दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग तिसरा आणि शेवटचा)


दीराची बायडी हीच माझी तायडी,

अर्थात जनजागृती नाटक

हे नाटक 'ऐसी अक्षरे'वर तीन भागांत प्रसिद्ध होईल:

  • भाग पहिला: स्थापना (दुवा)
  • भाग दुसरा: प्रवेश १,२ आणि ३ (दुवा)
  • भाग तिसरा: प्रवेश ४ आणि ५.

————

प्रवेश चौथा

(सुझन अंग ताणून वाळूत पालथी पडली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एकनाथने हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला आहे. ह्या प्रसंगातलं संभाषण सातत्याने तुटक आहे.)

सुझन : अंगभर गोड शिरशिरी आहे.

एकनाथ : ग्लानी येते आहे.

सुझन : स्वल्पमरण.

एकनाथ : म्हणजे?!

सुझन : आमचा खास परदेशी शब्द आहे. विशिष्ट प्रसंगी वापरतात. तुम्हाला नाही कळायचा!

एकनाथ : तुम्ही आधुनिक परदेशी बायका मोठ्या लबाड असता. भोळ्याभाबड्या कोंकणी तरुणांना नादी लावता. त्यांना समजणार नाहीत असे शब्द मुद्दाम वापरता.

सुझन : असं करता येणं हाही मायदेशीच्या आकर्षणाचा एक भाग आहे. (एकनाथ पराभूत हास्य करतो. दोघेही थोडा वेळ अबोल आहेत.)

एकनाथ : (डोळे मिटून) तीळ. तीळ — लक्षवेधी आहे. जणू नव्याने दिसला.

सुझन : (अनिश्चित) अं? दृष्टिकोणामुळे फरक पडत असावा.

एकनाथ : (अनिश्चित) तसं असू शकेल. (दीर्घ श्वास घेत) काय बरं केलं आपण?

सुझन : खेळ मांडियेला.

एकनाथ : वाळवंटी घाई.

सुझन : पण आता ती संपली. (काही क्षणांनंतर) ए—, मला आता थोडा वेळ एकटी सोडाल? जे घडलं त्यावर विचार करीन म्हणते.

एकनाथ : मी तेच सुचवणार होतो. जवळिकीनंतर मोकळीक हवी. खलील जिब्रान असंच काहीसं म्हणाला होता. (तो उभा राहतो. वाळूत लोळणारी सुझन त्याचा हात धरून अलगद उठते.) पुन्हा कधी भेटायचं?

सुझन : असेच अचानक भेटू. केव्हा आणि कुठे हे कुणी सांगावं?!

एकनाथ : मी वाट बघेन. मन्मनांच्या तारा जुळलेल्या असल्या म्हणजे शरीरांची भेट आपसूक होईल.

सुझन : ठीक तर! भेटूच. केव्हातरी कुठेतरी —

एकनाथ : पण लवकरच! येतो मी.

(दोघे आवेगाने एकमेकांचं चुंबन घेतात. सुझन एकनाथचा चेहरा कुरवाळते. एकनाथ जातो. सुझन वाळूत ठेवलेल्या चपला उचलते आणि क्षणभर थांबून काहीशा व्यग्र मनाने चालू लागते. चपला हातात घेऊन पुळणीवरून विरुद्ध दिशेने चालणारी सुरंगा माने तिला सामोरी येते. एकमेकींना पाहताच त्या थबकतात. दोघींनाही संशय आलेला आहे, पण का ते त्यांनाच नीट कळलेलं नाही.)

सुरंगा : नमस्कार.

सुझन : नमस्कार.

सुरंगा : तुम्ही मला ओळखता का?

सुझन : बहुतेक नाही. पण खात्री वाटत नाही.

सुरंगा : मलाही खात्री वाटत नाही.

(हातातल्या चपला खाली ठेवून दोघी सामोऱ्या उभ्या राहतात. अंदाज घेत हळूहळू सुरंगा सुझनला प्रदक्षिणा घालत हुंगू लागते. सुझन हात पुढे करून सुरंगाचा चेहरा कुरवाळू पाहते, पण सुरंगा तिच्या हातांच्या कक्षेत येत नाही.)

सुरंगा : ए —

सुझन : ए?

सुरंगा : ए!

सुझन : काय हो? एकदम अशा एकेरीवर का येताय? मॅनर्स नाहीत का तुम्हाला?

सुरंगा : प्रश्नच नाही! अरे ए!

सुझन : आंधळ्या आहात का तुम्ही?

सुरंगा : काय हो, आंधळी कुणाला म्हणता?!

