नैनं छिन्दन्ति शस्त्राणि

"तू फेसबुकवर जी कॉमेंट लिहिली आहेस, त्यामुळे तुझ्यावर बदनामीचा दावा ठोकता येऊ शकतो." एक मित्र मला फोनवर म्हणाला.
"बरोबर आहे तुझं. पण आता त्यानेच फेसबुकवर मेसेज टाकून आपल्या कृत्याची कबुली दिलेली आहे. तो प्रश्नच नाही. पण ही कॉमेंट लिहिताना मला ट्रंपवर आरोप करणाऱ्या बारा स्त्रियांबद्दल प्रचंड आदर वाटला. त्यांनी ज्या माणसावर आरोप केला तो माणूस प्रचंड श्रीमंत आहे आणि अमेरिकेतच राहतो. मी ज्याच्यावर आरोप केला तो माझ्याच आर्थिक गटातला आहे आणि भारतात राहतो. त्याने माझ्यावर दावा गुदरण्याची शक्यता किती, असा विचार मी मनात केला होता. असली 'गणितं' माझ्या डोक्यात कायमच होत असतात." मी उत्तर दिलं.
आणि उद्या फेसबुकाने ते मेसेजेस दाखवायचं बंद केलं तर, म्हणून मी त्याचे स्क्रीनशॉट्स जपून ठेवले आहेत.

मी चतुर, धोरणी, डँबिस, crooked, manipulative, तोंडाळ, आगाऊ आणि अतिशहाणी आहे याबद्दल मला अजिबात संशय नाही. मग तरीही त्या दोन पुरुषांनी मला माझ्या मर्जीविरोधात हात लावला होता, तेव्हा मी गप्प का बसले?

मी सोळा वर्षांची होते. चुलतबहिणीचं लग्न नुकतंच झालं होतं. आम्ही, मी आणि माझा भाऊ, तेव्हा बरेचदा काकांकडे राहायला जायचो. त्या दिवशी काका-काकू बाहेरगावी होते आणि फक्त तरुण पिढीच घरी होती. चुलतभाऊ, त्याची बायको, चुलतभावाचा मावसभाऊ आणि आम्ही दोघे. आतल्या बेडरुममध्ये चुलतभाऊ आणि त्याची बायको, बाहेरच्या खोलीत बाकीचे सगळे, अशी झोपण्याची तयारी. मला नेहमीप्रमाणे रात्री आडवं झाल्यावर अर्ध्या मिनिटात झोप लागली. त्यानंतर किती वेळ गेला माहीत नाही; मला जाग आली तेव्हा माझ्या शेजारी शिरीष - चुलतभावंडांचा मावसभाऊ - होता. त्याचा हात माझ्या अंगावरून फिरत होता. मला जाग आल्याचं लक्षात आल्यावर तो कुजबुजला, "मला असं आवडतं. मग झोप चांगली लागते." मी काहीही केलं नाही. १९९६ च्या उन्हाळ्यापासून, आत्तापर्यंत मी काहीही केलं नाही. एक छोटासा अपवाद - काही वर्षांनी, शिरीषबद्दल काही गोष्टी कानावर आल्या. भाऊ मला त्या गोष्टी सांगत होता. त्याचा सूर साधारण, 'काय माहीत, खरंच शिरीष बाईलवेडा आहे का नाही कोण जाणे' असा काहीसा. मी त्याला एवढंच म्हटलं, "मलाही शिरीषचा विचित्र अनुभव आहे." आणि काही बोलले नाही.

आत्ता, थोड्या वेळापूर्वी ह्या प्रकाराबद्दल, मी जवळच्या मित्रांना इमेल लिहिताना वाक्यं लिहिली - the first person who tried to grope me... no he didn't just try, he groped me. (Let me just face the facts.)

नेहमीची बचावाची स्ट्रॅटेजी - माझं काही वाकडं झालेलंच नाही. हेसुद्धा थोडं वेडंवाकडंच. माझं काही वाकडं झालं नाही, हे खरं आहे. त्या प्रकाराला आता २० वर्षं होत आली आणि माझं काहीही वाकडं झालेलं नाही. पण बचावात्मक भूमिकेतून असं म्हणावं, हे वाकडं झालेलं आहे. आज त्या गोष्टी सरळ करण्याची मला गरज वाटते.

