवण, आणि एक बँक यांनी मिळून केलेला अवर्णनीय झांगडगुत्ता. त्याचं वर्णन करणं हे त्या मूळ प्रकारापेक्षा फारसं सुखावह नाही, त्यामुळे ते जाऊ दे.

यादरम्यान एका बेकरीत पाकीटमाराशी माझा पाला पडला.

मला मुळात कळलंच नाही, की माझा खिसा कापला जातो आहे. मला व्यवसायाशी एकनिष्ठ असे कसबी कारागीर आवडतात. पण माझ्याखेरीज बेकरीतल्या इतर सगळ्या लोकांना हे ताबडतोब लक्षात आलं, आणि त्यांनी पाकीटमाराला रस्त्यावर ढकलून परस्पर कुटलं. हे सगळं घडत असताना माझं चित्त बनपाव निवडण्यावर एकाग्र झालं होतं. बेकरीवाल्याने मला प्राप्त घडामोडींचा गोषवारा द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचं झाईरवा फ्रेंच माझ्या कानातून आरपार निघून गेलं. मला वाटलं तो मनुका घातलेल्या बनपावांची तरफदारी करतो आहे, म्हणून मी तसले सहा घेतले.

तेवढ्यात मार्क डबाबंद पेअर, गोरिलादर्शनाचे परवाने, आणि आमचा ड्रायव्हर या चिजा घेऊन आला. ड्रायव्हरला परिस्थिती ताबडतोब समजली आणि त्याने ताबडतोब मला तपशीलवार माहिती दिली. त्याने हेही सांगितलं, की मनुका घातलेले बनपाव थुकराट असतात पण तरी आम्ही ते जपून ठेवावेत कारण बाकीचेही सगळेच थुकराट असतात शिवाय माणूस म्हटला की पोट जाळायला काहीतरी हवंच. आपण इथून फुटाची गोळी घ्यावी या आमच्या सूचनेला त्याने जोरदार अनुमोदन देऊन गाडी काढली.

लोक 'अंधाऱ्या आफ्रिका खंडा'बद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर जो प्रांत असतो तो झाईर. जंगलं, पर्वत, महाकाय नद्या, ज्वालामुखी, चित्रविचित्र वन्य प्राणी, शिकारीवर जगणारे पिग्मी आदिवासी, आणि जगातले सर्वांत भीषण रस्ते. आफ्रिकेच्या याच भागात स्टॅनली आणि डॉक्टर लिव्हिंग्स्टनची भेट झाली होती.3

एकोणिसाव्या शतकापर्यंत हा भाग अंधाऱ्या आफ्रिका खंडाच्या नकाशावरचा अंधारा डाग होता. लिव्हिंग्स्टनने या भागाचा (युरोपीय नजरेत) 'शोध' लावला आणि या भागावर हळूहळू (युरोपीय) प्रकाश फाकायला सुरुवात झाली.

इथे प्रकाश घेऊन आलेले पहिले लोक मिशनरी होते (अर्थातच! आणखी कोण असणार!). प्रोटेस्टंट कसे चूक आहेत ते स्थानिक जनतेला शिकवायला कॅथलिक आले. कॅथलिक कसे चूक आहेत ते स्थानिक जनतेला शिकवायला प्रोटेस्टंट आले. स्थानिक जनता दोन हजार वर्षं चूक आहे याबद्दल मात्र प्रोटेस्टंट आणि कॅथलिक दोघांचंही एकमत होतं.

त्यापाठोपाठ व्यापारी आले; गुलाम, हस्तिदंत, तांबं, आणि शेतमळे वसवण्यासाठी योग्य जमिनीच्या शोधात. स्टॅनलीने 'आफ्रिका खुला करायचा' मक्ता पाच वर्षांसाठी घेतला होता. त्याच्या मदतीने बेल्जियमच्या लिओपोल्ड राजाने १८८५मध्ये या विस्तीर्ण भूभागावर कब्जा केला. त्यानंतर पहिलं काम कोणतं केलं असेल, तर वसाहतिक दमनशाही नेमकी कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक स्थानिक जनतेला दिलं.

लिओपोल्डने केलेल्या भीषण अत्याचारांची माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोचली तेव्हा जग स्तंभित झालं. आंतरराष्ट्रीय दबावाखाली लिओपोल्डला 'त्याची' ही जमीन लोकनियुक्त बेल्जियन सरकारच्या हाती सोपवावी लागली. या बेल्जियन सरकारने ताबा घेतला खरा, पण परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही केलं नाही. पण १९५० साल उजाडलं होतं. आफ्रिकाभर स्वातंत्र्यचळवळी जोमात होत्या. राजधानी किन्शासामध्ये १९५९ साली झालेल्या हिंसक दंगलींनी बेल्जियन सरकारला मुळापासून इतकं हादरवलं, की त्यांनी पुढच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य देऊन टाकलं. बेल्जियन काँगोने १९७१मध्ये स्वतःचं नाव बदलून झाईर केलं.

झाईरचा आकार बेल्जियमपेक्षा ८० पट मोठा आहे.

अनेक वसाहतींप्रमाणे नोकरशाहीने झाईरलाही विळखा घातला होता. या नोकरशाहीचं एकमेव काम म्हणजे कोणताही निर्णय न घेता ती बाब 'वर' म्हणजे आपल्या वसाहतमालकांकडे पाठवून द्यायची. बरेच निर्णय घ्यायची मुभा त्यांना मुळातच नव्हती, आणि जे निर्णय ते घेऊ शकत होते ते मजबूत लाच दिल्याशिवाय घ्यायची त्यांची इच्छा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर वसाहतमालक उरले नाहीत. आता निर्णय घेण्यासाठी बाब कोणाकडे पाठवायची? मग ही नोकरशाही आपल्याच शेपटाचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे गोल गोल फिरत राहिली. 'हो' म्हणण्यापेक्षा 'नाही' म्हणण्यात जास्त सत्ता आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला. पूर्वाश्रमीची वसाहत असणाऱ्या देशांमध्ये उत्तेजन देणार्‍या नोकरशाहीपेक्षा प्रतिबंध करणारी नोकरशाही अधिक मूळ धरते.

अर्धवट झोपेत पाचेक तास गचके खाऊन झाल्यावर आमची गाडी विरुंगा पर्वतराजीच्या पायथ्याशी वसलेल्या बुकिमा गावात पोचली. गाडीरस्ता इथे संपतो. यापुढे आम्ही अकरा नंबरची बस धरली.

डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुकिमा खेड्याची वस्ती जिथे विरळ होते तिथे एक मोठ्ठा वसाहती शैलीचा बंगला होता. तो रिकामाच पडला होता; फक्त मागच्या एका लहानशा खोलीत एक लहानखुरा माणूस बसला होता. लश्करी पोशाखातल्या त्या माणसाने एखाद्या नवोदित ज्योतिष्याने कुंडली पाहावी अशा थाटात आमचे गोरिलादर्शनाचे परवाने पाहिले. मग त्याने आपल्या लघुलहरी रेडियो संचावरून कोणाशी तरी खरखरयुक्त संवाद साधला. शेवटी आमच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्याने आम्हांला पुढे जायची परवानगी दिली. नैरोबीतल्या वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडाच्या प्रयत्नांमुळे आम्हांला गोरिला बघायला एक जादा दिवस मिळाला होता.

आमची राहायची सोय जंगलाच्या वॉर्डनच्या खोपटात केली होती. इथून ती जागा पायी तीन तासांच्या अंतरावर होती. तिथे आम्हांला आणि आमच्या जड सामानाला नेण्यासाठी हमाल-कम-वाटाड्यांची गरज होती. असे लोक कुठे मिळणार हा प्रश्न मनात यायच्या आधीच तो सुटला. बाहेर आमच्या गाडीभोवती धट्ट्याकट्ट्या लोकांचा गराडा पडला होता. आमचं सामान न्यायला किती लोक लागतील असा प्रश्न त्याला विचारल्यावर 'सगळे!' असं उत्तर मिळालं.