सुझन : मग 'अरे ए' काय म्हणता?! मी बाई आहे. बुवा नव्हे.

सुरंगा : बाई आहात की बुवा आहात ते तुम्ही ठरवा, पण तुमच्या अंगाला माझ्या नवऱ्याचा वास का येतोय?

सुझन : कुणाचा?!

सुरंगा : तुमच्या अंगाला माझ्या नवऱ्याचा जबरदस्त वास येतो आहे.

सुझन : अहो, असा कसा येईल? यायचाच झाला तर माझ्या अंगाला माझ्या नवऱ्याचा वास नाही का येणार?

सुरंगा : चांगला घमघमाट सुटला आहे. म्हणून तर मी 'ए —' म्हणाले. माझ्या नवऱ्याला मी 'ए' म्हणते.

सुझन : माझ्याही नवऱ्याला मी 'ए'च म्हणते.

सुरंगा : म्हणत असाल. पण म्हणून तुमच्या नवऱ्याचा वास माझ्या नवऱ्यासारखा कसा असेल?

सुझन : पण ही वासाची भानगड काय आहे? इतकं नाक फुगवून फेंदारून वास घेताय कशाला?

सुरंगा : कारण मी वासावरून माणसं ओळखते. मला डोळ्यांनी व्यवस्थित दिसतं पण माणसांचे चेहरे ओळखता येत नाहीत. लहानपणापासून माझं असंच आहे.

सुझन : मलाही माणसांचे चेहरे ओळखता येत नाहीत. लहानपणापासून माझंही असंच आहे. म्हणून मी हातांनी चेहरे चाचपडून माणसं ओळखते.

सुरंगा : पण असं का आहे आपल्या बाबतीत?

सुझन : ते आता ठाऊक नाही. लोक म्हणतात आपल्या मेंदूचं वायरिंग निराळं आहे. पण प्रत्यक्षात मेंदूत तारा कुठेच नसतात. ते काही असो; आपलं जे आहे त्याला मानसशास्त्राच्या पुस्तकात अधिकृत नाव आहे: प्रोसोपॅग्नोसिया!

सुरंगा : काय?! प्रोसो—

सुझन : प्रो-सो-पॅग्नो-सिया.

सुरंगा : प्रो-सो? च्च. फार आडनिडा शब्द आहे. जीभ तशी वळत नाही हो.

सुझन : आपण मुखांधळ्या आहोत असं म्हणा.

सुरंगा : मुखांधळ्या?!

सुझन : फार दुर्मीळ आहोत आपण. लाखात एक. गेलाबाजार लाखात दोन म्हटलं तरीही दुर्मीळच आहोत.

सुरंगा : पण अधिकृत नाव सांगितलंत ते एक बरं झालं. त्यामुळे दिलासा वाटला. नाहीतर आत्तापर्यंत चाचपडल्यासारखं होत होतं.

सुझन : हो, पण ही बरी होण्यासारखी गोष्ट नाही. आयुष्यभर आपण दुर्मीळच राहणार.

सुरंगा : आता आहे ते आहे. (आवेश गोळा करून) पण मूळ मुद्दा सोडू नका! तुम्हाला माझ्या नवऱ्याचा वास का येतोय ते सांगा!

सुझन : मला वाटतं ह्या सगळ्यात कसलंतरी गौडबंगाल आहे. आपण एकमेकींवर गुरगुरून काही होणार नाही. दोघींनी मिळून काय तो छडा लावला पाहिजे. तुम्ही जरा स्थिर उभ्या राहाल का? तुमचा चेहरा मी कुरवाळून बघते. तेवढा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे वास येणार नाही.

सुरंगा : लवकर आटपा.

(सुझन तिचा चेहरा कुरवाळते. मग गोंधळून स्वत:चा चेहरा कुरवाळते. मग पुन्हा सुरंगाचा चेहरा चाचपते.)

सुझन : तुमचा चेहरा अगदी माझ्याचसारखा कसा आहे?

सुरंगा : काय म्हणता?!

सुझन : तुमचा तोंडवळा आणि माझा तोंडवळा! कुठेही काहीही फरक नाही.

सुरंगा : (स्वत:ची काख उचलून वास घेते.) पण वास वेगळा आहे हो!

सुझन : अहो, वासाचं काय घेऊन बसलात? चेहरा तर तंतोतंत सारखा आहे ना! याचा अर्थ आपण जुळ्या बहिणी असणार!

सुरंगा : छे हो! तसं कसं शक्य आहे? मला जुळी बहीण असती तर माझ्या आईबाबांनी तसं मला सांगितलं नसतं का?

