आस्वलीची वाटचाल... एक वारल्यांचं गाव आहे आस्वली...

केव्हापासून एक गुणगुण मनात होते आहे आठवणीतल्या त्या रस्त्याची.
घोलवड स्टेशन ते आस्वली गाव हे अंतर सात किलोमीटरचं. थोडं जास्तच. १९७८-७९मधली गोष्ट आहे ही. तेव्हा मोबाईल्स नव्हते, फोनही तुरळक असत. आस्वलीला जाणारी एस्टीबसही नव्हती. रिक्शाही जखमी झाल्याशिवाय पोहोचू शकत नसत.
घोलवड ते आस्वली, आस्वली ते घोलवड ही वाटचाल मी दर आठवड्यात दोनदा करत असे. असे नऊ-दहा महिने. सुरुवात केली ती जुलै महिन्याच्या ऐन पाऊसकाळात.
घोलवडला उतरलं की तिथून रेल्वेच्या पटरीवरून चालत बोर्डीजवळच्या लेवल क्रॉसिंगपर्यंत जायचं- (आता तिथे नवीन बोर्डी स्टेशनच झालंय.) आणि मग तिथून कच्च्या रस्त्याने आस्वलीपर्यंत. जास्तीत जास्त एक तास दहा मिनिटांत पोहोचायचं असं मनात धरून झपझप चालत रहायचे. चालताना कधी सोबत असे कधी नसे. पण तो काळ मनात भीतीला स्थान मिळण्याचा नव्हता.
पावसाळ्यात रस्ता कापताना मधल्या रस्त्याने जायचा मात्र विचारही करवत नसे. पटरी टाकून खाली उतरून मधल्या शेताडीतून गेलं तर एक किलोमीटर अंतर कमी होत असे. पण पावसाळ्यात तिथं गच्च गवत, वेली-झाळ्या फोफावलेल्या असत. अनेक ठिकाणी चिखलाची डबकीही असत. तिथनं जाणं अवघड वाटे. त्यापेक्षा सरळसोट पटरीच्या फळ्याफळ्यांवरून पावलं टाकत जाणं जरा कंटाळवाणं वाटलं तरीही बरं असे. पावसाळ्यात पटरीच्या कडेनेही भरपूर दाटी झालेली असे. त्यामुळे खाली पाहून चालताना त्या हिरव्या गर्दीतले चेहरेही हसून साथ करत. लाल एरंड, वेगवेगळी गवतं, घोटवेलीचे ताणे, स्पिट बीटलच्या थुंकीचे फुगे, किडेमकोडेनाकतोडे...
बाजूने कधीतरी खडाडखडाड करत गाड्या जायच्या. एकादं कार्टं ओरडायचं, ओय किधर चले अकेलेअकेले... तेव्हा हिंदी सिनेमांची गाणी जास्त मातलेली नव्हती आणि लोकही. माझ्या पाठीवर खाकी हॅवरसॅक म्हणजे एक दणकट दप्तरच असायचं. अडचण नको म्हणून छत्री नसायचीच. फाटका रेनकोट पाठीवर दफ्तर राखायचा. तोही कशी भिजत चाललीय असं कुणी म्हणू नये एवढ्यापुरताच असायचा.
पटरी तुडवत लेवल क्रॉसिंगपाशी आलं की लगेच पलिकडे एक पाडा होता. चारपाच घरं होती. तिथं एक विहीरही होती. आधी औत्सुक्याने पाहात रहाणारी लाहानी पोरं नंतरनंतर ओळखीचं हसत. एकटं चालत असलं की एक स्वातंत्र्य असतं. आपली पावलं विशिष्ट लयीत टाकायची, वेडीवाकडी टाकायची, तहान लागली तर आकाशाकडे पाहात पावसात आ वासायचा. डोळ्यावर चष्मा असायचा तो काढून टाकायचा. शेजारच्या कुणाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचा, किंवा कुणी आपल्याकडे काय कसं पाहातंय याची नोंद घ्यायचा प्रश्न नसायचा.
मी तेव्हा अगदी बारीक, काटकुळी होते. पण कडक. चालायचं काही वाटायचं नाही, भिजायचं काही वाटायचं नाही, उन्हात तापायचं काही वाटायचं नाही, अनवाणी पावलं कुरकुरायची नाहीत कधी. पायात साधीच चप्पल असायची. ती चिखलाला चिकटू लागली, तुटली की ती हातात घेऊन चपकचपक अनवाणी चालू लागायचे मी बिनधास्त. वाटेतल्या झाडाझुडूपांआड आटपून घ्यायलाही काही वाटायचं नाही. भुकेचं काही वाटायचं नाही, तहान लागली तर कुणाकडचंही पाणी घेऊन कसल्याही भांड्यातून प्यायला काहीही वाटायचं नाही. पाण्यातला काडीकचरा वगळून घोटघोट पाणी पिण्यात काही नवल नव्हतंच. सोबत सहजपणे घेऊन जाव्या अशा पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या नसत. लहान मुलांच्या वॉटरबॅग्ज नाहीतर मग जड काचेच्या बाटल्या हेच पाणी सोबत नेण्याचं साधन असे. त्यापेक्षा हे कुठेही पाणी पिणं सोप्प होतं.
पटरीचा रस्ता संपल्यानंतर कच्च्या रस्त्याला लागलं की चिखलाचं राज्य असायचंच. बैलगाड्यांनी पडलेल्या अस्पष्ट चाकोऱ्यांतून चुळकाचुळका पाणी साठलेलं असायचं. त्यांच्या मधल्या जागेतली जमीन जरा उंचवट्याची आणि घट्ट असायची. त्यावरून चालायचं. रस्त्याकडेला वीतभर वाढलेलं गवत असेल तर त्यावरून चालायचं. एकेक टप्पे ठरलेले असायचे. एक भलाचांगला पिंपळवृक्ष होता. तिथं बहुतेकवेळा कुणीनाकुणी विसाव्याला टेकलेलं असे. आपणही टेकायचं. कोठ् चाल्ले. आस्वाललं. आमी तं नागबंधावं जांव. चला हारीच जांव. असं काहीबाही बोलणं होई. किंवा मग डॅहॅणूंलं. बॉर्डीं जांव बाजारलं. अशी नेमकीच देवघेव होई. मग कोणी विचारे- धनजी नॅहीं... कोठ आहें,. आस्वाललं? मुंबईलं. येनार आहें कां. हो येईल उंधी. उंधी? सांगजोस तेलं. – मिलला होतां म्हन.
मग येई नागबंध पाडा. तिथे सुंदरचं छोटंसं दुकान. तिथं पाणी पिऊन पुढे सरकायचं. मग रामजी भेसकरचं घर. तिथं हाक मारून पुढं. मग माझी खूप आवडती जागा. डावीकडे नदीचं वळण यायचं. तिथे वाटेवर झुकलेली झाडं, बांबूचं बेट असा एक सुंदर टप्पा होता. त्या तिथे रस्ता सोडून आत झाडीत घुसलं आणि नदीच्या काठाकाठाने गेलं तर आमच्या सेंटरच्या झोपडीच्या मागून जाता यायचं. आणि रस्ता नाही सोडला तर सरळ जाणारा रस्ता पुढे आता धरण झालंय तिकडे जायचा. आणि गावठाणपाड्याकडे आमच्या घराकडे वळणारा डावीकडे वळायचा. वळलं की पुन्हा उजवीकडे एक कवरी विणायचा ‘कारखाना’ होता. कवरी म्हणजे काय, तर पावसाळा उलटल्यानंतर भाताचे पेंढे सोनेरी सुकून गेले- त्याला वारली भाषेत पुली म्हणत- की ते विणून, गुंफून औषधाच्या काचेच्या बाटल्यांसाठी कव्हर्स विणली जात. नेआणीमधे त्यांची फुटाफूट होऊ नये म्हणून पॅकिंग. त्यानंतरच्या काही वर्षांतच पॅकिंगचं सामान बदललं आणि कवरी विणायचा कारखाना बंद पडला. तर तिथं गावातल्या पोरीसोरी कवरी विणत बसलेल्या असायच्या. एका कवरीला पंचवीस पैसे असा काहीतरी रेट होता.
मला बघून त्यांचा कल्ला झाला की बरं वाटायचं. राती येव हाँ चं भरघोस आश्वासन देऊन मला निरोप. तिथून दहा मिनिटांवरच आमचं सेंटर होतं. कुणीतरी मागून ओरडायचं- जा लाहौ. धनजी वांट हेंरत आहे. आणि हसू उधळायचं. धनंजय आणि माझं लग्न होणार याची अर्थातच आम्ही सोडून सर्वांना खात्री होती.