तत्क्षणी आम्हांला एक घोर जाणीव झाली. आमचं जास्तीचं जड सामान आम्ही गोमाच्या हॉटेलातच ठेवून निघणार होतो. पण गोमातून बाहेर पडायच्या गडबडीत आम्ही सगळंच गाडीत भरलं. आता गोरिलादर्शनासाठी लागणाऱ्या सामानापेक्षा कैक पट सामान आमच्याकडे होतं.

गोरिलादर्शनासाठी लागणारं बेसिक सामान येणेप्रमाणे : दणकट जीन्स, मुलायम टीशर्ट, रेनकोट, भरपूर कॅमेरे, आणि डबाबंद पेअर. पण याबरोबर आमच्याकडे न धुतलेल्या कपड्यांचा एक ढीग, पॅरिसमधल्या माझ्या प्रकाशकाला भेटायला जाताना घालायचा सूट, कॉम्प्युटर मासिकं, एक थिसॉरस, समग्र डिकन्सचा अर्धा भाग, आणि कोमोडो ड्रॅगनची एक लाकडी प्रतिकृती इतका जादा माल होता. प्रवास करताना गरजेपुरत्याच वस्तू घ्याव्यात असं माझं ठाम मत आहे. मी सिगारेट सोडावी आणि नाताळचं शॉपिंग वेळेत करावं अशी माझी इतर ठाम मतं आहेत. असो.

आमची लाज गुंडाळून ठेवून आम्ही हमाल-कम-वाटाड्यांना हे सामान वर विरुंगा ज्वालामुखीपर्यंत न्यायला सांगितलं. त्यांनी आनंदाने पत्कर घेतला - कोणी डिकन्स आणि ड्रॅगन गोरिलांपर्यंत नेऊन परत खाली आणायचे पैसे देणार असेल, तर त्यांना तक्रार असायचं काहीच कारण नव्हतं. गोऱ्या चमडीच्या लोकांनी यापेक्षा भयानक उद्योग झाईरमध्ये केले होते. यापेक्षा बावळट उद्योग केले नसावेत, पण तरी.

वॉर्डनच्या खोपटाकडे जायची चढण चांगलीच थकवणारी होती. वाटेत बऱ्याचदा विश्रांती घेऊन आम्ही आणि आमच्या टोळीने सिगारेटी आणि कोका कोलाचा आस्वाद घेतला. प्रत्येक थांब्यादरम्यान त्यांनी डिकन्स आणि कॉम्प्युटर मासिकं भरलेली पिशवी डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारे कशी घेता येईल याचं प्रात्यक्षिक दाखवलं.

साबुदाणे ज्यापासून बनवतात त्या टॅपिओकाच्या पाणथळ शेतांतून आम्ही बराच वेळ चालत होतो. टॅपिओकाला इंग्रजीत sagoही म्हणतात. एक वेडसर विचार मनात येऊन गुदगुल्या झाल्या : माझ्या नावाच्या इंग्रजी अक्षरांचा एकच अ‍ॅनाग्रॅम असा आहे त्याला काहीतरी (का होईना) अर्थ आहे. तो आहे Sago Mud Salad. मी या क्षणी त्या अ‍ॅनाग्रॅममध्ये चालत होतो. या योगायोगाला काहीतरी वैश्विक अर्थ असणार असं तर्कट लढवण्यात माझा वेळ बरा गेला. शेवटी ते खोपट आलं - ओबडधोबड पण दणकट.

जड दमट धुकं जमिनीच्या पातळीपर्यंत उतरलं होतं. दूरवरची ज्वालामुखी शिखरं धूसर दिसत होती. दिवसभर उन्हाचा कडाका होता तरी जंगलातली संध्याकाळ चांगलीच थंडगार होती. आम्ही आमच्या कंदिलांच्या मिणमिणत्या प्रकाशात डब्यातली पेअर खात आणि मोडक्या फ्रेंचमध्ये आमच्या जंगल-मार्गदर्शकांशी संवाद साधत वेळ काढला. मुरारा आणि सेरुंदोरी अशी त्यांची नावं होती.

लश्करी वेशांतले आणि काळ्या बेरे (beret) टोप्या घातलेले हे दोन चांगलेच चिकनेचुपडे तरुण होते. टेबलाभोवती आपल्या रायफली कुरवाळत निवांत रुबाबात बसले होते. हा वेष घालण्याचं कारण ते पूर्वी कमांडो पथकात होते असं त्यांनी सांगितलं. रायफली बाळगणं सक्तीचं होतं कारण जंगलात वन्य प्राणी तर होतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चोरशिकारीही होते.4 मुराराने आम्हांला सांगितलं, की त्याने आजपर्यंत अशा पाच चोरशिकार्‍यांना टपकवलं आहे. हे सगळं त्याने एकदम निवांतपणे सांगितलं - शिकारी.. गोळी.. खुडूक! अटक, खटला, शिक्षा वगैरे अनावश्यक भानगड नाही. ते खुडूक आणि हा घरी.

खुर्चीत आरामात रेलून बसत तो रायफलच्या दुर्बिणीशी चाळा करत राहिला, आणि आम्ही आमचे पेअर खात राहिलो.

चोरशिकारी हा डोंगरी गोरिलांचा सर्वात मोठा शत्रू आहे हे खरं, पण म्हणून शिकाऱ्यांचीच शिकार करायला अनिर्बंध परवाना देणे हा काही त्या समस्येवरचा इलाज नाही. आपण मानव अजून तरी दुर्मीळ प्रजातींमध्ये मोडत नाही, पण वेळोवेळी लोक तसे प्रयत्न करत असतात.

पण अवैध शिकार हळूहळू कमी होते आहे. जिवंत गोरिला पकडून नेणं तर जवळपास खुंटलंय. जगातल्या प्राणीसंग्रहालयांत आज असलेल्या गोरिलांपैकी ८०% जंगलांतून पकडून नेले आहेत हे खरं असलं, तरी आज कोणतंही सार्वजनिक प्राणीसंग्रहालय जंगलातून पकडून नेलेला गोरिला स्वीकारणार नाही. कारण अवैध पकडापकडीची हकीकत लोकांसमोर येईल.

पण जगात काही खासगी संग्राहक आहेत त्यांना अजूनही थेट जंगलांतून पकडलेले गोरिला पाळायचे असतात. विरुंगा पर्वतांचा युगांडातला भाग अजूनही चोरशिकार्‍यांचं नंदनवन आहे. सप्टेंबर १९८८मध्ये तिथे एका तान्ह्या गोरिलाला शिकाऱ्यांनी पकडलं. त्या गोतावळ्यातले दोन पूर्ण वाढ झालेले गोरिला त्या तान्हुल्याला मदत करताना मारले गेले. त्या गोरिलाबाळाला पुढे रवांडन तस्करांना £१५,००० इतक्या रकमेला विकण्यात आलं.

जिवंत गोरिला पाळण्यापेक्षा मृत गोरिलांच्या शरीराचे भाग विकत घेणारे लोक आणखीच विकृत असतात. काही टुरिस्ट लोकांना वाटतं गोरिलांच्या कवट्या आणि केसाळ हात जिवंत प्राण्यापेक्षा त्यांच्या दिवाणखान्यातल्या भिंतीवर जास्त शोभून दिसतील. हे लोण हल्ली कमी होत चाललं आहे. सुसंस्कृत जगात हल्ली क्रौर्याच्या उघड प्रदर्शनाला फारसा भाव दिला जात नाही.5

आफ्रिकेच्या काही भागांत स्थानिक जनता मांसभक्षणासाठी गोरिलाची शिकार करते. विरुंगा पर्वतांत तसं होत नाही. किंबहुना तसं मुद्दाम होत नाही. समस्या अशी आहे, की इतर (खाण्यायोग्य) प्राण्यांची शिकार करायला लावलेल्या सापळ्यात गोरिला चुकून अडकतात. 'जोझी' नाव दिलेल्या एका लहान गोरिला मादीचा हात हरणासाठी लावलेल्या फाशांत सापडला, आणि तिला जखम झाली. पुढे ती जखम चिघळली आणि ऑगस्ट १९८८मध्ये तिचा अंत झाला. त्यामुळे गोरिलांसाठी सुरक्षागस्त गरजेची होती.

त्या दिवशी आमच्या खोपट्यात आणखी दोन लोक होते. हे तरुण जर्मन विद्यार्थी होते. त्यांची नावं आता मी विसरलो आहे, पण जगभरच्या प्रवासांमध्ये भेटलेल्या सगळ्या तरुण जर्मन विद्यार्थ्यांसारखेच हे वागतबोलत होते. त्यामुळे सोयीसाठी आपण त्यांना हेल्मुट आणि कुर्ट म्हणू. काय फरक पडतो?

हेल्मुट आणि कुर्ट सोनेरी केसांचे सुदृढ तरुण होते, आणि त्यांच्याकडे असलेली प्रवासी सामग्री आमच्यापेक्षा कैक पट चांगल्या दर्जाची होती. बेसिकली आम्ही जे जे करू शकत होतो ते ते आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते करू शकत होते. सुरुवातीला ते आम्हांला फारसे भेटले नाहीत कारण त्यांचा जेवण शिजवायचा उद्योग चालू होता. यात बाहेर तीन दगडांची चूल मांडणे, लाकूडफाटा मिळवणे, चूल पेटवणे, आतबाहेर हेलपाटे घालून पाणी आणणे, घडीचा चाकू आणि स्टॉपवॉच वापरणे, आणि आजूबाजूला टिपलेल्या कोंबडीसदृश प्राण्यांचे तुकडे भाजून घेणे वगैरे जगड्व्याळ उद्योग अंतर्भूत होते. शेवटी त्यांनी त्या चुलीसमोर बसून आपलं जेवण भरपेट खाल्लं. हवाबंद डब्यांतलं पेअर कुरतडून खाणाऱ्या आम्हां तिघांकडे त्यांनी वळून बघायची तसदीही घेतली नाही.

जेवण झाल्यावर ते आत आले तेव्हा व्हरांड्यात बसलेल्या आम्हांला टाळणं त्यांना अशक्य झालं. पण नाही; ते खोपट्यात झोपणार नव्हते. कारण त्यांच्याकडे तंबू होता, तो जर्मन बनावटीचा होता, जर्मन तंबू जगातभारी असतात, आणि जंगलांत बाहेर झोपणं हेच आरोग्यासाठी चांगलं असतं. ही माहिती आम्हांला बहाल करून त्यांनी आम्हांला गुडनाईट घातला.

रात्री मी नेहमीप्रमाणे विश्वाची चिंता करत पडलो होतो. लोकांना येताजाता गोळ्या घालायच्या मुरारा आणि सेरुंदोरीच्या आवडीबद्दल सुरुवातीला काळजी केली. नंतर माझे विचार हेल्मुट आणि कुर्टकडे वळले. ते जसे होते तसे ते असण्याबद्दल माझी हरकत असायचं काहीच कारण नव्हतं. पण ते जर्मन नसते तर बरं झालं असतं. अगदीच सोपं, अगदीच ठरीव. हे म्हणजे एखादा निर्बुद्ध आयरिश माणूस भेटण्यासारखं होतं. किंवा लठ्ठ सासू असण्यासारखं. किंवा नाव-आडनावाच्या मध्ये एक अक्षर घुसवलेला आणि जाडी सिगार ओढणारा अमेरिकन व्यापारी भेटण्यासारखं. हेल्मुट आणि कुर्ट ब्राझिलियन, चिनी, किंवा लात्वियन असते, आणि आत्ता वागतात तसे वागले असते, तर त्यात काहीतरी आश्चर्यरम्य होतं. मला लिहायला ते सोपं गेलं असतं. लेखकांनी ठरावीक पूर्वग्रहांना खतपाणी घालणारी ठोकळेबाज पात्रं रंगवायची नसतात. काय करावं यावर मी भरपूर डोकं खाजवलं. शेवटी असं ठरवलं, की मला पाहिजे तर हेल्मुट आणि कुर्ट लात्वियन असू शकतात. हाय काय न नाय काय. मग मी शांतपणे माझ्या बुटांविषयी चिंता करण्याकडे मोर्चा वळवला.

बुटांची भानगड झाली ती अशी : झोपायला जाण्यापूर्वी मार्कने मला सांगितलं, की उठल्याउठल्या ब्रश किंवा अन्य काही प्रातर्विधी करण्यापूर्वी पहिलं काम कोणतं करायचं, तर ते म्हणजे पलंगाखाली काढून ठेवलेले बूट उलटे करून ठेवायचे.

"का?" मी विचारलं.

"विंचू," तो जांभई देत म्हणाला, "चल, झोपतो रे आता."

भल्या पहाटेच मुरारा आणि सेरुंदोरी रायफली कुरवाळत आणि मशेटींवर हात फिरवत आमच्या दारात अवतीर्ण झाले. त्यांचे डोळे मिस्कील आनंदात चमकत होते. गोरिलांना आपल्या उत्क्रांतीनातेवाईकांना भेटण्यात शून्य रस असतो. तीन इंग्लिश लोक भेटायला आले आहेत म्हणून ते आगाऊ वेळ ठरवून येणार नव्हते. त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटावं लागतं. कधीकधी ते इतके खोल आत जंगलात असतात, की आमच्या खोपट्यापासून तिथे पोचायला साताठ तास लागतात. पण आज खबर अशी आली होती, की एक गोरिला कुटुंब आमच्यापासून फारतर तासाभराच्या अंतरावर होतं. आम्ही लगोलग आमचं गोरिलानिरीक्षण-सामान गोळा केलं. अर्धा समग्र डिकन्स आणि लाकडी ड्रॅगन मागेच ठेवला, कारण गोरिलांना कोणताही मानसिक त्रास द्यायची आमची इच्छा नव्हती. आम्ही आमच्या लात्वियन हेल्मुट आणि कुर्ट द्वयाला रामराम घातला; तेही आज आम्हांला सामील होणार होते. आणि धुक्यात हरवलेल्या मिकेनो ज्वालामुखीच्या शिखराकडे आम्ही वाटचाल सुरू केली.

जंगल घनदाट आणि ओलंकिच्च होतं. मी मार्ककडे तक्रार करताच त्याने सगळा कार्यकारणभाव सांगितला.

गोरिलांना 'मोन्टेन' प्रकारची सदाहरित जंगलं आवडतात. समुद्रसपाटीपासून ३००० मीटर उंचीवर ही जंगलं असतात - म्हणजे ढगांच्याही वर. ढगांच्या सान्निध्यामुळे वातावरण कायम ओलं ओलं असतं.

"प्रामुख्याने सापडणारी सदाहरित जंगलं म्हणजे समुद्रसपाटीवर सापडणारी, विषुववृत्तीय जंगलं. ही तुलनेने दुर्मीळ, दुय्यम असतात. मुख्य जंगलं कापली गेली, की तिथे राहणारे प्राणी वर चढत या दुय्यम जंगलांकडे येतात.' मार्क म्हणाला.

"मला वाटलं सदाहरित जंगलं एकदा कापली की परत वाढत नाहीत." मी म्हणालो.

"लगोलग नाही वाढत. विषुववृत्तीय सदाहरित जंगलाला परत त्याच स्थितीत यायला शेकडो-हजारो वर्षं लागतात. तोपर्यंत सगळे मूळ प्राणी कायमचे नष्ट झालेले असतात. पण दुय्यम जंगलं तुलनेने लवकर वाढतात." मार्क म्हणाला.

"का?" मी विचारलं.

"विषुववृत्तीय सदाहरित जंगल जबरदस्त गुंतागुंत असलेली संरचना असते. तू त्या जंगलात गेलास तर तुला उंच गच्च गगनचुंबी वृक्ष दिसतील, पण जमीन मोकळी दिसेल. गवतही फार नसेल. होतं काय, तर हे वृक्ष सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच उंच वाढत जातात. बुटक्या झाडाला सूर्यप्रकाश मिळत नाही - ते मरून जातं. या स्पर्धेमुळे खालच्या बाजूला फार काहीच नसतं. पण तरी या जंगलात अनेक प्राणी असतात. उपलब्ध सूर्यप्रकाशाचा शक्य तितका कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने ही सगळी सृष्टी विकसित झालेली असते."

"त्या मानाने ही ढगातली जंगलं गोरिलांच्या दृष्टीने सोयीची असतात. झाडं कमी उंचीची असतात, आणि बऱ्यापैकी विरळ असतात. त्यामुळे जमिनीच्या पातळीवर गवत आणि खुरटी झुडुपं असतात. गोरिलांना ते आवडतं - कारण त्यांना खायलाही मिळतं, आणि लपायलाही."

आम्हांला मात्र त्या गर्द झाडाझुडुपांतून वाट काढणं मुश्किल झालं असतं. पण मुरारा आणि सेरुंदोरी आपल्या मशेट्या इतक्या कौशल्याने फिरवत होते, की हे वार अंदाधुंद नसून झुडुपांतून वाट काढण्यासाठीच होते हे कळायला आम्हांला बराच वेळ लागला.

मशेटीला एक विशिष्ट आकार असतो : एका बाजूने केळ्यासारखा बाक, पण दुसऱ्या बाजूने सपाट. पात्याच्या प्रत्येक भागाचं वळण, कोन, आणि जाडी वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक वाराचं वजन वेगवेगळं पडतं. मुरारा आणि सेरुंदोरी पुढ्यात येणाऱ्या गोष्टीप्रमाणे मशेटीचे वार बदलत होते. कधी एक जोरदार तडाखा लावून जाड फांदी कापून काढायचे, लगेच सामोऱ्या आलेल्या खुरट्या झुडुपांवर आडवा वार करत त्यांना भुईसपाट करून टाकायचे. लगेच उभा वार करत, लटकत्या, एकमेकांत गुंतलेल्या वेलींच्या शेवया कापून काढत, जायला वाट पाडायचे.

जंगलात मोठ्या काळ्या मुंग्याही होत्या. हेल्मुट आणि कुर्ट वगळता आम्ही बाकी सगळे त्यांच्या चाव्यांनी हैराण झालो होतो. पण हेल्मुट आणि कुर्टकडे (अर्थातच) खास मुंगीप्रूफ मोजे होते. ते त्यांनी (अर्थातच) लात्वियातून आणले होते. जिथे ते (अर्थातच) जगातभारी दर्जाचे मिळतात.

या दूरदृष्टीबद्दल त्यांचं कौतुक करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्यायच नव्हता. "लात्वियन लोक कायम सगळ्यासाठी तय्यार आणि सुसज्ज असतात", ते खांदे उडवत म्हणाले. आमचे कॅमेरे आणि एकूणच रेकॉर्डिंग यंत्रणा पाहून त्यांना महदाश्चर्य वाटलं. या भंगारापेक्षा अतिप्रचंड प्रगत कॅमेरे आणि रेकॉर्डर लात्वियात असतात ही मोलाची माहिती त्यांनी दिली. ते काहीही असलं, तरी बीबीसीला हे कॅमेरे चालताहेत - प्रश्न मिटला, आम्ही बाणेदारपणे म्हणालो. त्यावर लात्वियात यापेक्षा चांगल्या दूरचित्रवाहिन्या आहेत अशी माहिती मिळाली.

राजनैतिक संबंध आणिक ताणले जाण्यापूर्वीच आमच्या मार्गदर्शकांकडून गप्प राहण्याच्या सूचना मिळाली. आम्ही गोरिलांच्या जवळ पोचलो होतो.

"अर्थात, वेळ झालीच होती!” कुर्ट आपली लात्वियन जिवणी फाकवत म्हणाला. जसं काही गोरिला मंडळी याला वास्तुशांतीचं आमंत्रण देऊन गेली होती.

पण दस्तुरखुद्द गोरिला अद्याप लांब होता - सध्या आमच्या मार्गदर्शकांना गोरिलांनी काल रात्री मुक्काम केला ती जागा सापडली होती. आम्ही चालत होतो त्या ओबडधोबड रस्त्याच्या कडेला एक गवताळ खड्डा होता. आजूबाजूची झुडुपं, गवत वगैरे ओढून तळाशी बिछायतीसारखं अंथरून थंडी आणि दमटपणा यांपासून बचावाचा प्रयत्न केला होता.

वन्यजीवांची विष्ठा पाहिली की प्राणीशास्त्रज्ञ अक्षरशः देहभान विसरतात. म्हणजे ते गोळे तपासून प्राण्यांच्या सवयी, खाद्य यांबद्दल मोलाची माहिती मिळते वगैरे मला ठाऊक आहे. पण वासाड हागू दिसली, की त्यांच्या चेहेऱ्यावर चमकणारा विशुद्ध आनंद बघून इतर येरूंना अचंबा वाटतो.

आनंदाचा चीत्कार कानावर पडताच मार्कला अशी एक लेंडी सापडली आहे हे माझ्या ताबडतोब ध्यानात आलं. गुडघ्यावर बसत त्याने त्या लहानशा ढिगाचे शक्य तितक्या कोनांतून शक्य तितके फोटो घ्यायचा सपाटा लावला.

"ही त्यांच्या घरातली शी आहे, तो चमकत्या डोळ्यांनी म्हणाला. "म्हणजे हा डोंगरी गोरिलांचा कळप आहे. इथे रात्री खूप थंडी असते, म्हणून डोंगरी गोरिला राहत्या जागेतच ढेकळं टाकतात. पश्चिमेकडच्या मैदानी प्रदेशात इतकी थंडी नसते. त्यामुळे तिथले गोरिला रात्री लागली तरी घरट्यापासून लांब जाऊन हागतात. शिवाय, मैदानी प्रदेशात त्यांना खायला चिकट फळं मिळतात - झोपायच्या जागेजवळ न हागण्याचं आणखी एक कारण!"

"बरं!" मी म्हणालो.

हेल्मुट काहीतरी बोलणार होता. बहुधा लात्वियातली गोरिला-विष्ठा जगातभारी असते हे सांगणार असावा; तेवढ्यात मी त्याला गप्प राहायचा इशारा केला, कारण त्या क्षणी ट्रकसदृश काहीतरी अवजड धिप्पाड आपल्या पाळतीवर असल्याची भावना वळवळली.

आवाज न करता आम्ही आजूबाजूला पाहिलं. पण आजूबाजू आमच्याइतकीच शांत होती. वरच्या झाडीतून कोणी बघत नव्हतं, झुडुपांतून कोणी लक्ष ठेवून नव्हतं. दोन मिनिटांनी एक सूक्ष्म हालचाल डोळ्यांच्या कडांना जाणवली. आमच्या थेट समोर, आमच्यापासून साधारण तीस यार्डांवर एक डोंगरी गोरिला होता. आम्हांला त्याचं अस्तित्व इतक्या वेळ जाणवलं नव्हतं कारण तो इतका महाप्रचंड धिप्पाड होता, की इतकं मोठ्ठालं जिवंत काही असू शकतं हे आमच्या मेंदूत शिरलंच नव्हतं. तो डोंगरी गोरिला, किंवा गोरिला डोंगर, मागच्या चवड्यांवर उकिडवा बसला होता.

बऱ्याच लेखकांनी लिहिलेलं तुम्ही वाचलं असेल, की हे डोंगरी गोरिला झक्कास प्राणी असतात. मी तुम्हांला माझं मत सांगतो : हे डोंगरी गोरिला झक्कास प्राणी असतात. यापेक्षा समर्पक वर्णन करणं अवघड आहे. याच्यासारखा दुसरा प्राणी नाही. जंगलात हा समोर आला की अक्षरशः देहभान हरपून जातं. तुमच्या मनात आजवर कधी न आलेल्या आदिम जंगली भव्य भावना आपसुख येतात. कदाचित मेंदूचा हा भाग चेतवण्यासाठी अशाच एखाद्या अनुभवाची गरज असावी.

