वलय (कादंबरी) - प्रकरण २४ ते २८

प्रकरण 24

राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही.

राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले.

मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले. सुरुवातीला ती थोडी डिप्रेस झाली होती पण लवकर सावरली. तिने प्रॅक्टिकली विचार केला आणि सर्वप्रथम "चार थापडा सासूच्या" ही निरर्थक सिरीयल सोडायचे ठरवले. कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केल्याचे पैसेही तिने प्रोड्युसरला ऑनलाईन देऊन टाकले. तसेच स्वतःच्या लग्नासाठी तिने आईवडीलांकडे तयारी दर्शवली. आईवडील तिच्याकरता सुयोग्य वर शोधण्यात मग्न झाले.

सिरीयल्समध्ये येण्याआधी तिने नाटकात काम केले होतेच. म्हणून थोड्या प्रयत्नांनंतर काही दिवसांनी तिला एका नाटकात काम मिळाले.

“कुमारगंधर्व” मध्ये त्याचे 10 यशस्वी आणि 7 हाऊसफुल प्रयोग झाले. त्या नाटकाचे नांव- "चाफेकळी खुलली". दरम्यान कलेची आवड जपणारा आणि अत्यंत रसिक असलेला सुबोध केतगांवकर इटलीहून सुट्टी घेऊन भारतात आलेला होता. त्या नाटकाच्या 20 व्या प्रयोगाला तो आणि त्याची आई आले होते. तो तिचे काम बघून प्रभावित झाला. नाटक चालू असतांना सुबोध आणि त्याची आई पहिल्या रांगेत बसले होते. लव्ह ऍट फर्स्ट साईट जे काय म्हणतात ते त्या दोघांत नाटक चालू असतांनाच घडले. नाटकातील तिच्या प्रत्येक संवादाला आणि लाजवाब अभिनयाला सुबोधची मिळणारी दाद तिला आवडली. लवकरच त्याने तिचा पत्ता शोधून घरी येऊन तिला प्रपोज केले. तिलाही तो आवडला कारण तिच्या मनातही तो होताच. मग सोबत फिरणे झाले. दोघांच्या घरच्यांना ते मान्य झाले. मग राजेशला ती हळूहळू विसरली.

फ्रेंडबुकवर राजेश तिच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये होताच पण तिने सिरीयल सोडल्यानंतर कटाक्षाने कोणतेच स्टेट्स अपडेट टाकले नव्हते. इतकेच नाही तर सुबोधने सुद्धा त्याचे स्टेट्स अपडेट केले नव्हते. लग्नानंतर इटलीला पोहोचल्यानंतरच सिंगल स्टेटस बदलून मॅरिड करायचे असे त्यांनी ठरवले होते. तिने सुबोधला राजेशबद्दल कोणताही आडपडदा न ठेवता सगळे सांगितले होते. त्यांचे लग्न पुण्यातच झाले पण तिने अभिनय क्षेत्रातील काही मोजके सहकारी आणि मोजके मित्र आणि नातेवाईक यांनाच बोलावले होते. सुबोधने तिला ऍक्टिंगचे करियर करायला मोकळीक दिली होती. त्यासाठी ती अधूनमधून भारतात येऊ शकणार होती. वडील आणि नवरा दोघेही तिला करियरसाठी मोकळीक देणारे मिळाले याहून आणखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? यावर आणखी चांगली गोष्ट म्हणजे इटली मधल्या काही टीव्ही स्टार्सशी सुबोधची त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याद्वारे ओळख झाली होती आणि त्याने सुप्रियला त्यांचेशी ओळख करून घ्यायचे कबुलही केले होते. त्या ऍक्टर 'फ्रांको बोनुकी' ला प्रत्यक्षात भेटण्याची उत्सुकताही तिला होती. मुंबईत असतांना ती 'केपीएक्स' चॅनेल वरची 'प्राईम प्रॉस्पेक्ट' ही इंग्रजी सिरीयल नेहेमी बघायची.

नंतर तिचा व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली. दरम्यान ती हळूहळू इटालियन भाषा शिकली. त्यासाठी तिने पुण्यात "जोशींकडे झटपट परदेशी भाषा शिका!" अशी जाहिरात असलेला इटालियन भाषेचा कोर्स केला तसेच ऑनलाइन वेबसाईट्सची आणि विविध मोबाईल अप्लिकेशनची मदत घेतली. राजेश सोबत ब्रेकप झाला हे एका अर्थाने बरे झाले असे तिला वाटले.

कदाचित जे राजेश म्हणाला होता तेच बरोबर होते की: “हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत.”

सुप्रिया फक्तच करियरिस्ट नव्हती तर तिला वर्क लाईफ बॅलन्स हवा होता. एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा बळी द्यायची तिची इच्छा नव्हती. म्हणून लग्न वगैरे सारख्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी वेळेवरच व्हायला हव्या असे तिला वाटे.

बेडवर विचारांत असतांनाच तिला अचानक आठवले:

फ्रेंडबुक? येस! आज फ्रेंडबुकचा फडशाच पडते मी!

