साखर उद्योग आणि आफ्रिका

#साखरेचाव्यापार #गुलामगिरी #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

साखर उद्योग आणि आफ्रिका

- सई केसकर

१५६६ साली पोर्तुगलची राजकन्या मारिया द आविझ (Maria de Aviz) हिचा विवाह आलेसांद्रो फारनेजे़ (Alessandro Farnese) या पारमाच्या इटॅलियन सरदाराशी झाला. त्या शाही सोहळ्यातलं जेवण फारच गाजलं. त्यांच्या लग्नातली पक्वान्नं साखरेच्या ताटांवर वाढली गेली. ती खाण्यासाठी साखरेचे चमचे होते. पोटात मद्य असणारी नाजूक चॉकलेटं कापायला साखरेच्या सुऱ्या होत्या. मद्य पिण्यासाठी साखरेचे प्याले होते. या सगळ्या भांड्यांतलं अन्न संपल्यावर पाहुणेमंडळी चमचे आणि ताटल्याही मोडून खात होती. एवढंच काय, मेणबत्त्या ठेवण्याची रोशनदानंही साखरेपासून तयार केली होती. पण हे सगळंदेखील त्यानंतर येणाऱ्या देखाव्यासमोर फिकं ठरलं. मारियाला अँटवर्प शहरानं (जिथून मोठ्या प्रमाणावर पोर्तुगिजांचा व्यापार चालायचा) 'रुखवत' दिलं ज्यात साखरेची तब्बल तीन हजार शिल्पं होती. लिस्बन हे तिचं माहेर सोडून ती आता तिच्या सासरी, म्हणजेच नेदरलंडला जाणार होती. पाहुण्यांना तिच्या प्रवासाचा अंदाज यावा म्हणून साखरेचे मासे, होड्या, तिच्या वाटेत लागणाऱ्या शहरांच्या प्रतिकृती, एवढंच नव्हे, तर नवरदेवाचा साखरेचा पुतळाही त्यात होता! घरी जाताना पाहुणेमंडळी यांतल्या काही वस्तू लग्नाची आठवण म्हणून सोबत घेऊन गेली.

पोर्तुगलची राजकन्या मारिया द आविझ
प्रतिमा स्रोत : विकीपीडिया

सोळाव्या शतकाच्या आसपास वसाहतवादी राष्ट्रांना ऊस-लागवड करून मोठ्या प्रमाणात साखर तयार करायची पद्धत गवसली. अशा प्रकारे तयार केलेली साखर मायदेशी परत आणून ती महाराण्यांच्या लग्नकार्यांत उन्मादानं उधळली जाऊ लागली. त्याआधी भारतातली साखर अरबांमार्फत युरोपात जात होती. पण ती भयंकर महाग असायची आणि तिचा पुरवठाही नियमित नसायचा. आज सगळीकडे अतिरेकी प्रमाणात साखर सापडते. बाजारात मिळणारे जे खाद्यपदार्थ चवीला थेट गोडही नसतात, त्यांतही मुबलक प्रमाणात साखर असते. पांढरी साखर वर्ज्य करा असा सल्ला मध्यमवयीन लोकांना मिळतोच; पण अलीकडे तान्ह्या बाळांनाही शक्यतो साखर देऊच नका असं डॉक्टर सांगतात. हे असं होण्याआधीची काही शतकं केवळ साखरेसाठी म्हणून माणसानं जग पालथं घातलं. साखरनिर्मितीच्या 'पाककृती’ची उत्तरोत्तर होणाऱ्या तांत्रिक प्रगतीनं 'प्रक्रिया' झाली; साखरेसाठी लढाया झाल्या; मोठमोठ्या मोहिमा आखल्या गेल्या; वसाहती निर्माण झाल्या आणि अनेक निरपराध लोकांचं शोषणही झालं. आज जगभरात ज्या ज्या देशांत मोठ्या प्रमाणावर साखरनिर्मिती होते, त्यांतले बहुतांश देश या इतिहासाचे साक्षीदार आहेत.

साखरेचा पश्चिमप्रवास


भारतीयांना उसापासून साखर तयार करायचं तंत्र इ.स.पूर्व काळापासून ज्ञात होतं. कौटिल्य त्याच्या 'अर्थशास्त्रा'त चार प्रकारच्या साखरेचा उल्लेख करतो. खांडसरी, काकवी, मळी, आणि भुरा (पूड केलेली साखर). खांडसरी या शब्दावरूनच इंग्रजीतला 'कँडी' हा शब्द तयार झाला आहे.

त्याच ग्रंथात कौटिल्य 'सगळ्या पिकांमध्ये सर्वांत वाईट पीक कोणतं - तर ते ऊस' असंही सांगतो. उसाची लागवड जमिनीसाठी चांगली नाही, तसंच उसाला भरपूर पाणी लागतं ही माहिती त्या ग्रंथात आहे. उसाची लावणी, सिंचन, कापणी, वाहतूक, आणि त्यातून रस काढण्याची प्रक्रिया अतिशय कष्टप्रद आहे. त्यापुढची पायरी, म्हणजेच स्फटिकरूपी पांढरी साखर तयार करायची प्रक्रिया ही तोडणीपासून रस काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेइतकीच अवघड आहे. आजकाल, काही तासांत शेकडो टन साखर तयार करणारे कारखाने असल्यानं आणि दर काही वर्षांनी साखरेचं अतिउत्पादन होत असल्यानं, साखरेचं सर्वव्यापी असणं आपल्या अंगवळणी पडलं आहे.

आपण खातो ती पांढरी साखर ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन शर्करा एकत्र येऊन तयार झालेली असते. या दोन शर्करांच्या संयुगाला सुक्रोज असं नाव आहे. उसाच्या रसातल्या सुक्रोजचं, ऊस तोडल्यानंतर झपाट्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये विघटन होऊ लागतं. यामुळे सुक्रोजच्या रूपातली स्फटिकरूपी साखर तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, परिणामी आर्थिक तोटा होतो. ते थोपवण्यासाठी, ऊस तोडल्यानंतर शक्य तितक्या लवकर रस काढून उकळायला ठेवावा लागतो. उसाच्या रसातलं आम्ल वाढलं (म्हणजेच pH कमी झाला) तरी सुक्रोजचं विघटन होतं. याउलट, pH सतत सातच्या जवळपास राहिला, की स्फटिकरूपी सुक्रोज तयार होतं. उसाच्या रसात चुना घालून तो उकळला, की स्फटिकरूपी साखर तयार होते हे ज्ञान भारतीयांना इसवी सनपूर्व ३०० वर्षांपूर्वी होतं याचे पुरावे सापडतात. 'शर्करा' हा शब्द इ.स.पूर्व ५०० ते ३०० या कालावधीत कधीतरी वापरला जाऊ लागला होता. अशी स्फटिकरूपी साखर तयार करायचं तंत्र भारतातून इराणमध्ये गेलं आणि तिथेही साखर तयार होऊ लागली. साधारण इ.स. पाचव्या शतकात त्यांना हे अवगत होतं असं दिसतं.

तेराव्या शतकाच्या शेवटाकडे, मार्को पोलो जेव्हा बंगालमध्ये आला, तेव्हा तिथे व्यावसायिक पद्धतीनं साखर तयार होत होती. दिल्लीत साखरेची मोठी बाजारपेठ होती. उसातून रस काढण्याचे नवनवीन मार्ग शोधले जात होते. चांगली साखर कशी तयार करायची याचा अनुभव असलेल्या त्या काळच्या साखर-तंत्रज्ञांची अगदी चांदी होती. इल्बा बोस्मा (Ulbe Bosma), त्यांच्या २०२३ साली प्रसिद्ध झालेल्या 'द वर्ल्ड ऑफ शुगर' या पुस्तकात असं म्हणतात, की मानवी श्रमांचं आणि निसर्गाचं वस्तूकरण करून खासगी भांडवलदारांचा अधिकाधिक फायदा करून देणे अशी जर भांडवलशाहीची (काहीशी मर्यादित) व्याख्या केली, तर तेराव्या शतकात साखर व्यवसायाच्या रूपातून भारतात भांडवलशाही प्रस्थापित झाली होती असं म्हणता येईल.

त्याआसपास आणि नंतर भारतात आलेल्या अनेक परदेशी प्रवाशांनी साखरेबद्दल सुरस नोंदी करून ठेवल्या आहेत. सुरुवातीला साखरेचा व्यापार अफगाणिस्तान – उझबेकिस्तान – आखाती देश असा जमिनीवरून होत असे. त्यानंतर बंगालमधून साखर, मळी, आणि मद्य गंगेमार्गे होड्यांतून समुद्रापर्यंत नेण्यात येऊ लागलं. तिथून समुद्री जहाजांमध्ये चढवून साखर आणि साखरेपासून तयार झालेली उत्पादनं पर्शिया आणि अरबी देशांत जाऊ लागली. पण बंगाल हे निर्यातीचं एकच ठिकाण नव्हतं. फ्रान्सच्या चौदाव्या लुईच्या एका हेरानं ‘पोर्तुगिजांच्या वसईत भारतातील सर्वोत्कृष्ट साखर मिळायची' अशी नोंद करून ठेवली आहे. सुरत, कॅम्बे (खंबाट), बाटीकाला (भटकळ) बंदरांवरूनही साखर मध्यपूर्वेत निर्यात होत असे.

भारतातून निर्यात होत असतानाच, मामलुक साम्राज्याच्या काळात (साधारण तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत) इजिप्त हे मुस्लीम आणि ख्रिस्ती देशांना साखर पुरवणारं एक मोठं केंद्र झालं. साखर तयार करायच्या तंत्रज्ञानात, विशेषतः उसापासून कमीत कमी कष्टात रस काढण्याच्या तंत्रज्ञानात, एव्हाना बरीच प्रगती झाली होती. दगडी जाती जाऊन त्यांची जागा आता आडव्या, सहज गोल फिरू शकणाऱ्या रोलर्सनं घेतली होती. साखरेतून मळी वेगळी करायचं तंत्रज्ञानही प्रगत झालं होतं. एकदा तयार केलेली, मळीचा रंग असलेली भुरी साखर ही दूध आणि अंड्याचा पांढरा भाग पाण्यात मिसळून त्यात विरघळवून स्वच्छ केली जायची. आजही पाश्चात्त्य देशांमध्ये तयार होणारी 'रिफाइन्ड' साखर ही भुरी, ‘कच्ची’ साखर पुन्हा एकदा विरघळवून रिफाइन केली जाते. भारतात मात्र एकाच प्रक्रियेतून, रिफाइन्ड साखरेइतकी शुभ्र नसली, तरी पांढरी साखर तयार होते. तिला 'प्लान्टेशन व्हाईट' असं नाव आहे.

इजिप्तमधून साखरेचा मोठ्या प्रमाणात व्यापार होऊ लागला आणि हळूहळू साखर ख्रिस्ती साम्राज्यांच्या नजरेत भरू लागली. या व्यापारात राजे, त्यांना भांडवल वा कर्ज देणारे सधन सावकार, आणि जिवाची पर्वा न करता जगभरात कुठेही जायला तयार असणारे खलाशी असे गट असायचे. साखरेला असणारी मागणी आणि साखरव्यापारातून मिळणारं उत्पन्न बघता, वेगवेगळ्या ख्रिस्ती साम्राज्यांनी इजिप्तचा साखरेतला एकाधिकार संपवायचे प्रयत्न सुरू केले. युरोपातल्या त्यातल्या त्यात उष्ण भागांत, उदाहरणार्थ सायप्रसमध्ये, ऊसलागवडीला आणि साखरउत्पादनाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या मध्यात इजिप्तमध्ये पसरलेल्या प्लेगचादेखील साखरउत्पादनावर विपरीत परिणाम झाला. त्यानंतर हळूहळू दुष्काळ, यादवी, दिवाळखोरी अशा अनेक कारणांनी मामलुक साम्राज्याची – परिणामी आजच्या इजिप्तची – साखरेवरची पकड सैल झाली आणि ख्रिस्ती जगाबरोबर असलेला त्यांचा व्यापारही कमी झाला.

वसाहतवाद आणि गुलामगिरी

भारत, चीन, आणि इजिप्त यांसारखे उष्ण कटिबंधातले देश पुरवायचे तेवढी साखर युरोपच्या उष्ण भागांत ऊस लागवड करून तयार करणं शक्य नव्हतं. उपलब्ध भौगोलिक क्षेत्र आणि त्यावर करता येणारं वस्तूंचं उत्पादन यांची कमाल पातळी गाठली जाते, तेव्हा भांडवलशाही नेहमीच जागेची निर्मिती करते. याला आजच्या तांत्रिक भाषेत 'स्पेशियल फिक्स' असं म्हणतात. १४२०मध्ये पोर्तुगिजांनी अटलांटिक महासागरातल्या मदिरा बेटांवर उसाची लागवड सुरू केली. हा साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा आणि मानवतेसाठी दुर्दैवी 'स्पेशियल फिक्स' होता. या बेटांवरचे विविध भाग वेगवेगळ्या सरदारांच्या हवाली करण्यात आले. आणि त्यातून आलेलं उत्पन्न काही हिस्सा राखून मायदेशी पाठवण्यात येऊ लागलं. साजेसं हवामान मिळाल्यामुळे उसाचं उत्पन्न वाढू लागलं. पण तरीही अशा हवामानात काम करणाऱ्या मनुष्यबळाची चणचण भासू लागली. १४४१ साली, अंताम गोन्साल्वेस नावाच्या तरुण आणि धडाडीच्या खलाश्यानं, पोर्तुगालच्या राजकुमार हेन्रीला खूश करायचं ठरवलं. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असताना त्यानं तिथल्या काही स्थानिक लोकांना पकडून नेलं आणि राजासमोर पेश केलं. पाठोपाठच, नुनो त्रिस्ताव नावाच्या खलाश्यानं आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून २३५ आफ्रिकन लोक पकडून आणले. अशा प्रकारे आफ्रिकेतून लोकांना पकडून आणून कोणताही मोबदला न देता काम करून घेता येऊ शकतं ही कल्पना जोर धरू लागली आणि 'साओ तोमे' या आफ्रिकन बेटावर पहिल्यांदा आफ्रिकन लोकांना गुलाम करून साखरउत्पादन सुरू झालं.

लगोलग पेर्नामबुको (Pernambuco) आणि साओ विन्सेंच्ये (Sao Vincente) यांसारख्या उष्ण कटिबंधातल्या बेटांवर आफ्रिकन गुलामांकरवी उसाची लागवड आणि साखरेचं उत्पादन सुरू झालं. पोर्तुगिजांचे हे पहिले काही प्रयोग यशस्वी झाल्यावर इतर वसाहतवादी देशांनीही निर्धोकपणे आफ्रिकेतून गुलाम आणून साखरेसाठी म्हणून वेगवेगळ्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळातला साखरेचा नकाशा


१४९३मध्ये कोलंबस दुसऱ्यांदा अमेरिकेला पोहोचला. या वेळी त्यानं लागवडीसाठी म्हणून सोबत ऊस नेला होता. कोलंबसनं वसाहतवादी देशांना एक नवीन जग दाखवलं. इंग्रजीत याला 'न्यू वर्ल्ड' असंच नाव आहे. ब्राझील, कोलोम्बिया, पेरू, आणि क्युबा यांसारख्या कॅरिबियन समुद्रातील बेटांवर ऊस लागवडीसाठी पूरक असं हवामान होतं. यथावकाश वसाहतवादी गटांनी इथले विविध प्रांत बळकावले.

या राज्यांची आपापसात बरीच लहानमोठी युद्धं होत असत. त्यामुळे ब्राझील कधी पोर्तुगिजांचा असायचा, तर कधी डच सत्तेखाली असायचा. सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत ही सत्तान्तरं होत राहिली. पण ढोबळमानाने बघायचं झालं, तर ब्राझीलची किनारपट्टी आणि मुख्य ब्राझील पोर्तुगिजांचा होता. जमेका, बार्बाडोस आणि वेस्ट इंडिजमधली इतर काही बेटं इंग्रजांची होती. लुईज़ीयाना, आईती (सँ दोमिंग), मार्तिनिक, ग्वाद्लूप यांवर फ्रेंच सत्ता होती. ब्राझील सोडल्यास बहुतांश दक्षिण अमेरिका आणि क्युबा स्पेनच्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. एकमेकांवर कुरघोड्या करून सत्ता जरी बदलत असली, तरी उसाच्या मळ्यांमध्ये अहोरात्र खपणारं मनुष्यबळ मात्र सगळीकडे सारखं होतं – आफ्रिकेतून आणलेल्या माणसांचं.