धनंजय किंवा प्रताप किंवा तिथे जाणारे कुणीही लोक चालताना बरोबर असले की चालताना मनाशी रमणं व्हायचं नाही. बोलण्यात, खिदळण्यात नाहीतर भांडण्यातच वाट सरायची. पण कितीतरी वेळा मस्तराम एकट्ने चालत यायला प्रचंड आवडायचं मला. सभोवारच्या अर्धा मैल परिसरात तर शांतीत शांती. कोतवाल, कावळे, बुलबुलांचे मधूनच आवाज. किड्यांची किर्रकिर्र, खुसफूस, सरड्यांची खसफस, डबक्यातून बेडूक दचकायचे त्यांची प्लॉपप्लॉप पळापळ, किंवा पाऊस पडत असेल तर ड्राँवड्राँव... आपल्याच पावलांचा आवाज फक्त सतत.
क्वचितच कधीतरी मला एकाटसुनसान रस्त्याने जाताना धास्ती वाटली असेल. पण ती धास्ती एखादी ओहोटीची लाट उगीच कुचमत पुढे यावी तशी असायची. मी अनेकदा सकाळीच निघून दुपारी पोहोचणाऱ्या गाडीने येत असे. म्हणजे आईबाबांचा आग्रह दिवसाउजेडी जा एवढाच असायचा बिचाऱ्यांचा. पण अकरा वाजता घोलवडला पोहोचलं की ऐन मध्यान्हीच्या उन्हातून चालावं लागायचं. जुलै-ऑगस्टमधे ठीक होतं. सप्टेंबरमधे कधी पावसाने दडी मारलेली असली की चटचट तापायचं सगळं. मधूनच आकाशाकडे विनवून पाहात, सावळ्या ढगांसाठी डोळे लावत चालायचं. ऑक्टोबर मध्यावर चिखल सुकू लागलेला असे. मग एकदा आम्ही प्रथमच पटरीने न जाता पटरीवरून खाली उतरून त्या मधल्या रस्त्याने गेलो. काय सुंदर वाट होती ती. दुतर्फा शेताडी नाहीतरी उंचवट्यांवरल्या झाडांच्या रांगांत गुंतलेल्या वेली. कुठेतरी मधेच लपणातून डोकावणाऱ्या वारली झोपड्या.
मग नंतरच्या सगळ्या फेऱ्या त्याच वाटेने झाल्या. पाऊण मैल अंतर कमी असेल तसं त्या वाटेने पण वेळ जवळपास तेवढाच जायचा. कारण खुणावणारे थांबे जरा जास्तच होते. वाटेत आदिवासी ग्रामसेवकाचंही घर होतं. तिथं पाणी प्यायला थांबल्याशिवाय त्याच्या पोरांशी गप्पाटप्पा केल्याशिवाय पुढं जाताच येत नसे. शिवाय वाटेत बोरंही थांबवायची. काहीच नाही मिळालं तर तोंडात टाकायला गुंजेचा गोड पाला तरी देतच असे उदार वाट...
एक जागा होती- सरळ बैलगाडीच्या चाकोऱ्यांनी पाडलेली वाट. तिचं पुढचं टोक म्हणजे आंधळं वळण. पलिकडून कुणी येतंय का दिसायचंच नाही. कुठलंतरी रहस्य त्या वळणापलिकडे भेटेल की काय अशी हुरहूर लावेल असं वळण. तिथंच थांबून रहावं किंवा तिथून पळत सुटावं असं काहीसं वाटायचं. पण दोन्हीपैकी काहीच कधी केलं नाही. संथ गतीने चालतच रहायचं. एकदा त्या वाटसांदीत शिरले आणि मागून कर्रकर्र ऐकू येऊन थबकले. आस्वलीचा दत्तू बैलगाडीवर बसून येत होता. मला बघून आनंदात ओरडून त्याने बैलगाडीत बोलावलं. “चल, हारींच जांव.” मी आनंदाने पुढच्याच बाजूने चढायला गेले- गाडीत बकरीच्या लेंड्या भरलेल्या! मी पाहातच राहिले. तेव्हा दत्तू म्हणाला- “क्या नॅहीं हॉत. बस, झटं.” मी त्या वाळक्या लेंड्यांच्या घुळघुळ्या गादीवर आरामात बसले. थोड्या वेळाने आपण कशावर बसलोय वगैरे विसर पडला आणि चाळीस मिनिटांचा चालचाल रस्ता बैलपावली वीस मिनिटांत संपला. त्या लेंड्या कुणाच्या तरी बागेत घालायला दत्तू चाललेला.
मग एकदा संध्याकाळची गाडी लेट झाली. आणि हिंवाळी तोकड्या दिवसांत साडेसहालाच अंधार झाला. घोलवडला आमच्या सेंटरच्या शेजारच्याच झोपडीत रहाणारा दशमादा भगत आणि त्याची बायको नि एक पोरगी भेटले- मग काय- “चल, हारींच जांव.” दशमादा भगत म्हणजे ताडीबहाद्दर. पण आता हारींच म्हणजे हारींच. सुटकाच नव्हती. ते सगळे रमतगमत चालत होते. मी सांगितलं- चालां झटं... लाहौ करा... तर हसले माझ्या घाईला. आणि मधेच दशमादा सुळ्ळकन एका घराकडे वळला. तोवर इतका अंधार मिट्ट झालेला की एकट्याने जाते म्हणण्यातही अर्थ नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. मग त्यांचं साग्रसंगीत ताडी गरम करून पिणं सुरू झालं. फक्त चुलीतल्या निखाऱ्यांचा उजेड आणि वर दिसणारी आकाशगंगा. मग चिंता सोडून आकाश भरून घेतलं, ते आजवर पुरलंय. अखेर साडेनऊपावणेदहाला मंडळी हालली. आणि म्हटली- चंलां, आता जांव झटं. मुघाबायला लेट झालां. चांला झटं. लाहौं. साडेदहाला सेंटरवर पोहोचले तेव्हा धनंजय, प्रताप सगळ्यांनी हजेरी घेतली. मागे दशमादा तराट उभा. ओय- क्याला कजा करता. आम्हीं हारींच आलो. सगळं सांगितल्यावर सगळे हसूनहसून मेले. दशमादाची सोबत म्हणजे लेटच.
पाठोपाठच्या एका संध्याकाळी घोलवडला उतरले आणि त्याच लाडक्या मधल्या रस्त्याने चालू लागले. तर एक वारली तरूण मुलगा पाठोपाठ आला.
कोठ जास? आस्वाल?
हो.
सेंटरवर?
हो. तू कुठला.
मी जेठू. डोल्हारपाड्यात. चल, हारींच जांव.
हारींच जांव.
दे तुझी ब्याग घेतो.
राहू दे. हलकीच आहे.
मग तो कुठे असतो, काय करतो वगैरे जुजबी चौकशी करून आम्ही चालू लागलो. तोही पूर्वी सेंडरवर येत असे म्हणाला. आता उंबरगावला सायकलच्या दुकानात कामाला होता.
आम्ही चांगले भरभर चालत होतो. थोड्या वेळाने मी पाणी प्यायला थांबले तेव्हा तो पुढे जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं असावं पाणी प्यायले म्हणजे मी दमले असणार. म्हणाला, देस् तुझी ब्यॅग, मी घेतो. दिली.
सेंटरवर पोहोचण्याच्या जरा अलिकडेच डोल्हारपाड्याचा फाटा होता. त्याने मला बॅग दिली नि तो निघाला. म्हटलं चल सेंटरवर चहा प्यायला. तर नको म्हणाला. आणि झुळकन्न् नाहीसा झाला.
मी पोहोचल्यावर सहजच सांगितलं की मला असाअसा जेठू नावाचा मुलगा भेटलेला. दत्तू, धर्मा, बाबू, धनंजय सर्वांचीच तोंड पालटली. मग तो असा होता का तसा होता का... मी सांगत गेले. तो उंबरगावला सायकलच्या दुकानात कामाला आहे म्हणून सांगितल्याचं सांगितलं. माझी बॅगही त्याने उचलल्याचं सांगितलं तसं सगळ्यांचेच हात कप्पाळावर गेले.
“आणि परत पण दिली?”
“हो…”
“अरे तू म्हणजे थोर आहेस बाबा. अगं तो जेठू म्हणजे- फरार आहे. चोर आहे. कुणालातरी मारलंही होतं म्हणतात.”
“आता मला कसं कळणार. आणि माझ्याशी नीट बोलला. बॅगही परत दिली ना. मग झालं तर.”
पण त्यानंतर माझं संध्याकाळी एकट्याने सारा रस्ता चालत येणं सर्वानुमते बंद करण्यात आलं.
त्यानंतर काही महिन्यांनी कळलं जेठूचा कुणीतरी खून केला. मिटला तो.
सात किलोमीटरच्या वाटचालीत एका एकट्या मुलीबरोबर तो भलेपणानेच वागला होता हे तर मिटत नाही.
नंतर मी सांध्यरंग वाटेवर उतरलेले पाहिले ते धनंजयच्याच सोबतीने, पायाखाली चांदणे उलगडलेले पाहिले तेही त्याच्याच सोबतीने.
दिवसाची टळटळीत वाटचाल मात्र अनेकदा एकट्याने करायची संधी घेत राहिले. आजवरही...

आस्वलीला पावसातून पोहोचायचो तेव्हा बरोबर अनेकदा पातीचहाची जुडी नि चार काड्या पुदिना अशी वीस पैशाची जुडी किंवा आठ आण्याच्या तीनचार जुड्या घेऊन जात असू आम्ही.
हाडापर्यंत भिजत, कातडं लिबलिब होईपर्यंत पाणी मुरवत पाच मैल तुडवत गेलं की जे कुणी घरात म्हणजे सेंटरवर असे त्याने दुरूनच पाहून रॉकेल असेल तर स्टोव् नाहीतर चुलीतली आग पेटवलेली असे. भांड्यात पाणी तापत टाकलेलं असे. त्यात ती अख्खी जुडी लोटून देऊन- भरां उकळू देजोस हौ.- चहा-साखर आणि दुधाची भुकटी सावकाश लोटायची. मग आमचे एनॅमलचे मग्ज भरून तो पातळ लज्जतदार, गोड चहा आम्ही सारे घ्यायचो. चहात बुडवायला बडबडच असायची हातातोंडाशी.
आता एक धाकला मित्र विचारतोय- तुमच्याकडे तेव्हा रमबिम नसायची कां... म्हटलं तेव्हा पैका फार महाग होता लेका. परवडायचं नाही काही. ताडी प्यायला परवडायची. पण मी ती उगीच चवीपुरती चाखलीय.
ताडी पिण्याची गंमत. मुलगा नि मुलगी यांनी एकमेकांना संगतीच जगण्याचा होकार दिला की नाही यासाठी एक परीक्षा असे. मुलगा मुलीला सुर प्यायचं- म्हणजेच ताडी प्यायचं निमंत्रण देत असे. ती हो म्हणाली तर पटली. नाही म्हणाली तर कटली. असा हिशेब.
धनंजयची नि माझं बराच काळ भवति- न भवति चाललं होतं. म्हणजे म्हटलं तसं- सारा गाव जाणत होतं की आम्ही नवरास् न बेहलसं. पण आमचंच नक्की होत नव्हतं.
मग जानेवारीच्या एका पौर्णिमेच्या आदल्या रात्री आम्ही एकमेकांना फायनल हो म्हणून टाकलं. ती बातमी पोरांना रात्रीतच कळली होती. ती सकाळी पसरलीच.
मग “धनजी, मुग्ताबायला सुर पाज. पियाली तरच खरं.” असं प्रत्येकानेच सांगून झालं.
मग नदीचं पात्र ओलांडून आम्ही गेलो. तिथं ताजी काढलेली गोडी ताडी धनंजयने मला ऑफर केली. आणि मी ती एका पानाची दोन टोकं चिमटून धरलेल्या द्रोणातून प्यायले बा. मग बातमी अधिकृतपणे पसरली. चिडवणे, मस्कऱ्यांना ऊत आला. अशी सुर प्यायची गंमत... धनंजय ताडी पिणं एंजॉय करायचा. मला नाहीच आवडली तिची चव कधी. पण हा संदर्भ मात्र खूप गोड वाटला.
गोडच होते आमचे वारली मित्रमैत्रिणी.
एकदा सगळ्या पोरींनी रात्रीचा अक्षरओळखीचा वर्ग झाल्यावर मला नाचायला यायचं आमंत्रण दिलं. आणि लक्षमने सांगितलं की- “मुग्ताबाय, तू आज नाचाले माझी साडी नेस हौ.” तिनं साडी दाखवायला आणलीच होती. बोर्डीवरून आणलेली नवी कोरी हिरवीकंच लालछटेची मऊ सुती साडी.
मी म्हटलं अगं नवी साडी आहे. तूच नेस. “नाहें. आज तू. उंधी मी. बघ कशी मस्स्तं दिसशील. तू तं पारशीन जशी गोरीगोरी नं.”
तिचा आग्रह खरा होता. मी ती साडी नेसले अखेर. मग कौतुक- बघ कशी पार्शीनजशी नांगाय...
मग नाचायला गेले. ती साडी तशी बरीच मोठी होती. ती घेऊन मला काही नाचता येत नव्हतं. पण त्यांनी मला फेरात सावरून घेतलं. हसणं, खिदळणं... धमाल. रात्री घरी परतल्यावर तिला साडी घडी करून परत दिली.
दुसऱ्या दिवशी पाहिलं लक्षम ती साडी नेसून आलीच. तिने आता त्या साडीचे दोन भाग केले होते. एका साडीत दोन साड्या... एक तिला, एक तिच्या आईला. म्हणून तिने काल रात्री घाई केली होती. फाडायच्या आधी आखुटच साडी मुग्ताबायला नेसवायची होती...
कधी न विसरण्याची गोष्ट. कोण नवी साडी घडी मोडायला देतं सहजपणे- आई मुलीला नाहीतर सुनेला देते ते सोडलं तर...
या गरीब वारल्यांकडे थोडी मातीची भांडी, अल्युमिनियमची भांडी, चूल, एखादी तट्ट्याची चटई एवढंच सामान असायचं. या कुडापासून त्या कुडापर्यंत टाकलेल्या एक दोन आडव्या बांबूंवर सर्वांचे कपडे टांगलेले असत. प्रत्येकाकडे दोन जोड. कधीकधी तर एखादाच.
काठी, कुऱ्हाड, विळा, पहार अशी काही आय़ुधं असायची.
सगळ्या झोपड्यांच्या बाहेर एक कारवीच्या कुडांचा चौकोन करून बांबूच्या स्टॅण्डवर ठेवलेला असायचा. पिण्याचं पाणी त्यावरच्या मडक्यांत भरून ठेवलेलं असायचं. घराच्या बाहेर असं पाणी ठेवण्याची- आल्यागेल्या कुणालाही पाणी पिता यावं अशी पध्दत इथंच पाहिली.
घरात चुलीजवळ एखादं भांडं भरलेलं असायचं. भात शिजवण्यापुरतं. तवाही असायचा. किंवा मग एकमेकांकडून मागून घेत असतं. ओतभाकरी करायची पध्दत असे पण ती फारवेळा केली जात नसे. नवा लाल तांदूळ आला की तो नवा चवदार भात खाणं किती मनापासून करायचे आमचे वारली. तो खाऊन पोटं फुगायची आणि मग ढमाढम पादण्याची नि पाठोपाठ खदखदून हसण्याची स्पर्धा. त्या पादण्याचा जोरदार उत्सव हसण्याच्या घोषात सुरू रहात असे.
चांगलं सुग्रास अन्न म्हणजे काय हे माहीत असलेल्या आम्हाला त्या आनंदाने आतल्या आत चुपचाप गलबलून यायचं.
आता मात्र परिस्थिती बरीच बदललीय. भाताबरोबर तेल, भाज्या, कोंबड्या आहारात येऊ लागल्यात.
तेव्हा मात्र तेलाचा वापर फारसा नसलेलंच अन्न असे त्यांचं. स्निग्धांश, प्रथिने, चौरस समतोल वगैरे सगळं कुठेतरी दूरदूर कुणाच्यातरी पाठ्यपुस्तकांत मिटून राहिलेलं असायचं.
या समाजात कोंबडीही क्वचित, बकरा तर दुरापास्तच. गुरं पाळून दूध काढायचं त्यांच्या परंपरेत न बसणारं. म्हणून दूधदहीताक वगैरे प्रश्नच नसायचा. माहीत असलेले कंद उकरून भुजून खायचे. आठवडाबाजारात मोळ्या घेऊन गेलेल्या बाया परतताना चवळी, चणे-हरभरे ही कडधान्ये- उच्चारी च्यवळी, च्यनं- घेऊन कधीमधी येत. एक अगदी बारीकशी- क्वार्टरची किंवा त्यापेक्षाही लहान तेलाची बाटली भरून आणत. त्याचा उपयोग डोकीला लावाले, आणि कधीमधी आंबटातच थेंब दोन थेंब ओताले. आस्वलीतला एक भिवा डोल्हारी नावाचा वारली नियमितपणे एक मोठी बाटली तेल वापरायचा तर आख्खं गाव त्याला तेलची म्हणायचं.
कोंबडी हळदमीठतिखट लावून बारीक तुकडे करून चुलीत भाजायची. तांदळाच्या कालवलेल्या पिठाची ओतभाकरी करून तिच्याशी भाजके बोंबील, किंवा भाजलेलं खारं. आजोळ्याच्या बियांची सुकट घातलेली किंवा नुसती मिरची घातलेली चटणी खायची.
नदीचे मासे, पावसाळ्यात मुबलक मिळणारे बेलकडे म्हणजे खेकडे, कधीमधी गावणारे रानपक्षी काटक्यांच्या आगीत होरपळवून चुखून खाणे हे असलेच प्रथिनांचे सोर्सेस. पावसाळ्यात रानात मिळणाऱ्या लहान बोराएवढ्या शंखांतला- खुबं म्हणायचे ते- बाऊ मडक्यांत गोळा करून आणायच्या बाया.
त्यांच्या जेवणात धान म्हणजे भात हे मुख्य. कालवणासाठी आंबट घालायला चिंचा, नाही तर कैऱ्या, कुसुंबाची आंबटढाण फळं, काकडं, काही पिकवलेल्या भाज्या, स्वस्तात मिळवलेले सुके मासे वगैरे. हे सारं पाण्यात उकळत ठेवायचं. हे सगळं करताना ते सगळं पाण्यात तिखट, मीठ, चैनीसाठी लसूण ठेचून घालून उकळवायचं बस्स. बांबूचे कोंब त्यातच ढकलायचे. बोरं, करवंद, काहीही त्यात ढकलायचं... हीच चैन. बांबूच्या कोंभामुळे त्या सर्वाला एक उग्रस वास यायचा. माझी ते खाण्याची हिंमत झाली नाही कधी. ते पाणी भातात जिराकजिराक घालून भाताशी खायचं.
दिवाळीतला सर्वांचा लाडका मेन्यू म्हणजे भिजवून उकडलेल्या मीठ लावलेल्या चवळ्या, भाजलेले जाडे बोंबील आणि पानात वाफवलेली धानाची भाकरी.
आमच्या सेंटरवर तशा बऱ्याच वस्तू होत्या. पण कधी कुठल्या वस्तू इकडेतिकडे झाल्या नाहीत कधी. साबणाची वडी झिजून बारकी झाली की मात्र हमखास गायब व्हायची. आणि मागून नेत कधीकधी ते लाल तिखट आणि मीठ. ते आम्ही आणून ठेवलेलं असायचं. लाल तिखट आणि मीठ घालून ‘च्यटना कुटून खांव’ हा आवडता कार्यक्रम असे. चिंचा, कैऱ्या, कच्ची करवंद, सुके बोंबील... सारे च्यटना कुटून खांवच्या रांगेत असायचे.
एक दिवस अक्षरं शिकायला येणाऱ्या सगळ्या पोरींनी मला ‘उंधी डोंगरावर ये आमच्याहारीच’ असा आग्रह चालवला. त्या बकऱ्या चारायला डोंगरात जायच्या. तो दिवस कायम लक्षात राहील. सकाळीच फक्त चहा पिऊन नि एक लहानसा पाव खाऊन मी निघाले त्यांच्यासोबत. परत कधी यायचंय वगैरे काहीच विचारलं नाही.
निघाले तेव्हा धनंजय हसला. तू जातेस? बघ बाबा... (तोवर आमचा एकमेकांना होकारबिकार काही झाला नव्हता.) मी निघाले. करडं नि शेळ्या आणि सातआठ पोरी, तीन पोरं, आणि एक मोठी बाई आणि मी असे आम्ही निघालो. पावसाचेच दिवस होते. डोंगर पावसात भिजून चिंब झालेला. सारे खडक चकचकीत किंवा मग हिरव्या मॉसने किंवा गडद हिरव्या शेवाळाने झाकलेले. शेवाळाने झाकलेले गडद काळेहिरवे खडक महा धोकेबाज. आपटी खाणारच. त्यावरून आम्ही सारे टणाटणा उड्या मारत चाललेलो. थोड्या वेळाने पावलांना आपोआप अक्कल येते कुठे टेकायचं नि कुठं नाही.
सोबतची सोनीबाय कंबरेला एक गाडगं बांधून चालली होती. दगडांतून चालताना वाकून काहीतरी वेचत होती आणि पदराच्या शेवात टाकत होती.. काय करतेय पाहिलं तर ती डोंगरातले खुबे किंवा गोगलगायी वेचत होती. तेव्हाच कळली ही खुबे खाण्याची खुबी. तिला विचारलं याचं काय करायचं. तर तिने केसातून एक हेअऱपिन काढली. आणि तिच्या टोकाने ते खुबे कसे उचकटायचे आणि त्यातलं मांस कसं गोळा करायचं ते दाखवलं. वाटेत करडं चरत थांबली आणि तिथं खुबं नसतील तेव्हा ती पटापटा ते खुबे पिनेने उघडून त्यातलं मांस गाडग्यात टाकायची. आंबट ब्येस हुतंय म्हणाली.