शब्दांच्या फुलोऱ्याबद्दल क्षमा करावी. आपल्या नेहमीच्या तर्ककठोर सुसंस्कृत मेंदूमध्ये अशी खळबळ माजली, की ती कागदावर उतरवायला शब्दही वेगळे वापरायला लागतात. तरी अनुभव पूर्णपणे शब्दांत पकडता येत नाहीत, पण ते खरे आणि तीव्रपणे खरे असतात हे नक्की.

कोणीतरी उंचीमुळे भोवंड येण्याच्या विकारात (vertigo) माणसाला नेमकं कसं वाटतं याचं एक वर्णन केलं होतं. कितपत गांभीर्याने ते माहीत नाही. पण ते होतं असं :

खूप उंचीवरून खाली पाहताना आपल्याला जे गरगरतं, ती खाली पडायची भीती नसते. कार्यकारणभाव उलटा आहे. किंबहुना गरगरल्यामुळे आपण खाली पडण्याची शक्यता असते. उत्क्रांतीच्या कोणत्यातरी टप्प्यावर आपण उंच झाडांच्या फांद्यांवर उड्या मारणारे शाखामृग होतो. त्यामुळे खोल पोकळी दिसली, की उत्क्रांतीने आपल्या मेंदूत ठसवलेली प्रतिक्षिप्त संवेदना म्हणते, "तू याच्या पार जाऊ शकतोस, भावा; घे उडी!" आणि आपल्या मेंदूचा सारासार विचार करणारा विवेकी भाग म्हणतो, "वेडा झालास का! गप उभा राहा!"

त्यामुळे डोक्यातलं भिरभिरणं हे मेंदूच्या दोन भागांनी दिलेल्या परस्परविरोधी सूचनांमुळे होते असं म्हणायला वाव आहे. ती भीतीची भावना नाही. निव्वळ भीतीची भावना मानवाला एका अर्थी हवीहवीशी वाटते - यामुळेच जत्रेतले मोठे पाळणे वगैरे चालवणाऱ्यांची चूल पेटते.

गोरिलाचं जवळून प्रथमदर्शन घेताना मला व्हर्टिगोसारखी गरगर जाणवली. मेंदूचा एक आदिम भाग मला पुढे जाऊन आणखी जवळून अनुभव घ्यायला सांगत होता, आणि आधुनिक भाग धोक्यापासून दूर पळून जायला सुचवत होता. त्यामुळे मी जागीच थरथरत डोळे तांबारून उभा खिळलो. तिकडे गोरिलाने आम्हांला त्याच्या शीचे फोटो काढताना पाहिलं असल्याने त्याने असल्या विक्षिप्त प्राण्यांची दखल न घ्यायचा निर्णय घेतला असावा. तो झाडोऱ्यात निघून गेला.

आम्ही त्याच्या मागोमाग झाडीत उडी घेतली. पण हे त्याचं आवार होतं, आणि आम्ही नवखे पाहुणे. बघता बघता आम्हांला हूल देऊन महाशय निघून गेले, आणि आम्ही झाडीत भटकत राहिलो.

आम्हांला भेटलेला महाकाय गोरिला चंदेरी पाठीचा होता. फक्त नर गोरिलांच्या पाठीवरची फर चंदेरी (खरं तर मळकट राखाडी) होते, तीही त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर. लोकप्रवाद असा आहे, की नर गोरिला कळपाच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यावरच त्यांची फर चंदेरी रंग धारण करते. पण असं काही नाही. हा एक खुळचट लोकप्रिय गैरसमज आहे. खुळचट लोकप्रिय गैरसमजांवरून आठवलं : नंतर कधीतरी आम्ही कॉनरॅड अव्हेलिंग या गोरिला संरक्षण+संवर्धन तज्ज्ञाशी बोलत होतो. मी त्याला मुरारा आणि सेरुंदोरीबद्दल आणि त्यांच्या शिकाऱ्यांची शिकार करण्याच्या पद्धतीबद्दल सांगत होतो. तो खुर्चीत मागे रेलला आणि खो खो हसत बसला. 'च्यायला काय टेपा लावतात हे लोक टुरिस्टांना! ते लोक कमांडो पथकात असल्याची स्टोरीही विकली असेल त्यांनी?'

आमचे चेहरे बघूनच ही स्टोरी आम्ही विकत घेतल्याचं त्याला कळलं. आपलं डोकं दोन्ही हातात गच्च धरून त्याने गदागदा हलवलं.

"घंटा कमांडो! त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात कमांडोच्या जवळ जाणारं काही असेल, तर त्यांचे गणवेश! इथल्या कमांडो तुकड्यांना पुरेसे पगार नसतात. त्यामुळे ते त्यांचे जुने गणवेश असल्या लोकांना विकतात," तो म्हणाला. "परवा अशीच एक थोर स्टोरी ऐकली. राविंडी भागात गोरिला नसतात. तिथल्या एका टुरिस्टने आपल्या गाईडला विचारलं, "गोरिला आणि सिंह समोरासमोर आले की काय होतं?" आता याने सांगावं ना, की गोरिला आणि सिंह जंगलाच्या वेगवेगळ्या भागात राहतात आणि एकमेकांसमोर कधीच येत नाहीत. पण नाही! याला काहीतरी रंगीत उत्तर द्यायचं होतं. कदाचित टुरिस्टला ते हवं असेल. तर तो म्हणतो, "गोरिला सिंहाला बेदम मारहाण करतो, आणि एकदा सिंह निश्चेष्ट पडला, की पालापाचोळ्यांत त्याचा देह गुंडाळतो आणि त्याच्या अंगावर थयथय नाचतो!" मला हे कसं कळलं, तर हा टुरिस्ट काही दिवसांनी माझ्याकडे आला आणि ही बाब किती रोचक आहे सांगू लागला. मला नाही पटत अशी रंगीत फेकाफेकी करणं. 'मला माहीत नाही' असं सांगा, किंवा चक्क सांगा, की 'खरं उत्तर फार दिलचस्प नाही.' पण नाही, त्यांना ते पटणार नाही, कारण ग्राहकांचं समाधान हेच त्यांचं ध्येय, ना!"

एक गोष्ट मात्र खरी, की आमचे मार्गदर्शक जेव्हा फेकत नसायचे, किंवा रॅम्बोगिरी करत नसायचे, तेव्हा त्यांचा जंगलाचा अभ्यास अतिशय सूक्ष्म होता. कॉनरॅडने आम्हांला सांगितलं, की मुरारा आणि सेरुंदोरीने गोरिलांचे दोन कळप 'माणसाळवले' होते. 'माणसाळवणे' म्हणजे त्यांना मानवी सान्निध्याची सवय लावणे. ही एक प्रदीर्घ, किचकट, पण नाजूक प्रक्रिया असते. एका गोरिला-कळपाला हेरायचं, त्यांच्या भोवती भोवती राहायचं, जेणेकरून मानवी अस्तित्वाची त्यांना सवय होईल. मानवापासून त्यांना कोणताही धोका नाही याची खात्री पटली, की ते अनोळखी मानवांना - अभ्यासकांना आणि टुरिस्टांना - आपल्या जवळ येऊ देतात.

'माणसाळवायची' प्रक्रिया किती काळ चालणार हे त्या कळपाच्या चंदेरी पाठीच्या नेत्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. त्याचा विश्वास संपादन करणं हे मुख्य काम. आम्ही ज्या कळपाला भेटायला जात होतो त्याला 'माणसाळवायला' तीन वर्षं लागली. कॉनरॅड सुरुवातीच्या काळात या प्रकल्पात सहभागी होता. त्याने पहिले आठ महिने त्या कळपाच्या वीसतीस फुटांवर रांगत जायचा. पण एकदाही त्या गोरिलांनी त्याला दर्शन दिलं नाही.