सुझन : आईवडिल कोण तुमचे?

सुरंगा : आम्ही माने! शहाण्णव कुळी मराठा आहोत म्हटलं!

सुझन : माझंही आडनाव माने!

सुरंगा : अय्या! तुम्ही पण शहाण्णव कुळी?!

सुझन : च्च. नाही हो. आम्ही भारतातले माने नव्हेत. स्पेलिंग वेगळं आहे, त्यामुळे आपला पदर जुळायचा नाही. मूकव्यंजन ही भाषिक संकल्पना तुम्हाला माहीत आहे का?

सुरंगा : मला असलं काही माहीत नसतं. मी अलिबागेत वाढलेली अस्सल शहाण्णव कुळी मराठा बाई आहे. माझं नाव सुरंगा माने. माझा नवरा अलिबागेतच वाढलेला आहे. त्याचं नाव एकनाथ मोने. तो ब्राह्मण आहे. आम्ही दोघेही कलेक्टर कचेरीत नोकरीला असतो. तिथेच ओळख झाली. जातीबाहेर लग्न म्हणून त्याच्या आणि माझ्या दोन्ही कुटुंबांतून कडाक्याचा विरोध झाला. पण आम्ही जुमानलं नाही.

सुझन : असं म्हणता?

सुरंगा : सासरच्यांवर मी इतकी उखडले होते की लग्नानंतर आडनाव बदललं नाही.

सुझन : चांगलं केलंत. सुमो नावाचे जपानी मल्ल असतात.

सुरंगा : लग्नाला सहा वर्षं झाली, पण अजून मी कुणालाही माफ केलेलं नाही.

सुझन : ते समजण्यासारखं आहे.

सुरंगा : माझं आहे ते आहे, पण तुमची ओळख काय?

सुझन : सांगते. मी सुझन माने —

(तेवढ्यात 'सुमाताई! अहो, सुमाताई!' अशी हाक येते. दोघीही दचकून तिकडे पाहतात. वनमाला जवळ येते.)

वनमाला : अग्गो बाई! तुमच्यातल्या सुमाताई कोण म्हणायच्या?

सुझन : मी.

सुरंगा : मी पण. (दोघी तिला गराडा घालतात. एकजण तिचा वास घेते तर दुसरी चेहरा कुरवाळते.)

वनमाला : (स्वत:ला सोडवून घेत) अग्गो बाई! दोन आवळ्याजावळ्या मांजरी अंगावर चढल्यागत वाटलं!

सुरंगा : त्या तिकडच्या बंगल्यातल्या आगाऊ बाई तुम्हीच का? वास तसाच येतोय.

वनमाला : मीच ती. मला वनमाला म्हणतात. पण माझा धैर्यधर मला अजून भेटायचा आहे.

सुरंगा : तो भेटेल हो, पण आवळ्याजावळ्या कुणाला म्हणता?! ह्या मानेबाई पण मला तेच म्हणाल्या. मला जुळी बहीण असती तर आईबाबांनी सांगितलं असतं ना तसं —

वनमाला : अहो, खुळ्या का काय तुम्ही?! तुमच्या आईबाबांनी लोणकढी थाप मारली तुम्हाला. तुम्ही दोघी जुळ्या बहिणी नव्हेत हे नाटकातसुद्धा शक्य नाही! तोंडं बघा नुसती!

सुझन : आता ती बघता आली असती तर काय हवं होतं?!

वनमाला : हो! ते एक मी विसरलेच होते. (दोघींकडे आळीपाळीने बघत राहते.) पण मला एवढं आश्चर्य पूर्वी कधी वाटलं नव्हतं हो! तुम्ही दोघी जन्मलात कशा, नंतर गेलात कुठं आणि आत्ता इथे भेटताय कशा?! सगळंच मजेशीर असणार!

(सुझन वनमालेला बाजूला घेऊन तिच्या कानात बराच वेळ काहीतरी कुजबुजते. वनमाला ते लक्षपूर्वक ऐकून घेते, तसं तिचं आश्चर्य वाढत जातं. पण शेवटी तिला जबरदस्त हसू कोसळतं. त्या दोघी परत सुरंगाजवळ येतात.)

वनमाला : तुमचं नाव सुरंगा माने ना?

सुरंगा : हो.

वनमाला : आणि नवऱ्याचं नाव एकनाथ मोने?

सुरंगा : हो.

