भुरकुंडीचे शहाणे

महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्याला जवळपास समांतर अशी सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या मधल्या पट्टीला 'कोंकण' असे म्हणतात, सह्याद्रीच्या मूळ रांगेला काटकोन करून काही दुय्यम/तिय्यम रांगा समुद्रापर्यंत पोचतात, कोंकणात खूप पाऊस पडतो इत्यादी गोष्टी सर्वांना माहीत आहेतच.
भुरकुंडी हे कोंकणातील एक जोड-खेडे. तिथला डोंगर ("डोंगर कसला, टेकडीच ती; टेकडी तरी कसली, टेकाडच म्हणा" इति शिरूभट, गावचे पुजारी) हा उत्तर-दक्षिण वा पूर्व-पश्चिम यापैकी एकही दिशा मान्य न करता वेलांट्या मारत पसरला होता. सलग पन्नास फूटही जागा सपाट सापडणे महाकठीण. इथे वस्ती करणे जवळपास अशक्यच होते. पण 'अशक्य ते शक्य करिता सायास' या उक्तीला जागणारी पुरेशी माणसे अजून जगात आहेत हे सिद्ध करीत हे जोड-गाव वसले.
गावाच्या त्यातल्यात्यात मधून भुरी नदी वाहत होती. जोडगाव म्हणजे, एका बाजूचे लोक स्वतःचे गाव भुरकुंडी खुर्द सांगत आणि दुसऱ्या बाजूला भुरकुंडी बुद्रुक या नावावर समाधान मानावे लागे. भुरकुंडी खुर्दच्या बाजूला कुंडीदेवीचे देऊळ होते, ज्यामुळे त्या बाजूला 'खुर्द' म्हणवून घेण्याचा अधिकार मिळाला होता. तत्कालीन ब्रिटिश कलेक्टराने हे विभागीकरण मान्य केले होते आणि स्वतंत्र भारताच्या जिल्हाधिकाऱ्याने तोच कित्ता पुढे चालवला होता.
भुरी हे नदीचे नाव आणि कुंडी हे देवीचे नाव म्हणून फारसे आकर्षक नाही हे कुणीही विचारी माणूस मान्य करील. पण नद्यांच्या आणि देवदेवतांच्या बारशाला विचारी माणसांना बोलावण्याची प्रथा नसल्याने असे घडून गेले होते.
गावातील सरकारी म्हणता येईल अशी इमारत म्हणजे भुरकुंडी खुर्दमधला वामनभटाची ओसरी. कारण पत्रे घेऊन येणारा पोस्टमन तिथे तंबाखू मळायला थांबे आणि पत्रांचा गठ्ठा वामनभटाच्या ताब्यात देई. मळायला तंबाखू वामनभट पुरवीत असल्याने हे साहजिकच होते. आणि वामनभट सगळ्यांची पोस्टकार्डे (कोंकण ते; पाकिटे किंवा आंतरदेशीय पत्रे महाग पडतात) वाचून, मनन करून, मगच पुढे सरकवी हेही साहजिकच होते. त्यामुळे दोन्ही गावांमधील सगळ्या घडामोडींची वामनभटाला पक्की खबर असे. मनिऑर्डरी मात्र ज्याच्या त्याच्या पदरात पडत, पण त्यासाठी पोस्टमन आपल्यापर्यंत येण्याची अवास्तव अपेक्षा न बाळगता लोक वामनभटाच्या पडवीला पोस्टमनच्या वेळेला बसून राहत. वामनभटाचे किराणा मालाचे दुकान होते, ज्यात 'उधारी बंद' (मूळ पाटी 'उधारी बंद केली आहे' अशी होती. पण "बंद करायला चालू कधी होती?" या बाबल्या मुसळेच्या मार्मिक शंकेला उत्तर म्हणून पैसे टाकून रंगवलेली दोन अख्खी अक्षरे वामनभटाला अजून पैसे टाकून - अक्षरे तैलरंगात रंगवली होती - पुसावी लागली होती. बाबल्या मुसळेला दिल्या जाणाऱ्या किराणा मालाच्या वजनात या प्रसंगाला साजेशी घट होत असे) आणि 'हातावर तंबाखू - चार आणे' (स्वतः पुडी खरेदी न करता असे 'खिशावरचे हातावर' निभावणारे बहाद्दर कोंकणातल्या कुठल्याही गावाप्रमाणे इथेही होते) अशा दोन ठळक पाट्या होत्या.
गावात दूरध्वनी आणण्याचा प्रयत्न झाला होता. खांब, त्यावर तारा, काही घरांत यंत्रे हे सर्व पोचले होते. पण या गोष्टी कुणी फारशा मनावर घेतल्या नव्हत्या. त्यामुळे ती यंत्रणा चालू आहे वा नाही याबद्दल कुणी एक वाक्यही नासायला तयार नसे. तीच अवस्था विजेची होती. खांब, तारा, काही घरात दिवे असे सर्व होते. पण तेही कुणी मनावर घेतले नव्हते. नाही म्हणायला बुद्रुकमधला तिरसट अच्युत रात्रभर खळ्यातला शंभरचा दिवा जाळत असे. कारण? विजेचे देयक भरमसाट रकमेचे येते म्हणून. आधी काहीच वीज न वापरतानाच अच्युतचे देयक सणसणीत येत होते. पण ती वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांची एक छोटीशी लीला होती. मात्र संगमेश्वराला खेट्या घालून अच्युतचे आधीच तिरके असलेले डोके पारच सटकले. 'पैसे भरायचेच तर वीज तरी जाळतो' या हट्टाने त्याने खळ्यातला दिवा पेटता ठेवला. अर्थात त्याचा पैशाचा स्रोत एकुलत्या एका मुलाच्या रूपात थेट बर्मिंगहॅममध्ये होता. आणि पौंडाला सत्तर-ऐंशी रुपये विनिमय दर असल्याने मुलगाही ते फारसे मनावर घेत नसे. शिवाय "माझे काय? सडा माणूस मी {पत्नी कर्करोगाने निवर्तली होती}. कुठेतरी शेवटचे दिवस मोजायचे. पाहिजे तर तिकडे येऊन पडेन. साहेबाने तीनशे वर्षे काढली ह्या देशात. मला तिकडे पंधरा-वीस काढायला जड नाहीत" असा दम दिल्याने मुलगाही बापाने इकडेच राहावे म्हणून हरप्रयत्नांना राजी होता. (अच्युतने इंग्लंडमध्ये येऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारच मनिऑर्डर पाठवते हे खुर्दमध्ये सगळ्यांना माहीत होते)
कुठल्याही शेजार-शेजारच्या गावांत असावी तशी या दोन गावांतही तेढ होती. खुर्दचा मान देवळाच्या अस्तित्वाने मिळाला असला तरी लोकसंख्या बुद्रुकची जास्त होती. त्यामुळे गोविंदा नाचायला पाय आणि होळीच्या बोंबा मारायला तोंडे त्यांची जास्त पडत. देऊळ, त्याचा पुजारी शिरूभटाचे निवासस्थान, भजनी विनायकबुवा या खुर्दच्या जमेच्या बाजू. मात्र यातील तिसऱ्या गोष्टीला बुद्रुकमधला बंड्या किरवेकर हा तबलजी आडवा जात असे. त्यामुळे भजनाचा शेवट बहुधा शिमग्याने होत असे.
अशाच एका भजनोत्तर शिमग्यात दोन्ही बाजू हिरिरीने सहभागी झाल्या होत्या आणि त्यांचा सुखसंवाद चालू होता.
"नुसते नावात खुर्द असून काय करायचेय? तशी लायकी पाहिजे, काय समजलेत? नाहीतर म्हणतात ना, नाव सोनूबाई आणि हाती ... तशातली गत" जनार्दन किरवेकराने (बंड्याचा बाप) तोफ डागली.
"अरे लायकी असल्याखेरीज नाव द्यायला पूर्वीची माणसे काय अक्कल गहाण टाकून, मिलिट्रीची रम पिऊन कारभार करीत नव्हती..." वामनभट फुसांडला. त्याच्या बायकोचे नाव सोनूबाई होते. जनार्दनाचा दुसरा मुलगा मिलिट्रीत होता, ज्याच्या कृपेने जनार्दनाकडे 'म्हातारा साधू' या जादुई द्रव्याचा कायम साठा असे. जनार्दनाने एकदा वामनभटाला एकच पेला मद्य पाजून "आता संपली" म्हणून वाटेला लावले होते. ती न चढलेली नशा अजून वामनभटाच्या मस्तकात तिडीक उठवे.
इथून पुढे 'दीवार' चित्रपटातल्या प्रसिद्ध संवादाची ("मेरे पास ये है" "मेरे पास वो है"...) तिरक्या मराठीत आवृत्ती निघाली. हेही नेहमीचेच होते. नुसत्या भजनाने करमणूक अशी किती होणार? मात्र शेवटचे हुकुमाचे पान ("मेरे पास मां है") कुणाकडेच नसल्याने हे वाग्युद्ध काही काळ चालून तेल संपलेल्या दिव्यासारखे आपोआप विझून जाई.
त्या दिवशी मात्र बुद्रुकमधल्या अण्णा खोताने हुकुमाचा एक्का टाकला. "अरे, अक्कल कुणाची काढता? आमच्या गावातला वेडादेखील तुम्हाला भारी पडेल... आलेत शहाणे मोठे".
अण्णा खोताची विष्टेट बुद्रुकच्या पार एका कोपऱ्यात होती. गावातले कोणीच त्याच्याकडे नेहमीचे जाणेयेणे ठेवत नसे (वर्गणी मागण्याच्या वेळा सोडून). किंबहुना देवळात येण्यापेक्षा त्याला घाटी ओलांडून पलीकडच्या शिरवलीला जाणे जवळ पडे. पण भुरकुंडीच्या मानाने शिरवली मोठे आणि गडगंज श्रीमंत. बुद्रुक (आणी खुर्दमध्येही) अण्णा खोत सर्वात श्रीमंत. त्यामुळे मोठ्या तळ्यातला लहान मासा होण्यापेक्षा लहान तळ्यातला मोठा मासा झालेले बरे या न्यायाने तो भुरकुंडीला धरून होता.
सगळेच स्तब्ध झाले. ही बातमी नवीन होती.
झाले असे होते, तीन दिवसांमागे अण्णाकडे एक माणूस आला, "काम द्या" म्हणून. विहिरीवरचा पंप बंद पडला म्हणून अण्णा वैतागला होता. पार चिपळुणापर्यंतचे मेस्त्री आणून झाले, पण 'मिष्टिक' काय गावत नव्हती. अण्णाने या अवताराला नीट न्याहाळले. काळी अर्धी चड्डी, वरती उघडा, गळ्यात जानवे, पण ते माळेसारखे घातलेले, कपाळावर गंध उभे अथवा आडवे न काढता गंधाचा त्रिकोण काढलेला, खुरटी दाढी, बारीक कातरलेले केस, दणकट तगडे शरीर, चेहऱ्यावर ख्रिस्त, बुद्ध या लोकांच्या पंगतीतली अतीव करुणा...
अण्णा बोलून गेला, "पंप दुरुस्त करतोस? म्हणशील तितके पैसे देईन" (चिपळुणाच्या मेस्त्रीने 'आता नवीनच घ्या' असे सांगून हात वर केले होते).
एक शब्द न बोलता तो महापुरुष कामाला लागला. तीन तास खपून त्याने तो अख्खा पंप उलगडला आणि परत जोडला. पंप चालू झाला. अण्णाला अतीव आनंद झाला. नवीन पंपाचे पैसे वाचले म्हणून फुटलेली उकळी आवरत त्याने "किती देऊ बाबा? जरी नीट किंमत सांग हां, नायतर स्वतासकट सांगशील" असा सवाल टाकला.
"तुम्ही किती देणार?" कष्टाने त्या महापुरुषाने तीन शब्द खर्चले.
अण्णा या खेळात तरबेज होता. "शंभर देईन" (चिपळुणातल्या मेस्त्रीला एका वेळचे अडीचशे द्यावे लागत).
"पंचवीस द्या" महापुरुषाने सौदा तोडला.