"ही जंगलं इतकी घनदाट आहेत की तुम्ही आणि गोरिला अक्षरशः तीस मीटरच्या आत असता, पण एकमेकांना पाहू शकत नाही. तुम्हांला भीती वाटत असते, गोरिलालाही. खरं थ्रिल आहे, खरा अड्रेनलिन रश." तो सांगत होता, "या बकावू कळपाचा प्रॉब्लेम असा होता, की चंदेरी पाठीचा नेता वैतागून अंगावर येत नव्हता. अंगावर यायचं म्हणजे त्याला उघड्यावर, माझ्या पुढ्यात यावं लागलं असतं, आणि मग त्याला कळलं असतं मी निरुपद्रवी आहे. पण हे करायच्या ऐवजी तो माझ्याभोवती गोल गोल फिरत राहिला."

"पण तो अंगावर आला, की तू झुकतोस का?" मार्कने विचारलं. "झुकायचं असतं असं मी वाचलं होतं."

"कसलं झुकणं, रे!" कॉनरॅड हसत म्हणाला. "अंगावर आला, की माझी इतकी टरकायची की मी जागीच खिळून राहायचो."

एकदा का चंदेरी पाठीच्या गोरिलाने तुम्हांला स्वीकारलं, की बाकीचा कळप त्याचं अनुकरण करत तुम्हांला आपलंसं करतो. त्यांचं पाहून त्या भागात वस्ती करणारे इतर कळपही तुमचे मित्र होतात. सगळे शिस्तीत राहिले, तर ही घडी सहसा मोडत नाही. 'माणसा, प्लिस माझ्या डोक्यात जाऊ नकोस' हे सांगायची गोरिलांची विशेष पद्धत असते. मग आपण त्यांच्या डोक्यात जायचं नाही. एकदा एका गोरिला-कळपाचं डोकं काही कारणाने सटकलं. तरी त्यांचा मानव-मित्र काही टुरिस्टांना सोबत घेऊन मागेमागे करत होता. त्यांनी एकदोनदा नीट इशारे देऊन पाहिले. तरी तो मानव-मित्र ऐकेना म्हटल्यावर चंदेरी पाठीच्या नेत्याने मानव-मित्राचा हात आपल्या केसाळ पंज्यांत घेतला, आणि त्याला काहीही इजा न करता आपल्या टोकदार दातांनी फक्त त्याच्या हातातलं घड्याळ तोडून टाकलं.

हा एकंदर पर्यटन प्रकारच असा विवादास्पद आहे. मला स्वतःला गोरिला बघायची इच्छा अनेक वर्षं होती, पण आपण तिथे जाऊन त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ढवळाढवळ करणं योग्य वाटत नव्हतं. मानवी संपर्काचा आणखी एक तोटा म्हणजे मानवाकडून त्यांना संसर्गजन्य विषाणूंचा प्रसाद मिळू शकतो. त्या विषाणूंविरोधातली प्रतिकारशक्ती त्यांच्याकडे नसेल, तर ते त्यांच्या जिवावर बेतू शकतं. डायान फॉसी या सुप्रसिद्ध गोरिला संरक्षक-संवर्धक-अभ्यासक तज्ज्ञाने बरीच वर्षं पर्यटनाला विरोध केला. पुढे तिचा विरोध मावळला; किंवा तिला वास्तवाचं भान आलं म्हणा. सध्याचा सर्वमान्य विचार असा आहे, की सुजाणपणे नियंत्रित केलेलं पर्यटन हे गोरिला संरक्षण-संवर्धन प्रयत्नांना पूरकच ठरेल. गोरिलांचं अस्तित्व भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या हातात गेलं आहे ही दुःखद बाब आहे खरी, पण त्यातली अपरिहार्यता आपण सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे. जर टुरिस्ट नसतील, तर गोरिलांची अवैध शिकार तरी होईल, किंवा गोरिलांच्या अधिवासाचं जंगल शेतीसाठी किंवा जळणासाठी कापून काढलं जाईल. अगदी करकरीत शब्दांत सांगायचं, तर सध्या तरी स्थानिक लोकांसाठी मृत गोरिलांपेक्षा जिवंत गोरिला जास्त मौल्यवान आहेत. पुढचं कोणाला ठाऊक?

तर गोरिलानियंत्रणाचे नियम कसोशीने पाळले जातात. प्रत्येक कळपाला दिवसातून एकदाच एका तासासाठी मानवी संपर्कात आणलं जातं. एका गटात कमाल सहा टुरिस्ट असतात. त्यांच्याकडून यासाठी दरडोई शंभर डॉलर घेतले जातात (अर्थात, त्यांना गोरिला दिसतीलच असं छातीठोक सांगता येत नाही).

आम्हांला दर्शन झालं हे नशीबच म्हणायला हवं. पहिला गोरिला दिसल्यावर थोडा वेळ असं वाटत होतं, की आता आणखी दिसणार नाहीत. आम्ही झाडोऱ्यातून रांगत होतो. मुरारा आणि सेरुंदोरी खोकण्याचे आणि रेकण्याचे आवाज काढत होते. हे गोरिलांसारखेच आवाज म्हणजे त्यांना दिलेला संदेश असतो - आम्ही येतोय, आणि आमच्यापासून काही धोका नाही. खरं तर त्यांच्यासारखे आवाज काढण्याला काही अर्थ नाही. कोणता आवाज गोरिलांचा आणि कोणता माणसांचा हे त्यांना समजत नसेल का? मुद्दा असा आहे, की रोज सारखेच आवाज काढायचे म्हणजे गोरिला त्या आवाजाची तुमच्याशी सांगड घालू शकतील. खोकण्यारेकण्याऐवजी तुम्ही राष्ट्रगीत म्हटलंत तरी हरकत नाही.

आम्ही कंटाळून परत जाणार इतक्यात आम्ही एक वळण घेतलं आणि एकाएकी आमच्या आसपास गोरिलेच गोरिले दिसायला लागले. आमच्या डोक्यावरच्या फांदीवर एक मादी निवांत एका काटकीवरची साल चघळून चघळून खात बसली होती. तिने आम्हांला पाहून न पाहिल्यासारखं केलं. दोन बाळगोरिले जमिनीपासून चार मीटर उंचावरच्या फांदीवर शिवाशिवी खेळत होते. एक तरुण नर आमच्या बाजूलाच झाडोऱ्यात अन्न शोधत भटकत होता. आम्ही स्तिमित होऊन, देहभान हरपून त्या शिवाशिवी खेळणाऱ्या पोरट्यांकडे बघत होतो. 'अरे! पडशील ना कार्ट्या!' असा बापलळ्यातून जन्मलेला विचार मनात येईपर्यंत एकाचा पाय घसरला, आणि तो खाली कोसळला. पण खालच्या झाडोऱ्याच्या गादीवर आपटून तो लगेच टणदिशी उभाही राहिला!

एकेका गोरिलाचे उद्योग पाहात आम्ही पुढे सरकलो. चंदेरी पाठीचा नर पलीकडे एका कुशीवर आडवा पडून उलट्या बाजूचा कान खाजवत होता. अर्धोन्मीलित नेत्रांनी तो वरच्या दोन हलणाऱ्या पानांकडे लक्षपूर्वक पाहात होता. आपण मानव ज्यासाठी रोज गळणाऱ्या दूरचित्रवाणी मालिका पाहतो त्याच कारणासाठी त्याचा हा उद्योग चालू होता - वेळ घालवणे.

ते माणसासारखे दिसतात - हलतात - वस्तू धरतात. त्यांच्या चेहऱ्यावर माणसासारखे भाव येतात. त्यांच्याकडे पाहून हे माणसासारखाच विचार करत असणार असं वाटतं. पण ते तसं नाही. आपण आपला 'माणूसपणा' त्यांच्यावर लादून आपले पूर्वग्रह वाढवतो, इतकंच.

