पद्मा

'पद्मा'

(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)

माझ्या आज्जीचं नाव पद्मावती. अगदी अकाली आजोबा गेले. लहान लहान मुलं, थोरल्यांची शिक्षणंही पूर्ण नव्हती झाली अजून. गावाकडं घर, मळा सगळं होतं. शिक्षण काहीच नाही बाईचं. पण बाई करारी, धोरणी, धाडसी. मुलांच्या शिक्षणासाठी भिर्डीतून सगळं बिऱ्हाड कोल्हापूरात हलवलं. बाळंतपणात एक लेक गेली, पाठोपाठ नवऱ्याचं अचानक जाणं, हातात पैसाच नाही. घरी खाणारी तोंडं दहा. कमावणारं असं कुणीच नव्हतं. शेतीतून येईल तेच धान्य. गावाकडं लोकांनी खुळ्यात काढलं. 'बघबाई जातीस शहरात कसं निभवणार?' असंही काहीजणं म्हणाली. पण मुलांनी शिकायलाच पाहीजे ह्या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन ती सगळ्या मुलांना घेऊन कोल्हापूरात आली. गावाकडं जायची सुगीच्या काळात. रयतांवर विश्वास टाकलेला. थोरला मुलगा शिक्षकाची नोकरी करू लागला. त्याच्या पाठचाही शिक्षकच झाला. पण पगार फार कमी मिळत होते. त्यातून आमच्या घराण्याचा गुणधर्म म्हणजे लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या, आपण उपाशी राहतील पण लोकांची पोटं भरतील असली तुकारामी प्रवृत्ती. तसंच होत होतं. धाकट्यांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. थोरल्यांच्या जुजबीच पगाराच्या नोकऱ्या. इथं कोल्हापूरात आल्यावर एका वाड्यात तात्पुरतं भाडं भरून रहायला सुरूवात केली. एकट्या तरूण बाईनं त्यावेळी आठ मुलं आणि गावाकडच्या शेतमळ्याला सांभाळण्याची जबाबदारी अतिशय उत्तम पार पाडली होती. कोल्हापूरात आल्यावर ज्या वाड्यात भाड्यानं रहात होते भिर्डीकर त्याचा अर्धा भाग नंतर विकत घेतला काकांनी. घर विकत घेतलेलं बघायला मात्र ती नव्हतीच. धाकट्यांची शिक्षणं, लग्न बघेपर्यंत ती जगली नाही. कॅन्सरमुळं ती ७० च्या दशकात गेली. पुढं पाच सहा वर्षांनी हे घर काकांनी विकत घेतलं. तिच्या कष्टांमुळं, तिच्या जिद्दीमुळंच हे होऊ शकलं होतं. तिच्या आठवणीत घराला 'पद्मा' नाव दिलं. घरात रहायला जाऊन पन्नास वर्षं पूर्ण झाली म्हणून आम्ही सर्व भिर्डीकर काही वर्षांपूर्वी तिथे जमून तो दिवस साजरा केला होता. आम्हा सर्व मुलांचे जन्म बालपण तिथलंच.

तिथल्या अंगणात दगड का माती, पळापळी, लपंडाव पासून क्रीकेट, तगडवालं बॅडमिन्टन असे खेळ खेळत असणारे आम्ही दिसतो आहोत. तिथल्या अंगणात दिवाळीला रांगोळ्या काढण्यापासून, फटाके उडवण्यापासून रंगपंचमीला रंग खेळत असणारी आमची ध्यानं दिसताहेत. तिथल्याच अंगणातल्या उघड्या मोरीत पुरुषांच्या मुलांच्या आणि लहान मुलिंच्या रोजच्या अंघोळ्या झाल्याहेत त्यावेळी अंगणात अखंड पेटता असणारा, धगधगणारा तांब्याचा हा थोरला बंब दिसतोय.

पद्माच्या माळ्यावर असणारी अगणित पुस्तकं आणि जुन्या पत्रांच्या चवड्या नजरेसमोर येताहेत. त्यांच्या घाणेरड्या वासामुळं दिवाळीच्यावेळी माळ्याकडं फिरकूच नये असं वाटणारे शेणाचे पांडव तिथं नीटच विराजमान होऊन बसलेले दिसताहेत. सोप्यात दादांकडे, काकांकडे, बाबांकडे सतत येत असणाऱ्या मित्रांचा ओघ आणि त्यांच्या चर्चांचा, गप्पांचा जमलेला फड दिसतो आहे. सतत चहा नाष्टा करत असणाऱ्या आई काकवा दिसताहेत. मधूनमधून पेटीकोट चड्ड्या आवरत बागडणाऱ्या आम्ही बहीणी दिसतो आहोत. उन्हाळ्याच्या दिवसातल्या सुट्टीच्या दिवशी गोधड्या पाण्यातून काढून त्या खिडकीला दारावर वगैरे टाकून खोली थंडगार, अंधारी करून तिथंच काहीतरी वाचत लोळणारे बाबा आणि काका दिसताहेत. माजघरात गेल्यावर प्रचंड दुःखं असतानाही आपलं अख्खं आयुष्य आमच्यासाठीच घालवलेल्या मावशी दिसताहेत. त्यांचं ते सुबक सुंदर लावलेलं साड्यांचं कपाट दिसतंय. त्यांच्या काॅटवर, मऊ मऊ उशी पांघरूणात झोपण्यासाठी मरणारे आम्ही दिसतो आहोत. रोजच्या रोज जेवायला बसणाऱ्या पंगती दिसताहेत. पाटपाणी करणाऱ्या आई काकवा दिसताहेत. दिवाळीच्यावेळी बसकी शेगडी घेऊन त्यावर फराळ करत असणाऱ्या मावशी नजरेसमोर येताहेत. स्वयंपाकघराच्या एका पायरीवर कुठलीतरी काकू किंवा आई किंवा कुठलीतरी ताई कावळा शिवून घेऊन बसलेली दिसतेय. तिथल्या कटांजनात आमची मुंडकी अडकवून घेतलेली आणि नंतर शेंबूड गळेपर्यंत रडणारी आम्ही एकजात सगळी भिर्डिकरांची पोरं दिसून हसायला येतंय. वरच्या मोठ्या खोलीत अभ्यासाला बसलेलं कुणी ना कुणी दिसतंय. तिथंच दादा आमच्याकडून छोट्याशा नाटुकल्या बसवून घ्यायचा ते दिसतंय. मोठ्या खिडकीत बसून दिदी माझ्या हातावर मेंदी गिरगुटताना दिसतेय. छोट्या खोलीत टेबल मधोमध घेऊन त्यावर टेबलटेनिस खेळणारे दादा लोकं दिसताहेत. आणि टेपरेकाॅर्डवर गाणी ऐकत बसलेल्या ताया. पत्र्यावरच्या पसरट कुंडीतला फुललेला ब्रह्मकमळ आजपण तसाच दिसतोय आणि तो बघण्यासाठी डोळे तारवटून जागलेले आम्हीही दिसतो आहोत. दादाचा साखरपुडा झाला तेव्हा काहीही न कळत असणाऱ्या आम्हा बच्चेकंपनीनं अमराठी वहिनीशी सिनेमाहिंदी आणि 'my name is,..., what is your name?' असले प्रश्न विचारल्यामुळं बोर झालेल्या वहिनीचा चेहराही येतोय डोळ्यासमोर. चौथ्या दिवशी चार दिवसांचं सगळं धुणं बडवत असणारी कुणीतरी घरचीच बाई दिसतेय मोरीत. आणि त्याचवेळी पायरीवर बसलेल्या मला 'तुला काऽऽऽऽपी केलंय बग' असं म्हणणारी इन्नीही दिसतेय.

इथंच आम्ही जन्मलो, इथंच खेळलो. भांडलोही खूप. गोड कडू सगळ्या आठवणी इथल्या.

(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)

पद्मा आता म्हातारं झालंय. एक एक वसा निखळतोय. आठवणी ठेवाव्यात, जपाव्यात. पण जुनं सोडून द्यावं. पद्मा पाडून नवीन होतंय. नवीन रूपात सगळ्यांसमोर येईल ते काही दिवसात. रोज एक वसा, एक भिंत पाडणं सुरू आहे.

पद्मा व्हायच्या आधी कुणाचंच काहीच होऊ शकणार नाही अशी परीस्थिती होती भिर्डीकरांची. नातवंडं तर ती बघू नाही शकली, पण ती असती तर खात्रीनं सांगते तिला तिच्या प्रत्येक नातवंडाचा अभिमान वाटला असता. सगळी नातवंडं उच्चशिक्षित आहेत. सगळी उत्तम ठीकाणी नोकऱ्या करतात आणि गालबोट लागू नये म्हणून 'ही' करंटी आहेच पण तो मुद्दा नव्हे. ती आज असती तर सगळ्यांचं सगळं छान बघून आनंदली असती. आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता विसरून गेली असती. आणि शांत, निवून उरलेलं आयुष्य जगली असती असं वाटतं.

~अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0