सूर्य बाहेर डोकावतच नव्हता त्यामुळे दिवस किती चढलाय हे कळायला मार्गच नव्हता. सोबत घड्याळही आणलेलं नव्हतं. किती वाजलेत हे भुकेवरूनच ओळखायचं होतं. शेवटी भूक कोकलायला लागली तेव्हा मी पोरींना विचारलं, आता घरी जायचं. त्या खिदळल्या. म्हटल्या हे मुग्ताबाय दमली. म्हटलं- नाही पण भूक लागली. तुम्हाला नाही लागली? तर त्या नुसत्याच खिदळल्या. सोबत एक रतना नावाचा मुलगा होता. शाळेत नियमितपणे जाणारा आणि नीट शिकत असलेला तो एकटाच मुलगा. तो म्हणाला. “हो भूक लागली. पेक तांव,(थांब जरा). मी आणतोय कायतरी.” ती पोरं पटापटा एका झाडावर चढली आणि गदागदा त्यावर नाचली. सगळीकडे हिरव्या टोकेरी फळांचा सडाच सडा पडला. सगळी पोरं वाकून ती गोळा करू लागली. चारदोन मीही उचलली. त्यांनी आणखीही दिली. पोरांनी जसं केलं तसंच मीही केलं. ते टपोऱ्या बोराएवढं फळ जाड हिरव्या-पिवळट सालीचं होतं. आणि सोलल्यावर आत पिवळसर तांबूस पारदर्शक सुंदर दिसणारा गर. खाल्लं. अरे देवा... देवच आठवला. इतकं आंबट फळ कधीच खाल्लं नव्हतं आधी. ती पोरंपोरी पटापट फळं सोलून खात होती.
“खा, मुग्ताबाय, रानात हेच खाया.” मी आणखी चारपाच फळं निकराने खाल्ली. जीभ जणू सुन्न झाली तेव्हा आणखी थोडी खाल्ली. त्या फळांचा परिणाम उलटाच होता. इतकं कडूआंबट आम्ल होतं त्यात की त्याने भूक वेडीपिशी झाली. त्या मुलांच्या जठराला कसलीकसली ‘सवं’ झाली असेल कल्पनाच करा.
नंतर संदर्भ शोधले, कोशिंब किंवा कुसुंबाची फळ अशी सर्रास कुठे खाल्ली जातात असा एकही संदर्भ मिळाला नाही.
सोनीबाय कुठंशी गायब झालेली. ती परतली. तिनं सोबत एक भाकरी आणि कवटाचा म्हणजे तिच्या घरच्या कोंबडीच्या अंड्याचा पोळा आणलेला. तिच्या जुनाट भिजक्या साडीच्या एका गाठीत एका पानात बांधलेली ती शिदोरी तिने सोडली. बाकीच्या या पोरांकडे काहीच नव्हतं. ती फळं खाऊन सारी ओढ्यावर भरपूर पाणी पिऊन पुन्हा रानोमाळ झाली. सोनीबायने मला तिच्यातली अर्धी भाकर आणि पोळा ऑफर केला. कशी घेणार होते मी. ही सारी पोरं उपासपोटी फिरत होती. सोनी म्हणाली, “तू खा मुघाबाय, त्यांचं काय नाय. सवं.” मी तिच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून चतकोरातला नितकोर घास घेतला. त्यात मीठ नव्हतं काहीच नव्हतं. पण तो केवढा अलगद पोटात जाऊन समाधान देऊ लागला. मग तिने त्या भाकरीतले आणखी चार तुकडे जवळच खेळणाऱ्या चार पोरींना दिले. त्यांनी ते खिदळतच खाऊन टाकले... मग सोनीबाय वाटणीला उरलेली अर्धी भाकर खाऊन पुन्हा खुबं धुंडाळू लागली.
आमच्या पोरींच्या काय गप्पा चाललेल्या, काय खिदळणं चाललेलं, मला काहीसुध्दा आठवत नाही आता. मी भुकेनं झेलकांडले होते. वाटेत मिळेल तिथल्या ओढ्याझऱ्याचं पाणी पोटभर पीत होते. ते कितीवेळा रिकामंही होऊन जात होतं. कारण थंडगार पाऊस मधूनच भिजवत होता. कपडे अंगावरच सुकवत तशीच नेटाने चालत... ती पोरं बघ कशी असं स्वतःला दटावत चालत राहिले होते. कुसुंबाच्या फळांचा फराळ चाललाच होता त्यांचा. सप्टेंबरमधलं रान अगदीच कंजूस असतं, खायला काही म्हणून काही देत नसतं ते आपल्याला हे कळलं. नुसतंच हिरवं सौंदर्य- पोट नाही भरत त्याने. पोट भरलेलं असलं तरच भोवतीचं सौंदर्य डोळ्यांत उतरतं हा धडा आपोआपच शिकले. साग, ऐन, शिवण, कुसुंबांच्या ऐन गर्दीत काय खायला मिळणार?
अखेर एकदाचे सगळे परतीला लागले. सेंटरवर पोहोचले तोवर साडेचार वाजून गेले होते. कशीबशी जाऊन बसले आणि रामजीला विचारलं, काही आहे काय रे दुपारचं उरलेलं. काहीच नव्हतं. धनंजयने एक पाव शिल्लक ठेवलेला. त्यांचा नुकताच पिऊन झालेला चहा. त्यातला थोडा उरलेला. मी भुकेजून येणार याची खात्रीच होती धनंजयला. त्या दिवशी तो एक लहानसा पाव नि चहा किती महत्त्वाचा होता. दुकानातला पाव संपून गेलेला. त्यामुळे भात शिजेपर्यंत तेवढंच.
मी कुणाच्याही भुकेची काळजी अजूनही आपोआपच घेते याचं कारण त्यादिवशी अनुभवलेली, पोट चिरणारी भूक हेच अजूनही.
रोज संध्याकाळी शिकायला यायला टाळाटाळ का चालते तेही कळलं. रात्रीचं जेवण हेच बहुतेकांचं पूर्ण दिवसाचं एकमेव जेवण असे.
कुठे पुरे पडणार अक्षरओळख भुकेच्या हाकेला?
त्यांच्या पोटात घास पडल्यानंतर शिकवायला घ्यावं असं ठरलं. संध्याकाळी सहासात वाजता आमची शिकवणी सुरू व्हायची ती आता जेऊन झाल्यावर घेऊ म्हटलं. पण जेवल्यावर नाचाले जायचं नायतर दमणूक झाली म्हणून झोपून जायचं... तो अक्षरओळखीचा वर्ग काही धड पुरा झालाच नाही.
जे काही शिकायला मिळालं ते मलाच मिळालं. मला अनोळखी प्रांताची ओळख झाली.
एक घटना अशीच कायमची हलवून गेली. दिवाळीचे चार दिवस सारे वारली धमाल करतात. लाल भात,चवळी, भाजके बोंबील, पानातली भाकर, आणि ताडी या जोरावर सारं गाव झिंगलेलं असतं.
सगळेच ताडी पिऊन ‘भरां माजूंन्ना’ झुलत असतात. आम्ही आणि आम्हाला वेळोवेळी सेंटरवर ठेवण्यासाठी औषधं वगैरे विकत घेऊन देणारी काही मित्रमंडळी होती ती थोडे पैसे जमा करून बुंदीचे कडक लाडू आणि फरसाण-चिवडा घरोघरी नेऊन द्यायचा बेत केला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बोर्डीतून सामान घेऊन सेंटरवर जाऊन त्या पुड्या वगैरे रात्रीत बांधल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघालो. गावठाणातल्या बारापंधरा घरांतून वाटून झाल्यावर आम्ही नदीपार गेलो. तिथे एक वारली बाप्यांचा एक गट चुपचाप बसून होता. आम्हाला नदीतून येताना पाहाताच सगळे उठून उभे राहिले. जवळ आले.
त्यातला सोन्या आमचा सेंटरवर नेहमी येणारा मित्र. त्याने बातमी फोडली. “भिवान् वनश्याचं डोचकं फोडलंय. तो काय जगत नाय.”
आम्ही सुन्न. भिवा अगदी शांत माणूस. ताडीपण न पिणारा. आणि वनशा- त्याचा धाकटा भाऊ सदा तराट. भिवा कष्टाळू तर वनशा काहीच न करणारा. कसं शक्य आहे...
भराभर आम्ही त्यांच्या घरापाशी पोहोचलो. हातातल्या पुड्या सोन्याला सर्वांना वाटायला सांगितल्या. भिवा दाराशीच उभा होता.
धनंजयने विचारलं, “का रे, भिवादा, काय केलं तू?”
तो ओशाळा हसला, आणि म्हणाला, “क्या सांगू. सकाळीच यून्ना शिव्या दिधेल आहें. म्हन म्हटला अक्कल घालावी. हातात बैलगाडीचा टेकाण आला त्येच घातलां.”
आत वनश्याच्या घरात गेलो. वनश्या रक्तबंबाळ होऊन पडलेला. डोकं चांगलंच फुटलेलं आणि चेहरा रक्ताने भरलेला. कुणालातरी धावत जाऊन सेंटरवरून डेटॉल, सोफ्रामायसिन, कापूस, बॅंडेज आणायला पाठवलं. गरम पाणी मागितलं. डोक्याखाली ठेवायला काही आहे का विचारलं. काही नव्हतंच घरात. त्याचंच एक फाटकं जुनं टीशर्ट दिलं त्याच्या बायकोनं. ते पाण्यात बुडवून आम्ही चेहरा साफ करायला सुरुवात केली. पुसून चेहरा स्वच्छ केला. रक्त वाहातच होतं. डेटॉल, सोफ्रामायसिन आल्यावर स्वच्छ बॅडेज, कापसाने जखम मी कापऱ्या हातांनी साफ केली. थोडी दाबून धरली. आणि सोफ्रामायसिनची ट्यूब त्यात जवळपास रिकामी केली.
पंधरावीस मिनिटं गेली असतील. मघा पाहिला होता त्यापेक्षा त्याचा चेहरा बराच बरा वाटत होता. डहाणूला न्यायला रिक्शा आणायला सायकल हाकत माणूस गेलेला. त्याला दवाखान्यात पोहोचवेपर्यंत तो जगला तर जगेल असं आम्हाला वाटू लागलं. वाडघे वारली म्हणू लागले- ‘नाय बाय, नाय धनजी, तो जगाय नाय आथा...’
एक तास असाच सरला. आणि मग एक रिक्शा आणि मोटरसायकलवरून पोलीस दोघेही आले. गावच्या पोलीसपाटलानेही सायकलवर जाऊन तक्रार केलेली.
पोलीस भिवालाही अटक करून घेऊन गेले आणि वनशाला दवाखान्यातही.
दिवाळीची वाट लागलेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोसबाडला एका मित्राच्या घरी येऊ म्हणून सांगितलेलं. तिथून डहाणूला जाऊ आणि वनशाला बघून येऊ म्हणून ठरवलेलं. दुपारी दोन वाजता कोसबाडहून डहाणूला गेलो. दवाखान्यात दारातच आस्वलीचे दोघे चोघे होते. कळलं- वनश्या टाकाला. वनश्या मेला. धनंजयला आत जाऊन प्रेत ओळखायला सांगितलं.
भिवा आत राहिला. केस सुरू झाली. दहा महिन्यांत भिवा सुटला. वनश्याच्या बायकोला नि पोरांना भिवाच बघायचा. वनश्या असतानासुध्दा. गावातल्या ज्येष्ठांनी तिला सांगितलं ‘तू त्याच्या विरुध जाऊ नको. तो बाहेर आला तं तुला सांभाळील. पोरांनाहुं सांभाळील. वनश्या कसाक होता नायतरी...’
घडलं ते डोळ्यांनी पाहिलेली ती एकमेव साक्षीदार होती. तिने अजिबात ब्र काढला नाही.
तक्रार केल्याबद्दल नंतर पोलीसपाटलाला खूप शिव्या पडल्या होत्या.
भिवाने नंतर खरंच सर्व जबाबदारी पेलली. शांत माणसाचा तोल ढळला तर काय होतं... नागर जनांत जे होतं तेच अनागर आदिवासींतही होतं.