रांगत रांगत मी त्या चंदेरी पाठवाल्याच्या जवळ सरकलो. इतका जवळ, की आमच्यात फक्त अठरा इंच अंतर राहिलं. त्याने माझ्याकडे पाहिलं पण कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या गोरिलाची उंची माझ्याएवढीच असावी, पण वजन नक्कीच माझ्या दुप्पट असणार. त्यातही स्नायूभार जास्त असावा. खरखरीत केसांनी भरलेली जाड कातडी त्याच्या अंगावरून लोंबत होती.

मी आणखी जवळ सरकलो तेव्हा मात्र तो जरा सावरून बसला आणि लांब झाला. एखादा माणूस सोफ्यावर आपल्या जास्तच जवळ बसल्यावर आपण सरकतो तसा. मग तो पालथा पडला, आणि एका हाताच्या मुठीवर चेहरा ठेवून दुसऱ्या हाताने गाल खाजवू लागला. मला जाम मुंग्या चावत होत्या, पण मी जागचा हललो नाही. त्याने दृष्टी माझ्याकडून मार्ककडे वळवली आणि परत माझ्याकडे. मुद्रेवर फारसा फरक पडला नाही. दुपारी लागणाऱ्या सास-बहू मालिकेच्या रिपीट टेलिकास्टकडे आपण ज्या उत्साहाने बघतो त्याच उत्साहाने तो आमचं निरीक्षण करत राहिला.

अँथ्रोपोमॉर्फाईज करणं - म्हणजे (मानवेतर प्राण्यांना) मानवी भावभावना आणि गुणावगुण चिकटवणं - ही मानवाची नैसर्गिक प्रेरणा असावी. हे टाळणं कठीण आहे, आणि ही संवेदना वाचकांपर्यंत पोचवायचा कदाचित एकमेव मार्ग आहे.

थोड्या वेळाने मी माझे गुलाबी कागद बॅगेतून काढले आणि टिपणं काढू लागलो. (या टिपणांवरच हा लेख बहुतांशी बेतलेला आहे.) लिहिण्याच्या क्रियेत गोरिलाला जरा रस वाटला. बहुधा त्याने गुलाबी कागद आधी कधी पाहिला नसावा. त्याने आपला हात लांबवून आधी कागद, आणि मग पेनाच्या वर अडकवलेल्या टोपणाला स्पर्श केला. मला अडवायचा, त्रास द्यायचा, आडकाठी करायचा त्याचा इरादा नव्हता. फक्त ही अज्याब वस्तू हाताला कशी लागते हे बघायचा त्याचा विचार होता. मला एकदम छान वाटलं, आणि त्याला माझा कॅमेराही दाखवायचा वेडपट विचार मनात आला.

तो थोडा मागे सरकला आणि पुन्हा माझ्यापासून सुमारे चार फूट अंतरावर झोपला. मूठ पुन्हा एकदा हनुवटीखाली दाबली. त्याच्या अभिव्यक्तीतील विलक्षण विचारशीलतेने आणि मुठीच्या दाबाने वर एकत्र झालेल्या त्याच्या ओठांनी मला आकर्षित केलं. मध्येच तो डोळ्यांच्या कोपर्‍यांतून माझ्याकडे कटाक्ष टाकत होता.

मानवी बुद्धिमत्ता हे काही प्राण्यांतली बुद्धिमत्ता मोजायचं माप नव्हे. त्याची बुद्धी मानवी नजरेतून बघणं चूक आहे या विचाराने मी अस्वस्थ झालो. त्याऐवजी त्याच्या नजरेला आपण कसे दिसत असू याचा विचार करायचा मी प्रयत्न केला. हे अर्थात अशक्य आहे - कारण त्यासाठी गृहीतकं लागतील. विचारांत नकळत शिरलेल्या गृहीतकांपेक्षा वाईट काही नाही.

त्याच्या जगातली माझी नको ती लुडबूड तो बहुधा किंचित मन मारून सहन करत होता. कदाचित मला काहीतरी सांगू पाहात होता, पण ती भाषा मला समजणार नव्हती. मग मी त्याच्या नजरेतून मला स्वतःला पाहिलं - माझा हलकाफुलका रेनकोट, पेन, गुलाबी कागद, निकॉन कॅमेरा, आणि जंगलातलं जग समजून घेण्यातलं माझं तोकडेपण - हे सगळं सगळं मला दिसलं. उत्क्रांतीच्या धाग्याने या प्राण्यांशी आपला खोलवर संबंध जोडला आहे, पण त्याचे तपशील आपल्यासाठी आज धूसर झाले आहेत. गेल्या वर्षी पडून गेलेल्या स्वप्नाप्रमाणे - अस्तित्वात असलेलं, पण धूसर.

खूप पूर्वी एक चित्रपट पहिला होता. त्यातला नायक - पूर्व युरोपातून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या आईबापांचा मुलगा - आपली मुळं शोधत आईबाप जिथून आले त्या गावात पोचतो. तो श्रीमंत, यशस्वी, आणि अमेरिकी असल्यामुळे तिथले लोक त्याला विशेष असामी म्हणून वागवतील, उत्साहाने फसफसतील असा त्याचा उगाचच समज झालेला असतो. पण असं काही होत नाही - म्हणजे त्याला तुच्छतेने वागवलं जातं असं नाही - पण त्याचं स्वागत ज्या थंड्या प्रकारे केलं जातं ती पद्धत त्याला कळत नाही. शेवटी त्याच्या लक्षात येतं, की त्याला भेटल्यावर स्थानिकांच्या थंड प्रतिक्रियांचा अर्थ त्याला नाकारलं आहे असा नाही. त्यांच्या आयुष्यात सामील होण्याची परवानगी त्याला आहे, पण ढवळाढवळ करायची नाही. त्याने अमेरिकेतून आणलेल्या भेटवस्तू मातीमोल ठरतात, कारण ती कृती त्याच्या हरवलेल्या गतकाळाची परिणती असते.

मी परत गोरिलाच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं. गोरिलांना, वानरांना माणसाची भाषा शिकवण्याच्या 'प्रयोगा'ची आठवण माझ्या मनात जागी झाली. आपली भाषा. का शिकवायची? जंगलात राहणारी माणसं असतात, त्यांना जंगल कळतं, प्राण्यांना काय हवंय ते कळतं. त्यांचं तर आपण काही ऐकत नाही - त्यांना फाट्यावर कोलतो. मग गोरिलाने आपल्या भाषेत बोललेलं आपण काय घंटा ऐकणार आहोत? शिवाय, त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी मांडायला आपल्या भाषेत शब्द असतील का? कदाचित त्यांना भाषा मिळाली नाहीये असं नाही - आपण ती भाषा गमावली आहे.

चंदेरी पाठीच्या गोरिलाला अखेर आमचा कंटाळा आला, आणि तो धप्प धप्प पावलं टाकत आपल्या घराच्या वेगळ्या भागात चालता झाला.

परतीच्या वाटेवर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ट्युनाचा एक डबा अजून शिल्लक आहे. या बातमीने आनंदीआनंद पसरला, आणि परतल्यावर आम्ही बियरसंगे त्याचा फन्ना उडवला. आमचा दिवस दुपारी दोनलाच संपला. यापुढे जर्मन लात्वियन पोरांकडून त्यांचे हातचाकू जगातभारी आहेत हे ऐकणं एवढंच करण्यासारखं बाकी होतं.

मार्कचं टाळकं सरकायला सुरुवात झाली होती हे माझ्या लक्षात आलं, कारण त्याने बियरच्या बाटलीचा गळा दाबायला सुरुवात केली होती, आणि तो एकटक तिच्याकडे रोखून बघत होता. कुर्टने आम्हांला पुढचे बेत विचारले. आम्ही उत्तरी सफेद गेंडे बघायला गारांबा अभयारण्यात जाणार होतो (त्याबद्दल पुढे कधीतरी). त्याने एक तुच्छतादर्शक हुंकार काढून आम्हांला सांगितलं की तो बहुधा आज रात्री पायी युगांडात जाईल.

हे ऐकल्यावर मार्कने बाटलीचा गळा आणखी जोरात घोटला. एकुणातच प्राणिशास्त्रज्ञांना माणसांपेक्षा वन्यजीवांची संगत आवडते - मार्कही त्याला अपवाद नव्हता. पण आज मला त्याचा मुद्दा पटत होता. आम्ही सहा तास गोरिलांसोबत मोठ्या आनंदात काढले होते. आता परतून मानवांबरोबर दोन तास काढणं आम्हांला कंटाळवाणं वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी आम्ही बुनिया विमानतळावर गेलो. तिथून आम्हांला नैरोबीला परत न्यायला मिशनरीमय विमान तयार होतं. विमान कंपनीच्या हस्तकाने आम्हांला धीर दिला, की इमिग्रेशनचं काम झालेलं आहे आणि आम्ही आता थेट विमानाकडे जायला हरकत नाही. पण काही मिनिटांतच आम्हांला एक प्रेमळ संदेश मिळाला, की मिनिटभरासाठी इमिग्रेशन हापिसरास भेटून आल्यास त्याला बरं वाटेल. बॅगा इथेच सोडल्या तरी चालतील. इमिग्रेशन हापिसात सांगितलं, की नाही नाही, बॅगा तर पाहिजेतच. पौडाहून आला का दाजीबा, बॅगा कोण सोडतं? आम्ही बॅगा घेऊन आलो, सोबत महाग दिसणारं कॅमेरासामान. तिथे एक दांडगासा झाईरवा अधिकारी आमची वाट बघत बसला होता. उन्हातून हे सगळं कड्याळ ओढून आणताना तो खिडकीतून आमच्याकडे बघत होता. त्याच्या डोक्यात शिजणाऱ्या खलबतांचा वास आम्हांला लगेच आला.

आमची जराही दखल न घेता आमच्या पासपोर्टांचा त्याने बराच वेळ व्यासंग केला. मग वर बघून तोंडभर हसला.

"तुम्ही," तो म्हणाला, "देशात कुठून शिरलात? बकावू?"

तो हे सगळं फ्रेंचमध्ये बोलला. फ्रेंच न समजण्याचा बहाणा पथ्यावर पडतो हे आमच्या ध्यानात तोवर आलं होतं. त्यामुळे आम्ही त्याचं एक वाक्य समजावून घ्यायला बराच वेळ लावला. शेवटी आम्ही मान्य केलं, की वादासाठी आपण समजू या, की हो, आम्ही बकावूमधूनच झाईरमध्ये प्रवेश केला.

"मग," तो शांतपणे म्हणाला, "तुम्हांला देशाबाहेरही बकावूतूनच जावं लागेल."

आमचे पासपोर्ट परत देण्यासाठी कोणतीही हालचाल त्याने केली नाही.

आम्ही त्याच्याकडे शुंभासारखं पाहिलं. त्याने आमच्याकडे साक्षात्कारी महापुरुषाप्रमाणे पाहिलं. "टुरिस्टांनी", तो म्हणाला, "ज्या ठिकाणाहून आमच्या देशात प्रवेश केला तिथूनच त्यांनी बाहेर पडणं पर्याप्त आहे." स्मितहास्य. पासपोर्टांवरची पकड कायम.

आम्हांला तो काय म्हणत होता त्याचा अर्थबोधच झाला नाही. म्हणजे या वेळेस खरोखर झाला नाही. कैच्याकै नियम होता हा. पण भाऊ पासपोर्ट दाबून बसले होते. शेजारी बसलेली मुलगी पासपोर्टांवरून कायकाय माहिती हाताने टिपून घेत होती. त्या जाडजूड रजिस्टरांत नोंदवलेली माहिती परत कोण कधी बघणार होतं देव जाणे!

आम्ही वाद घालत बसलो. नैरोबीचं विमान आमची वाट पाहात बसलं. इमिग्रेशन हापिसर नुसताच बसला. हा मूर्खपणा आहे हे आम्हांला माहीत होतं. हा मूर्खपणा आहे हे त्यालाही माहीत होतं. हा मूर्खपणा आहे हे त्या मुलीला माहीत होतं, किंवा नव्हतं, किंवा कसंही. या घटनेतल्या नाट्यमयतेचा इमिग्रेशन हापिसर अविभाज्य भाग होता. तो आमच्याकडे बघून परत एकदा हसला. आपले जाडे खांदे गदागदा हलवले, कानात बोट घालून आत चाचपणी केली, आणि आतला मुद्देमाल आपल्या छानशा सुटाला पुसला. त्या सुटाच्या किमतीइतकी दक्षिणा त्याला आमच्याकडून अपेक्षित असावी.

त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर राष्ट्राध्यक्ष मोबुटो गंभीरपणे उजवीकडे बघत बसले होते. त्यांच्या डोक्यावर बिबट्याच्या कातड्याची पिलबॉक्स टोपी चकाकत होती.

तळटिपा


  1. या देशाच्या नावाचा उच्चार 'झाईर' असा आहे. इंग्रजी स्पेलिंग Zaïre आहे. स्थानिक भाषेत काँगो नदीचं हे नाव होतं. काँगो या शब्दापेक्षा झाईर हा अधिक प्राचीन शब्द आहे. मोबुटो या नेत्याने १९६५ साली सत्ता हस्तगत केल्यावर देशाचं नाव बदलून 'झाईर' केलं. मोबुटोची हुकूमशाही १९९७मध्ये उलथवली गेली, आणि देशाचं नाव 'काँगो लोकशाही गणराज्य' केलं गेलं. 

  2. एलिस बेट (Ellis Island) हे १८९२ ते १९२४ या काळात 'अमेरिकेचं प्रवेशद्वार' म्हणून प्रख्यात होतं. इटली, पोलंड, आणि रशिया या देशांतले एक कोटीपेक्षा अधिक गरीब आणि पददलित लोक चांगल्या दर्जाच्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेची दारं ठोठावते झाले. अमेरिकेत आल्यावर तिथल्या समाजाशी एकरूप होण्यासाठी ते आपली नावं बदलत, 'अमेरिकानाइज' करत. 'ज्युजेsप्पे' / 'जेसुपी' (Giuseppe) चा 'जोसेफ' होई, 'योहानस' (Johannes) चा 'जॉन'. नाव बदलण्याचा आणि एलिस बेटांचा हा संदर्भ आहे.  

  3. ही भेट काँगोमध्ये झाली नव्हती. उज्जी या टांझानियामधल्या (तत्कालीन टांगानिका) गावी १० नोव्हेंबर १८७१ला झाली होती. 

  4. 'चोरशिकारी' हा इंग्रजी poachers चा अनुवाद आहे. मराठीत या जोडशब्दाला विलक्षण अर्थवाही छटा आहेत. '(वन्य प्राण्यांची) चोरून शिकार करणारे', '(वन्य प्राण्यांची) चोरी किंवा शिकार करणारे' असे दोन्ही.  

  5. अनुवादकाची नोंद : १९८९ साली लिहिताना लेखकाला असं वाटलं असेलही. आत्ता २०२३ साली हे कितपत खरं उरलं आहे हा चिंतनाचा विषय आहे.  

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

(तूर्तास ही केवळ पोच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास! वाचायला जाम मजा आली. डग्लस ऍडम्सची whimsical शैली अनुवादात चपखल उतरली आहे.

रच्याकने, चोरांची शिकार करणारे असा विग्रह केल्यास मुरारा आणि सेरुंदोरी हेदेखील चोरशिकारी होते (किंवा तसा दावा करत होते).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर आणि सुरस अनुवाद.
वाचायला खरंच मजा आली.
डग्लस ॲडम्सची "हिच-हायकरी" सर्किट शैली उत्तम पोर्ट केलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद नेमका, सुरस झालाय. फारच मजा आली वाचताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0