मला तेव्हा गप्प बसायची काहीही गरज नव्हती. चुलतभावाच्या बायकोशी माझे संबंध बहीण, मैत्रीण असल्यासारखे आहेत. ज्या काही मोजक्या नातेवाईकांशी मला संपर्क राखावासा वाटतो, त्यांतली ती एक. मी तिलाही कधीही, काहीही बोलले नाही. भावाशी माझे मैत्रीचे संबंध अधिक, त्याला कधी काही सांगितलं नाही. आज वडील असते, तर मी तेव्हा त्यांना हे सांगितलं नाही, याबद्दल त्यांना वाईट वाटलं असतं; मला खात्री आहे. ह्या प्रसंगानंतर शिरीष आमच्याकडे अधेमधे येतच राहिला; मी काकांकडे जातच राहिले; पण मी लोकांकडे राहायला जाणं काही काळ कमी झालं होतं. वडलांनी बहुदा त्याचा अर्थ, टीनेजर मुलींचे बदलते विचार, म्हणून बघितलं असेल. किंवा त्यांच्या लक्षातही आलं नसेल.

त्या उन्हाळ्यात माझी दहावीची परीक्षा झाली होती. कॉलेजला गेले तेही शाळेला संलग्न असलेलं, गणवेश होता. मुलांनी मुलींशी बोलायचं नाही, असा नियम जरा शिथील झालेला, पण मराठी मध्यमवर्गीय संवेदना अगदी किंचितच कमी टोकदार. माझ्या वर्गात दोन मुलगे होते, ते आधीपासूनच ओळखीचे. इमारतीत राहणारा, ह्या लेखात उल्लेख असलेला राहुल (हे बदललेलं नाव आहे) आणि दुसरा शेजारच्या सोहोनींचा चुलतनातू - निरंजन. निरंजन माझ्याशी उघडउघड बोलायला लागला; मलासुद्धा गप्पा येतात, शिंकेसारख्या. त्यामुळे मीही काही खडूसपणा केला नाही. त्याच्याबरोबर त्याचे मित्र असायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हाही म.म.व. खडूसपणा मला फार मान्य नव्हता. त्यामुळे वर्गातल्या मुलांशी, सगळ्यांसमोर बोलणं नॉर्मल झालं. एकंदरच शिरीष प्रकाराचा माझ्यावर फार मोठा प्रभाव पडला, असं तेव्हाही वाटलं नाही.

आज मी हे सगळं लिहायला घेतलं कारण राहुल! त्यानेच त्याच्या कृत्याची कबुली फेसबुक मेसेजेसमध्ये दिलेली आहे.

१४ नोव्हेंबर २०१४ या दिवशी मी फेसबुकवर एक फोटो आणि त्याबद्दल माझे विचार लिहिले. दोन वर्षांनी फेसबुकने स्मरणरंजनाचं काम केलं; मी ते पोस्ट पुन्हा शेअर केलं. (ऐसीच्या भाषेत, मी तो धागा वर काढला.) त्या पोस्टचा मजकूर हा -
नेहरु

नंतर मिळालेल्या माहितीनुसार - हा फोटो भारतातल्या पहिल्या स्त्री-फोटोवार्ताहर होमाई व्यारावाला यांनी काढलेला आहे. या तपशिलामुळे मुख्य मुद्दा बदलत नाही. मूळ पोस्ट या नोंदीखाली तसंच ठेवलं आहे.

----

माझ्या (अपूर्ण) माहितीनुसार हा फोटो आँरी कार्तिअर-ब्रेसाँ* या फ्रेंच छायाचित्रकाराने काढलेला आहे. हा माणूस अतिशय कलात्मक, सुंदर फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध होता, (प्रसिद्ध अजूनही आहे).

पुरुषाने स्त्रीची सिगरेट पेटवणं, हे तत्कालीन युरोपमध्ये सभ्य आणि उच्चभ्रूपणाचं लक्षण मानलं जात असे. (आज याला बहुतेक स्त्रीवादी आणि कर्करोगविरोधक आक्षेप घेतील.) पण कार्तिअर-ब्रेसाँने हा फोटो सुंदर चित्र म्हणून काढला आणि प्रकाशित केला.

म्हणून मला गॅरी विनोग्रांड या प्रसिद्ध अमेरिकन छायाचित्रकाराचं एक वाक्य पुन्हा आठवलं आणि पटलं. त्याचा मथितार्थ असा -
समोरचं दृश्य सगळ्यांनाच दिसतं. छायाचित्रकाराचं कसब चित्राची फ्रेम निवडण्यात, जेणेकरून दिसतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं, कलात्मक, आपला दृष्टिकोन मांडणारं चित्र समोर ठेवता येईल.

निःसंशय, या चित्राकडे बघण्याचा कार्तिअर-ब्रेसाँचा दृष्टिकोन स्वच्छ होता. हे सगळे संदर्भ समजल्यावर मला हा फोटो आवडतो.

पण अशा कोणत्याही संदर्भाशिवाय, भारतीयांनी आजच्या काळात, आजच्या दिवशी हे चित्र दाखवणं कुचेष्टा वाटावी का? होय. विशेषतः अशी चित्रं प्रसारीत करणारे कडवे धार्मिक, उजव्या विचारसरणीचे, संघिष्ट आणि/किंवा नेहरूविरोधक असतील तर मला ते हीन विचारसरणीचं लक्षण वाटतं.

(कार्तिअर-ब्रेसाँबद्दल अभिजीत भाटलेकर यांनी डिजीटल दिवाळी २०१४ या अंकात एक सुंदर लेख लिहिला आहे. जरूर वाचा. दुवा)

*आँरी कार्तिअर-ब्रेसाँ याच्याबद्दल गूगल करायचं असल्यास हे स्पेलिंग : Henri Cartier-Bresson

(पोस्ट पूर्ण)

राहुलसकट त्यांचं संपूर्ण घर संघिष्ट आहे. मी संघाला नावं ठेवलेली त्याला आवडत नाहीत. मागे मी फेसबुकवर किंवा आमच्या शाळेतल्या वर्गाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर संघाला नावं ठेवत होते, तर 'तुझे वडील संघिष्ट होते', अशी आठवण मला राहुलने करून दिली होती. माझे वडील काय आणि कसे होते हे त्याने मला शिकवू नये; आणि ते संघिष्ट असण्याचा संबंध नाही कारण मी स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती आहे; असं सांगून मी त्याला असंबद्ध गोष्टी, भलत्या ठिकाणी उगाळायची गरज नाही हेही सांगितलं होतं. थोडक्यात, मी तोंडाळ आहे; प्रसंगी मी माझ्या वडलांशी वैचारिक विरोध प्रकट करत असे आणि त्यांनी त्यांचे विचार माझ्यावर लादले नाहीत; आणि आम्ही २० वर्षांचे असताना (आणि तेव्हाच्या कायद्यानुसार त्याला कन्सेन्टचा अधिकार नसताना) त्याने माझ्याशी माझ्या मर्जीविरोधात जी शारीरिक जवळीक केली होती, त्याचाही माझ्यावर काडीमात्र विपरीत परिणाम झालेला नाही.

तरीही मी ही गोष्ट आत्तापर्यंत कोणालाही सांगू शकले नव्हते. डॉनल्ड ट्रंपची 'अॅक्सेस हॉलिवूड'ची टेप, त्याने आपण असं वर्तन केलेलं नाही असं म्हणणं, त्यामुळे १२ स्त्रियांनी पुढे येऊन 'त्याने असं वर्तन केलं आहे', असं म्हणणं याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. खूप, चांगला परिणाम झाला. मी डोक्यात अनेकदा विचार करून झाला; मला जर पुन्हा कधी शिरीष भेटला तर मी त्याला नक्की विचारेन, "१६ वर्षांच्या मुलीशी, तिला होकार देण्याचा अधिकार नसतानाही, शारीरिक जवळीक करण्याबद्दल तुला कधी भीती वाटली नाही का? तुला कधी तरी स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली नाही का? तुझ्या अशा वर्तनामुळे लहान मुलीच्या भावविश्वात काय होत असेल, याची काही कल्पनाही करावी असं तुला वाटलं नाही का?" हे प्रश्न विचारताना त्याची बायको-मुलं समोर असावी का नसावी याबद्दल माझं मत अजून ठरलेलं नाही. या विषयावर पक्का विचार करून 'ऐसी'वर व्यवस्थित लिहायचं, असं मी ठरवलं. तेव्हा दिवाळी अंकाचं कामही होतं.

काल ही संधी मला राहुलने दिली. नेहरुंचा हा फोटो, इतर काही स्त्रियांबरोबर हास्यविनोद करतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध आहेत. राहुलला नेहरुंचं हे वर्तन पटत नाही. काल त्याने ही गोष्ट माझ्या भिंतीवर जाहीर केली. 'इतर दोन-तीन स्त्रियांचं चुंबन घेतानाचे त्यांचे फोटो आहेत, त्यांचं स्पष्टीकरण तू असंच देणार का', त्याने मला विचारलं. त्याच्याच शब्दांत, "Aditi Joshi your argument is for the sake of argument and without any tangible purpose".

(हा माझा अपमान आहे. त्याला काय वाटलं, पंधरा वर्षं मी गप्प बसले म्हणजे मी कधीही या गोष्टीबद्दल बोलू शकणार नाही? त्याला काय वाटतं, ट्रंप निवडणूक जिंकला म्हणजे त्याने ज्या-ज्या गोष्टी केल्या त्याला राजमान्यता मिळेल? ट्रंपच्या जिंकण्यामुळे मला फार काही फरक पडत नाही. ट्रंप जिंकू शकेल, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकेल, तो श्रीमंत तर आधीच आहे, हे माहीत असूनही त्या बारा स्त्रियांनी आपण होऊन ट्रंपवर आरोप करण्याचं धाडस केलं, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं वर्णन जगासमोर केलं, ही गोष्ट इतर स्त्रियांसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे. निवडणुकांचे निकाल भले डिजिटल छापाचे, जिंकले-हरले असे लागत असतील, माणसांवर होणारा परिणाम असा डिजिटल नसतो.)

मी राहुलला म्हटलं, "तू एका मुलीच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक जवळीक केली होतीस. तू संस्कृतीच्या गप्पा मारू नकोस. तुला कसलंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि मी तर असलं काहीही करणार नाही."
"कधी तरी तुला स्त्री-पुरुषांमधल्या मोकळ्या नात्यांबद्दल काही समजेल अशी अपेक्षा मी धरते."

माझा भाऊ हल्ली फेसबुकवर अॅक्टिव्ह झालाय. मी लगेच त्याला मेसेज पाठवला. काय घडलं आहे हे सांगितलं. या प्रकाराचा मला काडीमात्र त्रास होत नाही, याचा आवर्जून उल्लेख केला. घडलेली गोष्ट कोणालाही बदलता येणार नाहीये, त्याबद्दल मलाही कधी फार त्रास झाला नाही आणि आता त्याने करून घेऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा.

मग मलाच प्रश्न पडला. माझ्यासारखी आत्मविश्वास असलेली, फार भीडभाड न बाळगणारी आणि तोंडाळ बाई, ह्या प्रकारांबद्दल बोलायला एवढी वर्षं लावते, तर किती स्त्रिया असं ठामपणे म्हणू शकतील, की मला कधीही अवांच्छित स्पर्शांचा त्रास झालेला नाही.

कालच मी न्यूयॉर्करमधला resilienceबद्दलचा लेख वाचला. लेख वाचताना विचार केला, मी आहे resilient. माझी कातडी चांगली जाड आहे. बाहेरून मला कोणी, काही केलं, म्हटलं म्हणून माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणी माझ्या शरीराला इजा केली तरीही त्यामुळे मी बदलत नाही.

त्यामुळेच मी एवढी वर्षं गप्प बसले का? मी गप्प बसून काय मिळवलं; बोलून तरी काय मिळवत्ये?

जाहीररीत्या राहुलला असं म्हटल्यामुळे तो दुःखी झाला आहे; आणि हो, मी जाहीर बोलल्यावर त्याने खाजगीत माझी माफीही मागितली. एवढ्या वर्षांनंतर त्याचा बदला घ्यावा, वगैरे फिल्मी विचार मी करत नव्हते. मला माझी कामं आहेत, मला माझं आयुष्य जगायचं आहे. पण एक नवीन जाणीव झाली; मला वाटतं त्यापेक्षा मी फार जास्त ख्रिश्चन आहे. 'पहिला दगड कोणी मारायचा?' राहुलने नेहरुंवर चिखल उडवला नसता तर मीही त्याचं नाव जाहीररीत्या बद्दू केलं नसतं. त्याने माझ्या श्रद्धास्थानावर हल्ला केला, असं मला वाटून मी त्याची अंडीपिल्ली काढली का?

मला असं वाटत नाही. राहुल मोदीभक्त आहे; राहुल मुस्लिमद्वेष्टा आहे; स्वतः काचेच्या घरात राहूनही त्याला इतरांवर दगड फेकायला आवडतात (किंवा आवडायचे - Thank yours truly). पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण काहीही केलं तरी आपल्याला काही होत नाही असं त्याला वाटलं. ही मुलगी तेव्हा गप्प बसली, आता मी काहीही बोललं तरी चालेल असं त्याला वाटलं असेल. माझी मूल्यं त्याला समजली नाहीत, त्याला समजून घ्यायचीच नाहीत आणि तरीही, ज्या मूल्यांवरून तो नेहरुंचं मूल्यमापन करायला गेला, त्याच मूल्यांमध्ये त्याने भयंकर अनैतिक वर्तन केलेलं आहे.

त्याने माझ्याशी जे गैरवर्तन केलं त्याला कोणीही साक्षीदार नाही. तो एकदाच असं वागला, असं मला त्यानंतर खाजगीत म्हणाला. तो खोटं बोलतही नसेल, मला वाटतं. मला 'साईनफेल्ड'मधला जॉर्ज आठवला, "आपण खोटं बोलत आहोत असं आपल्याला वाटत नसेल, तर ते खोटं नसतं." नेहरुंवर चिखलफेक करताना, आपण दुटप्पी वर्तन करत आहोत, हे त्याला समजलंच नाही. तो माझ्याशी वाईट वागला, हा प्रसंग मला आठवतो याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केलं; मला आणखीही काही आठवतंय.

त्याला अजूनही कदाचित हे माहीत नसेल किंवा महत्त्वाचं वाटलंही नसेल. आम्ही एकाच इमारतीत लहानाचे मोठे झालो. एकाच वर्गात होतो. अनेकदा एकत्र अभ्यासाला बसायचो. मला पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा माझे कपडे खराब झाले. मी सातवीत होते. आईने मला आधीच पाळीबद्दल सांगितलं होतं, पण त्या संध्याकाळी आईने सांगेस्तोवर माझ्या लक्षात आलं नाही. रक्ताच्या डागांमुळे मी आतल्या खोलीत दोनदा कपडे बदलून आले; तेव्हा राहुल आणि मी बाहेरच्या खोलीत बसून, एकत्र विज्ञानाचा अभ्यास करत होतो. आमच्या घरी तिसरं कोणीच नव्हतं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

माझ्या victim आणि perpetrator* यामधील भूमिका अदलून बदलून केलेल्या आहेत्/झालेल्या आहेत. मला हा धागा फार अत्यंत अवघड वाटला. मला चट्टकन म्हणावसं वाटतय की राहुल तेजायला थोबाड फोडलं पाहीजे. पण आयुष्यात हे असे सडेतोड बोलण्याचा हक्क गमावलेला आहे. "i am guilty" चे ओझे आणि victim hood चा आक्रोश - दोन्ही भूमिका एकाच मनाला निभावणे अस्वस्थ करणारे आहे.
.
(१) असे लोक खरच असतात का जे की फक्त victim असतात perpetrator नसतात?
(२) असे लोक खरच असतात का जे की फक्त perpetrator असतात victim नसतात?
(३) का प्रत्येक perpetrator हा कधीतरी victim झालेला असतो?
(४) का पूर्वसुकृतानुसार एका जन्मातील perpetrator पुढे शिक्षा म्हणुन victim होतो?
.
हे सर्व फार क्लिष्ट आहे.

मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

* बाप रे हे सांगायचच राहीलं की कोणाचा विनयभंग वगैरे केलेला नाही पण अन्य संदर्भ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गोष्टी नेहमीच गंभीर असतात.1तेव्हा तुम्हाला बचावाची लिहिलेली strategy ( माझं काही वाकडं..) हि का होती ? काही लिहाल यावर ?2.आणि आता एवढया वर्षांनी वैचारिक मतभेद आल्यावर तुम्ही त्याचा भोंदूपणा स्पष्टपणे त्या घटनेने दाखवून दिलात हेही मला विशेष वाटते.या विषयावर जनरल खूप लिहिले जाते. पण स्वानुभव असलेले कमी त्याकरिता अभिनंदन . आणि हा विषय आणि सांस्कृतिक दुटप्पी दांभिक पणा याची सांगड ... खास !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

@ अदिती: अभिनंदन उशिरा का होईना स्पष्टंपणे व्यक्तीला बोलल्याबद्दल आणि अपराधाची जाणीव करून देण्याबद्दल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अदिती तै, तू त्या दोन्ही मुलांशी ( शिरीष आणि राहुल ) थोडी का होइना ओळख ठेवलीस, त्यांच्याशी बोलत राहिलीस. हे काही बरोबर केले नाहीस असे मला वाटते. तू जरी ह्या घटना जाहिर केल्या नाही तरी त्या दोघांशी उघड इघड संबंध तोडायला हवे होतेस. म्हणजे कमीत कमी त्यांना तरी मेसेज मिळाला असता. उदा शिरीष असेल त्या ठीकाणी, फंक्शन ला मी येणार नाही वगैरे.

तुझे असे न करण्यानी कदाचित असे झाले असेल की "आपण मुलीच्या मनाविरुद्ध पुढाकार घेतला तरी त्याची काहीच झळ आपल्याला सोसावी लागत नाही" असे त्यांचे मत झाले असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुतै, त्या घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा मला अपराधगंड नव्हता. आता कुठला यायला!

अण्णा, बरोबर आहे तुमचं. अजून विचार करण्याची आणि लिहिण्याची गरज आहे. आज बाकी काही विचार करणं शक्य नव्हतं म्हणून लिहून मोकळी झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुला अपराधगंड असायचे काही कारणच नाही. पण ज्यांना अपराधी वाटायला पाहिजे होते त्यांना तसे तू वाटुन दिले नाहीस इतकेच म्हणायचे होते.
त्या दोघांच्या मनातले विचार असे असु शकतात " अदितीसारखी निर्भीड मुलगी जर गप्प बसु शकते तर बाकीच्या मुलींच्या बाबतीत असा प्रयत्न करुन बघायला काहीच हरकत नाही"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एकाच लेखात, नेहरु ते ट्रंप आणि तुम्ही (कि लेखातील नायिका) ? नीट काही कळाले नाही. कोणी जरा उलगडून सांगीतले तर बरे होईल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहरूच्या फोटोचे निमित्त, ट्रंपच्या उदाहरणाशी लेखिकेच्या अनुभवाची समांतर तुलना अशी माझी समजूत लेख वाचून झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हा तो लेख!
आपल्याकडे या घटना बय्राचदा झाल्या आहेत पण कुजुबुज या पलिकडे जाऊ शकल्या नव्हत्या.आता फेसबुकामुळे उघड चर्चा होऊ लागल्या आहेत.सहसंमतीने च्याउम्याउ करणं वेगळं आणि गैरफायदा घेणं वेगळं हे महत्त्वाचे आहे.शिवाय काही वर्षांनी चर्चा घडवून डोक्यावर मुकुट चढवून घेण्याचा खटाटोप हाणून पाडलाय अदितिने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय काही वर्षांनी चर्चा घडवून डोक्यावर मुकुट चढवून घेण्याचा खटाटोप हाणून पाडलाय अदितिने.

सॉलिड्ड!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखांची नावं वाचत काल पुढे गेलो होतो काही अध्यात्मिक लिहिणाय्रा लेखकाचा समजून.मला ते दळण समजत नाही. नंतर क्लिष्ट लेख/गहन खफवर वाचून परत पाहिलं तर निसो नाही.
एक नात्यातली मुलगी २७-२८। "मला या पुरुषांचा इतका वाइट अनुभव आलाय - बस,ट्रेनमध्ये ~~~। लग्न न करण्याचं ठरवून टाकलय."
(* हिला कोण सांगणार हिचा बापच असा प्रसिद्ध होता ते?)
आता हे उगाच श्टोरी म्हणून लिहित नाही ,खरी गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते पाप त्या मुलीचं नाही. तिला त्याबद्दल शिक्षा देणं दुष्टपणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबर. पण एकाच घरातले दोन विरुद्ध अनुभव या दृष्टीने विचार आला.मनुष्यप्राणी हा कधीकधी मनुष्य होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://aisiakshare.com/node/1485

गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.

मनमध्ये लिखाणाची प्रचंड ताकद आहे पण या हनुमानाला कोण जांबुवंत सांगणार की "ऊठ आळस झटकुन लिही. तुझ्यात ही ताकद आहे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच वाईट घटना. त्या माणसाचे खरे नाव लिहिण्याची अजूनही भीती वाटते हेच आश्चर्य.
कधी कधी 'विचारी' जनांपेक्षा 'बदला' वगैरे वाली 'मवाली' मंडळी अनुकरणीय वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> त्या माणसाचे खरे नाव लिहिण्याची अजूनही भीती वाटते हेच आश्चर्य. <<

खरं नाव न लिहिण्यामागचं कारण भीती हे होतं असा निष्कर्ष नक्की कशावरून काढला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काका, माझ्या निष्कर्षाबद्दलची चर्चा इतकी महत्वाची आहे का ?
माझा निष्कर्ष चुकीचा असेल तर मला आनंद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माझ्या निष्कर्षाबद्दलची चर्चा इतकी महत्वाची आहे का ?<<

धागालेखिकेला आज त्या व्यक्तींची भीती वाटते आहे असं मला अजिबातच वाटलं नाही म्हणून तुमच्या निष्कर्षाविषयी कुतूहल वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाय द वे, वय १६ आणि वय २०(हे तर खूपच झाले) मधे अशी घटना घडून देखील जर एफआयआर नोंदवली नसेल तर इतर वेळी 'पुरुषी मानसिकता','फेमिनिस्टपणा' वगैरेंबद्दल 'आंतर जालीय शौर्य' गाजवणे हा स्व्तःलाच फसवण्याचा कळस म्हटला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वाआयुष्यात घडलेली एक घटना तसेच त्यामध्ये नेहरू टू ट्रंप व्हाया मोदी इ. राजकीय मंडळींचा उल्लेख, यांची परस्पर सांगड घालत असता माझ्या असे लक्षात आले कि धागालेखिका ट्रंप च्या विजयामुळे उद्विग्न झाल्या आहेत.
आणि तेव्हाच त्या इसमाला त्याच्या चूकीची जाणीव करू न देता इतक्या वर्षांनी त्या भावना बाहेर काढणे, ते ही नेहरूच्या चित्राला निमित्त करून तर कुठेतरी गोंधळाची अवस्था आहे असे वाटते.

(इतरत्र महापुरूंषाच्या एकेरी उल्लेखाचं समर्थन करणारे नेहरूला मात्र आदरपूर्वक उल्लेखतात!!! वा रे वा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शिरीष आणि राहुलची भीती वाटत नाही. माझ्या फेसबुकवर मी राहुलला सरळच "तू कोण रे मला जाब विचारणारा", अशीच सुरुवात केली. त्यावर आमचा जो संवाद झाला त्यातून माझ्यासमोर प्रतिमा अशी की, तो गावातून नग्न धिंड निघाल्यासारखा दुःखी आहे आणि मी त्याला म्हणत्ये, "तुला आठवत होतं ना तू चुकीचं वागलं होतास ते! मग माझी माफी मागण्याऐवजी माझ्याकडे नेहरुंच्या वर्तनाचं स्पष्टीकरण का मागत आलास?" लाक्षाणिक अर्थाने मी ज्याला emasculate केलंय, आमच्या ओळखीच्यांना सांगत्ये की "तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका", त्याला मी घाबरत्ये असं म्हणणं मोठ्या धार्ष्ट्याचं आहे. पण माझे विचार समजून घेण्यासाठी बायका सहनशील, नाजूक, गरीब-बिचाऱ्या असतात, अशा जळमटांमधून आधी बाहेर पडावं लागेल.

वय १६ आणि वय २०(हे तर खूपच झाले) मधे अशी घटना घडून देखील जर एफआयआर नोंदवली नसेल तर इतर वेळी 'पुरुषी मानसिकता','फेमिनिस्टपणा' वगैरेंबद्दल 'आंतर जालीय शौर्य' गाजवणे हा स्व्तःलाच फसवण्याचा कळस म्हटला पाहिजे.

अप्पा, तुमच्याकडून स्वतःची निंदा झाली म्हणजे मी थोर असणार याबद्दल खात्री पटली. गेली अनेक वर्षं जालावर लिहून तुमची मूल्यं काय (आणि 'पूजेची पथ्ये'सारख्या धाग्यात तुमची ट्यूब किती उशिरा पेटली हे पाहता तुमची विनोदबुद्धी काय) याची कल्पना आलेली आहे. तुमच्यासारख्या लोकांनी माझी निंदा केली की मला आनंद होतो.

शेंबडं पोर, तुम्ही तुमचे अंदाज चोवीस तास आधी लिहिले असते, "धागालेखिका ट्रंप च्या विजयामुळे उद्विग्न झाल्या आहेत", तर तुम्हाला नवीन काही समजलं असं म्हणता आलं असतं. जे मी स्वतःच लिहिलंय ते पुन्हा लिहून किती कूल पॉईंट्स मिळवणार!

मी तेव्हा त्याला बोलले नाही, याबद्दल कोणाचं काही म्हणणं असेल तर त्याला मी काडीमात्र किंमत देत नाही. हे माझं कथन आहे, हे माझं आयुष्य आहे. माझ्या आयुष्यातल्या गोष्टी मी कधी आणि कोणाला सांगायच्या याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. राहुलने माझ्या शरीराशी दुर्वर्तन केलं, तुम्ही भोचकपणा करून माझ्या खाजगीपणाशी दुर्वर्तन करत आहात. तेव्हा मी पुरेशी तोंडाळ नव्हते; आता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते माझी ट्यूब कधी पेटली वगैरे सोडून सोडा हो. ते या विषयासंदर्भात अवांतर आहे.
'शिरीष', 'राहुल' वगैरेंच्या बाबत तुमची ट्यूब पेटायला पंधरा वर्ष लागली हेसुद्धा आश्चर्यच आहे.
पोलिसात तक्रार दाखल का केली नाही ते सांगा.
आणि तो तुमचा खाजगी मामला वगैरे असेल तर जाहीर संस्थळावर जाहीर पणे लिहिणे निरर्थक आहे.
एखाद्या बाईचे सरळ सरळ मॉलेस्टेशन होत असताना आणि मूलभूत मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात असतानाचा किस्सा लिहून त्याला 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' असे नाव देणे हेच हास्यास्पद आहे.

पण माझे विचार समजून घेण्यासाठी बायका सहनशील, नाजूक, गरीब-बिचाऱ्या असतात, अशा जळमटांमधून आधी बाहेर पडावं लागेल.
अस मी कुठे लिहिलय ते सांगा. सगळ्या बायका अशा नसतात. पण तुमच्यावरचा अन्याय तुम्ही ज्या निमूटपणे गिळलात ते बघता काही बायका बिचार्‍या असू शकतात हे नक्कीच पटले.

ही सगळी स्टंट बाजी आहे आणि असल काही खरोखर घडल आहे की नाही अशी शंका घेण्यास जागा आहे. .
मागे एकदा 'मॄगनयनी' या आय्डी बरोबर तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीची जी स्टंटबाजी केली आणि 'तेथून' जाणीवपूर्वक तात्पुरता बॅन घेतला होता ते उगाचच आठवले.
असो. चालूद्या. रजा घेतो. शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्रोपिंग एव्हढं मनाला का लावून घेतात बायका ते कळत नाही.
मी नववीत असताना आमच्याच एरीयातल्या एका काकूंनी मला एकटं असताना अचानक जवळ घेऊन गालावर किस केले होते,मला तेव्हाही गुदगुल्या झाल्या होत्या व आता ते आठवलं तरी गुदगुल्या होतात.ग्रोपिंग सर्रास होत असते,ज्या अर्थी ते होते त्या अर्थी nature made it so.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

फटके एव्हढे मनाला का लावून घेतात लोकं ते कळत नाही.
मी नववीत असताना आमच्याच एरीयातल्या एका काकाने मला एकटं असताना अचानक जवळ घेऊन गालावर थप्पड मारली होती,मला तेव्हाही मस्त झिणझिण्या झाल्या होत्या व आता ते आठवलं तरी झिणझिण्या येतात. ठोसे, बुक्के, फटके, चापट्या, थपडा, टपल्या, लाठीमार, गोळीबार, भोसकाभोसकी, खुनाखुनी या गोष्टी सर्रास होत असतात,ज्या अर्थी ते होते त्या अर्थी nature made it so.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हे अवांतर पण {गालावर} थप्पड ही फारच खोल जखम करते. इतक्या तोंडाजवळ असून गिळता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांचे वस्तूकरण आणि त्या अनुषंगाने अनुमतीची गरज न भासणे हे फार सामान्य आहे - लहानपणी ही बाब मला समोर असून लक्षात येत नसे. डोळसपणे बघितल्यावर सर्वत्र दिसते.

असा अनुभव कुठल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कुठल्या दृष्टीने - रेझिलियन्स - त्याची इजा होऊ दिली नाही, हे दोन्ही पैलू सांगणे कठिण आहे. तो समतोल लेखात जमलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0