अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२
पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.
मी ज्या गोष्टीला घाबरत होतो तेच झाले होते. मी लगेच डॉक्टरांना विचारले, 'माझ्या अन्ननलिकेला भोक पडले आहे का ?' ते म्हणाले , हो पण आम्ही सर्व स्टेप्स घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी त्या भागात एक स्टेंट घातला होता. काही नुकसान झाले नाहीये या खात्रीसाठी मला लगोलग सीटी स्कॅन करायला नेण्यात आले. वाटेत, मी बायकोला काय झाले आहे याची कल्पना दिली. नशिबाने सीटी स्कॅन चा रिपोर्ट चांगला आला. मला आता रुममधे हलवण्यात आले. हाताला सलाईन चिकटले. इंजेक्शन्सचा मारा झाला. पाठोपाठ सर्जन वर आले. त्यांनी आम्हाला सर्व समजावून सांगितले. मला तोंडावाटे आता पाणीही घ्यायचे नव्हते. गेल्या बासष्ट वर्षांत, प्रथमच मी उपास करणार होतो आणि तोही अगदी निर्जळी! पहिली रात्र ग्लानीतच गेली. डॉक्टर सकाळ,संध्याकाळ येत होते. सर्व गोष्टी मॉनिटर होत होत्या. चार दिवसांनंतर एक्स रे मधे माझा स्टेंट थोडा खाली घसरल्याचे लक्षांत आले. डॉक्टरांनी दुसरा स्टेंट बसवावा लागेल याची कल्पना दिली. तोपर्यंत आमच्या नातेवाईकांनी इतर तज्ञांशी सल्लामसलत करुन डॉक्टरांना त्यांचाशी चर्चा करायला लावली. आम्ही तर घाबरुनच गेलो होतो. पण दुसरा इलाजच नव्हता. दुसरा स्टेंट बसवताना तो पहिल्याशी इंटरलॉक करुन नीट बसवण्यात आला. आता माझ्या अन्ननलिकेत दोन डब्यांची छोटी 'मोनोरेल' झाली होती. आणखी दोन दिवस खात्री करुन नंतर मला लिक्विड डाएट वर घालणार असे ठरले. एव्हाना सगळ्यांचे फोन यायला लागले होते. मुलगी अमेरिकेतून रोज विचारपूस करत होती. मी तिला धीर देण्यासाठी मी अजिबात घाबरलो नसल्याचे सांगितले. 'स्टेंटसे स्टेंट मिला' असे गाणे तयार केल्याचे सांगून माझ्यातला 'सेन्स ऑफ ट्युमर' जागरुक असल्याची खात्री पटवून दिली.
लहान असताना आम्ही एक शन्ना नवर्यांचे एक रहस्य नाटक,अ,ब आणि क बघितले होते. त्यातील प्रत्येक अंकाच्या शेवटी अनुक्रमे, अचलाबाई अत्तरदे,बनुताई बनसोडे या ललनांचा खून होतो. तिसर्या अंकाच्या शेवटी कमलाबाई कविश्वर मरणारच असतात, पण खुनी पकडला गेल्यामुळे त्या वाचतात, असे काहीसे कथानक होते. माझी बहिणही माझ्यासारखीच विनोदी स्वभावाची आहे. त्यामुळे माझे 'बलून डायलेशन' करायचे ठरल्यावर मी तिला , अचलाबाईंना घालवायला बलूनताई बनसोडे वापरणार आहेत असे मजेने सांगितले होते. नंतर ती भेटायला आली तेंव्हा मात्र, ती गंभीर असली तरी मीच तिला माझी कमलाबाई होणार होती असे म्हणून हंसवले. असो.
तर सद्यस्थितीला मी घरी आहे पण स्टेंटस महिनाभराने काढायचे असल्यामुळे अन्ननलिकेतच आहेत. त्यांत काहीही अडकण्याचा धोका टाळण्यासाठी लिक्विड डाएट चालूच रहाणार आहे. त्यानिमित्ताने वजन घटवण्याची एक नामी संधी मला मिळाली आहे.
यापुढील भागात या रोगाविषयी विस्तृत लिहिनच. शेवटचा भाग अर्थातच माझे स्टेंटस यशस्वीरीत्या काढले गेले का नाही याबद्दल असेल. अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
काळजी घ्या. अन्ननलिकेशी
काळजी घ्या. अन्ननलिकेशी निगडित हा विकार पहिल्यांदाच कळला. उपचार चालू असतानाही माहिती देण्याबद्द्ल धन्यवाद.
अलिकडेच नात्यातल्या एका बर्याच वयस्कर(८२ वर्षे) आजोबांना अन्ननलिकेचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झाले. ते आता बरे आहेत.पण लिक्विड डाएटवर रहावे लागले त्यांना काही काळ.
लवकर बरे व्हा! तुमच्या
लवकर बरे व्हा! तुमच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.