दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग
लेखिका : हेमा पुरोहित

अमेरिकेत पर्यटनाला गेलेल्या हेमा पुरोहित यांना एकाएकी करोना साथ चालू झाल्यामुळे काही अभूतपूर्व अनुभव मिळाले. त्यांचे हे वर्णन -

भाग पहिला

Flight taking off

१ मार्च रात्रीचे मुंबई - सिंगापूर - सॅन फ्रान्सिस्कोचे विमान. तीन महिने आधीच बुकिंग झालेले. त्यामुळे उत्साहाने थोडी थोडी तयारी सुरू झाली होतीच. मध्येच एक बातमी आली चीनमधून कोरोना व्हायरसची. तीव्रता तेवढी नव्हतीच. इथे ३० जानेवारीला पहिली केस ऐकली. गांभीर्य नव्हते फारसे.

१७ फेब्रुवारीला सिंगापूर एअरलाईन्सची मेल आली. आमचे २० मार्चचे परत येण्याचे त्यांनी reschedule करून २१ मार्चचे तिकीट कन्फर्म केले होते. अमेरिकेत अजून एक दिवस राहण्यात काहीच अडचण नव्हती. परत २ दिवसांनी अजून एक reschedule आले. आणि एअर इंडियाचे तिकीट कन्फर्म केले. तेव्हाही गंभीरता नव्हती. तसे काही कारणही नव्हते.

२ तारखेला पहाटे सिंगापूरला एअरपोर्टवर विमानात बसताना आम्हांला गेल्या महिन्यात चीनला जाऊन आल्याची विचारणा झाली. उत्तर अर्थातच 'नाही' असे होते. मास्क काही प्रवाशांनीच लावले होते. विमानातील कर्मचारी मात्र मास्क लावून होते.

छान प्रवास करून, भरपूर खाऊन पिऊन, “गल्ली बॉय” सिनेमा पाहून सॅन फ्रान्सिस्कोचा प्रवास एन्जॉय केला. २ आठवडे मजेत घालवले. अगदी “कोरोना” शब्द विसरून मजा केली. अधून मधून काही Down towns मध्ये चक्कर मारताना दुकानांतून गर्दी कमी जाणवत होती पण टेन्शन वाटलंच नव्हतं.

आणि… अचानक १४ मार्चला एक प्रेक्षणीय स्थळ पहायला गेल्यावर पाटी पाहिली की कोरोनामुळे आता हे बंदच रहाणार आहे. तेथून परत फिरलो आणि परतीच्या प्रवासाची मानसिक तयारी आणि घाई सुरू झाली. लगेच फक्त भारत दर्शन “दूरदर्शनवर” सुरू झालं. टेन्शन आलं आणि नकळत वाढत गेलं. रात्री झोपच आली नाही. एकच विचार 'आता इथेच रहायला लागलं तर?' लगेच जवळच्या BPच्या गोळ्यांची मोजणी झाली. Smile १०/१२ गोळ्या जास्तीच्या घेतल्या होत्या. पुढे काय? या विचाराने आधीच BP वाढायला लागले. वास्तवाला धरून हा विचार नाहीए; आपला इथल्या राहण्यातला insurance आपण वाढवू शकतो, हे सगळं समजत असून सुद्धा उमजत नव्हतं. काही काळ तसाच गेला. नंतर कधीतरी डोळा लागला. सकाळी उठल्यावर परत एकदम फ्रेश. पण रात्री विचार थांबवू शकले नाही हे तेवढेच सत्य.

