खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया
खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया
खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.
त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.
इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.
भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.
याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.
वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.
माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.
१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?
२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?
३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?
४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?
५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?
६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?
७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?
८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.
तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?
पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).
सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.
प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.
हे पहा.
ह्या विषयावर सुमारे २ वर्षांपूर्वी येथेच 'ऐसी'मध्ये बरीच चर्चा झाली आहे. विशेषतः दलित समाजाचा भीमा-कोरेगाव लढाईतील पेशवा सैन्याच्या पराभवाबाबत आणि इंग्रज सैन्याच्या विजयाबद्दल काय विचार आहे ह्यावर तेथे बरेच वाचायला मिळेल.
उच्चवर्णीय/राष्ट्रवादी गट मराठयांच्या ह्या पराभवाकडे इंग्रज सत्तेच्या पायाभरणीचा एक महत्त्वाचा टप्पा मानतो, त्याच वेळी दलित समाज दोन हजार वर्षे चालत आलेल्या आणि पेशवाईपर्यंत दृढमूल असलेल्या दलितांवरील अन्यायाच्या विरोधातील एक महत्त्वाचे पाऊल मानतो हा दृष्टिकोनांमधील फरक आहे. हा फरक नंतरहि मिटल्याचे दिसत नाही तदनंतरच्या काळात गांधींच्या नेतृत्वाखालील इंग्रजविरोधातील राष्ट्रीय स्वातन्त्र्य चळवळीला दलित समाजाचा फार पाठिंबा नव्हता, कारण त्यांच्या दृष्टीतून पाहिल्यास इंग्रज सत्ता ही दलितांवरील दडपण दूर करण्यामधील एक catalyst (मराठी प्रतिशब्द?) होती आणि तिचे अस्तित्व दलितांच्या दृष्टीतून पाहिल्यास एक सकारात्मक घटक होता. जानेवारी १, १८१८ ची कोरेगाव-भीमा आणि १९३१ मधील गोलमेज परिषद इतक्या ११-१२ दशकांच्या कालावधीमध्ये ह्या दोन विचारांमधील अंतर बिलकुल कमी झालेले नव्हते असे दिसते.
धन्यवाद कोल्हटकरसाहेब. आधीची
धन्यवाद कोल्हटकरसाहेब. आधीची चर्चा वाचली. त्यातला कुंभोजकरांचा लेख मागेच वाचला होता.
मुळात ५०० लोक २५,०००ना हरवू शकतील का जिज्ञासेतून मी याकडे पहायला सुरूवात केली. त्यातून ते ८०० विरूद्ध २००० होते हे समोर आले. (अर्थात तेही कमी नाही). या लढाईत निर्णायक विजय व अर्थात पराभव कोणाचाच झाला नाही. याचे मुख्य कारण ही ठरवून झालेली लढाई नव्हतीच, त्यामुळे डावपेच आखायलाही कोणाला सवड नव्हती हे असावे.
शिवाजीराजांच्या काळात महारांची सामाजिक अवस्था कशी होती याबद्दलही मी वाचलेले आहे. ती फार चांंगली नव्हती. शिवाय पेशवाईच्या उत्तरार्धात व पूर्वार्धातही याबाबतीत फार फरक नव्हता. त्यामुळे मराठ्यांना सोडून इंग्रजांकडून लढण्याचे मी जे तात्कालिक कारण म्हटले आहे, तेच खरे असावे. हा घाणेरडा प्रकार पुण्यातच अंमलात असावा, तो इंग्रजांच्या काळात सर्वदूर अंमलात आला, त्यामुळे महारांच्या स्थितीत काहीच फरक पडला नाही, उलट असा परिणाम झाला.
आधीच्या चर्चेत वर उल्लेख केलेल्यातले काही मुद्दे (प्रश्न) आलेले दिसले नाहीत. त्यावर चर्चा व्हावी.
>>मराठा साम्राज्य आज ना उद्या
>>मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच.
खरे पाहता पेशवाई बुडाली हे खरे असले तरी मराठा साम्राज्य बुडाले हे खरे नाही. नामधारी का होईना होळकर/शिंदे/भोसले/गायकवाड/पटवर्धन हे मराठा साम्राज्यातले गट आपापले राज्य राखून होते. मराठ्यांचा पराभव इंग्रजांनी १८१८ मध्ये केला हे खरे नाही. तो आधीच (पेशव्यांसह) सर्व मराठा सरदारांना तैनाती फौजेचे मांडलिक बनवून करण्यात आला होता. भीमा कोरेगाव लढाई ही दुसर्या बाजीरावाच्या अस्तित्वाच्या /अस्तित्व मिटवण्याच्या लढायांपैकी एक होती. त्यावेळी त्याचे बॉस असलेले छत्रपती तरी त्याच्या बाजूचे होते का याविषयी साशंक आहे. बाजीरावास पकडून देणार्यास एक लाख रुपयांचे इनाम होळकरांनी लावले होते त्याची नोटीस होळकरांच्या राजवाड्यात इंदूर येथे नुकतीच पाहिली.
हे अरब / आरब कोण होते?
हे अरब / आरब कोण होते? अरबस्तानाशी काही संबंध असण्याची शक्यता कमी आहे.