वलय (कादंबरी) - प्रकरण २९ ते ३३

प्रकरण २४ ते २८ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6514

प्रकरण 29

इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला.

‘फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!” हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते:

"फेमस हॉरर सिरीयल की फेमस ऐक्ट्रेस रागिणी के बारे में एक बडा खुलासा! एक ऐसा सच जो आजतक किसीको नही था पता! देखीये थोडीही देर में!"

बेडवर झोपलेली रागिणी अचानक उठून बसली. तिला धक्काच बसला.

"हे चाललंय काय या चॅनेलचं! काय सांगणार आहेत ते माझ्याबद्दल? मला तर डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये! आतापर्यंत मी फिल्मी पत्रकारांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती सांगणे शिताफीने टाळले होते. मात्र या चॅनेलला अचानक कुणी माझ्याबद्दल सांगितलं आणि काय सांगितलं? नक्कीच राहुल असणार! त्याला पैसे देऊन सुद्धा त्याने जे करायचे तेच केले वाटते!"

पुढे निवेदक सांगू लागला:

"दरअसल ये रागिणी भाग गयी थी अपने घर से! बिना अपने हजबंड को बताये! क्या फिल्म इंडस्ट्री में आनेके लिए कोई इस हद तक जा सकता है? हमारे जर्नालिस्टने ये भी खुलासा किया है की शादी से पहले रागिणी के दो लडकों के साथ रिश्ते थे और इतना ही नही ..."

पुढे ऐकवले जात नव्हते. रागिणीच्या मनात संताप, आश्चर्य आणि पराकोटीचा अनपेक्षित धक्का या तीन भावना एकत्र झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे तिने रिमोट टिव्हीकडे जोराने भिरकावले. टीव्ही खळकन फुटून बंद पडला. तिने पुन्हा सूरजला कॉल केला असता त्याचा नंबर स्विच ऑफ होता.
ओह नो! आता काय करू मी? रागिणी अस्वस्थपणे येरझारा घालू लागली. मला या शहरात दुसरं कोण आहे? जवळचं? सूरजशिवाय? आता तिला प्रश्न पडला की ही बातमी पाहून सूरजच्या आधी त्याच्या वडिलांनी, डी. पी. सिंग यांनी तिला बोलावले तर? त्यांना तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच सांगितले नव्हते आणि त्यांनीही काही विचारले नव्हते कारण त्यांची वागणूक प्रोफेशनल होती. ते कामाशी काम या वृत्तीचे होते. पण आता मात्र गोष्ट वेगळी होती कारण ती आता त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड होती. त्याचेसोबत रहात होती. पण त्यांना कॉल करण्याऐवजी प्रथम सूरज आल्यानंतर त्याच्या सोबत बोलूया असा विचार तिने केला....

प्रकरण 30
रागीनीची ही बातमी इटलीत सुप्रिया दुपारी टीव्हीवर बघत होती. तिला आश्चर्य वाटले आणि जुन्या होस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या. मेडिया आता सेलिब्रिटींच्या खासगी जीवनात जरा जास्तच शिरायला लागलीय असे तिला वाटले. सेलिब्रिटीजना एक हवेहवेसे सोशल “वलय” प्राप्त तर होते पण ते “वलय” आपल्यासोबत अनेक दुःखदायक आणि नकोशा गोष्टी घेऊन येते हे नक्की! असा विचार सुप्रियाच्या मनात आला.

ती एव्हाना चांगलीच इटालियन बोलू शकत होती. तिने जवळच्या शहरातील एका एफएम रेडिओ स्टेशनवर दिवसातील चार तास रेडिओ जॉकी म्हणून जॉब पत्करला होता. आसपासच्या शहरातील एशियन लोकांसाठी चार तास एशियन गाण्यांचा प्रोग्रॅम त्या रेडियोवर आठवड्यातून तीन दिवस लागायचा. त्यासाठी त्यांना थोडे इंग्लिश, इटालियन आणि हिंदी भाषा येत असणारी एशियन वूमन हवी होती. लोकल न्यूजपेपर मध्ये तशी ऍड आली होती. सुबोधने ती ऍड सुप्रियला दाखवली आणि तिने एप्लाय केले. इंटरव्ह्यू झाला आणि तिला निवडण्यात आले. इंटरव्ह्यू साठी जास्त स्त्रिया आल्या नव्हत्या आणि ज्याही दोन पाच आल्या होत्या त्यात सुप्रियाच सगळ्यात उजवी ठरली. मध्यंतरी तिचे आईवडील आणि सुबोधची आई येऊन त्यांचेकडे चार आठवडे राहून गेले होते. एकंदरीत दोघांचं बरं चाललंय हे पाहून समाधानाने ते इंडियात परत गेले होते...

एकदा रात्री सुबोध लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत होता. घरातली कामं आटोपली होती. सुप्रियाने सहज म्हणून एक न्यूज चॅनेल लावले असता तिला एक फिल्मस्वर आधारित प्रोग्रॅम दिसला. त्याचा दुसरा भाग सुरु होता. राजेश त्या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार आणि अँकर होता. समोर ऑडिएन्स बसली होती आणि स्टेजवर अनेक प्रोड्युसर आणि डायरेकटर मंडळी बसली होती. ऑडिएन्स मध्ये बरीचशी मंडळी ही राजेशने बनवलेल्या टीम मधली होती. अर्थात हे फक्त त्यांना आणि राजेशला माहिती होते. प्रथम टीव्ही बंद करायला तिचा हात वळला पण स्वत:च्या मनाविरुद्ध उत्सुकतेने ती सरसावून बसली आणि उशी मांडीवर घेऊन प्रोग्रॅम बघू लागली.

राजेशने माईक हातात धरून म्हटले, "आपल्या पहिल्या भागात आपण भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास पहिला. दादासाहेब फाळके यांचे अविस्मरणीय कार्य यानिमिताने आपण बघितले. भारतीय चित्रपट कसा बदलत गेला याचा इतिहास आपण बघितला. पहिला भाग आवडल्याबद्दल अनेकांचे ईमेल, ट्विट्स आणि फ्रेंडबुक वर प्रतिक्रिया आल्यात. आपण सोशल मीडिया आणि फोनद्वारे या कार्यक्रमात सिनेरसिकांच्या थेट प्रतिक्रिया आणि प्रश्न या कार्यक्रमात लाईव्ह समाविष्ट केल्या त्यामुळे हा कार्यक्रम लोकांना आपलासा वाटला. आजच्या भागासह यापुढचेही भाग प्रेक्षकांना जागतिक मनोरंजन क्षेत्राबद्दल असेच मनोरंजनपूर्ण ज्ञान आणि ज्ञानपूर्ण मनोरंजन पुरवत राहतील अशी मी खात्री देतो. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला!"

स्टुडिओत आलेले प्रेक्षक, व्यासपीठावरचे प्रोड्युसर, डिरेक्टर्स वगैरे सगळे सरसावून बसले.

राजेश म्हणाला, "तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे- "सिनेमा आणि लेखक!" आपणास माहिती आहेच की कार्यक्रमाची सुरुवात आपण एका प्रश्नाने करतो. तर आजचा प्रश्न आहे- "सिनेमाला सशक्त कथा, पटकथा आणि संवाद असावेत असे आजकाल अनेक निर्माते दिग्दर्शकांना का वाटत नाही?" किंवा दुसऱ्या अर्थाने विचारायचे झाल्यास "निर्माते दिग्दर्शकांना स्वतःच लेखन करावेसे का वाटते?"

थोडा वेगळाच प्रश्न होता. अनेक निर्माते, दिगदर्शकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये अस्वस्थ चुळबूळ सुरु झाली.

रामरत्नम नावाचे निर्माते म्हणाले, "मिस्टर! तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. निर्माते आणि दिगदर्शक हेच खऱ्या अर्थाने चित्रपटाला अंतिम रूप देतात. त्या दोघांच्या अनुभवी नजरेशिवाय कितीही सशक्त कथा लेखकाने लिहिली तरीही ती पडद्यावर साकारता येत नाही. दिग्दर्शकाच्या व्हिजनची सर लेखकाच्या व्हिजनला येऊच शकत नाही आणि दिग्दर्शकाच्या व्हिजनला पैशांच्या वेसणात बांधून शेवटी पडद्यावर येते ते चित्रपटाचे फायनल रूप!"