दुसऱ्या दिवसापासून सगळीकडे फक्त तोच विषय सुरू झाला. मी Sunnyvale (कॅलिफोर्निया)ला रहात होते. अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. तसेही रस्त्यावर माणसं खूपच कमी. आता मास्क लावलेली माणसं दिसू लागली. कुत्र्यांना मात्र नियमित फिरवले जात असल्याचे दिसले.
सगळीकडून माहिती घेतली जाऊ लागली. अगदी काही विमान कंपन्यांच्या स्टाफकडून सुद्धा. सगळ्यांचा एकच सल्ला : “जमेल तितक्या लवकर भारतात परत जा.” तसेही आमचे तिकीट २१ मार्चचे होतेच बुक केलेले. त्याच्याही आधी जायचे का हाही विचार होऊ लागला. अजून तरी विलगीकरणाच्या फारशा बातम्या कानांवर आल्या नव्हत्या. रोजचे TVवरील भारतातील आणि त्याहीपेक्षा जगभरातील आकडे बघून सगळ्यांचे मुड्स बदलत जात होते. टेन्शन, चिडचिडेपणा नकळत वाढला होता. इकडे लगेचच “work from home”च्या सूचना दिल्या गेल्या.

२ /३ दिवसांत खरंतर TV बघण्याचा आणि “कोरोना” या शब्दाचाच त्रास होऊ लागला. इकडे अमेरिकेत मुलाकडे आलेल्या माझ्या एका मैत्रिणीने घरगुती काही कारणाने एक महिना आधीच निघून आमच्याबरोबर परत येण्याचे ठरवले. तिचे तिकीट बुक करण्यासाठी पुण्यात त्या विमान कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्या यजमानांना तिकिट बुक करावे लागले. On line होत नव्हते. म्हणजे आता जवळ आलेले जग दूर जायला लागले होते तर…

आणि मग आणखी एक घोषणा झाली. २२ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंतच international flights भारतात येऊ शकतात. आम्ही दुपारी पोचणार होतो, त्यामुळे एक टेन्शन कमी झाले.

घरातील काही गरजेचे सामान आणण्यासाठी मॉलमध्ये (पार्किंगमधील गाड्यांची संख्या बघून मगच) गेलो. खूपच मोठ्ठे मॉल्स पण तरीही ५० / ६० जणं जमलेली दिसली की खरेदी लवकर आटपली जायची. Social distancing तिथे आपोआपच पालन करत होते सगळेजण. बऱ्याच मॉल्समध्ये पहिले टॉयलेट पेपर्स संपल्याचे जाणवत होते Smile कॉस्मेटिक्स, गिफ्ट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी विभाग बरेचसे रिकामेच दिसले. या प्रकारात अमेरिकेत शॉपिंग असे झालेच नाही.

आता भारतात पोचण्याचे टेन्शन राहिले नव्हते. पण ओढ लागली होती. “ने मजसी ने परत मातृभूमीला” ओळ खरीखुरी जगत होते. _/\_ रोजचे नवे आकडे, नवीन बंधनं, परीक्षा पुढे ढकलल्याचे, शाळा / कॉलेजं, बंद केल्याच्या बातम्यांमुळे तिकडची ओढ वाढत होती.

घरात नुसते बसून कंटाळा येऊ लागला. दुपारी Netflixवर एखादा सिनेमा आणि संध्याकाळी एक / दीड तासाची मोठी चक्कर झाली शेवटचे ३ / ४ दिवस. तेवढेच जरा फ्रेश वाटायचे. पण या कोरोनामुळे सगळीकडे उदासीनता भरलेली अनुभवाला आली. उद्या काय होते, आपण काय काळजी घ्यायची हेच विचार डोक्यात घोळत असायचे. बॅग्ज भरून झाल्याच होत्या. दिवस मोजणे सुरू झाले होते. परवा कुठे असू, उद्या कुठे पोचलो असू,… असे करत शेवटी २१ तारखेला सकाळचे साडेदहाचे विमानात बसण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला पोचलो. सगळे चेकिंग पूर्ण झाल्यावर हुश्श झाले. भारतात घरी मेसेज गेले. तसा चेकिंगला काही त्रास होत नव्हता. विमानही फुल्ल असल्याचे कळले. आणि... अखेर दिल्लीला घेऊन जाणारे विमान आकाशात झेपावले. फिर भी दिल्ली बहुत दूर ही थी। सत्रह घंटे दूर!!!
---
(क्रमशः)
भाग दुसरा - पुणेकरांना केले उणे...
भाग तिसरा आणि अंतिम - झाले मोकळे आकाश...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet