पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (पूर्वार्ध)

हे अध्यक्षीय भाषण या अंकात समाविष्ट करण्यामागची भूमिका:

अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे 'संत साहित्य संमेलना'पासून ते 'आदिवासी साहित्य संमेलना'पर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची संमेलने भरतात. बहुतेक संमेलने ही त्या त्या प्रकारच्या साहित्याची उपेक्षा टाळणे, त्यांचे वेगळे वैशिष्ट्य जोपासणे, त्याबाबत चर्चा घडवून आणणे, साहित्याच्या मुख्य धारेत दखल घ्यायला लावणे, जनसामान्यांना त्या साहित्याची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगणे, इत्यादी अनेकविध कारणांनी स्वतंत्ररीत्या संपन्न होत असतात. बालवाड्मय वा बालसाहित्यही त्यास अपवाद नाही.

अश्याच भूमिकेतून 'भारतीय बालकुमार साहित्य संमेलन समिती'चे पहिले अधिवेशन १९७५ साली पुणे येथे झाले. त्याच्या अध्यक्षपदाचा मान श्री. भा. रा. भागवत यांना मिळाला. त्या काळात भारा हे बाल/कुमार साहित्यलेखक व भाषांतरकार म्हणून वाचकांत प्रसिद्ध होतेच. परंतु एक अध्यक्ष म्हणून बालसाहित्याविषयीचे त्यांचे विचार व भूमिका ही एकत्रित अशी इतर लेखकांसमोर व वाचकांसमोर बहुधा प्रथमच जाहीर प्रकट झाली.

'भा. रा. भागवत व त्यांचे साहित्य' या विषयीचा प्रकल्प हाती घेतल्यावर, भारा लिहिते होण्यापूर्वी महाराष्ट्रात बालसाहित्याची अवस्था काय होती; मुळात असा साहित्यप्रकार वेगळा म्हणून रुजला होता का; तो तसा कधीपासून रुजला व त्यास कारणे कोणती; पुढे ते साहित्य कसे फोफावत गेले; त्यात कोणी, कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न केले; प्रकाशक, छपाईतंत्र, चित्रकार व लेखक यांचा त्या काळात समन्वय कसा साधत असे; बदलत्या काळानुसार व नव्या पिढीच्या रुंदावणार्‍या आकलनाच्या कसोटीस त्या त्या काळचे बालसाहित्य उतरत होते का, अश्या प्रश्नांच्या अनुषंगाने येणार्‍या बालवाड्मयाच्या इतिहासाचा मागोवा घेणारा लेख या अंकात असावा असा मानस होता. याचे कारण, त्या पार्श्वभूमीवर भारांच्या साहित्याची ओळख होण्यास व त्याचे मूल्यमापन करण्यास, त्यांच्या लेखनातल्या वेगळेपणाच्या प्रेरणा जाणून घेण्यास वाव मिळणार होता. शोध घेता घेता, खुद्द भारांचेच एक भाषण आम्हांला मिळाले व त्यातला पूर्वार्ध हा खरोखरीच एक समर्पक असा मराठी बालसाहित्याचा ऐतिहासिक आढावा घेणारा आहे असे दिसले. इतिहास केवळ कालानुक्रमानेच नाही तर कथा, कविता, चरित्रे, विज्ञानकथा/कादंबर्‍या, नाट्य अश्या वर्गवारीनुसारही रचलेला दिसतो. ते करतानाच कोणत्या लेखकाने काय लिहिले आहे याची जंत्री व त्यावरचे मार्मिक, सूचक नि विनोदी शेरे हे त्यांच्या प्रचंड वाचनासोबतच त्यांचा स्वभावही दाखवून जातात.

भाषणाच्या उत्तरार्धात, बालसाहित्यकारांकडून काय अपेक्षा आहेत, हे ते स्पष्ट करतात. त्यातच त्यांच्या स्वत:च्या लेखनामागची प्रेरणा व भूमिका दिसून येतात. भारतीय पुराणांतल्या गोष्टी मागे सारताना त्यातले मनोरंजक मूल्य कायम ठेवून विज्ञानाभिमुख भूमिकेतून लेखन करण्याचे आवाहन ते करतात. तसेच परकीय बालवाड्मय मराठीत आणताना ते भाषांतर असावे की रूपांतर याविषयीचेही त्यांचे विचार हे सुस्पष्ट आहेत.

एकूण, भारांआधीची लेखन परंपरा आणि भारांची लेखनाविषयीची भूमिका व आव्हाने, याचे सांगोपांग आकलन करून देणारे असे हे भाषण ठरले. ते इथल्या वाचकांच्या भारांविषयीच्या असलेल्या प्रश्नांना व कुतूहलाला काही प्रमाणात तरी शमवणारे ठरेल असे वाटते. तसेच, ४० वर्षांपूर्वीचे हे विचार आत्ताच्या काळातल्या लेखकांसाठी कितपत लागू आहेत वा मुलांच्या विस्तारलेल्या भवतालात ते आज कालबाह्य झाले आहेत का; असल्यास कुठली नवी आव्हाने वा धारणा आजच्या बालसाहित्यकारांसाठी महत्त्वाची आहेत, इत्यादी गोष्टींवर ऊहापोह घडवून आणणे हे आम्हांला महत्त्वाचे वाटले. यासाठीच आम्ही ते वाचकांपुढे - पूर्वार्ध आणि उत्तरार्ध - अश्या दोन भागांत ठेवत आहोत.

- अमुक

-------

भाषणाच्या मूळ प्रकाशनाचे तपशील -
पुस्तिकेचे नाव – 'दहा अध्यक्षीय भाषणे'
संपादक - शंकर सारडा
प्रकाशन वर्ष - १९९३
© / प्रकाशक - मराठी बालकुमार साहित्य संमेलन, पुणे - ४११०४०

-------
भा. रा. भागवत
(अधिवेशन पहिले : पुणे, १९७५)

‌‌

पूर्वार्ध
-------

आजवरच्या मराठी बाल-कुमार साहित्याचे विहंगमावलोकन:

बाल-साहित्य संमेलन येथे पहिल्यानेच भरत आहे असे मी म्हणणार नाही. मोठ्या साहित्य संमेलनांतून बालांकडे दुर्लक्ष होते असे आपण 'बाल'-लेखक नेहेमी म्हणत असतो. ही तक्रार खरी असली तरी अनिवार्य आहे असे मोठ्या साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल. कारण प्रौढांच्या वाङ्मयाहून बालवाङ्मयाचे - निदान छोट्यांच्या वाङ्मयाचे - क्षेत्र अजिबात निराळे आहे. त्याला संमेलनातला एक श्रोतृवर्ग एका निराळ्याच 'मूड'मध्ये असावा लागतो. एकंदर वातावरण वेगळे असावे लागते, मुलांनाही जिथे अधूनमधून फेरफटका मारता येईल, तिथली पुस्तकांची प्रदर्शने बघता येतील, एखाद-दुसऱ्या स्पर्धेत भाग घेता येईल असे वातावरण असावे लागते. हे सगळे दोन किंवा तीन दिवसांच्या संमेलनात मोठ्या साहित्यिकांना साधणे अशक्य आहे. तेवढा सर्वांना वेळही नसतो आणि तशी त्यांची मन:स्थितीही नसते. ती उचापत करायला तुमच्या-आमच्यासारखे मुलांमध्ये ऊठबस करणारे लोकच हवेत. इ. व्ही. ल्यूकसने एकोणिसाव्या शतकातल्या एका निसर्गप्रेमी साहसकथा लेखकाच्या कादंबरीवर अभिप्राय देताना म्हटले होते की, "This is a book for boys who are still boys, and also for boys who are masquerading as boys!" माझी खात्री आहे की, आपल्यापैकी बहुतेकांनी प्रौढ प्रतापी पुरुष म्हणून मुखवटे घातलेले असले तरी मनाने आपण अजून बाल आहोत. कोणत्याही बालिश अर्थाने मी हे म्हणत नाही, तर आपल्याला गौरवार्थाने 'बाल' म्हणत आहे. ही बाल्यसुलभ टवटवी आपण टिकवली नसती तर आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमण्याची बालबुद्धी आपल्याला झाली नसती.

१९४४ च्या अशांत काळात वीरेंद्र अढियांनी आपल्या कुमार चळवळीतून याच पुण्यामध्ये एक 'कुमार साहित्य संमेलन' भरवले होते. त्यानंतर गोपीनाथ तळवलकरांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा पुण्यात एक 'बाल-साहित्य संमेलन' भरले. मग बरीच वर्षे सुनी गेली आणि यंदाच्या 'नूतन बाल शिक्षण संघा'च्या विद्यमाने अनुताई वाघ आणि शेष नामले यांच्या प्रयत्नांनी कोसबाड गावी असेच एक संमेलन भरवण्यात आले. त्याला संयोजकांनी प्रथम 'बाल-साहित्य संमेलन' नाव दिले होते ते कोणत्याही ईर्षेने नसून, यापूर्वी जी बाल-साहित्य संमेलने झाली ती जरा विस्कळीत आणि संपूर्ण महाराष्ट्राला नागरी तसेच ग्रामीण भागालाही साथ देऊ शकतील अशी नव्हती, या विचाराने असावे. तसा एक खास प्रयत्न आपण करीत आहोत अशी संयोजकांची कल्पना होती. पण तोही प्रयत्न तसा अपुराच राहिला. कोसबाड हे एकीकडचे गाव पडले आणि मंडळी फारशी जमली नाहीत. पण जे लोक जमले त्यांनी तळमळीने, धडपडीने विचारांची पुष्कळ देवाणघेवाण केली. पण कोसबाडचे पडसाद महाराष्ट्रात फारसे उमटले नाहीत. मला त्याचे नवल किंवा दुःखही वाटत नाही. आपले हे क्षेत्र उपेक्षितच आहे. त्यात प्रगती टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. या कामाला लागतील तेवढे हात हवेच आहेत.

हे खरे की गेल्या पंचवीस तीस वर्षांत बाल-साहित्याची अमाप निर्मिती झालेली आहे. पालक मुलाला घेऊन पुस्तकांच्या दुकानात गेला - खरं म्हणजे हा कपिलाषष्ठीचाच योग! पण गेला - तर विचारतो, "मुलांसाठी पुस्तकं आहेत का हो?" आणि त्याच्या पुढ्यात बारक्या बारक्या पुस्तकांचा ढीग येऊन पडतो. "घ्या तुम्हाला यातलं कोणतं हवं ते!" आणि पालक बिचारा त्या भूलभुलैयात गुरफटल्यासारखा होतो. 'काय निवडावं निवडणारानं?' असे त्याला होते.

खरंच कसं निवडावं बाल-साहित्य? दुकानात गेल्यावर कसं निवडावं? पण त्याच्याही अगोदर छापण्यापूर्वी ते कसं निवडावं? बालकांच्या काही आवडीनिवडी आहेत. पुस्तकं काढताना त्या आपण सांभाळतो का? त्यांच्या काही गरजा आहेत, त्या आपण पुरवतो का?

फार फार वर्षांपूर्वी

आपल्या पूर्वजांनी असा विचार कधी केला होता का? आपण कधी केला का? आज करतोय का?

फार फार वर्षांपूर्वी बालवाङ्मय किंवा बाल-साहित्य असा शब्दही नव्हता. मुलांसाठी लिहिण्याचे काही वेगळे तंत्र असते हा विचारही कुणाच्या मनाला शिवलेला नव्हता. इतेकच काय, मुलांसाठी काही वेगळी पुस्तके असावीत असेही कुणाच्या डोक्यात आले नव्हते. कृष्णाच्या अद्भुत बाललीलांनी थरारलेला, कुश-लवांच्या बालवयीन पराक्रमांनी मंतरलेला आपला भारत, बालशिवबाच्या बहादुरीने हादरलेला आपला महाराष्ट्र; पण या स्फूर्तिदायक गोष्टी मुलांना सांगण्यासाठी एखादे पुस्तक लिहावे अशी बुद्धी आपल्याला शेकडो वर्षे झाली नाही. माकड तर मुलांचा आवडता प्राणी ना? पण एका शूर वानराने रावणाची लंका कशी पेटवून दिली आणि हजारो माकडांची 'सुइसाइड स्क्वाड' कुंभकर्णासारख्या पर्वतपुरुषावर कशी चालून गेली आणि तिने त्याची कशी भंबेरी उडवली, हा सर्व मसाला वाल्मिकींनी तयार ठेवला असूनही, खास मुलांना गोष्टीरूपाने सांगण्याचा कुणी कधी प्रयत्न केला नाही. जी पुराणे रचली गेली, ज्या कहाण्या सांगितल्या गेल्या, त्यादेखील कितीही रंजक असल्या तरी त्याचे आकर्षण प्रौढांना असे. त्यात खास मुलांना रिझवणारे असे काही नसे. विनोद जिथे असे तिथे तो खेळकर असण्यापेक्षा बाष्कळ अधिक असे. बखरकारांखेरीज गद्यलेखन आपल्याकडे फारसे कुणी करत नसे आणि पद्यलेखकांचा बहुतेक भर वैराग्यावर असायचा. आणि वैराग्य - निदान बालवयात तरी नसावे! पुराणांवर आधारित पद्ये ज्यांनी रचली, त्या वामन पंडितांच्या मधुर काव्यात मुलांना चुचकारल्यासारखे वाटते ते 'बनी खेळती बाळ ते बल्लवांचे'मध्ये. पण तेवढ्यापुरतेच. मोरोपंतांचा गरीब ब्राह्मण बाळ राक्षसाला मारण्याच्या मजेदार बढाया मारतो तेव्हा तो बोबडे बोलतानासुद्धा 'लाल्लिंचल' म्हणतो. 'लाक्सस' म्हणत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मुलांना जवळ करण्याचा, त्यांना गोंजारण्याचा आमच्या पंडित कवींचा बाणाच नव्हता. कीर्तनकारांनी आख्याने वाचताना थोडेफार ते काम केले. पण अखेरीस वर्षानुवर्षं घराच्या ओट्यावर बसून राहिलेल्या आजीबाईंवरच ती जबाबदारी येऊन पडली. त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचली - किंवा मुलांचा आवडता गणपती नाचला म्हणा, किंवा मारुतीने उड्या मारल्या म्हणा - आमच्या मुलांचा जो काय निकोपपणा व तजेला होता तो टिकून राहिला. आजीबाईंच्या गोष्टींनी नि दंतकथांनी हे काम केले. अलिखित युद्धात अनेक सेनानी पराक्रम गाजवतात. त्यांना पदके देऊन मग त्यांचा गौरवही होतो. पण सामान्य सैनिकांचा गौरव कोण करणार? त्यांची नावेसुद्धा कुणाला माहिती नसतात. म्हणून मग अज्ञात सैनिकांच्या नावाने एखादा गौरवस्तंभ उभारला जातो. बालसाहित्यात असा स्तंभ ह्या अज्ञात आजीबाईंच्या नावाने उभारायला हवा.

इंग्रजी अमदानीची कामगिरी

बालवाङ्मयाची ही उणीव दूर व्हायला इंग्रजी अमदानी यावी लागली. आणि कृष्ण, मारुती मागे पडून शेवटी बालसाहित्याचे सूतोऽवाच झाले ते इंग्रजीवरून अनुवादित केलेल्या 'बाळमित्रा'ने १८२८ साली. आणि त्यात पुढाकार घेतला तोही आपण नाही तर इंग्रज विद्वानांनी. त्यांनी सांगितले म्हणून आपण केले. आपण म्हणजे बापू छत्र्यांनी. 'बाळमित्रा'च्या आधीही काही पुस्तके निघाली, नाही असे नाही. पण छापण्याची सोय सगळीकडे नव्हती. बायबल सोसायटीचे काही छापखाने असत. तसल्याच श्रीरामपूर गावच्या एका लाकडी अक्षरांवरून डॉ. केरी नावाच्या खलाशी मिशनर्‍याने प्रथम छापली इसापनीती. नंतर पंचतंत्र, हितोपदेश आणि सिंहासन बत्तिशी. ही आपल्याकडच्या गोष्टींची पुस्तके छापली तीसुद्धा याच इंग्रज गृहस्थाने. या पुस्तकांना बाल-साहित्य मुळीच म्हणता येणार नाही; आणि तरी ती शाळांमधून नेमली गेली.

पेशवाई बुडाल्यावर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा मुंबईचा गव्हर्नर झाला. इंग्रजी अमलाचे 'गोडवे' तत्कालीन 'नेटिवां'नी जे गायले त्याचे पुष्कळसे श्रेय युद्धनीतीइतकाच राजनीतीतही प्रवीण असलेल्या या इष्टुर फाकड्याला दिले पाहिजे. पूर्वीचा शत्रू आपला मित्र बनला - रसिक, दिलदार आणि विद्याप्रेमी. पुढे आणखी दोन तपांनी दुसर्‍या एका इंग्रजाने मुलांची शालेय पुस्तके सोपी असावीत म्हणून परिश्रम केले, तोही लष्करी माणूस होता - मेजर कँडी. महामहोपाध्याय पोतदारांनी म्हटल्याप्रमाणे 'साखरे'. त्यांनी आपल्या समितीवर घेतले आमच्या रसिकवर्य तात्या गोडबोल्यांना. आणि दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या नव्या पिढीसाठी गोड कामगिरी केली. छ्त्र्यांच्या 'बाळमित्रा'वर आणि 'इसापनीती'वरही पुढे संस्कार झाले आणि त्या पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या निघाल्या.

पण प्रारंभ झाला तो अनुवादांनीच. हरि केशवजी पाठारे (शालोपयोगी नीतीकथा) आणि गोपाळशास्त्री बापट (हरि आणि त्रिंबक) हे दोघे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले नामांकित भाषांतरकार होते. हरि केशवजींची तर इंग्रज अधिकार्‍यांनी फारच स्तुती केली होती. आणि तरी खालील उतारा आपल्याला कसा काय वाटतो ते पाहा :

"त्वां अझून माझा बिछाना केला नाहीस. बिछाना केल्याचे तुला श्रम होतात असे कदाचित आढळले असेल म्हणून त्याविषयी काही निश्चय केला आहेस असे दिसण्यात येते. पण इतकेही असून ती काही मोठी गोष्ट आहे असे नाही. का तर तो जसा बिछाना आहे त्या तसल्याची मलाही सवयी लागत चालली आहे."

जुन्या काळातली भाषा, तेव्हा तिचा ढंग वेगळा असणार याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण त्यातले वाक्प्रयोग आणि वाक्यरचना पाहा. मराठी भाषेवर इंग्रजीची कशी छाप पडली होती त्याचा हा नमुना आहे!! काही असो. अर्वाचीन मराठी साहित्याला ह्या इंग्रजांनी हातभार लावून जी सुरुवात करून दिली, ती बालवाङ्मय काढून, हा एक गमतीदार योग आहे नाही? कदाचित ते इंग्रज आम्हांला सगळ्यांनाच बालबुद्धीचे समजत असतील!

मराठी बालसाहित्याला आजच्या दृष्टीने सरळ, सोपे वळण लागले ते विनायक कोंडदेव ओकांच्या 'बालबोध'च्या काळात. पण विनायक कोंडदेवांची लेखणी जरी सुलभ लेखनात प्रवीण असली आणि 'हिंदुस्थान कथारस'सारखी गोष्टींची सुंदर पुस्तके त्यांनी लिहिली असली तरी त्यांची सहजप्रवृत्ती बालांकडे होती असे वाटत नाही. तशी आवड असलेल्या वासुदेव गोविंद आपट्यांचे सतत साहाय्य त्यांनी घेतले असते, तर दुधात साखर पडली असती, आणि कँडी-गोडबोलेंसारखा आणखी एक गोड सुयोग जुळला असता. पण ते झाले नाही आणि आपट्यांना वेगळेपणी 'आनंद' काढावा लागला. आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या बालसृष्टीत खरा आनंद निर्माण झाला. छापखाना हाताशी घेऊन त्यांनी विपुल बालसाहित्य निर्माण केले. आम्ही 'आनंद'च्या छायेत वाढलेली मुले. आम्हांला त्या पुस्तकांची नावे तोंडपाठ आहेत. 'मनी आणि मोत्या', 'एका दिवसाच्या सुट्टीत', 'बालरामायण', 'बालभारत', 'बालभागवत' वगैरे. भाषांतरकारांचे मुकुटमणी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आधीच तयार केलेल्या 'अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टीं'मधून काही कथा त्यांनी आपल्या विद्यार्थांसाठी संक्षिप्त स्वरूपात छापल्या. ते 'चित्तरंजन' अथवा 'मुलांचे अरेबियन नाईट्स'. मुळातला जाडा ग्रंथ अर्थात मुलांसाठी नव्हता. पण त्याची एक मध्यम आटोपशीर गुळगुळीत कागदावर छापलेली आवृत्ती आम्ही जरा मोठे झाल्यावर रंगून जाऊन वाचीत होतोच. त्यातली ती शिळाप्रेसवर छापलेली चित्रे आणि त्याखालच्या ओळी अजून आमच्या डोळ्यांसमोर नाचत आहेत. 'तिसर्‍या तीराने घोड्यावरचा पुतळा उडून समुद्रात पडला' किंवा 'त्याने साबण तिला दिले आणि कोंडा डेर्‍यासुद्धा घेऊन गेला.' नुसत्या ह्या वाक्यांवरूनसुद्धा कथनपद्धतीला कशी गती मिळत चालली ते दिसून येईल.