प्रेक्षकांतील काहीजणांनी टाळ्या वाजवल्या. एका खुर्चीवर बसलेला कथाचोर के. के. सुमनपण मनोमन सुखावला. टाळ्या शांत झाल्यावर हळूच राजेश म्हणाला, "पण मला सांगा की आडातच नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार हो? म्हणजे मला म्हणायचे आहे की लेखकाने कथाच लिहिली नाही तर त्याला पैशांच्या वेसणात बांधणारे आणि पडद्यावर साकारण्याचे व्हिजन येणार कोठून? मुळात एखादी मूर्ती बनवून झाल्यावरच तिला मूर्तिकार किंवा इतर कुणीतरी फायनल टच किंवा रंग देऊ शकतो! आधी मूर्तीला फायनल टच आणि रंग देऊन घ्यायचा आणि मग मूर्ती बनवायला सुरुवात करायची असं कोण करतं का, सांगा बरं मला प्रेक्षकांनो?"

हे बोलून संपताच दुप्पट टाळ्या वाजू लागल्या. टाळ्या संपल्यावर रामरत्नम् काही बोलू इच्छित होते पण त्यांना नेमके शब्दच सापडेनासे झालेत आणि जवळपास ते निरुत्तर झाले.
ही संधी साधून राजेश पुढे म्हणाला, "आणि आता आजकाल तर हद्द झालीये. बरेच निर्माते, दिग्दर्शक तर लेखकांच्या कथा तोंडी ऐकून घेतात किंवा त्याचे कथा वाचन किंवा स्क्रिप्ट ऐकून घेतात, लेखकांना कथा न आवडल्याचे सांगून हाकलून लावतात आणि कालांतराने तीच कथा स्वतःच्या नावाने खपवतात!"

के. के. सुमन आणि काहींच्या चेहेऱ्यावर घाम आला आणि प्रेक्षकांमध्ये चलबिचल सुरु झाली.

“व्ही. शामसुंदर” नावाचे दिग्दर्शक उभे राहिले, "राजेश, काही ठिकाणी असे होत असेलही पण सगळेच जण असे करत नाहीत. मी असा दिग्दर्शक आहे की जो लेखकाला त्याचे पूर्ण मानधन निर्मात्यांकडून द्यायला लावतो आणि त्याच्या कथेशी कुठे तडजोड करत नाही!"

राजेश म्हणाला, "मान्य आहे! मान्य आहे. पण असे चित्र फार दुर्मिळ आहे. आजही लेखकांना हवा तेव्हढा मान, मानधन आणि प्रसिद्धी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिली जात नाही. अवार्ड्स फंक्शन मध्ये सुद्धा चित्रपटाच्या लेखनासंबंधी फारसे अवार्डस् नाहीये. लेखकाला त्याचा सन्मान मिळालाच पाहिजे. आणि प्रत्येक निर्मात्याने एका सशक्त कथेचा आग्रह धरलाच पाहिजे! लक्षात ठेवा लेखक हा पुरातन काळापासून आहे आणि कथा लिहून तो शतकानुशतके वाचकांचे मनोरंजन करत आहे. सिनेमा नंतर आला. लेखक फार पूर्वीपासून अस्तित्वात होते! प्रसिद्ध इंग्रजी लेखक केतन सहानी यांच्या पहिल्या कादंबरीवर आधारित चित्रपट चार चतुर खूप चालला पण केतनला त्याचे श्रेय दिले गेले नाही पण त्याची वाचकसंख्या खूप असल्याने नंतर सोशल मेडीयातून निर्मात्यावर दबाव येऊन त्यांना केतनची माफी मागणे भाग पडले, नंतर त्याच्या आणखी एका कथेवर चित्रपट बनला तेव्हा त्याचे योग्य ते क्रेडीट केतनला मिळाले, पण सगळ्याच आणि नवोदित लेखकांसोबत मात्र असे होत नाही!"

पुन्हा टाळ्या....

पण एक प्रोड्युसर "सी. आर. छब्बीसिया" म्हणाला, "पण राजेश! मी अनेक चित्रपट बनवलेत की ज्यात मी कुणाच लेखकाची मदत घेतली नाही. माझ्याजवळ फॉर्मुले आहेत! त्यात थोडा तिखट मीठ मसाला टाकला की झाला चित्रपट तयार! कशाला हवेत लेखक अन बिखक! रोमँटिक चित्रपटांचे अनेक फॉर्मुले, थ्रिलरचे, सस्पेन्सचे, इमोशनल, कॉमेडी असे प्रत्येक प्रकारच्या सिनेमाचे विविध फॉर्मुले असतात!"

या प्रोड्यूसरला दे दणादण बदडून काढण्याचा प्लॅन राजेशच्या मनात आला पण त्याने स्वतःला कंट्रोल केले कारण त्याच्या टीमचा एक प्यादा त्याला ठरल्याप्रमाणे मदत करणार आहेच हे त्याला माहित होते...

त्याऐवजी राजेश त्याला एवढेच म्हणाला, "येथे बसलेल्या आणि देशभरातील करोडो सिनेरसिकांना तुमचा एखादा फॉर्म्युला सांगाल का?!"

"हे बघा! सामान्य माणूस तिकीट काढून पैसे खर्च करून दोन अडीच तास चित्रपट पाहण्यासाठी येतो ते दोन घटका मनोरंजन करायला! सॉरी मी दोन अडीच तास म्हणालो कारण आजकाल चित्रपट पूर्वीसारखे तीन साडेतीन तासांचे राहिले नाहीयेत! आणि आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तर एका तिकिटाला दोनशे ते पाचशे रुपये पडतात. एवढे पैसे खर्च करून फक्त दोन तासांचा सिनेमा असतो, त्यातही जर समोर पडद्यावर डोक्याला जड असे काहीतरी बघायला मिळाले तर प्रेक्षक शिव्या देईल! चित्रपट प्रेक्षकाला दोन घटका करमणूक देण्यासाठी असतो आणि मसाला फॉर्म्युला त्यासाठी पुरेसा आहे. त्यासाठी लेखकाची गरज नाही. मला तरी नाहीच नाही!"

राजेश म्हणाला, "अहो तुम्ही फॉर्म्युला सांगणार होतात ना! सांगा ना एखादा फॉर्म्युला आम्हाला!"

छब्बीसिया सांगू लागला, "समजा रोमँटिक मुव्ही घेऊ! एक हिरो घ्यायचा एक हिरोईन घ्यायची! मग त्यांची भेट एखाद्या परदेशातल्या एका सुंदर नयनरम्य ठिकाणी घडवायची. चार पाच नाचगाणी. रुसवे फुगवे. तिथल्या एखाद्या पब, डिस्को किंवा क्लबमध्ये एकादे सेक्सी आयटम सॉंग टाकायचे. वर आम्ही सेन्सॉरला असे म्हणायला मोकळे की हे अंगप्रदर्शन किंवा सेक्सी नंगा नाच जास्त वाटत असला तरी ते परदेशात घडतंय, आपल्या भारतात थोडंच घडतंय! आणि मग हिरोईनचे वडील तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून देतात. मग त्या नियोजित वराच्या ओढून ताणून वाईट सवयी दाखवायच्या आणि मग हिरो ते उघडकीस आणतो आणि मग थोडी मारामारी आणि मग हॅपी एंडिंग! माझा पिक्चर "दुल्हन हमारी हिंदुस्तानी" बघितला ना तुम्ही??"

काही जणांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान राजेशने त्याच्या टीम मधल्या गावाकडील एका मेम्बरला एसेमेस केला आणि प्रोग्रॅम मध्ये कॉल करायला सांगितले. तो मेम्बर काय ते बरोबर समजला.

छब्बीसिया पुढे म्हणाला, "हा होता रोमँटिक चित्रपटाचा एक फॉर्म्युला. तसेच ऍक्शन चित्रपटाचाही माझा एक फॉर्म्युला आहे. मी जवळपास सत्तर ऐशी मोडक्या तोडक्या गाड्या गैरेज मधून विकत घेतो आणि चित्रपटभर त्या गाड्या बॉम्बने उडवत राहातो! गाड्यांचे पाठलाग, ऍक्सिडेंट करत राहातो, गाड्या तोडतो फोडतो. प्रेक्षकांना आवडतं! मी लहानपणी माझ्या स्वतःच्या आणि मित्रांच्या खेळण्यातल्या कार तोडून टाकायचो, दिवाळीत गाड्या सुतळी बॉम्बला बांधून त्यांना फोडून ब्लास्ट करून टाकायचो तेव्हाच माझे एक बॉलिवूडमधले काका बोलले होते की हा मोठा झाल्यावर नक्की एक मोठ्ठा ऍक्शन डायरेक्टर किंवा प्रोड्युसर होणार! खि खि खि!"

पब्लिकपण हसायला लागली. राजेश त्याला म्हणाला, "वा! तुमचे फॉर्मुले आणि तुमचा सेन्स ऑफ ह्युमर छानच आहे की! तुम्ही आता एखादा कॉमेडी मुव्हीपण बनवायला हवा! मग त्याचाही फोर्मुला बनवायला हवा! मी तुमच्या या मताशी सहमत आहे की प्रेक्षकाला दोन घटका करमणूक हवी असते पण मी या मुद्द्याशी सहमत नाही की लेखकाची गरजच नसते. मुळात तुमचे हे जे फॉर्मुले आहेत ते कोठून आलेत? ते तुमचे स्वतःचे नाहीत. एखाद्या लेखकाची एखादी कादंबरी हिट होते त्यावर पिक्चर बनतो आणि मग त्याची कॉपी करून तसे अनेक पिक्चर बनतात आणि मग त्याचा फॉर्म्युला होतो. म्हणजे त्याचे श्रेय लेखकालाच जाते शेवटी! अर्थात असेही असेल की एखादा दिग्दर्शक मुळातच एक प्रतिभावान लेखक किंवा संवाद लेखक असू शकतो. असा योग म्हणजे दुग्धशर्करा योग्य किंवा सोने पे सुहागा म्हणावा लागेल! पण विजय शेवटी लेखकाचाच!"

तेवढ्यात फोन वाजला.

"आपल्याला भारतातील एका प्रेक्षकाकडून फोन आलाय. आपण तो फोन घेऊया, हॅलो?"

"हॅलो, मी एक सामान्य सिनेमा रसिक बोलतोय. माझे नाव जय भोसले! मी केव्हापासून तुमची चर्चा बघतोय, ऐकतोय. मला काहीतरी सांगायचं आहे. मी जे सांगणार ते माझं आणि माझ्या अनेक मित्राचं मत आहे!"

"सांगा जय आपले मत! आम्ही सगळे ऐकायला उत्सुक आहोत!"

"तर मी काय म्हणत होतो की छब्बीसिया साहेबांची गाड्यांची तोडफोड आम्हाला आवडत नाही. आपल्या देशात लय गरिबी आहे. नुसत्या मनोरंजनासाठी गाड्या तोडफोड कशापायी करायच्या? त्यापेक्षा गरिबाला एकवेळ भाकर दिली तर तो दुवा देईल. आणि आमाला लेखकाशिवाय पिक्चर सहन होत नाही. पिक्चरला लेखक पायजेलच पायजेल! आणि एखादाच फॉर्म्युला एकदाच फक्त हिट होतो पण नंतर फ्लॉप होतात. त्या के. के. सुमनवर आम्हाला लय डाऊट येतो राव! इतके सगळे पिक्चर तो स्वतःच लिहितो आणि डायरेक्ट पण करतो? शक्य वाटत नाही राव. सुमन एवढाss हुशार आहे हे त्याच्या एकंदरीत अवतारावरून वाटत नाय!" आणि फोन कट झाला. प्रेक्षकांत एकच हशा पिकला आणि सुमन अस्वस्थ झाला. राजेश मनातून आनंदला....

सगळी चर्चा सॉलिड इंटरेस्टिंग होत चालली होती पण डोळ्यांवर आता झोपेचा अंमल येत चालला होता त्यामुळे सुप्रियाने टीव्ही बंद करून टाकला मात्र सुबोधकडे बेडरूमकडे जातांना तिच्या मनात थोड्या वेळाकरता राजेशबद्दल विचार येऊन गेले, "राजेशच्या मनात काहीतरी नक्की वेगळे आहे. काहीतरी आहे ज्यासाठी तो धडपडतोय! राजेशचे इतर प्रोग्राम सुद्धा बघितले पाहिजेत. तो नक्की काहीतरी वेगळे करेल असं एकंदरीत वाटतंय! अगदी राजेशच्या पुन्हा प्रेमात पडावेसे वाटते आहे! छे! सुप्रिया! काय हे!" असे म्हणून तिने सुबोधला मागून येऊन मिठी मारली...

प्रकरण 31

काही दिवस मुंबईबाहेर असल्याने डी. पी. सिंग हे रागिणीबद्दलच्या टीव्हीवरील गौप्यस्फोटाबाबत मौन बाळगून होते. मौन बाळगण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते सूरज ब्राझीलहून परतण्याची वाट बघत होते. तो कालच आला होता. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सूरजशी फोनवर बोलले तेव्हा मी सगळे बघतो, तुम्ही चिंता करू नका असे आश्वासन सूरजने त्यांना दिले होते.

कालांतराने एका हिंदी टिव्ही शोच्या सक्सेस पार्टीला जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेल "गोल्डन सिटीझन" मध्ये रविवारी संध्याकाळी रागिणी, सूरज, डी. पी., सुभाष भट, पत्रकार म्हणून राजेश, तसेच सोनी बनकर, तिच्या शो मधील इतर कलाकार यांच्यासह सिने क्षेत्रातील अनेकांना आमंत्रण होते. एव्हाना सोनी बनकर रियालिटी शो जिंकली होती. जवळपास महत्वाची अशी सगळी टीव्ही फ्रॅटर्निटी आणि काही प्रमाणात बॉलिवूड मधील मंडळी सुद्धा येणार होती. ती सक्सेस पार्टी आयोजित केली होती सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या एका ऐतिहासिक टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी!! कारण त्यांच्या “चक्रवीर राजा विक्रमसेन!” या शोचे नुकतेच दोनशे भाग पूर्ण झाले होते.

प्रथम टीव्हीवरील त्या न्यूजने अस्वस्थ झालेली रागिणी पार्टीला यायला तयार नव्हती पण सूरजने आग्रह केला. विशेष म्हणजे तो रागिणीच्या भूतकाळाचा गौप्यस्फोट करणारा टीव्ही जर्नालिस्ट "सुधीर श्रीवास्तव" पण तेथे येणार होता. त्या टीव्हीवरील कार्यक्रमाबद्दल जास्त टेन्शन घेऊ नको असे सूरजने रागिणी सांगितले तसेच सूरजने त्या पत्रकारावर लीगल ऍक्शन घ्यायचे ठरवले होते. पण जर का त्याने माफी मागितली तर प्रकरण मिटवून टाकू असे रागिणीला सांगितले. असे अनेक धक्के सेलिब्रिटीजना पचवावे लागतात असे तो म्हणाला. ती शेवटी पार्टीला तयार झाली होती.

पण कितीही केले तरी त्यादिवशीनंतर आजतागायत ती एका अनामिक दडपणाखाली होती. आतापर्यंत तिने शिताफीने पत्रकारांपासून लपवलेले सत्य नेमके सूरज ज्यादिवशी ब्राझीलला गेला त्यानंतरच कसे काय पत्रकारांना समजले? राहुलने तर नाही ना हे सगळे केले? पण सूरजला राहुलबद्दल सांगितल्यानंतर राहुलचा फोन येणे बंद का झाले? सूरजने त्याला धमकावले असावे! त्यामुळेच राहुलने टीव्ही चॅनेलला माझे पूर्वायुष्य सांगितले असेल!!

पार्टीच्या दिवशी संध्याकाळी कारमध्ये मुंबईतील रस्त्यांवर सूरजची कार धावत होती. सूरजसोबत रागिणी बसली होती-

"एनिवे रागिणी, राहुलचा फोन तुला पुन्हा आला होता का?"

"नाही!"

"पुन्हा फोन आलाच तर आपण काही ठोस ऍक्शन घेऊ! तसे मी त्याचा फोटो माझ्या काही विश्वासू सहकाऱ्यांना दाखवून काही माहिती मिळतेय का हे गुप्त रीतीने तपास करायला सांगितलंय. पोलिसांत गरज पडली तरच जाऊया! कारण पोलिसांचा उगाच ससेमिरा मागे लागतो, यु नो!"

यानंतर रागिणी काही न बोलता शांत विचार करत राहिली. म्हणजे अजून तरी सूरज राहुलशी डायरेक्ट बोलला नाहिए तर! सूरज ब्राझीलहून आल्यानंतर थोडा बदलला आहे असे तिला वाटल्यावाचून राहवले नाही. पण कामाच्या व्यापामुळे तसे असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले. बराच वेळ कुणी कुणाशी बोलत नव्हतं…

"गोल्डन सिटीझन" च्या टेरेसवर म्हणजे बाराव्या मजल्यावर खास मोठे पार्टी लाऊंज होते. ते आजच्या पार्टीसाठी बुक केले होते. जसा अंधार पडायला लागला तसे टीव्ही आणि बॉलिवूड मधील चमकते वलयांकित तारे एकेक करून पार्टीत यायला सुरुवात झाली.

आजकाल टीव्ही पण बॉलिवूड इतकाच ग्लॅमरस झाला असल्याने एकेकाळी छोट्या पडद्याला नाकारणारे अनेक बॉलिवूड मधील लोक टीव्ही पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत. डिनर जॅकेट, डेंनीम जॅकेट, जीन्स पॅन्ट, शेरवानी, स्लीवलेस टीशर्ट , ग्रे, ग्रीन, ब्लु ब्लेझर्स अशा अनेक प्रकारच्या पोशाखात टीव्ही तसेच बॉलिवूड मधली पुरुष कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी, गीतकार, संगीतकार, गायक मंडळी अवतरत होती. ऐतिहासिक आणि पौराणिक सिरीयलचे कलाकार मात्र थोडे वेगळ्या वेशात आले होते कारण शूटिंग साठी जुन्या काळातील व्यक्तिरेखांप्रमाणे त्यांना तसे राहाणे भाग होते. कुणी टक्कल केलेले तर कुणी केस वाढवलेले असे सगळेजण आले होते.

तर स्त्रियांपैकी काहीजणी सलवार, स्लीव्हलेस टॉप, जीन्स, लो कट् ब्लाऊज आणि मुद्दाम कमरेखाली नेसलेल्या साड्या, तर काहीजणी अतिशय शॉर्ट स्कर्ट आणि खूप मोठा क्लिव्हेज दाखवणारे शॉर्ट टॉप, पार्टी गाऊन्स, वन पीस टॉप, वन पीस गाऊन अश्या प्रकारचे कपडे घालून आणि हातात पर्स आणि महागडे मोबाईल मिरवत येत होत्या. अनेक ग्लॅमरस स्त्रिया एकेक करून पार्टीत येत होत्या. त्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या सेंट्सचा सुवास त्या पार्टीला एक वेगळीच अनुभूती देत होता. काही स्पॉन्सर बिझिनेसमॅन मंडळींनीही हजेरी लावली होती. सोनी बनकर अंगाला घट्ट आणि फिट बसणारा, तिचे स्त्रीत्व दर्शवणारे अंग उठून दिसेल असा स्लीव्हलेस टॉप आणि अतिशय छोटी पण हिप्सचा गोलाकार ठळकपणे दर्शवणारी जिन्सची पॅन्ट घालून आली होती. त्यामुळे तिच्या गोऱ्या उघड्या पुष्ट पायांकडे आणि मांड्याकडे सगळ्या पार्टीतील पुरुषांची नजर होती. काही स्त्रिया तिला लाभलेले असे सौंदर्य पाहून मनातल्या मनात जळून नाक मुरडत होत्या. सोनी बनकर या पार्टीत तिच्या रियालिटी शोमधील कोस्टार “भूषण ग्रोवर” याच्यासोबत पोहोचली होती.

सोनीच्या चेहेऱ्यावरचा नेहमीचा अल्लडपणा आणि उच्छृंखलपणा ओसंडून वाहात होता आणि तो तिच्या कपड्यांशी मॅच होत होता. भूषण ग्रोवरचे दणकट बाहू पकडून पार्टीत येतांना तिला खूप गर्व आणि आनंद वाटत होता.

सुभाष भट त्यांची साडी घातलेली पत्नी रजनी घोसाळकर सोबत नुकतेच पोहोचत होते. सुभाष भटना आज सोनी बनकरला त्यांच्या आगामी हॉरर, थ्रिलर म्युझिकल चित्रपटात घेण्याबद्दलची औपचारिक घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. तशी BEBQ च्या प्रोड्यूसरने थोडी पूर्वकल्पना सोनीला दिली होतीच!

पार्टीत स्टार्टर्स आणि सॉफ्ट ड्रिंक सर्व्ह केले जात होते. रागिणी आणि सूरज “ऑन द वे” होते तर राजेश घरून निघण्याच्या बेतात होता. तो बहुदा अश्या पार्ट्यांना हाफ स्लीव्ह ग्रे टी शर्ट आणि जीन्स घालायचा पण यावेळेस त्याने ग्रीन ब्लेझर निवडले जे त्याने नुकतेच ऑनलाइन मागवले होते खास अशा पार्ट्यांसाठी ज्यात तो फिल्मी पत्रकार म्हणून जात असे.

प्रकरण 32

शक्यतो सुनंदा त्याच्यासोबत अशा पार्ट्यांना येत नसे. फक्त एक दोनदा ती आली होती पण तिला ग्रामीण जीवनाची सवय अंगवळणी पडली असल्याने अशा पार्ट्यांना तिला अवघडल्यासारखे वाटे. मध्यन्तरी राजेशची आई त्यांचेकडे राहून गेल्यानंतर तिची एक दूरची काकू दोन महिन्यापासून त्यांचेकडे राजेशच्या इच्छेविरुद्ध येऊन राहात होती कारण सुनंदाला शहरात करमत नव्हते. काकू राहायला आल्यापासून सुनंदा राजेशवर संशय घ्यायला लागली कारण ती काकू सुनंदाला नेहेमी राजेश नसताना असे काहीतरी सांगायची ज्यामुळे तिला राजेशवर संशय निर्माण होईल!

"या फिल्मी क्षेत्रात काय खरं नसतं बरं! बायका लै लफडेबाज असत्यात! आपला मतलब साध्य करायला त्या कायबी करायला तयार व्ह्त्यात! माझ्या एका दूरच्या चुलत भावाकडून म्या ऐकलंया तसं! तो शुटिंगच्या ठिकाणी स्पॉट-बाय आसतो. त्यो सांगतो की त्यानं लै येळा एका कारमंदी एका फेमस नटीला एका लगीन झालेल्या डायरेक्टर सोबत लव्ह करताना पायलंय, त्या हिरोईनचा नवरा एक जानमाना यापारी हाय, बिझीनेशमॅन! त्याला हे लफडं माहिती नाय! नायतर..." विविध प्रकारे अशिक्षित हातवारे करून बांगड्यांचा खळ खळ आवाज करत ती अशा ऐकीव सुरस आणि चमत्कारिक कथा सुनंदाला सांगायची.

"खरंच कावो काकू असं असतं?” गावभोळी सुनंदा तिच्या बोलण्यात यायची.

"असतं मंजे? बिलकुल असतं! मला तो चुलत भाऊ अजुन काय काय सांगत आसतो! न सांगितलेलं बरं! आन या बायका राजेशसारक्या सध्यासुध्या माणसाला लवकर जाळ्यात ओढत्यात! असं झालं तर तुझा संसार संपलाच की सुनंदे! तू त्याच्यावर लक्ष ठिव! त्याच्या बोलण्या वागण्यात काय बदल होतो का, त्याच्या शर्ट, पॅन्टवर कसला बाईचा लिपस्टिक, लांब केस बारीक तपासत जा, शरीराचा बदललेला वास ओळखत जा म्हणते मी! काय? तुला आता हे सांगायला नको! बाई माणसाला माहित पायजेत या गोष्टी! श्रेयापदा आणि जयदेवी या नट्यांचे पिक्चर पहाते ना तू नेहमी टीव्हीवर? त्यातून शिकत जा ना जरा!"

"व्हय! व्हय व्हय नक्की!", सुनंदा आणखीनच गोंधळून जायची आणि मान डोलवायाची.
"शक्य झालं ना तर त्याला म्हणा ही पत्रकार, टीव्ही सिनेमा वाली नोकरी सोडून दे आणि दुसरीकडे हाफिसात नोकरी कर! 9 ते 5”, काकू मोलाचा सल्ला द्यायच्या. त्यांना राजेश सुनंदाच्या संसाराबद्दल काय आकस होता माहीत नाही पण जणू काही त्यांचा चाललेला सुखाचा संसार तिला सहन होत नसावा.

"नाही पण काक्कु! ते तर त्यांचे स्वप्न आहे! ते हे क्षेत्र ही नोकरी कधीही सोडणार नाही! ते मला तसं बोलले होते मागे!", सुनंदा म्हणायची.

मग ती "काक्कु" वेगवेगळे उपाय सांगे आणि मग सुनंदा राजेशच्या मागे तगादा लावायला लागली की दुसरीकडे नोकरी शोधा आणि त्याचेवर संशय घ्यायची. राजेश सुरवातीला वाद टाळण्यासाठी काही बोलायचा नाही पण नंतर वाद व्हायला लागले तेही अगदी मोठ्याने. राजेशला काकूंवर संशय होताच पण त्याचेकडे काही पुरावा नव्हता आणि बोलायला सोयही नव्हती.

सासू सुनेच्या सिरीयलसाठी तो अनेक कथा लिहायचा ज्यात संसारात लावालावी करणारी अनेक स्त्री पात्रे असायची पण तशा प्रकारचं एक जिवंत पात्र त्याच्या घरात आज ठाण मांडून बसलं होतं आणि तो काहीही करू शकत नव्हता! त्याचे जीवन म्हणजे त्याने लिहिलेली कादंबरी थोडेच आहे ज्याला तो हवे तसे वळण देईल?

सध्या तो त्याच्या प्रोफेशनल लाईफ आणि त्याच्या महत्वाकांक्षेकडे जास्त लक्ष देत होता. समिरणने त्याच्या म्हणण्यानुसार हिंदी चित्रपटाचे काम् सुरु केले होते. राजेशने त्या चित्रपटाच्या लेखनाचे काम संपवले होते. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरु होते. विशिष्ट दिवशी समिरण त्याला सेटवर बोलवून त्याचे इनपुट्स घ्यायचा. इकडे त्याचे फिल्मी लेखन तसेच टीव्हीवरील त्याचे फिल्मी कार्यक्रम लोकप्रियता मिळवत होते. के के सुमन कडे त्याची आणि त्याच्या टीमची वक्रदृष्टी होतीच!

आजच्या पार्टीत के के सुमन पण येणार होता कारण आता तो म्हणे यापुढे टीव्ही सिरियल्स पण प्रोड्यूस आणि डायरेक्ट करणार होता असे राजेशला त्याच्या टीममधील अशा खबऱ्यांनी सांगितले होते ज्यांना त्याने सेटवर आणि इतर ठिकाणी छोटी मोठी कामे मिळवून दिली होती आणि ज्यात ते खूप खूश होते कारण त्यांना विविध स्टार्सच्या आसपास वावरायला मिळायचे!

सारंग सोमैया हापण आता एका मराठी साप्ताहिकासाठी टीव्ही स्टार्सच्या मुलाखती घेणारा एक पत्रकार बनला होता. त्यानिमित्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात त्याचा वावर वाढला होता. या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे मॅनेज करतांना घरी निर्माण झालेल्या या “साँस बहू टाईप” प्रॉब्लेमचे मात्र त्याचेकडे सोल्युशन नव्हते. कथेत जर असे पात्र असते तर त्याने कदाचित त्या काकूंना सुनंदाचा पती खडे बोल ऐकवून हाकलून देतो असे त्याने लिहिले असते, पण येथे तो तसे करू शकत नव्हता कारण त्याचे परीणाम जेही होतील ते झेलण्याची त्याची तयारी आणि मानसिकता नव्हती...

तर आज तो पार्टीसाठी ग्रीन ब्लेझर अंगावर चढवतच होता आणि ती काकू त्यांच्या हॉल मध्ये टीव्ही बघत बसली होती तेव्हा बेडरूम मध्ये सुनंदा आली आणि राजेशला म्हणाली, "काय गरज होती एवढ्या महाग ब्लेझरवर खर्च करण्याची? खरं म्हणजे सारख्या सारख्या पार्ट्यांना जायची गरजच काय म्हणते मी?"

ऐन पार्टीच्या तयारीआधी अचानक हे प्रश्न आल्याचे बघून प्रथम राजेशला आश्चर्य वाटले आणि मग खात्री झाली की हे काम त्या टीव्ही बघत बसलेल्या खाष्ट बाईचे असणार! त्याने त्या काकूकडे नजर टाकली तर ती राजेशकडे बघून टीव्हीचे रिमोट हातात घेऊन उपहासाने तोंड वाकडे करत हसत होती, जणू काही आता सुनंदाला कंट्रोल करायचे रिमोट तिच्या हातात आहे असे ती दर्शवत होती. म्हणजे आता सुनंदाशी वाद घातला आणि नाही घातला तरी राजेशच्या डोक्याला ताण हा असणारच आहे हे उघड होते!

पण राजेश त्यातल्या त्यात काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून शक्य तेवढ्या संयमाने म्हणाला, "असं बघ सुनंदा, आता विकत घेतलाच आहे हा ब्लेझर तर घालू दे ना मला. मग तो घ्यायची आवश्यकता होती की नव्हती हे नंतर पार्टीहून परतल्यावर आपण ठरवू!"

"हो का? बरंय बुवा तुमचं झगमगतं जग! बरं पण एकटेच तयारी करता आहात, मला विचारलं नाही की चलतेस का म्हणून?"

"अगं, तुला काल विचारले की आजच्या पार्टीला येणार का तर तू नाही म्हणाली होतीस आणि आता??"

"एकदा नाही म्हटलं तर तेच धरून ठेवलं? परत विचारता येत नाही? एवढी का मी नकोशी झालेय तुम्हाला!"
"बरं, आता विचारतो! परत विचारतो! चलतेस का?", येथे सावध पवित्रा घेऊन राजेश बोलत होता कारण विनाकारण राजेशने शब्द पकडून काकू “ध चा मा” करून सुनंदाला भडकवायची शक्यता होती.

"मी लक्षात आणून दिल्यावर मग तुम्ही मला आमंत्रण देता? आता तर मी मुळीच येणार नाही तुमच्यासोबत. पण घरी लवकर या! शक्यतो अकरा वाजेपर्यंत परत या!"

"लवकर येणं शक्य नाही सुनंदा! तुला चांगलं माहिती आहे की अशा पार्ट्यांना रात्री उशीर हा होतोच! तू आधी आली आहेस अशा प्रकारच्या पार्ट्यांना एक दोनदा आणि तुला चांगलं माहिती आहे !"

"आली होती म्हणूनच सांगतेय की लवकर या! कुणी आहे का एखादी सटवी तेथे तुम्हाला सोबत करायला? गळ्यात गळा घालून नाचायला? मागच्या वेळेस ती तुमच्या सारखी एक पत्रकार.. काय नाव होतं तिचं? हां! मोहिनी मोने! काय बाई कपडे घालते आणि काय सगळं अंग अंग मिरवते, शी बाई!?" मग तिचा शब्दांचा पेटारा असा काही उघडला की वाक्यांवर वाक्ये राजेशवर आदळू लागली.

थोड्या वेळानंतर, मुंबईतील रस्त्यांवरून नुकत्याच विकत घेतलेल्या कारमध्ये ड्राइव्ह करत राजेश सुटकेचा निश्वास टाकत होता. असे वादविवाद आता रोजचे झाले होते. त्याच्या आयुष्याने थोड्याच कालावधीत वेगळेच वळण घेतले होते. घरातून निघतांना मोठ्याने सुनंदा ओरडली होती ते त्याच्या कानात गाडी चालवतांना सारखं घुमत होतं:

"मी म्हणते सोडून का नाही देत तुमची ही नोकरी! मला आवडत नाही हा तुमचा फिल्मी तमाशा! एखाद्या ऑफिसात 9 ते 5 क्लार्कची नोकरी पकडा! डबा बनवून देत जाईन रोज! टिफिन! रोज खाऊन घरी येत जा...मी म्हणते काय गरज आहे त्या नटव्या सटव्या बायांसोबत नाचायची आणि जेवण करायची??.. आणि ती घोडी काय नांव तिचं? ती साउथची अप्सरा? “माया भैरवी”! पूर्ण पाय आणि अर्धी छाती उघडे टाकणारे कपडे घालून येते पार्टीत! भलती आवडत असेल नाही ती तुम्हाला? चार चार वेळा मुलाखत घेतली होती तिची तुम्ही म्हणून म्हटलं..." अशा प्रकारे ती बऱ्याच असंबंध गोष्टी सुद्धा बडबडत राहिली होती आणि राजेश चढलेला पारा उतरवत घराच्या पायऱ्या उतरू लागला होता.

कार चालवत चरफडत राजेश मनातल्या मनात खूप मोठ्याने विचार करत होता: "अरे, मूर्ख स्त्री! ज्या महत्वाकांक्षेसाठी मी सुप्रियाला सोडलं, ज्यासाठी मी आईचा एकसारखा तगादा ऐकून ऐकून तुझ्याशी लग्न केलं, तीच महत्वाकांक्षा, तेच क्षेत्र सोडून दे म्हणतेस?..आणि तुझं ते संशय घेणं कधी थांबणार? असा बिनबुडाचा संशय आता जर का तू सतत घेत राहिली तर कदाचित तुझ्या संशयाला मी खरे करूनच दाखवेन! साला! याला घरगुती वादळाचा वीट आलाय! त्या इष्टमनकलर काकूचा हात पिरगाळून तिला जाब विचारून घराबाहेर काढलं पाहिजे! घरची भांडणं आता सिनेमास्कोप एवढी जास्ती मोठी व्हायला लागलीत! 70 एम एम!"

विचारांतील संतापामुळे त्याने स्टिअरिंग व्हीलवर जोरात उजवा हात आपटला आणि त्यामुळे गाडी अचानक थोडी उजवीकडे वळून बाजूच्या वेगातल्या कारला थोडी स्पर्शून पुढे गेली. पण पटकन स्टिअरिंग व्हील सावरून मोठा अपघात होण्यापासून त्याने वाचवला. ती मागची कार वेगाने समांतर पुढे आली आणि त्या कारचा पुढचा काच हळूहळू खाली होऊ लागला. आता त्या कारमधला ड्रायव्हर वाद घालणार! नक्की! राजेशनेही काच खाली केला आणि उजवीकडे बघितले. आहे कोण त्या कारमध्ये?

अरेच्च्या! मोहिनी मोने! वाचलो! दुसरं कुणी अनोळखी असतं तर? राजेशच्या कपाळावर आठ्या आणि चेहेऱ्यावर सुनंदासोबतच्या भांडणाच्या निराश रेषा पसरल्या होत्या.

मोहिनी म्हणाली, "अरे! काय रे राजेश काय झालं? अशा प्रकारे गाडी का चालवतोयस्? माझ्या माहितीप्रमाणे शक्यतो तू जास्त पीत नाहीस आणि मला एक सांग की पार्टीच्या आधीच कुणी घरूनच पिऊन निघतं का रे?"

राजेश मनात म्हणाला, “ आता हिला कसं सांगावं की हिच्यामुळेच एक काल्पनिक संशय निर्माण होऊन आता सुनंदाशी माझे भांडण झाले आहे!”

आणि मग तो मोठ्याने म्हणाला, "हे मोहिनी, समांतर गाडी चालवू नकोस, एक तर पुढे हो नाहीतर मागे तरी जा! नाहीतर या जास्त ट्राफिक वाल्या रोडवर आणखी अनेक ऍक्सिडेंट व्हायचे! आणि सॉरी, माझेकडून ते चुकून झालं आणि हॅलो, मी काही पिलेलो बिलेलो नाही बरं का, नॉटी गर्ल!" राजेश हसून म्हणाला.

अचानक मोहिनी भेटल्याने त्याच्या डोक्यातला ताण थोडा हलका झाला. मोहिनीने आज अतिशय आकर्षक पोशाख केला होता - खोल गळ्याचा पिवळा टी शर्ट आणि शॉर्ट निळी जीन्स! तिच्याकडे पाहून राजेश क्षणभर देहभान विसरला!

तिची गाडी त्याच्या गाडीच्या पुढे झर्रकन घेत ती म्हणाली, "नो प्रोब्लम्, आपण पार्टीत बोलूया! आणि मी माझ्या गाडीला झालेल्या डॅमेजची वसुली कोणत्या न कोणत्या मार्गे करणार हे विसरू नकोस!" मिश्कीलपणे हसत ती म्हणाली आणि भरपूर वेगात ती त्याच्या खूप पुढे निघून गेली कारण राजेशने आधीच त्याचा वेग कमी केला होता आणि तो आता हळूहळू चालवत होता.

प्रकरण 33

जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेल "गोल्डन सिटीझन" च्या बाराव्या मजल्यावर टेरेसवरील पार्टी लाउंज मध्ये टेलिव्हिजन आणि सिनेक्षेत्रातील तारे तारका जमले होते. कुणी टेबलवर खुर्चीवर बसून तर कुणी उभ्याने खात आणि पीत होते. वर्तमानपत्र आणि टीव्ही पत्रकार आपापल्या कामात मग्न होते. राजेश आणि रागीणीच्या पूर्वायुष्याचा गौप्यस्फोट करणारा सुधीर श्रीवास्तव, सारंग सोमैया तसेच इतर पत्रकार त्यात होते.

सारंगने त्याच्या गावाकडील एका मैत्रिणीला, वीणा वाटवे हीला पार्टीत बोलवून एका हिंदी सिरियलच्या कास्टिंग डायरेक्टरशी तिची भेट घालवून दिली. तसेच तिची ओळख त्याने मिष्टी मेहरानशी करून दिली. तिला छोटासा रोलसुद्धा पुरेसा होता. मिष्टी तिला तिच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये घेणार होती.

रागिणी आणि सूरज एका ठिकाणी उभे होते. डी. पी. सिंग हे त्या दोघांशी जुजबी बोलणे झाल्यावर दुसरीकडे निघून गेले. रागिणी टेन्स दिसत होती तर सूरज कसल्यातरी विचारांत गढलेला होता. बॅकग्राऊंडला म्युझिक सुरु होते. सोनी आणि भूषण ग्रोवर एकमेकांच्या कमरेभोवती हात घालून एकमेकांच्या डोळ्यात डोळा घालून डान्स करत होते. सुभाष भट आणि त्यांची पत्नी रजनी अनेकांशी ओळख आणि गप्पा करत होते. ते दोघेजण सोनीला आणि के. सचदेवाला भेटले आणि मग गप्पा मारत पुढे निघून गेले. राजेश सोनी आणि रागिणीला एकत्र भेटला पण सुप्रियाचा विषय निघणार असे वाटत असतांना त्याने त्यांच्यातून काढता पाय घेतला. मग तो सारंग सोमैय्याला भेटला. एलेना, नातशा, मिष्टी, जेसिका कर्टिस हे सुद्धा हजर होते.

बाजूला लावलेल्या एका स्टेजवर ऐतिहासिक सिरीयलचा निर्माता आणि काही कलाकार तंत्रज्ञ मंडळी उभी होती. विशेष म्हणजे अचानक बॉलिवूड मधील एका मसल्स मॅनचे म्हणजे अरमान खानचे तेथे आगमन झाले.

त्या ऐतिहासिक सिरीयलमधील राजाची लहानपणाची भूमिका करणारा चौदा वर्षाचा कलाकार सोहम सूरी याने बॉडी बिल्डिंगचे धडे या अरमान खान कडून घेतले होते आणि अरमानला सोहमची ऍक्टिंग खूप आवडायची. वेळ मिळेल तेव्हा तो "राजा विक्रमसेन" ही मालिका जरूर बघायचा.

त्याने माईक हातात घेतला आणि बोलू लागला, "मे आय हॅव युर अटेन्शन प्लिज स्वीट लेडीज अँड नॉट सो स्वीट जन्टलमेंन! प्लीज गीव्ह ऑल ऑफ देम अ स्टँडिंग ओव्हेशन! ऐतिहासिक सिरीयल बनाना कोई आसान बात नही है! बहोत सोचना और पढना पडता है! आजकल तो वैसे भी ये छोटा पर्दा बडे परदे से भी बडा हो गया है!"

थोडे थांबून मग अरमान पार्टीतून निघून गेला. मग नंतर त्या सिरियलमधील मुख्य कलाकारांचे, तसेच प्रोड्युसर, डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर वगैरे यांचे इंटरव्ह्यू झाले. हा इव्हेंट टीव्ही चॅनेल्स लाईव्ह टेलिकास्ट करत होते. मग स्टेजवर सुभाष भट आले. सगळेजण आता त्यांचेकडे लक्ष देऊन होते.

त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलू लागले, "आज मैं इस पार्टी में आकर गर्व महसूस कर रहा हूं! मैंने मेरी कई फ़िल्मो में टेलिव्हिजन ऍक्टर्स को चान्स दिया और वे आगे जाकर बडे कलाकार बन गये और बाद में उन्होने कई सुपरहिट फिल्मे दी. आज इस स्टेज पर मैं एक अनौन्समेंट करना चाहता हूं! वो ये है की, BEBQ शो की विनर सोनी बनकर को मैं मेरी आनेवाली म्युजीकल डान्स हॉरर फिल्म में ले रहा हूं!" त्याने सोनीला स्टेजवर बोलावले आणि आणखी एक अनौन्समेंट केली, "को-विनर जेसिका कर्टीस को भी इस फिल्म मी एक रोल दिया जायेगा और "राजा विक्रमसेन" के आर्ट डिरेक्टर निलेश देसाई मेरे फिल्म का आर्ट डिरेक्शन करेंगे और BEBQ का “कास्टिंग डिरेक्टर” इस फिल्म के लिए मेरा असिस्टंट डिरेक्टर रहेगा!"

उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि रागिणीला एक जबरदस्त धक्का बसला आणि रागिणी सूरजसोबत काही बोलणार अगदी त्याच वेळेस तिची नजर चोरून “एक्सक्यूज मी” म्हणून सूरज कुणालातरी भेटायला म्हणून गर्दीत पुढे निघून गेला.

सुधीर पण त्याच्या जागेवरून उठला आणि बाहेरच्या छोट्या डान्स फ्लोरच्या काचेच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. मध्ये स्टेजवर पुढे अनेक गोष्टी सुरु होत्या. सेलिब्रेशन झाले. रागिणीच्या मनात एक सुप्त आशा होती की तीच सुभाष भटच्या पुढील हॉरर चित्रपटात असेल पण सोनी? माझ्याच मैत्रिणीला सोनीला चान्स मिळाला हे चांगलेच झाले पण ...? खरे पाहता दोन समकालीन अभिनेत्रींच्या मधून विस्तव जात नाही पण रागिणी आणि सोनी यांच्यातील रिलेशन सौख्याचे होते. त्यामुळे रागिणीला सोनीचा द्वेष किंवा मत्सर वाटला नाही.

“आणि आजकाल सूरजचे वडिल पण माझेपासून दूरदूर राहात होते, ते का? सुभाष भटने सिंग यांचेकडे माझेसाठी चित्रपटाकरता शब्द तर टाकला नसेल? पण तसे असते तर सिंग यांनी मला सांगितले असते! रागिणी विचार करत बसली! कदाचित टीव्हीवरच्या बातमीमुळे आणि माझ्या झालेल्या बदनामीमुळे सिंग आणि सुभाष भट यांनी त्यांचा विचार बदलला असावा का?” रागिणी विचार करत राहिली.

स्टेजवर उशिराने आणखी एक व्यक्ती चढली. ती व्यक्ती नुकतीच पार्टीत आली होती. तो एक टक्कल पडलेला सावळा आणि लठ्ठ माणूस होता. त्याच्या उजव्या गालावर मोठा काळा डाग होता. दरम्यान आता फ्लॅश लाईट्स चमकत होते. तो माणूस अर्धी हिंदी आणि अर्धी मराठीत बोलू लागला, "के के सुमनला आज काही कारणास्तव वेळेवर पार्टीला येणे कॅन्सल करावे लागले लेकिन मैं उनका असिस्टंट और अनके फ़िल्मो का असिस्टंट डिरेक्टर ‘आर. रत्नाकर’ आज यहां अनौन्स करता हूं की केकेजीने भी विक्रमसेन के प्रॉडक्शन हाऊस के साथ मिलकर एक हिस्टोरीकल सिरीयल बनाने का फैसला किया हैं!...."

राजेश त्याच्या पत्रकारितेच्या कामामधून थोडा ब्रेक घेऊन मोहिनीसोबत ड्रिंक्स घेण्यात मग्न होता तेवढ्यात गंमत म्हणून मोहिनीने कोपराने ढोसून राजेशला स्टेजकडे बघायला लावले, "ए राजेश, ते बघ ना तिकडे स्टेजवर! केकेचा टकला असिस्टंट म्हणतोय केके म्हणे ऐतिहासिक सिरीयल बनवणार!..खि खि खि! लायकी तरी आहे का त्या केकेची? मी सिने वर्तुळात केके बद्दल बरेच काही ऐकले आहे."

राजेशने स्टेजकडे पहिले...
फ्लॅश लाईट्स मध्ये “आर. रत्नाकरचा” टकला चेहेरा चमकला आणि राजेशच्या डोक्यातपण लख्ख प्रकाश पडला...
त्याला आठवू लागले...
विनित आणि तो.
त्याच्या कथेची चोरी.
दिवाळी अंक कार्यालय.
रत्नाकर रोमदाडे नावाचा ऑफिस मधला माणूस.
त्या भाडेकरूने वर्णन केलेला तोच हा रत्नाकर.
उजव्या गालावर मोठा डाग.
सावळा, टाकला आणि लठ्ठ माणूस!!
आर. रत्नाकर.
हाच तो चोर.
याचेकडेच तर पोष्टाने पाठवली होती मी कथा.
हाच सामील असणार कथा चोरीमध्ये...
माझ्यासारख्या अशा कित्येकांच्या कथा याने चोरल्या असतील..

"मोहिनी, एक मिनिट जरा येतोच!", असे म्हणून ग्लास टेबलावर त्याच्या वायरलेस माईक जवळ ठेवत राजेश गर्दीतून स्टेजच्या जवळ जाऊ लागला.

"अरे, राजेश अचानक काय झाले?" असे मोहिनी म्हणाली पण ते ऐकायला राजेश तेथे नव्हता.

तोपर्यंत इकडे इतर काही पार्टीतले उत्साही पाहुणे काचेच्या रूम मधल्या डान्स फ्लोअरवर डीजेच्या तालावर नाचायला निघून गेले होते.

इकडे स्टेजवर पण म्युझिक सुरूच होते. राजेश स्टेजकडे गर्दीतून वाट काढत पोहोचणार तोपर्यंत रत्नाकरला कसला तरी फोन आला म्हणून तो स्टेजवरून उतरून बाजूच्या अंधाऱ्या टेरेसकडे फोनवर बोलायला जाऊ लागला. त्याचा पाठलाग करायचा म्हणून पुन्हा राजेश स्टेजकडून त्याच्या मागे जायला लागला.

टेरेस बरेच मोठे होते. पण सगळीकडे अंधार होता. रांगेने विविध रोपांच्या कुंड्या लावलेल्या होत्या. टेरेस वरून खाली खोलवर दिसणाऱ्या विविध वाहनांनी भरलेल्या रस्त्यांकडे बघत रत्नाकर केकेशी बोलत होता. राजेश गर्दीतून मार्ग काढत टेरेसकडे जात होता...

पण जातांना बॅकसाईडला एका खिडकीजवळ त्याला असे काही ऐकू आले की तो तिथेच थिजला. कुणीतरी फोनवर संशयास्पद रीत्या बोलत होते.

अंधारात तो माणूस राजेशला नीट ओळखू येत नव्हता पण डान्स फ्लोर रूममधून अधूनमधून येणाऱ्या फ्लॅशलाईट मुळे चेहरा दिसत होता पण त्या व्यक्तीचे राजेशकडे लक्ष नव्हते.

"कोण आहे हा? हो! करेक्ट! सूरज आहे हा! रागिणीचा बॉयफ्रेंड!"

सूरज बोलत होता: "अपनी दिल्ली की टीम का एक पंटर राहुल गुप्ता साला अपनी रागिणी का लव्हर निकला, साला ब्लॅकमेल कर रहा था उसे! चूप करा दिया उसे! अब बार बार फोन नही करेगा उसे! और सुधीर श्रीवास्तव को मैने ही कहां था रागिणी का सब सच टीव्ही पर बताने के लिये! जैसेही रागिणीने मुझे उसके अतीत के बारे में बताया जिसमे राहुल था तो मैने उसे तो चूप कर दिया, लेकीन मैने सुधीर की जबान खोल दी! दोस्त है वोह मेरा! उसे मैने टीव्ही प्रोग्राम बनाने को कहां! सिर्फ एक दिन के लिये! बाद में मेरे कहने पर वो टीव्हीपर रागिणी की माफी मांग लेगा! मग मी रागिणीला सांगणार की कोर्टाच्या कारवाईची धमकी दिल्याने आणि अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याच्या भीतीने सुधीरने माफी मागितली! आणि मी हे का केलं सांगू? रागिणीचा आत्मविश्वास कमी करायचाय मला आणि हळूहळू या इंडस्ट्रीपासून दूर न्यायचे आहे मला तिला! तिने नाही ऐकले तर माझेकडे उपाय आहेत! शेवटचा उपायही आहे! मीच तर सुभाष भटची ऑफर तिच्यापर्यंत पोहचू दिली नव्हती.. हा हा हा!"

सूरज बरेच काही बोलत होता. राजेशला हे ऐकून धक्का बसला. सुप्रियाकडून त्याने सोनी आणि रागिणीबद्दल ऐकलेले होते आणि या क्षेत्रातील पत्रकार म्हणून त्याला बऱ्याच कलाकारांबद्दल माहिती होती. हे सूरजचे ऐकलेले बोलणे रागिणीला जरूर सांगितले पाहिजे असे त्याला त्याचे मन सांगू लागले.

हे ऐकत असतांना राजेशला आठवले की आपण रत्नाकरचा पाठलाग करत होतो. त्याने टेरेसवर नजर फिरवली. तेथे रत्नाकर नव्हता. त्याने लिफ्टकडे पाहिले. रत्नाकर लिफ्टमध्ये बसून खाली जाण्याच्या तयारीत होता त्याचे मागे राजेश जाणार इतक्यात सुनंदाचा कॉल आला. कॉल नाही उचलला तर घरी गेल्यानंतर एका मोठ्या वादविवादाला सामोरे जाण्यापेक्षा तो उचललेला बरा असे म्हणून त्याने कॉल उचलला, तोपर्यंत रत्नाकर लिफ्टमध्ये शिरून खाली निघून गेला.

सुनंदा विचारत होती की तो घरी केव्हा येणार आणि त्याने सांगितले की पार्टी संपल्यावर! तिने तो येईपर्यंत ती जागीच रहाणार असे त्याला बजावले. सुनंदाशी बोलून झाल्यावर त्याने पहिले आता तेथे सूरजही नव्हता.

सूरजचे फोनवरचे बोलणे रागिणीला सांगितलेच पाहिजे! पण कशाला उगाच त्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचे? नाही राजेश! हा मामला काहीतरी वेगळा वाटतोय! मला रागिणीला सावध केले पाहिजे! माणुसकी म्हणून! एक पत्रकार म्हणून! सुप्रियाची ती एक रूम पार्टनर होती म्हणून!