------
एकदा एक मुलगा शांतपणे सेंटरच्या ओवरीत येऊन बसला. बाहेर येऊन बसला ते कळलंच नाही. मग कशालातरी बाहेर गेले तेव्हा दिसलं ते पोर. अख्खं डोकं खरजेच्या फोडांनी, चिघळलेल्या जखमांनी भरलेलं. भीतीच वाटली त्याचं ते डोकं पाहून. जाम किळसले. पण मग तोंड घट्ट मिटून सगळं साहित्य आणलं बाहेर. डेटॉल. बेंझिन बेंझोएट. कापूस. मग लक्षात आलं. याचे केस कापल्याशिवाय औषध नीट लागणार नाही. मग बारीक बॅन्डेज कापायची कात्री घेतली. जखमांना, टचटचलेल्या फोडांना लागू न देता केस कापणं महामुश्कील होतं. त्याला विचारलं, “दुखेल हं. घेशील ना करून?” त्याने मानेनेच होकार दिला. तो आलेला नागबंधपाड्यावरून चालत. मी सावकाश सावकाश सगळे मधलेमधले केस कापून काढले. डेटॉल आधी लावलंच होतं. सारखी कात्री डेटॉलने धुवून पुसून घ्यायला लागत होती. मधूनच रक्त पुसावं लागत होतं. कात्री लागल्यामुळे नव्हे, केवळ नाजूक झालेली त्वचा धक्क्यानेच फाटून पू-रक्त येत होतं. मधेच त्याचा चेहरा वर केला हनुवटीला धरून. ते पोर आवाज न करता टिपं गाळत होतं. सारा चेहरा ओला झालेला. “फार दुखं क्या... आता जिराकुच हां...”
तासभर की दोन तासभर कितीवेळ मी ते सारं साफ केलं आणि मग बेंझिन बेन्झोएटने माखून टाकलं. ते पाहायला बरीच पोरं बाजूने गोळा झालेली. पण कुणीही आवाज करीत नव्हतं. त्याला किती दुखत असेल, तो किती सोसतोय ते त्यांनाही कळत होतं.
त्याला सगळ्या आवश्यक त्या सूचना दिल्या. बेन्झिन बेन्झोएट तसंच अंगावर दोन दिस सुकू देस. धुवू नको. खाजवू नको. आणि परवा परत ये.
तो परवाच्या दिवशी परत आला. पुन्हा सारं डेटॉलने साफ केलं. कापसाने खरजेच्या खपल्याखवल्या काढून टाकल्या. नव्या पुळ्या डोकं वर काढत होत्या त्या कापसाच्या चिमटीनेच खरडल्या. पुन्हा बेन्झिन बेन्झोएटचा थर लावला.
मग दोन दिवसांनी पुन्हा. मग दोन दिवसांनी पुन्हा.
दहा दिवस संपले. पंधरवड्याच्या शेवटी ते पोर हसतच उड्या मारत आलं. आणि डोकं माझ्या समोर धरून बसून हसत राहिलं. मला खरंच खूप बरं वाटलं.
आज खरजेचं बरंचसं निर्मूलन झालंय त्या भागातून. असते, पण अशी जीवघेणी नसते. याबद्दल खरजेवर संशोधन करणाऱ्या आणि औषधं शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकांना मी अजूनही दुवा देते. आणि पाणी, साबण परवडू लागण्यालाही.
...
आस्वलीची एक वाडघीण...
मी आस्वालीला गेले तेव्हा आमच्या सेंटरवर नियमितपणे येणारी पंधरासोळा माणसं होती. म्हणजे घरचीच. कधीही यायची,बसायची, गप्पा करायची. त्यात मेऱ्याची वाडघीण एक.

तिची उंची चांगली होती. ताठ... काळी, सुरकुतून कडक वाळलेली. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हा चित्रकाराच्या कुंचल्याचा विषय झाला असता.
तिचं नाव हरवलेलं. तिला सगळे वाडघीन म्हणूनच ओळखायचे. तिला घाबरायचेही. तिचा मान मोठा. कारण ती फार नामांकित सुईण होती. कुठे दूरदूरवर सुईणपण करायला तरातरा चालत जायची. सुईणींना घाबरावंच लागतं. त्यांना खूष ठेवावंच लागतं. त्यात हिचा आवाजही असा टणत्कारी...
वाडघीनचा आमच्या सर्व पठारी (मुंबईतनं आलेल्या) पोरांवर फार जीव होता. येऊन भरभर कायकाय गोष्टी सांगू लागायची.
मला पहिलाच प्रश्न टाकला- तुलं समझाय क्या मी काय सांघं ते?
-समझाय समझाय.
असं उत्तर आल्याबरोबर मी तिची लाडकी झाले.

अनेकदा आम्ही म्हटलं जेव की आमच्यासोबत जेवायची. आपल्या थाळीतला कण नि कण वाया जाता कामा नये हा तिचा संस्कार होता. सगळे घास संपल्यावर ती ताटलीत दोन घोट पाणी ओतायची आणि नीट निपटून ते पाणी पिऊन घ्यायची.

तिच्या अंगावर नेहमीच बऱ्या साड्या असत. आणि दोन तुकडे न करता नीट आख्ख्या नेसलेल्या. आणि सगळ्या गोठी बाळंतपणांच्या. अडलेल्या बाईला ती सोडवायची. खुनवडा, जळवई या आसपासच्या गावांतही सुईणी होत्या. पण भारी अडलेल्या बाईसाठी वाडघीनला घेऊन जायचे तिथले लोक. मग परतल्यावर गोठ सांगायची ठरलेली.
एकदा मी तिच्याकडे हट्ट धरला, वाडघीन आता सुमनचं- सुमन आमचा मित्र सोन्याची बायको- बाळंतपण येईल, ते बघायला तू मला तुझ्यासोबत नेशील?

हां म्हंटली. सुमन बाळंत होणार कळल्यानंतर मी तिच्या झोपडीत पोहोचले. सगळी तयारी झाली होती. पाणी गरम करायला ठेवलं होतं. वाडघीनसाठी जेवण शिजलं होतं. सुईणीला काम सुरू होण्याआधी चांगलं जेवण देण्याची पध्दत आहे. ती कधी जेवत असे, कधी बांधून नेत असे. पोट चोळणं वगैरे सुरू होतं. सुमनची पहिली दोन्ही बाळं गेली होती. आता ही तिसरी खेप होती. मी जरा टेन्शनमधेच बघत उभी होते. तिच्या वेदनांचा कल्लोळ उडाला आणि वाडघीन महामायेसारखी आमच्यावर जोरात ओरडली. काठी काढून आम्हा सर्व लोठ्या पोरींना बाहेर हाकलून दिलं. मी म्हटलं, वाडघीन तू मला कबूल केलेलं... जा आथा नायतं हानीन, कुटंन्... तिचा अवतार बघून बाकीच्या साऱ्या पोरींनी मला हसतहसत खेचून बाहेर नेलं.

थोड्या वेळाने सुमन बाळंत झाली. सुखरूप. मी रुसले होते.

दुसऱ्या दिवशी वाडघीन सेंटरवर आली.

- क्या गे मुघाबाय, हटली कां?

मी तोंड फिरवलं. तिला म्हटलं कट्टी.

मग तिने जवळ येऊन मायेमायेने झरझर मला समजावलं. आता तिचे वारली शब्द आठवत नाहीत मला. पण तिचं म्हणणं होतं- तू पोयरी ना...

तुला पण पोर राहील. मग आधीच बाळंतपण पाहिलंस तर तुला भीती नाय बसेल? मग तू म्हणशील पोरच नको. नवराच नको. कायच नको. म्हणून लोठ्यांना ( लग्न न झालेल्या नव्या पोरींना) बाळंतपण बघू देत नाय मी. खूप त्रास असतो गं बाय... तो आधीच कशाला बघायचा...
तिने मायेने माझ्या चेहऱ्यावरून तिचा कुशल हात फिरवला. माझा रुसवा पळाला. म्हटलं अगं पण डॉक्टरणी होतात पोरी, त्यांना कुठे पोर झालेलं असतं... मग त्या कुठे भितात? तशी ती विचारात पडली.

मग म्हटली. -नाय करावं असं.

मी म्हटलं -बरं बाय...

तेवढ्यात वाडघीनने माझी पोरवाल नेत्रांजनची डबी पाहिली. तिला वाटलं काजळ.
माझं लक्षच नव्हतं. तिने भरमसाठ बोटावर घेतलं आणि पटापट दोन्ही डोळ्यांतून फिरवलं.
ध्यानीमनी नसताना तिच्या डोळ्यांची जी आग झाली. ती ओऱडत, शिव्या देत, नाचायला लागली. आणि आसपासचे सगळे वाडघीनला काय झालं म्हणून जमा झाले. आणि सगळेच हसत सुटले. ज्या वाडघीनला सगळे घाबरत होते तिची ही गंमत झालेली पाहून त्या दिवसाचा सणच झाला.
मग तिला हाताला धरून बसवून, डोळे चोळू नको, शांतपणे बस वगैरे सांगितलं. थोड्या वेळाने भरपूर आसवं ढाळून ती शांत झाली.

आणि हळूच म्हणाली, पर आथा डोल्याला ब्येस वाटाय...
बाकीच्यांना म्हणाली, ह्या मुघाबायला काल मी घालवला मा... म्हनं थो तिनी माजे डोलीत घाथला. आणि मग लहान मुलीसारखी हसतहसत तुरतुर पळून गेली.
आम्ही आस्वली सोडून किती वर्षे झाली. मधेच कधीतरी ती मरून गेल्याचं कळलं...
वाडघीन बाय गे, तुजा आठव येतो गे माय...

...

नंतर कितीतरी वर्षे मधे गेली. आस्वलीतल्या जिवातल्या मित्राचा एक मुलगा बारावी केल्यानंतर मुंबईत आला. तरतरीत हुषार मुलगा आहे तो. सिडनहॅममधून बीकॉम आणि एमकॉमही केलं. त्यातील दोन वर्षं आमच्या घरी शिक्षणासाठी येऊन राहिला. त्याची मैत्रीणही वारलीच होती. तिने होमिओपॅथीमधे डिग्री घेतली. मेडिकलला अॅडमिशन घेताना एका बाबूने तिला फसवलं होतं. अॅलोपथीचा खर्च तुला झेपायचा नाही म्हणून होमिओपॅथीलाच प्रवेश घे म्हणून सांगितलं. ती फसली बिचारी. सहा महिन्यांनंतर आमच्या घरी पहिल्यांदा आली तेव्हा तिला कळलं की आपण फसलो.खाण्यापिण्याची आबाळ होऊन तिला टीबीनेही ग्रासलेलं. थोडी मदत केली. पोटात पुरेसं अन्न जाईल एवढीच मदत दिली. पण फार छान अभ्यास करायची.
आज त्या दोघांची शिक्षणं पूर्ण झाली. त्याला आरक्षणामुळे नोकरी लागली, तिने दवाखाना सुरू केला. दोघांचं लग्न झालं. मुलगा झाला. घर घेतलं. तिचा दवाखाना डहाणूपासून फार लांब म्हणून आधी स्कूटी नि मग आता कर्ज काढून गाडीही घेतली. आस्वलीतला बदलाला सामोरा हिस्सा असा अजून माझ्या आय़ुष्यात टिकून आहे. फार बरं वाटतं त्यांची खबरबात कळते तेव्हा.
खूप बरं वाटतं.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

छान लिहिलय. आवडलं वाचायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छानच. वारली लोकांशी थोडीफार ओळख होती. आता पुसट होत चाललीय. उजाळा मिळाला. ओतभाकरी, आंबाट, खुबे, च्यटनी आणि आणखी थोडं फार ठाऊक होतं. पण कोशिंब्याची फळं आणि बाकीचं जग नव्याने कळलं.
च्य, ज्य असे उच्चार माडिया-गोंडांतही असतात. पाढे म्हणताना पाच्ये पाच्ये पंचीस, ऐकताना गोड वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख, अतिशय सुरेख लिखाण आहे. ईतके सुंदर तुमचे अनुभव तितक्याच समर्थ शब्दात मांडले आहेत. सुरवातीचं वाटचालीचं वर्णन आहे ते वाचताना मी पण चालायला लागलो त्या वाटेवरनं! व्वा. मला चटकन गोनीदांचं "कुणा एकाची भ्रमणगाथा" आठवलं. छोटी वाक्यं नी निवडक, वेगळे शब्द. आपण सहसा पातीची जुडी चहात टाकतो, ईथे "लोटून दिल्येय" !! कींवा, "...आणि हसू उधळायचं. " मधे 'उधळायचं' चपखल आहे, नेमकं सांगतो काय झालं ते! असो. चित्रात काय काय सुरेख आहे ते शब्दात मांडत बसू नये, चार लोकाना चित्र बघायला पाठवावं. वाचनखूण अर्थातच साठवली आहे.


मी फारसा फिरकत नाही ईकडे. फार चिवडावं तेव्हा जरा बरं काही हाती लागतं. आज मात्र नशीब जोरावर आहे. यादितला दुसराच लेख हा काय छान निघाला...


अगदी रहावत नाही म्हणून लिहितोय - "चाळ नावाची गचाळ वस्ती" लिहिलेल्या तुमचा हा लेख वाचायला घ्यावा का विचार करत होतो! "सेंटरवर पोचणं कसं कटकटीचं होतं, एकदा कुसुंबाची आंबटढाण फळं खाउन भूक मारत दुपार कशी काढावी लागली, वारली काय वाटेल ते खातात पितात" असं काहीही नाही? !!! नाही, "तुमची तशी दॄष्टी असती तर तुम्हाला चाळीतल्या जीवनाचाही आनंद घेता आला असता" असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, गैरसमज नसावा. चाळीचंही वास्तव आहे. हेही वास्तव. मला नीटसं मांडता येत नाहीये हे कळतंय मला, पण एखाद्या कार्यक्रमाला आपण जाताना, बाजूने रस्त्यावर पचाककन् थुंकून जाणार्‍या कोणाबद्दल सूक्ष्म अढी मनात घेउन आपण हॉलवर पोचावं नी त्याच माणसाने तासभर सुरेल कविता ऐकवाव्या तसं काहिससं माझं झालंय Smile असो. चाळीचा लेख was probably emotional venting for you. या लेखात मात्र तुम्ही आठवणींचं गाठोडं उलगडून आनंद वाटलात त्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

एक नंबर लेख. फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अप्रतिम!
अजून काही लिहून पाणी गढूळवत नाही.
केवळ अप्रतिम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा अणि आधीचा 'चाळी'चा लेख वाचून आणखी असे लेख वाचण्याचा आमच्या अपेक्षा तुम्ही उंचावून ठेवल्या आहेत! अवचटांची आठवण झाली.