वनमाला : सुमाताई (भारतीय पद्धतीने म्हणत) आणि सुमाताई (फ्रेंच पद्धतीने म्हणत), तुम्ही दोघी इथे पुळणीवर पाय लांब करून बसून राहा. कुठं हलू नका. खेकडाबिकडा दिसला तर त्याला हुंगू नका की हाताळू नका. तोवर मी ह्या एकनाथ मोन्यांना शोधून आणते. कधी भेटले नसले तरी बघितलेलं आहे. टीचभर तर गाव आहे. जातील कुठे?! (डोक्यावरची हॅट सारखी करून 'शोधू मी, कुठे, कशी, प्रिया तुला —' असं गाणं गुणगुणत तडक चालू लागते. मधोमध सुरक्षित अंतर राखून दोन्ही सुमा वाळूत बसकण मारतात.)

प्रवेश पाचवा

(बंगल्याचा वऱ्हांडा. वेताच्या खुर्चीत बसून एमील 'कळ्यांचे निश्वास' वाचतो आहे. हातात एक कापडी पिशवी घेऊन आणि नाकाला पदर लावून वनमाला येते.)

एमील : वनमाले, बायको सापडली का?

वनमाला : सापडली ना. मागून येतेच आहे.

एमील : आणि नाकाला पदर का लावला आहेस?

एमील : तुम्हाला असता तर तुम्हीसुद्धा लावला असता. कळेल आता.

(नाकासमोर हात हलवणारी त्रासिक चेहऱ्याची सुरंगा, आणि तिच्यापासून (आणि एकमेकांपासून) बरंच अंतर राखून पाय ओढत एकनाथ आणि सुझन येतात.)

एमील : (थक्क होऊन) बाप रे! ही इतकी माणसं कोण?! आणि असा विचित्र सरमिसळ वास का येतो आहे?! ('कळ्यांचे निश्वास' वापरून स्वत:ला वारा घालण्याचा प्रयत्न करतो.)

वनमाला : ओळख करून देते. नाकासमोर हात हलवते आहे ती तुमची मेव्हणी सुरंगा माने. (सुरंगा एमीलला तोंडदेखला नमस्कार करते.) मघाशी बंगल्यावर आली होती ती हीच. आपण दोघांनी आग्रह करून तिला दोन ग्लास वाईन पाजली.

सुरंगा : (एमीलला उद्देशून) पाहुणचार केल्याबद्दल तुमचे आभार मानते.

एमील : अहो, पण —

वनमाला : अंगाला कस्तुरीचा वास मारणारी ती सुरंगाची जुळी बहीण, म्हणजेच तुमची बायको सुझन माने.

एमील : सुझन! अगं, तू कुठे हरवली होतीस?!

सुझन : (एमीलला उद्देशून) ए—, आपण नंतर सविस्तर बोलू.

वनमाला : आणि अंगाला केवड्याचा वास येतो आहे तो तुमचा जुळा भाऊ एकनाथ मोने.

(एकनाथ आणि एमील एकमेकांसमोर येऊन अनिश्चितपणे पाहतात. वातावरणातली अवघड शांतता मोडण्यासाठी सुझन पुढे सरसावते.)

सुझन : तुम्हा सर्वांना माझ्या नवऱ्याची ओळख करून देते. हा ए-मील मोने. (अतिशयोक्त 'ए' म्हणते.)

एकनाथ : एमील?

सुझन : ए—मील. (कोपऱ्यात दुमडलेला आहे आणि तळवा उघडा आहे अशा पवित्र्यात डावा हात ताठ उचलून शरीराच्या उजव्या बाजूला तिरका करून दाखवते.)

सुरंगा : नाव एमील ना?

सुझन : ए—मील! (हाताने तीच कृती पुन्हा करून दाखवते.)

एकनाथ : (तिचा तिरका हात मनगटाशी पकडून त्याकडे रोखून बघत) तुम्ही 'ए' हे अक्षर सावरकरी पद्धतीने लिहिता का? मी लिहितो तेव्हा त्यावर मात्रा नसते.

सुझन : च्च. तुम्ही चुकीच्या बाजूने बघताहात. ही मात्रा नव्हे. फ्रेंचमधला ॲक्यूट ॲक्सेंट आहे. (सामोऱ्या असलेल्या एकनाथच्या कमरेला हात घालून त्याला आपल्या शेजारी वळवते. काय चक्रम बाई आहे अशा आविर्भावात वनमाला डोकं हलवते.)

एमील : सुझन, जाऊ दे ना. मला माझ्या भावाला भेटून घेऊ दे.

