Skip to main content

लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास

लस्ट फ़ॉर लालबाग: विश्वास पाटील (राजहंस प्रकाशन २०१५)

गेल्या दोन-तीन आठवड्यांत "लस्ट फ़ॉर लालबाग"ने अक्षरश: पछाडले होते. अगदी येता-जाता वेळ मिळेल तशी वाचली. आठशे पानी कादंबरी वाचायला घेतली खरी पण सगळीकडे घेऊन फ़िरतांना खांदे आणि हाताला चांगलाच व्यायाम झाला. मुंबईच्या कापड गिरणी-कामगारांचा संप हे माझ्या शाळकरी वयातले एक कटू सत्य होते. कारण माझे वडील ऐंशीच्या दशकात जवळ-जवळ वर्षभर घरी होते. आम्हां तिघां मुलांना आई-बाबांनी अनेक क्लृप्त्या काढून वाढवले अन गरिबी फारशी जाणवू दिली नाही. ही कादंबरी वाचतांना त्या दिवसांची सारखी आठवण येत राहिली. मी आज हे लिहू शकते आहे कारण माझी शाळा अन पुढचे शिक्षण चालू राहिले यामागे आई-बाबांचे कष्ट आहेत. कादंबरीतील नायक-नायिका - "इंदाराम-अंजू" पेक्षा मला जाई-जुई-झेलम या मुलींबद्दल खूप आपुलकी वाटली. ह्या मुली संपाच्या वेळी सातवीत असतात आणि त्यांचे सारे आयुष्यच कसे उद्ध्वस्त होऊन जाते ते वाचतांना अंगावर कांटे येतात. संपाने नष्ट केलेल्या एका मध्यमवर्गीय गिरण-कामगार पिढीची ही गाथा आहे असे म्ह्टले तरी चालेल. सर्व प्रथम ह्या अभ्यासपूर्ण कादंबरीबद्दल विश्वास पाटलांचे मन:पूर्वक अभिनंदन!

एका कम्युनिस्ट, ध्येयवादी निष्ठावान बापाचा मुलगा गरिबी आणि जुलमामुळे गुन्हेगारीकडे कसा वळतो याचे विदारक चित्रण केलेले आहे. संपाच्या तारखा, काही माणसे सत्य घटनांशी जुळतात. पण जी काल्पनिक असतील ती सुद्धा खऱ्यासारखीच वाटतात. मुंबईचा गेल्या तीस-पस्तीस वर्षांचा इतिहास गोष्टींच्या माध्यमातून लिहलेला आहे. मालवणी, कोळी भाषा अचूकपणे वापरल्या आहेत. खुनांचे काही प्रसंग अतिरंजक केल्यामुळे खरे वाटत नसले तरी "थ्रिलर" म्हणून खपून जातात. कादंबरी एवढी जाडी असली तरी भरपूर रक्तपात/मारामाऱ्या असल्याने आपसूकच वेगाने पाने सरतात. शेवट तसा प्रेडिक्ट करण्यासारखा असला तरी वाचायला आवडला. खलनायक जाल्याचे कॅरॅक्टर आणखी रंजक करता आले असते. त्याचे अंतर्मन जरा कोमल ठेवायला हवे होते.

विश्वास पाटलांचे भाऊ सुरेश पाटील यांनी २०१४ मध्ये "दाह" ही कादंबरी ह्याच विषयावर लिहली होती आणि त्यांनी आपल्या ज्येष्ठ बंधूंवर वाङ्मय चौर्याचा आरोप लावला होता. मी दाह वाचलेली नाही पण सध्या तरी "लस्ट" च्या भूताने मला भारलेले आहे. कामगार संपाचे परिणाम सगळ्याच कामगारांवर साधारण सारखेच झाले होते. त्यामुळे मूळ कुठले आणि नक्कल कुठली हे सांगणे कठीण आहे. मला तर यातील कित्येक गोष्टी अगदी वास्तववादी वाटतात. आणि ही माणसे मुंबईत कुठेतरी खऱ्या रुपात भेटत राहतात.

मी परवाच कादंबरी हातावेगळी केली आणि काल गिरणगावात फिरुन आले. तिथल्या उंच-उंच इमारती पाहतांना सारी पात्रे डोळ्यांसमोर येतात. या भागातील मुंबई आता झकपक दिसत असली त्यामागे लाखांचे तळतळाट आहेत हे जाणवते.

अन्वर हुसेन यांची रेखचित्रे खूपच बोलकी आणि लक्षवेधी आहेत. कादंबरीची रचना लांबच-लांब एक-सुरी वाटते. वेगवेगळी कथानके-पात्रे-प्रसंग वेगवेगळ्या प्रकरणांत टाकले असते तर फ़्लो आला असता. काही ठिकाणी पाल्हाळ लावले आहे, ते कमी करुन ६०० पानांत तीच कथा देता आली असती. हे सगळे "वजा" जाऊनही ही मला आवडलेली एक झकास कादंबरी!

समीक्षेचा विषय निवडा

बॅटमॅन Wed, 03/08/2016 - 04:46

हा एक हटके विषय आहे नक्कीच. माझ्यागत नॉनमुंबैकरांना हे फक्त ऐकून माहिती आहे. लेख वाचून कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली त्याबद्दल अनेक धन्यवाद!

अस्वस्थामा Wed, 03/08/2016 - 18:38

इंटरेश्टींग.

विश्वास पाटलांचे भाऊ सुरेश पाटील यांनी २०१४ मध्ये "दाह" ही कादंबरी ह्याच विषयावर लिहली होती आणि त्यांनी आपल्या ज्येष्ठ बंधूंवर वाङ्मय चौर्याचा आरोप लावला होता.

याबद्दल मला वाटतं लोकसत्ताच्या लोकरंगमध्ये चांगला मोठा लेख आला होता. आणि सुरेश पाटलांनी त्यांच्या कादंबरीचा ड्राफ्ट विश्वास पाटलांना दिला होता असं त्यांच म्हणणं होतं. प्रत्यक्षात काय झालं असेल काय कल्पना नाही आणि दोन्ही कादंबर्‍या वाचून याचा कोणी निर्णय लावावा इतका हा आरोप कोणी विचारात घेतलेला दिसत नाही (विश्वास पाटलांनी काहीही उत्तर दिलेले माझ्यातरी वाचण्यात आलेले नाही).

बाकी अशाही असल्या चोर्‍या आपल्याकडे खूप कॉमन आहेत आणि लोक त्याबद्दल उदासीन असतात बहुतेकदा, तेव्हा हे खरे असेल तरी खूप आश्चर्य वाटणार नाही.

गौरी दाभोळकर Wed, 03/08/2016 - 21:26

In reply to by अस्वस्थामा

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पाटलांचा विश्वासघात वाचूनच पुस्तक वाचायला उत्साह आला. दोन्ही पुस्तके खपवण्याचा स्टंट असावा.

सैराट Thu, 11/08/2016 - 23:33

ही कादंबरी वाचली आहे. पाटलांच्या इतर कादंबऱ्यांच्या तुलनेत एवढी चांगली नाही वाटली. अर्थात मी मुंबईकर नसल्याने असेल तसे,पण रिलेट करता आले नाही कादंबरीशी आणि वातावरण अनोळखी असूनही वाचकाला त्या जगात घेऊन जाण्याइतकी ही कादंबरी प्रभावी नाहीये.

आदूबाळ Fri, 12/08/2016 - 00:07

In reply to by सैराट

चंद्रमुखी हा मास्टरपीस वाचला की नाही? त्याच्या तुलनेत पाटलांच्या घरच्या किराणा सामानाची यादी अक्षर वाङ्मय वाटेल.

सैराट Fri, 12/08/2016 - 00:36

नाही वाचली. सुदैवच म्हणायचं. मला पाटलांची 'झाडाझडती' हीच काय ती चांगली कादंबरी वाटलेली. रणांगण त्यातल्या भाषेकरता, नाट्य निर्मितीकरता आवडली. महानायक ठीकच होती. पण खूपच पाल्हाळिक. कदाचित 'रणांगण' एवढाच विस्तार ठेवला असता तर अधिक परिणामकारक झाली असती.