खडतर समुद्रप्रवास

आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याच्या काही भागाला 'स्लेव्ह कोस्ट' असं नाव पडलं आहे. उत्तरेकडच्या सेनेगालपासून सुरू होऊन दक्षिणेकडील अंगोला या देशांच्या मधल्या ३४०० मैल लांब किनारपट्टीवरून गुलामांचा व्यापार चालायचा. सतराव्या शतकापर्यंत गुलामांच्या खरेदी-विक्रीला संघटित व्यापाराचं स्वरूप आलं होतं. गुलामांच्या वाहतुकीसाठी मोठमोठी जहाजं बाळगणारे आणि गुलामांची बोली लावणारे दलाल तयार झाले. गोऱ्या (उसाची लागवड असलेल्या) मळेधारकांचे आफ्रिकन लोकांची निवड करण्याचे अनेक निकष होते. वय, लिंग, अंगकाठी, कधीकधी जमातही बघितली जायची. कोणत्या जमातीचे आफ्रिकन लोक चांगले गुलाम होऊ शकतात याचाही अभ्यास झाला होता. उदाहरणार्थ, कोरोमांटी जमातीतले लोक बंडखोर असतात, तर इबोस जमातीतले लोक गरीब असतात पण आत्महत्येला बळी पडणारेही असतात असं अनुभवी मालकांचं निरीक्षण होतं! या लोकांना पकडून आणणारे दलाल कुणालाही सोडत नसत, अगदी राजघराण्यातल्या बायकांचीही गुलामगिरीत रवानगी केली जायची.

पकडून आणलेल्या लोकांची सर्जनकडून नीट तपासणी व्हायची. शारीरिक व्यंग असलेल्या किंवा अशक्त असलेल्या ‘नशीबवान’ लोकांना सोडून देण्यात यायचं. मुळातच विवेक बाजूला ठेवून करायची एखादी कृती अंगवळणी पडल्यावर ती करत असताना हळूहळू तिथे विकृतीही उत्पन्न होते. गुलाम निवडण्याच्या पद्धती रूढ झाल्यावर समोर असलेल्या व्यक्तीचा आत्मसन्मान ठेचायच्या विविध प्रथा सुरू झाल्या. लोकांना विवस्त्र करून उड्या मारून दाखवायला लावणे, स्त्री आणि पुरुषांच्या गुप्तांगांची 'नीट' तपासणी करणे अशा पद्धती रूढ झाल्या. गुलामांच्या वाहतुकीसाठी बांधलेल्या जहाजाची रचनाच जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या हेतूनं केलेली असायची. प्रत्येक माणसाकरिता लांबीला पाच फूट, रुंदीला तेवीस इंच आणि उंचीला अकरा इंच इतकीच जागा असायची.

जहाजाचे स्किमॅटिक
जहाजाचे चित्र येथून

या जागेत प्रवाशांना दाटीवाटीनं झोपावं लागायचं. पुरुषांना साखळदंडांनी बांधून घातलेलं असायचं. स्त्रियांना आणि लहान मुलांना वेगळं ठेवण्यात यायचं. प्रवासादरम्यान जहाजावरचे अधिकारी स्त्रियांवर सतत बलात्कार करत असत. इतक्या हालांत ठेवूनही दलालांना जहाजावरच्या प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा असायचा. कारण जहाजावर मरण पावलेले लोक म्हणजे आर्थिक तोटा! म्हणून दाटीवाटीनं कोंबलेल्या माणसांना दिवसातून एकदा मोकळ्या हवेत नेऊन व्यायाम करण्याची सक्ती केली जायची. काही जणांना असह्य होऊन ते अन्नपाणी सोडून द्यायचे. अशा लोकांना जबरदस्तीनं जेवायला घातलं जायचं. याव्यतिरिक्त, जहाजावरच्या प्रवाशांनी बंड पुकारू नये यासाठी त्यांना सतत बांधून घालायची व्यवस्था करावी लागायची. अनेकदा, बांधून न घातलेल्या स्त्रिया बंड घडवून आणायच्या कारवाया करायच्या पण असे उद्रेक ठेचण्याची क्षमता त्यांना घेऊन जाणारे बाळगून असायचे.


ईप्सित स्थळी पोचल्यावर गुलामांचे बाजार भरवले जायचे. एक मेणबत्ती जळून एक इंच कमी होईपर्यंत बोली घेण्याची प्रथा होती. आणि नंतर विकत घेतलेल्या गुलामांना त्यांचे मालक बरोबर घेऊन जायचे. अशी विक्री झाल्यावर अनेकदा कुटुंबांची ताटातूट व्हायची; आणि आपल्या प्रेमाची माणसं आता कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाहीत या जाणिवेनं सगळा बाजार आक्रोशानं भरून जायचा.

या दिव्यातून बाहेर येऊन नवीन घरी आल्यावर मालकाच्या नावाचा अगर निशाणीचा लोखंडी शिक्का तापवून, त्यांच्या गालावर किंवा खांद्यावर मालकीचा एक व्रण दिला जायचा. जेणेकरून जर कधी एखादा गुलाम पळून गेला तर त्याची मालकी सिद्ध करता यावी. त्यानंतर, त्यांचं मूळ नाव बदलून त्यांना एखादं 'सोपं' नाव दिलं जायचं.

पळालेला माणूस तुरुंगात
प्रतिमा स्रोत : लूइजियाना डिजिटल लायब्ररी

मळे आणि कारखाने

आफ्रिकेतून 'नवीन जगा'त स्थलांतर झाल्यानंतर उसाच्या मळ्यांत आणि साखर कारखान्यांत गुलाम केलेल्या माणसांना रोज सरासरी अठरा तास काम करावं लागायचं. तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली, तरी आजही गळीत हंगाम चालू असताना एखाद्या साखरकारखान्यात दिवसभर थांबणं कष्टाचं काम असतं. जिथे सतत रस उकळत ठेवलेला असतो ती जागा अशी कितीशी सुसह्य होऊ शकेल? उष्णता, दमटपणा, सतत उडणारे चिपाडांचे कण, संपूर्ण आवारात भरून राहिलेला मळीचा वास यांमुळे आजही साखर-कारखान्यात काम करणं कष्टाचंच आहे. एखाद्या हमरस्त्यावरून जाताना तो परिचित मळीचा वास आला, की जवळपासच कुठेतरी साखर-कारखाना आहे हे लक्षात येतं.

सतराव्या शतकात वाफेवर चालणारे कारखाने आले नव्हते. त्यामुळे रस उकळण्यासाठी लाकूडफाटा किंवा थेट उसाची चिपाडं जाळली जात. उसाचा रस काढणे, तो एका पाठोपाठ एक लावलेल्या मोठमोठ्या बॉयलरांमध्ये उकळणे, चुना वापरून साखर तयार करणे, साखरेपासून वेगळ्या केलेल्या मळीतून पुन्हा साखर किंवा रम तयार करणे - ही सगळी कामं गुलाम करायचे. आजच्या काळात ऊस एकदा गाळपयंत्रात (क्रशरमध्ये) घातल्यावर त्याची साखर होईपर्यंत तिथे प्रत्यक्ष मानवी सहभाग फार कमी लागतो. पण त्या काळी यातली बरीच कामं माणसं थेट, जीव धोक्यात घालून करत असत.

निरीक्षण

ऊसगाळप (crushing) चालू असताना, अनेकदा काम करणाऱ्या लोकांचे हात गाळपयंत्रात अडकायचे. ते वेळीच सोडवले नाहीत तर व्यक्ती त्या यंत्रात पूर्णपणे खेचली जायची. त्यामुळे एखाद्याचा हात यंत्रात अडकला तर तो कापून टाकण्याशिवाय इलाज नसायचा. अतिश्रमाने, भुकेमुळे ग्लानी येऊन अनेक मजुरांचे हात असे यंत्रांत अडकायचे आणि कापून टाकले जायचे. वोल्तेअरच्या (Voltaire) काँदिदमध्ये (Candide) एक अतिशय बोलकं चित्रं आहे. त्यात एक हात आणि पाय नसलेला कृष्णवर्णीय माणूस समोरच्या सधन दिसणाऱ्या व्यक्तींना उद्देशून म्हणत आहे, "युरोपमध्ये साखर खाता येण्याची ही किंमत आहे."