(ओठांना मुरड घालत सुझन बाजूला होते. एकनाथ आणि एमील एकमेकांना मिठी मारण्याचा अर्धवट आविर्भाव करतात पण तेवढा धीर न झाल्यामुळे हस्तांदोलनावर भागवतात.)

वनमाला : बायको आणि मेव्हणी मला पुळणीवर भेटल्या. तिथून पुढे जाऊन बाजारात भावाला शोधून काढला. तुमच्या मेव्हणीचं नाक तिखट आहे, त्यामुळे तिला कसलेकसले संशय पटकन येतात. ते थोपवून धरावेत म्हणून मामू अत्तरवाल्याकडून मिरगाची एक आणि केवड्याची एक अशा दोन बाटल्या विकत घेतल्या. तुमच्या भावाला एक दिली आणि बायकोला एक दिली. गडबडीत उलटापालट झाली हे मी कबूल करते, पण दोघांनीही घाबरून जास्त वापरलं ही आगळीक त्यांची आहे. बाजारात पुढे खाऱ्या पाण्याचा वास आला म्हणून गेले तर ताजे झिंगे मिळाले! (पिशवी दाखवते.) आता तुम्हीच सांगा: अशी तीन माणसं एकदम घरात शिरल्यावर सरमिसळ दरवळ का येणार नाही?

एमील : दरवळ राहू देत; पण हे एवढे जुळे एकदम कुठून आले?! मला तर जुळा भाऊ आहे हे माहीतदेखील नव्हतं! (पाव्हण्यांना उद्देशून) अहो, बसा बसा —

(पण ते कठड्याला टेकून अवघडून एकमेकांकडे पाहात उभेच राहतात, तसा एमीलही गोंधळून उभा राहतो. सुझन दबक्या पावलांनी वनमालेजवळ येते.)

सुझन : मला थोडंसं मळमळतंय —

वनमाला : अहो, त्याचं एवढं काही नाही. (फडताळातून सुपारी घेऊन येते.) रत्नाग्रीची सुपारी आहे. लगेच बरं वाटेल. (सुरंगा आणि सुझनला देते.)

सुरंगा : (चिडून) अहो, मला कशाला देताय?! मला कुठे मळमळतंय?!

वनमाला : सॉरी हं. दोघी सारख्याच दिसता म्हणून चुकले —

सुझन : हे अगदी म्हणायलाच हवं होतं का?

वनमाला : एकमेकींना नसाल दिसत. बाकीच्यांना दिसल्याखेरीज राहाल कशा?! (सुपारी फडताळात परत ठेवत) पण आता मी काय म्हणते: एकनाथदादा आणि सुमाताई (फ्रेंच पद्धतीने अतिशयोक्त उच्चारात), तुम्ही दोघे ताबडतोब आंघोळी करून घ्या. वर दोन न्हाणीघरं आहेत, मी पाणी काढून देते. (नाकाला पदर लावत) आम्हाला इथे वावरणं अशक्य झालं आहे.

(दोघांना वर घेऊन जाते. रंगमंचावर आता फक्त एमील आणि सुरंगा आहेत. एमील 'कळ्यांचे निश्वास' उचलून वाचण्याचा बहाणा करू लागतो. संभाषण सुरू करावं की नको ह्याबद्दल सुरंगाच्या मनात चलबिचल आहे.)

सुरंगा : (धीर करून) कुठली कथा वाचताय?

एमील : सगळ्या सारख्याच आहेत.

(सुरंगा निश्वास सोडते. अवघड शांतता तशीच राहते. रंगमंचाच्या पुढच्या भागात सूत्रधारिणी आणि नट दबकत प्रवेश करतात.)

सूत्रधारिणी : गुंता झाला खरा.

नट : हो ना.

सूत्रधारिणी : आता काय करायचं?

नट : मलाही नीट सुचत नाहीय.

सूत्रधारिणी : खूप पूर्वीच्या काळची एक पद्धत मी ऐकलेली आहे. नाटक चालू असताना कथानकात अडसर आला तर त्यावर 'आपो मेखानेस थेओस' नावाचा उतारा होता. एका लाकडाच्या डोलीत देवाला बसवून रंगमंचावर खाली उतरवत असत. मग तो देववाणी उच्चारून प्रश्न सोडवत असे. आपण कोंकणात आहोत. इथे मासळीच्या टोपल्या सहज मिळतील. त्यांत बसून स्टेजवर जाऊ.

नट : तो प्रकार ट्रॅजेडीला वापरायचे. कॉमेडीला नाही.

सूत्रधारिणी : हिला आता कॉमेडी कोण म्हणेल?!

नट : पण नको. आपलं हसं होईल. मानसशास्त्रज्ञ कधी मासळीच्या टोपलीत बसतात का?

