त्याचे असे झाले (भाग १)

तो दिवसच असा कसा उगवला होता देव जाणे. किंबहुना उगवण्याआधीच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आदला दिवस कार्यालयात 'प्रकल्प व्यवस्थापक' (Project Manager) या बिरुदाबरोबर येणाऱ्या डोकेदुख्या (अनेकवचन बरोबर नसेल, पण भावना जाणून घ्या) मिटवण्यात गेला होता. आणि हे सगळे कधी नव्हे ते वेळेत पूर्ण करून 'संध्याकाळी घरी लौकर येण्याचा' सनातन वायदा पूर्ण होण्याचा इरादा दिसायला लागताच वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक नावाचा असुर जागृत झाला.
"हेय, पुरू, काही विशेष उद्या सकाळी?" {असुर मराठी बोलत नाहीत. निदान हा 'नवीन पुरी' नावाचा असुर तरी बोलत नाही. अमेरिकेत काही काळ काढून इंग्रजाळलेल्या त्याच्या पंजाबी वळणाच्या हिंग्लिशचे मी हे भाषांतर केले आहे}. झपाट्याने चाल करून येणारा काळा ढग मला स्पष्ट दिसू लागला, पण जवळपास आडोसा किंवा छत्रीचा मागमूस नव्हता. शेवटी मी डोके खाली घालून सरळ पुढे झालो, "नाही, विशेष काही नाही. मी काही काम करायचे आहे का?".
"अं हो. उद्या आपल्या ('आपल्या' काय, हराम्या रांड्या पंजाबी सांडा, अप्रेजलच्या वेळी कुठे जाते रे हे 'आपल्या'?) ऑस्ट्रेलियाच्या ग्राहकाबरोबर प्रकल्प निश्चितीची शेवटची दूरध्वनी बैठक आहे, ती तू करशील का? मग नंतर इकडे येण्याची गरज नाही, घरूनच काम कर". घरून काम कर? असुराने सुरा तर घेतली नाही ना? माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आल्यापासून नेहमी साडेसातीच्या घरात ठाण मांडून बसलेला शनी माझ्या पत्रिकेतून हद्दपार तर झाला नाही ना? अशा गोड गोड शंका मनात रुंजी घालू लागल्या आणि बदकन थंड पाण्याची बादली डोक्यावर उपडी झाली.
"पेगीला सकाळी लौकर हे काम संपवून टाकायचे आहे. ती म्हणत होती की सकाळी आठलाच सुरू करू. मला वाटलेच की तू मोकळा असशील ('"हो रे, मी मोकळाच आहे. जन्माला घालून आणि शिक्षण देण्याचे कर्तव्य पार पाडून माझ्या आईवडीलांनी मला देवाला बोकड सोडतात तसा तुझ्यासाठी सोडलाय'") म्हणून मी तिला सांगितले की पुरू ही दूरध्वनी बैठक करेल.
शेवटच्या बैठकीला तुझ्यासारखा तांत्रिक जाणकार असलेला बरा". शेवटचे वाक्य म्हणजे थोबाडीत सणकावून हाणल्यावर मग हळूच रुमालाने गाल पुसण्यासारखा हा प्रकार होता हे मला कळत होते पण त्यामुळे काहीच फरक पडणार नव्हता. सायंकाळी चारलाच कार्यालय सोडल्याचा आनंद (पहाटे पाचलाच तिथे पोचलो होतो ते सोडून द्या) फार काळ मनात टिकला नाही. उद्या सकाळच्या कल्पनेने अंगावर काटा उभा राहू लागला होता.
त्याचे असे आहे, की हा ऑस्ट्रेलियाचा प्रकल्प येणार येणार म्हणून खच्चून गेले दीड वर्ष गाजतोय. दर वेळेला अशा 'शेवटच्या' बैठकी किती झाल्या ते मोजणे आम्ही सोडून दिले होते. हा प्रकल्प येणार म्हणून 'बिंदू जाळे' या तंत्रज्ञानात काम करणाऱ्या मनुष्यप्राण्यांना (मनुष्य कमी, प्राणी जास्ती) जमेल तिथून गोळा करून त्यांचे प्रशिक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. ती मी इमाने इतबारे पार पाडली होती. तीन महिने प्रशिक्षणाच्या नावाखाली काढल्यावरही प्रकल्प ओटीत पडला नाही म्हणून ती मंडळी 'बाकड्या'वर गेली. सहाएक महिन्यांनी त्या प्राण्यांना अस्वस्थ वाटू लागले. नोकरी मिळवून देणाऱ्या दलालांच्या त्या प्राण्यांना येणाऱ्या दूरध्वनींच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. आणि जसे 'जमेल तिथून' त्यांना आणले होते तसेच 'जमेल तिथे' त्यांच्यातले दहापैकी आठजण चालू लागले. उरलेले दोन असे ओवाळून टाकलेले होते की त्यांना इतर कुणी शुद्धीवर असलेला व्यवस्थापक घेऊ करील असे या जन्मात शक्य नव्हते. बिंदू जालाची शून्य माहिती हेच त्यांचे वैशिष्ट्य.
आणि ही पेगी म्हणजे त्या ग्राहक कंपनीची मुख्य व्यवस्थापिका. वय वर्षे पंचेचाळीस (पण दिसायला तीस; खोटे का बोला?). भारताबद्दल कमालीचे आकर्षण. त्यामुळे प्रत्येक बैठकीत चर्चा मुख्यत्वे भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल. आणि त्यात तिला किती गती आहे ते सिद्ध करण्यावर भर. पहिल्या एक-दोन बैठकींकरता मी थोडे वाचन वगैरे करून गेलो होतो. पण नंतर लक्षात आले की ज्ञानापेक्षा जांभया आवरणे या कलेची तिथे जास्त गरज होती.
तर अशी ही पेगी असायची सिडनीला. आता तिचे आठ म्हणजे आपले सकाळचे साडेतीन. खरेतर मला कार्यालयातच थांबून जाग्रण करून ही 'बैठक' संपवणे सोयिस्कर पडले असते. पण मग माझ्या वेळ-पत्रकावर मी कार्यालयात सलग चोवीस तास थांबल्याची नोंद झाली असती. आणि कोणीही वरिष्ठ व्यवस्थापक आपल्या हाताखालचे लोक कसे नालायक आहेत हे सिद्ध करण्यावरच टिकून असतो. त्याच्या हाताखालचे लोक चोवीस-चोवीस तास काम करू लागल्याचे सिद्ध झाले तर संपलेच.
अशा रीतीने या नवीनासुराने नवे अस्त्र सोडले होते.
त्याचे असे आहे - मालविका (माझी धर्मपत्नी, जिची आज्ञा पाळणे हे माझे आद्य कर्तव्य आहे) अशा भल्या पहाटेच्या दूरध्वनी बैठकींनी नेहमीच वैतागते. एकतर तिची झोपमोड होते. त्याहून मुख्य म्हणजे ती रोज सकाळी साडेचारला उठते आणि मी (... जाऊ दे, कोण किती वाजता उठतो त्यावरून त्याचे मोजमाप करू नये, नाहीतर पुढचा जन्मी मनेका गांधींपासून खूप लांब असलेला कुत्रा होतो म्हणतात). तर ज्या दिवशी मी तिच्याआधी उठून कामाला लागतो त्या दिवशी तिचे नाक तिला जरा खालीच ठेवावे लागते. ते टाळण्यासाठी ती सरळ माहेरी पळते. आणि जाताना ती ज्या सूचनांचा भडीमार करते की माझे डोके उठते. राहत्या घरापासून १३७० मीटर अंतरावर असलेल्या माहेरी जाणे आणि उत्तर (किंवा दक्षिण) धृवावर जाणे यात फरक आहे की नाही?
थोडक्यात, त्या असुराने काडी तर टाकली होती. आणि हातात असलेला प्रकल्प (जो 'जा जिवंत' करण्यासाठी मी सकाळी सहा वाजता कार्यालय गाठले होते) पूर्ण करण्याच्या नादात मी गेल्या तीन महिन्यांत घरी पाठ टेकण्यापुरताच काय तो जात होतो. त्यामुळे भडकायला इंधन चांगलेच तयार होते.
संध्याकाळी लौकर घरी जाऊन मग विद्यापीठात फिरायला जावे, येताना महाराष्ट्र कॅफेच्या मल्याळ्याकडे छान खिमा-परोट्टा हाणावा आणि घरी येऊन 'सिंगिंग इन द रेन' बघावा आणि ... असो, तर असे बरेच बेत करून मी आजच्या दिवसापर्यंत गाडी रेटली होती. आणि आता हे...
घरी अर्थातच भर उन्हाळ्यात फटाके उडाले. "एवढं कामावर प्रेम होतं मग लग्नच कशाला केलं" या संवादाचा एकशेसदतिसावा उच्चारण सोहळा झाला आणि मालू मला एकही सूचना न देता (लग्न झालेल्यांनाच याची दाहकता जाणवेल) माहेरी चालू पडली.
संध्याकाळचे जेमतेम साडेपाच झाले होते. माझे डोके भिरभिरायला लागले होते. निदान चालण्याचा बेत तरी पार पाडू म्हणून मी जामानिमा करून बाहेर पडलो. विद्यापीठात न जाता नदीकाठच्या रस्त्याने फिरत बसलो. डोके हळूहळू शांत होऊ लागले. आणि बऱ्याच उत्साही मनाने मी घरी परतलो. 'अरे, एक रात्र मालू नसली म्हणून डरतो की काय? लग्न होण्याआधी एकटाच होतो ना चार वर्षं? अगदी स्वतःच्या हाताने स्वैपाक करून जेवलो ना?' इ संवाद मनाशीच म्हणून स्वतःलाच संमोहित केले आणि घराच्या दारासमोर उभा राहिल्यावर लॅचची किल्ली नसल्याची शुभ जाणीव झाली.
हाही प्रयोग आधी झालेला होता, त्यामुळे मला त्यातले अंक व्यवस्थित माहीत होते. अंक पहिला मी तिच्या माहेरी जाणे, माझे आगतस्वागत. अंक दुसरा "नाही ना राहवत माझ्याशिवाय अजिबात?" असा चेहरामोहरा करून मालूचे आगमन. माझे वर्तमानकथन. अंक तिसरा दुप्पट वेगाने दुप्पट तापमानाच्या मालूचे अंतगृहात निर्गमन. पंधरा मिनिटांनी घराच्या किल्लीचे हवेतून माझ्या देहाकडे आगमन, झेल घेण्याची माझी पराकाष्ठा आणि किल्लीची कुठल्यातरी अवघड ठिकाणी प्रतिष्ठापना.
हा सर्व मिळून वीस-पंचवीस मिनिटांचा प्रयोग पुढचे चांगले तीनेक महिने आपला ठसा उमटवून जात असे.
तर हे पार पडले आणि मी घरात प्रवेश करता झालो. आणी दुसरी जाणीव झाली. उद्याच्या बैठकीत नक्की काय बोलणे अपेक्षित होते ते विचारायचेच विसरलो होतो. म्हणजे आत्तापर्यंतच्या अनुभवावरून विशेष काही असेल असे वाटत नव्हते. पण न जाणो, उद्याची बैठक खरेच 'शेवटची' असेल तर? 'लांडगा आला रे आला' म्हणताना खरेच आला तर? आता त्या असुराला हलवणे आले. वेळ सात, म्हणजे काही उशीर नव्हता झालेला. पण नवीनासुर भ्रमणध्वनी उचलेनाच. म्हणजे आता त्याच्या फोनची वाट पहाणे आले.
सकाळी लौकर उठण्यासाठी मी नेहमीच तीन वेगवेगळे गजर लावून झोपतो. त्याचे काय आहे, मी आहे थोडा झोपेला जड. जर कुणी उठवायला नसेल तर अनवस्था प्रसंग येऊ शकतो. विद्यापीठात असताना वेळेवर न उठल्याने माझी प्रकल्पाची तोंडी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. ('यात विशेष काय' असे वाटले, तर ती परीक्षा दुपारी तीन वाजता होती हे ध्यानी घ्यावे). तर ते सगळे सव्यापसव्य केले, ऑम्लेट-पाव असे जेवण केले आणि अंक-उच्च (lap-top) वापरून ई-पत्रे वाचत आणि लिहीत बसलो. मध्येच डुलकी लागली. जागा झालो ते भ्रमणध्वनीच्या आवाजाने. असुर जागृत झाला वाटते एकदाचा... नाही, चुकीचा क्रमांक. हे चुकीचा क्रमांकवाले लोक स्वतःच फोन करून "हॅलू, कोन बोल्तय?" असे का विचारत असतील?
त्यांना तसे शिकवले असेल काय? असल्यास कुणी? असे मौलिक प्रश्न स्वतःलाच विचारत मी परत आडवा झालो. परत भ्रमणध्वनी. या वेळी असुर होता.
"काय, पुरु, काय झाले? पटकन बोल, माझा एका ग्राहकाबरोबर संवाद चालू आहे, तो थांबवून तुझ्याशी बोलतोय" (सध्या तुझ्याकडे एकही ग्राहक नाही हे मला काय माहीत नाही काय रे?). माझ्या पृच्छेवर "तुझ्यासारख्या तज्ञ माणसाने अशा गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत ताणाव्यात हे म्हणजे...." अशी प्रस्तावना करून "ते मला बघावे लागेल, नंतर फोन करतो" अशी धमकी देऊन तो गप्प झाला. थोडक्यात, झोपेचे खोबरे. कारण हा असुर दिवस मावळल्यावर सुरेच्या आधीन असण्याची शक्यता बरीच असे. त्यामुळे आपल्या झोपेची वाट लावण्यापेक्षा उद्याच्या बैठकीला आपले आपणच सामोरे जावे म्हणून मी भ्रमणध्वनी आमच्या पलंगाच्या खाली कोपऱ्यात आतपर्यंत ढकलला (तिथे तो 'टप्प्यात नाही' असा संदेश प्रसारित करत असे; मीपण काय काल व्यवस्थापक झालो नव्हतो!) आणि अंक-उच्च मिटून परत आडवा झालो.
अशा वेळेला स्वप्ने पडतात तीसुद्धा झोपमोड होतील अशी - घराला आग लागली आहे आणि अग्निशामक दलाचे लोक दारेखिडक्या तोडायच्या कार्यक्रमाला लागले आहेत; भूकंप झाला आहे, मी पलंगासकट तळमजल्यावरच्या कर्नल थापरच्या बागेत पडलो आहे आणि त्याचा जर्मन शेपर्ड माझे लचके तोडतो आहे; इ इ. त्यामुळे मी दार ठोकणाऱ्या अग्निशामकदलाच्या जवानांकडे दुर्लक्ष करून कुशी बदलली तरीही त्यांनी दार ठोकणे सोडले नाही. मी अनिच्छेने डोळे उघडले. दार खरेच ठोकले जात होते. अगदी त्याच्या बिजागऱ्यांची क्षमता तपासण्याइतपत जोराने. खरेच काही झाले की काय? दाराकडे जाण्याआधी मी स्वैपाकघरात डोकावलो. नाही, गॅस अगदी मालूच्या दृष्टीकोनातून बघितला तरीही संपूर्ण बंद होता. मी मान ताठ करून दाराजवळ पोचलो.
"मालू, मालू", घोगऱ्या आवाजातल्या हाका ऐकून मला क्षणभर सगळे घर फिरत असून मी स्थिर आहे (किंवा विरुद्ध) असे वाटू लागले. मालविका तशी भांडते-तंडते, पण हे? भर रात्री तिला हाका मारणारे पुरुष दारावर? तिरीमिरीत मी दार उघडले.
रमच्या वासाचा एक ढग माझ्या नाकावर आदळला. त्याचे उगमस्थान माझ्या डोक्याच्या एक फूटभर वर होते. मी घाबरून वर पाहिले. आमच्या वरच्या मजल्यावरचा सुधाकर बोंबलवाडकर नामक अवतार अस्वलासारखा झुलत उभा होता. नेमका आमच्या दारातला दिवा सुरक्षारक्षक लावायला विसरला होता किंवा उडाला होता किंवा गायब झाला होता. हा अवतार पाचवाच नव्हे सहावा अंकसुद्धा संपवून आलेला दिसत होता. अन्यथा परत एकदा "मालू, मालू" असा जप करत माझ्या गळ्यात पडण्याचे काही कारण नव्हते. पण तो पडला, मग मला घेऊन खाली पडला, त्या पडापडीत मी मालू नसून एक पुरुष आहे हे त्याला हळूहळू आकळले.
मग माझ्याच घरात मलाच खेचून नेत त्याने सुरुवात केली "पुरू..पुरूश...पुरूशा...पुरुशू" माझे नाव पुरुषोत्तम असल्याचा मला तीव्र पश्चात्ताप झाला. "मालू कुठे आहे?" त्याने जोडाक्षरविरहित डरकाळी फोडली. यावर मी नक्की काय म्हणणे अपेक्षित होते? माझ्या तोंडून शब्द फुटेना. त्याच्या नाकावर एक गुद्दा ठेवून द्यावा का? माझ्यापेक्षा फूटभर उंच असला तरी ज्या रीतीने तो झुलत होता त्यावरून एक हलकासा गुद्दा त्याला धराशायी करायला पुरला असता. पण मालू? हा राक्षस? छे! जीवनाचे फारच बीभत्स अंग माझ्यासमोर उलगडत होते.
"आणी तुम् तुम तुमी इथे कसे". आता तर माझी बसलेली वाचा पार रसातळाला गेली. लॅचची किल्ली न घेता सरळ येरवड्याला पळ काढावा अशी तीव्र इच्छा होऊ लागली. "आणी या भिंतीचा रंग कसा बदलला?" या प्रश्नाने थोडा प्रकाश पडू लागला. "आमच्या आबांचा (हाताची बोटे कानांच्या पाळ्याजवळ) फोटो कुठे गेला?" प्रकाशाची तीव्रता वाढली.
"अहो हे माझे घर आहे, तुमचे वरच्या मजल्यावरती आहे".
"म्हन म्हण म्हणजे मालूपण वर आहे?"
संपूर्ण प्रकाश. या अस्वलाच्या बायकोचे नाव मालती आहे हे मला केव्हातरी सांगण्यात आले होते. एखाद्या कुशल माहिती-साठा व्यवस्थापकाप्रमाणे माझ्या मेंदूने वेळ होऊन गेल्यावर मग ही माहिती पुढे आणली. मालू म्हणजे मालविका! मला क्षमा कर! मी चुकलो!
मी हे बाळ कोल्हटकरी नाटक अजून (मनातल्या मनात) रंगवले असते, पण हे झुलते अस्वल आता हळूहळू गुरुत्वाकर्षण मान्य करण्याच्या मार्गाला लागले होते. त्याला आधी सावरून सोफ्यावर बसवले.
"पुरु..पुरु..."
"अहो, मला पुरूच म्हणा, सगळे तसेच म्हणतात"
"वा, वा, असे कसे, तुमच्यासारके जंटलमन, त्याला आम्ही कसे पुरणार?"
भरपेट दारू प्यायलेल्या माणसाच्या विनोदाला आपण हसलो नाही तर तो स्वतःच खिंकाळू लागतो हे मला ठाऊक होते. पण या प्राण्याचा संवाद 'विनोद' या सदरात पूर्वीच्या 'स्वराज्य' साप्ताहिकानेदेखील छापला नसता.
सुधाकरराव 'स्वराज्य' आणि 'परराज्य' या भेदभावांच्या पलिकडे गेले होते. ते खिंकाळू लागले. तेव्हा कुठे माझे लक्ष घड्याळाकडे गेले. एक. म्हणजे जेमतेम दोन तास झोप मिळाली तर मिळाली.
अचानक खिंकाळणे थांबवून सुधाकररावांनी गळा काढला. "तुमच्यासारक्या जंटलमन्ला तर्रास दिला....कुठं फेडू हे पाप". स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला त्यांनी पवित्रा घेतला. नेहमीप्रमाणे मी नको तिथे तोंड खुपसले. "तसे काही ना..." फटाक.... त्याची अवस्था पहाता स्वतःचा गाल त्याला सापडेल अशी अपेक्षा करणे चुकीचे होते. पण माझा गाल त्याच्या फिरत्या हाताच्या टप्प्यात बिनचूक आला.
छ्या! असली सणसणीत कानफटात पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या सोलेगांवकर मास्तरांनंतर पहिल्यांदा खाल्ली!
पुन्हा त्याने गळा काढला (खरे तर थोबाडीत खाल्ल्यावर मला काढावासा वाटत होता).
थोडक्यात, पुढचे संवाद गाळून एवढेच लिहितो की (माझा झोपेचा) वेळ वाचवण्याकरता त्या महापुरुषाने आमच्या इथेच झोपावे असे ठरले. कारण तो वर गेला, मालतीबाईंनी दार उघडले नाही तर तो खाली झोपायला आला तर चालेल का असा प्रश्न त्याने तीन मिनिटे खाऊन अखेर शब्दात पकडला. मला कमी कमी होत जाणारे दोन तास दिसत होते. म्हणून मी घाईघाईत प्रस्ताव मान्य करून बाहेर सोफ्यावर उशी आणि चादर घालून बाळाला निजवले आणि परत आत गेलो.
बाळ उठायचे ते उठतच गेले. अर्ध्या तासाने, "पाणी कुठे आहे" (पाण्याची एक बाटली दिली); एक तासाने "बाथरूम कुठे आहे" (बाथरूम दाखवली, तिथला दिवा लावला, याचे कर्म आटपल्यावर फ्लश करून दिवा बंद केला); दीड तासाने "अजून पाणी कुठे आहे" (स्वयंपाकघरातला पाण्याचा उगम दाखवला).
दोन तासांनी मी उठलोच.

त्याचे असे झाले (भाग २)
त्याचे असे झाले (भाग ३)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अप्रतिम ताबा घेतलाय लेखनाने.
बाकी पिलेले भाषेच्या पेरणीत गदिमानाही हरवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरीज!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

देव आहे. कारण त्याने रा. कु. ना ईथे पाठवलं आणि त्याचबरोबर चौकसना पण ईथे परत सक्रीय केलं !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आधी वाचलंय. पण नंतरही अनेकदा वाचलंय. आताही वाचलं. मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0