असा विचार करून ती बेडवरून उठली आणि मोबाईल जवळ घेऊन बेडवर मोठ्या मऊ उशीला टेकून बसली. बघूया काय काय अपडेट्स आलेत? 1250 नवीन नोटिफिकेशन्स आलेले होते! ओह गॉड! किती दिवस झाले चेक केले नाही!

तिचे आणखी एक फेसबुक पेज सुद्धा होते तेही ती स्वतः मॅनेज करत असे आणि एक होते स्वतःचे फ्रेंडबुक अकाउंट! फ्रेंडबुकवर कुठेच तिने स्वतःचा मोबाईल नंबर कधीच दिला नव्हता. भारत सोडतांना तिने जुना नंबर कायमचा बंद केला आणि भारतात एक नवीन पोस्टपेड नंबर घेतला होता. तो आणि इटलीत आणखी एक नंबर ती घेणार होती. तिने तिचे स्टेटस अपडेट केले- “मॅरीड टू सुबोध केतगांवकर!”

त्याबरोबरच तिने फेसबुक वरचे आपले नांव बदलले- प्रिया केतगांवकर. सुबोधनेही नुकताच ऑफिसमधून त्याचे स्टेट्स बदलले. तेव्हा मेसेंजरवर राजेशसुद्धा तिला ऑनलाइन दिसला. त्याचे प्रोफाइल तीने चेक केले तेव्हा तिला दिसले की त्याने सुद्धा एका तासांपूर्वीच त्याचे स्टेटस "मॅरीड टू सुनंदा!" असे केले होते. काय योगायोग असतो एकेक! तिला आश्चर्य वाटले. आणि ही जी कोण सुनंदा आहे ती मात्र फ्रेंडबुकवर नव्हती.

तिचे स्वतःचे नवे स्टेटस बघून राजेशला काय वाटेल असा विचार तिच्या मनाला शिवून गेला आणि राजेशकडून कधी सुनंदाबद्दल काहीच ऐकले नव्हते. आणि मुळात माझ्यासोबतच काय पण राजेश लग्नालाच तयार नव्हता मग त्याने अचानक घाईत लग्न का केले असावे? असे विचार तिच्या मनात येऊ लागले. एनिवे तुला काय करायचे ते जाणून घेऊन, सुप्रिया! ऑनलाइन असल्याने कदाचित राजेश तिच्याशी चॅट सुरु करू शकतो असे वाटून ते टाळण्यासाठी तिने इंटरनेट बंद केले आणि बेडवर आडवी झाली. राजेश सोबतचे अनेक प्रसंग तिला आठवायला लागले पण तिने ते विचार झटकन बाजूला सारले.

सुप्रियाचा इटली देशातला पहिला आठवडा नव्या शहराची ओळख करून घेण्यात गेला. सुबोधने घरातल्या टीव्हीवर लोकल इटालियन चॅनेल्स सोबतच इंडियन आणि इंटरनॅशनल चॅनेल्सचे पॅक (कार्ड) सुद्धा घेतले होते. ते महाग होते पण त्याच्या रसिक वृत्ती साठी आणि सुप्रियाच्या एकूणच पुढच्या संभाव्य करियरसाठी ते आवश्यक होते. त्यायले भारतीय कार्यक्रम सिलेक्टेड होते आणि त्याच्या वेळा या भारतात ते कार्यक्रम टेलिकास्ट होण्याच्या वेळांपेक्षा वेगळ्या होत्या. सुबोधकडे घरी ब्रॉडबँड वायफाय आणि एक लॅपटॉप होता, लँडलाईन फोन होता. सुप्रियाचा स्वतःचाही लॅपटॉप तिने सोबत आणलेला होता आणि सुबोधचा ऑफिसचा लॅपटॉप वेगळा होता.

एके दिवशी सुप्रियाने चॅनेल बदलता बदलता “चार थापडा सासूच्या” सिरीयल मधली बदललेली सून पाहिली. वैशाली विचारे. तिने सुप्रिया करत असलेला रोल चांगलाच निभाऊन नेला होता. एकूण काय, तर सुप्रिया गेल्याने सिरीयल थाबली नव्हती किंवा सिरीयलचे नुकसान झाले नव्हते हे महत्वाचे!

प्रकरण 25

गॉथिक शैलीने बांधलेल्या एका भव्य बिल्डिंगमध्ये एक गौरवर्णीय उंचापुरा माणूस शिरतो. त्याच्या हातात बंदूक असते. भव्य दरवाज्यातून आत येताच आधी उजवीकडे आणि मग डावीकडे बघून तो बंदूक समोर धरतो. कुणी दबा धरून बसलेलं असेल तर त्याला हालचाल आणि हल्ला करायला मिळू नये म्हणून तो सावधगिरीने पावले उचलतो. त्याची नजर वर जाते. वर एक भव्य काचेचे झुंबर असते.

वरच्या बाजूला रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनलेला वाटावा असा भव्य गोल घुमट असतो. तो माणूस पुढे जात राहतो. दोन्ही हात नाकासमोर ताणून त्याने बंदूक धरलेली असते. पुढे गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत असे वाटणारे बांधकाम असते. त्या बाजूला काचेच्या रंगीत तुकड्यांतून मस्त सूर्यप्रकाश आत येत असतो. बहुतेक जे तो शोधत होता ते न सापडल्यामुळे त्या माणसाची निराशा झाली असावी.