अण्णाने घाईघाईत पंचवीस रुपये त्याच्या हातावर ठेवले (त्या घाईत तो जुन्या आणि मळकट नोटा खपवायचे विसरून नव्या नोटा देऊन बसला) आणि मग बाकीची चौकशी सुरू केली. त्या बऱ्याचशा एकतर्फी संवादाचे फलित म्हणजे तो अवतार अण्णाकडे कायमचा राहायला तयार झाला. आणि तीन दिवसात स्वतःसाठी त्याने खळ्यात बरीचशी टिकाऊ झोपडीदेखील बांधली. अण्णाने त्याचे बारसे करून त्याला नाना फडणीस म्हणायला सुरुवात केली.
हे हुकुमाचे पान वर्मी लागले. कारण चिपळुणातल्या मेस्त्रीकडे जाण्याअगोदर खुर्दमधल्या गजा बापटाचा इंजिनेर मुलगा सुटीला म्हणून आला होता, त्याच्याकडे पंप सोपवून झाला होता. गजाचा मुलगा संगणकवाला, पण "आपल्याला यातले काही येत नाही" हे कबूल करून द्यायला त्याचा बाप परवानगी देत नव्हता. "नटासारखा नट आणि बोल्टासारखा बोल्ट. मग तुमचा तो कांपुटर असो की पंप" हे त्याचे तत्त्वज्ञान. ऍलन टुरिंगला गजासमोर उभा केला असता तर संगणकाच्या छळवादातून जग सुटले असते.
थोडक्यात पंपाची विधुळवाट लागली. आणि "तुझ्या इंजिनेर मुलापेक्षा हुशार हो माझा नाना" असा संवाद अण्णाला योग्य त्या शब्दांवर पुरेसा भार टाकून म्हणता आला. गजाचा मुलगा हैदराबादला परत गेला होता, त्यामुळे बापाचे कापलेले नाक पाहायला तो नव्हता.
बैठक विस्कटली आणि खुर्दच्या मंडळींनी वामनभटाच्या ओसरीत तळ टाकला. एक वेडा, जो शहाण्यापेक्षा जास्त शहाणा असेल, ताबडतोब शोधणे आले. "लौकरच बगा हो, न्हायतर ह्यांचे इंजिनेर येतील परत दिवे लावायला" भंडारवाड्यातला सुरेश गुरगुरला. सुरेशचा आंब्यांचा व्यवसाय होता. गजाने एकदा अख्खे लगडलेले आपले झाड सुरेशला उक्ते दिले होते. मात्र रातोरात निम्मे आंबे गपचूप उतरवले होते असे सुरेशचे म्हणणे होते.
सुरेशच्या शरीरात रक्ताऐवजी माडीच वाहत असे, त्यामुळे गजा गप्प बसला. शिवाय सुरेशचे म्हणणे खरे होतेच.
परत स्तब्धता. एकवेळ कोहिनूर हिरा शोधणे सोपे (सगळ्यांनाच माहीत आहे तो कुठे आहे तो), पण वेडा कुठे शोधावा? "या प्रश्नाला उत्तर नव्हते....राणी केविलवाणी" शिरूभटजींच्या विनूने गळा काढला. अरुण दातेंनंतर कोण हा प्रश्न त्याच्या बापाने सोडवला होता असे विनूचे मत होते. "विन्या, कानपटीन", वामनभट गुरगुरला. विनूने वामनभटाला सासरा म्हणण्याची तयारी दाखवल्यानंतर ही झकापकी अशीच चाले.
काहीही निर्णय न होता मंडळी सांडली.
कुंडीदेवीलाच दया आली की काय कोण जाणे, पण बरोब्बर तिसऱ्या दिवशी एक महापुरुष खुर्दमध्ये अवतीर्ण झाला. खुर्दमध्ये कोणाकडे पंप नव्हता, पण बाबल्याचा जावई स्वतःच्या मोटारीतून ("स्वतःची कुठली आल्ये? ड्रायव्हर हो तो त्या मोटारीवरचा... दुरुस्तीला न्ह्यायला हवी अशी थाप मारून आला असेल मालकाला" इति अच्युत. मुलगा इंग्लंडला जाईपर्यंत अच्युतने डायवरकी करून संसार चालवला होता) सासरी अधिक मासाचे वाण वसूल करायला आला होता आणि मोटार खाली रस्त्यावरच रुसून बसली होती.
भुरकुंडीची भौगोलिक रचना दुस्तर होती हे आधी सांगितलेच आहे. बाबल्याचे घर रस्त्यापासून शंभर फूट वर होते. मोटार रस्त्यावरच सोडायला जावई तयार नव्हता. बैलगाडीच्या रस्त्याने ती मोटार ढकलून वर चढवताना बाबल्याचे सगळे कामकरी फेसाटले होते. आंगण चोपायला आलेल्या रामा घडशीने तर मोटार वर चढवल्यावर आंगणातच कुले टेकले आणि "पाट ग्येली वाटते हो बाबल्याशेट... काय डाक्तराचा खर्च आला तर बगा हो..." असा बाबल्याचा रक्तदाब चढवला. अखेर मोटार ढकलण्याची मजुरी आंगण चोपण्याच्या मजुरीच्या दुप्पट द्यावी लागली.
अशा तापलेल्या धरतीवर वळीवाच्या पावसासारखे दुसऱ्या वेड्याचे आगमन उमटले. तो काय बुद्रुकमधल्या नाना फडणीसाचा जत्रेत हरवलेला भाऊ होता की काय नकळे. एकंदर प्रकरण वागायबोलायला तसेच होते. खाली मान घालून त्याने मोटार तर दुरुस्त केलीच, पण बाबल्याचे पंचाहत्तर नारळही उतरवून दिले. अन्यथा रामा घडशाला आंगण चोपायच्या मजुरीच्या तिप्पट मजुरी नारळ उतरवायला ("ही अशी चमक उटते मदूनच कमरेत...") द्यावी लागली असती या विचाराने बाबल्या खूश झाला आणि खुर्दतर्फे त्याने पुरस्कर्ता व्हायचे कबूल केले.
'तुमचा तो नाना फडणीस काय?' असे म्हणत खुर्दच्या लोकांनी याचे बारसे सखारामबापू बोकील असे केले.
दोन आठवडे खपून सखारामबापूंनी एकहाती बाबल्याचा घराची शाकारणी केली.
येथून पुढे दोन्ही वेड्यांची कारकीर्द समांतर चालली. नाना फडणीस तबल्यातले ज्ञानी निघाले. भजनी धुमाळी जेमतेम वाजवणाऱ्या आणि लग्गी वाजवताना केरव्याऐवजी ताल बदलून दादऱ्यात घुसणाऱ्या बंड्याला आता नानांनी तीनताल, एकताल, झपताल, रूपक अशा पायऱ्या पार करत झुमरा, आडाचौताल अशा इयत्तेपर्यंत नेले.
इकडे सखारामबापू गाण्यातले दर्दी निघाले. 'टाळमृदंग दक्षिणेकडे, आम्ही गातो उत्तरेकडे' अशी अवस्था असलेले विनायकबुवांना बापूंनी यमन, बागेश्री करत सकाळी भटियारचे आलाप आणि संध्याकाळी मारव्याचे पलटे या पायरीपर्यंत चढवले.
अशा रीतीने या दोन गावांत पार बरोबरीच होऊन गेली. मात्र हे दोन्ही महापुरुष नदी कधीच ओलांडत नसत. किंबहुना आपापल्या गावात शिरल्यावर ते तिथून बाहेर निघालेच नाहीत.
आणि जानवली रस्त्यावरच्या माळावर असलेल्या शंकराच्या देवळामध्ये बाबा रत्नाकरानंद यांचे आगमन झाले. काळेभोर खांद्यापर्यंत वाढलेले केस, काळीभोर छातीपर्यंत पोचणारी दाढी, बायकी आवाज, स्वच्छ कपडे, सकाळ संध्याकाळ भसासणारा धूप....
त्यांचा साक्षात्कार पहिल्यांदा कुणाला झाला याबद्दल अर्थातच दुमत आहे. पण साधारण घटना अशी घडली - खुर्दमध्ये राहणारे पंचायत सदस्य तात्या एकदा ग्रुपग्रामपंचायतीची जानवलीमधली बैठक आटपून दुपारी तीनप्रहरी त्या माळावरून येत होते. घटकाभर टेकावे म्हणून महादेवाच्या देवळात शिरले. त्यांना बघितल्या बघितल्या बाबांनी "ये बाळ" असे प्रेमपूर्वक आमंत्रण दिले. तात्या बघतच राहिले. तात्यांना 'बाळ' म्हणण्याच्या वयाचे कुणी शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे त्याला एक सणकवावी काय असा विचार त्यांच्या मनात आग्रहाने घोळू लागला. "पैशाची चिंता करू नकोस... दक्षिणेला जा, तिथे तुझा भाग्योदय आहे". तात्यांना पैशाची चिंता होती हे खरेच होते. त्यांचा लाडका नातू अमेरिकेला शिकायला जायचे म्हणत होता. आणि पुण्यात इंजिनेर असलेल्या (आणी बायकोच्या ताटाखालचे मांजर असलेल्या) त्यांच्या मुलाने "पैशाचे जमणे कठीण दिसते... तुमच्याकडे मागायची लाज वाटते, पण ही संधी सोडून द्यावी लागेल असे दिसते" अशी प्रस्तावना केली होती. त्या बाबाला न सणकवता तात्या घरी परतले.
या घटनेपासून चौथ्या दिवशी एक मारवाडी तात्यांचा गावच्या दक्षिणेला असलेला दोन एकराचा तुकडा भारंभार पैसे मोजून विकत घ्यायला आला.
अशीच घटना जनार्दन किरवेकराच्या बाबतीत घडली (तोच मारवाडी) आणि तीही तात्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेच्या आधी असे बुद्रुकमधल्या लोकांचे मत पडले. पण बाबा 'पावरबाज' आहे याबद्दल (कधी नव्हे ते) एकमत होऊ लागले.
बाबांना (आपापल्या) गावात आमंत्रण करण्याचे अनेक प्रयत्न करून झाले. पण ते व्यर्थ गेले. आणि एका अर्थाने ते बरेच झाले. बाबा खुर्द अथवा बुद्रुकला आले असते तर दुसऱ्या गावातल्या लोकांचे कायमचे नाक खाली झाले असते. शिवाय जानवली रस्ता तसा खूपच गावाबाहेर असल्याने काही विशेष, वैयक्तिक, ... असे काही असल्यास गपचूप संध्याकाळी किंवा रात्री जायची सोय झाली. बायकामुलांसाठी बाबांनी सोयीची अशी वेळ राखीव ठेवली. 'कोंकण दर्शन'च्या प्रवासी गाड्याही तिथे हळूहळू थांबू लागल्या.
'स्त्रीविषयक काही बालंट येईल काय?' अशी चाचपणी करण्यासाठी जिल्हा परिषद सभापती रावसाहेब, आणि सरकारला पाठिंबा देण्यासाठी किती भाव 'फायनल' करावा यासाठी नुकतेच अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदारसाहेब यांनी बाबांची भेट घेतल्यावर तर बाबांच्या शक्तीवर शिक्कामोर्तबच झाले.
मात्र नाना आणि सखारामबापू या दोघांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. दोघांनी आपापल्या गावातली वीज आणि दूरध्वनी या यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केल्या. आता जनार्दन किरवेकराला चिपळुणातल्या मिलिट्री कॅन्टिनमध्ये 'म्हातारा साधू' उपलब्ध आहे की नाही ते घरबसल्या कळू लागले. आणि बाबल्या मुसळेला जावई येण्याची पूर्वसूचना मिळू लागली.
आणि एक दिवस नाना आणि बापू दोघेही आपापल्या गावांबाहेर पडले आणि जानवली रस्त्यावरच्या तिठ्यावर भेटले. तिथून जोडीने त्यांनी बाबा रत्नाकरानंदांकडे मोर्चा वळवला.
एव्हाना बाबांचे संस्थान खूपच भरभराटले होते. अपक्ष आमदारसाहेब थेट वनमंत्रीच झाले होते. त्यांनी देवळाच्या आसपासची वनखात्याची असलेली जमीन अनारक्षित करून "श्री श्री श्री श्री {अर्धवट ज्ञान झालेले पावटे नावामागे एकदा वा दोनदा श्री लावतात; बाबांची कीर्ती चतुर्दिशांना पसरलेली असल्याने त्यांना चार 'श्री'कारांचा बहुमान मिळाला होता} विश्वगुरू {जगदगुरू हल्ली जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात उगवू लागले आहेत. बाबांचा दरारा आकाशगंगा, ग्रहमंडळ अशा वैश्विक ठिकाणांपर्यंत होता} विधिभास्कर {या विधीचा 'सकाळच्या विधी'शी काही संबंध आहे का हे विचारणाऱ्या एका भक्ताच्या डोक्यात बाबांनी राख सावडायचा लोखंडी चिमटा घातला होता} रत्नाकरानंद महाराज संस्थान" या नावे केली होती.
आता कोणत्याही वेळी पाच-पन्नास माणसे तिथे हजर असतच असत.
पण नाना आणि बापू जे झंझावातासारखे आत शिरले त्यांना अडवण्याचे भान कोणालाच राहिले नाही. आणि नंतर हिंमत झाली नाही (दोघेही दणकट आणि तगडे होते हे मागे आलेच आहे).
ध्यान करीत बसलेल्या बाबा रत्नाकरानंद यांना पाहून आधी दोघांनी पोट धरधरून हसून घेतले. मग बुवाबाजी कसे थोतांड आहे, याबद्दल नाना फडणीस यांनी नेटक्या इंग्रजीत विवेचन केले. सखारामबापू बोकिलांनी त्याची हातासरशी हिंदी, गुजराती, बंगाली आणि तमिळ आवृत्ती काढली. मग त्यांनी बाबांवर झडप घातली. एका हिसड्यासरशी नानांच्या हातात बाबांचे केस आले आणि सखारामबापूंच्या हातात दाढी. आतमधला महिपतलाल सोनेलाल पटेल भेदरून पळून गेला. केस आणि दाढी हातात धरून नाना आणि बापूंनी यक्षगान नृत्य केले आणि वाऱ्यासारखे पिसाटत दोघेही धूमतकाट पळून गेले.
गावात स्वतःचा असा वेडा असण्याचे महत्त्व आता दोन्ही गावातल्या गावकऱ्यांनाच नव्हे तर त्या सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांना पटले आहे. सगळे वेड्यासारखे वेड्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता शहाणेही तिथे जायला घाबरतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

" या चौकसाने रांडेच्याने आख्यान रंगवलयन झकास. मात्र शेवट जरा गुंडाळलनीत म्हणून भोसडणारे भेटला की. " अशी दाद द्यायचा मोह आवरत नाहीये Smile भुरकुंडीचे शहाणे अधनंमधनं भेटत राहीले तर बहार येईल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पुल स्टाइल आख्यान आवडले. पण तडका कमी पडला.
शिवाय, खुर्द आणि बुद्रुक या शब्दांच्या अर्थामध्ये घोळ झालेला आहे. तो विनोदसाठी केला आहे की काय न कळे. खुर्द म्हणजे लहान, कमी महत्त्वाचे. चिल्लरखुर्द्यातला खुर्द. बुद्रुक म्हणजे मोठे, वडीलधारे, थोरली पाती, बुजुर्ग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तिकडे छापलंत तर तिथले सगळे मंत्रचळी खवळतील हो! तुमचा पार 'चौनावाला' करुन टाकतील.

लेखन आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी भारी आख्यान.पुलंछाप वाटले हे लेखकाचा दोष नसून कोकणात थोडे दिवस राहिलं की डोकं असंच काम करू लागतं.एक शंका- खुर्द बुद्रुक कोकणच्या मातीत आहे का?वरती घाटावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे! मूडमध्ये जमीनअस्मानाचे अंतर आहे. पण बाळकृष्ण देसाई यांच्या 'गन्धर्व' या कथासंग्रहातल्या एका कथेची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खुसखुशीत लेखनशैली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा "विधीभास्कर" आररं!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0