एक गोष्ट कळली नाही. ह्या लेखामध्ये मला वारल्यांच्या बदलत चाललेल्या जगाबद्दल सूक्ष्म हळवेपणा - nostalgia - जाणवल्याशिवाय राहिला नाही. तोच सूक्ष्म हळवेपणा तुमच्या 'चाळी'मध्ये का दिसत नाही? तेथे 'चाळी'तून सुटल्याचा तुमचा आनंद लगेचच जाणवतो. का हे 'परदु:खं शीतलम्' अशा स्वरूपाचे आहे? वारली जग बदलले ह्याची हळहळ,मात्र आपलेहि बदलले ह्यामुळे सुटकेची भावना?

हे थोडेसे परदेशामध्ये सुस्थित NRI सारखे आहे. ते 'पुणं बदललं' म्हणून उसासे टाकत असतात पण मनोमन 'आपण सुटलो' हा आनंदहि त्यांना सुखावत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वारली जग बदलत चालल्याची हळहळ अजिबातच नाही. ते जग बदलायलाच हवं इतकं हलाखीत जगणारं होतं. उलट ते जग फारच संथपावली बदलतंय हे वाईट आहे. दोनेकशे उंबऱ्याच्या गावातून केवळ एक मुलगा त्या हलाखीतून बाहेर पडू शकला... तो आमच्याकडे रहायचा तेव्हा त्याचा तिथला एक मित्र त्याला म्हणाला, की त्यांच्याकडे खायला भेटतं म्हणून तू तिथं ऱ्हातोस नाय? ते पोर एवढं दुखावलेलं, तिसऱ्या दिवशी मला म्हणाला, मावशी मी नाही रहाणार इथे. खूप खोदून विचारलं तेव्हा रडू फुटून सांगितलं. किती समजूत काढावी लागली. वारल्यांचंही उदात्तीकरण नाही करणार मी...
चाळीच्या बाबतीतील कटुभाव तसाच राहील, कारण त्यातील खूप जास्त अनुभव कडवट आणि अगदी थोडे माणुसकीचे होते. त्यातून सुटल्यासारखंच वाटणार. या वारली गावात तसे निसर्गाच्या कुशीत होते- आणि आपोआपच वरचं स्थान बहाल झालेलं. बाहेरच्या मदत करणाऱ्या माणसाशी लोक गोड वागतात. त्यामुळे माणसांशी थेट अनुभव चांगले होते. वाईट होता तो लोकांच्या हलाखीचा अनुभव...
चाळीबाबतचा हळवेपणा फक्त आईबाबा आणि एक मैत्रीण याबाबत होता. आईबाबा गेले. मैत्रीणही दुसरीकडे गेली. काही धागे अजून जिवंत आहेत पण ते तसे फार रेशमी नाहीत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती मनापासून लिहिलेलं लिखाण आहे हे. खूप खूप आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ सुरेख, सुंदर. त्या दिवसांमध्ये तुम्ही जगलात ते सगळं डोळ्यासमोर उभं केलय तुम्ही. "आणि माणूस जागा झाला" मधून भेटलेल्या वारलीबद्द्ल हे वाचताना खुप बरं वाटलं हलाखीतही एवढं मनमोकळं जगणारे वारली ते त्यांच्यामधील बदलाला सामोरी जाणारी पहिली पिढी. खुप खुप सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार, अंतराआनंद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर्जेदार आणि कलात्मक लेख खूप आवडला. आपले समृद्ध अनुभव विश्व आणि लिहिण्याची एक छान शैली असा समसमा योग !
लेख अती आवडला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दर्जेदार आणि कलात्मक लेख खूप आवडला. आपले समृद्ध अनुभव विश्व आणि लिहिण्याची एक छान शैली असा समसमा योग !
लेख अती आवडला !"
हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच आवडलं. बरंच काही भरून येतंय, शब्दात नाही मांडता येत आहे पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर लेखन. सेंटरवरच्या कामाचं, आणि त्यासंदर्भाने येणाऱ्या आठवणींचं, अनुभवांचं अजून चित्रण येऊ द्यात.

वरती अनेकांनी 'चाळ...' आणि या लेखाची तुलना केलेली आहे. माझ्या मनातही ती अर्थातच झाली. चाळीच्या लेखात एक कडवटपणा दिसतो, तर इथे एक कोवळेपणा आणि अनुकंपा दिसते. मला वाटतं त्याचं कारण म्हणजे चाळीच्या आतून अनुभवलेल्या जगण्याचं, आपलं बालपण नासल्याचं ते चित्रण आहे. या उलट इथे वारल्यांच्या जीवनाकडे बाहेरून बघण्याचा दृष्टिकोन आहे. या लेखात कुठेतरी 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे' असं आश्चर्य, कुतुहल आहे. मात्र कुठेच या जीवनाचं उदात्तीकरण नाही. किंवा 'मुलं छान आंबट फळं खातात आणि आनंदी असतात, आपली शहरी पोरं पाहा, बर्गर-पिझ्झे खाऊनही रडरड करतात' असली मल्लिनाथी नाही. भुकेची जळजळ आहेच, आणि ती आपण अनुभवतो तेव्हा कळते, हे या लेखनातून सांगितलं आहे. दुर्भिक्ष्याबद्दल बोलतानाही ते सहज सांगितल्यासारखं, त्यांच्या जीवनात ज्या नैसर्गिकरीत्या ते रुतलेलं त्या नैसर्गिकरीत्या ते लेखात सामावलेलं आहे. कुठेच त्याचा बडेजाव नाही की अतिरेकी कारुण्याचे उमाळे नाहीत. हा सहजपणा अतिशय आवडला.

अजून लिहाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार, राजेश. तुम्ही नेमकेपणाने तुलना मांडलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेला समजलेली आस्वली तिने लिहिली आहे.चाळीचाही लेख आताचाच त्यामुळे तुलना झाली.त से आम्हाला अथवा पुलंनाही अनुभव आले परंतू पुलं ठरले सिद्धहस्त लेखक.ते गळक्या बादलीलाही बूड घालतात.टीका पुलंवरही झाली.सगळेच मनोहर म्हणू लागले तरी कोणीतरी चूक काढतोच.'उदात्तीकरण','पोहोच नाही',बालिशपणा वगैरे शब्दांत लेखकाची बोळवण होते.
कथा म्हणून न बघता नोंद म्हणून मी बघीतलं.चांगलं वाटलं लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ही कथा नाहीच. अनुभवकथन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ही कथा नाहीच. अनुभवकथन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेठूवाला उल्लेख विशेषनीय वाटला. अतिशय भाबड्या व सरळ माणसांतही काही दुष्टात्मे दडून असतात हे कळले. नशीब त्याने काही दगाफटका केला नाही.
.

पोट भरलेलं असलं तरच भोवतीचं सौंदर्य डोळ्यांत उतरतं हा धडा आपोआपच शिकले.

वाक्य अतिशय आवडले.
.
आपल्या सहजीवनाचे काही उल्लेख आले आहेत ते आवडले.
.
लेख वाचताना काहीतरी चिंब चिंब हिरवं अनाघ्रात डोळ्यांसमोर येत राहीलं.
http://mw2.google.com/mw-panoramio/photos/medium/50994630.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय बोलू? शब्दांनी विटाळू नये असं लिहिणं आहे. बाकीची चिरफाड होत राहील. तूर्तास नको. फक्त आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शांतपणे वाचायचा म्हणून बरेच दिवस हा लेख उघडला नव्हता. लेखन सुंदरच पण वाचून अस्वस्थताच आली.

माझ्या आजोळच्या गावी कातकऱ्यांची वस्ती. दारिद्र्य हे असंच होतं. आता बदल होत आहेत, पण जे दिसतंय तेही फार सुंदर नाही. आस्वलीला २०० मुलांमधला एक डॉक्टर झालेला दिसतोय, आमच्या गावात तेही नाही. होती ती बसची चांगली सोय बंद झालेली. दुखण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, कधीतरी स्वतंत्रच लिहावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.