मुलांच्या नियतकालिकांवर धावती नजर

मुलांना दिलेला नैमित्तिक नव्हे; तर नित्याचे मासिक - 'आनंद' हे आपट्यांचे मोठे वैशिष्ट्य असल्यामुळे ह्या निमित्ताने मुलांच्या नियतकालिकांवरून एक धावती नजर फेकण्याचा मोह मला अनावर होतो आहे. आमच्या बालपणी 'आनंद'च्या प्रत्येक अंकाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात असू. 'आनंद'चा अंक तसा काही मोठा वजनदार असायचा असे नाही. वाचनहावरी मुले तो केव्हाच संपवून टाकीत. पण छोट्या बत्तीस पानी अंकात मजकुरांची विविधता भरपूर असे. गोष्टींनी, कवितांनी, एखाददुसर्‍या चरित्राने किंवा चरित्रपर लेखाने, प्रवासवर्णनाने, शास्त्रीय माहितीने तो भरलेला असे. कवितांची फुलबाग फुललेली असे. त्याशिवाय आम्हांला मोठे आकर्षण म्हणजे मुलांचे लेख असत आणि कोड्यांची उत्तरे बरोबर देणारांची नावे छापलेली असत, तीसुद्धा श्रेणीवार. म्हणजे दोन्ही कोड्यांची उत्तरे देणारे ठळक टाइपात मिरवीत, तर एका उत्तरवाल्यांना बारीक टाइपावर समाधान मानावे लागे. वासुदेव गोविंद आपट्यांनी होतकरू विद्यार्थ्यांची एक नवी पिढीच तयार केली.

त्यापूर्वी मुलांसाठी मासिके नव्हती असे नाही. विनायक कोंडदेव ओकांच्या 'बालबोध'चा मी ह्यापूर्वीच उल्लेख केला. 'ओकांच्या मृत्यूबरोबर ते बंद पडले' हा 'बालसाहित्याच्या रूपरेखे'त आलेला उल्लेख चुकीचा असावा असे मला वाटते. कारण त्याच्या किरकोळ चढाओढीत मी भाग घेतला होता आणि पोस्टकार्डावर शाईने रंगवून पाठविलेल्या बदकाच्या चित्राबद्दल मला एक पुस्तक बक्षीस मिळाले होते हे मला आठवते. मला वाटते - हिंदू मिशन सोसायटीच्या वैद्यांनी 'बालबोध' चालवायला घेतले. ते पॉकेट साइझमधे निघायचे. आणि थोड्याच काळात त्याचा अवतार संपला.

१८६४ साली आणखी एक मासिक प्रकटले होते, ते म्हणजे 'पाठशालापत्रक'. त्याचे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 'शालापत्रक' बनवले. पण शास्त्रीबुवा रसिक भाषाप्रभू असले तरी मासिकाचे उद्दिष्टच मुळी निव्वळ शैक्षणिक किंबहुना अध्यापकीय स्वरूपाचे होते. त्यामुळे त्याला मनोरंजनाची जोड लाभली नाही. 'शालापत्रक' बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १८७५ साली बंद पडले होते. १८९० साली त्याचे पुनरुज्जीवन झाले. कृष्णशास्त्री व विष्णुशास्त्री हे पितापुत्र त्यात लिहू लागले. त्यांनी काळाची पावले ओळखून मासिकाला आणखी सोपेपणा, रंजकपणा आणला. आणि तरी आपट्यांच्या 'आनंद'ने त्याला हां हां म्हणता मागे टाकले. १९३० साली 'आनंद'चे संपादकत्व गोपीनाथ तळवलकरांकडे आले. त्यांनी 'आनंद'चे क्षेत्र आणखी वाढविले, आणि चालू घडामोडींकडे लक्ष द्यायला विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. हळूहळू छोट्या मुलांचे 'नाना' हे आवडते मित्र बनले. तिकडे दे. ना. टिळकांच्या संपादकत्वाखाली नाशिकला 'बालबोध मेवा'ही मुलांना अधिकाधिक गोड वाटू लागला होता.

माझ्यावर 'आनंद'ने जितकी छाप पाडली तितकेच, किंबहुना अधिकच, मला 'बालोद्यान' मासिकाने मोहित केले होते. लिथो प्रेसवर छापलेल्या 'बालोद्यान'च्या चालकांचे - सहस्त्रबुद्धे यांचे - आजमितीलाही मला आश्चर्य वाटत असते. संपूर्ण चित्रकथांचे - कार्टून किंवा कॉमिक स्टोरीजचे - 'बालोद्यान'ने मराठी मुलांना पहिले दर्शन घडविले. माझे वडील हायस्कूलचे हेडमास्तर असल्यामुळे इंग्रजीत निघणारी 'आर्थरमी'ची सुप्रसिद्ध Children's Newspaper आणि My Magazine आम्हांला दरमहा वाचायला मिळत. मी तर तो गुळगुळीत आर्टपेपवर छापलेल्या 'माय मॅगझिन'चा अंक उघडून वाचण्यापूर्वी हुंगून बघायचो. प्रिंटिंग इंकचा व कागदाचा तो ताजा वास किती घेऊ नि किती नाही असे मला व्हायचे.

ह्या 'माय मॅगझिन'मधे 'टायगर टीम'च्या आणि 'हिप्पी बॉईज स्कूल'च्या संपूर्ण चित्रकथाच असत. तशीच 'डोके मास्तरांची शाळा' ही 'बालोद्यान'ने उघडली होती. 'चित्रशाळे'च्या 'अरेबियन नाईट्स'मधल्या चित्रांप्रमाणेच अशी व्यंगचित्रमाला त्या काळात मराठीत बघायला मिळणे हे एक आश्चर्य होते खरे. त्यामागचे गुपित काही असो, पण मराठी मुलांवर ह्या चित्रांनी उपकार केले.

'बालोद्यान'चे ते माझ्याजवळचे अंक नंतर हरवल्यामुळे त्याची खंत मला नेहमी वाटत राहिली. कारण आता ते दुर्मीळ आहेत. या मासिकाने सहाच वर्षांचे आयुष्य भोगून राम म्हटले. त्यानंतर 'आनंद'च्या जोडीला 'खेळगडी' आला - का. रा. पालवणकरांचा. स्वरूप साधारणपणे 'आनंद'सारखेच, पण स्वत:चा छापखाना नसल्यामुळे की काय, ते आकर्षक असूनही फार चालले नाही. १९४८ साली पालवणकरांनी ते बा. ग. ढवळ्यांना चालवायला दिले. सुंदर चित्रे, व्याकरणशुद्ध छपाई, उत्तम कागद या सर्वच बाबतीत ढवळे विलक्षण आग्रही. त्यामुळे प्रत्येक अंक अनियमित निघूनही सुबक व सुरेख असायचा. पण हे महागडे काम ढवळ्यांच्या 'कर्नाटक प्रेस'लाही अखेर झेपेनासे झाले आणि दोन वर्षांनी त्यांनी ते बंद करून टाकले. ह्या दोन वर्षांच्या अवधीत एका वर्षी वा. ल. कुलकर्णींना व दुसर्‍या वर्षी मला 'खेळगडी'चे संपादन करण्याचे भाग्य लाभले होते.

ह्या मधल्या काळात आणखीही काही बालमासिके चालत होती. 'खेळगडी' निघाल्यानंतर दोनच वर्षांनी नागपूरला बा. रा. मोडक यांनी 'मुलांचे मासिक' काढले. आणि ते आजतागायत चिकाटीने चालवले आहे. 'बालक' नावाचे मासिक काही दिवस निघत होते असे मला आठवते. पुण्यात पंडित अनंत कुलकर्णींनी मोठ्या हौसेने काढलेले 'किशोर' आणि वीरेंन्द्र अढियांचा 'कुमार' ही दोनही मासिके दोन-तीन वर्षांतच बंद पडली. १९३८ साली मुंबईत 'असोसिएटेड ॲडव्हर्टायझर्स अ‍ॅँड प्रिंटर्स'नी काढलेल्या 'साप्ताहिक प्रकाश'चे संपादकीय काम माझ्याकडे दिले गेले तेव्हा त्यात एक संपूर्ण पान मी मुलांकरता द्यायला लागलो. साप्ताहिकांच्या सृष्टीत पोरे - मला वाटते - प्रथमच घुसली होती.

मोठ्या शहरातला हा पसारा नजरेआड करून कोकणाकडे जरा पाहा. तिथे मालवणसारख्या खेड्यात ध्येयधुंद झालेला एक फकीर दर पंधरवड्याला मुलांच्या हातात विविध वाक्प्रसादांनी भरलेला एक कटोरा देत असे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून, अनुभवी लेखकांकडून सतत मागणी करून मागवलेले साहित्य 'बालसन्मित्रा'त छापण्याची पारूजी नारायण मिसाळ यांची जिद्द आदरणीय होती. ह्या ऋषितुल्य पुरुषाच्या मृत्यूनंतर एक-दोन वर्षे चालून मग 'बालसन्मित्र'ही बंद पडले. पाटणकर नावाचे गृहस्थ मुलांसाठी 'सुमंत' मासिक पेण येथे काही काळ चालवीत असत.

एक सुसज्ज छापखाना मागे असलेला दाक्षिणात्यांचा रंगदार 'चांदोबा' आणि रसिकांच्या शुभेच्छा आणि अर्थात काही थोड्या वर्गण्या यांखेरीज पाठबळ मागे नसलेला आमचा 'बालमित्र' ही दोन्ही १९५१ साली एकदम सुरू झाली. 'बालमित्रा'च्या बाबतीत आम्ही एक दृष्टिकोन ठेवला होता. तो म्हणजे अंधश्रद्धा जोपासणारे काहीही द्यायचे नाही. मुलांना शक्यतो विज्ञानाभिमुख करायचे. 'खेळगडी' बाललेखांक काढीत असे, तसा 'बालमित्र'ने वर्षातून एक 'बालबगीचा अंक' द्यायला सुरुवात केली. तो सर्वस्वी मुलांनी सजवलेला असे; आणि उत्तम लेखांना व चित्रांना बक्षिसे असत. पुढे 'साधने'ने फार मोठ्या प्रमाणावर आपली 'कुमार' अंकाची प्रथा सुरू केली आणि आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातले ते एक भूषण बनले आहे. 'बालमित्रा'ची धन्यता ही की, त्याला दलाल, गोडसे, गोरे, ठाकरे, ज. ना. थत्ते यांसारख्या कल्पक बालप्रिय चित्रकारांचे साहाय्य लाभले. मराठीतल्या नामवंत बालसाहित्यकारांनी आपण होऊन विनामूल्य लेखनसाहाय्य दिले. 'मौज'सारख्या मुद्रणालयाने 'बालमित्रा'कडे सहानुभूतीने व स्नेहाने पाहिले. 'बालमित्र'चे कव्हर तेवढे दुरंगी असले तरी बाकीची सजावट रंगीबेरंगी करणे आम्हांला अशक्यप्राय होते, त्यामुळे हा प्रयोग साडेसहा वर्षांत आटपावा लागला.

तात्पर्य हे की, आजच्या यंत्रयुगात एकखांबी तंबू कोसळायला वेळ लागत नाही. मग त्या तंबूत कितीही चांगले काम चाललेले असो, त्याचा उपयोग काय? हा काळ सहकाराचा; सहयोगाचा आहे. एकट्या-दुकट्याच्या शक्तीचा नाही. साधनसामग्री हाताशी असलेल्यांचाही धीर खचतो तिथे इतरांची काय कथा? 'बालमित्र'नंतरसुद्धा अशा मित्रांनी व हितचिंतकांनी एखाद्या नवीन बालनियतकालिकासाठी थोड्या का योजना आखल्या होत्या? पण त्यांतल्या किती अंमलात आल्या आणि किती कागदोपत्री राहिल्या हे पाहणे उद्बोधक ठरेल. अनेक वर्तमानपत्रे आज मुलांसाठी 'सदरे' देतात. पण ते अक्षरश: सदरे असतात! सुरेख फ्रॉक किंवा झबलीसुद्धा नसतात. कुक्कुल्या बाळांचे रांगेने फोटो छापणे म्हणजे मुलांचे पान झाले का? त्या बाळांचे नातेवाईक सोडले तर बाकी कोणी त्या फोटोकडे ढुंकूनही पाहणार नाही. मुलांसाठी पुरवणी देण्यात 'स्त्री'ची 'बालवाडी' आणि 'सह्याद्री'चा बालविभाग यांनी चांगली कामगिरी केली आहे. 'अनुराधे'च्या 'टुणटुण नगरी'चाही उल्लेख करायला हवाच. मुलांसाठी चांगले नियतकालिक असावे असे मुकुंदराव किर्लोस्करांना मनापासून वाटते. त्यांच्याशी माझी अनेकदा जी चर्चा झाली, तीत ही तळमळ दिसून आली. या चर्चेची निष्पत्ती म्हणजेच वर्षभर 'बालवाडी' स्वतंत्र पुरवणीरूपात निघाली. पण अखेरीस त्यांचीही धडाडी, उत्साह अपुरा पडून तो प्रयोग थांबवावा लागला. इतके या क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे.

पण हिंमत खचलेली नाही.

आणि तरी कित्येक वर्षे मराठीत आणखीही काही मासिके नित्यनेमाने चालू होती. साने गुरुजी कथामालेचा 'मुलांचा श्याम' प्रकाश मोहाडीकरांनी एकनिष्ठेने चालवला. आज अनेक वर्षे बालांच्या जगात समाजोपयोगी कार्य करीत असलेल्या 'आनंदवन' संस्थेचे 'आनंदवन' मासिक चारुशीलाबाई गुप्ते चालवीत आहेत. अमरेंद्र गाडगीळ सांस्कृतिक मूल्य जपण्याच्या एका आस्थेने 'गोकूळ' मासिक चालवीत आहेत. 'प्रेस्टीज प्रकाशना'ने 'बिरबल', 'क्रीडांगण', 'टारझन'सारखी मासिके चालवली आहेत. शिरवाडकरांचा 'कुमार' मुलांना कथासाहित्य, कोडी, छंद पुरवतो आहे. 'गंमतजंमत' नावाचे छोट्यांसाठी चालवलेले मासिक अण्णा फणसे व कृष्णा करवार यांनी वर्ष-दोन वर्षं धडपडत चालवले. सुभाष समेळ यांची 'बालसेना'ही अल्पकाळ लढून गेली. 'शिशुरंजन' नावाचे मराठी साप्ताहिक गुजराती बंधूंनी काही दिवस चालवले. अशोक माहिमकर हे तरूण गृहस्थ सबंध मजकूर हाताने लिहून, पृष्ठांचे ब्लॉक करुन 'फुलबाग' सजवीत असतात. किती कौतुक करावे ह्या मेहनतीचं नि धडपडींचं!

इतके प्रयोग फसताहेत, पण माणसांची हिंमत खचतेय का? नाही. नव्या नव्या लोकांना ह्या फंदात पडण्याची बुद्धी होतच असते. 'खेळगडी' बंद करतेवेळी पालवणकर मला काय म्हणाले असतील? ते म्हणाले, "भागवत, मुलांच्या मासिकाचा काळ आता संपलेला आहे." आणि त्यांच्या या उद्गाराला अनुमतिदर्शक असा लांबट चेहेरा मी करतो आहे, तोच त्यांनी पुढचे वाक्य उच्चारले, "आता दिवस आले आहेत मुलांच्या साप्ताहिकांचे." मला वाटतं, महाराष्ट्राला नाटकांचं जितकं वेड आहे असं म्हणतात, तितकंच मासिकं-साप्ताहिकांचं वेड आहे - पुस्तकांचंच आहे म्हणा ना. म्हणजे काहींना ती छापून काढण्याचे आणि बाकीच्यांना ती कुठून तरी घेऊन वाचून काढण्याचे, विकत घेण्याचे मात्र नाही!

बालनियतकालिकांवर मी इतका घोळ घातला आहे याचे कारण त्यात आपल्या बालसाहित्याच्या प्रगती-परागतीचे, यशापयशाचे किंबहुना सार्‍या वैशिष्ट्यांचेच संपूर्ण प्रतिबिंब उमटलेले आहे. आज जे मासिकात तेच उद्या पुस्तकात. म्हणजे केवळ या लेखांचे संकलन करून पुस्तके काढली जातात एवढाच अर्थ नव्हे, तर ज्या अनेक बालपुस्तकांच्या योजना आखल्या जातात, त्यांच्यामागेसुद्धा आजपर्यंतची मासिके, त्याचे स्वरूप आणि त्यांना आलेला अनुभव ही उभी असतात. काही प्रकाशक - मुलांची बरीच पुस्तके काढली, आता त्यांना आधाराला किंवा त्यांच्या आधारावर एखादे मुलांचे मासिक काढावे - अशा विचाराने हा उद्योग करतात. पण असे चिरस्थायी उदाहरण विरळाच असते. आता पाठ्यपुस्तक मंडळानेच रंगीबेरंगी, भल्या मोठ्या आकाराचे 'किशोर' मासिक काढले आहे. छान असते. साधासुधा 'आनंद'सुद्धा लहानपणी उघडताना आम्हांला कोण आनंद व्हायचा! मग हा भव्य 'किशोर' वर्गणीदार मुले किती हर्षाने उघडीत असतील याची कल्पनाच करावी. पण 'किशोर'मधल्या गोष्टी, कविता, चित्रे छान असली तरी त्यातलेच ते इतर निबंधवजा लेख मुले वाचतात तरी का?

आपट्यांच्या 'आनंद'ने सुबोध सोपेपणाची जी प्रथा आणली तिचा इतरांवरही परिणाम झाला. 'चित्रशाळा', रावजी श्रीधर गोंधळेकर, 'नवीन किताबखाना', नेर्लेकर वगैरे पुण्याच्या प्रकाशकांनी मुलांसाठी सोपी पुस्तके काढायला सुरुवात केली. 'पंचतंत्रा'ची बापूजी मार्तंड आंबेकरांनी केलेली नवी आवृत्ती याच वेळी निघाली. क्रमिक पुस्तकांनाही आणखी सोपेपणा आला आणि त्यात अगदी छोट्या विद्यार्थ्यांना 'वाहवा वाहवा चेंडू हा' यासारखी आधुनिक शिशुगीततंत्राला शोभणारी गाणी गायला मिळाली. हा खेळकरपणाही आम्हांला 'मिस मेरी भोर'सारख्या मिशनरी बायकांनी शिकवला. इतक्या सुगम धाटणीची लयबद्ध गाणी रचणारे आपल्याकडे नारायण गंगाधर लिमये निघाले. 'धोबी कपडे रोज कसा - धू धू धूत असे' ही त्यांच्या धोब्याची आपटधोपट आजही माझ्या कानांवर कधीकधी आदळत असते. केमकर मंडळींनी काढलेली ही सोपी गाणी. त्यांच्याही आधी तांबे-लोंढे-लेंभे आणि दत्त कवींनी काही बालकाव्ये रचली होती. 'चिव चिव चिमणी छतात -' ही तांब्यांची कविता प्रसिद्धच आहे. 'चिमुकल्या छकुल्या न रडे उगा' ही चिमुरड्यांवरची कविता जुन्या क्रमिक पुस्तकांमधून झळकलेली आहे. कविवर्य यशवंतही बालगीतांकडे वळले. त्यांच्या वेळोवेळी तुरळकपणे प्रसिद्ध होणार्‍या कविता 'मोतीबागे'त एकत्र यायला मात्र बेचाळीस साल उगवावे लागले. पण त्याला ढवळ्यांनी साज चढवला तो मात्र अत्यंत आकर्षक. ढवळ्यांनीच पुढे मायदेवांच्या शिशुगीतांची अनेक सुशोभित पुस्तके काढली. मायदेव हे बालकवितांच्या उद्यानाचे खरेखुरे माळी. त्यांच्या पूर्वीच्या महान कवींत आणि मायदेवांत फरक हा होता की, मायदेवांच्या कविता म्हणजे खरीखुरी गेय अभिनयगीते असत. ती मुलांच्या तोंडी बसू शकत, आईने मुलाला उद्देशून म्हणण्याची ती वत्सल-कवने नसत. अत्रे, घाटे, खानोलकर यांनी आता क्रमिक पुस्तकांनाही आणखी सोपे व चित्रमय रूप दिले.

५४-५५ चा नवा जमाना

कुसुमाग्रज, गोपीनाथ तळवलकर, भवानीशंकर पंडित, संजीवनी मराठे, शांता शेळके, वि. म. कुलकर्णी, ग. ह. पाटील, ना. गो. शुक्ल, ह. रा. पाटील, शांताराम आठवले आणि श्री. बा. रानडे ही मान्यवर कवी मंडळी वेळोवेळी बालांसाठी कविता रचीत होती. त्यामुळे सरस्वतीचे हे मंदिर कधीच ओस पडले नाही. महाराष्ट्रशारदा ह्या बालकाव्याच्या बाबतीत भाग्यवान आहे, असेच म्हटले पाहिजे. १९५४-५५ च्या सुमाराला आणखी एक नवा जमाना सुरू झाला. स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील राज्यांच्या शासनांनी उत्कृष्ट साहित्यासाठी स्पर्धा सुरू केल्या. पहिल्या वर्षी मराठीत कुणालाच बक्षीस मिळाले नाही. दुसर्‍या वर्षी 'बालमित्रा'तून आधी प्रकटलेली आणि मग पुस्तकरूपाने बाहेर पडलेली लीलावली भागवतांच्या 'घोड्याची नि बंबवाल्याची जोडी' टप-टप नि ठण-ठण करीत पहिले बक्षीस पटकावून गेली. आणि तेव्हापासून शिशुगीतांना नुसता बहर आला आहे. मुलांना सहज म्हणता येतील, आवडतील अशी कितीतरी गाणी प्रसिद्ध झाली आहेत. आजची बाले घरातच गोठा थाटावासा वाटला की निर्मला देशपांड्यांची 'मातीची गाय' घेऊन बसतील किंवा शाळेचा कंटाळा आला की मंगेश पाडगावकरांच्या 'भोलानाथ'ला सवाल करतील - 'भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल का? शाळा बुडेल का?' ग. दि. माडगूळकरांची 'एका तळ्यात होती' ती मुलांची आवडती बदकांची पिल्ले तर तबकडीवरून सारखी क्वॅक क्वॅक करतातच आहेत. 'नाच पोरी नाच' म्हणून सरिता पदकी मुलींबरोबर - खरं म्हटलं तर - मुलांनाही नाचायला लावताहेत. सरलाताई देवधरांनीसुद्धा छान छान अभिनयगीते म्हणून मुलांना काय थोडे नाचवले आहे? शांता शेळके चिमण्या पाखरांना 'चिमणचारा' देताहेत तर वृंदा लिमये त्यांच्या तोंडात 'लॉलीपॉप' घालताहेत. आणि हा बालिशपणा टाकून देऊन कुठेतरी विचित्र भटकंती करून यावेसे वाटले की, हीच बाले विंदा करंदीकरांचा हात धरून एटू लोकांच्या देशात जाताहेत. शिरीष पै यांनीदेखील या प्रांतात यशस्वीपणे पाऊल टाकले आहे. याशिवाय शं. ल. थोरात, सूर्यकांत खांडेकर, रजनीकांत राजाध्यक्ष, वि. न. गंधे, तारा वैशंपायन, मंदा बोडस, योगेश्वर अभ्यंकर, रा. ना. विगम, ना. मा. तलारवार, सरोजिनी ताम्हणे - किती किती म्हणून नावे घ्यावीत! छोट्या बाळांना संगीताची आवड जात्याच असते हे ओळखून, आमच्या भगिनीवर्गाने तर त्यांना भराभर कितीतरी गाणी पुरवली आहेत.

छोट्या वाचकवर्गासाठी गाण्यांप्रमाणे गोष्टीही आताशा खूप रचल्या जात आहेत. पण सहत स्फुरलेली गाणी जितकी चटकदार असतात, तितक्या ह्या शिशूंसाठी लिहिलेल्या कथा आढळत नाहीत. त्यांना सफाई कमी असते. केवळ टाईप ठळक देऊन आणि चित्रे छापून चालत नाहीत. भाषा ही छोट्यांना सुलभपणे वाचता येईल अशी असावी लागते.

मुलांसाठी अशा अगदी सोप्या शिशुकथांची पुस्तके पहिल्याने ताराबाई मोडक आणि कावेरी कर्वे यांनी लिहिली. आजीबाई सांगत त्याच गोष्टी, तशाच गमतीदार पद्धतीने ताराबाईंनी सांगितल्या. एक होती ऊ, तिला झाली टू - त्या टूचा पादसुद्धा कापण्याचे क्रौर्य त्यांनी दाखवले नाही! मुलांना निरागसपणे हसायला तेवढीच मोकळीक. निदान अगदी लहान मुले स्वत: वाचू शकत नाहीत, सांगितलेल्या गोष्टी ऐकत असतात. तेव्हा Read Aloud प्रकारच्या गोष्टींमध्ये तरी अशा गंमती ठेवायला हरकत नसावी.

मोठ्या मुलांसाठी कथा लिहिण्यापेक्षाही छोट्यांसाठी लिहिणे जास्त कठीण आहे - अर्थात ज्यांना ते उत्स्फूर्तपणे जमत असेल त्यांची गोष्टी निराळी. पण पद्याइतके गद्य थोडेच उत्स्फूर्त असते? आणि तरीदेखील मा. के. काटदरे, का. रा. पालवणकर, दे. ना. टिळक, म. का. कारखानीस, शं. रा. देवळे, आशा गवाणकर, उमाकांत ठोंबरे, सुमती पायगांवकर, मालती दांडेकर, पंढरीनाथ रेगे, आकाशानंद, वि. म. घुले, आशा जोशी ह्या मंडळींची नावे घ्यायला हवीत. यांनी आणि मगाशी उल्लेख केलेल्या काही शिशुगीतकारांनी छोट्यांसाठी कथा लिहिलेल्या आहेत. श्री. बा. रानड्यांचा 'तिंबूनानांचा रेडिओ' तर चांगलाच वाजला गाजला आहे. 'पिटुकले चालले लढाईला' (वि.स.गवाणकर) आणि 'बोकोबा चालले काशीला' (शशिकांत कदम) ही नुसती नावेही किती गंमतीदार!

मुले थोडी मोठी झाली की त्यांना राजाराणीच्या व पर्‍यांच्या गोष्टी आवडू लागतात. अशा मुलांसाठी पाश्चात्त्य परीकथांचे अनुवाद आपल्याकडे पुष्कळच झालेले आहेत. त्यात हान्स ॲन्डरसनच्या कथांचे सुमतीबाई पायगांवकर आणि ललित वालावलकर यांनी केलेले अनुवाद अतिशय सुंदर स्वरूपात 'व्हीनस' आणि 'पॉप्युलर' ह्या प्रकाशकांनी बालवाचकांपुढे ठेवले आहेत. त्याशिवाय मालतीबाई दांडेकरांच्या 'छान गोष्टी' खरोखरीच छान आहेत. लीलाधर हेगडे यांचे 'पाचूचे बेट' आणि उद्धव शेळके यांची 'इंद्रधनूवर स्वारी' ही एका परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आतापर्यंत उल्लेख केलेल्या लेखक मंडळींनी केव्हा ना केव्हा परीकथा लिहिलेल्या आहेतच. आणि नवी मंडळी अधिकाधिक लिहीत आहेत. परीकथांची जादू कधीच कमी होत नाही. मग मुलांच्या गोष्टीत परी नसावी असे काही मानसशास्त्रज्ञ खुशाल म्हणेनात का! हो. जादूवरून आठवण झाली. जादूच्या गोष्टींचा तर आपल्याकडे सुकाळ झाला आहे. जादूची अंगठी मुलांच्या बोटात घालण्यापासून त्यांना जादूची बायको बहाल करण्यापर्यंत एका प्रकाशकाने विक्रम केला आहे! अनेक लेखकांनी राजाराणी-परी-राक्षसांच्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात काही उत्कृष्टही आहेत. काही अगदी निकृष्टही आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.

परीकथांप्रमाणे लोककथाही अलीकडे विपुल प्रमाणात सांगितल्या गेल्या आहेत. त्यात देशोदेशींच्या कथा आहेत तसेच प्रांतोप्रांतीच्याही आहेत. या लोककथांच्या बाबतीतही आपल्याकडे प्राथमिक कामगिरी साहेब लोकांनी करावी हे आपल्याला कितपत अभिमानास्पद वाटते? पण तसे ते आहे खरे! 'फ्लोरा ॲन स्टील' ह्या इंग्रज बाईने अशा काही लोककथा जमा केल्या. त्यांची ओळख तसेच जातककथांचा परिचय पहिल्याने लोकसाहित्याच्या प्रमुख भाष्यकार दुर्गा भागवत यांनी मुलांना करून दिला. पंजाबी लोककथांप्रमाणेच बंगाली लोककथांचे स्वरूपही मोठे मजेशीर आहे. अशा प्रांतोप्रांतीच्या लोककथांवर आधारित गोष्टी, कादंबर्‍या प्रथम साने गुरूजींनी आणि वामन चोरघड्यांनी लिहिण्याचा पायंडा पाडला. त्या 'सोनसाखळी'ला आणि 'चंपाराणी'ला आता आणखी कितीतरी राण्यांची नि राजकन्यांची जोड मिळाली आहे. महादेवशास्त्री जोशी, शि. स. शिर्के, बा. मो. कानिटकर, के. नारखेडे, शं. रा. देवळे, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते, सरोजिनी बाबर, शरश्चंद्र टोंगो, मालती दांडेकर, सविता जाजोदिया, श्रीपाद जोशी यांनी लोककथांना आपापल्या पद्धतीने वेगवेगळी खुलावट देऊन, त्या बालवाचकांना सांगितल्या. पुराणकथांमधून चारित्र्यसंवर्धक गोष्टी निवडून सांगण्याचे कार्य तर गेली पन्नास वर्षे कित्येक लेखक आपापल्या परीने करीत आहेत. त्यात भा. द. खेर, राधाबाई आपटे, अमरेंद्र गाडगीळ, शैलजा राजे, वि. के. फडके, योगिनी जोगळेकर, नलिनी सहस्रबुद्धे आदी लेखक नवी भर टाकीत आहेत. गो. नी. दांडेकरांची 'आईची देणगी' आणि श्यामला शिरोळकरांच्या 'आईच्या आठवणी' ह्या संदर्भात उल्लेखनीय कृती आहेत. नी. शं. नवरे यांचा एक वेगळाच पंथ आहे. त्यांनी संस्कृत कवींच्या नाट्यकथा तर सांगितल्या आहेतच; पण शिवाय वेचक सुभाषितांवर गोष्टी रचून सांगणे, इतकेच नाही तर स्वत: सुभाषिते रचणे हा त्यांचा छंद आहे.

कुमारवाचकांची वास्तवाची मागणी

कुमारवयातील मुले अद्भुताकडून वास्तवाकडे वळलेली असतात. त्यांना कर्तृत्व दाखवणारे वीर हवे असतात. जादूचा दिवा घासून श्रीमंत होणार्‍या 'अल्लाउद्दिना'पेक्षा अनेक संकटात गटांगळ्या खाऊन स्वत:च्या हिमतीवर एखाद्या फळीच्या आधाराने किनारा गाठणारा 'सिंदबाद' जास्त आवडतो. त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ 'रॉबिन्सन क्रूसो'. कारण तो एकटाच ओसाड बेटाला लागतो असे नाही, तर उपलब्ध अशा सर्व साधनांचा - म्हणजे झाडेझुडपे, जहाजाचे मोडके भाग, आतली हत्यारे आणि इतर वस्तू यांचा - योजक बुद्धीने वापर करून त्या निर्जन बेटावर स्वत:साठी 'फर्निश्ड' बंगला उभा करतो. कुमारवयाच्या मुलांना समाजात जे जे वाईट आहे त्याचा नि:पात करावा असे वाटते. जुने मोडून नवे बांधावे असे त्यांना वाटते. पण हे काम हिंसेने, हत्येने करू नका, भांडून करू नका. प्रेमाने, सामोपचाराने करा असा संदेश महात्मा गांधी राजकीय जीवनात देत होते. तो साने गुरुजींनी बाल-साहित्यात नव्हे, बालांच्या जीवनातच आणला. एका सबंध पिढीला त्यांनी संस्कारित, सुप्रवृत्त केले, ध्येयवादाची बैठक त्यांना दिली. समाजातले दारिद्र्य व अन्याय दूर करण्यासाठी धडपडणारी मुले बालवाचकांना स्फूर्ती देऊ लागली. श्याम, बेबी सरोजा, तीन मुले.... सारी आदर्शवादाने झपाटलेली मुले होती. 'श्यामची आई' आणि 'श्याम' ही अजरामर पात्रे आहेत आणि तरी 'श्याम'ला मॉडर्न मुले दुरावलीत की काय अशी शंका कधीकधी घेतली जाते. याचे कारण मला वाटते एवढेच की, 'श्याम' जे आयुष्य जगला ते हल्लीच्या मुलांना जवळजवळ माहीतच नाही. आज जीवनाला विलक्षण गती आलेली आहे. कर्तृत्वाचे क्षेत्रही वाढले आहे. आईबद्दल प्रेम आणि आदर असला तरी आईभोवती घोटाळत बसणे त्यांना आवडत नाही. त्यांना दूर जाऊन पराक्रम करावासा वाटतो. आणि म्हणून गतिमान वाङ्मयाकडे त्यांची अधिक ओढ आहे. पण रथ कितीही बेगुमान धावला तरी त्याला वंगण असले तरच तो धावणार. साने गुरुजींनी स्नेहाचे हे वंगण दिले हे आपण विसरता कामा नये. या वंगणाशिवाय नुसत्या बुद्धीच्या व कर्तृत्वाच्या साहसकथा रुक्ष, ओबडधोबड बनतील.

कुमारांना एखादा वीरनायक आवडला की त्याच्याशी त्यांची इतकी दोस्ती जमते की, त्याचे आणखी आणखी किस्से त्यांना हवे असतात. साने गुरुजींच्या 'श्याम'प्रमाणे ना. धों. ताम्हनकराचा 'गोट्या'ही असाच मुलांच्या गळ्यातला तईत बनला. 'श्याम' गंभीर प्रवृत्तीचा तर 'गोट्या' अवखळ - सर्वसामान्य मुलांसारखाच खेळकर, खट्याळ. पण त्यालाही जग सुधारण्याची तळमळ भयंकर. या 'गोट्या'ने महाराष्ट्रीय मुलांच्या हृदयक्रीडांगणावर कितीतरी वर्षे टोले हाणलेले आहेत. त्यानंतर खानविलकरांचा 'चंदू' आला आणि वि. वि. बोकिलांचा 'वसंत'. या आपल्या पूर्वसुरींना वाट पुशीत - किंवा ती वाट पुसून कुठच्या तरी आडवाटेने आज एक असा किडकिडीत पण तुडतुडीत पोर उड्या मारीत चाललेला आहे - डाकूंचा आणि हेरांचा समाचार घेत - फास्टर फेणे. रामतनयांचा 'कॅप्टन प्रताप' आणि आता आनंद घाटुगड्यांचा 'तिरसिंगराव'ही आपापल्या वैशिष्ट्यामुळे मुलांचे आवडते झाले आहेत. चिं. वि. जोशी यांना आपण बालवाङ्मयात घालीत नाही. पण त्यांचा 'चिमणराव' हाही मुलांचा आवडता हिरो आहे. कारण साहसाइतकेच विनोदाचे मुलांच्या मनावर प्रभुत्व असते. दिवाकरांच्या नाट्यछटाही यामुळेच त्यांना आवडतात.

कुमारांच्या क्षेत्रातही पाश्चात्त्य वीर हिरिरीने उतरलेले आहेतच. एकांड्या 'रॉबिन्सन क्रूसो'प्रमाणेच एका बेटावर जाऊन पडलेली रॉबिन्सन मंडळी इथे आहेत. दुष्ट कोतवालाला हैराण करणारा 'रॉबिन हूड' आपल्या रंगेल गड्यांसह इथे हजर आहे. 'लिलिपुट'पासून 'लापुटा'पर्यंत अनेक तऱ्हेवाईक देशांच्या सफरीचे वृत्तांत सांगणारा 'गलिव्हर' इथे आहे. फ्रेंच साहित्याला भूषणभूत ठरलेले तीन शिलेदार आहेत. इंग्रज बाणबहाद्दर 'आयव्हॅन्व्हो' आहे आणि अमेरिकन भटकबहाद्दर 'हकलबेरी फिन' नि 'टॉम सॉयर' आहेत. पाणचक्कीशी दोन हात करणारा चक्रमवीर 'डॉन क्विक्झोट' आहे. दत्त आपटे, उषा आपटे, भा. म. गोरे, अ. वा. मराठे, दि. बा. मोकाशी, मालती दांडेकर, सुशील परभृत, गं. गो. कुंटे, ग. रा. टिकेकर, सुरेश शर्मा, ह. भा. वाघोलीकर, रमेश मुधोळकर, प्रकाश गोळ वगैरेंनी ह्या विभागात प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे. आणि अर्थात अनेक अनुवाद-रूपांतरे कुमारांना आवडण्याजोगी करणाऱ्या आणि ज्यूल व्हर्नच्या अनेक कादंबऱ्या मराठी आणणाऱ्या अस्मादिकांनाही याच सदरात ढकलावे लागेल.

या अनुवाद-रूपांतरांच्या बाबतीत पुष्कळदा एक शंका घेतली जाते ती अशी परभाषेतल्या कथा आपल्या भाषेत आणताना त्यांना पोशाख देणे योग्य होईल का? तो मूळ लेखकाचा अधिक्षेप तर नाही? मला तर वाटते की, आपल्या बालवाचकांचे सुबुद्ध रीतीने मनोरंजन करणे आणि त्या मनोरंजनातून त्याला काहीतरी शिकवणे हा आपला मुख्य हेतू आहे. त्या हेतूच्या आड जर सरळ भाषांतरपद्धती येत असेल तर रूपांतरच करणे चांगले. पण जेव्हा तद्देशीय इतिहास, विशिष्ट भूभाग किंवा वातावरण हाच वर्ण्य विषय असेल आणि कथेचा आत्मा त्याच्याशीच निगडित असेल तर सरळ भाषांतरच योग्य होईल. अशा वेळी 'फ्रेंच राज्यक्रांती'ला '१८५७ चे बंड' किंवा '१९४२ चा उठाव' बनवणे योग्य ठरणार नाही. पण अद्भुत किंवा कुठेही घडू शकणारे कथानक असेल आणि निव्वळ करमणूक हे उद्दिष्ट असेल, तर मूळ व्यक्तींचे आणि देशाचेसुद्धा भारतीकरण क्षम्य ठरेल. कधी कधी तर असे संपूर्ण रूपांतर हे नुसते क्षम्य नाही, तर आवश्यक ठरते. 'Alice in wonderland'च्या बाबतीत हा अनुभव आला. छोट्या अॅलिसच्या तोंडून वेळोवेळी जे असंबद्ध उद्गार निघत असतात आणि लहानपणी शाळेत पाठ केलेल्या ज्या कविता तिला विडंबित स्वरूपात आठवतात, त्या जशाच्या तशा इंग्रजीच्या मराठी करून देणे हास्यास्पद ठरले असते. तशीच काहीतरी - समानार्थीसुद्धा नव्हे - दुसरी मराठीत रूढ असलेली बडबडगीते किंवा निरर्थक गीतेच द्यायला हवी होती. म्हणजे 'अॅलिस'ला 'जाई' बनवणे आलेच. परभाषेतली कथा आपल्याकडे आणताना सरळ भाषांतर बरे दिसेल की रूपांतर केल्याने तिची शोभा वाढेल, हे अनुवादकाने विचार करून ठरवावे. आनंद दोन्हीत आहे. भाषांतराने मूळ लेखकाला न्याय दिल्याचा आनंद होतो, तर एखादा रूपांतरात रंगल्यावर मूळ लेखक बाजूला पडून आपण एखादी नवनिर्मिती करत आहोत असा आनंद अनुभवतो.

वीरश्रीला आव्हान देणारे वाङ्मय

ऐतिहासिक कथा वीरश्रीला आव्हान देणाऱ्या, त्यामुळे कुमारांना प्रिय असतातच. रजपूत-मराठी इतिहासातल्या वीरांचे शौर्यप्रसंग नेहमीच आपल्याला स्फूर्ती देत असतात. र. ल. उपासनींचे 'मेवाडचे वीर' आणि वि. गं. लेले यांच्या 'मराठ्यांच्या वीरकथा', शं. रा. देवळे यांनी लिहिलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी आणि महान रियासतकारांनी लहानांसाठी लिहिलेल्या मराठ्यांच्या राज्यकथा यांनी हे रणांगण तेजस्वी केले आहे. अनेक पारितोषिकांचे मानकरी बनलेल्या सुधाकर प्रभू यांनी 'अमुचा अजिंक्य हिदुस्थान' म्हणून इतर विभागांप्रमाणे इथेही लेखणी गाजवली आहे. तु. ता. सावंतांची 'महाराष्ट्राची हाक'ही अशीच मुलांना ओ द्यायला लावणारी आहे. शिवप्रभू हा तर आमच्या मुलांचा देवच. काळ बदलला, साधने बदलली, इतकेच नव्हे तर तत्त्वज्ञानही बदलले, तरी शिवाजीच्या गोष्टींनी आजही आमची मुले रोमांचित होतात. मग अनेक किल्ले पालथे घालणाऱ्या दुर्गदर्शन घडवून आणणाऱ्या दांडेकर-पुरंदऱ्यांची नौबत त्यांच्या कानात घुमते आणि श्री. के. देवधरांचा जरीपटका त्यांच्या डोळ्यांपुढे फडफडला तर नवल नाही. आम्ही मोठी झालेली मुले जितक्या उत्सुकतेने मोठे 'अरेबियन नाइट्स' हातात धरीत असू, तितक्या उत्सुकतेने आजचे कुमार वाचक पुरंदऱ्यांच्या भल्या मोठ्या पण कादंबरीसारख्या रंजक 'राजा शिवछत्रपती'ला चिकटून राहतात ही आनंदाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याला पूरक अशी कामगिरी त्याच काळात आसामात करणाऱ्या 'लछित बड फुकन' याची चरित्रकथा म. वि. गोखले यांनी चटकदार पद्धतीने लिहिलेली आहे.

हरिभाऊ आपट्यांच्या आणि नाथमाधवाच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची संक्षिप्त रूपांतरेही बालप्रिय ठरलेली आहेत याबद्दल संक्षेपकार ग. वि. अकोलकर आणि पटवर्धन यांचे अभिनंदन करायला हवे.

खऱ्याखुऱ्या जीवनातील मुलांची साहसकृत्ये अरुंधती महांबरे आदींनी चांगली रंगवली आहेत. अलीकडच्या जीवनातल्या पण वैशिष्ट्यपूर्ण अशा काही कादंबरीकारांचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते. त्यात कुठे ग्रामीण दलितवर्गाचे जीवन आहे, स्वतःला व समाजाला सुधारण्याची जिद्द आहे. मंगळवेढेकरांचा 'मुक्या', चारुशीला गुप्ते यांचा 'बनगावचा सदू', द्वारकानाथ लेले यांचा व शंकर सारडांचा 'गुराख्याचा पोर', व. म. घुले यांची 'कळसू धनगर', तारा पंडित यांचा 'पेट्रोल पंपावरचा पोऱ्या' वगैरे. कोकणातला विद्यार्थी देशावर येऊन आदर्श कामे कशी करतो त्याचे चित्र गो. वि. नामजोशी यांनी रंगवले आहे, तर ग. ल. ठोकळांनी आणि पंडित गुरवांनी अशाच काही खेड्यांतल्या गोष्टी सांगितल्या आहेत. 'बजरंग' आणि 'उमजापूरचा आनंदराव' हीही अशीच ग्रामीण जीवनावरची खुसखुशीत व्यक्तिचित्रे आहेत. रमा बखले यांची 'कळीच्या डोंगराच्या छायेत' ग्रामसेवा करणाऱ्या विद्यार्थिनी गावाला पाणी कसे मिळवून देतात हे सांगणारी कादंबरी किशोर-कथांप्रमाणे, किशोरी-कथांबद्दल आशा निर्माण करणारी आहे. 'विद्याभवनातल्या गमतीजमती' ही साधना कामतांची कादंबरी अशीच विद्यार्थिनींच्या जीवनावर होती. पूर्वी ताम्हनकरांची 'चिंगी' होतीच. आणि पिरोज आनंदकरांनीही अशीच एक मुलींच्या साहसाची कादंबरी लिहिली होती असे आठवते. अलीकडे लीलावती भागवतांनी दोन कथा लिहिल्या आहेत. शैलजा राजे यांच्या एक-दोन कथा आहेत. दत्ताराम बारस्करांची 'छोटी मंजू'ही नुकतीच प्रगटली आहे. आशा भाजेकर, दिवाकर बापट, गिरिजा कीर, ल. ग. देव, ग. वि. साळवी, द. वि. परचुरे, सुशीला चिकटे, दत्ता टोळ, श्रीपाद डोंगरे, वसंत गांगल, सुमन गांगल यांनीही अलीकडे किशोर वाङ्मयात नवी भर टाकली आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांच्या कथा रेचेल गडकर लिहीत आहेत.

चरित्रांचा प्रांत

गोष्टी-गोष्टी-गोष्टी! गोष्टींवरच आपण फार भर देतो की; पण मुलांपुढे मोठ्यांची चरित्रे ठेवली की तीही ती रंगून जाऊन वाचू शकतात. 'असे होते गांधीजी' हे यशवंत जोशींचे, 'थोर शास्त्रज्ञ' हे डॉ. वि. ना गोखले यांचे, 'विज्ञानाचे शिल्पकार' हे शांता पेंडसे यांचे, 'खंडो बल्लाळ' हे वा. अ. देसाईंचे, 'भारतीय वैज्ञानिक' हे यदुनाथ थत्ते यांचे, दत्ताजी कुलकर्णी यांचे 'कलासागरातील मोती' अशी आठवली ती चटकदार पुस्तकांची नावे मी घेत आहे. सुधारक प्रभू यांनीही रंजक चरित्रे लिहिली आहेत. देवळे-सोवनींनी ऐतिहासिक कथा-चरित्रे लिहिली आहेत. गोपीनाथ तळवलकरांचे 'आशियाचे धर्मदीप' गेली अनेक वर्षे प्रकाश देत आहे. दा. न. शिखऱ्यांनी लिहिलेली समाजधुरिणांची चरित्रे बालप्रिय ठरली आहेत. त्यांनीच लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रानंतर बऱ्याच वर्षांनी गोविंद भिड्यांनी 'सागरा प्राण तळमळला' हे गोष्टीरूपाने स्वातंत्र्यवीरांचे चरित्र लिहिले आहे.. प्र. न. जोशी यांनी प्रेरणात्मक चरित्रांची मालाच काढली आहे. के. ना. वाटवे, प्रा. वीरकर व रा. गो. भिडे यांचीही नावे ह्या संदर्भात घेण्यासारखी आहेत. चरित्रे अनेक लिहिली गेली, लिहिली जात आहेत. अलीकडे या लेखनाला गोष्टींचे चटकदार वळण येत चालेल आहे, ही छोट्या मुलांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. क्रिकेट आणि हॉकीमधल्या क्रीडापटूंची वाचनीय चरित्रे बाळ पंडित, र. गो. सरदेसाई आणि खाडिलकर यांनी लिहिली आहेत.

विज्ञानविषयक लेखन

वैज्ञानिक विषायांवर अलीकडे सुगम लेखन होऊ लागले आहे. अणसृष्टीपासून अंतराळविश्वापर्यंत लेखकांची झेप आहे. प्र. न. जोशी, रा. वि. सोवनी, ना. वा. कोगेकर, चिं. श्री. कर्वे, ज. नी.कर्वे, भालबा केळकर प्रभृती लेखक अशा माहितीच्या सोप्या पुस्तकांचा लाभ बालवाचकांना नेमाने करून देत आहेत. छंद, कोडी वगैरेंवर परचुटण लेखन करणे हा आशा भालेकरांचा उद्योग आहे. मालतीबाई दांडेकरांच्या आधी देवीदास बागुल यांनी ह्या साऱ्या बालवाङ्मयाचा आढावा घेण्याचा एक उपक्रम केलेला आहे.

बालसाहित्याला मागेच एक छोटीशी डहाळी फुटली होती. तिची मोठी शाखा बनली नाही, पण तिला जी पाने म्हणजे पत्रे आली ती फार मनोहारी होती. एक म्हणजे साने गुरुजींची 'सुंदर पत्रे' आणि दुसरी ना. ग. गोऱ्यांची 'करवंदे'.

प्राण्यांविषयीची आणि वनस्पतींविषयीची माहिती अनेक छोट्या मुलांना हसतखेळ समजावून द्यावी तर ती श्री. बा. रानड्यांनी, आणि जरा मोठ्यांना असे शास्त्रीय विषय शिकवावेत प. म. बर्वे, द. क. केळकर, वि. श्री. मोडक, वि. आ. मोडक, म. वि. आपटे, वा. वा. केळकर, ज. श. मेढेकर, ना. ह. फडके प्रभृतींनी. 'व्हीनस' आणि 'वोरा'सारख्या प्रकाशकांनी विज्ञानविषयक पुस्तकांच्या चांगल्या मालाही काढल्या आहेत. महादेव शास्त्रींचा 'नक्षत्रलोक' हा जुन्या 'ज्योतिर्विलास'ची आठवण करून देणारा सुंदर ग्रंथ. मुलांसाठी प्रवासवर्णनेही अलीकडे पुष्कळच चांगली निघत आहेत. तिथेही महादेवशास्त्री जोशींचा 'तीर्थरूप महाराष्ट्र' एक आगळे स्थान मिळवून बसला आहे.

विद्यार्जन व चरित्रघडण ह्या दोन्ही बाबतीत मुलांना शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारी मोजकी पुस्तके मराठीत निघाली, त्यांत य. गो. निजसुरे यांचे 'कुमारांचा सोबती' खास उल्लेखनीय म्हटले पाहिजे.

भारतातल्या मुलांसाठी चांगली पुस्तके अकरा भाषांत काढून त्यांचा परस्परपरिचय वाढविण्याचे एक मोठेच काम 'नॅशनल बुक ट्रस्ट'ने हाती घेतलेले आहे. त्यांच्या 'नेहरू वाचनालया'ची पुस्तके छोटी असतात, सोपी असतात - भारतीय नद्या, प्राणी, पक्षी, धान्य, आगगाड्या, पोस्टाची तिकिटे अशा विविध विषयांपासून ते लोककथांपर्यंतचे क्षेत्र या पुस्तकांनी गाठले आहे. इतकेच नाही तर चित्रकार, संगीततज्ज्ञ अशा कलाकारांचीही चरित्रे त्यांनी प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके छपाई, चित्रे, विषय व लेखन या सर्व दृष्टींनी उत्तम आहेत, स्वस्तही आहेत आणि तरी मराठीत ती फारशी खपत नाहीत, त्याअर्थी महाराष्ट्रात त्यांना विशेष प्रसिद्धीच मिळाली नसावी अशी एक शंका येते.

नेत्रदीपक बालनाट्य

आणि हो! बालसाहित्याचा सर्वात नेत्रदीपक म्हणता येईल असा विभाग राहिलाच, तो म्हणजे अर्थात बालनाट्याचा. मराठीत बालनाट्याने चांगले बाळसे धरे आहे; पण ते बेटे अजून अद्भुताच्या पलीकडे जात नाही. अद्भुताचा जो पसारा मांडला गेला आहे, निश्चितपणे नयनमनोहर आणि श्रुतिमनोहर असाच आहे आणि त्याचे श्रेय सुधा करमरकर यांच्या बालरंगभूमीलाच द्यायला हवे. आकाशानंद, दिनकर देशपांडे यांचीही कामगिरी उल्लेखनीय आहे. अर्थात भालबा केळकर आधीपासूनच नाटिका लिहीत आहेत, बसवीत आहेत. त्यांच्यानंतर रत्नाकर मतकरी, सई परांजपे, नरेंद्र बल्लाळ, 'मंगळावर स्वारी'चे सोमनाथ समेळ, वंदना विटणकर, विनय सोनाळकर, जयंत तारे, दत्ता टोळ, श्रीधर राजगुरू यांसारखे बालनाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक पुढे आले आहेत. बाळसृष्टी त्यामुळे खुशीत आहे. आता जरा वास्तव सृष्टीतल्या गडकऱ्यांच्या 'सकाळचा अभ्यास'ने ज्याची नांदी म्हटली असल्या मनोरंजक कथानकांवर आधारित अशी बालनाटकेही पुढे यायला हवीत. 'बेटावरचे बहाद्दर' तशापैकीच होते. आणि आपले खरे वय लपवून बालमनाशी तद्रूप होऊन त्यांच्या बालसृष्टीत किल्ले बांधण्याची विद्या ज्यांना अवगत झाली होती, असे दोन मोठे नाटककारही अशी नाटके घेऊन पुढे आले, ते म्हणजे 'वयम् मोठम् खोटम्'वाले पु. ल. देशपांडे आणि 'चिमणा बांधतो बंगला'वाले विजय तेंडुलकर.

श्याम फडके आणि माधव कुलकर्णी यांनी एखादे नाटक लिहून या क्षेत्रात प्रवेश केला. पण पुढे वाटचाल केली नाही.

चित्रकलेचे साहाय्य आवश्यक

बालवाङ्मय म्हटले की चित्रे हवीतच. आज मुलांसाठी काढलेले एकही पुस्तक चित्राशिवाय आढळायचे नाही. खास मुलांचे चित्रकार म्हणून प्रभाकर गोरे, गोडसे, राम वाईरकर, पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट प्रभृतींनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले आह. भय्यासाहेब ओंकार, हवालदार, सालकर, जोशी, देसाई, परब, कंटक यांनीही आतापर्यंत शेकडो बालपुस्तकांची सजावट केलेली आहे. दलालांचा कुशल कुंचलाही ह्या क्षेत्रात फिरला होता, आणि रघुवीर मुळगावकरांचाही.

मजकुराइतकेच किंबहुना अधिकच जास्त महत्त्व ज्यात चित्रांना आहे, असे चित्रकथांचे नवे दलन आपल्याकडच्या मुलांना अलीकडे खुले झाले आहे. त्यात अनंत पै यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया बुक हाऊस'ने जी भारतातल्या पौराणिक व ऐतिहासिक कथांवर आधारित अशी 'अमर चित्रकथां'ची पुस्तके काढली, त्याचा निर्देश प्रामुख्याने केला पाहिजे. यांतल्या बहुतेक पुस्तकांचे मराठी अनुवाद झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा तऱ्हेचा प्रयत्न खरोखर भारतातही अपूर्व असा होता आणि मराठीत त्याला मिळावी तशी साद मिळाली नाही ही खरोखर खेदाची गोष्ट होय. या अमर चित्रकथा चितारणारांत वाईरकर, प्रताप मुळीक, हवालदार, कबाडी यांच्यासारखे नामवंत महाराष्ट्रीय चित्रकार आहेत. अनंत पै हे एक अस्वस्थ गृहस्थ आहेत. त्यांनी पुढे 'रंगरेखा' नावाची चित्रपट-कथा (Comic Strip) देणारी संस्था काढली आणि आपल्यासारख्याच अस्वस्थ मुलाला - फास्टर फेणेला - त्या चित्रसृष्टीवर बसवले.

मराठी बालसाहित्याच्या रोपाचा असा वृक्ष बनत चालला आहे. माझ्या यादीतूनही काही ठळक नावे निसटली असण्याचा संभव आहे. तसे असल्यास संबंधित बंधुभगिनींनी मला क्षमा करावी. प्रत्येकाला त्याचे श्रेय मिळावे अशी मला अंतःकरणापासूनची इच्छा आहे. मी मुद्दामच विस्तारपूर्वक इतका आढावा घेतला, नामोल्लेखही इतके केले त्याचे कारण ह्या मंडळींनी या उपेक्षित, दुर्लक्षित अशा वाङ्मयक्षेत्रावर जे उपकार केलेले आहेत, ते ऋण केव्हातरी कोणीतरी मान्य केले पाहिजे. मी एखाद्याच विभागात ज्यांचा उल्लेख केला त्यांपैकी बऱ्याच जणांनी इतर विभागांतही लेखन केले आहे. इथे 'वॉटर टाइट कंपार्टमेंट' पाडता येणार नाहीत. इथे कीर्तीचा झगमगाट नाही. द्रव्यप्राप्तीही फारशी नाही. आणि तरी जेव्हा एखादा लेखनपटू मुद्दाम बालांसाठी लेखणी उचलतो, तेव्हा त्याच्यामागे खात्रीने काहीतरी सत्प्रेरणा असली पाहिजे. त्याचे लिखाण कितपत यशस्वी होते, त्याचे मूल्यमापन काय होते हा प्रश्नपुढचा आहे. पण त्याची आस्था आणि कळकळ उपेक्षणीय खास नाही.

गौरवास्पद कामगिरी

मला काही नावांचा इथे गौरवाने उल्लेख करावासा वाटतो आहे, की ज्या मंडळींना आपल्या आयुष्यात सातत्याने फक्त मुलांसाठीच लिखाण केले - विपुल केले आणि चांगले केले. एक म्हणजे सुमतीबाई पायगांवकर, दुसरे शं. रा. देवळे आणि तिसरे - आमचा राजाभाऊ मंगळवेढेकर, की ज्यांनी मुलांसाठी गोष्टी लिहिणे आणि त्यांना सांगणे हा आपला धर्मच बनविला आहे. बालसाहित्याचा जो विभागशः आढावा मी घेतला, त्यात खरे म्हणजे प्रत्येक विभागात हे तिघे बसण्यासारखे आहेत. मालतीबाई दांडेकरही अशाच. त्यांनी तर अपार बालसाहित्य लिहून शिवाय 'बाल-साहित्याची रूपरेषा' तयार केली आणि बालवाङ्मय-अभ्यासकांवर उपकार करून ठेवले.

मुलांसाठी पुस्तके नुसती लिहून भागत नाहीत. ती छापून त्यांच्या हाती द्यावी लागतात. बालपुस्तक प्रकाशनाचे कार्य सातत्याने आणि साक्षेपाने करणारे प्रकाशक म्हणजे केशव भिकाजी ढवळे. त्याशिवाय मौज, पॉप्युलर, व्हीनस, वोरा यांनीही आकर्षक स्वरूपात मुलांसाठी पुस्तके काढली. मुलांच्या हातात पुस्तक देताना ते चांगले लिहिले असावे हे पाहणे, ही जशी आपली जबाबदारी आहे, तसेच त्याचे बाह्यस्वरूप आकर्षक असावे, त्यातली चित्रे दर्जेदार असावीत, मुद्रण सफाईदार असावे, बांधणी पक्की असावी हे पाहणेही आपले काम आहे. बालसाहित्याच्या बातीत हा कटाक्ष विशेष ठेवायला हवा, कारण बालकांची सौंदर्यदृष्टी आपण जोपाशीत असतो, त्यांच्या कल्पनांचा परिपोष करीत असतो. चित्रांना तर फार महत्त्व आहे. एक अनुभव सांगतो. एक छोटी मुलगी पुस्तक वाचीत होती. तिला वाचता येत नाही हे मला माहीत होते. म्हटले - "अगं, तुला अजून अक्षर कळत नाही मग तू वाचते आहेस काय?" ती म्हणाली, "मी चित्र वाचते आहे!"

अर्थात मला ही जाणीव आहे, की हे सगळे करणे म्हणजे खर्चाचे काम आहे. पण मी म्हणेन - कुठेतरी काटछाट करा, पण चित्रे विषयानुकूल आणि मुलांना आवडतील अशी द्या. वाटले तर रंगांना छाट द्या; पण प्रसंगचित्रांची सजावट चांगली असू द्या. मुकुट घालून राजा जेवायला बसला आहे असे कृपया दाखवू नका किंवा बागेतल्या झाडांच्या गर्दीत राजपुत्राचा चेहरा गुरफटून तो राक्षस दिसेल अशी गिचमीड दाखवू नका.

आत्यंतिक अडचणीच्या या काळातही आमच्या प्रकाशकांची हौस आणि जिद्द कायम आहे, हे आमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. मॅजेस्टिक, कॉन्टिनेन्टल, वोरा, नितीन, संजय, जयहिंद, नीलकंठ, लेखनवाचन भांडार, व्हीनस, जोशी-लोखंडे, जगताप-कारले, महाराष्ट्र आणि नागविदर्भ प्रकाशन अमरावती, महाराष्ट्र ग्रंथ भांडार मुंबई, महाराष्ट्र ग्रंथ भांडार कोल्हापूर, नागपूर प्रकाशन यांनी पुष्कळच चांगले साहित्य निर्माण केले आहे. काही नवे प्रकाशक बालपुस्तकांच्या माला किंवा संच काढण्याच्या योजना नित्य हाती घेत आहेत. 'वोरा'च्या गाडगीळांनी योजनाबद्ध प्रकाशन हाती घेऊन नव्या लेखकांना पुढे आणले आहे. 'जोत्स्ना', 'इंद्रायणी'सारखे प्रकाशक खास मुलांसाठी म्हणून छोटी छोटी पुस्तके काढीत असतातच. नव्या दमाचे अरगडे-कुलकर्णी यांनी तर ह्या बाबतीत विक्रमच केला आहे. हौसेला मोल नाही हे अगदी खरे आहे. ह्या सर्व मंडळींनी काढलेली पुस्तके खरोखरीच उत्कृष्ट आहेत. आणि तरी सर्वच प्रकाशकांना माझी नम्र विनंती आहे, की प्रकाशनासाठी आलेले साहित्य एकदा तज्ज्ञांच्या डोळ्यांखालून गेल्यावरच घ्यावे. विषयानुकूल भाषाशैली आहे की नाही; विचार मुलांना रुचतील, पचतील असे आहेत की नाहीत; चित्रेही विषयानुरूप आहेत की नाहीत; हे सर्व तपासून घ्यावे.

असो, आपल्या बालसाहित्यात मला उणीव कशाची भासते आणि त्यात नवीन काय यायला हवे आहे याबद्दल माझे विचार आता थोडक्यात मांडून हे लांबलेले भाषण मी आटोपते घेतो.

(भाषणाचा उत्तरार्ध)

***

हे भाषण उपलब्ध करून दिल्याबद्दल व पुनर्प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. शंकर सारडा यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात श्री. राजीव तांबे व 'ऐसीअक्षरे'च्या सदस्या 'राधिका' यांची मदत झाली. तसेच लेखाच्या सुरुवातीला वापरलेले छायाचित्र भागवत कुटुंबीयांकडून मिळाले आहे. या सर्वांचे अनेक आभार.

---
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कुमारवयातील मुले अद्भुताकडून वास्तवाकडे वळलेली असतात. त्यांना कर्तृत्व दाखवणारे वीर हवे असतात. जादूचा दिवा घासून श्रीमंत होणार्‍या 'अल्लाउद्दिना'पेक्षा अनेक संकटात गटांगळ्या खाऊन स्वत:च्या हिमतीवर एखाद्या फळीच्या आधाराने किनारा गाठणारा 'सिंदबाद' जास्त आवडतो. त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ 'रॉबिन्सन क्रूसो'. कारण तो एकटाच ओसाड बेटाला लागतो असे नाही, तर उपलब्ध अशा सर्व साधनांचा - म्हणजे झाडेझुडपे, जहाजाचे मोडके भाग, आतली हत्यारे आणि इतर वस्तू यांचा - योजक बुद्धीने वापर करून त्या निर्जन बेटावर स्वत:साठी 'फर्निश्ड' बंगला उभा करतो. कुमारवयाच्या मुलांना समाजात जे जे वाईट आहे त्याचा नि:पात करावा असे वाटते. जुने मोडून नवे बांधावे असे त्यांना वाटते.

निव्वळ मार्मिक. कुमारवयीन मुलांची पल्स एकदम बरोबर पकडली आहे भारांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0