सूत्रधारिणी : तेही खरंच आहे.

नट : पण आत जायचं हे तर आपण ठरवलंच होतं.

(एवढ्यात वनमाला वरून खाली येते.)

सूत्रधारिणी : मी हिला विचारून बघते.

(नट आणि सूत्रधारिणी ह्या दोघांच्या दृष्टीने बाकीची पात्रं एका अदृश्य काचेमागे आहेत. ह्या काचेवर सूत्रधारिणी बोटांनी टकटक करते, तशी वनमाला जवळ येते.)

वनमाला : कोण पाहिजे?

सूत्रधारिणी : नमस्कार! मी ह्या नाटकाची सूत्रधारिणी आहे. हा माझा सहकारी नट. (तोही ओशाळं हसून नमस्कार करतो.) आम्हाला आत येऊ द्या.

वनमाला : (कपाळाला आठ्या घालून) नाट्यशास्त्रात तशी परवानगी नाही —

सूत्रधारिणी : काय?!

वनमाला : तशी परवानगी नाही.

सूत्रधारिणी : अहो, पण अधिकृत सूत्रं माझ्या हाती आहेत.

वनमाला : तुम्हाला चौथं तावदान फोडून आत यायचं आहे का? नाट्यशास्त्रात तशी परवानगी नाही.

सूत्रधारिणी : पण —

वनमाला : चौथं तावदान कसं फोडायचं याचे नियम काटेकोर असतात. ते फोडून आतून बाहेर आलेलं चालतं, पण बाहेरून आत आलेलं चालत नाही.

(सूत्रधारिणी नटाला ढोसते. तो धीर एकवटतो.)
नट : अहो, पण हा खेळ आमचा आहे. आम्ही (आवंढा गिळून) मानसशास्त्रज्ञ आहोत.

वनमाला : मानसशास्त्रज्ञ?!

नट : हो! मुखांधळेपणा ह्या विकाराबद्दल जनजागृती करायची म्हणून हे नाटक करतो आहोत. आत्तापर्यंत सगळं छान सांभाळलंय तुम्ही! आम्ही पाहतो आहोत ना इथून —

वनमाला : बरं बरं! उगीच लाडीगोडी लावू नका. हे बघा, तुम्ही मागच्या दारी या. तुम्हाला स्वयंपाकघरातून आत घेते. (सूत्रधारीण आणि नट विंगेत अदृश्य होतात.) एवढं शिकूनही काही रीतभात नाही. (गुणगुणते.) मानस का बधिरावे —

(सावकाश हालचाली करत आत जाऊन दोघांना घेऊन येते. सूत्रधारिणी आणि नट वेताच्या खुर्च्यांवर बसतात. त्यांच्यापैकी कुणीतरी बोलायला सुरुवात करणार एवढ्यात एकनाथ आणि सुझन श्रीमंती ढंगाचे आवळेजावळे बाथरोब घालून ओल्या केसांनी खाली येतात. त्याच्या रोबवर 'त्याचा/sa' आणि तिच्या रोबवर 'तिचा/sa' अशी वेलबुट्टीदार अक्षरं लिहिलेली आहेत. सगळेजण त्यांच्याकडे टकमका पाहताहेत. अवघडलेपणात आणखीनच भर पडते.)

सूत्रधारिणी : (सगळ्यांकडे बघून) नमस्कार! मी ह्या नाटकाची सूत्रधारिणी आणि हा नट. माझ्या हाताखाली शिकायला आहे.

वनमाला : का येणं केलंत?

नट : एवीतेवी नाटक ह्या टप्प्यावर आलं की आत शिरण्याचा आमचा विचार पहिल्यापासूनच होता. तुम्हा सर्वांना कथानक समजावून सांगायचं होतं. जुळ्यांच्या जन्माची कूळकथा काय आहे —

वनमाला : अहो, त्यात समजावून सांगण्यासारखं काय आहे?! जग बघितलेलं असलं की अदमासाने कळतं ना! मी काय म्हणते की ह्या दोन जुळ्या पोरी तान्ह्या असताना अनाथालयात पडल्या असणार. अनाथालयं म्हणजे त्यांचे पैशाचे नेहमीचे वांधे असतात. इतकी पोरं एकाच वेळी सांभाळणं त्यांना झेपत नाही. तेव्हा अशाच केव्हातरी दोघी दोन ठिकाणी पांगल्या. माने मंडळींना पोर होत नव्हतं म्हणून त्यांनी एकीला गुपचूप दत्तक घेतली आणि स्वत:ची म्हणून सांगितली. हे असं सर्रास चालतं. त्याची एक रुळलेली पद्धत आहे. खोटं बाळंत व्हायच्या दोन महिने आधी पोटाला बोचकं बांधून शालू नेसून देवदर्शनाला जाऊन आलं की लोक फसतात. आयत्या वेळी सुईणीला नुसती बोलावून बसवून ठेवायची आणि चारसहा तासांनी जेवायला घालून साडीचोळी देऊन कपाळावर घाम आल्यासारखं दाखवून बाहेर काढायची. दोघा पोरग्यांचंही हेच असंच झालं असणार —

नट : हो, ते अगदी बरोबर आहे. हेच समजावून सांगणार होतो आम्ही —

वनमाला : समजावून सांगण्यासारखं ह्यात काही नाही. सरळसोट गोष्ट आहे.

सुरंगा : पण मला एक कळत नाही! असं असेल तर माझ्या माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी लग्नाला एवढा निकराचा विरोध का म्हणून केला?

एकनाथ : अगं, ते सोपं आहे. केला नसता तर लोकांना संशय नसता का आला? लोक म्हणाले असते शहाण्णव कुळी पोरगी बामणाला देताय. पूर्वजांच्या रक्ताची तुम्हाला काही चाड आहे की नाही? तेव्हा मग आव आणावा लागला. माझ्या आईबाबांकडून हेच कारण असणार. इकडचा आर्यधर्म आणि तिकडचा क्षात्रधर्म दोन्हीही तितकेच बनावट होते. पण त्याचमुळे उभयपक्षांना ते आवर्जून मिरवावे लागले.

सुरंगा : हं! सगळ्यांना समोर उभं करून कशी फैलावर घेते बघाच तुम्ही आता!

एकनाथ : अगं जाऊ दे ना. आपल्यासमोर तोच एक प्रश्न आहे का?

(विचित्र शांतता नांदते. एमील हवामान बदलण्याचा प्रयत्न करतो.)

एमील : पण आमचं सगळं वेगळंच झालं बरं का! सुझन म्हणालीच असेल तुम्हाला. आम्ही दोघेही आपापल्या आईबापांबरोबर फ्रान्सला गेलो तेव्हा मायदेशाशी संपर्क तुटला तो तुटलाच! नाही का सुझन?!

सुरंगा : (चिडून) पण म्हणून मायदेशात येऊन बहिणीचा असा केसाने गळा कापायचा?!

सुझन : बहिणाबाई, माझ्यावर का डाफरताय? त्याआधी तुमच्या नवऱ्यालाच चार रोखठोक प्रश्न विचारा ना!

सुरंगा : विचारणारच आहे! सोडते की काय?!

एमील : सुमा (फ्रेंच पद्धतीने म्हणत), हा काय प्रकार आहे? कुणी कुणाचा गळा कापला?

सुरंगा : मला 'सुमा' म्हणू नका. एवढी सलगी कशाला करताय?

एमील : तुम्हाला नव्हे हो, माझ्या बायकोला म्हणतो आहे. तुम्ही असं करा, मी हाक मारत असताना माझ्या चेहऱ्याकडे नीट लक्ष देऊन बघत चला. ओठांचा चंबू केलेला असेल तर हाक माझ्या बायकोला उद्देशून आहे. नसेल तर तुम्हाला आहे.

सुरंगा : पण मुळात चेहरा नीट दिसायला हवा ना.

एमील : म्हणजे? तुम्हीही मुखांधळ्या आहात की काय?

सुरंगा : हो ना. शब्द माहीत नव्हता तेवढा मात्र आज कळला. आता माझी आणि जुळ्या बहिणीची गुणसूत्रं तीच असणार ना. नको तिथे गुण उधळायचीच!

एमील : हे बघा, उगीच त्रागा कशाला करताय? मी इथे बंगल्यात 'कळ्यांचे निश्वास' वाचत निमूट बसलो होतो. काय झालं मला काहीही धड कळलेलं नाही—

सुझन : ए—, आपण दोघेच असताना बोलू म्हटलं ना? मी सगळं सांगेन तुला. पश्चिमी आधुनिक संस्कृतीत वाढलेला शहाणासुरता नवरा आहेस ना तू?

एमील : हो, आहे. पण — (थांबून) एकनाथ, तू सांग. काय झालंय?

एकनाथ : तू आणि वहिनी आधी बोलून घ्या. मग बघू आपण —

सूत्रधारिणी : मी काय म्हणते की एखादी कृती उचित की अनुचित हे ठरवण्याचे दोन निकष असतात. एकतर तिच्या परिणामावरून किंवा करणाऱ्याच्या मानसशास्त्रीय भूमिकेवरून. आता दुसरा निकष लावून जर विचार केला —

सुरंगा : तुम्ही गप्प बसा हो. निष्कारण घोळ घालून ठेवलाय. जनजागृती करताहेत —

वनमाला : (सूत्रधारिणी आणि नटाला उद्देशून) तुम्ही दोघे आता काही बोलू नका. मी निस्तरेन काय ते. (इतरांना उद्देशून) आपण असं करू. हे एवढे ताजे झिंगे आणले आहेत त्यांची मी तव्यावर चरचरीत तिखट भाजी करते. लोण्यातला पापलेट मघाशीच केलेला आहे. घडीच्या पोळ्या करते आणि भात टाकते. सगळीजणं पोटभर जेवा. भाऊभाऊ बहीणबहीण पहिल्यांदाच भेटताय. (सूत्रधारिणी आणि नटाकडे जाते.) मी काय म्हणत होते की जेवण पाचच माणसांना पुरेल एवढं आहे. भाऊभाऊ, बहिणीबहिणी, जावाजावा, साडूसाडू अशा सगळ्यांच्या आनंदाचा दिवस आहे तर त्यांना कमी नको पडायला. तेव्हा थोडं समजुतीनं घ्या, आणि —

(सूत्रधारिणी आणि नट एकमेकांकडे बघतात आणि खुर्च्यांतून उठतात.)
वनमाला : (हात जोडत) भेटून आनंद वाटला. पुन्हा याल तेव्हा जेवायलाच या!

(ते दोघेजण वनमालेजवळ काहीतरी कुजबुजतात.)
वनमाला : चालेल. तेवढं एक उरकून घेऊ, म्हणजे तुम्हा दोघांचा खोळंबा व्हायचा नाही.

(सूत्रधारिणी आणि नट पात्रांना एकत्र जमवतात. स्टेजच्या पुढल्या भागात क्रमाने सूत्रधारिणी, एमील, सुरंगा, सुझन, एकनाथ आणि नट चंद्रकोरीच्या आकारात उभे राहतात. सुझनला अजूनही मळमळतंच आहे. वनमाला मागून येऊन सुरंगा आणि सुझन यांची अदलाबदल करते आणि दोघींच्या मध्ये उभी राहते. सर्वजण प्रेक्षकांना अभिवादन करतात. सूत्रधारिणी आणि नट दबक्या पावलांनी नजरेआड जातात.)

वनमाला : (चौघांकडे भिरभिर नजरेने हसून पाहात) गेले एकदाचे. आता आपल्याला मोकळीक राहील. (प्रेक्षकांना उद्देशून) मंडळी, पोटात कावळे ओरडताहेत, तेव्हा आम्ही आपली रजा घेतो. लोभ असू द्यावा ही विनंती!

(वनमाला ठुमक्या पावलांनी आत जाते. दोघे मोने आणि दोघी माने असे चौघेजण एकमेकांची नजर टाळत तिच्यामागून रेंगाळत्या पावलांनी जातात. जाण्यापूर्वी सुझन माठातलं पेलाभर पाणी पिऊन घेते. सूत्रधारिणी आणि नट पुन्हा एकदा रंगमंचावर येतात.)

सूत्रधारिणी : तिला जुळे होणार आहेत हे काही आपण बोललो नाही.

नट : माझा धीर झाला नाही.

सूत्रधारिणी : माझाही नाही. पण मी म्हणते झालं ते झालं. जुळ्यांची नावं-आडनावं काय ठेवायची हा आता त्या चौघांचा प्रश्न आहे. यापुढे जुलमाची जवळीकच करा मेल्यांनो. तुमची सगळी मोकळीक संपलेली आहे.

✼✼✼

समाप्त

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाटक लिहून झाल्यावर जेव्हा उतरली असेल, त्यानंतर जबरदस्त हँगओव्हर आला असेल, नाही?

– (समंजस) ‘न’वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(दोघे आवेगाने एकमेकांचं चुंबन घेतात.

हे मराठी नाटकात भर रंगमंचावर दाखवणे अंमळ कठीण जाईल, नै?

पहिले दोन भाग भारी जमून आलेले. ‘खेळ खुर्च्यांचा’ चा आठवा ऋतू गंडण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर पैल्या लंबरावर अढळपणे विराजित असल्याने त्यामानाने दिबाहीमाता फिनाले कै येवढंही वैट्ट वाटलं नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0