(गुलाम) स्त्रीच्या बाळंतपणामुळे तिची उत्पादनक्षमता कमी होणं 'परवडत' नसल्यामुळं, गरोदर स्त्रियांना शेवटच्या क्षणापर्यंत कामाला जुंपलं जायचं आणि मूल झाल्यानंतर दोन आठवड्यांत त्या बाळाला झोळीत घालून पुन्हा कामावर रुजू व्हायच्या. ठरावीक काळानंतर बाळाला स्तनपान देण्याची परवानगी स्त्रियांना नसायची, त्यामुळे वृद्ध बायकांकडे मुलं सोपवून त्यांना पीठ आणि पाण्याचं पातळ मिश्रण करून भरवलं जायचं.

ऊसमळ्यांवरची समाजव्यवस्था

मालकाचा किंवा इस्टेटीची देखरेख करणाऱ्या गोऱ्या माणसाचा एक भला मोठा बंगला असायचा. त्याला 'ग्रेट हाऊस' किंवा अशाच प्रकारचं काही नाव असायचं. या बंगल्यात काम करायलाही अनेक गुलाम असायचे. घरात काम करण्यासाठी कृष्णवर्णीय निवडताना, त्यातल्या त्यात गहूवर्णीय, दिसायला सुंदर अशा स्त्रिया निवडल्या जायच्या. बागकाम आणि घरातली इतर कष्टाची कामं करायला पुरुष निवडले जायचे. मळ्यांत आणि कारखान्यांत काम करण्यापेक्षा घरातली कामं सोपी असली तरी सतत गोऱ्या लोकांबरोबर वावर असल्यानं इथलं जगणं जास्त तणावपूर्ण असायचं. क्षुल्लक गोष्टीवरून मालकाचा मार खायची वेळ यायची आणि स्त्रियांवर सतत गोरे पुरुष लैंगिक अत्याचार करायचे. घरातल्या पुरुषाला आवडणाऱ्या गुलाम स्त्रीला सतत त्याच्या बायकोबरोबर राहायला लागल्यामुळे वेगळ्याच प्रकारचा ताण अनुभवावा लागायचा.


घरातल्या कृष्णवर्णीय स्त्रियांवर अत्याचार केल्यामुळे किंवा संमतीने प्रेमसंबंध ठेवल्यामुळे मुलं जन्माला यायची. अशी मिश्र वंशांची मुलं जन्माला येण्याचं प्रमाण बरंच होतं; इतकं की गोऱ्या लोकांनी त्यासाठी एक वर्णव्यवस्थाच सुरू केली होती.

गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा दोन व्यक्तींच्या (यामध्ये गौरवर्णीय पुरुषच असायचा) अपत्याला 'म्युलाटो' म्हणायचे. म्यूल म्हणजे खेचर - घोडा आणि गाढव यांचं अपत्य! म्युलाटो आणि कृष्णवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला 'सांबो' असं नाव ठेवलं होतं. सांबो आणि कृष्णवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला पुन्हा कृष्णवर्णीयाचा दर्जा मिळायचा. उलट दिशेला - म्युलाटो आणि गौरवर्णियाच्या अपत्याला 'क्वाड्रून' (quadroon) म्हणायचे. क्वाड्रून आणि गौरवर्णियाचं अपत्य 'मस्टी'. मस्टी आणि गौरवर्णीयाचं अपत्य 'मस्टीफिनो'. मस्टीफिनो पुन्हा 'शुद्ध' झाला तर 'क्विनट्रून' (quintroon). क्विनट्रून आणि गौरवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला 'ऑक्टोरून' म्हणायचे. या शेवटच्या दोन वर्णांना गौरवर्णीयांचा दर्जा दिला जायचा कारण त्यांच्या दिसण्यातून तो स्पष्ट होत असे.

गुलामांची वस्ती मुख्य बंगल्यापासून दूर, जेणेकरून त्यांच्या आवाजांचा आणि वासांचा त्रास होणार नाही अशी असायची. मळेधारक गुलामांच्या अन्नपाण्याची जबाबदारी सहसा घ्यायचे नाहीत. पुरवठा केलाच तर तो अत्यल्प आणि पुरेसा पोषक नसायचा. पण गुलामांना त्यांचं अन्न उगवता/पाळता यावं यासाठी जमिनीचे तुकडे दिले जायचे. हे तुकडे, एका अर्थानं स्वातंत्र्याचे तुकडे होते असं म्हणता येईल. तिथे स्त्रिया त्यांच्या खाद्यसंस्कृतीत वापरली जाणारे कंदं, भाज्या, बिया लावायच्या. ते विकून त्यांना थोडे पैसेही मिळवता यायचे. या शेतीमुळं एक वेगळीच खाद्यसंस्कृती जन्माला आली. लुईज़ीयानातल्या, न्यू ऑर्लीन्सच्या प्रसिद्ध 'गंबो' सूपामागे क्रिओल खाद्यसंस्कृतीचा हा मोठा इतिहास आहे. पश्चिम आफ्रिकेतल्या बांटू भाषेत भेंडीला 'कि गंबो' (ki ngombo) म्हणतात. गंबोमध्ये दाटपणा यावा यासाठी भेंडीचा रस वापरला जातो. म्हणून त्याचं मूळ आफ्रिकेत आहे असं काही जण मानतात. पण असाच दाटपणा यावा यासाठी, फ्रेंच 'रू' (roux) ही गरम तेलात पीठ शिजवून सूपामध्ये घालण्याची पद्धतही वापरतात. त्यामुळे काही लोकांना याचं मूळ फ्रेंच संस्कृतीत आहेत असं वाटतं. तसंच, १७५५मध्ये आताच्या नोव्हा स्कॉशियामधून (Nova Scotia) ब्रिटिशांनी फ्रेंच लोकांना हुसकावून लावलं. त्यांनी मग न्यू ऑर्लीन्समध्ये स्थलांतर केलं. त्या लोकांना 'केजन' (cajun) असं नाव पडलं. गंबोनिर्मितीत केजन मसाल्यांचाही समावेश आहे असंही मत आहे. शिवाय, ससाफ्रास या झाडाची पानंही (फिले पावडर) या पाककृतीत वापरली जातात त्यामुळे अमेरिकेतल्या मूळ इंडियन संस्कृतीचाही प्रभाव या पदार्थावर आहे असं मानलं जातं. या पदार्थावर हक्क सांगणारे, किंवा त्या पदार्थाचं मूळ निर्विवाद आफ्रिकन संस्कृतीत आहे असं न मानणाऱ्या लोकांमुळे, गंबो सूप एक राजकीय मुद्दा झाला आहे. असं असलं तरीही, न्यू ऑर्लीन्सच्या इतिहासात झालेल्या अनेक स्थित्यंतराची साक्ष गंबो देतं.

जुन्या जगातून (म्हणजे युरोप, आफ्रिकेतून) नव्या जगात आलेल्या गुलामांच्या पुढच्या पिढ्यांना 'क्रिओल' संबोधलं जाऊ लागलं. हा शब्द फक्त गुलामांसाठी नसून नव्या जगात जन्माला आलेल्या कोणाही आफ्रिकन किंवा युरोपियन वंशाच्या व्यक्तीसाठी वापरला जायचा. काही पिढ्या नव्या जगात स्थिरावल्यावर, क्रिओल विरुद्ध आफ्रिकन असेही गट गुलामगिरीत असलेल्या लोकांमध्ये तयार झाले. आणि त्यांच्यातही एक उतरंड तयार होऊ लागली.

सतत एकसारखं, तरीही लक्ष देऊन करावं लागणारं कंटाळवाणं, दमवणारं काम करत असताना आफ्रिकन लोक आपल्या संस्कृतीतल्या संगीताचा आधार घ्यायचे. दिवसभराच्या कामाचा थकवा व्यक्त करणारी, आणि गुलामगिरीतून मुक्ती देण्यासाठी देवाकडे साकडं घालणारी अनेक गाणी, उसाची लावणी, तोडणी करताना गायली जायची. आफ्रिकेतून आलेल्या संगीताकडून प्रेरणा घेऊन अमेरिकेतलं जॅझ, ब्लूज, आणि आर 'एन' बी पद्धतीचं संगीत जन्माला आलं. कृष्णवर्णीय लोक, त्यांच्या चर्चमध्ये गाऊ लागले. या गाण्यांमध्ये भाषा जरी इंग्रजी असली, तरी संगीत आफ्रिकेतल्या विविध संस्कृतींतून आलेलं असायचं. याला 'निग्रो स्पिरिच्युअल' (त्या काळी रूढ असलेला शब्द) असं नाव पडलं. पुढे याच संगीतातून, अमेरिकेत गुलाम केलेल्या लोकांची स्वातंत्र्यगीतं तयार झाली.

गुलाम केलेल्या आफ्रिकन लोकांमध्ये धार्मिक लग्नव्यवस्था रुजवण्याला मळेधारकांचा विरोध असायचा. यामागे अनेक कारणं होती. धर्माच्या आधारानं कोणत्याही प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळू नये हा एक हेतू. तसंच, कृष्णवर्णीय बायकांवरची सत्ता गमावण्याची असुरक्षितता. लग्नामुळे हमखास येणाऱ्या संततीचा भारही मालकांना नको होता. मालकांना प्रेमसंबंधांचं वावडं नसलं, तरी कोण कोणाच्या प्रेमात आहे याच्या मागावर ते असत आणि अशा संबंधाबद्दल त्यांना आपणहून माहिती देण्याची सक्तीही गुलामांवर असे. सुरुवातीला, आफ्रिकेतून गुलाम आणले जात तेव्हा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण कमी असायचं. पण हे प्रमाण वाढल्यावरही, मुळातच असुरक्षिततेचं आयुष्य जगत असल्यानं गुलामांना लग्नव्यवस्थेचं फार काही आकर्षण नव्हतं.

आयतीचा 'स्वातंत्र्यलढा'

आयती हैती
चित्रश्रेय: द न्यू यॉर्क टाइम्स

१४९२मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस आयतीत (Haiti) पोहोचला. कॅरिबियन समुद्रात क्युबा आणि प्वेरतो रिको (Puerto Rico) या दोन बेटांच्या मध्ये वसलेलं हे बेट आहे. त्यानं त्या बेटाचं नाव इस्पान्योला, म्हणजेच 'छोटं स्पेन' असं ठेवलं. १४९६मध्ये सान्तो दॉमिंगोमध्ये (Santo Domingo) - आजच्या डॉमिनिकन रिपब्लिकची राजधानी - स्पेनची वसाहत स्थापन झाली. पुढे १६९७मध्ये, बऱ्याच लहानमोठ्या लढाया झाल्यावर, स्पेननं त्या बेटाचा पश्चिमेकडचा भाग फ्रेंचांना देऊन टाकला आणि तो सँ दोमांग (Saint Domingue) झाला. १७९१मध्ये तेव्हाच्या सँ दोमांग आणि आताच्या आयतीमध्ये एक अभूतपूर्व बंड झालं. आयती आज पश्चिम गोलार्धातला सगळ्यांत गरीब देश आहे. तसा तो पूर्वी नव्हता. सतराव्या शतकात, आयती फ्रान्सची साखर-वसाहत होती. काप-फ्रॉन्से (Cap‑Français ) या आयतीतल्या शहरात एके काळी इतकी सुबत्ता होती, की तिला 'अँटीलीजचं (Antilles) पॅरिस' म्हणलं जायचं. आयतीमधून युरोपात प्रचंड साखर निर्यात होऊ लागली. त्यामुळे आफ्रिकेतून अटलांटिकमार्गे येणाऱ्या गुलामांपैकी जवळपास ३७% आयतीमध्ये आणले जाऊ लागले. त्यांची संख्या इतकी प्रचंड झाली, की आयातीच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ९०% लोक आफ्रिकेतून आणलेले कृष्णवर्णीय झाले.

हा जमाव आपल्यावर भारी पडू शकतो याची सुप्त जाणीव असल्यानं आयतीमधले स्थानिक फ्रेंच राज्यकर्ते गुलामांचा अनन्वित छळ करायचे. त्यांना देण्यात येणाऱ्या अनेक शिक्षांपैकी एक शिक्षा म्हणजे त्यांच्या गुदद्वारात दारूगोळा भरून त्यांना तोफगोळ्यासारखं उडवून टाकायचं. या अशा विकृतींच्या चर्चा फ्रान्सपर्यंत पोहोचल्यावर, त्या थांबवण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडूनही होऊ लागले इतक्या भयानक कृती तिथे होत होत्या.

याचा परिणाम, आणि आपल्या संख्याबळाचा अंदाज या दोन गोष्टींमुळे, आयतीमधल्या गुलामांनी १७९१मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारलं आणि पुढच्या दहा एक वर्षांत ते स्वातंत्र्य मिळवण्यात यशस्वीही झाले. तूसँ लूवेर्त्यूर (Toussaint L’Ouverture) या क्रांतिकारी नेत्यानं त्यांना एकत्र आणलं. फ्रान्सनं लूवेर्त्यूरला तुरुंगात टाकलं जिथे स्वातंत्र्य मिळायच्या एक वर्ष आधी त्याचा मृत्यू झाला. गुलामगिरीत असलेल्या लोकांनी वसाहतवादी राष्ट्रांच्या सत्तेला उलथवून लावून स्वतःचा देश स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. याचा योग्य तो धसका इतर वसाहतवादी सत्तांनी घेतला. आयतीच्या स्वातंत्र्यलढ्याकडे इतर देशांनी जाहीर दुर्लक्ष केलं, पण असं काही आपल्याकडे होऊ नये यासाठी हे देश अधिकाधिक काळजी घेऊ लागले.

फ्रान्सला हा पराभव सहन झाला नाही. स्वतंत्र आयतीवर सतत फ्रेंच आक्रमणाची टांगती तलवार असायची. असं आक्रमण होऊ नये यासाठी फ्रेंच राज्यकर्त्यांबरोबर वाटाघाटी झाल्या आणि त्यातून आयतीनं स्वातंत्र्य मिळवून ज्या मळेधारकांचं आर्थिक नुकसान केलं, त्यांना भरपाई द्यावी असा 'तोडगा' निघाला! आयतीसारख्या नव्या देशाला हे निर्बंध फारच महागात पडले. लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. फ्रेंच राजानं मग त्यांना फ्रेंच बँकांकडून कर्ज घ्यायला भाग पाडलं. एक कर्ज फेडायला इतर अनेक कर्जं घेऊन आयती अधिकाधिक गरीब होत गेला. फ्रेंच बँकांना मात्र यातून धो-धो पैसा मिळाला. तसंच, ज्या सरदारी कुटुंबांना ही नुकसानभरपाई मिळत होती त्यांच्याकडून कर वसूल केल्यानं फ्रेंच राज्यकर्त्यांचाही अप्रत्यक्ष फायदा झाला. आयतीनं फ्रान्सला किती पैसे दिले याचा नेमका हिशोब सापडणं आजही कठीण आहे. पण न्यू यॉर्क टाइम्सनं २०२२ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून तो आकडा आजच्या काळचे साधारण रोख ५६ कोटी डॉलर इतका होतो. एवढे पैसे जर आयतीनं त्यांच्या देशातल्या वीज, रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अशा मूलभूत सुविधांमध्ये गुंतवले असते, तर त्या गुंतवणुकीची एकूण किंमत आज २१०० कोटी डॉलर एवढी झाली असती.

अर्थात, या आर्थिक अधोगतीमागे निर्बंध हे एकच कारण नव्हतं. सरकारी भ्रष्टाचार हेही एक कारण होतंच. पण अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यावरही हा देश आर्थिक गुलामगिरीत खितपत पडला. या निर्बंधांकडे आणि त्यामुळे आयतीच्या जनतेला आलेल्या गरिबीकडे जगानं सोयीस्करपणे दुर्लक्षच करायचं ठरवलं.

तंत्रज्ञानाची झेप आणि गुलामगिरीचा अंत

१७९४मध्ये वाफेवर चालणाऱ्या गाळपयंत्राचा शोध लागला आणि १७९७ साली, स्पेनच्या क्युबा वसाहतीत पहिलं वाफेवरचं गाळपयंत्र वापरलं जाऊ लागलं. ही यंत्रं अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे प्रयोग जगभरातच सुरू झाले कारण ऊसगाळप ही साखर निर्मितीतली अत्यंत वेळखाऊ आणि जोखमीची प्रक्रिया होती. १८२० उजाडता, वाफेवरची जवळपास दोनशे गाळपयंत्रं अटलांटिक ओलांडून वसाहतींमध्ये आली होती. एव्हाना, आयतीच्या स्वातंत्र्यामुळे साखरनिर्मितीत पडलेला खड्डा क्युबामध्ये तयार होणाऱ्या साखरेनं भरून काढला होता. तसंच, अमेरिकेतल्या फ्रेंच लुईजियानामध्येही ही यंत्रं येऊ लागली.

याच दरम्यान, उसाव्यतिरिक्त कोणकोणत्या फळांतून, कंदांतून साखर तयार करता येऊ शकते यावर जगभरात संशोधन सुरू झालं. या ध्यासामागे अनेक कारणं होती. पण त्यांतलं मुख्य कारण म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, आणि पोर्तुगाल यांसारख्या देशांची उसापासून तयार झालेल्या साखरेच्या व्यापारावर असलेली घट्ट पकड हेच होतं. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या आपापसातल्या स्पर्धेत एकमेकांना साखर मिळू नये यासाठी विविध क्लृप्त्या काढल्या जायच्या. या संघर्षातूनच युरोपात बिटापासून साखर तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं. ही साखरेसाठीची बिटं म्हणजे आपण खातो ती लाल बिटं नव्हेत. भरपूर सुक्रोज असलेली पांढरी 'शुगर बीट' असतात. ही साखर उसापासून तयार केलेल्या साखरेपेक्षा महाग पडायची, अजूनही महागच पडते; पण युरोपात अनुदान देऊन ती स्वस्त ठेवली जायची/जाते.

बिटापासून साखर तयार करायचं तंत्रज्ञान विकसित होत असताना, जगाला 'व्हॅक्युम पॅन' मिळालं. या शोधामुळे उसाचा रस शंभर अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाला उकळवता येऊ लागला. एडवर्ड चार्ल्स हावर्ड या ब्रिटिश केमिकल इंजिनियरनं हा शोध लावला आणि युरोपातून इतर वसाहतींमध्ये लवकरच व्हॅक्युम पॅन पोहोचलं. यामुळे, साखर तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली आणि जलदही.

व्हॅक्युम पॅनसारखं तंत्रज्ञान जरी उपयुक्त असलं, तरी सगळ्याच उद्योजकांना अशी तंत्रज्ञानं वापरायचा उत्साह नसायचा. विज्ञानाची, बदलाची भीती आणि अंगी मुरलेली सरंजामी वृत्ती या कारणांनी त्यांना गुलामगिरीच अधिक सोयीची वाटायची. पण १८३९ साली आलेलं एक यंत्र मात्र सगळ्यांनाच लवकरात लवकर हवं होतं. साखरेतून मळी वेगळी करण्यासाठी ती आपणहून गळून जाऊ देण्याव्यतिरिक्त काहीच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. १८३९ साली कापड वाळवण्यासाठी म्हणून तयार झालेलं सेंट्रीफ्यूज यंत्र साखर उद्योगात साखरेपासून मळी वेगळी करण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. वाफेवर चालणारी गाळपयंत्रं, व्हॅक्युम पॅन, आणि सेंट्रिफ्यूज या तीनही शोधांनी साखरनिर्मितीचे विविध टप्पे सोपे केले.

याच दरम्यान युरोपात 'एन्लाइटनमेन्ट' चळवळ उदयाला आली. गुलामगिरी बंद व्हायला हवी यासाठी अनेक युरोपियन विचारवंत प्रचार करू लागले. सामान्य नागरिकांनादेखील आफ्रिकन लोकांचे हाल करून निर्मिलेली साखर नकोशी होऊ लागली. इंग्लंडात सर्वांत आधी ही गुलामगिरीविरोधी चळवळ चालू झाली. १८०७ साली ब्रिटननं गुलामगिरीविरोधात कायदा आणून ती बंद करायचा निर्णय घेतला. असं असलं, तरी त्यापुढे अनेक वर्षं ब्रिटनमध्ये गुलामांकरवी तयार केलेली साखर क्युबासारख्या देशांतून येत होती. दुसरीकडे, साखरनिर्मितीचं तंत्रज्ञान अधिक सुरक्षित आणि जलद झाल्यानं उत्पादकांचं मनुष्यबळावरचं अवलंबित्व कमी होऊ लागलं. हे आधुनिक तंत्रज्ञान समजणारे लोकही उच्चशिक्षित गौरवर्णीय होते. हळूहळू जिथे आफ्रिकन गुलाम दिवसभर कष्टाचं काम करायचे, तिथे गोरे अभियंते 'प्रक्रियेची देखरेख' करायला नेमले जाऊ लागले. सगळ्या वसाहतींमध्ये हळूहळू युरोपातून असे अभियंते आणि तंत्रज्ञ येऊ लागले. १८५०-६०च्या आसपास लुईजियानामध्ये अशा तंत्रज्ञांचा पगार महिन्याला १५० डॉलर इतका असायचा (आताचे वार्षिक $७२०००). पिढ्यानुपिढ्या शिक्षणापासूनच नव्हे, तर दोन वेळच्या चौरस आहारापासूनही जे वंचित राहिले होते, त्या आफ्रिकन वंशाच्या लोकांना अशा प्रकारचं तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातून रोजगार मिळायची संधी दुरापास्तच होती. इतकी वर्षं तंत्रज्ञान मागास आणि जीवावरही बेतणारं असताना ज्यांना सक्तीनं, मोबदल्याविना कारखान्यांत कामाला जुंपलं जायचं, त्यांची जागा तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर भरपूर पगार घेणारे गौरवर्णीय घेऊ लागले.

आयतीचा स्वातंत्र्यलढा त्या देशाला महागात पडला असला, तरी ती घटना दोन्ही बाजूंसाठी एक 'मिसाल' ठरली. अठराव्या शतकात अनेक वसाहतींतून लहानमोठी बंड होऊ लागली. आणि वसाहतवादी शक्तीही गुलामगिरीत असलेल्या लोकांपुढे नमतं घेऊ लागल्या. प्रत्येक वसाहतीचा 'ब्लॅक कोड' असायचा. कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा असावी हे त्यात लिहिलेलं असायचं. कृष्णवर्णीयांच्या सगळ्याच लहानमोठ्या 'गुन्ह्यांसाठी' अतिशय कडक शिक्षा असत. आयतीच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर अनेक वसाहतींतून या शिक्षा सौम्य करण्यात आल्या. आफ्रिकेतून मनुष्यबळ आणण्यावर आता लवकरच बंदी येईल या भीतीनं गुलामगिरीत असलेल्या बायकांना मुलं जन्माला घातल्याबद्दल बक्षिसं मिळू लागली. तसंच गरोदरपणी त्यांना बरा आहार आणि थोडी विश्रांती देण्यात येऊ लागली!

गुलामगिरीचा अंत अचानक झाला नाही. ब्रिटनमध्ये कायदा केला असला, तरी ती वसाहतींतून नष्ट करण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. गुलामगिरीत असलेल्या लोकांकडून साखर तयार करून घेण्यापेक्षा भारतात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करावं अशी एक चळवळ सुरू झाली. भारतातल्या अनेक धनिकांनी आणि संस्थानिकांनी यात पुढाकार घेतला खरा, पण भारतात शेतीशी निगडित समाजव्यवस्था इंग्रज मोडू शकले नाहीत. शेतकरी साखर-कारखान्यांसाठी म्हणून सतत ऊस लावायला तयार होत नसत आणि भारतात खांडसरी उद्योग अनेक शतकं रुजला होता. ती व्यवस्थाही या नवीन कारखान्यांना भीक घालेना. मग ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मॉरिशसकडे मोर्चा वळवला. काहीही असलं तरी जमैका, बार्बाडोसमध्ये ज्या प्रमाणात साखर तयार होत होती तिथवर पोहोचायची क्षमता या नवीन प्रयोगांतून गाठता येईना. मग, ब्राझील आणि क्युबासारख्या अजूनही गुलामगिरीत असलेल्या इतर राष्ट्रांच्या वसाहतींतून ब्रिटनमध्ये साखर येऊ लागली. यासाठी त्या साखरेवर असलेला आयात कर कमी करण्यात आला. अशा प्रकारची साखर ब्रिटनमध्ये येऊ लागल्यावर पुन्हा नागरिकांच्या चळवळींतून त्याला विरोध होऊ लागला. १८३३मध्ये ब्रिटननं 'इमॅन्सिपेशन' कायदा लागू केला. या कायद्यान्वये, वेस्ट इंडीजमध्ये गुलामगिरीत असलेल्या लोकांना मुक्त करून काही वर्षं आहे त्याच मालकाकडे 'अप्रेन्टिस' म्हणून काम करावं असा प्रस्ताव होता. यामागे त्यांना मुक्तपणे कसं जगायचं हे शिकता येईल हा हेतू होता. गुलामगिरीचा अंत एका घावात व्हावा की हळूहळू, याबद्दलही दोन मतप्रवाह होते. इमॅन्सिपेशन कायदा गुलामगिरीत असलेले लोक हळूहळू मुख्य प्रवाहात येऊ शकतील या दृष्टीकोनातून केला होता. तसंच,मळेवाल्यांमध्ये जी घबराट पसरली होती त्यावरही हा मध्यमार्ग होता. ब्रिटिश वसाहतींमधली गुलामगिरी अशी हळूहळू संपली. उत्तर अमेरिकेत गुलामगिरी हवी असणारे आणि तिला विरोध करणारे असे दोन गट पडून यादवी युद्ध झालं. १८६५ साली हे युद्ध संपल्यावर अमेरिकेतली गुलामगिरीदेखील संपली.


युरोपातला गुलामगिरीविरोधी सूर ओळखून भांडवलशाहीनं तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मग 'नैतिक साखर' तयार करायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भांडवलशाहीला 'उपरती' झाली आणि ग्राहकांची 'स्वच्छ' साखरेची मागणी नफेखोरीला विशेष धक्का न लागता पूर्ण होऊ लागली.

थोडक्यात, गुलामगिरीत असलेल्या लोकांच्या संख्याबळाची आणि उठावाची धास्ती, मायदेशातल्या नागरी चळवळी, आणि साखर उत्पादन सोपं करणारं तंत्रज्ञान या तीन कारणांमुळे हळूहळू गुलामगिरीचा अंत झाला. पण जी व्यवस्था केवळ आर्थिक फायद्यासाठी उभी केली होती, ती राबवत असताना वर्णभेदाची दुर्दैवी परंपरा रुजली. गुलामगिरीच्या बाजूनं युक्तिवाद केले जायचे तेव्हा अनेक वैद्यकीय शोधनिबंध लिहिले गेले, ज्यांमध्ये आफ्रिकन लोकांच्या कातडीची जाडी, त्यांच्या मेंदूचा आकार, त्यांच्या स्वभावाचं 'मानसशास्त्रीय' विश्लेषण करून ते गुलामगिरीसाठीच योग्य आहेत असे निष्कर्ष काढले गेले. हे असे छद्मविज्ञानामुळे रुजलेले समज, विज्ञानाच्या पातळीवर जरी खोडून काढले गेले असले, तरी ते वर्णद्वेषाला पूरक ठरले आणि परंपरेसारखेच चालत राहिले ही खेदाची बाब आहे.

गुलामगिरीचा अंत होण्यासाठी अनेक विवेकी लोक लढले. गुलामगिरीला विरोध करणारे लोक दोन्ही बाजूंना होते. एका बाजूसाठी तो त्यांच्या अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा प्रश्न होता, तर दुसऱ्या बाजूसाठी तो एक महत्त्वाचा नैतिक प्रश्न होता. सत्तेला असे नैतिक प्रश्न विचारणारे नेते दोन्ही समूहांत तयार झाले. पण गुलामगिरी संपली म्हणून एखाद्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला सहज जमीन घेता येऊ लागली का? तर नाही. गुलामगिरीत राहिलेल्या निरक्षर लोकांना नवीन तंत्रज्ञान चालवणाऱ्या अभियंत्यांचे पगार मिळू लागले का? नाही. आफ्रिकन वंशाच्या लोकांप्रति असलेला द्वेष, वर्णभेद संपुष्टात आला का? नाही.

याकडे अजून थोड्या विस्तृत परिप्रेक्ष्यातून बघितलं तर जाणवतं, की एका वर्णाचे मूठभर लोक दुसऱ्या वर्णाच्या असंख्य लोकांवर अशी सत्ता गाजवू शकायचे कारण त्यांच्याकडे भांडवल असायचं. आणि ते वाढवण्यासाठी, कोणत्याही प्रकारे शोषितांवर सत्ता गाजवण्याचा निर्धार असायचा. शोषण करणारे आणि शोषित असे दोन गट असणाऱ्या कोणत्याही समाजव्यवस्थेचं उदाहरण घेतलं तर असं लक्षात येतं, की समाजात असे भेदभाव निर्माण करण्यामागे बहुतेक वेळा सत्ताधीशांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असायचे. सुरुवातीला, राजे, त्यांना भांडवल/कर्ज पुरवणारे सावकार, आणि शूर खलाशी असे गट होते. कालांतरानं त्यांचं सरकारं-बँका-उद्योजक अशा गटांत रूपांतर झालं. हा नवीन त्रिकोण आपल्याला चांगलाच परिचित आहे. साखर सगळ्याच अर्थानं उपयुक्त अशी वस्तू आहे. साखरेची निर्मिती आणि व्यापार प्रस्थापित होण्याआधी, अन्नातल्या गोडीचं सगळ्याच संस्कृतींना अप्रूप होतं. ती मिळवणं सहजसाध्य असण्याचा ध्यास होता. आणि क्रयशक्ती असणाऱ्या लोकांना साखर मिळवून देण्यात उत्पादकांचा आर्थिक फायदा होता. तो पूर्ण करण्यासाठी आर्थिक उलाढाल झाली, मानवी श्रमांचं वस्तूकरण झालं आणि साखरेवर सत्ता, एकाधिकार राखण्यासाठी माणसानं टोकाची धडपड केली. अशीच कॉफीची, किंवा कोकेनचीही कथा लिहिता येईल. साखर, कॉफी किंवा कोकेन ही साधनं होती. ही साधनं नेहमीच अशा 'जड रूपांमध्ये' असतील असं नाही. एखाद्या बंद खोलीत बसून संगणकात टंकलेला 'कोड'ही आज साधन होऊ शकतो. तसंच गुलामगिरीही भौतिक, शारीरिक पातळीच्या पलीकडे गेली आहे. धर्म, वंश, पैसा - अशा प्रकारच्या मानवनिर्मित संकल्पनादेखील शोषक-शोषित परंपरा टिकवून ठेवण्यास पुरेशा ठरतात हे आपल्या आजूबाजूच्या घडामोडींकडे बघून लक्षात येत राहतं. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देणारी लवचीक भांडवलशाही आपल्याला नवनवी रूपं दाखवत असते. नवनवीन प्रारूपं आली, तरीही ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती साठते आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही - असे दोन गट नेहमीच ओळखता येतात. ही व्यवस्था बदलेल असा आशावाद बाळगणं भाबडेपणाचं आहे, पण तिथे किमान न्याय असावा, पर्यावरणाचा, मानवाच्या सर्वांगीण हिताचा विचार आणि पारदर्शकता असावी यासाठी आजही लढा सुरुच आहे.

संदर्भ :

१. Sugar: A Bittersweet History - Elizabeth Abbot
Publisher: Duckworth Overlook, London, 2009
पृष्ठसंख्या : 453

२. The World of Sugar: Ulbe Bosma
Publisher: Harvard University Press, 2023
पृष्ठसंख्या : 464

३. The New York Times 1619 Project

४. The Root of Haiti’s Misery

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम लेख. आभार.
साखर कारखान्यात म्हणे सल्फर चा वापर होतो की. तो कुठल्या टप्प्यात आणि कशासाठी होतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात दिल्याप्रमाणे भारतात प्लॅन्टेशन वाईट साखर तयार होते. ही एकाच प्रक्रियेतून तयार होते. पुन्हा रिफाईन होत नाही. त्यामुळे ती पांढरी करायला ब्लीचिंग एजंट म्हणून सल्फर डायॉक्साईड वापरला जातो. सुरुवातीला उसाच्या रसात आणि नंतर त्याचं सिरप झाल्यावर SO2 वापरला जातो. त्याचप्रमाणे pH योग्य ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लीचिंग एजंट म्हणून SO2चा वापर नक्की कधीपासून (नि का) सुरू झाला असावा? बोले तो, पूर्वी, एका जमान्यात, या कामाकरिता (जनावरांच्या हाडांपासून बनविलेला) प्राणिज कोळसा (animal charcoal किंवा bone charcoal), (नेमका bleaching agent म्हणून नव्हे, तरी adsorption agent म्हणून) वापरला जात नसे काय? (‘आम्हां भटां’मध्ये अनेकदा अशा साखरेला नाक मुरडण्याची (परंतु तरीही खाण्याची – दुसरा पर्याय नसावा बहुधा!) प्रथा जरी असली, नि अशा साखरेच्या सेवनार्हतेबद्दल शंका जरी उपस्थित केली जात असली, तरीही?)

अंग्रेजांच्या जमान्यात मला वाटते आपल्या महाराष्ट्रात सामान्यतः मिळणारी साखर ही बहुधा मॉरिशसहून आयात केलेली असे. तिला आपल्याकडे ‘मोरस साखर’ म्हणून संबोधीत. माझ्या कल्पनेप्रमाणे, तिच्या उत्पादनात या कामाकरिता अशा प्रकारे हाडांचा कोळसा वापरण्यात येई. (किमानपक्षी, तशी किंवदन्ता तरी होती.) माझ्या आठवणीप्रमाणे, ‘मोर, ससा, आणि खर म्हणजे गाढव, यांच्या हाडांचा चुरा म्हणजे मोरस साखर’ अशी कोटी चिं. वि. जोशींनी एके ठिकाणी केलेली आहे. (कदाचित चिं. विं. ची ओरिजनल कोटी नसेलसुद्धा; केवळ त्या काळात पुण्यातील काही वर्तुळांत प्रचलित असलेल्या कोटीचा चिं. विं. नी पुनरुच्चार केला असेल, कोणास ठाऊक! निदान माझ्या वाचनात तरी ही कोटी चिं. विं. च्या लेखनातून आली. तर ते एक असो.)

तर कुतूहल असे, की ही पद्धत बाजूस सरून त्याऐवजी गंधक-द्वि-प्राणिल हा विरंजक अडत्या म्हणून वापरला जाण्याची प्रथा ही नक्की कोठे, कधी, आणि का अंमलात आली असावी? (अधिक विकीशोध घेतला असता, प्राणिज कोळश्याकरिता वापरात येणारी हाडे ही अनेकदा गायीची आणि/किंवा डुकराची असल्याचे कळते. म्हणजे, १८५७/मेरठच्या पुनरावृत्तीची भीती तर या बदलामागे नसेल? अन्यथा, ‘आम्हां भटां’च्या नाके मुरडण्याला भीक घातली जाऊन बदल होण्याइतकी क्रयशक्ती समाजाच्या केवळ साडेतीन टक्के असलेल्या (नि त्यातही बहुतांशी कनिष्ठमध्यम ते फार फार तर मध्यम वर्गात मोडणाऱ्या) समाजघटकात खाशी नसावी!)

——————————

लेखात ‘भुरी साखर’ असा शब्दप्रयोग वापरलेला आढळला. तो brown sugar अशा अर्थी असावा काय? या शब्दप्रयोगाचे नक्की प्रयोजन काय? (विरोध म्हणून नव्हे, तर कुतूहल म्हणून विचारीत आहे.) म्हणजे, शक्य तोवर मराठी शब्द वापरायचा, म्हणून, की ‘ब्राउन शुगर’ या शब्दप्रयोगातून निदान महाराष्ट्रात तरी काही भलताच अर्थ प्रतीत होतो, म्हणून? (दुर्दैवाने, ‘भुरी साखर’ या शब्दप्रयोगातून — अशा चिजेच्या अस्तित्वाबद्दल आगाऊ कल्पना असल्याखेरीज — कोणताच अर्थबोध होत नाही. नि, ‘ब्राउन शुगर’करिता मराठीत ‘गर्द’ असा जो प्रतिशब्द प्रचलित आहे, तो ‘त्या दुसऱ्या अर्था’ने आहे. मराठीत भाषांतर केले, तर काहीही अर्थबोध होत नाही, नि मूळ इंग्रजी शब्द वापरला, तर भलताच ‌अर्थ लागतो — धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय, अर्थात Damned if you do and damned if you don’t — ही परिस्थिती लेखिकेकरिता अडचणीची आहे खरी!)

(अतिअवांतर: ‘आमच्यांत’ ब्राउन शुगरचे सेवन सर्रास (नि उघडउघडपणे) केले जाते. नि त्याकरिता तिला ‘भुरी साखर’ असा कूटशब्द वापरण्याची गरज आम्हांस भासत नाही. असो.)

——————————

बाकी, लेख अत्यंत माहितीपूर्ण. लेखावर, त्यातील तपशिलांवर कष्ट घेतलेले दिसून येतात. छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आठवणीप्रमाणे, ‘मोर, ससा, आणि खर म्हणजे गाढव, यांच्या हाडांचा चुरा म्हणजे मोरस साखर’ अशी कोटी चिं. वि. जोशींनी एके ठिकाणी केलेली आहे.

रावसाहेब चिमणराव स्टेट गेस्ट. (चंदनवाड).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बोले तो, पूर्वी, एका जमान्यात, या कामाकरिता (जनावरांच्या हाडांपासून बनविलेला

हाडांचा चुरा साखर पांढरी करायला नव्हे तर रसातले इन्सोल्युबल कण खाली बसावेत म्हणून वापरला जायचा. In technical terms this is called juice clarification. The phosphates in the bonemeal react with lime and form calcium phosphate that settles down trapping the insolubles. It is called pressmud. This leaves behind a clear syrup which is then bleached again and concentrated. Now, industrial phosphoric acid has replaced bonemeal.

>>प्राणिज कोळसा (animal charcoal किंवा bone charcoal), (नेमका bleaching agent म्हणून नव्हे, तरी adsorption agent म्हणून) वापरला जात नसे काय?

कोळसा कार्बन डायॉक्साईड तयार करण्यासाठी वापरला जाई. सल्फिटेशनच्या आधी कार्बोनेशन प्रक्रिया वापरली जायची. पण ती गंधक जाळण्यापेक्षा महाग पडते. हल्ली अंबानी सल्फरचे सोनेरी गोळे तयार करून देतात जे भट्टीत (kiln) जाळले जातात.

>>भुरी साखर
भावना पोचल्या असतील तर चालवून घ्या

>>बाकी, लेख अत्यंत माहितीपूर्ण. लेखावर, त्यातील तपशिलांवर कष्ट घेतलेले दिसून येतात. छान!
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यासंदर्भात पुढील ताजी बातमी वाचनात आली -
राज्यात ‘क्रांतिकारी’ साखरेची निर्मिती?
स्रोत : 'लोकसत्ता' , शनिवार - ११ नोव्हेंबर २०२३, पान क्र. ९.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यासपूर्ण आणि या माध्यमाला न्याय देणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म, वंश, पैसा - अशा प्रकारच्या मानवनिर्मित संकल्पनादेखील शोषक-शोषित परंपरा टिकवून ठेवण्यास पुरेशा ठरतात हे आपल्या आजूबाजूच्या घडामोडींकडे बघून लक्षात येत राहतं.

वाहवा.

सुंदर लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे वाक्य नेमकं संपादनादरम्यान अमुकनं सुचवलेलं आणि मी जसंच्या तसं उचललेलं आहे. त्यामुळे.. Smile
तरी पुढे येणारं वाक्य उरलेल्या लेखासाठी लागू आहे असं समजून आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सखोल, सरस, माहितीपूर्ण लेख. केमिस्ट्री, हिस्ट्री आणि भूगोलाचे 'गोड' मिश्रण. अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0