फायदा आणि तोटा
http://www.aisiakshare.com/node/606 या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.
१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.
सर्वप्रथम अदिती यांच्या लेखाच्या शीर्षकाविषयी - "मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?"
कुठल्याही वाक्याचे उद्देश (सब्जेक्ट) आणि विधेय (प्रेडिकेट) असे भाग पाडले जातात. तसे या वाक्याचे सब्जेक्ट स्त्रिया आणि प्रेडिकेट हे त्यांचे मराठी इंटरनेट साईट्सवरील प्रमाण असे होईल. आता याचे अधिक पृथक्करण करण्याआधी स्त्रियांचे प्रमाण कमी का असा प्रश्न विचारण्याऐवजी मराठी संस्थळावरील एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तिंचे प्रमाण कमी का? ह्या अनुषंगाने का विचार करू नये? कुठलीही कृती (अॅक्ट), जी करण्यासाठी शरीराची ऊर्जा (एनर्जी) खर्च करावी लागते ती करणार्यांच्यात ढोबळमानाने दोन प्रकार पडतात.
एक - कुठलातरी हेतू अथवा अपेक्षा ठेवून ती कृती करणारे.
दोन - कुठलाही हेतू अथवा अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्ष वृत्तीने ती कृती करणारे.
आता या वरील दोन प्रकारांपैकी पहिल्या प्रकारच्या व्यक्ति सर्रास आढळतात. दुसर्या प्रकारच्या व्यक्ति सापडणे केवळ अशक्य आहे.
आता पहिल्या प्रकारात ज्या अपेक्षा / हेतू मनाशी बाळगून कृती केल्या जातात त्या अपेक्षा / हेतूंमध्ये मोठी विविधता जाणवते. परंतु आपल्या अभ्यासाकरिता आपण काही ठराविक अपेक्षांचा विचार करूयात. आता या (किंवा यातल्या काही अथवा सर्व) अपेक्षा कुठल्याही व्यक्तिला कुठलीही कृती करण्यापूर्वी असतात. तद्वतच त्या मराठी संस्थळावर लेखन करणार्या व्यक्तिला त्या लेखन करण्याच्या कृतीबद्दल असतात. (इथे स्वतंत्र लेखनासोबतच प्रतिसादात्मक लेखन व त्याप्रमाणेच केवळ वाचनमात्र वावर ह्या कृतीबाबतही हाच निकष लावला जावा). आता जर या कृतीतून आपल्या अपेक्षांची पूर्ती होत असेल तर ती व्यक्ति ती कृती करणार आणि जर इष्ट अपेक्षापूर्ती होत नसेल तर अर्थातच ती व्यक्ति ती कृती करणार नाही, कारण कुठलीही कृती करताना वेळ, पैसा, कष्ट खर्ची पडत असतात. आता ती व्यक्ति स्त्री आहे की पुरूष याने त्यात फारसा फरक पडत नाही.
खाली काही अपेक्षा मांडत आहे. या अपेक्षांचा मराठी संस्थळांच्या दृष्टीने विचार करता त्यांची पूर्तता किती प्रमाणात होते तेही पाहू.
१. प्रत्यक्ष आर्थिक वा इतर लाभ :- मराठी संस्थळावर ही अपेक्षा पूर्ण होणे अंमळ अवघडच. मिसळपाव, उपक्रम व ऐसीअक्षरेवर निदान मला तरी लेखन / प्रतिसाद लेखन याकरिता काही परतावा मिळत असल्याचे आढळले नाही. मी मराठीवर विविध स्पर्धांमधून पुस्तके पारितोषिक स्वरुपात मिळतात. मराठी कॉर्नर ने मला एकदा पारितोषिक म्हणून १०० रुपयांचा (अक्षरी रुपये शंभर फक्त) टॉक टाईम दिला होता. परंतु एकुणातच खर्च होणारे श्रम, वेळ व पैसा यांचा विचार करता हा मिळणारा परतावा अतिशय क्षुल्लक आहे.
२. अप्रत्यक्ष आर्थिक वा इतर लाभ :- संस्थळावर आपल्या व्यवसायाची माहिती देऊन व्यवसायाची वृद्धी करावी किंवा आपण नोकरदार असू तर आपल्या कौशल्यांची इतरांना माहिती द्यावी सध्या करीत असलेल्या नोकरीपेक्षा अधिक चांगली संधी मिळवावी या मार्गाने अप्रत्यक्ष आर्थिक लाभ होऊ शकतो. लिंक्डइन सारख्या संस्थळावर असा उद्देश पूर्ण होतो. मराठी संस्थळावर (पुन्हा मिसळपाव, उपक्रम व ऐसीअक्षरे) हा हेतू कितपत साध्य होतो? मिसळपावने तर आपल्या व्यवसायाची जाहिरात करणारे लेखन करू नये असा नियम केला आहे. तरीही तिथे नाडीपट्टी विषयी लेखन होते, इतर सदस्य त्यावर आक्षेप घेतात. पुन्हा लेखन होते असे चालुच आहे. परंतु लेखकाला काही आर्थिक फायदा झाला असेल असे वाटत नाही कारण बहुतेक जण तिथे अंधश्रद्धाविरोधी आहेत. एकाने (मिसळपाव व ऐसी अक्षरे या दोन्ही ठिकाणी) आपल्या पुस्तकाविषयी माहिती दिली होती तर आणखी एकाने आपण केलेल्या बुटाच्या दुकानाच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती दिली होती. परंतु या दोघांनाही यातून फारसा आर्थिक लाभ झाला असेल असे संभवत नाही. किंबहूना त्या दोघांचा तसा उद्देश असण्याची शक्यताही फारच कमी. (परंतू या दोघांनीही तसे अपेक्षा क्रमांक चारची पूर्तता होण्याकरिता केले आहे हे उघड आहे)
वरील दोन अपेक्षा या बहुतेकांना आपल्या अनेक कृतींमधून (यात अगदी राजकारण, समाजसेवा ते लग्नापर्यंत सारं काही आलं) पूर्ण व्हाव्या असे वाटत असते. या दोन अपेक्षांची पूर्ती होत नसेल तर या व्यक्ति स्वत:चे श्रम, वेळ व पैसा खर्ची घालत नाहीत. अर्थातच या अपेक्षा ठेवणार्या गटात स्त्रियांचे प्राबल्य आहे. स्त्रिया जास्त व्यवहारी असतात असे म्हंटले जाते ते यामूळेच.
३. सामाजिक बदल घडवून आणण्याची आशा :- आपल्या लिखाणाने फार मोठी क्रांती घडली नाही तरी निदान सामाजिक बदलाचे वारे वाहू लागतील व त्या करिता आपल्याला आपले हे समाजप्रवर्तक, क्रांतिकारी लेखन आवर्जून प्रकाशित केलेच पाहिजे त्याचप्रमाणे चालु घडामोडींवर झडत असलेल्या चर्चांमध्ये आपले मत हिरीरीने मांडलेच पाहिजे असे वाटणार्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचा भरणा अर्थातच अतिशय कमी असतो. हा भाबडा आशावाद पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले अनेक युगपुरूष इथे दिसून येतात. उदाहरणादाखल - मद्य, इतिहास, नाडीपट्टी, प्रेम, चित्रपट या व अशा अनेक विषयांवर आवर्जून व नियमित लिखाण करणारे पुरुषच आहेत.
४. समाजाकडून कौतूक व प्रसिद्धी, नवे मित्र, मैत्रीणी, प्रशंसक मिळविणे :- माझं लेखन वाचून समाज बदलला नाही तरी चालेल, पण निदान समाजातून माझ्या वाट्याला चार कौतूकाचे शब्द यावेत ही अपेक्षा निश्चितच अनेकांच्या मनात असते. इथेही पुन्हा स्त्रियांची ही अपेक्षा अनेकदा आपोआपच संकेतस्थळावर न येताही पूर्ण होत असते. नुसते फेसबुकावर दोन ओळींचे स्टेटस टाकले की हजार लाईक्स आणि पाचशे प्रतिक्रिया मिळतात. अशा वेळी हजार शब्दांचा लेख टाकायचे कष्ट कशाला घ्या? इतकेच कशाला, कार्यालय, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी स्त्रियांना त्यांचे अनेक प्रशंसक भेटतच असतात. तेव्हा त्यांना ही गरज फारशा प्रमाणात उरतच नाही.
५. निखळ आनंद :- ही एक अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. जर अपेक्षा क्रमांक ४ देखील पूर्ण होणार नसेल तर कसला आलाय डोंबलाचा निखळ आनंद? मी जर एखाद्या संस्थळावर पाच लेख प्रसिद्ध केले आणि एकावरदेखील एकही प्रतिक्रिया येत नसतील तर सहावा लेख मी कशाला प्रसिद्ध करेन? तेव्हा या प्रकारात स्त्री व पुरुष या दोहोंचाही भरणा अत्यल्पच असणार. अर्थात तरीही आपले लेखन इतरांपर्यंत पोचावे, भले त्यांनी त्याची पोच न दिली तरी चालेल असा विचार करून लेखन प्रदर्शित करणारेही काही थोर आहेत. परंतु पुन्हा तेच, स्त्रिया या असल्या फंदात पडणे महामुश्किल.
६. निदान मनस्ताप तरी होऊ नये :- पहिल्या दोन अपेक्षांमध्ये मोठा फायदा अपेक्षित आहे. म्हणजेच या दोन अपेक्षांची जर पूर्तता झाली तर आयुष्यात बरंच काही ++++++ होईल. तिसर्या आणि चौथ्या अपेक्षांची पूर्तता झाली तर निदान आयुष्यात थोडंतरी +++ होईल. पाचव्या अपेक्षेच्या पूर्ततेने अगदीच किंचित + होईल. परंतु सहावी अपेक्षा म्हणजे निदान --- तरी होऊ नये इतकी माफक आहे. या अपेक्षेच्या कसोटीवर मराठी संकेतस्थळे कितपत उतरतात? मिसळपाव तर बिलकूल नाही. हे एक फार मोठं कारण आहे की ज्यामुळे बरेच लोक मराठी संस्थळांच्या नादी लागत नाहीत आणि या नादी न लागणार्या गटात स्त्रियांचा मोठा भरणा आहे.
आता या सर्व अपेक्षांचा एकत्रित रीत्या विचार करू. मॉस्लोच्या नीड्स हायरार्किप्रमाणे इथेही काही अपेक्षा या अगदी मुलभूत आहेत. म्हणजे तिसरी व चौथी अपेक्षा पूर्ण होण्यासाठी बहुसंख्य लोक या संस्थळावर येतात पण त्यांची धड सहावी अपेक्षाही पूर्ण होत नाही जी अत्यंत मुलभूत आहे. मिसळपाव (व काही प्रमाणात ऐसी अक्षरे वर देखील) या मराठी संस्थळावर सरळ सरळ जुगार चालतो म्हणजे तुम्हाला प्रशंसा हवी असेल तर लेख प्रदर्शित करा पण टीकेलाही सामोरे जायची तयारी ठेवा. अर्थातच टीका अनेकवेळा अवांतर, व्यक्तिगत स्वरूपाची व अतिशय हीन शब्दांत केली जाणारी असते. अशी शेरेबाजी सहन न करू शकणारे मराठी संकेतस्थळावर वावरू शकत नाहीत मग ते स्त्री असो वा पुरूष. माझ्या माहितीत अनेक पुरूषांनीही मिसळपाव याच कारणाने सोडलंय. खरे तर तिथे अपेक्षा क्रमांक ४ ची ज्या प्रचंड प्रमाणात पूर्तता होते तेवढी इतर कुठल्या संस्थळावर क्वचितच होत असेल, पण त्या बदल्यात जो प्रचंड मनस्तापही सहन करावा लागण्याची तयारी असावी लागते ते पाहता हा जुगार न खेळणंच उत्तम असं अनेकांना वाटतं. शिवाय पुढे पुढे त्या अपेक्षा क्रमांक ४ मधून ही फारसा आनंद मिळत नाहीच. कारण, माझ्या लेखाला दुसर्या संकेतस्थळावर जेमतेम दोन आकडी प्रतिसाद मिळतात तर मिसळपाववर सहज शतक गाठलं जातं पण नीट नजर टाकली तर असं दिसून येतं की सुंदर मुलगी कशी पटवावी? असे शीर्षक असणार्या दहा ओळींच्या धाग्याला देखील ११२ प्रतिसाद मिळतात तर माझ्या हजार शब्दांच्या लेखाला मिळालेल्या १०५ प्रतिसादांचं काय ते कौतूक? शिवाय काही व्यक्ति कंपूबाजी करून तुम्हाला त्रास देतात. संस्थळाचा टीआरपी कायम राखण्याच्या नादात संपादक ही अशा सदस्यांना पाठीशी घालतात. पक्षपाती वागणूक देतात. अशा वेळी जर अनेक पुरूष देखील संस्थळ सोडत असतील अथवा आपला वावर मर्यादित ठेवत असतील तर स्त्रियांचा सहभाग देखील आपोआप कमीच असणार.
काहींनी असेही मत मांडले आहे की स्त्रियांना स्वतःचे असे ठाम मत नसतेच त्यामुळे ते मांडण्याची खुमखुमीही ओघाने नसतेच व याच कारणाने त्या संस्थळावर येत नाहीत. हे काही फारसे पटले नाही. स्त्री असो वा पुरूष, ठाम मत असलेले अनेक जण ते मांडायच्या फंदात पडत नाहीत. ते मांडून उपयोग काय? स्वत:ला पटलेले असले तरी इतरांना पटवून देता येईलच असे नाही. म्हणजे अपेक्षा क्रमांक १ व २ ची नाहीच पण ३ व ४ चीही पूर्तता होणे नाही. शिवाय अनेकदा आपले मत पटलेले असूनही समोरचा आडमुठेपणाने आपल्याशी वाद घालत असेल तर अपेक्षा क्रमांक ६ ची ही पूर्तता होत नाही.
याबाबत एक उदाहरण देता येईल ते म्हणजे सुनीता देशपांडे यांचे. आपण डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना जसे कट्टर अंधश्रद्धा विरोधक म्हणून ओळखतो तसे सुनीताबाईंना ओळखतोच असे नाही. खरे पाहता सुनीताबाई या अंनिस वाल्यांपेक्षाही अधिक कट्टर अंधश्रद्धाविरोधक व निरीश्वरवादी होत्या. आपल्या आयुष्यात त्यांनी आपले तत्त्व आग्रहाने मोठ्या हट्टाने पाळले. प्रसंगी अनेकांशी वाईटपणाही घेतला (सख्ख्या आईशी देखील). परंतु आपले विचार लोकांपर्यंत पोचावे याकरिता डॉ. लागू व दाभोळकरांप्रमाणे त्यांनी या विषयावर सभांमधून भाषणे झोडली नाहीत. त्याऐवजी आपल्या आहे मनोहर तरी या पुस्तकात त्यांनी आपले हे सारे विचार व्यवस्थित मांडले. यातून त्यांच्या अपेक्षा क्रमांक ३ ची कितपत पूर्तता झाली हे जरी समजले नसले तरी अपेक्षा क्रमांक १ व ४ ची मोठ्या प्रमाणात पूर्तता झाली.
आज जर भाई व सुनीताबाई असते किंवा त्यांच्या काळात मराठी संस्थळे असती तर भाई मराठी संस्थळावर सक्रिय झालेले असते आणि सुनीताबाई त्यांच्यामागे "इथे का टाईमपास करतोयस? तुझे लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित का करत नाहीस?" असा धोशा करताना दिसल्या असत्या. कारण पुन्हा तेच भाई फक्त अपेक्षा क्रमांक ५ करता लेखन करीत तर त्यांच्या लेखनातून अपेक्षा क्रमांक १, ३ व ४ चीही पूर्तता व्हावी असे व्यवहारी असणार्या सुनीताबाईंना वाटत असे.
अर्थात या व्यतिरिक्त इतरही काही अपेक्षा ठेवून काही लोक संस्थळावर येतात (ज्यामुळे बाकीचे संस्थळ सोडून जातात) त्यातली प्रमुख अपेक्षा म्हणजे इतरांना छळून त्यातून आनंद मिळविणे. या गटात पुरुषांचा भरणा जास्त असला तरी स्त्रिया अगदी नाहीतच असे नाही. मिसळपाव वर अशाही काही महिला होत्या / आहेत ज्यांनी काही पुरुष सदस्यांनाही पळवून लावले.
अशा प्रकारे आपल्या प्रत्येक कृतीत काही फायदा होतोय की नाही (किंवा निदान तोटा तरी होत नाहीये ना)? हे पाहून मगच ती कृती करण्याचा मनुष्य स्वभाव असल्याकारणाने मराठी संकेतस्थळावरून केवळ स्त्रियांचाच नव्हे तर एकूणच सहिष्णू लोकांचा वावर कमी होत चालला आहे.
हा वावर वाढवायचा असेल तर काही उपाय सूचविता येतील -
एक म्हणजे संपादकांनी काहीसे कडक धोरण आखले व अंमलात आणले पाहिजे. लेखन व प्रतिसाद शब्द न शब्द तपासून मगच प्रकाशित केले पाहिजेत (मनोगत असे करते). आपला टीआरपी कमी होईल ही भीती बाळगू नये. सर्वच संकेतस्थळांनी असे धोरण अवलंबिले तर कुणाचाच टीआरपी कमी होणार नाही. संपादकांना हवे तर या करिता मानधन द्यावे. आता मनोगत, उपक्रमवर संपादन टाईट आहे तर मिसळपाववर एकदम लूज. त्यामुळे मिसळपाववर काहीही लिहा किमान दोन आकडी प्रतिसाद येणारच व अनेकदा फालतू एकोळी धाग्यांनीही अवांतर प्रतिसादांसह शतक गाठलेले दिसून येते. त्यामुळे त्या संस्थळाची सदस्यसंख्याही वाढत चाललेली दिसते. परंतु ही सूज आहे. अनेक आयडी हे मृत, सुप्त, निष्क्रिय व बरेचसे बोगस देखील आहेत. ऐसीअक्षरेवरही अनेकदा ढिले संपादन, श्रेणी देण्याच्या प्रकारात पक्षपात असे प्रकार दिसून येत आहेत. अर्थात हे नवीन संस्थळ असून आपली वाटचाल मनोगत, उपक्रम प्रमाणे करायची की मिसळपाव प्रमाणे हे इथल्या चालकांना ठरवावे लागणार आहे. त्यांच्या धोरणानुसार येथील स्त्रियांचा सहभाग ठरेल. श्री. अशोक पाटील (अजुनही काही जण आहेत परंतु हे नाव चटकन आठवले) यांच्या सारखे कुणालाही न दुखावणारे व सर्वांनाच प्रोत्साहनपर ठरेल असे सातत्याने आदर्श लेखन (स्वतंत्र लेख आणि प्रतिसाद या दोन्हीबाबतीत) करणारे सदस्य जर ऐसी अक्षरेवर वाढत गेले तर अनेक सहिष्णु स्त्री-पुरूष सदस्य येथे सक्रिय होतील.
दुसरा उपाय म्हणजे सदस्यांना (सदस्य स्त्री आहे की पुरूष असा भेद न करता) लेखनाकरिता काही आर्थक परतावा दिला जावा. थोडक्यात अपेक्षा क्रमांक १ ची पूर्तता व्हावी. कारण, अपेक्षा क्रमांक १ ची पूर्तता होत असेल तर अनेकदा सौम्य प्रवृत्तीचे लोकही अपेक्षा क्रमांक ६ बाबत तडजोड करायची तयारी ठेवतात. अर्थात हा काही पहिल्या उपायाइतका आदर्श उपाय नव्हे.
तिसरा उपाय म्हणजे उपनगरी रेल्वेसारखी पर्यायी व्यवस्था असावी. म्हणजे उपनगरी रेल्वेच्या जनरल डब्यातही स्त्रियांचा सहभाग कमीच असतो. कारण सरळ आहे तिथे त्यांची गैरसोय होते. त्यांच्याकरिता उपनगरी रेल्वेने महिला आरक्षित डब्याची सोय केलेली आहे. तद्वतच महिलांनी महिलांकरिता चालविलेले एखादे संस्थळ काढले जावे. उपनगरी रेल्वेच्या जनरल डब्यात दुसर्यांना त्रास देण्याची वृत्ती नसणारे व दुसर्यांनी दिलेला त्रास सहन करण्याची इच्छा नसणारे अनेक पुरुषही जात नाहीत. मग ते काय करतात? सरळ जास्त भाडे देवून प्रथम वर्गाने प्रवास करतात. अशा पुरुषांकरिता व महिलांकरिता देखील एखादे प्रथम वर्गाचे संस्थळ चालू करावे. ज्यात विशिष्ट मासिक शुल्क आकारावे. त्याचप्रमाणे सदस्याची खरी माहिती ही नोंदवून घ्यावी. ही माहिती ताडून पाहिलेली (वेरिफाईड) असावी. प्रत्येक सदस्याचे खरे नाव, संपर्क क्रमांक इत्यादी गोष्टी संस्थळावर प्रकाशित असल्यावर फालतूपणास आपोआप आळा बसेल व जेन्युईन (सद्हेतू असलेले) लोकच अशा ठिकाणी सहभागी होतील.
अदिती यांनी स्त्रियांच्या सहभागाविषयी प्रश्न केला होता परंतु मी विशिष्ट अपेक्षा ठेवणार्या लोकांच्या सहभागाविषयी (ज्यात प्रामुख्याने स्त्रियांचा भरणा जास्त आहे असे मला वाटते) उत्तर दिले.
आता या प्रश्नाचे निव्वळ स्त्री असण्याच्या अनुषंगाने उत्तर द्यायचे झाले तर हा मूळात हा प्रश्न शरीरभेदावर आधारित असल्याचे मान्य करावे लागेल व त्याप्रमाणेच त्याचे उत्तर ठरेल. अदिती यांनीच इतरत्र समलिंगी संबंधांविषयी एक धागा काढला आहे. संबंध समलिंगी असो अथवा भिन्नलिंगी त्यात एकाला डॉमिनेटींग व दुसर्यास पॅसीव्ह अशी भूमिका घ्यावीच लागते. दोघेही समान पातळीवर नसतात. समलिंगी संबंधात आकाराने मोठी असणारी व्यक्ति ही डॉमिनेटींग भूमिका घेत असते अशी माहिती सिडने शेल्डन च्या एका कादंबरीत वाचली होती. परंतू भिन्नलिंगी संबंधात नेहमीच स्त्रिया या पॅसीव्ह व पुरुष डॉमिनेटींग असतात. या कारणांमुळे पारंपारिक रीत्या स्त्रीला पॅसीव्ह करमणूकीची जास्त आवड आहे. त्यामुळेच मालिका बघणार्यांत स्त्रियांचा जास्त पुढाकार असतो कारण ती एक पॅसीव्ह करमणूक आहे. तर व्हिडीओ गेमींग, संकेतस्थळावरील चर्चा अशा ठिकाणी पुरुष आघाडीवर असतो कारण तिथे आपला सक्रिय(अॅक्टीव्ह)सहभाग आवश्यक असतो व त्यातही काही मराठी संकेतस्थळांवर त्याचे स्वरूप आक्रमक सहभाग(डॉमिनेटींग)असे होऊ लागले आहे.
एकूणातच सारी व्यवस्था पुरूषप्रधान असल्याने स्त्रियांचा वावर सर्व ठिकाणी कमीच असतो. तो वाढविण्यासाठी इतरत्र अनेक चीप उपाय योजले जातात. जसे की, महाराष्ट्र टाईम्समध्ये फ्रेंडशिप क्लबच्या जाहिराती असतात जिथे पुरुषांना सभासद होण्याकरिता वार्षिक रुपये चार हजार पर्यंत शुल्क आकारले जाते तर महिलांना सभासद झाल्यास क्लबकडूनच आर्थिक मोबदला दिला जातो.
मराठी संस्थळांचे अशा फ्रेंडशिप क्लबांत रुपांतर होऊ नये असे वाटते.
<< अप्रत्यक्ष लाभांबद्दल अजुन
अप्रत्यक्ष लाभांबद्दल अजुन सांगायचे झाल्यास एखादेच घबाड मिळते व सर्वांची कसर भरुन काढते. अशा प्रकारच्या मार्केटिंग मधे गुंतवणुकिच्या मानाने मिळालेला परतावा अधिक असतो. >>
हे मान्य. परंतु असे घडल्याचे अजुन तरी माझ्या वाचनात आले नाही. म्हणजे असे की, मराठी प्रकाशक / वृत्तपत्रमालक नियमित रीत्या मराठी संस्थळाचे वाचन करीत आहेत व त्यातून त्यांनी चांगले ले़खन करणारे रत्न हेरून त्यास आपल्या तर्फे व्यावसायिक संधी दिली आहे वगैरे वगैरे. असे एकाच्या बाबतीत जरी घडले तरी अजुन शंभर चांगले लेखक त्या संस्थळावर हिरीरीने ले़खन करू लागतील.
बाकी स्वांत सुखाय लेखन खरे उत्तम. >>
हेही मान्य. पण तेवढीच अपेक्षा असेल तर स्वतःचा ब्लॉग काय वाईट? संस्थळावर लेखन केले तर निदान अपेक्षा क्रमांक ४ ची तरी पूर्तता व्हायलाच हवी.
असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
क ड क...
चेतन, बर्याच दिवसांनंतर तू लिहिता झालास हे बघून आनंद झाला :)
लेख बराच लांबलचक झाला आहे हे खरे आहे पण ज्याप्रकारे एकंदरीत विषयाचा परामर्श घेतला आहेस त्याने तो फारच वाचनिय आहे.
आत्तापर्यंत सगळ्या मसंवर ह्या लेखासाठी आलेल्या प्रतिक्रियांपैकी ही प्रतिक्रिया अतिशय भावली.
खरेतर एकढ्या खोलात जाउन मी विचारच केला नव्हता आणि नसता. खरेतर मी विडंबनच पाडणार होतो ज्या धाग्याचे.
पण इथेच "चेसुगु" हा ब्रॅन्ड का आहे आणि तो इतरांपेक्षा वेगळा ऊठून का दिसतो ह्याचे इंगीत दडलेले आहे.
मित्रा असे वैचारिक पातळीवर खोलात जाउन विचार केलेले आणि समरसून लिहीलेले लेख आणि दिलेले प्रतिसाद ह्यामुळेच आंजावर आजही बराच वाचकवर्ग आहे तुझा.
आता असाच लिहिता रहा. बोळा निघून पाणी वाहते राहू दे...
- (आनंदी) सोकाजी
सहमत
सोकाजीशी सहमत. चेसुगु यांनी हे असे लेखन विचारविषयक लेखन-चर्चेसाठी साठी प्रसिद्ध अशा 'उपक्रम'वरही केले पाहिजे ही त्यांना आग्रहाची विनंती. इथल्यापेक्षा खचितच अधिक टोकदार चर्चा तिथं होऊ शकते. मुख्य म्हणजे तेथील संपादक कडक असल्याने अवांतराला फारशी संधी नसते.
उपक्रम वर ले़खन प्रकाशित केल्याचा परिणाम
उपक्रमच्या संपादक मंडळाकडून आलेला व्यक्तिगत निरोप :-
नमस्कार,
माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि समुदाय हे उपक्रमचे स्वरूप टिकून राहावे आणि उपक्रमच्या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन इथे असावे अशी उपक्रम संकेतस्थळाची अपेक्षा आहे.
फायदा आणि तोटा हे आपले लेखन मुद्देसूद आणि उपक्रमाच्या तोडीचे असले तरी त्यातील काही वाक्यांतून इतर संकेतस्थळांची बदनामी होत आहे असे लक्षात येते. इतर संकेतस्थळांना लक्ष्य करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट नाही. अशी अनावश्यक वाक्ये बदलून लेख पुनर्प्रकाशित करणे शक्य असल्यास पाहावे. तूर्तास, सद्य लेख अप्रकाशित केला आहे याची नोंद घ्यावी. उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन करून कृपया सहकार्य करावे.
कलोअ,
संपादन मंडळ.
रोचक
संपादक मंडळाचा हा निरोप रोचक आहे. तुमच्या या लेखातील काही वाक्यांतून इतर संस्थळांची बदनामी होते, हा युक्तिवाद तर, उदाहरणार्थ, थोरच. पण, आपण त्यांचे म्हणणे मान्य करूया. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. शिवाय, ती मंडळी नव्या सायबर लॉच्या तरतुदी मानत असावीत, असेही त्यातून दिसते. बदनामी का, काय, कशी, कधी, कोणाकडून, कोठे होते वगैरेची चौकट ज्याची त्याची समज, जाण, आकलन यावरच अवलंबून असते. तेव्हा ती त्यांची चौकट आहे हे आपण समजून घ्यावे, इतकाच याचा बोध!
उदाहरणार्थ, आणखी एक गोष्ट आहे. प्रस्तुत लेख ज्या लेखावरची प्रतिक्रिया आहे, तोच लेख तेथेही आहे. त्यावरची चर्चा वाचण्यालायक आहे. विशेषतः, संपादकांच्या या निरोपाच्या संदर्भचौकटीत ती मी पुन्हा वाचली, तेव्हा हा निरोप मला थोडा अधिक समजला.
गुगळे यांनी तेथील निरोप येथे जसाच्या तसा टाकला याला 'ऐसी अक्षरे'चे संपादक त्या संस्थळाची बदनामी मानत नाहीत, असे दिसते. त्याचे मात्र कौतुक करावे लागेल.
असो. इतर संस्थळाविषयीची चर्चा येथेच थांबवतो.
स्पष्टीकरण
>>>गुगळे यांनी तेथील निरोप येथे जसाच्या तसा टाकला याला 'ऐसी अक्षरे'चे संपादक त्या संस्थळाची बदनामी मानत नाहीत, असे दिसते. त्याचे मात्र कौतुक करावे लागेल.
प्रस्तुत वाक्यात 'ऐसी अक्षरे'च्या संपादकांबद्दलचे भाष्य आहे म्हणून हा प्रतिसाद. उपरोक्त प्रतिसाद वाचला. तो व्यक्तिगत निरोप आहे असं मानलं तरी त्यात कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी आहे असं दिसलं नाही. ज्या व्यक्तीने हा व्यक्तीगत निरोप जसाच्या तसा येथे दिला आहे (असे त्यांचे म्हणणे आहे ) तो त्या व्यक्तीला स्वतःलाच आलेला निरोप आहे. त्यामुळे इथे कुठे प्रायव्हसीचाही भंग झाल्याचे जाणवले नाही.
या निमित्त संपादक मंडळाच्या झालेल्या कौतुकाबद्दल आभार.
धन्यवाद. हे असे प्रतिसाद
धन्यवाद. हे असे प्रतिसाद म्हणजेच अपेक्षा क्रमांक ४ ची पुरेपुर पूर्तता. अर्थात हे घडत असताना अनेकदा अपेक्षा क्रमांक ६ पणाला लावावी लागते व यामुळेच माझा मराठी संकेतस्थळावरील वावर लक्षणीय रीत्या कमी झालेला आहे व भविष्यातही तो फारसा वाढण्याची शक्यता नाहीच.
बरोबर! मला एक सांगा, तुम्हाला
बरोबर!
मला एक सांगा, तुम्हाला लेखक म्हणून मानधन स्वरूपात परतावा हवा, मान्य. तुमचा तो अधिकार (?) देखील असू शकतो परतावा मिळणे हा. मग सर्वसामान्य वाचकांना कोण मानधन देणार जे आपला अमुल्य वेळ तुमच्या सारख्या प्रतिष्ठीत लेखकाचे लेखन वाचण्यासाठी खर्ची घालतात?
काही मुद्दे, विचार यांच्या अनुषंगाने
सर्वप्रथम श्री.चेतन सुभाष गुगळे यांचे अभिनंदन एवढ्यासाठी की त्यानी या विचार-प्रकटनासाठी केलेला अभ्यास. त्यावरून लेखाची लांबी जोखल्यास ती योग्य असून इथल्या संपादक मंडळालाही त्यातून बरेचसे उद्भोदन होण्यासारखी त्याची आवाहनात्मक मांडणी आहे, ज्याचा ऐसी अक्षरे मंडळ नक्कीच विचार करेल [जसे 'उपक्रम' व्यवस्थापनाने श्री.गुगळे याना पाठविलेल्या वैयक्तिक पत्रात प्रगटलेला विचार].
या निमित्ताने (जरी माझा अधिकार नसला तरी) या लेखातील काही विचाराबाबत माझे मत नोंदवित आहे :
१. "......पण त्या बदल्यात जो प्रचंड मनस्तापही सहन करावा लागण्याची तयारी असावी लागते ते पाहता हा जुगार न खेळणंच उत्तम असं अनेकांना वाटतं." ~ श्री.गुगळे यांचे हे गृहितक स्वीकारणारे जे कुणी सदस्य आहेत/असतील त्यामध्ये मी आहे हे मी थेटच सांगतो. सध्या वयाच्या वा सामाजिक दर्जाच्या ज्या अवस्थेत मी आहे तिथे सर्वार्थाने मनःशांतीची फार गरज आहे असा (शारीरिकदृष्टीनेही) विचार केल्यास तसा निर्णय घेणे मला योग्य वाटते. मी इथल्या - ऐसी अक्षरे - काही लेखांचे नाव न घेता म्हणू शकतो की इच्छा आणि काही प्रमाणात अभ्यास असूनही तिथे प्रतिसाद देण्याचे विचार आयत्यावेळी मी बदलले आणि केवळ काही काळ 'वाचनमात्र' च राहिलो. त्याला कारणही माझ्या प्रतिसादामुळे येऊ शकणार्या प्रतिसादामुळे काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार याची (सार्थ) भीती वाटत असल्याने ते सारेच टाळणे मला गरजेचे वाटले. श्री.गुगळे म्हणतात तसे "जुगार न खेळणेच उत्तम".
२. "प्रमुख अपेक्षा म्हणजे इतरांना छळून त्यातून आनंद मिळविणे. या गटात पुरुषांचा भरणा जास्त असला तरी स्त्रिया अगदी नाहीतच असे नाही." ~ हे मला नवीनच आहे. म्हणजे असे की एखाद्या विषयावर चाललेल्या चर्चेतून असे काय मुद्दे असतात की जेणेकरून 'अ' ला छळून 'ब' आनंद - विकृत म्हणू या - प्राप्त होतो ? शिवाय या गटात 'स्त्रिया अगदी नाहीतच नाही असे नाही" हे विधान तर काळजी वाटण्यासारखे आहे. विविध संस्थळावरील स्त्रियांची जी उपस्थिती दिसते त्यावरून जवळपास सर्वच स्त्रिया उच्चशिक्षित, उद्योगजगताशी संलग्नित वा चांगल्या ठिकाणी नोकरीत तसेच आर्थिकदृष्ट्याही 'स्टेबल' अशा गटातील आहेत असे मानले जाते, मग अशा पातळीवरील स्त्री वर्ग संस्थळाचा वापर एखाद्याला/एखादीला छळण्यासाठी करीत असेल तर ती अनाकलनीय बाब मानावी लागेल. [हे निरीक्षण धागाकर्त्याचे आहे, आणि या क्षणापर्यंत तरी इथल्या स्त्रीवर्गाने त्यांच्या या मुद्द्याला विरोध केलेला नाही, म्हणजे एकतर स्त्री सदस्यांनी हा लेख वाचलेला नाही आणि वाचला असल्यास मुद्दा खोडून काढण्याचा यत्न केलेला नाही असे दिसते.]
३. सुचविण्यात आलेले काही उपाय ~ हा मुद्दा लेखकाने अनेकबाबींबा विचार करून खुलविला आहे आणि येथील व्यवस्थापन मंडळच त्यावर आपले मत व्यक्त करू शकते.
श्री.गुगळे यानी लेखात माझे नाव घेऊन माझ्या लेखन/प्रतिसादाबद्दल जे आपुलकीचे मत व्यक्त केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
अशोक पाटील
पाटील साहेब, आपल्या
पाटील साहेब,
आपल्या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक १ मधील
काही लेखांचे नाव न घेता म्हणू शकतो की इच्छा आणि काही प्रमाणात अभ्यास असूनही तिथे प्रतिसाद देण्याचे विचार आयत्यावेळी मी बदलले आणि केवळ काही काळ 'वाचनमात्र' च राहिलो. त्याला कारणही माझ्या प्रतिसादामुळे येऊ शकणार्या प्रतिसादामुळे काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार याची (सार्थ) भीती वाटत असल्याने ते सारेच टाळणे मला गरजेचे वाटले. >> हे अनेकांच्या बाबत अनेक वेळा घडत असते. मी ही कित्येक वेळा या परिस्थितीतून गेलो आहे. आपण हे अगदी नेमक्या शब्दांत मांडले.
मुद्दा क्रमांक २ विषयी जमल्यास फोन अथवा ईमेलवर संवाद साधूयात. (संकेतस्थळावरील वैयक्तिक निरोप हा भागही तितकासा गोपनीय नाही असा अनुभव मला यापूर्वी मिसळपाववर आला असल्याने आता पुन्हा ती जोखीम पत्करायची इच्छा नाहीये.)
मुद्दा क्रमांक ३ मध्ये अगदीच वरवरच्या व जुजबी उपाययोजना सूचविल्या आहेत. खरेतर तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून त्यावर अनेक मान्यवर सदस्यांनी एकत्र येऊन ब्रेन स्टॉर्मिंग केल्यास अनेक चांगल्या कल्पना सुचून त्यावर अंमलबजावणी करता येऊ शकते.
व्यक्तिला न पाहता / प्रत्यक्ष भेट न होताही केवळ त्या व्यक्तिचे लेखन वाचून आदर वाटावा असे आपले जालीय लिखाण असल्याचा मला प्रत्यय आल्यानेच चटकन आपले नाव आठवले व त्याप्रमाणे मी तसा उल्ले़ख केला. अनेक सदस्यांचा अभ्यास चांगला असतो परंतू स्वभाव चांगला नसतो. तर कित्येकांचे याच्या अगदी उलट असते. आपणांजवळ दोन्ही गोष्टी एकाचवेळी आहेत जे एरवी अपवादानेच आढळते. आपला आदर्श सर्वांनीच ठेवला तर इतर कुठलीही बाह्य उपाय योजना न करताही जालीय स्थळांवरील स्त्री-पुरुष वाचकांचा वावर निश्चितच वाढेल असे वाटते.
प्रतिसादाबद्दल आभार.
आपण ज्या सहा अपेक्षांचे
आपण ज्या सहा अपेक्षांचे विवेचन केले आहे त्याच्याशी मी एकूण सहमत आहे. खोलात जायचे झाल्यास एक दोन मुद्दे वेगळे येतील पण ते तितकेसे महत्त्वाचे नाही.
एकूण 'संस्थळ कशासाठी चालवले जाते' याबाबत संपादक मंडळाची आणि सदस्यांची काय समज आहे यावर बरेच काही अवलंबून आहे असे दिसते. म्हणजे 'मौजमजा' हा प्राथमिक हेतू असेल तर काहीच्या काही धाग्यांवर भरपूर प्रतिसाद दिसणे (आणि तेही त्याच त्याच ठराविक आय. डी. कडून) हे स्वाभाविक आहे. सदस्यांनी काही एक संकेत पाळावेत असे नियम कोणी करायचे हाही एक प्रश्न आहे - म्हणजे संस्थळाने करायचे तर त्यांना सदस्य नेमेके कोण आहेत याचा काहीच पत्ता नाही, सदस्यांनी करायचे तर लोकशाहीमुळे एकमत होणे अवघड - अशा पेचात आज मराठी आंजा दिसते आहे - असे माझे प्रथमदर्शनी मत झाले आहे. (माझा संस्थळांचा अनुभव अर्थातच अगदी मर्यादित आहे हे मी अदिति यांच्या धाग्यावरच्या प्रतिसादात लिहिले आहे - इथे पुन्हा सांगते.)
मला स्वतःला संस्थळावर वावरण्यापेक्षा ब्लॉगविश्व जास्त सुरक्षित वाटते. तिथे टीका होतेच, पण त्यातून पुढे जाता येते. तिथेही अवांतर आणि खोडसाळ लोक येतात, नाही असे नाही. पण ब्लॉगवर आपण परिस्थिती जास्त चांगली नियंत्रणात ठेवून मनःस्ताप टाळू शकतो. संस्थळ म्हणजे दुस-यांचा अंगणात येऊन गप्पा मारल्यासारखे आहे. आपण फार फार तर वातावरण चांगले निर्माण करायचा प्रयत्न करू शकतो (आपल्या लिखाणातून, प्रतिसादांतून) - आणि ते नाहीच जमले तर अखेर संस्थळ सोडून जाऊ शकतो.
ब्लॉग आणि संस्थळ फरक
सविताताई ~
तुमच्या "मला स्वतःला संस्थळावर वावरण्यापेक्षा ब्लॉगविश्व जास्त सुरक्षित वाटते. तिथे टीका होतेच, पण त्यातून पुढे जाता येते." ~ याबद्दल थोडेसे.
माझा ब्लॉग नाही, पण मी वेळोवेळी इतर अपरिचितांचे वाचतो, वाटल्यास प्रतिक्रियाही देतो. तुम्ही म्हणता तशा टीकाही काही ठिकाणी वाचल्या ज्यातील बर्याचशा अस्थानीही वाटल्या. त्या बोचर्या टिकेला तितक्याच उग्रपणाने धुडकावून लावणारे/लावणार्या ब्लॉग्जधारकही मला माहीत आहे. पण या पाहणीतून लक्षात येते की त्या दोघांच्या आदानप्रदानाची व्याप्ती तितपतच मर्यादित असून तिसर्याला तिथे स्थान नसते....किंबहुना तिसरा त्या फंदातही पडत नाही. शिवाय 'वाचकवर्ग' हा एक वेगळाच प्रकार आहे. ब्लॉगवर प्रकाशित होणारे लेखन वाचणारे संख्येने निश्चित जास्त असतील पण ते सारेच प्रतिक्रियेत सहभागी होतील (च) असे नसते. संसंस्थळावर अशी परिस्थिती नसते. जरी इथे वावरणे हे एक प्रकारचे 'दुसर्याच्या अंगणात येऊन गप्पा मारल्यासारखे' असले तरी त्या गप्पांना अगदीच ग्रामीण भागातील चावडीसदृयश्य पातळी येऊ शकत नाही (कारण संपादकांच्या कात्रीचीही खात्री असते). इथला वाचकवर्ग, तुलनाच केली तर, ब्लॉगला लाभत असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो, शिवाय एक नाही अनेकजण आपल्या लिखाणाकडे लक्ष देतात, प्रतिसाद देऊन प्रतिक्रियेतून लेखकच नव्हे तर अन्यांशीही विचारमंथन करू शकतात, नव्हे करतात असा अनुभव आहे.
मराठीतील सुप्रसिद्ध लेखक श्री.संजय सोनवणी यांच्या 'ब्लॉग' ची मी नियमित वाचक होतो/आहे; पण प्रत्यक्ष त्यांच्यासमवेत माझी अगदी एकमेकाकडे जाण्याइतपत मैत्री झाली ती ते ज्यावेळी अन्य एका मराठी संस्थळाचे सदस्य झाले आणि तिथे नियमितपणे चाललेल्या ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय विषयांवरील चर्चेतील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागानंतर. त्यांच्या तेथील लिखाणावर प्रतिसाद देणार्या अन्य कित्येकजणांशीही (यातील जवळपास सर्वांचेच इंटरनेटवर ब्लॉग्ज नाहीत) मग त्या निमित्ताने ओळखीचे पूल बांधले गेले आणि हा विस्तार वाढताच आहे ही एक चांगली कमाई होऊ शकते, संस्थळावरील सहभागामुळे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. [मला वाटते ओळखीच्या संदर्भातील हा असा अनुभव तुम्हालाही संस्थळ सदस्यत्वानंतर प्रकर्षाने जाणवला असेल.]
तुम्ही म्हणता तसे आपण चांगले खेळीमेळीचे वातावरण नक्कीच निर्माण करू शकतो. पण इथेही खेळीमेळीचे म्हणजे 'ओरबाडणे' असे होण्याचीही शक्यता असतेच. त्याला जशास तसे उत्तर देण्यापेक्षा मनःशांती बिघडायला नको असेल तर सभागृहातून रजा घेतलेली बरे अशी कुणी भूमिका घेत असेल तर त्याला संपादक मंडळही विरोध करणार नाही.
अशोक पाटील
वेगळा प्रश्न
लेखातली सहा कारणांची मांडणी चांगली आहे. विशेषतः मॅस्लोच्या हायरार्की ऑफ नीड्स ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. संस्थळांवरचा वावर हा मॅस्लोच्या पिरॅमिडमध्ये वरच्या दोनतीन भागांत येत असल्याने त्या भागांचं तुम्ही जास्त विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. मात्र तुमचा एकंदरीतच रोख स्त्री-पुरुष फरकापेक्षा संस्थळांवरील सहिष्णू-असहिष्णू प्रवृत्तींच्या वावरावर दिसतो.
अदिती यांनी स्त्रियांच्या सहभागाविषयी प्रश्न केला होता परंतु मी विशिष्ट अपेक्षा ठेवणार्या लोकांच्या सहभागाविषयी (ज्यात प्रामुख्याने स्त्रियांचा भरणा जास्त आहे असे मला वाटते) उत्तर दिले.
मला वाटतं तुम्ही दिलेली उत्तरं ही सर्वच लोकांच्या सहभागाविषयी आहेत. या अपेक्षा ठेवणाऱ्यांत स्त्रियांचं प्रमाण अधिक असेल हे पटत नाही. १. आर्थिक फायदा २. अप्रत्यक्ष आर्थिक वा व्यावसायिक फायदा - या दोन गटांत तर पुरुषच अधिक असतील कारण सध्या तरी समाजात नोकरी व व्यवसाय करण्यात पुरुषांचं बहुमत आहे. ३. सामाजिक बदल घडवून आणण्याची आशा - यातही पुरुषांचं किंचित प्राबल्य असेल असं वाटतं. कारण पुन्हा तेच. समाजाची यंत्रणा चालवणारे, वापरणारे पुरुषच अधिक आहेत. ४. कौतुक, प्रसिद्धी - यात प्रमाण समसमान असावं ५. निखळ आनंद - हा हेतू कोणाचाच नसतो असं तुमचंच मत आहे (अगदीच चूक नाही) ६. दुखापतीपासून दूर रहाण्याची इच्छा याबाबतीत कदाचित संस्थळांपासून दूर रहाण्यात स्त्रियांचं प्रमाण किंचित अधिक असेल.
केवळ स्त्रियांचाच नव्हे तर एकूणच सहिष्णू लोकांचा वावर कमी होत चालला आहे.
हे पटत नाही. तुम्ही पंचवीस सोडून गेलेल्या सहिष्णू लोकांची नावं सांगितलीत तर मी पंचवीस टिकून राहिलेल्या सहिष्णू लोकांची नावं सांगू शकेन. शिवाय सहिष्णू-असहिष्णू या वितरणातही जेंडर बायस फारसा दिसत नाही हेदेखील तुम्हीच म्हणता.
तुम्ही दिलेले उपाय - कठोर संपादन - हा पटत नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या तो आड येतो. दुसरं म्हणजे कागदी मासिकांच्याच पद्धतीने संस्थळ चालवणं हा आंतरजालाच्या माध्यमाचा कोता वापर ठरतो. टीव्हीवर सुरूवातीच्या जाहिरातींमध्ये केवळ एक चित्र दाखवून मागे रेडियोचीच जाहिरात लावायचे, तसं काहीसं. आंतरजाल या माध्यमाची शक्ती वापरायची असेल तर खुलेपणा हवा. तो खुलेपणा ठेवूनही त्रासदायक प्रतिसाद कमीत कमी करण्यासाठी श्रेणी सुविधा ऐसी अक्षरेवर परिणामकारकरीत्या वापरली जाते. सर्वच लेखन येऊ देऊन त्यातलं निवडक थोडं जपून ठेवण्याची व्यवस्था तारका देऊन आरकाइव्हच्या स्वरूपात केली जाते. आमच्या मते तुम्हाला निखळ आनंदासाठी चांगलं वाचायचं असेल तर मुख्य पानावर न येता केवळ निवडक विभागात जावं. जर मुख्य पानावर लेखन करायचं असेल तर कौतुक व रास्त टीका याला सामोरं जायची तयारी असायलाच हवी. घरीच बसलं तर कसेही बेंगरूळ कपडे घालून चालतं, पण रस्त्यावर, पार्टीला जायचं असेल तर आपल्या नीटनेटकेपणाबद्दल टीका होण्याची तयारी सगळेच ठेवतात. यात काही जगावेगळं नाही.
मानधन देणं ही उत्तम कल्पना आहे. तत्वतः मान्य पण सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही असं दिसतं. तुम्ही जर पैसे देऊन संस्थळाची मेंबरशिप घेणारे १००० लोक मिळवून दिलेत तर उद्यापासून उत्तम लेखांना आणि संपादकांना पैसे देण्याची व्यवस्था करू.
तिसरा उपाय, म्हणजे महिलांसाठी वेगळा विभाग - ट्रेनची उपमा इथे लागू होत नाही. ट्रेनमध्ये नाईलाजाने येणं होतं. आणि बेसुमार गर्दीत जे काही गैरफायदे घेतले जातात त्यांची तुलना इथे करणं म्हणजे तिथे होणाऱ्या छळाचं क्षुद्रीकरण (ट्रिव्हियलायझेशन) आहे. इथे स्त्रियांसाठी होणारे 'अनुचित' प्रकार सर्वसामान्य तिऱ्हाइतांच्या संभाषणांत घडतात त्यापलिकडे घडत नाहीत. होत असल्यास जरूर दाखवून द्या. त्यामुळे हे पुरुष काहीतरी रासवट बोलतात, ते कानावर पडून त्यांच्या कोमल मनावर वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी गोडगुलाबी विभाग काढून द्यावा ही थोडी कॉंडेस्सेंडिंग (तुच्छतादर्शक?) पॅट्रिआर्किअल भूमिका वाटते.
श्री.गुगळे यांचे हे गृहितक
श्री.गुगळे यांचे हे गृहितक स्वीकारणारे जे कुणी सदस्य आहेत/असतील त्यामध्ये मी आहे हे मी थेटच सांगतो.
मी इथल्या - ऐसी अक्षरे - काही लेखांचे नाव न घेता म्हणू शकतो की इच्छा आणि काही प्रमाणात अभ्यास असूनही तिथे प्रतिसाद देण्याचे विचार आयत्यावेळी मी बदलले आणि केवळ काही काळ 'वाचनमात्र' च राहिलो. त्याला कारणही माझ्या प्रतिसादामुळे येऊ शकणार्या प्रतिसादामुळे काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार याची (सार्थ) भीती वाटत असल्याने ते सारेच टाळणे मला गरजेचे वाटले. श्री.गुगळे म्हणतात तसे "जुगार न खेळणेच उत्तम".
याच गटात मी सुद्धा येते. मराठी आंजावर सर्वसाधारणपणे अव्यक्त राहणेच मी पसंत करते. मी मराठी आंजावर येण्याचे मुख्य कारण माझी वाचनाची आवड.. ती वाचनमात्र राहूनही पुरविता येते. शिवाय काही काळ ( माझ्या बाबतीत अनेक वर्षे ) वाचनमात्र राहिल्यानंतर कोण लेखक / लेखिका दर्जेदार लिहितात याची बर्यापैकी जाणीव / ओळख झाली आहे आणि आता मला माझे वाचन जास्ती नेमके ( selective) करता येते व कमी वेळात देखिल (माझ्यासाठी ) उच्च कोटीचा आनंद मिळविता येतो. आजचे मराठी आंजावरील वातावरण बघता काही लोकांशी परिचय वा मैत्री व्हावी (व्यक्तिला न पाहता / प्रत्यक्ष भेट न होताही केवळ त्या व्यक्तिचे लेखन वाचून आदर वाटावा असे)असे जरी वाटले तरी मी प्रतिसादाखेरीज काही लिहीन असे वाटत नाही.
लेख बराच मोठा आहेत, अनेक
लेख बराच मोठा आहेत, अनेक मुद्दे आहेत आणि त्याबद्दल सवडीने प्रतिसाद देईन.
पैकी काही मुद्दे:
१. महिलांसाठी असा वेगळा विभाग काढावा असं मलाही अजिबात वाटत नाही. कारणं राजेशने दिलेली आहेत तीच + खांद्यावरच्या भागाला त्रास देण्याचा प्रश्न येतो तेव्हा स्त्री-पुरूष भेद आणि/किंवा आरक्षण मला अजिबात मान्य नाही. पुरूषांची आणि स्त्रियांची शरीरं फक्त वेगळी असतात; पण म्हणून गायनॅकॉलॉजी हा विषयही अभ्यासाचा विचार करता स्त्रियांपुरता मर्यादित नाही.
२. वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांना वेगवेगळ्या प्रवृत्तीची संस्थळं आवडणार यात काही संशय नाही. चांगल्या लेखकांनी आपल्याही संस्थळावर लिहावं असं सर्व मालक, व्यवस्थापक आणि सदस्यांना वाटतं यातही काही आश्चर्य नाही. पण संस्थळांवर लिखाणच करणार नाही अशा सुज्ञ (वाचन आणि विचार करणारे सर्व) सदस्यांनी कोणत्यातरी संस्थळावर आपलं असं लेखन करावं असं निश्चित वाटतं.
--(सामान्य सभासद) अदिती
अमूक एक संस्थळ कसं आहे याबद्दल काही वाईट मतं असतील तर ती त्या-त्या संस्थळांवरही मांडावीत (आणि त्यावरच्या भल्याबुर्या टिप्पणीलाही सामोरं जावं) अशी अपेक्षा आहे. प्रशंसा कोणाचीही करणार असलात तर अडचण नाही.
-- (ऐसी अक्षरे वरील मॉडरेटर+सभासद) अदिती
श्रावणचा मुद्दा: इतरांनी पाठवलेली पत्रे आणि आपण इतरांना लिहीलेली पत्रे यांच्याबद्दल सुनीताबाईंनी काहीएक कठोर आणि खंबीर भूमिका घेतलेली होती, जीएंच्या पत्रांसंदर्भात. आता नेमका तपशील आठवत नाही, पण त्यांनी स्वतःला आलेली पत्र प्रकाशित होऊ दिली नाहीत, स्वतः लिहीलेली होऊ दिली. हा एका वेगळ्या चर्चेचा विषय दिसतो. कुणी स्वयंसेवक आहे का, चर्चा सुरू करून पुढे चालवायला?
मी सध्या स्त्री स्वातंत्र्यात बिझी आहे. ;-)
विचारपूर्वक लिहिलेला लेख आहे
लेख विचारपूर्वक लिहिलेला आहे, आणि मुद्देसुद्धा चांगले आहेत.
संकेतस्थळाची ओळख तयार करण्यात संपादनधोरणे फार महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट काहीशी नशिबा बाब आहे. ती म्हणजे सुरुवातीला येणार्या बीजरूपी सदस्यांची जडणघडण : नवजात संकेतस्थळाला जिवंत राहायचे असेल, तर सुरुवातीच्या सक्रिय सदस्यांच्या ("कंपू"च्या) कलाकलाने घ्यावे लागते, आणि वहिवाटीप्रमाणे हेच धोरण होते, ओळख ठरते.
टिप्पणी १ : मराठी संकेतस्थळावर राहून आर्थिक नफा-तोटा झालेले लोक माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. कलम १ अपवादात्मक सदस्यांना लागू असले, तरी लागू तर आहेच.
टिप्पणी १.१ (उगीचच आपला लक्षात आलेला तपशील) "नाडीपट्टी"चा उल्लेख कलम १ ऐवजी कलम ३ मध्ये केलेला दिसतो.
विचारपूर्वक पण अगदीच एकांगी
विचारपूर्वक पण अगदीच एकांगी भूमिकेतून लिहिलेला लेख आहे असे मत नोंदवतो.
लेखकाचा समग्र विचार व अभिनिवेष एखाद्या लेखनाला लोकांनी स्तुतीपर प्रतिक्रीया दिल्या नाहीत तरी चालतील पण निदान टीका करणार्या अथवा मनस्ताप देणार्या तरी देउ नयेत असा सूर दिसतो. यातील एक धोका इथेच दर्शवतो पण तो एका मोठ्या वेगळ्या चर्चेचा विषय होईल.
जेव्हा असा आग्रह धरला जातो की "किमान प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ नयेत", त्याचे नेक्स्ट लॉजीकल एक्स्टेंशन निश्चीतच असे आहे की अनुकूल प्रतिक्रीयाच याव्यात, आणि त्याचेही नेक्स्ट लॉजीकल एक्स्टेंशन अगदी पुढील आग्रही वाक्यांपर्यंही जाऊ शकते.
'अमुक सदस्यांकडूनच अनुकूल प्रतिक्रीया याव्यात'
'प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये 'अप्रतिम लेखन' असा शब्द प्रयोग असायलाच हवा'
'रोज ३८ प्रतिक्रीया यायलाच हव्यात' वगैरे वगैरे, ....
हे सार्वजनिक फोरम्सच्या मूळ तत्त्वांशी विसंगत आहे असे मला वाटते.
मनस्तापाचा मुद्दा चर्चिला गेल्यास असे लक्षात येइल, की मनस्ताप होण्याची कारणे व टॉलरन्स वेगवेगळी असू शकतात, उदाहरणार्थ चेसुगू यांना त्यांचे नाव पुर्ण न लिहिल्याचा मनस्ताप होऊ शकेल, अथवा नावाचे लघुरूप वापरल्याचा मनस्ताप होऊ शकेल.
तर इतर कुणा सदस्याला 'काय साहेब' असे म्हणल्याचाही मनस्ताप होऊ शकेल
आणखी कुणाला 'फार बाळबोध लेख आहेत ब्वॉ तुमचे' या वाक्याचा त्रास होईल तर कुणाला हेच भूषणावह वाटू शकेल.
आदितीला 'कित्ती कित्ती देवभोळी व सालस आहेस ग तू' याचा प्रचंड मनस्ताप होईल तर कुणाला तेच अगदी सुखावणारे ही वाटेल ;)
तस्मात, मनस्ताप ही संकल्पना सापेक्ष आहे, पण तरीही मनस्ताप या गोष्टीचा बागुलबुवा करून प्रत्येक फोरममधून निघून जायचे ठरवले तर आपण इतर अनेक चांगल्या गोष्टींना मुकू शकतो असा माझा आपला बापुडवाणा समज आहे.
+१
मूळ लेख अजूनही संपूर्ण वाचून झालेला नाही.
मनस्ताप या गोष्टीचा बागुलबुवा करून प्रत्येक फोरममधून निघून जायचे ठरवले तर आपण इतर अनेक चांगल्या गोष्टींना मुकू शकतो
सहमत आहे.
प्रत्येकाला आपली मतं (सभ्यपणे) मांडण्यासाठी व्यासपीठ असावे आणि समान वागणूक देताना मतं काय आहेत याबद्दल अजिबात विचार करू नये. आपल्या मताविरोधात आलेला प्रतिसादही अभिव्यक्तीस्वातंत्र्य असणार्या व्यासपीठावर दिसणार. त्याचा मनस्ताप करून घेऊ नये.
गुगळेंचा मुद्दा इतर ठिकाणी संपादन कसे आहे त्यात मला फारसा रस नाही. प्रत्येक संस्थळाच्या मालक, चालक, प्रवर्तकांची काही मूल्ये आहेत; इतर संस्थळांच्या मालकांचा त्या मूल्यांवरच विश्वास असावा अशी सक्ती का?
आदितीला 'कित्ती कित्ती देवभोळी व सालस आहेस ग तू' याचा प्रचंड मनस्ताप होईल
कोण म्हणतंय त्यावर अवलंबून आहे, पण बहुदा नाहीच.
अजून एक पर्याय
मनस्ताप या गोष्टीचा बागुलबुवा करून प्रत्येक फोरममधून निघून जायचे ठरवले तर आपण इतर अनेक चांगल्या गोष्टींना मुकू शकतो >>
म्हणजे नेमकं कोण मुकणार? ज्याला मनस्ताप करून घ्यायचा नाही व त्यामुळे तो संस्थळावर सक्रिय होऊ इच्छित नाही असा सदस्य की त्या सदस्याच्या उदासीन राहण्यामुळे त्याचं ले़खन (स्वतंत्र व प्रतिसादात्मक असं दोन्ही प्रकारचं) वाचण्यास न मिळालेले इतर सदस्य? तो सदस्य संस्थळावरील विविध प्रकारच्या आनंदास मुकतोय असं तुमचं म्हणणं असेल तर त्याविषयी इतर लोक सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज काय करू शकतात?
पण तो खरोखरच असं काही तरी लिहीतोय जे आपल्या इतर सदस्यांना वाचायला मिळावं अशी संपादकांची इच्छा असेल तर ते बरंच काही करू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे त्या सदस्यास प्रोटेक्टेड (संरक्षित) स्वरूपात संस्थळावर आणणे. याबाबत माझाच एक अनुभव सांगतो. पूर्वी मी ऑर्कूट वरील मुक्तपीठ या कम्युनिटीवर लेखन करायचो. अनेकदा मनस्ताप देणार्या प्रतिक्रिया येत. त्यास कंटाळून मी तिथे लेखन करणे सोडून दिले. त्यानंतर मी स्वतःच्या ब्लॉगवर तसेच प्रमोद देव व कांचन कराई यांच्या ई-अंकांत माझे लेखन प्रकाशित करु लागलो. तसेच या प्रकाशित साहित्याच्या लिंक्स गुगल बझ्झवरही देऊ लागलो. गुगल बझ्झ वरील लिंक्स पाहून मला मुक्तपीठच्या मॉडरेटर सौ. श्रद्धा सौंदीकर यांनी सदर साहित्य मुक्तपीठवर प्रकाशित करण्यास सूचविले. मी त्यांना येथे पूर्वी मनस्ताप झाला होता असे सांगितले. त्यावर त्यांनी आता असे काही होणार नाही मी स्वतः लक्ष देईन असे आश्वासन दिले. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी लेख प्रकाशित केला. लगेचच दोन वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या की आता इथे अवांतर व फालतू प्रतिक्रिया येतील आणि संध्याकाळ पर्यंत हा लेख उडविला जाईल. मी तिथेच खाली माझे प्रत्युत्तर दिले की सदर लेख मॉडरेटरच्या विशेष सूचनेवरूनच इथे प्रकाशित झालेला आहे. माझ्या या वाक्यांचा योग्य तो परिणाम जाणवला. भरकटणारे प्रतिसाद आलेच नाहीत. मुद्देसूद चर्चा झाली व लेखन प्रकाशित केल्याचा मला जराही मनस्ताप झाला नाही.
मराठी संस्थळांनीही अशाच पद्धतीने काही निवडक सदस्यांना (स्त्री, पुरूष असे दोन्ही प्रकारचे जे की केवळ मनस्ताप होईल या एकमेव हेतूने अनेकदा लेखन व प्रतिक्रिया देणे टाळतात (वाचा श्री. अशोक पाटील यांचा याच धाग्यावरील प्रतिसाद)) संरक्षित स्वरूपात संस्थळावर प्रमोट करावे. वेगळा विभाग अथवा वेगळे संस्थळ काढण्यापेक्षा हा कधीही एक मध्यम मार्गी पर्याय आहे.
एक गंमत आठवली. साधारण मी
एक गंमत आठवली. साधारण मी प्राथमिक शाळेत असेन तेव्हाची. आमच्या बिल्डींगच्या समोर बर्यापैकी मोठी मोकळी जागा होती. बिल्डींगमधली, आजूबाजूची, भेटायला आलेली, अशी बरीच पोरंटोरं तिथे खेळायला जमायची. माझ्यापेक्षा वयाने सात-आठ वर्षांनी मोठे ते दोन-तीन वर्षांनी लहान असा बराच मोठा वयोगट. आमची भांडणंही चिक्कार व्हायची. कधी तक्रार घेऊन कोणत्याही पालकाकडे गेलं की त्या सगळ्यांचं एकच उत्तर असायचं, "तुमची भांडणं तुम्ही सोडवा. अपशब्द वापरले किंवा आपल्यापेक्षा अगदी लहान मुलांशी मारामारी केलीत तर जो कोणी असं करेल त्याचं खेळणं बंद करून टाकू."
रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी अगदी आमच्या आधीच्या पिढीतलेही काही लोकंही खेळायला आमच्यातच यायचे. आणि कोणाचंही खेळणं बंद करण्याची वेळही कधी आली नाही.
तशी वेळ येणारच नाही.
आणि कोणाचंही खेळणं बंद करण्याची वेळही कधी आली नाही. >>
नक्कीच तशी वेळ येतच नाही, कारण या नियमानुसार ज्यांचं खेळणं बंद होण्याची शक्यता आहे असे लोक आधीच खेळात सहभागी व्हायचं नाकारतात. बाकी तुम्ही लिहीलेल्या गंमतीवरून मलाही एक गंभीर किस्सा आठवला. मी प्राथमिक शाळेत (इयत्ता ४ थी) असताना शालेय सहलीला गेलो असता तिथे आमच्यातल्याच काही टारगट विद्द्यार्थ्यांनी एकेकाला 'बकरा' करून चिडवायला सुरूवात केली. थोड्या वेळात त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळविला. मला आडनावावरून आणि जातीवरू़न (चिक्कू मारवाड्या असे) चिडवायला सुरूवात केली. मी दूर एका झाडाखाली जाउन थांबलो. ते माझ्याकडे येऊ लागल्यावर मी माझ्या हातात असलेली लांब पट्ट्याची वॉटरबॅग आणि स्टीलचा मोठे हँडल असलेला जेवणाचा डब्बा यांना एकमेकात अडकवून वॉटरबॅगचा पट्टा जोरात फिरवायला सुरूवात केली. हेतू हा की आता माझ्या या वर्तूळात येतून मला त्रास देऊ नका. तरी एक जण आलाच. अपेक्षेप्रमाणे त्याला स्टीलच्या डब्याचा जोरदार फटका बसून त्याचे डोके फुटले. शिक्षकांनी मग धावपळ करून त्याला योग्य ते उपचार करून बरे केले. त्या मुलालाही आपली चूक असल्याचे मान्य होते त्यामुळे आमच्यात काही वैर निर्माण झाले नाही. शिवाय चौथीतच असल्यामुळे शिक्षकांनीही माझ्यावर काही दंडात्मक कारवाई केली नाही, फक्त घडला प्रकार वर्गशिक्षिकेने घरी येऊन आईच्या कानावर घातला. परिणाम एवढाच झाला की आईने पुढे मला दहावीपर्यंत कधीच शालेय सहलीस पाठविले नाही.
प्रत्येक इयत्तेत शालेय सहल ज्या ठिकाणी जाऊन आली असेल त्या परिसरात माझे आईवडील मला त्यांच्या सोयीने काही दिवसानंतर घेऊन जात. सुरूवातीला थोडे वाईट वाटले पण नंतर निरीक्षणांती असे लक्षात आले की, दरवर्षी सहलीत कुणा न कुणासोबत असे प्रकार घडतातच. फक्त आता आपण त्यांच्यात नसल्यामुळे आपल्यावर ती वेळ येत नाही ही एक प्रकारे समाधानाचीच बाब आहे.
जिथे आपला वाद होतो / होण्याची शक्यता आहे अशां लोकांना / परिस्थितीला होता होईतो टाळावे हा माझा स्वभाव बनला.
<< आता मनोगत, उपक्रमवर संपादन
आता मनोगत, उपक्रमवर संपादन टाईट आहे तर मिसळपाववर एकदम लूज. त्यामुळे मिसळपाववर काहीही लिहा किमान दोन आकडी प्रतिसाद येणारच व अनेकदा फालतू एकोळी धाग्यांनीही अवांतर प्रतिसादांसह शतक गाठलेले दिसून येते. त्यामुळे त्या संस्थळाची सदस्यसंख्याही वाढत चाललेली दिसते. परंतु ही सूज आहे. अनेक आयडी हे मृत, सुप्त, निष्क्रिय व बरेचसे बोगस देखील आहेत. ऐसीअक्षरेवरही अनेकदा ढिले संपादन, श्रेणी देण्याच्या प्रकारात पक्षपात असे प्रकार दिसून येत आहेत. >>
यात दुस-या संस्थळावर टीका नाही असे कसे म्हणता येईल? आहेच ती. ठीक आहे, टीका नाही तरी मतप्रदर्शन आहे आणि ते काही अनुकूल नाही फारसे. त्यामुळे उपक्रमच्या संपादकांना ही दुस-या संस्थळावर टीका आहे असे वाटले तर मला ते योग्यच वाटते. ती छापावी की नाही हा भाग वेगळा, पण टीका नाही असे म्हणणे अवघड.
मुद्दा क्रमांक २ विषयी जमल्यास फोन अथवा ईमेलवर संवाद साधूयात. (संकेतस्थळावरील वैयक्तिक निरोप हा भागही तितकासा गोपनीय नाही असा अनुभव मला यापूर्वी मिसळपाववर आला असल्याने आता पुन्हा ती जोखीम पत्करायची इच्छा नाहीये.)>>
असं तुम्ही अशोक पाटील यांना दिलेल्या प्रतिसादात लिहिलत. ते पटलं. पण मग उपक्रमनेही तुम्हाला व्यनि पाठवण्यात जोखीम घेतली, असच म्हणावं लागेल. आपण पाठवलेले व्यनि जाहीर करणं ही एक वेगळी बाब आहे आणि आपल्याला दुस-यांनी पाठवलेले व्यनि आपण जाहीर करणं (यासाठी आपण त्यांची परवानगी घेतली असल्यास बाब वेगळी) -ही गोष्ट वेगळी.
सहमत
आता मनोगत, उपक्रमवर संपादन टाईट आहे तर मिसळपाववर एकदम लूज. त्यामुळे मिसळपाववर काहीही लिहा किमान दोन आकडी प्रतिसाद येणारच व अनेकदा फालतू एकोळी धाग्यांनीही अवांतर प्रतिसादांसह शतक गाठलेले दिसून येते. त्यामुळे त्या संस्थळाची सदस्यसंख्याही वाढत चाललेली दिसते. परंतु ही सूज आहे. अनेक आयडी हे मृत, सुप्त, निष्क्रिय व बरेचसे बोगस देखील आहेत. ऐसीअक्षरेवरही अनेकदा ढिले संपादन, श्रेणी देण्याच्या प्रकारात पक्षपात असे प्रकार दिसून येत आहेत.यात दुस-या संस्थळावर टीका नाही असे कसे म्हणता येईल? आहेच ती. ठीक आहे, टीका नाही तरी मतप्रदर्शन आहे आणि ते काही अनुकूल नाही फारसे. त्यामुळे उपक्रमच्या संपादकांना ही दुस-या संस्थळावर टीका आहे असे वाटले तर मला ते योग्यच वाटते. ती छापावी की नाही हा भाग वेगळा, पण टीका नाही असे म्हणणे अवघड.
गुगळे यांच्या विधानाचा विचार करू. पहिल्या वाक्यात त्यांचे मत (किंवा दावा, आरोप) आहे. दुसऱ्या वाक्यात त्यांच्या अभ्यासातून दिसणारे तथ्य (किंवा दावा, आरोप) आहे. तिसऱ्या वाक्यात त्यांचे निरिक्षण आहे. चौथ्या वाक्यात त्यांनी तिसऱ्या वाक्यावरून काढलेला अन्वयार्थ आहे. पाचव्या वाक्यात गुगळे यांचा दावा (किंवा आरोप) आहे. सहाव्या वाक्यात गुगळे यांचा दावा (किंवा आरोप) असा आहे.
आता या संदर्भात गुगळे यांना 'उपक्रम'च्या संपादकांनी पाठवलेला निरोप पाहावा:
फायदा आणि तोटा हे आपले लेखन मुद्देसूद आणि उपक्रमाच्या तोडीचे असले तरी त्यातील काही वाक्यांतून इतर संकेतस्थळांची बदनामी होत आहे असे लक्षात येते.
गुगळे यांच्या वाक्यांतून त्या संस्थळांची बदनामी होत असेल तर प्रत्येक टीका ही बदनामी ठरू शकेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चौकट यातून समजून घेता येते. ;)
फरक समजून घ्या
सविताजी,
आपण दोन अतिशय वेगळ्या बाबींची गल्लत करीत आहात असे मला वाटते.
पाठविणारा + स्वीकारणारा या दोघांव्यतिरिक्त (व त्या दोघांच्या नकळत) कुणा तिसर्यापर्यंत (केवळ त्यास उपलब्ध असणार्या तांत्रिक अधिकाराच्या जोरावर) जर व्यक्तिगत निरोप पोचत असेल तर त्यास काय म्हणावे? संभाषण गळती असे नक्कीच म्हणता येईल. मला मिसळपाव वर असा अनुभव आला आहे. त्यामुळेच गोपनीय व खासगी संवादाकरिता फोन वा इमेलचा वापर जास्त सुरक्षित आहे असे मी पाटील साहेबांना सूचविले.
मला उपक्रमने व्यनि पाठविण्यात जोखीम घेतली असं कसं म्हणता येईल? जे उपक्रमचं धोरण आहे (त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे) ते त्यांनी मला व्यक्तिगत रीत्या पाठविलं आणि मी ते जाहीर रीत्या मांडलं इतकंच. त्यात मी त्यांची कुठलीही गोपनीय बाब उघड केलेली नाही. गंमत म्हणजे अशा प्रकारे काही मजकूर त्यांच्या धोरणात बसत नसेल तर ते तो मजकूर तिथेच संपादित करतात आणि ठळक अक्षरात तो मजकूर धोरणात बसत नसल्याने संपादित केल्याचेही लिहीतात. माझ्या लेखाच्या बाबतीत त्यांनी असं न करता संपूर्ण लेखच अप्रकाशित केला (कारण त्यांची लांबी मोठी आहे व त्यांना इतका मजकूर संपादन करणे शक्य नाहीये असं त्यांनी त्यांच्या पुढच्या निरोपात म्हंटलंय). म्हणजेच जी गोष्ट ते जाहीर रीत्या तिथे मांडणार होते तीच गोष्ट त्यांनी तो धागाच उरला नसल्याने मला व्यक्तिगत निरोपात पाठविले. म्हणजे तांत्रिक रीत्या तो एक व्यक्तिगत निरोप असला तरी त्यात खासगी व गोपनीय असं काहीच नव्हतं. निदान आता यापुढे ज्या कुणी हा उघड झालेला वैयक्तिक निरोप वाचला आहे ते त्यांच्या धोरणाशी विसंगत लेख तिथे प्रकाशित करणार नाहीत. उलट एका प्रकारे मी उपक्रम संपादक मंडळाचे श्रमच वाचविले आहेत असंच मला वाटतं. अर्थात तरीही मला आलेला हा व्यक्तिगत निरोप (जो की काहीसा तंबीवजा आहे) इथे मांडणे फारसे भूषणावह आहे असे नक्कीच नाही. तरीही मी तो तसा मांडलाय कारण श्रीयूत श्रावण मोडक यांनी मला जाहीर रीत्या हा लेख उपक्रम वर मांडण्याची सूचना केली आहे. त्यांच्या तशा सूचनेनंतर काही उलटून गेल्यावरही तो लेख तिथे प्रकाशित झालेला दिसला नाही तर मी त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सभासदाची सूचना धूडकावून लावत आहे व त्यांचा अपमान करीत आहे असा त्यांचा अथवा इतर सदस्यांचाही गैरसमज होण्याची शक्यता आहे. तसा तो होवू नये व त्यांस वस्तुस्थिती समजावी (म्हणजे मी लेख प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो नाकारला गेला वगैरे वगैरे) याच कारणास्तव मला तो निरोप उघड करावा लागला.
(तूलने करिता असे म्हणू की पाटील साहेब फोनवर माझ्यासोबत काय बोलले हे मी इतरांना सांगणे वेगळे आणि इतर कोणी आमच्या दोघांचे संभाषण टेलीफोन टॅपींग करून ऐकणे यात जो फरक आहे तोच फरक वर आपण ज्या दोन बाबींची तूलना करीत आहात त्या दोन बाबींमध्ये आहे)
वा:
आपण पाठवलेले व्यनि जाहीर करणं ही एक वेगळी बाब आहे आणि आपल्याला दुस-यांनी पाठवलेले व्यनि आपण जाहीर करणं (यासाठी आपण त्यांची परवानगी घेतली असल्यास बाब वेगळी) -ही गोष्ट वेगळी.
खरडवही आणि व्यनी मध्ये फारसा फरक न उरलेल्या आजच्या जमान्यात हे विचार खरेच आदर्श आहेत.
लेख वाचतो आहे.
पण तुर्तास संकेतस्थळांच्या संवेदनशीलतेबद्दल एक मत नोंदवतो.
गुगळेंनी अनेक स्थळांबद्दल त्यांची मते आणि निरीक्षणे नोंदवलेली आहेत. असे असताना इतर संस्थळांची निंदा हा त्यांचावरचा आरोप पटत नाही. त्याशिवाय, उपक्रमावर दुसर्या संस्थळांची टिका हा काही त्याज्य विषय१ नाही हे मी अनुभवाने जाणतो. असे असताना उपक्रमावर जर इतर संस्थळांची टिका करण्यांवर कारवाई करण्याची सुरुवात होणार असेल तर मात्र एक 'वेलकम चेंज' असे म्हणतो.२
१. सदर टिका ही अनेकदा दिसते आणि संपादीत होत नाही यावरून काढलेला निष्कर्ष
२. या प्रकारचे मत मी पूर्वीही उपक्रमावरच नोंदवलेले आहे. त्यामुळे इथे दिलेला प्रतिसाद ही 'इतर संस्थळाची टिका' या सदरात गणला जाणार नाही अशी अपेक्षा!
उपक्रमावरील नोंदवलेले मतः एखाद्या संस्थळाची आणी तूमची वेव्हलेंथ जर जमत नसेल (आणि म्हणून तूम्ही ते सोडले वा बॅन झालात), तर अशा वेळी सतत दूसरीकडे जाऊन त्या संस्थळाला कमी लेखणे माझ्या मते 'चाईल्डिश' आहे. (कधीतरी, काही कारणास्तव* वा अन्याय झाला म्हणून विरोधकरण्यासाठी, संस्थळावर टीका करणे, त्रूटी दाखवण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.)
*कारण स्वतःला जस्टिफाय करता येत असेल तर ठीक, कारणं शोधून काढणं अवघड नसेलही. पण स्वतःशी अप्रामाणिक कारणं आहेत का हे ज्याचेत्याने ठरवावे.
वाचून दमलो
वाचून दमलो. पण लेख चांगला आहे.बरेच कष्ट घेतले आहेत. अप्रत्यक्ष लाभांबद्दल अजुन सांगायचे झाल्यास एखादेच घबाड मिळते व सर्वांची कसर भरुन काढते. अशा प्रकारच्या मार्केटिंग मधे गुंतवणुकिच्या मानाने मिळालेला परतावा अधिक असतो. स्त्री पुरुष असे भेद हे प्रतिमांच्या सरासरीचे आहेत हे लक्षात घेतले तर मुद्दे समजायला सोपे जातात.
बाकी स्वांत सुखाय लेखन खरे उत्तम. जो देगा उसका भी भला जो नही देगा उसका भी भला!