हा फूड इंडस्ट्रीचा मालक मला काही बरोबर वाटत नाही! पण रत्नाकर सुद्धा निसटायला नको! मग त्याने मोहिनीला कॉल केला.

"अरे कुठे आहेस! इकडे ये! डान्स करुया!"

"मोहिनी ! ऐक! पटकन रागिणीला जाऊन भेट आणि तिला सांग की राजेशला तिला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. राजेशला भेटल्याशिवाय जाऊ नकोस असे सांग! प्लीज! का, कसे असे प्रश्न विचारू नकोस!"
"बरं बाबा! सांगते!"

दुसऱ्या एका लिफ्टने राजेश रत्नाकरच्या मागावर खाली गेला. तो इमारतीच्या बाहेर पडला तोपर्यंत रत्नाकर गाडीत बसून निघून गेला.

राजेश विचार करु लागला: "आता लगेच याचा पाठलाग करण्यात काही अर्थ नाही. त्याचा नंबर घेऊन त्याचा ठावठिकाणा मी नक्की शोधणार! रत्नाकर वर टेरेसवरच पकडला गेला असता तेथेच अंधारात त्याला मी चांगला चोप दिला असता आणि सगळं कबूल करवलं असतं त्याचेकडून पण सूरज ....? ओह नो! मला रागिणीला सावध केलेच पाहिजे."

तो लिफ्टने पुन्हा वर गेला तेव्हा बहुतेक सगळे लोक डान्स फ्लोरवर गेले होते. सूरज बराच वेळ पार्टीत नव्हता आणि रागिणी थोडी नर्व्हस होवून टेरेसवर बाहेर बघत उभी होती. मोहिनीने तिला राजेशचा निरोप दिला होता. राजेश लगेचच रागिणी जवळ आला आणि म्युझिकच्या आवाजात तिला मोठ्याने म्हणाला, "मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे."

प्रथम तिला आश्चर्य वाटले पण नंतर ती तयार झाली. ते दोघे टेरेस वर गेले. राजेशने वेळ न दवडता थोडक्यात तिला सूरजचे फोनवरील बोलणे सांगितले. ते बराच वेळ बोलत होते आणि ते इतर कुणाला ऐकू जाण्याची शक्यता तशी कमी होती कारण मोठ्याने म्युझिक सुरु होते आणि जवळपास जास्त कुणी नव्हते आणि जे लोक होते ते म्युझिकच्या तालावर नाचत होते.

शेवटी तो म्हणाला, "मला तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसून काहीही करायचे नाही पण मी जे ऐकले आहे ते तुला सांगणे मला आवश्यक वाटले."

असे म्हणून तो जायला निघाला. रागिणीने त्याला काही अडवले नाही.

आता तिच्या डोक्यात विचार चक्र सुरु झाली. अनेक दिवसापासून तिच्या मनात जे काही संशयास्पद विचार येत होते ते खरे ठरत होते. “डी. पी. सिंग” यांची सध्याची वागणूक कदाचित सूरजच्या दबावामुळे तर नाही ना? सुभाष भट यांनी अचानक सोनीला कसा काय ब्रेक दिला? राजेशला मी सांगितले त्यानंतरच राहुलचे कॉल अचानक बंद झाले? त्यानंतरच नेमके सुधीरने टीव्ही वर माझ्यावर प्रोग्राम केला? माझ्या आयुष्यात रोहन नंतर जोडीदाराचे सुख लिहिलेच नाही का? सूरजला आजकाल काय झाले आहे? माझे काही चुकले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू तिला सापडत होती. आता हे सगळे प्रश्न सूरजलाच विचारले पाहिजेत असे ठरवून ती सूरजला शोधायला गेली...

इकडे डान्स फ्लोअर वर डीजे वेगवेगळे आयटम साँग वाजवत होता आणि मोहिनी बेधुंद होऊन नाचत होती.

"आजा मेरे राजा, आजकी रात गुजार मेरी प्यासी बाहों में”

"देखके तेरा अंग अंग, चढ गया मेरे प्यार का रंग रंग"

"दिल मेरा दिल, चाहता है तो एक बस तुम्हे सुबह शाम "

राजेशने एकाकडून रत्नाकरचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि आणखी काही व्यक्तींना भेटून मोहिनीकडे गेला. तिने ड्रिंक्स जरा जास्तच घेतली होती आणि ती जोरात आणि जोशात नाचत होती. आपल्याला सहन होईल आणि आपण स्वतःला कंट्रोल करू शकू एवढेच पिले पाहिजे असा विचार मोहिनीकडे जाताना त्याच्या मनात आला. खरे तर तो तिला बाय करायला आला होता पण तिथे तो पोचेपर्यंत मोहिनी जवळपास शुद्ध हरपून बाजूला असलेल्या सोफ्यावर कलंडली.

ती आईवडिलांपासून वेगळी एका फ्लॅटमध्ये भाड्याने एकटी राहात होती. नुकताच तिचा ब्रेक अप झाला होता आणि त्यामुळे तिने अलीकडे जास्त प्यायला सुरुवात केली होती. या मोहिनीची कथा काही वेगळीच होती. तिला क्रिकेटचे वेड होते आणि ती ट्वेंटी ट्वेंटी आणि वन डे सामने नेहमी बघायला जायची. एका सामन्यादरम्यान संपत साधू या आयपीएल खेळाडूशी तिची ओळख झाली. मग काही सामन्यांदरम्यान एकमेकांना भेटणे सुरु झाले. पण तो खेळाडू कालांतराने काही आंतरराष्ट्रीय सामने खेळायला गेला. मोहिनी तेव्हा तेथे जाऊ शकली नाही. तेथून आल्यापासून संपत वेगळा वागत असल्याचा तिला दिसला. तो तिला टाळू लागला होता. काही दिवसांनी त्याने तिला एका मेसेजिंग एपवर आता “यापुढे मला भेटू नकोस” असे सांगितले. तिने नंतर त्याला भेटण्याचा आणि कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने रिप्लाय केला नाही. नेमके झाले काय, तिचे काही चुकले काय अशा प्रश्नांची उत्तरे तिला हवी होते पण ती उत्तरेपण तिला मिळाली नाहीत. जीवनातल्या पहिल्या प्रेमात फसवणूक आणि प्रेमभंग झाल्याने ती दुखावली गेली आणि अल्कोहोलच्या आहारी गेली.

नंतर राजेशमध्ये तिला एक चांगला मित्र सापडला. राजेशने तिला जीवनात अशा प्रसंगातून पुढे कसे जायचे याबद्दल तिचा चांगलाच ब्रेनवॉश केला.

सिनेक्षेत्रात केवळ शारीरिक पातळीवर असणाऱ्या आणि नंतर दोनेक वर्षांनी दुसरा पार्टनर शोधायचा, एकमेकांत मानसिकरीत्या अडकायचे नाही अशा प्रकारच्या मानसिकतेच्या काही फ्रेंडशिपच्या जमान्यात राजेश आणि मोहिनी हे मित्र मैत्रीण होते. त्यांची मैत्री शारीरिक पातळीवरची नसून प्लॅटोनिक रिलेशनशिप होती. पण त्यांचे वागणे एकमेकांशी इतके मोकळे होते की आपण मित्र आहोत पण स्त्री-पुरुष आहोत याचा त्या दोघांना विसर पडायचा आणि मग त्या दोघांबद्दल अनेकांच्या मनात संशय निर्माण व्हायचा.

मोहिनीने अनेकदा पर्सनल आयुष्यात राजेशचा सल्ला घेतला होता. तो तिला उपयोगी पडला होता. आता सुद्धा अशा नशाधुंद अवस्थेत राजेशशिवाय दुसरा पर्यात होता का तिला?

"राजेश मला सोडतोस का रे घरी? माझी गाडी उद्या माझ्या ड्रायव्हरला घेऊन यायला सांगेन मी!" ती बरळत होती. बारा वाजले होते. मोहिनीची विनंती अमान्य करून चालणार नव्हते. ती त्याची चांगली मैत्रीण होती. समोर काचेतून त्याला दिसले की रागिणी आणि सूरज एकमेकांशी तावातावाने काहीतरी बोलत होते.

रागिणीला सूरजचे फोनवरचे बोलणे सांगितले ते मी चूक तर केले नाही ना?

नाही राजेश! तू नेमका त्या फोनच्या वेळी तिथे उपस्थित होतास हा निव्वळ योगायोग समजावा का? मला जे योग्य वाटले ते मी केले. पार्टी संपली होती. बारा वाजून गेले होते. सगळेजण आता हळूहळू परत जायला निघाले होते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet