मी कोण आहे?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? तुम्ही स्वतःहून सांगितल्याशिवाय कसे बुवा कळणार तुम्ही कोण ते, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि तसे हा प्रश्न अध्यात्मिक किंवा तात्विक दृष्ट्या विचारलेला नाही, तर सरळ सरळ व्यावहारिक आहे. जरा विचार करा. आजकालच्या जगात आपण आपल्या बद्दलच्या विविध गोष्टींची महिती आपण चकटफू सगळीकडे नकळत देत असतो. तुम्ही म्हणल ते कसे? आपण मोबाईल वापरतो, संगणक वापरतो, विविध प्रकारे हि दोन्ही यंत्रे वापरून आपण आपल्या अनेक जीवनावश्यक तसेच इतर गोष्टी आपण करत असतो. त्याद्वारे स्वतःबद्दलच्या माहितीचे अनेक पैलूचे ठसे आपण सोडत असतो. पटते ना?

दर दिवसागणिक बातम्या येत असतात कि बँकेतून पैसे आपोआप गायब झाले, किंवा आपण कुठे काम करतो, आपले उत्पन्न काय, आपली जीवन शैली कशी आहे, आपण पैसे कसे खर्च करतो याचा सर्वसाधारण थांगपत्ता, सुगावा अनेक संस्थाना लागलेला असतो. संगणकाचा शोध लागल्यापासूनच त्यातील विदा (data) आणि त्या अनुषंगाने माहिती (information) यांची सुरक्षितता कशी राखावी या बद्दल विचार केला गेला आहे (data security, cryptography). जसे जसे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत गेले, प्रगत होत गेले, तसे तसे त्याने आपले आयुष्य व्यापून टाकले आहे. ठायी ठायी आता आपण हे तंत्रज्ञान, कधी कळत, कधी नकळत देखील, वापरतो आहोत. त्यामुळे माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातही प्रामुख्याने आपली वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती याची गोपनीयता आणि सुरक्षितता अतिशय महत्वाची बाब होत आहे. त्यामुळे विविध संस्था वर्तमान पत्रात आणि इतर ठिकाणी त्यांची सेवा कशी ह्या आपल्या माहितीची सुरक्षिततेची काळजी घेते याच्या आणाभाका घेत असताना आपण बघतो. पण आपण जागरूक राहणे अतिशय आवश्यक झाले आहे. आपण वापरात असलेल्या विविध सेवा, समाज माध्यमे (social media), mobile apps, smart phone, smart watch,किंवा इतर अनेक गोष्टी, ज्या आपली वैयक्तिक माहिती गोळा करत असतात, त्यातील किती गोष्टींसाठी आपण परवानगी दिली आहे, याची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. तेथे हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा टाळायला हवा. आपले जग मोबाईल, इंटरनेट, कॅमेरा, क्लाऊड, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता(artificial intelligence AI) या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा सुळसुळाट झाला आहे, अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत, पण त्यातील धोके आपण ओळखले पाहिजेत, आणि सजगपणे वापरले पाहिजेत.

संगणकावरील माहिती चोरली जाणे, गोपनीय माहिती स्पर्धकांच्या हाती, किंवा शत्रूंच्या हाती पडणे (hacking, cyber attack, cyber crime) ह्या तर आता नित्यनियमाने घडण्यारा गोष्टी झाल्या आहेत. सरकारी माहिती, तसेच बँक, आणि इतर खासगी संस्था यांची माहिती चोरण्यासाठी विविध तंत्रे, क्लुप्त्र्या शोधण्याचे काम कायमच जोरात चालू असते. अनेक कायदे (जसे cyber security, GDPR, HIPAA) तसेच सुरक्षितता आणि गोपनीयता पाळण्याविषयी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पाळल्या जाणे हे आजकाल आवश्यक झाले आहे, या सर्वांमुळे थोडेफार नियंत्रण आले आहे असे म्हणता येईल, ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण होईल असे मानता येईलही, पण त्यामुळे आपण सर्वसामान्य वापरकर्ते, ग्राहक या बाबत सतत जागरूक असणे अतिशय गरजेचे झाले आहे. स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील लहान तसेच ज्येष्ठ व्यक्तीची माहिती देखील सुरक्षित ठेवण्यास त्यांना मदत करणे हे देखील होणे आवश्यक आहे. मला आठवते काही वर्षांपूर्वी माझ्या मित्राचे क्रेडीट कार्ड दूरवरच्या आसाम मधील कोणी वापरून विमानाचे तिकीट काढले होते. हे समजल्यावर, सुदैवाने, बँकेच्या कृपेने, त्यांना हा प्रकार कळवल्यावर, हा व्यवहार रद्दबातल केला गेला आणि आर्थिक नुकसान टाळले गेले.

आपण वापरत असलेले अनेक संकेतस्थळे आपल्या बद्दलची अनेक प्रकारे माहिती गोळा करत असतात. आंतरजालावर आपण काय शोधतो याची माहिती, तश्या सेवा पुरवणाऱ्या, किंवा वस्तू विकणाऱ्या आस्थापनांना दिली जाते, त्या द्वारे त्यांच्या बद्दलची माहिती आपल्यापर्यंत धडकते, आणि आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत असतात. आजकाल सुरक्षिततेच्या कारणाखाली अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो. त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. आपल्यावर सतत कोणाची नजर आहे कि काय असे वाटू लागते( आपल्याला आठवत असेल कि 1984 नावाची जॉर्ज ऑरवेलची कादंबरी याच प्रश्नाचा उहापोह करते). भारत सरकारने गेल्या काही वर्षात आरंभलेल्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित अनेक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. हे नक्कीच स्वागतार्ह आहे, आणि आपले जगणे यामुळे सुकर झाले आहे, होत आहे. सुरुवातीला आधार कार्ड आले, UPI आले, आरोग्य क्षेत्रात हि सगळी तंत्रज्ञाने वापरून अनेक गोष्टी सुकर केल्या जात आहे, पण आपली वैयक्तिक माहिती सर्वत्र आहे, AI त्यावर उपयुक्त प्रक्रिया करते, आणि ती ज्यांना हवी आहे त्यांना विकली जात आहे, लाखो, कोट्यावधी लोकांची ती माहिती चोरीला जाणे, त्याचा गैरवापर होणे या सारखे प्रकार सातत्याने घडत आहे. ह्या सर्वांवर एकच उपाय तो म्हणजे आपण जागरूक राहणे, सतत प्रश्न विचाराने, सतर्क राहणे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विदा हे आजच्या युगातील खनिज तेल आहे असे समजले जाते (data is new oil). याचा अर्थ खनिज तेलासारखे विदा वापरायच्या आधी त्यावर विविध प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आणि अश्या प्रक्रिया करण्यासाठीचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झाले आहे, होत आहे (AI/ML, Deep Learning, ChatGPT वगैरे उदाहरणे आपण ऐकली असतीलच). त्यामुळे आपल्या दैनंदिन वापरामुळे जी विदा आपण विविध ठिकाणी स्वहस्ते देत जातो, त्याचे रुपांतर माहिती मध्ये अगदी सहज केले जाते, ज्यामुळे चुकीच्या हातांमध्ये हा विदा/माहिती गेल्यामुळे, आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आपण काय विकत घेतो, आपल्या सवयी काय आहेत, आपल्याला काय आवडते, आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, आपला व्यवसाय काय, आपण कसा आणि किती खर्च करतो, आपले आरोग्य कसे आहे, वगैरे वगैरे. ह्या सर्व माहितीचा उपयोग कसा आणि कुठे होऊ शकतो ह्याचे नियंत्रण आपण गमावत आहोत कि काय असे वाटू लागते.

तर समारोप करण्याआधी, आपण परत अगदी सुरुवातीला सांगितलेल्या मुद्द्यावर येऊ या. आपण सर्वांनी समजून घेण्याची गोष्ट अशी आहे आपण कोण आहोत, यांची माहिती काळात नकळत आपण जगजाहीर करतो आहोत कि काय, त्याचा गैरवापर होऊ शकतो कि कसे या कडे जरा सजगतेने पाहण्याची अतिशय गरज आहे. ह्या बद्दल सगळ्यांनी साक्षर होण्याची आवशक्यता आहे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत, माहिती भरताना, किंवा एखादी सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करताना त्यांचे सेवेसंबंधी करार मदार काय आहेत, अटी काय आहेत याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मी कोण आहे याबद्दल आंतरजालीय चव्हाट्यावर बोलण्याआधी विचार करा!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet