थिअरी आणि प्रॅक्टिकल - १

लेख.

थिअरी आणि प्रॅक्टिकल

- जयदीप चिपलकट्टी

पॉर्नोग्राफी ह्या साहित्यप्रकाराचा खापरपणजोबा मार्की द साद, ह्याने लिहिलेल्या 'La philosophie dans le boudoir' ह्या नाटकावर हा लेख आहे. अोंगळ लिखाण ज्यांना रुचत नाही, त्यांनी तो वाचू नये.

नाटक कसं असावं ह्यावर अॅरिस्टॉटलच्या 'De Poetica' ह्या पुस्तकात तीन नियम सांगितलेले आहेत; 'classical unities' म्हणून ते ओळखले जातात. ह्या नियमांचा तथ्यांश असा की,
(१) नाटकामधले प्रसंग,
(२) हे प्रसंग घडण्यासाठी नाटकाच्या अंतर्गत घड्याळाप्रमाणे लागणारा वेळ, आणि
(३) हे प्रसंग जिथे घडतात त्या जागा,
ह्या तिन्ही बाबींची आखणी करताना फापटपसारा किंवा विस्कळीतपणा येऊ देऊ नये. एक निश्चित ठिकाण निवडून, कथावस्तूला फाटे न फोडता, काही तासांच्या अवधीत जितके प्रसंग बसवणं शक्य आहे तितक्यांत नाटक गुंडाळावं. हे सगळे नियम उदाहरणार्थ 'हॅम्लेट'मध्ये मोडलेले आहेत. 'शांतता कोर्ट चालू आहे'मध्ये ते बव्हंशी पाळलेले आहेत. (ह्या विधानांचा अर्थ असा नव्हे, की त्या त्या नाटककाराला हे नियम मान्य होते किंवा माहीत होते.) ज्यात ते पाळलेले आहेत अशा नाटकाचा प्रयोग करणं जास्त सोपं असेल असा ग्रह प्रथमदर्शनी होणं शक्य आहे, कारण एक म्हणजे सेट्सची हलवाहलव फारशी करावी लागणार नाही, किंवा पात्रांची वेषभूषाही बदलावी लागणार नाही.

❇︎

जितक्या पुस्तकीपणे 'La philosophie'मध्ये हे नियम पाळलेले आहेत, त्याला समांतर उदाहरण निदान मला ठाऊक नाही. असं असूनही ह्या नाटकाचा प्रयोग करणं अवघड का आहे, ह्यामागचं कारण पुढे विनासायास कळेलच. युजेनी नावाच्या पंधरा वर्षांच्या मुलीची प्रौढांनी आणि सुज्ञांनी घेतलेली शिकवणी हा नाटकाचा विषय आहे. मदाम द सांतांज ह्या बाईला युजेनी एका कॉन्वेंटमध्ये भेटते, आणि मदाम लगोलग तिच्यावर लट्टू होते. पण तिथे कडक धार्मिक वातावरण असल्यामुळे आणि आजूबाजूला माणसांचा राबता फार असल्यामुळे मनात उफाळून आलेल्या कामना शांत करणं मदामला शक्य नसतं. यावर तोडगा म्हणून आणि युजेनी कोवळ्या वयाची असल्याकारणाने नीतिमत्ता ह्या प्रांतात तिचे गैरसमज अनेक आहेत असं पाहून मदाम तिला आपल्या घरी आमंत्रण देते. युजेनी ते आनंदाने स्वीकारते, आणि एका दुपारी तिथे हजर होते. मदामचा वीस वर्षांचा धाकटा भाऊ मिरवेल आणि मिरवेलपेक्षा पंधराएक वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र दोलमांसे यांनाही त्याच वेळी तिथे बोलावलेलं आहे. हे चौघे जण जमल्यानंतर संध्याकाळच्या जेवणापर्यंत म्हणजे पुढचे तीनचार तास ही शिकवणी चालते. आधी थिअरी, मग प्रॅक्टिकल, मग पुन्हा थिअरी, मग पुन्हा प्रॅक्टिकल अशी तिची सर्वसाधारण लय आहे. नीतिशास्त्र आणि समाजकारण ह्या विषयांत युजेनीला ज्या अनेक शंका आहेत, त्यांचं निरसन दोलमांसे आणि मदाम यांच्याकरवी केलं जातं. युजेनीच्या मनातल्या भ्रामक कल्पना झाडून टाकून तिला उपदेशाचे डोस पाजून तयार केलं जातं, आणि मग तिच्या विविधांगात वीर्याचे डोस दिले जातात. यामुळे थकवा आल्यानंतर विश्रांती घेत असताना हे चौघे जण अपुरी राहिलेली चर्चा पुढे नेतात, तशी आणखी काही मुद्द्यांची समाधानकारक उकल होत जाते. एव्हाना मंडळींना हुरूप येऊन ती पुन्हा एकदा कृतीला सुरुवात करतात, आणि आपापलं वैयक्तिक समाधान होईपर्यंत प्रत्येकाने ही कृती चालवल्यानंतर फिरून सगळे जण चर्चेला बसतात. जुन्या मुद्द्यांची उजळणी होते आणि नव्या गोष्टी युजेनीला शिकवल्या जातात तशी कृतीची वेळ पुन्हा येते इत्यादी इत्यादी इत्यादी. सुरुवातीपासून शेवटापर्यंत सात प्रवेशांत सर्व काही बसवलेलं आहे.

❇︎

मदाम, मिरवेल आणि दोलमांसे ह्या तिघांनाही या प्रांतात कित्येक वर्षांचा अनुभव असला तरीदेखील त्यातल्या त्यात दोलमांसेचा अधिकार फार वेगळ्या पातळीवरचा आहे. ह्यामागचं मुख्य कारण असं, की तो तत्त्वचिंतक आहे. माणूस आणि निसर्गशक्ती यांचं परस्परावलंबित्व, धर्म ह्या संस्थेला यात कुठे जागा आहे की नाही, नीतिमत्ता कशावर आधारित असावी किंवा मुळात असावीच का, लैंगिक आनंदासाठी एखाद्या व्यक्तीचा वापर करत असताना तिच्या बऱ्यावाईटाची काळजी करणं आपल्यावर बंधनकारक आहे की नाही, पुरेशी काळजी न घेतल्यामुळे जर बाई गर्भार राहिली तर आपलं पोर मारून टाकण्याचा हक्क तिला आहे का, तसा हक्क नाही असं जे लोक समजतात त्यांची वैचारिक गफलत कुठे होते, खून बेकायदेशीर असावा की नाही, ह्या आणि अशासारख्या मुद्द्यांवर त्याने प्रदीर्घ आणि सखोल विचार केलेला आहे. आपण काढलेले निष्कर्ष कोणते हे अर्थात तो युजेनीला आणि त्या अनुषंगाने इतर पात्रांना सांगतोच. पण दोलमांसेचं लिंग मोठं म्हणून त्याचा अधिकार मोठा असं मात्र नाही. ते लांबलचक, जाडजूड आणि सहा इंच परीघाचं जरी असलं तरी मिरवेलचं लिंग यापेक्षा कितीतरी जास्त मोठं आहे. मुळात मिरवेलच्या ह्याच अंगभूत गुणामुळे पॅरिसमधल्या श्रीमंत सरदार-दरकदार लोकांच्या बैठकीत त्याचं स्वागत होत असावं असा अंदाज करता येतो. अशा एका ठिकाणी जेवायला गेलेला असताना त्याची दोलमांसेशी अोळख झालेली आहे, आणि एकमेकांशी गुदमैथुन करताना दोलमांसेचं मोजमाप त्याच्या ध्यानात राहिलं आहे. आपल्या बहिणीला, म्हणजे मदाम सांतांजला, दोलमांसेच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल, जीवनविषयक तत्त्वज्ञानाबद्दल आणि चेहरेपट्टीबद्दल सांगताना हाही उल्लेख विषयाला धरून असल्यामुळे तो करतो. परिणामी दोलमांसे नाटकात दिसण्याआधी वाचकाला त्याच्याबद्दल बरीचशी माहिती झालेली असते. युजेनीचं उद्घाटन दोलमांसेकडून होतं यात विशेष आश्चर्य नाही, पण त्यातही मेख अशी, की दोलमांसे एक प्रकारचा व्रतबंध पाळत असल्यामुळे दोहोंपैकी एकाच दाराचं उद्घाटन तो करतो.

पण मिरवेलपेक्षाही आकाराने मोठं पात्र नाटकात आहे. एके ठिकाणी प्रात्यक्षिकासाठी पुरुषाची गरज पडल्यामुळे अॉगस्तां नावाच्या मदाम द सांतांजच्या पोरसवदा माळ्याची मदत घेण्यात येते. मदामने केलेल्या शिफारसीप्रमाणे ह्याचं लिंग चौदा इंच लांब आणि साडेआठ इंच परीघाचं आहे. त्याचे तुषार दहा फूट अंतरावर पोहोचू शकतात. पण अॉगस्तांचा उपयोग तेवढ्यापुरताच आहे. तत्त्वचर्चा करण्याइतपत बुद्धी किंवा उत्सुकता त्याच्यामध्ये नसल्यामुळे जमावावर गुलाबपाण्याचा वर्षाव करणाऱ्या हत्तीसारखा वापरून सारे जण त्याला बाहेर हाकलून काढतात, आणि प्रसंगी पुन्हा आत बोलावतात. तेव्हा शारीर परिमाणाने सर्वांत थिटा पण बौद्धिक परिमाणाने सर्वांत उंच असा अंतर्विरोध दोलमांसे ह्या पात्रात आहे.

❇︎

युजेनीचा बाप हा एक धनदांडगा व्यापारी असल्यामुळे युजेनीच्या शिकवणीला त्याची हरकत नसणं अगत्याचं आहे. पण आपल्या मुलीला धोतराच्या सोग्याखाली झाकून ठेवणारा संकुचित मनाचा तो माणूस नव्हे. युजेनी लवकर जाणती व्हावी अशी त्याचीही इच्छा आहे, आणि याखेरीज त्याच्या संमतीवर शिक्कामोर्तब व्हावं म्हणून मदाम सांतांजने आपला देह यापूर्वीच उदारमनाने अर्पण करून त्याला गटवलेला आहे. खुद्द युजेनी जरी भाबडी असली तरीही आपण तशा आहोत हे तिला ठाऊक आहे, आणि ह्या अज्ञानतिमिरांध:कारातून बाहेर पडावं यासाठी तिची धडपड असते. मदामच्या नवऱ्याचीही आडकाठी नाही. संपूर्ण नाटक मदामच्या घरी होत असलं तरीसुद्धा तो आसपास कुठे असल्याचं चिन्ह नाही. एकतर तो तिच्याहून पुष्कळ म्हातारा आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मदामला असं सांगून टाकलेलं आहे, की माझा एक हट्ट जर तू पुरा केलास तर बाकी तू काय करतेस याकडे मी लक्ष देणार नाही. हट्ट असा, की तो उताणा पडेल, आणि मदामने त्याच्यावर उलटं झोपून ढुंगण त्याच्या चेहऱ्यावर ठेवून त्याचं लिंग चोखावं. त्याचं वीर्य बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना मदामने त्याच्या तोंडात शी करावी, आणि ती तो खाऊन टाकेल. हे ऐकून युजेनीला अर्थात अचंबा वाटतो, पण दोलमांसे तिचा हा पूर्वग्रह ताबडतोब दूर करतो. तो म्हणतो की ह्यात वावगं काही नाही; निसर्गाचाच हा भाग आहे. निसर्गप्रकृतीने कुणाला काही, तर कुणाला काही दिलेलं आहे. आपल्या सर्वांचे नाकडोळे वेगवेगळे दिसतात यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काही नाही, तसंच आपल्या आवडीनिवडी वेगळ्या असतात यामध्येही आश्चर्य करण्यासारखं काही नाही. तेव्हा अशासारख्या बाबीत जर कुणी तुझी मदत मागितली तर तू नाही म्हणशील का? युजेनी लगोलग म्हणते, की शिकवणी आत्ता कुठे सुरू होत असली तरी मी जेवढं शिकले आहे त्यावरून हे मला समजलेलं आहे, की मी कशालाही नाही म्हणणं योग्य नव्हे. पण तरीदेखील अशा गोष्टी मला नव्या असल्यामुळे सुरुवातीला मला थोडं आश्चर्य वाटलं तर ते तुम्ही समजून घ्यायला हवं. ह्या शिकवणीला जिचा विरोध आहे अशी एकमेव व्यक्ती म्हणजे युजेनीची आई. सहाव्या प्रवेशाच्या शेवटी ती तिथे येऊन पोहोचते, आणि तिचा प्रश्न सातव्या प्रवेशात सोडवण्यात येतो.

❇︎

माणसाने स्वत:च्या संवेदनासुखांसाठी जगावं हे म्हणणं ठीक आहे, पण ते आचरणात जर आणायचं तर तपशीलात शिरायला हवं. दोलमांसेच्या वर्गवारीनुसार ह्या प्रांतात तीन जिल्हे आहेत:
(१) गुदमैथुनातून मिळणारा आनंद,
(२) पावित्र्यभंगातून मिळणारा आनंद, आणि
(३) क्रौर्यातून मिळणारा आनंद.

गुदमैथुन हे पाप नाही का असा युजेनीने उपचारापुरता घेतलेला आक्षेप दोलमांसे फुंकरीसरशी उडवून लावतो. गुदमैथुनात वीर्य फुकट जातं आणि नवीन जीव जन्माला येण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. देवाला हे मान्य नसल्यामुळे अशासारखी पापी कृत्यं करणारे लोक जिथे राहत होते त्या सॉडम आणि गमोरा या गावांचा त्याने नाश केला, अशी एका अडाणी ज्यू माणसाने बायबलमध्ये लिहिलेली भाकडकथा ऐकून लोक गुदमैथुनाविरुद्ध गहजब करतात. पण ह्यात काही तथ्य नाही. एकतर सॉडम आणि गमोरा ही शहरं ज्वालामुखीमुळे नष्ट झाली, देवाने आग लावून दिल्यामुळे नव्हे. आणि ते काही जरी असलं तरी आपण सतत पुनरुत्पादन करत राहिलं पाहिजे आणि माणसांची वैतागवाणी भाऊगर्दी वाढवत राहिलं पाहिजे, अशी काही कळकळीची निकड निसर्गाला असणं शक्य नाही. तेव्हा वीर्य फुकट गेलं तर जाऊ दे. आणि निसर्गामध्ये निर्मिती जशी आहे तसा विनाशही आहे. आता निसर्गाला जर विनाश चालत असेल, इतकंच नव्हे, तर तो आवश्यक असेल, तर निर्मिती करायला नकार देणं ही त्यामानाने खूपच मवाळ असलेली कृती न चालायला हरकत नाही. शिवाय निसर्गाने केलेल्या रचनेकडे आपण पाहिलं तर लंबगोलाकार योनीपेक्षा ढुंगणाचं वर्तुळाकार भोकच पुरुषलिंगाच्या आकाराशी जास्त चपलख जुळणारं आहे. गुदमैथुन करा अशी निसर्गाची आपल्याला आर्त विनवणी असते, हेच यातून सिद्ध नाही का होत?

मदाम सांतांजचं यावर म्हणणं असं, की पुरुषाचं लिंग माझ्या शरीरात कुठेही जायला तयार असेल तर त्यात मला आनंदच आहे. पण ते गांडीत घालून घेण्यामुळे होणाऱ्या संवेदना ह्या पुच्चीतल्या संवेदनांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत, असं स्वानुभव मला सांगतो. त्यामुळे ज्या स्त्रीने एकदा मागची चव घेतलेली आहे ती पुढचा पर्याय त्यातल्या त्यात नाराजीनेच पत्करेल यात संशय नाही. युरोपात जिथे जिथे गुदसंभोगाची चाल होती तिथे तिथे हा अनुभव आलेला आहे. शिवाय हा मार्ग चोखाळण्यामुळे दिवस जाणं वगैरे संभाव्य कटकटी टळतात ही सोय आहेच. मदाम पुढे म्हणते, की बाई जर चुकून अडचणीत सापडली तर पोट पाडण्यात काही गैर नाही; मी स्वत: हे दोनदा केलेलं आहे, आणि पुढेमागे तुला जर तशी गरज भासलीच तर बेलाशक माझ्याकडे ये. पण ती वेळ येऊ न देणंच श्रेयस्कर. अशा प्रकारे मूळ मुद्दा सिद्ध झाल्यानंतर दोलमांसे अशी माहिती पुरवतो, की गुदमैथुन करण्यासाठी जे दोघे खेळाडू लागतात त्यांच्यापैकी दुसऱ्याच्या ढुंगणात लिंग घालणाऱ्यापेक्षा ते स्वत:मध्ये घालून घेणाऱ्याकडे सुखाचा वाटा जास्त जातो. यामागचं कारण असं, की घालून घेणारा एका अर्थाने स्त्रैणभाव परिधान करत असल्यामुळे वेष पालटून गुपचूप वागल्याचा आनंद त्याच्या शारीर संवेदनांमध्ये मिसळून गेलेला असतो.

दोलमांसेच्या व्रताचा मोघम उल्लेख आधी झालेला आहे. युजेनीचं मागचं दार तिसऱ्या प्रवेशातच उघडलेलं आहे, त्यामानाने समोरचं दार उघडण्याचा प्रसंग बऱ्याच उशीरा म्हणजे पाचव्या प्रवेशात येतो. दोलमांसे मिरवेलला म्हणतो, की तू तयारीत दिसतोस, तेव्हा उद्घाटन करायला पुढे हो. यावर युजेनी कळवळून दोलमांसेला म्हणते, की त्याचं लिंग फार मोठं आहे, तेव्हा मला दुखेल. त्यामानाने तुझं लहान आहे, तेव्हा तूच हे काम कर. यावर दोलमांसे म्हणतो, " … Je n'ai jamais foutu de con de ma vie! Vous me permettrez de ne pas commencer à mon âge. - आयुष्यात मी कधीही पुच्ची झवलेलो नाही, आणि ह्या वयात सुरुवात करण्याची माझी इच्छा नाही." मदाम सांतांज ह्यावर म्हणते, की समोर चालून आलेली इतकी देखणी आणि कोवळी भेट नाकारायची म्हणजे काय! एवढी खडतर तत्त्वनिष्ठा म्हणजे फार झाली. ह्यावर दोलमांसे मदामला प्रत्युत्तर असं देतो, की तुम्ही माझी बाजू नीट समजून घेतलेली नाही. माझ्यापेक्षा कडक पथ्य पाळणारे माझे अनेक स्नेही आहेत; स्त्रीची गांड ते कधीही मारणार नाहीत. मी तुमची मारलेली आहे, आणि पुन्हा मारायलाही माझी तयारी आहे. तेव्हा मी अतिरेकी भूमिका घेतो आहे असं म्हणता यायचं नाही. ह्या उत्तरावर मदामचं समाधान होतं, आणि शेवटी उद्घाटनाचं काम मिरवेल करून टाकतो. युजेनीच्या मनात यामुळे जी किंचित अपमानाची भावना उत्पन्न झालेली आहे ती बराच वेळ रेंगाळते असं दिसतं. दोलमांसेला ती अधूनमधून हे बोलूनही दाखवते; पण त्याचं पुन्हापुन्हा असंच म्हणणं पडतं, की आम्ही गुदसंभोगी लोक आमच्या आवडीनिवडींबद्दल फार काटेकोर असतो, आणि स्वत:वर घालून घेतलेले निर्बंध असे आम्हांला सहजी मोडता येत नाहीत.

❇︎

पवित्र वस्तूंची आणि पवित्र संकल्पनांची विटंबना करण्यात जो आनंद असतो त्याबद्दल मात्र दोलमांसेला विशेष उत्साह नाही. संतांच्या मूर्ती, क्रॉस, कम्यूनियनच्या वेळी खायचा वेफर असल्या गोष्टींचा झवताना उपयोग करून घेतल्यामुळे माणसाची कल्पनासृष्टी चाळवली जाते हे खरं आहे, आणि समाजमान्यतेची बंधनं झुगारून देण्यात ज्या पोरकट लोकांना शेखी वाटते अशांची यामुळे क्षण दोन क्षण करमणूक होतही असेल. पण प्रगल्भ अभिरुचीच्या माणसाचा ह्या प्रकारातला रस पटकन विरतो. धर्मविचार हा सरसकट चुकीचा आहे हे एकदा मान्य केलं, की बेअक्कल लोकांना ज्या गोष्टी पवित्र वाटतात त्यांचा अपमान करण्यात काही गंमत उरत नाही. पण तरीदेखील, सुखाच्या बेहोशीत असताना रांगडे शब्द वापरणं ही एक तात्कालिक गरज असते, आणि देवाधर्माबद्दल घाण बोलण्यामुळे तो परिणाम साधला जातो हा एक उपयोग आहे. एकदा ही पार्श्वभूमी समजून घेतली की मग असे शब्द जितके भरभरून वापराल तितकं चांगलं. आजूबाजूचे लोक शरमून-हादरून जातात, आणि आपला अहंभाव त्यामुळे सुखावतो. अर्थात हा काही अवघड दिग्विजय नव्हे, पण म्हणून त्याला नाक मुरडावं असंही नाही. लिंग ताठरलेलं असताना देवाला करकचून शिव्या द्यायला दोलमांसेला फार आवडतं, पण ह्या ज्या घाणेरड्या वस्तूमुळे त्याला इतकी किळस येते ती अस्तित्वात नसावी ही बाब त्याला मनोमन खुपत राहते. घृणेला निदान ठोस काही लक्ष्य मिळावं म्हणून ती प्रत्यक्षात आणता आली असती तर बरं झालं असतं.

❇︎

दाईचा स्तन कसा चावावा, खेळणं कसं मोडावं आणि पिंजऱ्यातल्या पक्ष्याचा गळा कसा दाबावा, हे बुद्धी चालवता येण्याच्या कितीतरी आधी लहान मुलाला ठाऊक असतं. निसर्ग आपल्याला पहिल्याप्रथम क्रौर्यच शिकवतो. समाजाने केलेल्या संस्कारांमुळे ह्या मूळप्रवृत्तीत नंतर भेसळ होते खरी, पण हे संस्कार निसर्गाचा भाग नव्हेत. निसर्गत: वाढणाऱ्या झाडाला माळ्याने कृत्रिम आकार दिल्यामुळे जशी त्याची नासाडी होते तशीच संस्कारांमुळे माणसाची होते. मानवी संस्कृतीने अजून पूर्णपणे नासवलेली नाही अशी एकमेव गोष्ट जी उरली आहे ती म्हणजे क्रौर्य. सारांश असा, की माणसाची क्रौर्याकडे प्रवृत्ती होणं यात आश्चर्य नाही आणि ते अनैसर्गिक तर नाहीच नाही.

माणसाच्या संवेदनांवर सुखाचा परिणाम जितका होतो त्यापेक्षा वेदनांचा जास्त होतो हे उघड आहे. दोलमांसेचं म्हणणं असं, की इतरांना वेदना देण्यामुळे माझ्यामध्ये त्यांचे जे प्रतिसाद उमटतात ते जास्त खोलवर जाणारे असतात, आणि माझ्यातल्या आदिम प्रवृत्ती त्यामुळे खडबडून जाग्या होतात. ह्या संवेदना संबंधित अवयवांत पोहोचल्यामुळे संभोगाच्या वेळी मला मिळणाऱ्या अानंदात गुणात्मक वाढ होते. स्त्रीला सुख देणं ही त्यामानाने फार डळमळीत बाब आहे. त्याचा परिणाम कितपत होतो याची कधी खात्री नसते. शिवाय पुरुष म्हातारा किंवा विद्रूप असेल तर असं सुख देणं त्याला अवघडच असतं. त्यामुळे तिला वेदना देणं हा मार्ग श्रेयस्कर ठरतो. आता काही जण म्हणतील, की आपल्या सुखासाठी इतरांना वेदना देणं बरोबर आहे का? तर याचं उत्तर असं, की आपण स्वत:चा विचार इतरांपेक्षा जास्त करावा हे आपल्यात निसर्गाने निर्माण केलेल्या प्रवृत्तीला अनुसरूनच आहे. तुझा सोडून इतरांचा विचार आधी कर असं निसर्गशक्ती आपल्याला कधीही सांगत नाही. त्यामुळे हा प्रश्न निकालात निघतो. आणि म्हणूनच आनंद घेत असताना आनंद देणारी व्यक्ती माझ्या खिजगणतीत नसते.

क्रौर्याचे दोन प्रकार आहेत. बथ्थड माणूस जेव्हा क्रूरपणा करतो तेव्हा तो निव्वळ डोकं गमावल्यासारखा वागतो. सूक्ष्म विचार करायला असा माणूस लायक नसतो आणि म्हणून अशा कृतीतून त्याला कसलं सुखही मिळत नाही. अशा क्रौर्यापासून घाबरण्यासारखं काही नसतं, आणि स्वत:चा बचाव करणंही अवघड नसतं. पण याउलट अत्यंत बुद्धिमान आणि स्वत:च्या संवेदनांबद्दल अत्यंत सजग असणारे जेव्हा क्रौर्याने वागतात तेव्हा त्यामागे जाणकाराने घेतलेला रसास्वाद असतो. दुर्दैव असं, की दोहोंतला हा फरक समजू शकणारी माणसं जगात फार थोडी आहेत, पण सुदैव असं, की ती अगदीच नाहीत असं नाही. हे दुसऱ्या प्रकारचं श्रेष्ठ असं क्रौर्य खासकरून स्त्रियांमध्ये, पण सुप्तावस्थेत, असतं. अशा स्त्रियांची कल्पनाशक्ती सतत काम करत असते, आणि तल्लख बुद्धीची तिला जोड मिळाल्यामुळे त्या विलक्षण धोकेबाज बनतात. पण आपल्या समाजाचे नीतिनियम इतके सोवळे आहेत, किंवा खरं तर इतके भंपक आहेत, की त्यांच्या क्रौर्याला कधीच काही उत्तेजन मिळत नाही. आपल्या सुप्त उर्मींवर पांघरूण घालता यावं म्हणून अशा स्त्रिया मनोमन चडफडत कुठल्यातरी धर्मादाय परोपकारी कामात स्वत:ला गुंतवून घेतात. काही निवडक जवळच्या मित्रांबरोबर असतानाच त्यांना आपली निकड भागवता येते. अशा स्त्रिया फार अतृप्त आणि दु:खी असतात.

क्रौर्याला जखडू पाहणारे कायदे रद्द व्हायला हवेत. क्रौर्याचे सगळे दुष्परिणाम यामुळे नष्ट होतील, कारण जिथे विरोध नाही तिथे क्रौर्य नाही. आणि जेव्हा विरोध होईलच तेव्हा तो परस्परविरुद्ध अशा दोन क्रौर्यांमध्ये होईल. विरोध करणारा यशस्वी झाला तर प्रश्नच नाही, आणि जर अपुरा पडला तर त्याने आपल्यापेक्षा बलिष्ठ माणसाच्या इच्छेपुढे मान तुकवायला हवी होती हा निसर्गनियम आपोआपच सिद्ध होईल. एकूण एकच आहे. इतरांना वेदना दिल्याबद्दल दुसऱ्याने माझा सूड घेतला तर घेऊ दे. जो प्रबळ असेल तो जिंकेल. अविरत संघर्षासाठीच निसर्गाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे. आपल्याला जे सहन करावंसं वाटत नाही ते इतरांना सहन करायला लावू नये हा उपदेश दुबळ्या माणसासाठी आहे, शक्तिशाली माणसासाठी नव्हे. ख्रिस्ती लोकांचा धर्म जेव्हा स्थापन झाला तेव्हा तो हास्यास्पद आणि विसंगत असल्यामुळे सुरुवातीच्या शतकांत त्यांचा छळ खूप झाला. तेव्हा तो होऊ नये आणि इतरांनी आपल्यावर दया दाखवावी या हेतूने त्यांनी हे रडतराऊत तत्त्व पसरून दिलेलं आहे.

दोलमांसे म्हणतो, की स्वत:च्याच संवेदना ज्यांना ऐकू येत नाहीत आणि म्हणून माझा विचार ज्यांच्या पचनी पडत नाही अशा महामूर्खांचे ताफेच्या ताफे जगात आहेत, हे मला ठाऊक आहे. पण जे त्यांना समजत नाही त्यावर त्यांनी मत देऊ नये. जिवंत आणि सळसळती, अजूनपर्यंत संस्कारांच्या पायदळी तुडवली न गेलेली अशी ज्यांची कल्पनाशक्ती आहे, त्यांनाच ह्या विषयाची सैद्धान्तिक पायाभरणी करण्याचा अधिकार आहे.

❇︎

युजेनी ही हुशार आणि नव्या कल्पना आत्मसात करायला आतुर असणारी मुलगी आहे. ह्या तत्त्वज्ञानाचा सर्वसाधारण रोख तिला सहजी लक्षात येतो, आणि त्यात अंतर्भूत असलेला तर्क आपल्याआपण ती पुढे नेऊ शकते. ती म्हणते, की गुन्हा ठरतील अशा फारच थोड्या कृती जगात आहेत असं ह्या सगळ्यावरून सिद्ध होतं. दोलमांसे म्हणतो, की हे बरोबर आहे. समजा रामने आपल्या आनंदापोटी श्यामला इजा केली, तर त्याला गुन्हा केव्हा म्हणता येईल? तर ज्या निसर्गशक्तीने हे कृत्य करण्यासाठी रामला प्रवृत्त केलं तिच्या नजरेत श्यामचं सुखदु:ख रामपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं सिद्ध केल्यानंतरच म्हणता येईल. पण असं सिद्ध करणं अर्थात शक्य नाही. निसर्गशक्तीच्या दृष्टीने दोघांचं स्थान सारखंच आहे, तेव्हा एकाच कृतीमुळे रामला सुख होतं आणि श्यामला दु:ख होतं ह्या गोष्टीचं तिला काहीच सोयरसुतक नसतं. इथे कुठेही गुन्हा नाही हे आपोआपच ठरतं. पण ह्यावर युनेजी अशी शंका विचारते, की जर आपल्या एखाद्या कृतीमुळे कित्येक लोकांना इजा होणार असेल आणि आपल्याला थोडंसंच सुख होणार असेल तर काय? दोलमांसेच्या मते हा आक्षेप गैरलागू आहे. माझ्या संवेदना आणि इतरांच्या संवेदना या दोहोंत तुलना करण्यासाठी काहीही सामायिक मोजमाप नाही. दुसऱ्याचं दु:ख कितीही मोठं असलं तरी मला ते दु:ख म्हणून जाणवत नाही. पण याउलट त्याचा छळ केल्यामुळे जर माझ्या इंद्रियांना सुख होत असेल तर तो न केल्यामुळे त्या सुखाची चणचण मला जाणवते. ही चणचण दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणं नैसर्गिक नाही का? सर्व मनुष्यमात्रांविषयी आपण बंधुभाव बाळगायला हवा आणि म्हणून त्यांना इजा करू नये ही शिकवण भ्रामक आहे. जेव्हा ख्रिस्ती धर्म फार लहान होता, ख्रिस्ती लोक हालअपेष्टा आणि छळ सोसून आपल्या धर्माला जेव्हा चिकटून राहात असत, तेव्हा आपल्यावर इतरांनी दया दाखवावी म्हणून त्यांनी बेरकीपणाने पसरवून दिलेलं हे मत आहे. अर्थात दोलमांसे पूर्वीही हे म्हणाला होता, पण एकदा वीर्य बाहेर टाकल्यानंतर काही मिनिटांत तो पुन्हा तितकंच वीर्य बाहेर टाकू शकतो, त्याप्रमाणे नुकतंच मांडलेलं मत तितक्याच जोरकसपणे तो पुन्हा मांडू शकतो.

धर्मसंस्थेबद्दल आणि विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्माबद्दल दोलमांसेची वृत्ती तुच्छतेची जरी असली तरीदेखील वेळप्रसंगी बायबलमधल्या कथांचा युक्तिवादासाठी उपयोग करायला त्याची ना नसते. युजेनी मदामला सांतांजला विचारते, की तुझा पहिला अनुभव कुणी घेतला? यावर मदाम म्हणते, की माझ्या भावाने घेतला. त्यानंतरही आजतागायत सवड मिळेल तसे आम्ही अधूनमधून एकमेकांबरोबर असतो. युजेनीला ही योजना आवडते आणि ती तसं बोलूनही दाखवते. पण ती अशी शंका उपस्थित करते की अगम्यगमन हे नीतिमत्तेला सोडून नव्हे का? यावर दोलमांसे म्हणतो, की तसं जर असतं तर अॅडमचं किंवा नोहाचं कुटुंब क्षयाला गेलं असतं. ते वाढलं ते अगम्यगमनामुळेच वाढलं. बाप-मुलीला किवा बहिण-भावांना एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं ही निसर्गाचीच शिकवण आहे. गुदमैथुन काय किंवा हस्तमैथुन काय किंवा अगम्यगमन काय, ह्या गोष्टी निसर्गाला अमान्य असत्या तर आपल्याला त्या केल्यामुळे इतकी मजा कशी वाटली असती?

❇︎

०. नीतिमत्तेची उभारणी धर्माच्या पायावर न करता धर्माची उभारणी नीतिमत्तेच्या पायावर करायला हवी. त्याकरिता आधी दुबळा, मिळमिळीत, ढोंगी आणि तकलादू असा ख्रिश्चन धर्म फेकून द्यायला हवा. रोमन लोकांसारखा निधड्या छातीचा, पुरुषी, शूर धर्म त्यापेक्षा जास्त लायकीचा आहे.

०. नको असलेल्या माणसाचा खून करणं हा गुन्हा नव्हे. याउलट अशा कृत्यासाठी धीटपणा लागत असल्यामुळे आणि त्याच्या मुळाशी निसर्गदत्त उर्मी असल्यामुळे खुनाची वाखाणणी करायला हवी. अर्थात खुनाचा सूड घ्यायलाही कायद्याने बंदी असता कामा नये, कारण त्याच्याही मुळाशी निसर्गदत्त उर्मी असते आणि त्यालाही धीटपणा लागतो. पण तेच जेव्हा सरकार करतं तेव्हा त्यामागे अशी काही सबळ कारणं नसतात. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा योग्य नाही, आणि कायद्यातून ती पुसून टाकायला हवी.

०. स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच स्वतंत्र आहेत. पण डॉमिनीकला एमिली हवी असेल तर केवळ माझं दुसऱ्यावर प्रेम आहे अशा सबबीखातर तिला त्याला नाकारता येऊ नये. खऱ्या अर्थाने मुक्त झालेल्या समाजात अशा अप्पलपोटेपणाला वाव नाही. त्यामुळे एमिलीने डॉमिनीकशी संभोग करायलाच हवा, पण डॉमिनीकची तिच्यावर कायमस्वरूपी मालकी अर्थात नाही. तेव्हा सगळं संपल्यावर तिचं ती करायला एमिली मुखत्यार आहे.

ही आणि अशी अनेक मतं ज्यांना आधीच पूर्णपणे पटलेली नाहीत त्यांना ती पटवून घेण्याची आणखी एक संधी नाटकाच्या पाचव्या प्रवेशात येते. अॉगस्तांकरवी पुढून आणि दोलमांसेकरवी मागून एकाच वेळी झवून घेतल्यानंतर युजेनी जरी थकून जाते, तरीदेखील अभ्यासात वेगाने प्रगती करत असल्याची प्रौढी तिला वाटल्याखेरीज राहत नाही. ती विश्रांतीसाठी बसून राहते आणि दोलमांसेला म्हणते, की आत्ताच जो अतिचार मी केलेला आहे, त्याबद्दल क्षणापुरती का होईना पण वाटणारी खंत ज्यामुळे निघून जाईल असं काही मला सांग. दोलमांसे तिला विचारतो, की तुझ्या मनात कुठला विषय आहे? तेव्हा युजेनी विचारते, की समाजाला नीतिनियम आवश्यक आहेत का? आणि त्यांचा राष्ट्राच्या प्रकृतीवर प्रभाव पडतो का? ह्यावर दोलमांसे म्हणतो, की आजच सकाळी मला एक माणूस भेटला; त्याच्याकडून हे पाहा - मी एक पत्रक विकत घेतलेलं आहे. पत्रकाचं नाव आहे: 'Français, encore un effort si vous voulez être républicains - फ्रान्सच्या नागरिकांनो, राजेशाही झुगारून देण्याचा पुन्हा एकवार प्रयत्न करा!' हे वाचून युजेनीच्या शंकांचं समाधान होईल असं मला वाटतं. यावर मदाम सांतांज आपल्या भावाला म्हणते, की तुझा आवाज चांगला आहे, तेव्हा तूच आम्हांला हे वाचून दाखव. अॉगस्तांला बाहेर हाकलून दिल्यानंतर पत्रकाच्या जाहीर वाचनाला सुरुवात होते. नाटकाचा जवळजवळ एक चतुर्थांश भाग त्याने व्यापलेला आहे. ते वाचून झाल्यावर युजेनी म्हणते, की पत्रक फार विचार करून लिहिलेलं आहे, आणि त्याचा सूर दोलमांसेच्या विचारांशी इतका मिळताजुळता आहे, की त्यानेच ते लिहिलं असावं असं वाटतं. हा आरोप दोलमांसे मान्य किंवा अमान्य करत नाही. पण तो म्हणतो, की माझे विचार ह्या पत्रकातल्याशी पुष्कळसे जुळतात हे खरंच आहे, आणि त्यामुळे मिरवेल ते वाचत असताना द्विरुक्ती होते आहे असं वाटत होतं. युजेनीला हे मान्य होत नाही. ती म्हणते, की उद्बोधक विचार कितीही वेळा ऐकले तरी त्यांचा कंटाळा येत नाही. ह्या द्विरुक्तीच्या मुद्द्याबाबत मी दोलमांसेशी सहमत आणि युजेनीशी असहमत आहे, त्यामुळे पत्रकात शिरत नाही.

❇︎

सुधाकरची सनद कायमची रद्द झाल्याचा उल्लेख कुठल्या अंकातल्या कुठल्या प्रवेशात आहे, हे 'एकच प्याला' ज्यांनी अनेकदा वाचलेलं किंवा पाहिलेलं आहे त्यांना सहज आठवेल. पण 'La philosophie' चं तसं नाही. नाटक गोलगोलगोलगोल आहे. ज्यांचा सर्वसाधारण साचा तोच आहे अशा चर्चा, आणि त्या तात्पुरत्या संपल्यानंतर, जिचा सर्वसाधारण साचा तोच आहे अशी सामुदायिक झवाझवी ही नाटकाची रचना असल्यामुळे तपशील आठवणं एकतर सोपं राहत नाही, आणि शिवाय त्याला किती महत्त्व द्यायचं याबद्दल अनिश्चिती वाटू लागते. उदाहरणार्थ, पाचव्या प्रवेशामध्ये असा एक प्रसंग आहे: दोलमांसेचं लिंग ताठर होतं. (यामागचं तात्कालिक कारण असं, की दुसऱ्यावर बळजोरी करण्याची आदिम प्रेरणा निसर्ग माणसाला सदोदित कशी देत असतो, यावर आत्ताच त्याने एक लांबलचक भाष्य केलेलं आहे.) तो म्हणतो, की मी बोलत असतानाही अॉगस्तांचे पांढरेशुभ्र आणि सुदृढ कुल्ले माझ्या मनातून काही केल्या हटत नव्हते. अॉगस्तांला तो घंटी वाजवून आत बोलावतो, आणि त्यापुढे पंधरा मिनिटं त्याचे कुल्ले कुस्करत कुरवाळत राहतो. तो म्हणतो, की आता आपण सर्वांनी एक आकृतिबंध रचू या. मी अॉगस्तांच्या पार्श्वभागावर कूच करीन, आणि त्याच वेळी युजेनी गुडघे टेकून अॉगस्तांचं लिंग चोखेल. हे करत असताना ती स्वत:चं ढुंगण अशा प्रकारे पुढे काढेल की मिरवेलला त्यात घुसता येईल. याच वेळी मदाम सांतांजच्या ढुंगणाच्या मला पाप्या घेता याव्यात म्हणून अॉगस्तांच्या पाठीवर बसून ते ती माझ्यासमोर आणेल, आणि तिने किंचित प्रयास केले तर हातात काटेरी चाबूक घेऊन अोणवी होऊन तिला एकसमयावच्छेदेकरून मिरवेलला बदडत राहता येईल, जेणेकरून त्या झणझणीमुळे युजेनीचं शिक्षण तो हलगर्जीपणा न करता जोरकसपणे चालू ठेवू शकेल. ह्या प्रसंगाचं दिग्दर्शकाने काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. पण नाटक वाचणाऱ्यांपैकी शंभरातली नव्व्याण्णव माणसं हा प्रसंग आपल्या चर्मचक्षूंसमोर आणत नसावीत, किंवा हे सगळं शक्य आहे का आणि असल्यास त्यात भाग घेणाऱ्यांना ह्यातून कितपत आनंद घेता येईल याची फारशी स्पष्ट कल्पनाही करत नसावीत. नाटक पाहणं आणि वाचणं यात फरक असतो हे निरीक्षण नवं नाही, पण तरीदेखील काही वेळा हा फरक विशेषच जाणवतो.

त्याउलट वाचण्यापेक्षा करायला सोपा असा एक प्रसंग ह्यानंतर लगेचच आहे. एकेक जण निजधामाला गेल्यानंतर हा आकृतीबंध जेव्हा मोडतो, तेव्हा अॉगस्तांबरोबर काही मिनिटं मला एकांतात घालवायला मिळावीत अशी परवानगी दोलमांसे मदाम सांतांजकडे मागतो. (तो तिचा नोकर असल्यामुळे परवानगी तिची मागायला हवी, अॉगस्तांची नव्हे हे समजण्यासारखं आहे.) 'तुला नक्की काय करायचं आहे? करायचं ते सगळ्यांसमोर करता येणार नाही का?' असं मदाम आणि युजेनी विचारतात. दोलमांसे म्हणतो, की अशासारखी गोष्ट लोकांसमोर करता येत नाही, आणि ती काय हेही मी सांगणार नाही. ती काय असावी हे मिरवेल अोळखतो आणि दोघींच्या कानात सांगतो. लागलीच त्यांना भयंकर किळस येते, आणि आढेवेढे न घेता त्या दोलमांसेला अॉगस्तांबरोबर आतल्या खोलीत जाऊ देतात. हा प्रसंग स्टेजवर करणं सोपं आहे. पण नाटक वाचणाऱ्याला मात्र ते दोघे काय करत असतील ह्याची कल्पना स्वत:च्या जबाबदारीवर मनात आणावी लागते, आणि ते त्रासाचं आहे.

❇︎

एव्हाना नाटकाचा पाचवा प्रवेश संपलेला आहे. शिकवणी चालू असताना आत कुणाही उपऱ्या माणसाला येऊ द्यायचं नाही अशी स्पष्ट ताकीद मदाम सांतांजने देऊन ठेवलेली असते. पण तरीदेखील, सहाव्या प्रवेशाच्या सु्रुवातीला तिचा नोकर घाईघाईने आत येऊन एक पत्र देऊन जातो. युजेनीच्या बापाने घोडेस्वाराबरोबर तातडीने पाठवलेलं हे पत्र आहे. त्यातला मजकूर असा, की 'युजेनी तिथे आलेली आहे हे युजेनीच्या आईला आवडलेलं नाही. तिची तिथे कायकाय थेरं चालू असतील याबद्दल तिला धास्ती वाटते आहे. माझ्या मुलीने काहीही थेरं केली तरी मला स्वत:ला काळजी नाही, आणि तिची शिकवणी पुरी झाल्याखेरीज तिला परत पाठवू नका. पण सांगण्याचा मुद्दा असा, की युजेनीला परत आणायला तिची आई आत्ताच इथून निघालेली आहे. ह्या रांडेने मला जीव नकोसा केलेला आहे, त्यामुळे तिची तुम्हीच सोय लावलीत तर चांगलं होईल. तुम्ही काहीही केलंत तरी माझ्याकडून तक्रार यायची नाही.' यापुढच्या प्रवेशाचं वर्णन करण्याऐवजी मी केलेलं भाषांतर देतो आहे.

(वाचनाच्या सोयीसाठी हे भाषांतर स्वतंत्र पानावर प्रकाशित केलेलं आहे. ते इथे वाचता येईल.)