कडेमनी कंपाऊंड

जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस.....

कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या,
कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले.
पुस्तके मनाचा आरसा असतात,
कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते!
पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा
कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा.
‘रमलखुणा’ म्हटलं कि,
आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय,
त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात,
असं वाटतं.
‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’
आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.
तपशील विस्मरणात गेले, पण आठवतात ते
केवळ अज्ञात, गूढ प्रांतात केलेले अगणित प्रवास!
काही प्रवास, भयचकित होऊन,
तिथेच अर्ध्यावर सोडले.
डोळे आणि मन मजबूत झाल्यावर,
परत प्रवास चालू केले....!
आता भय वाटत नाही. फक्त चकित होते.
मनातल्या इतक्या नाना प्रकारच्या खोल दर्पात
त्या माणसाचे मन किती आरपार उतरले होते!
कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
किती लिहिले!
कुणाकुणाचे संचित लिहिले!
नियतीला जणू पानापानांवर खेळवत ठेवले.
माणसं केवळ बंदा वाटायची,
त्याने त्यांची चिल्लर समोर ठेवली.
माणसं केवळ नितळ वाटायची,
त्याने त्यांच्यातला आरभाटपणा दाखवून दिला.
कुठल्या कोनातून पहायचा?
कुठल्या प्रतलावर सगळा खेळ मांडायचा?
तिकडे त्यांनी भय इथले संपत नाही असे नुसते लिहिले,
इकडे याने ते शब्दाशब्दातून दाखवून दिले.
पण ती भिती पुनःपुन्हा हवीहवीशी वाटायची.
कळल्यासारखे वाटायचे,
पण आठवू गेल्यास सगळे निसटून गेल्यासारखे वाटायचे.
खरं तर ठार विसरायलाच हवं होतं आत्तापर्यंत!
पण मनाचा दरवाजा उघडला कि, इस्किलार भेटतोच!
कथा संपतात! पण अर्क उतरतोच मेंदूत. स्मरणात.
नियतीच्या रमलखुणा त्याने सोडवल्या नाहीत,
पण त्यांची आढ्यता अशी काही मांडून ठेवलीय
कि कठीण प्रसंगी नियतीची गूढ सावली ओळखून गप्प राहावे,
इतके अवसान दिले. इतकी समज दिली.
‘सांजशकुन’ होताना,
लाल डोळ्यांचा ‘पारवा’ तटस्थपणे कडेमनी कंपाऊंडवर बसत असेल,
तेव्हा त्याला आजही,
तो लिहिणारा माणूस दिसत असेल!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0