Skip to main content

मराठीनी समृद्ध केलं...

रवींद्र दत्तात्रय तेलंग

मराठीशी जवळीक-साधल्यामुळेच मला जगातील सर्वोत्कृष्ट कृतींचा आनंद उपभोगता आला.

काही गोष्टी आयुष्यांत कां घडतांत, याला तात्पुरतं जरी उत्तर नसलं तरी त्याचे दूरगामी परिणाम सुखद असतात. मी बघितलेला पहिला इंग्रजी चित्रपट व इंग्रजी नावेल दोन्हीं हिटलरशी संबंधित होते, हा योगायोग असेल. चित्रपट होता चार्ली चैप्लिनचा-‘दि ग्रेट डिक्टेटर’, पुस्तक होतं-इर्विंग वेलेस चं ‘दि सेवंथ सीक्रेट’

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. वयाच्या एका ठराविक टप्यावर ही आवड निर्माण होते. त्या वयात मला देखील शास्त्रीय संगीताची ओढ लागली. रेडियोवर मी मनमुराद मराठी-अमराठी गायक ऐकले. आज देखील खूपशा बंदिशी तोंडपाठ आहेत. एखादी बंदिश गुणगुणतांना त्या कलाकाराची आठवण होते. मुख्य म्हणजे बंदिश म्हणतांना जो आनंद होतो, तो वर्णनातीत आहे.

त्याचप्रमाणे लहानपणा पासून वाचनाची सवय होती. मिडिल स्कूल मधे असतांना इथे बिलासपूरला आम्हीं नार्मल स्कूल मधे (आता जुनं हाईकोर्ट भवन) असलेल्या वाचनालयात जायचो. तेव्हां ‘चंपक’, ‘चंदामामा’, ‘लोटपोट’, ‘अमर चित्र कथाएं’, ‘दिनमान’, ‘रविवार’, ‘धर्मयुग’ सारखी हिंदी मासिकं तिथे असायची. गवर्नमेंट शाळेत सकाळची शाळा असायची. मधल्या सुट्‌टीत आम्ही तिघं मित्र-अशोक व्यास, महेंद्र शर्मा आणि मी...या वाचनालयात जायचो...

आईचं माहेर नागपूरचं असल्यामुळे लहानपणी तिथल्या मुक्कामात आजू-बाजूला उपलब्ध असलेलं साहित्य (वर्तमानपत्रांपासून ते भावंडांच्या शाळेतील पुस्तकांपर्यंत) सगळंच मराठीत असे. तिथूनच मराठी भाषा आवडूं लागली. पण तेव्हां मराठी वाचनात गती नव्हती.

वडील रेलवे खात्यांत असल्यामुळे आम्ही बिलासपुरला रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग (आम्हीं त्यांना भाऊ म्हणायचो). त्यांच्या बंगलीवजा घरातील खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच. त्यांच्या कडे बघूनच भीती वाटायची. माझे वडील (दत्तात्रय लक्ष्मण तेलंग) पुस्तका सुरेख बाइंड करायचे. 1983 साली मी मैट्रिक झालो, त्या वर्षी प्रथमच या सुषमा काकूंनी रणजीत देसाईंचं पुस्तक ‘श्रीमान योगी’ बाइंड करायला दिलं होतं. बाइंडिंगच्या निमित्ताने ते पुस्तक घरी आलं. ते सहज चाळलं, तर आवडलं. नंतर त्या पुस्तकाचे सात-आठ खंड दादांनी बाइंड केले, म्हणजे ते अख्खं पुस्तक मी वाचून काढलं. मी वाचलेलं ते पहिलं मराठी पुस्तक होतं. त्यांत रेखाटलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र मनाला भावलं व माझी भीती दूर झाली. (पुढे काका-काकूंशी चांगलीच गट्टी जमली). दुसरं पुस्तक होतं बाबा साहेब पुरंदरेचं-‘राजा शिव छत्रपती.’ या पुस्तकातील सह्याद्रीच्या वर्णनाने मी भारावून गेलो -

‘अग्नि आणी पृथ्वी यांच्या प्रणयांतून सह्याद्री जन्मांस आला. अग्निच्या धगधगीत, उग्र वीर्याचा हा आविष्कारहि तितकाच उग्र. पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री...’

हे वर्णन वाचतांना मी जणूं सह्याद्रीच्या म्हणजेच मराठीच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर काकूनी मला बरीच पुस्तकं दिली. त्यांत स्वामी, डाॅ. कादंबरी, गंधाली प्रमुख होती. चांगली पुस्तके वाचण्याचे धडे मला इथेच मिळाले. पुढे मी शहरातील इतर वाचनालयांचा मेंबर झालो. त्यांत रेलवे इन्स्टीट्यूटची लाइब्रेरी, राघवेंद्रराव वाचनालय, जिला ग्रंथालय प्रमुख होते. या वाचनालयांमधे मराठी पुस्तका देखील कपाट भरुन होत्या. त्यात ‘अकुलिना’, गोनीदां चं ‘कुणा एकाची भ्रमण गाथा’, नचिं केळकरांनी लिहिलेलं टिळकांचं चरित्र सारखी पुस्तके होती. या सगळ्यांनी माझं जीवन समृद्ध केलं. कसं, हे सांगणं फार अवघड आहे.

1988 च्या डिसेंबर महिन्यात इथे बिलासपुरला राघवेंद्रराव हालमधील वाचनालयातील टेबलावर ‘अभी तो मैं जवान हूं...’ हा मथळा दिसला. बघितलं तर तो ‘महाराष्ट्र टाइम्स’ होता. त्या लेखामुळेच मी मटा नियमित वाचूं लागलो. त्याच दरम्यान प्रकाश जोशींचं ‘यादें’ सदर सुरू झालं होतं. पैकी ‘बेवफा’ या चित्रपटावरील लेख खूपच आवडला, त्यांत अशोक कुमारच्या हसण्याची तारीफ होती. मी चौकशी करून वाचनालयातील जुन्यां अंकांमधील ‘यादें’ सदर असलेले अंक घेऊन आलो. पण तेवढ्याने तृप्ती झाली नाही, म्हणून मटा विकत घेऊं लागलो. सुरवातीला ‘यादें’ साठीच मटा घेत होतो, पण एका महिन्यांतच संपूर्ण दैनिकाने मला वेड लावलं. इतकं की अमराठी क्षेत्रांत राहणारा असून देखील मला मटाच्या अग्रलेखाची आतुरतेने प्रतीक्षा असे की त्याचे संपादक गोविंदराव तळवळकर साहेब उद्या कुठल्या विषयावर लिहितील. मराठी किती सोपी आहे, हे मटामुळे कळलं, तसंच इतर भाषांतील साहित्याची ओळख झाली. श्री बा. जोशींनी ‘सुसंस्कृत गालीप्रदान’ लेख मटा मधेच लिहिला होता.

1989 ते 1995 पर्यंत मी मटाचा नियमित वाचक होतो. या दरम्यान सर चार्ली चैप्लिन, ग्रेटा गार्बो, इनग्रिड बर्गमन, सर जेम्स स्टुअर्ट, सर लाॅरेंस ऑलिविए सारखे हाॅलीवुडचे दादा कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. या सर्वांवरील अग्रलेख व इतर लेखांमुळे तेव्हां नकळत मनात विचार आला होता की या लोकांचे चित्रपट बघायला मिळाले तर काय बहार होईल. बेटी डेविस वरील प्रो. पुष्पा भावेंनी अप्रतिम लेख लिहिला होता. पुढे ‘ग्रंथांच्या सहवासात’ या लेखमालेमुळे देखील काय वाचावं...याचं मार्गदर्शन मिळालं. (हे सगळे लेख माझ्या संग्रही आहेत) या पार्श्वभूमीवर 1998 ते 2000 च्या जून महिन्यांपर्यंत छोट्या पडद्यावर 1930 ते 1960 च्या दरम्यान निघालेल्या हॉलीवुडच्या क्लासिक चित्रपटांचा आस्वाद घेतां आला.

‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ मधे गोनीदांनी नर्मदेचं सुंदर वर्णन केलंय. ते मनाला भावलं, कारण लहानपणापासून नर्मदाकाठी असलेल्या निरनिराळ्या शहरांमधे मला राहायला मिळालं. नर्मदेचं उगमस्थळ असलेलं अमरकंटक बिलासपूर पासून 3 तासांच्या अंतरावर आहे. शिवाय नरसिंहपूर (तिथून 18 किमी दूर असलेल्या बरमान चे वांगे प्रसिद्ध आहेत, टरबूजाएवढे वांगे अन् त्यात एक सुद्धा बी नाही. या वांग्यांचं भरीत आणि त्या सोबत बनणारे गाकर...खूप मजा यायची!), डिंडोरी, बरगी, मंडलेश्वर, होशंगाबाद, ग्वारीघाट, तिलवाराघाट, हरदा-इंदौर मार्गावर असलेलं नेमावर, ओंकारेश्वर... या सगळ्यां ठिकाणी नर्मदेचं भव्य रूप बघितलं होतंं. म्हणूनच आपल्या आवडत्या नदीबद्दल वाचून ऊर अभिमानाने भरून आला. नर्मदेवर मराठीत इतकं सुंदर पुस्तक आहे अन् ते मला मिळालं याचा आनंद झाला. गोनीदांच्या इतर पुस्तकांपैकी स्मरणगाथा देखील आवडलं.

लग्न झाल्यानंतर हरदा इथे गेलो होतो. हरदा-इंदौर मार्गावर जवळच नर्मदा तीरावर नेमावर गाव आहे. तिथे गेल्यावर कळलं की तिथे पुलाजवळ एक जागा आहे ती नर्मदेची बेंबी, म्हणजेच नर्मदेचं मध्यस्थान आहे. इथून एकीकडे उगमस्थळ असलेल्या अमरकंटक आणि दूसरी कडे असलेल्या भडौचचं अंतर सारखंच आहे...

मुख्य म्हणजे या काळांत पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय जडली. म्हणूनच रुडयार्ड किपलिंगच्या ‘कैप्टन्स करेजियस’ वर 1937 साली आलेला चित्रपट बघितल्या मुळेच (यात स्पेन्सर ट्रेसी होता) नागपुरला एका ग्रंथ प्रदर्शनात हे पुस्तक दिसतांच घेऊन टाकलं. तसंच ‘गान विथ दी विंड’, ‘दी विजार्ड आफ ओज’ (1939 सालच्या या चित्रपटांत जूडी गारलेंड होती) देखील घेऊन ठेवलंय. (घरी पुस्तक असलं की ते वाचलं जाणारच). मला ओल्ड क्लासिक चित्रपटांची आवड असल्यामुळे मी या विषयावर जास्त भर दिलाय. यशवंत रांजणकर, ज्ञानेश्वर कुलकर्णी सोबत इतर पुस्तके मजजवळ आहेत. मध्यंतरी मीना प्रभुंचं ‘मेक्सिको पर्व’ वाचलं. त्यातील पहिल्याच अध्यायात मेक्सिकन वीर पंचो विला व सिएरा मिडेयर चा उल्लेख होता. 1931 साली पंचो विलावर बेतलेला चित्रपट ‘विवा विला’ मी बघितला होता (यात वालेस बेरी होता). यात बेरीचं काम अप्रतिम होतं. मीना प्रभुंच्या पुस्तकामुळे विवा विला ची आठवण झाली, तसंच सिएरा मिडेयर मधे हंफ्री बोगार्ट होता. तो देखील सुंदर चित्रपट होता. या लेखनामुळे हे सगळं आठवलं. काही महिन्यांपूर्वी आफिस मधे असाच एक दीवाळी अंक मिळाला. तो अनुवादावर (ट्रांसलेशन) आधारित होता. त्यात ‘रेनमेन’ चा अनुवाद होता. डस्टिन हाफमेनचा ‘रेनमेन’ बघितल्यामुळेच त्या अनुवादाची किंमत आपोआपच वाढली.

पण हे सगळं कशामुळे घडलं, तर मराठीशी जवळीक साधल्या मुळेच. हिंदीत मला कधीच इतकं विस्तृत वाचायला मिळालं नाही, म्हणूनच मराठीचं अप्रूप वाटतं.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes