Skip to main content

वुडहाउस आवडणारे काका

खरडफळ्यावर गप्पा सुरु होत्या.कुणीतरी वूडाहाउसचं नाव काढलय. वुडहाउस म्हणजे पी जी वुडहाउस. पुलंवर त्याचा प्रभाव होता म्हणे. पुलंचा फेव्हरिट लेखक होता म्हणे. तर त्या वुडहाउसवरुन आठवलं --

*********************पाच वर्षाचा असतानाचं आठवतय तसं*************
आमच्या एका दूरच्या काकांना पी जीवूडहाउस आवडत असे म्हणे. म्हणजे ते रहायला शेजारीच होते. पण नात्यात दूरचे होते. दूरचे लोक वरिष्ठ सरकारी अधिकारी असतील तर त्यांना जवळचे करायचा प्रयत्न होतो. म्हणून सगळेच नातेवाइक त्यांना जवळचे असल्यासारखे वागवत. माझ्या बाबांहूनही बरेच मोठे असावेत वयाने. ते बर्‍याच वरच्या पोस्टला असावेत कारण त्यांची इमेज स्वच्छ होती. तरीही घर सुखवस्तू म्हणावं इतपत होतं. उच्चमध्यमवर्गीय होतं. तेव्हा टीव्ही आख्ख्या गल्लीत एखाद दोघांकडेच असायचा. मात्र ह्यांच्याकडे टीव्हीच्या जोडीला व्हीसीआर होता घरी विडियो कॅसॅट पहायला. त्यात ते देशोदेशीचे पिक्चर पहायचे.त्यांना म्हणे पी जी वूडहाउस आवडे. म्हणूनच त्यांच्याघरी नेहमी मारी नावाची बिस्किटं असतं.पारदर्शक बरणीत असत. ते अर्थातच चहा - कॉफीत साखर फार फार कमी घालत. त्यांच्या घरात कुणालाही डायबेटिस वगैरे नव्हता, तरी हे असं होतं. ते मंद मंद हसत. कितीही मोठा जोक असू देत; त्यांच्याकडे कुणीच ठ्ठो करुन हसत नसे. मोठ्याने रडत आणि बोलतही नसे. त्यांच्याकडे नवं बाळ पण मॅच्युर्डच व्हायचं. तेही मंद हसे. मंद मंद रडे. म्हणजे हाताच्या मुठी आवळून फक्त तोंड वाकडं करे ते इलुसं बाळ. त्यातून ते रडायला आलय असं सम्जायचं. खुश झालं तर ते बाळही मोठ्यानं हसतं नसे. अनुवांशिक स्मित करायला त्याला पोटातूनच येत होतं. काकांना काही लोक शिष्ट म्हणत. काही लोक बेचव म्हणत. त्यांनी कधी नव्हे ते एकदा मिसळ केली आणि संध्याकाळी आलेल्या लोकांन दिली. मिसळ अगदि फुळ्ळ्क फचक् होती; असं लोक माघारी म्हणायला लागले. मला मात्र ती ही आवडली. लोकांना मिसळ आवडली नाही; तरी त्यांनी तोंडभर स्तुती केली. काकांनी त्यावरही मंदस्मित केलं. ते इंग्लिश पेपर वाचत. त्यातल्या कार्टून्सवर आरामखुर्चीत बसलेले असतना कॉफीचा लहानसा घुटका घेत एक स्माइल देत. जोक फार जास्त आवडला तर तोच पेपर किम्चित वळवून शेजारी बसलेल्या काकूंना आहे त्या जागेवरुनच खुणावत. काकूही चक्क इंग्लिश वाचत. आणि काकांना जोक आवडलाय आणि आता ते आपल्याकडे पाहून " हे वाच" अशा अर्थाची खूण करतील हे काकूंना कसे कळे कुणास ठाउक. कारण काका काकूंना मोठ्याने "अग ए" म्हणत हाक मारत नसत. मग?
.
.
मागाहून जाणवले. पेपर दुमडल्याचा , पेपर काकूंकडे वळवल्याचा एक आवाज होइ पेपराचा. घरात इतकी शांतता असे की तो आवाजही शेजारच्या माणसाला जाणवे. त्यांची वेव्हलेंथ इतकी जुळली होती की दुम्डण्याचा आवाज, आणी साधं पान उलटायचा आवाज ह्यातला फरक त्यांना सरावाचा झाला असावा. त्यांच्या संसारिक आणि वैवाहिक सुखाचा इतर निम्न मध्यमवर्गीयांना हेवा वाटत असावा. श्रीमंतीचे रोग म्हणतात ते उलट ह्या श्रीमंतांना कधीच झाले नाहित. अ‍ॅसिडिटी, अल्सर, बी पी , डायबेटिस असे उलट इतर सर्वांना झाले. मग ह्यांना श्रीमंतीचे रोग का म्हणाय्चं ते मला समजत नसे. त्यांना कधीच कुणी सिगारेट बिडी पिताना पाहिलं नव्हतं. पण एक नक्षीदार सुरेख सागवानी अ‍ॅश ट्रे त्यांच्या घरात होता. हॉलमधल्या भिंतीवर गूढ अमूर्त पेंटिंग असे. त्याखालच्या काचेच्या पॉश टी पॉयवर अ‍ॅश ट्रे असे. त्या चित्रातून मला मला नागड्या बाईचा भास होइ. पण ते अस्पष्ट होतं. तो अ‍ॅश ट्रे सिगार का पाइप साठी असल्याची वदंता होती. सिगार अन् पाइप कधी पाहिला नाही. सिगार म्हणजे पैशेवाल्यांची बिडी असावी. ह्यांना गोल्फ आवडे. त्यांच्या मुली नव्यानेच मार्केट मध्ये फॅशन आलेल्या जीन्स घालत. स्लीव्हलेसही घालत. तशाच स्लीव्ह लेस घालून रामायण महाभारतही बघत.मुलींचे मित्र घरी येत. आणि ही त्यांच्यासाठी सहज बाब होती. मुलीचे केस नेहमीच तजेलदार कसे असत ते समजत नसे. तिचा आख्खा हात जबरदस्त गोरा होता. माहितीतल्या इतर गोर्‍या मुलींचा फक्त दंड गोरा असे. त्यानंतर सगळा हात ...विशेषतः कोपरापासून पुढे काळा. चेहराही उन्हानं काळवंडलेला असे. ह्या मुलींचा आख्खा हात गोरा. शिवाय काखेत केस नसत. शिवाय त्या मुली असूनही स्वयंपाक वगैरे येत नसे. चेहरा नितळ होता. त्वचा तजेलदार होती.
.
.
त्यांचं आणि आमचं नातेवाइक आणी परिचित सर्कल खूपसं कॉमन होतं. त्यातल्या बहुतांश श्रमिक लोकांचं फारसं वाचन नव्हतं. बहुतांश लोक कामगार होते. त्यांचं खाणं खणखणीत होतं, बोलणं मोठ्यानं होतं. एकमेकांशी शेयरिंग होइ. कधी काही केलं तर श्रमिक लोक एकमेकांना आणून देत. फक्त काहींचं वाचन होतं. त्या वाचन असणार्‍यांना इतरांत मान होता. वाचन मह्णजे पु ल , व पु आणि वसंत कानेटकर. सगळ्यांचं वाचन मराठी होतं. ह्या मराटेहे वाचन असणार्‍यांना इतर श्रमिक मान देत. आणि हे वाचन असणारे त्या वूडहाउस आवडणार्‍या काकांना मान देत म्हणून इतरही त्यांना मान देत. एक हायरार्की होती. कधीतरी बोलत असताना तयंच्या घरात "वूडहाउस की जॉर्ज बर्नार्ड शॉ " असं त्यांच्याच घरातले सदस्य आपसात बोलू लागले. लगेच जमलेल्या इतरांना आपापली कामं आठवली आणि ते बकाबका खाउन झटपट घराबाहेर पडले. वूडहाउस आवडणार्‍या काकांना सगळे शिष्ट म्हणत. का म्हणत मला कधीच समजलं नाही. ते स्वतःहून ज्याच्याशी बोलत, बोलावून घेत; त्यापैकी मी एक होतो. अभ्यासक्रम वगैरेमध्ये किम्वा खेळातही कधीच विशेष प्रावीण्य नव्हतं. ना मी स्टार होतो. तरी ते मला भाव का देत हे मलाही सम्जलं नाही. आजही देतात; आजही समजलं नाही.
.
.
पण खरंतर वूडहाउस न आवडणारे लोकही मारी बिस्किट खातात ; मंद हसतात ; स्माइल देतात ; चांगलेपण असतात.

--मनोबा

सुनील Thu, 31/03/2016 - 13:26

त्यांच्याकडे नवं बाळ पण मॅच्युर्डच व्हायचं. तेही मंद हसे. मंद मंद रडे

वारलो!!!!!!

ओंकार Thu, 31/03/2016 - 15:19

साबणाच्या पेटीत राहणारे चौकोनी कुटुंब आठवले. संदर्भ व्यक्ती आणि वल्ली.

- ओंकार

आडकित्ता Thu, 31/03/2016 - 21:24

पीजी वुडहाऊस आवडण्याकरता, ती कॉलोनियल लाईफस्टाईल, तो नर्म विनोद, ते ब्रिटिश अंडरस्टेटमेंट हे सगळं कंत्राट समजायला हवं मगच ते जमतं. अन हसूही येतं. अन मग ऑफकोर्स ते हसू खुदुखुदु येत रहातं. कडक थंडीत गरम टॉडीचा घोट घेतला की कसं आतून उबदार वाटतं, तसं.

त्या सगळ्याचा परिपाक = ते काका. तसे काका आजकाल टिकणार नाहीत. सापडणार नाहीत. वुडहाऊसचा विनोदही आजकालच्या मुलांना आऊटडेटेडच वाटतो.

'न'वी बाजू Fri, 01/04/2016 - 15:48

वूडहाउस आवडणारे लोक... मंद हसतात.

काय सांगता!

एक ज़माने में वुड्डहौस वाचून नुसता खदाखदा हसलेलोच नाही, तर गडाबडा लोळलोयसुद्धा.

असो चालायचेच.

मारी बिस्किट खातात.

आता काय बोलावे!

आयुष्यात कधी ते मारी बिस्कीट झेपलेले नाही.

चांगलेपण असतात.

माफ करा, एक वेळ आईवरून शिवी द्या, पण असे नका म्हणू. कसेतरीच वाटते. It's the insincerest form of FLATtery. (किंवा, तुमच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर अगदीच फुळ्ळ्क फचक्.) उगाच दिवंगत झाल्यासारखे वाटते.

असो.

टिन Sat, 02/04/2016 - 00:43

काहीही. मला, पिताजींना, एक भाऊ, २-४ मय्तरिणी इ. वुडहाऊसप्रेमी सँपलपैकी कोणीच असं नाही आहे. एलिट मनुष्याचे व्यक्तिचित्रण करण्यासाठी वुडहाऊसचा बळी दिल्याचा निषेध!

'न'वी बाजू Sat, 02/04/2016 - 07:33

In reply to by टिन

एलिट मनुष्याचे व्यक्तिचित्रण करण्यासाठी वुडहाऊसचा बळी दिल्याचा निषेध!

वुड्डहौससाहेब असा हगल्यापादल्याने बळी जात नसतो काही!

(बाकी, 'एलीट' की 'एलीटिष्ट'?)

adam Sun, 03/04/2016 - 11:03

सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार. आपल्याला ज्यांचं कौतुक आहे,आदर आहे , ज्यांचे आपण चाहते/पंखे आहोत; अशी लोकं कौतुक करतात तेव्हा अधिकच बरं वाटतं. आडकित्यांनी मुद्दा नेमका मांडलाय.
बादवे, नवीबाजू, Psyinfeld मूळ धाग्यातलं शेवटचं वाक्य बदललय. :)

अस्वस्थामा Mon, 04/04/2016 - 20:48

मनोबा लिहिलंय मस्त. (हे आधीच सांगून झालंय)
पण काये ना काही लोक्स काही म्हणाले म्हणून तुम्ही
"वूडहाउस आवडणारे लोक मारी बिस्किट खातात. मंद हसतात. स्माइल देतात. चांगलेपण असतात." हा शेवट बदललात ते नाही पटलं.

आम्ही वुडहाउस वाचला नाही पण म्हणून अगदी लेख समजलाच नाही असं थोडीच आहे. रादर वुडहाऊस वाचण्याशी लेखाचा काहीच संबंध नाहीय.

तुमच्या लिखाणाशी नेहमीच रिलेट करु शकतो (हे ही बोललोय आधीच) हे खूप छान वाटतं. म्हणूनच बदल आवडला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/04/2016 - 22:13

In reply to by अस्वस्थामा

आम्ही वुडहाउस वाचला नाही पण म्हणून अगदी लेख समजलाच नाही असं थोडीच आहे. रादर वुडहाऊस वाचण्याशी लेखाचा काहीच संबंध नाहीय.

अगदी सहमत.

चिमणराव Sat, 29/06/2019 - 05:47

लिहीत राहा. वुडहाऊस न वाचताही लेख आवडला.
-----------
पण बरेचसे प्रतिसादकर्ते गेले कुठे? (इतर साइटींवरही हेच झालंय. तीनचार वर्षांपूर्वीचे बरेच गायब आहेत.