....तो बंदूक खाली करतो आणि उलट्या दिशेने चालू लागतो. तो माणूस पाठमोरा वळताच, त्याच्या मागच्या त्या रंगीत काचेच्या खिडक्या ताडताड फुटतात आणि त्यातून लोखंडी दांडा हातात घेतलेला आणि स्टेनगन हातात घेतलेला असे दोन माणसं उड्या मारून खाली पडतात. खाली पडल्यावर ते दोघे उठतात आणि त्या आवाजामुळे तो बंदुकवाला माणूस सावध होऊन पुन्हा मागे वळतो. पण तो माणूस सावरायच्या आत लोखंडी दांड्यावाला त्याच्या हातावर दणका मारून त्याची बंदूक खाली पाडतो.

ती बंदूक खाली उचलण्याचे नाटक करत तो माणूस खाली वाकतो आणि वायूवेगाने मागच्या बाजूला पाय फिरवून स्टेनगन वाल्याला आणि लोखंडी दांड्यावल्या माणसाला एकाच वेळेस खाली पाडतो. स्टेनगन आणि दांडा दूर जाऊन पडतात.

आता तिघेही शस्त्र विहीन असतात. तिघेही धडाधड एकमेकांना भिडतात. हातापायांचे वार आणि थापडा एकमेकांना बसू लागतात. त्याचा चटाचट आवाज येऊ लागतो... बराच वेळ तिघांमध्ये धुमश्चक्री चालते. तो एकटा दोघांना भारी पडतो...

तीन बाजुंनी तीन हलते कॅमेरे आणि एक समोरून स्थिर कॅमेरा (सगळे कॅमेरे एका बाजूच्या अर्धगोलात) असे चार कॅमेरे हा प्रसंग टिपत होते कारण हा चित्रपट थ्रीडी असणार होता. तो एक इटालियन चित्रपट होता. दूरवरच्या बाकड्यांवर काही मोजके लोक ही शुटिंग श्वास रोखून बघत होते. त्यात सुप्रिया, सुबोध आणि त्याचा ऑफीसातला कलीग "व्हीटोरिओ अंतीनिओ" हे सुद्धा होते. तो बंदुकवाला माणूस म्हणजेच ‘फ्रांको बोनुकी’ होता. टीव्ही सिरीजनंतर त्याचा हा पहिला इटालियन चित्रपट होता. सुप्रियाचे फ्रांकोला याची डोळा बघण्याचे स्वप्न पूर्ण होत होते. ही सगळी शुटिंग इटलीच्या रोम शहरातील "सिनेसीत्ता" (इंग्रजीत - सिनेमा सिटी) या भव्य फिल्म स्टुडिओमध्ये होत होती. इटलीत येऊन आता दोघांना दोन महिने झाले होते. एका विकेंडला दोघे रोम शहर बघायला आलेले होते. प्रथम त्यांनी फिल्म स्टुडिओ बघितला. व्हीटोरिओच्या ओळखीने त्यांना ही शूटिंग बघायला मिळत होती.

‘फ्रांको बोनुकी’ इतका मोठा ऍक्शन शॉट देत असतांना सुद्धा त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. इतक्या शारीरिक कसरतीच्या सिन मध्ये सुद्धा त्याच्या मनात आठवणींचा कल्लोळ सुरु होता.

"एंजेलिना करोल"- त्याची गर्लफ्रेंड, जिच्यासोबत तो गेली चार वर्षे लिव्ह इन मध्ये राहात होता ती मागील सहा महिन्यांपासून बदलली होती. फ्रांकोला तिने एकसारखे बोलून बोलून डिवचायला सुरुवात केली होती. त्याची सुरुवात एका छोट्याशा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली होती. पण त्यातून राईचा पर्वत झाला होता आणि तो पर्वत दिवसेंदिवस मोठा मोठा होत चालला होता. आता गेल्या काही दिवसातला तो प्रसंग त्याला आठवला -

एंजेलिना त्याला इटालियन भाषेत खूपच टाकून बोलली होती -
"आंद्रे अल इन्फर्नो कोन ला तूआ रगझ्झा!'
म्हणजे -
"म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंड सोबत तू मसणात जा!"
त्याला बोलायचा चान्स न देताच तिने त्याला शिवीगाळ केली होती.

तिचा गैरसमज झाला होता. ती ज्या गर्लफ्रेंडबद्दल बोलली होती ती फ्रांकोची गर्लफ्रेंड नव्हती. त्याने लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण...ती ऐकत नव्हती.

तिला खरंच एक मुस्काटात द्यावे असे त्यावेळेस त्याला वाटले होते पण ती धाडकन त्याच्या तोंडावर दरवाजा आपटून त्या दिवशी बाहेर निघून गेली होती..

..फ्रांकोने अगदी जोर लावून समोरच्या माणसाच्या मुस्काटात दिली. एवढ्या जोरात की तो मार खाणारा समोरचा स्टंटमॅन अनपेक्षितपणे फ्रांकोकडे बघत राहिला आणि हेलपाटे खाऊन बराच दूर जाऊन पडला. पण कॅमेरामनच्या ते लक्षात आले नाही. तो शॉट जरुरीपेक्षा खूप जास्त रियल शूट झाला. पण फ्रांकोच्या लक्षात आल्यावर त्याने डायरेक्टरला खूण करून शूटिंग मधेच थांबवण्याची विनंती केली. त्या स्टंटमॅनला मदतीचा हात देऊन त्याने उठवले आणि सॉरी चुकून झाले म्हणून त्याची माफी मागितली. त्या दिवशीचा हा शेवटचा सिन असल्याने थोडे थांबून उरलेला सिन पुन्हा शूट करायचे ठरवले गेले. खरचटलेले आणि फाटलेले कपडे बदलले गेले.

व्हीटोरिओ, सुबोध आणि सुप्रिया हे तिघे फ्रांकोची फ्री होण्याची वाट बघू लागले. फ्रांको आणि बघ्यांमध्ये केव्हापासून बसून असलेली त्या चित्रपटाची हिरोईन "मार्सेला रमानो" हे दोघेजण आणि डायरेक्टर असे तिघेजण पिझ्झा खायला बसले. सोबत डाएट कोक होता.

व्हीटोरिओ वाट बघू लागला की फ्रांकोचे त्याच्याकडे दुरून का होईना थोडे लक्ष गेले तर बरे होईल. पिझ्झा खाऊन झाल्यावर थोडा आराम करण्यासाठी म्हणून बाजूच्या रूममध्ये जाण्यासाठी फ्रांको वळला तर त्याला नजरेच्या कोपऱ्यातून व्हीटोरिओ दिसला आणि त्याला हायसे वाटले. त्याच्या मनाला त्रास देणारा इश्यू विसरून अचानक त्याचे मन थोडे त्यातून बाहेर आले. फ्रांको स्वतःहून त्यांचेकडे चालत गेला तसे सुबोध आणि सुप्रिया नर्व्हस झाले आणि थोडे अलर्ट झाले.

सेटवरील इतर सर्वजण आपापल्या इतर कामांत गढून गेली. दरम्यान व्हीटोरिओने दोघांची ओळख फ्रांकोशी करून दिली. सुबोध कलाप्रेमी आणि सुप्रिया एक ऍक्टर आहे, दोन्ही भारतातून आलेत वगैरे थोडक्यात कल्पना दिली. व्हीटोरिओ आणि फ्रांको अनेक वर्षांपासूनन एकमेकांना ओळखत होते. अगदी थोड्या वेळाच्या त्या भेटीत सुप्रिया फ्रांकोला त्याचा अभिनय तिला आवडत असल्याचे सांगायला विसरली नाही. विशेष म्हणजे फ्रांको नावाप्रमाणे अगदी फ्रॅंक वाटला तिला! मनमोकळा! चित्रपट विषयावर त्यांनी थोड्या गप्पा केल्या. एक सेल्फी सुद्धा त्यांनी काढली. सुबोध सुप्रिया दोघेही खुश होते.

फ्रांको पुन्हा शूटिंगला निघून घेल्यावर व्हीटोरिओने सुद्धा त्या दोघांचा निरोप घेतला. दोघांनी अर्धे "सिनेसीत्ता" बघितले. नंतर पुन्हा वेळ मिळेल तसे ते पुन्हा येथे येणार होतेच. नाहीतरी सुबोध सुप्रिया सारख्या सिने रसिकांसाठी "सिनेसीत्ता" हे ठिकाण फक्त एकदा भेट देऊन एका दमात बघून मोकळे होण्यासारखे नव्हतेच!

एकंदरीत त्यांची त्या दिवशीची रोम ट्रिप स्मरणीय ठरली.

प्रकरण 26

राजेश, सुप्रिया, सोनी आणि रागिणी यांचे जीवन वेगवेगळी वळणे घेत होती. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित! सोनी आणि रागिणीचे मॅडम अकॅडमी मधील रीतसर शिक्षण आता पूर्ण झाले होते. सुप्रियाचे सुद्धा आधीच ते झाले होते. त्यांना रीतसर सर्टिफिकेटस मिळाले होते. तसेच त्यांनी होस्टेल सोडले. सोनी मालाडला भाड्याने रूम घेऊन राहू लागली होती. जवळच्याच एका भागात तिची एक दूरची एक विधवा स्त्री-नातेवाईक रहात होती. तसा त्यांचा जास्त घरोबा नव्हता पण ती एकदा तिच्याकडे जाऊन आली. तसेच गावाकडे आईला सोनी पैसे नियमित पाठवत असे.

आता एलेना आणि नताशा तिघींच्या पूर्वीच्या हॉस्टेल रूम मध्ये राहत होत्या. एलेना कॅनडाहून तर नताशा श्रीलंकेहून बॉलिवूड मध्ये नशीब कमवायला आलेल्या होत्या. त्या दोघींनी सुद्धा मॅडम अकॅडमी जॉईन केलेली होती. त्या दोघींसोबत तिसरी पार्टनर त्यांना जॉईन झाली, तिचे नाव - मिष्टी मेहरान!

ती मॅडम अकॅडमी मध्ये नवोदित स्टुडंट्सना शॉर्ट फिल्म्स आणि ऍड फिल्म्स बनवण्याची कला शिकवायची! आणि अर्थातच मिष्टी हे नांव आता मॅडम अकॅडेमीतच नाही तर शॉर्ट फिल्म्स क्षेत्रातही खूप प्रसिद्ध होत होते. मिष्टीने फारच कमी वयात हे यश मिळवले होते.

दरम्यान राजेशने त्याच्या स्पेशल टीममधील अनेक जणांना मिष्टीच्या शॉर्ट फिल्म्समध्ये काम मिळवून दिले आणि त्या कलाकारांचा अभिनय अनेकांकडून वाखाणला गेला, कौतुक झाले. तसेच मसालेदार कथालेखन करायची इच्छा असलेल्या काही जणांना राजेशने तो लिहीत असलेल्या स्क्रिप्टससाठी त्याचा सहायक म्हणून घेतले होते आणि ते लोक त्या बदल्यात राजेश म्हणेल त्या चित्रपटाबद्दल “अपप्रचार” करायला एका पायावर तयार होते. विशेषकरून “के. के. सुमन” शी संबंधित चित्रपट!

दरम्यान समीरण देवधरने राजेशची विनंती मान्य केली होती आणि मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बनवण्याची कल्पना त्याला पसंत पडली होती. चित्रपट निर्मिती लवकरच सुरु होणार होती.

दरम्यान रागिणी आणि सूरजने लग्न करायचा विचार लांबणीवर टाकला. लिव्ह इन मध्ये ते खुश होते. सूरजच्या परदेश वाऱ्या (विशेषतः ब्राझील देशातल्या) वाढू लागल्या आणि त्याचे वडील डी. पी. सिंग यांच्यासोबत रागिणी करत असलेल्या हॉरर सिरियल्स सुपरहिट होत होत होत्या. सुभाष भटने रागिणीला त्यांच्या आगामी हॉरर चित्रपटात घेण्याबद्दल डी. पी. सिंग यांना एकांतात विचारले होते कारण रागिणीला मुंबईत कुणी नातेवाईक नाहीत हे सिंग यांनी भट यांना सांगितले होते तसेच सूरज आणि रागिणी लिव्ह इन मध्ये राहातात ही त्यांना कल्पना होती. मग सिंग यांना विचारणेच योग्य आहे असे भटना वाटले. विचार करून सांगतो असे म्हणून त्यांनी भटकडे वेळ मागितला पण रागिणीजवळ त्याबद्दल बोलण्याऐवजी त्यांना ते सूरजला आधी सांगणे योग्य वाटले.

सूरजला सांगितल्यानंतर आश्चर्य असे की त्याने परवानगी तर दिलीच नाही उलट तो म्हणाला की आता आपण रागिणीला हळूहळू मनोरंजन क्षेत्रापासून दूर करायला हवे. तिने हाउस वाईफ म्हणून राहावे किंवा सूरजच्या फूड कंपनीत त्याला काहीतरी मदत करावी अशी त्याची इच्छा दिसली. म्हणून नाईलाजाने सिंग यांनी रागिणीला भटच्या प्रपोजलबद्दल डायरेक्ट सांगणे टाळले. सूरजने त्यांना आश्वासन दिले की तो रागिणीशी याबद्दल बोलेल त्यामुळे सिंग निर्धास्त झाले आणि दोघांच्या मध्ये न पडण्याचे त्यांनी ठरवले.

पण सूरजने रागिणीला त्याबद्दल सांगितलेच नाही. दरम्यान रागिणीला राहुलच्या फोनवरच्या धमक्या पुन्हा सुरू झाल्या. पैसे संपेपर्यंत तो चूप बसायचा मग परत कॉल करायचा. ती त्याला पैसे पुरवत होती. आता सूरजला याबद्दल सांगण्यावाचून पर्याय नव्हता!!!

प्रकरण 27

मग तिने एके दिवशी सूरजला तिचा रोहनसोबतचा संबंध सांगितला, मग रोहनच्या ऍक्सिडेंटबद्दल सांगितले. सूरज शांतपणे ऐकून घेत होता.

रागिणी पुढे म्हणाली, "रोहनच्या मृत्यूनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि राहुलच्या नादी लागले. अर्थात त्यांचेशी माझे शारीरिक संबंध नव्हते आणि तसे ते रोहनसोबतही नव्हते. राहुल आधीपासून माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता आणि मी त्याला नाकारले होते पण रोहनच्या मृत्यूनंतर तो थोडा सुखावला आणि मी आता त्याला हो म्हणेन अशी एक आशा त्याच्या मनात तयार झाली. मी राहुलला भेटायला लागले हे माझ्या घरी माहिती नव्हते. राहुलने मला मानसिक आधार देण्याचे नाटक करून मला हळूहळू सिगारेट, दारूची सवय लावली. मग एकदा मला माझ्या नकळत एका सिगारेट मध्ये ड्रग्ज भरून दिले!"

ड्रग्जचे नाव काढताच सूरजच्या चेहेऱ्यावर एक प्रकारची वेगळीच चिंतायुक्त अस्वस्थता पसरली. ती लपवून तो म्हणाला, "ओह नो रागिणी! खूपच वाईट झालं! आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवून का ठेवलंस? माझ्यावर विश्वास नव्हता का?"

रागिणी म्हणाली, "तसे नाही रे सूरज! मला भीती होती की मी तुला गमावून बसेल! एकदा रोहनला गमावले होते आणि तुला गमवायचे नव्हते!"

सूरज म्हणाला, "आय कॅन अंडरस्टॅन्ड रागिणी, माय लव्ह! एनिवे मग पुढे काय झालं ते सांग ना?"

रागिणी: "मी ड्रग्जच्या नशेत असतांना राहुलने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण मी अगदी वेळेवर शुद्धीवर येऊन तेथून कसेतरी पळाले. घरी काही कळू दिले नाही. राहुलला सांगून टाकले की आपल्यात जे झाले ते झाले पण आता यापुढे मला भेटू नकोस आणि आता मी लग्न करणार आहे. मग मी घरच्यांना लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. आणि मग माझ्या त्या नवऱ्याबद्दल मी तुला सांगितले आहेच. घरच्यांनी माझे लग्न एक बिझिनेस डील मिळावी म्हणून लावून दिले होते. म्हणजे ते एक डील होतं. दोन बिझिनेसमॅन फॅमिली मधले डील! नवरा मारकुटा निघाला. सॅडिस्ट निघाला!! छोट्या कारणांवरून मारायचा! रात्री सेक्स करतांना मला बांधून ठेवायचा! त्याने मला ऍक्टिंगमध्ये करियर करायची बंदी घातली होती. मग मी एके दिवशी बेमालूमपणे घरून पळून आले मुंबईत! दिल्लीतील एका मैत्रिणीच्या मदतीने!"

"ओह गॉड! मग पुढे?"

"घरच्यांनी मला सांगून टाकले की आता आपला संबंध संपला. मग नंतर राहुलला कसे माहित पडले ते माहित नाही पण माझ्या सिरियल्स पाहून त्याला कळले असावे की मी मुंबईत आहे आणि त्याने कुठूनतरी माझा फोन नंबर मिळवला असावा आणि आता मला तो ब्लॅक मेल करतोय की तो माझ्या नवऱ्याला माझा ठावठिकाणा सांगणार! मला भीती वाटतेय! माझा नवरा खूप खुनशी आहे. तो त्याचे गुंड पाठवेल! घटस्फोटाचा किंवा फसवणुकीचा दावा करून पैसे उकळेल किंवा माझ्यावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करेल! मला आता पुन्हा दिल्लीला परत जायचे नाही. प्लिज! हेल्प मी! माझे घरचेही माझ्या नवऱ्याला साथ देतील, वेळ पडली तर!" असे म्हणून ती रडायला लागली.

"हे बघ रागिणी! मला तू हे सगळं सांगितलंस ते बरं केलंस! मी ब्राझीलहून तीन दिवसांत परत येईन...आणि हे बघ, रडू नकोस!", असं म्हणून तो विचारात गढला.

मनावरचा भार हलका होऊन सूरजने तिला समजून घेतल्याबद्दल रागिणीला हायसे वाटले.

बराच वेळ विचार करून सूरज पुढे म्हणाला, "तू असं कर! तू मला राहुलची काही माहिती, फोटो दाखव! मी ब्राझीलहून परत आल्यावर फोन करून त्याला मुंबईला भेटायला बोलाव! आपण काहीतरी आमिष दाखवू त्याला! तू त्याला भेटायला एकटी जा आणि मी लपून तुझ्या मागे असेनच! मग बघूया काय करायचे! डोन्ट वरी!"

मग तिने त्याला तिच्या मोबाईलवरचा राहुलचा फोटो दाखवला. फोटो बघताच त्याच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता पसरली. तीला दिसू न देता त्याने तो स्वतःच्या मोबाईल मध्ये सेंड केला!

मग ब्राझीलला निघतांना तो तिला म्हणाला, "संशय येऊ नये म्हणून तू त्याला तो मागेल तेवढे पैसे पाठव. तोपर्यंत मी येतोच! आणि हो! त्याला माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस! नाहीतर तो सावध होईल!"
सूरजला घेऊन विमान हवेतून ब्राझीलकडे निघून गेले. दोन कामवाल्या बाई गेल्यानंतर ती फ्लॅटमध्ये एकटीच होती. आता ती वाट बघत होती सूरज परत येण्याची! काल राहुलचा फोन आला होता आणि त्याने आज संध्याकाळच्या आत 50000 रुपये मागितले होते ते तिने त्याच्या अकाउंटवर पाठवले. आतापूरता प्रॉब्लेम मिटला. सूरज आल्यावर आता पुढचे काय ते ठरवायचे होते.

मुंबईला पळून आल्यानंतरच्या घटना तिला आठवू लागल्या:

मुंबईला बोरिवलीला तिची दिल्लीतली एक मैत्रीण राहात होती. ती एकटीच होती. गौरी सहानी. तिच्या रूमवर सहा महिने रागिणी राहिली कारण नंतर गौरीला कॅनडात कायमचा जॉब मिळाला. म्हणजे तिला आता फक्त सहा महिने होते!

मग रागिणीने तात्पुरता सेल्स वूमन म्हणून जॉब पकडला आणि तिच्या मैत्रिणीने गौरीने काही पैशांची मदत केली. मग जमतील तसे अनेक पार्ट टाइम जॉब पकडून तिने मॅडम अकॅडमी जॉईन केली. तेथे सुप्रिया, सोनीशी ओळख आणि मैत्री झाली. परत टाइम जॉब सुरूच होता. टीव्ही किंवा सिनेमा कुठेतरी छोटासा का होईना रोल मिळणे अत्यावश्यक झाले होते अशातच मॅडम अकॅडमित डी. पी. सिंग यांचे सिरीयलसाठी ऑडिशन झाले. त्यात रागिणीची निवड झाली आणि अशा प्रकारे तिची करियरची सुरुवात झाली. मग गौरीची पैशांची परतफेड करतेवेळी गौरीने ते पैसे नाकारले आणि कॅनडाला जातांना फक्त ती एवढीच म्हणाली, "तुझी करियरची लाईन लागली ना! मग बास! पैसे मला परत नकोत. फक्त माझी आठवण ठेव म्हणजे झाले!"

प्रकरण 28

दरम्यान सोनी बनकरचा लव्हर साकेत न सांगता तिला सोडून निघून गेला. नेमका कुठे गेला त्याचा थांगपत्ता सोनीला लागलाच नाही. मग सोनीने स्वतःला बेबक्यू (BEBQ) च्या शुटिंगमध्ये व्यस्त ठेवलं. काही भागाचं शुटिंग झालं होतं आणि काही भागाचं बाकी होतं. पण प्रोग्रॅम टेलिकास्ट व्हायला सुरु झाला होता. सुभाष भट बारकाईने BEBQ शो वेळ मिळेल तेव्हा बघत होता कारण त्याला त्याच्या हॉरर चित्रपटासाठी नवीन चेहरा हवा होता आणि अशा रियालिटी शोजमध्ये नवे चेहेरे आणि नवनवीन टॅलेंट चिक्कार मिळतात हे तो जाणून होता. त्यातल्या त्यात त्या कार्यक्रमातली सोनी बनकर त्याचे जास्ती लक्ष वेधून घेत होती. सिंग यांचेकडून रागिणीसाठी नकार आल्याने सुभाष भटला दुसरे कुणीतरी शोधणे भाग होतेच. एकदा का हा शो संपला की सोनीला विचारून बघावे असा विचार त्याच्या मनात आला.

एका प्रायव्हेट रिसॉर्टवर दहा जणांना बोलावून त्या रियालिटी शोची शुटिंग सुरु झालेली होती. त्यात पन्नास टक्के काय करायचे ते आधीच स्क्रिप्ट लिहून ठरवलेले होते तर पन्नास टक्के आपल्या मनाने वागण्याची परवानगी होती. मात्र प्रेक्षकांना सांगण्यात आले होते की हा जगातील पहिलाच असा शो आहे की ज्यात सगळे कलाकार किंवा भाग घेणारे पार्टीसिपॅन्ट संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे जगणार आणि खेळ खेळणार! म्हणजे काहीही प्लान केलेले नाही!

चोवीस तासांपैकी जवळजवळ अठरा तास सतत कॅमेरे त्यांच्या मागे राहणार होते. काही हलते कॅमेरे काही स्थिर तर काही गुप्त ठिकाणी लपवलेले कॅमेरे असणार होते. मोबाईल आणि इतर उपकरणे सगळ्यांजवळून काढून घेण्यात आली आणि फक्त एक लँडलाईन फोन गरजेपुरता वापरता येणार होता.

रिसॉर्टवर दिवसभर कंटेस्टन्ट मनाप्रमाणे इकडे तिकडे फिरू शकत होते. दरम्यान त्यांना विविध ठिकाणी लपलेले चिठ्ठ्यांच्या स्वरूपातील दुवे (क्लू) शोधायचे होते. त्या क्लू मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे वागायचे होते. तसेच काही क्लू मध्ये खेळाडूला कठीण टास्क देऊन ते न जमल्यास त्याला बाद करण्यात येत होते. सगळ्यांना शेवटी कोणती वस्तू शोधायची आहे हे सुद्धा माहिती नव्हते. गेमच्या शेवटच्या लेव्हलला पोहोचेपर्यंत ते माहित असणार नव्हते. मग शोध संपल्यावर ज्यानेही ते शोधले तो पहिला येणार! आणि गेमच्या नियमानुसार शेवटी जे तीन जण टिकले त्यापैकी ज्या दोघांना शोध लागला नाही तो किंवा ती दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर येणार!

तसेच गेम मधले नियम एकदा तोडणाऱ्याला पेनल्टी म्हणून त्या गेमचा "बिग आय" म्हणून बघणारा संयोजक काहीतरी करायला लावणार होता. दुसऱ्यांदा नियम तोडल्यास मात्र गेम मधून बाहेर!

सोनी बनकरने एकदा गेमचा नियम मोडला. मग बिग आयने तिला एक पेनल्टी दिली - ती जोपर्यंत गेम मध्ये टिकून आहे तोपर्यंत तिने रोज रात्री दोन बॉलिवूड आयटम सॉंग्जवर डान्स करून दाखवायचा. त्यानंतर त्या गेमपेक्षा त्या गेममधले सोनीने डान्सच लोकप्रिय व्हायला लागले. पुन्हा तिच्या जुन्या सेल्फीबद्दल चर्चा व्हायला लागली. सुभाष भट हे सगळे बारकाईने पाहात होते. त्यांनी BEBQ च्या कास्टिंग डायरेक्टर के. सचदेवाला कॉल केला आणि त्याला भेटायची इच्छा बोलून दाखवली. प्रथम सचदेवाला आश्चर्य वाटले की नक्की सुभाषजीना आपल्याला का भेटायचे आहे?

पण त्यांच्या भेटीत ते क्लियर झाले, ते असे:

"मला सोनी माझ्या पुढच्या हॉरर फिल्ममध्ये हवी आहे! माझ्या डोक्यात अशी स्क्रिप्ट घोळते आहे की ज्यात म्युझिक आणि डान्स संबंधित एका ग्रुप सोबत काही सुपरनॅचरल घटना घडतात! म्हणजे सोनीचे डान्स टॅलेंटही सिनेमात वापरता येईल आणि तिला हिरोईन म्हणून पण लाँच करता येईल! लोकांना फ्रेश चेहेरा हवाय! तीच एक हिरोईन रिताशा सतत माझ्या बहुतेक हॉरर चित्रपटांत काम करतेय आणि आताशा तिचे नवे चित्रपट फ्लॉप होत आहेत!"

"बरं! हरकत नाही! सोनीच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास आमच्या शोचे सगळे एपिसोड टेलिकास्ट होऊन संपले की ती आमच्या अग्रीमेन्ट पासून मुक्त असेल! मग ती इतर कुठेही काम करू शकते! आय एम अबसोल्युटली फाईन विद धिस!"

"ते ठीक आहे! पण मला तुमच्याकडून काय हवंय ते ऐका! मला हवंय की या गेम शोची विनर तीच असेल! सोनी!"

"हे बघा! आमचा हा रियालिटी शो आहे त्यामुळे यात काय घडणार आणि काय नाही हे मी नाही सांगू शकत! आणि तिला ठरवून जिंकवणे म्हणजे इतरांवर अन्याय नाही का होणार?"

"मिस्टर मिस्टर! ऐका माझं जरा! तुमच्या या सगळ्या रियालिटी शोबद्दलची आतली रियालिटी मला चांगली कळते! तेव्हा मला तुम्ही शिकवू नका! तुम्ही या शोचे कास्टिंग डायरेक्टर आणि स्क्रिप्ट मॅनेजरपण आहात. तेव्हा तुम्ही हे मॅनेज करू शकता!"

"मिस्टर सुभाष! मी मॅनेज करू शकतो की नाही हा मुद्दा वेगळा! पण मला सांगा, मी तुमचे का ऐकू? माझा फायदा काय?"

"सांगतो! मूळ मुद्यावर येतो मी आता! मला माझी पुढची नवी हिरोईन ही गेम शो मध्ये जिंकून फेमस झालेली अशी हवी आहे आणि ती सोनीच हवी! त्याबदल्यात मी तुमचा फायदा करून देईन! तुम्हाला मी माझ्या चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक म्हणून घेईन! तुम्हाला आयती प्रसिद्धी मिळेल. चित्रपटाच्या उत्पन्नातला 20 टक्के हिस्सा देईन आणि आता सायनिंग अमाऊन्ट म्हणून ताबडतोब 2 लाख रुपये देतो. मग तुमच्या शोच्या प्रोड्युसर वगैरे मंडळींना मॅनेज करून सोनीला कसे जिंकवायचे कसे ते तुमचे काम! बोला! आहे मंजूर?!"

"आता तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करत आहात तर मी पण तुमचं काम केलंच पाहिजे, नाही का? नाहीतरी कुणाला न कुणाला तरी जिंकायचं आहेच! माझ्या माईंडमध्ये ती इंडियन-ओरिजिन फॉरेनर कंटेस्टन्ट - "जेसिका कर्टिस" जिंकायला हवी होती पण एनिवे मला जिथे फायदा आहे तिथे मी जाईन! ठीक आहे, सोनीला विनर बनवू या!"

"अरे तुझ्या त्या जेसिका कर्टिसला सेकंड नंबरवर आण! मी तिलापण चित्रपटात छोटासा रोल देतो! तिला सांग की तू तिला बॉलिवूड मध्ये ब्रेक मिळवून देणार आहे! खुश होईल ती! "

शेवटी डील ठरली. सुभाष भटना हे दाखवून द्यायचे होते की डी. पी. सिंग च्या रागिणीवाचून त्यांचे काही अडत नाही. रागिणीने स्वतः नकार दिला असे सुभाष भटना सिंग यांनी सांगितले होते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. मग त्यांनी अर्थातच रागिणीला स्वतःहून कॉल करण्याचा प्रयत्न केला नव्हता...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet