मराठीत अनुवादित आवडत्या कथा-कादंबर्‍या

(मराठी वाचकांची आवड बदलली आहे का? या चर्चेतले रोचक अवांतर दुसर्‍या चर्चेसाठी वेगळे काढले आहे.)

अनुवादित पुस्तके वाचणे म्हणजे आवड बदलणे असे म्हणणे गैर आहे, उलटपक्षी एका नविन लिखाणाची भरच मराठित पडत आहे असे म्हंटले पाहिजे.

आवड बदलते आहे म्हणण्यापेक्षा आवड विस्तारत आहे असे म्हणणे उचित राहील काय?

अनुवादित पुस्तकांतही विविधता असती - वेगळ्या भाषांतून, वेगळे रचनाप्रकार, इ, तर असे म्हणता आले असते. पण असे आहे का? अन्य भारतीय भाषांमधील साहित्य मराठीत किती येते आणि वाचले जाते हे नक्की माहित नाही, पण प्रत्येक चार महिन्यांनी पाथफाइंडरच्या "अनुवादित" शेल्फ वर भैरप्पा आणि तस्लीमा नसरीन, फार तर "गुरुदेव!" वगैरे रवींद्रनाथांवर काहीतरी. क्वचित साहित्य अकादमीचे एखादे पुरस्कृत पुस्तक इंग्रजी मार्गे मराठीत येते, आणि त्यांच्या प्रचंड वितरण-उदासीनतेवर मात करून चक्क दुकानात येते. बाकी सगळे इंग्रजी बेस्टसेलर्स, आणि त्यात कादंबर्‍या पॉटबॉइलर्सच किंवा पॉटरसारखे हिट असतात (बिगर-कथा-कादंबर्‍या जास्त असतात, पण ते तूर्तास जाऊ दे). विस्तारासाठी नवीन युरोपीय, अमेरिकी, चीनी-जापानी, किंवा मार्केझ वगैरे तर सोडून द्या, पण भगत पेक्षा वरच्या दर्ज्याचे भारतीय इंग्रजी लेखकही दिसत नाहीत - उदा. अमिताव घोष यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या.

त्यामुळे आवडीच्या विस्तारापेक्षा, लोकप्रिय इंग्रजी पुस्तकांचा खप पाहून त्यालाच थोडा विस्तारायचा प्रकार आपण या अनुवादित साहित्याच्या वाढीत पाहात आहोत असे वाटते. समकालीन पर्याय तेवढे सहज मिळत नसल्याने, आणि या साहित्याचा वितरणामुळे, माध्यमांमुळे गाजावाजाही होतो, आणि ते शेल्फ्स्पेसही जास्त घेतात. त्याचा ही वाचकांच्या आवडींवर परिणाम होणारच.

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
बुधवार, 24/09/2014 - 02:18 | लांडगा (Score: 1)

वरदा

पुण्य: 1

प्रतिक्रिया अजून वाचल्या नाहीत, त्यामुळे लांडग्याचा उल्लेख वर आला आहे की नाही कल्पना नाही.
माझी सर्वात आवडती अनुवादित कादंबरी म्हणजे - लांडगा. अनुवाद - अनंत सामंत, मूळ लेखक - जॅक लंडन, मूळ पुस्तकाचे नाव - व्हाइट फँग.
अतिशय सरस अनुवाद. कथा घडते ते ठिकाण, तिथले वातावरण, लोक, त्यांच्या सवयी वगैरे भारताशी जुळणारं काहीही नसूनही कुठेही कृत्रिमता नसलेला, ओघवता अनुवाद पुस्तकाला खिळवून ठेवतो. हा अनुवाद आहे हे कुठेही न जाणवता पुस्तक वाचून संपतं. (माझ्या मते शांता शेळक्यांच्या चारचौघींपेक्षाही हा अनुवाद जास्त चांगला आहे.)

मंगळवार, 23/09/2014 - 12:32 | आणखी एकच फक्त. पु ल. देशपांडे (Score: 2)

धनुष

पुण्य: 3

आणखी एकच फक्त. पु ल. देशपांडे हे माझे अजिबातच आवडते लेखक नाहीत पण त्यांनी केलेला काय वाट्टेल ते होईल या नावाचा एका रशियन पुस्तकाचा अनुवाद मला फार आवडलेला. (परचुरे प्रकाशन) रशियातून अमेरिकेत आलेल्या काही लोकांची छान मिश्किल आणि प्रांजळ अशी गोष्ट आहे, १०० एक पानांची. अनुवाद खुसखुशीत झालाय एकदम.

தநுஷ்

बुधवार, 24/09/2014 - 02:35 | +१ (Score: 2)

अस्वल

पुण्य: 2

नक्कीच.
त्यातली सगळी पात्रं अजूनही लक्षात राहिलियेत. आणि खूप सहजतेने जॉर्जी आय्व्हनोविच, झ्या वानो, इलारियान इ.इ. मंडळी भेटत जातात.
त्यात खास जॉर्जियन खाद्यपदार्थांचा खूप मस्त उल्लेख आहे! ते वाचून लहानपणी एकदा आईला "मला पिरोश्की बनवून दे" असं सांगितल्याचं आठवतं.
काही शब्द मात्र थोडे नवे वाटले -उ.दा सरकारस्वारी- हे कदाचित अ‍ॅडमिरलचं भाषांतर असू शकेल!
पण ए-वन पुस्तक. मूळ लेखकाला काय म्हणायचंय ते तंतोतंत वाचकांपर्यंत पोचतं, त्यात पु.ल अजिबात डोकावत नाहीत.

मंगळवार, 23/09/2014 - 11:43 | ह्या जुन्या धाग्यावर कसा काय (Score: 5 माहितीपूर्ण)

धनुष

पुण्य: 3

ह्या जुन्या धाग्यावर कसा काय पोहोचलो ते आता स्मरत नाही पण ही चर्चा वाचून लिहिण्याची खुमखुमी आवरेना. त्यामुळे, स्वतःलाच इर्शाद म्हणून सादर.

गेल्या अनेक वर्षांत इंग्रजीशी जुळवून घेण्याचे अथक प्रयत्न केले. वैचारिक लिखाणाशी आता बर्यापैकी दोस्ती झाली असली तरी इंग्रजी ललित लिखाण अजूनही कोसभर लांब वाटत त्यामुळे, जमेल तितके अनुवाद मिळवून वाचणे आले.

डोस्टोव्हस्की च्या काही पुस्तकांचे अनुवाद मराठीत वाचलेत. भाऊ धर्माधिकारींनी कारमाझफ बंधू नावानं दोन खंडात ब्रदर्स कारामाजोव चा चांगल्यापैकी अनुवाद केलाय (प्रकाशन: कॉन्टीनेन्टल), इडीयट चा त्याचं नावानं अनुवाद र ध विध्वांस यांनी केलाय. शिवाय जुगारी चे दोन एक तरी निरनिराळे अनुवाद पाहिलेत. काकाचं स्वप्न, गुन्हा आणि प्रायश्चित्त (संक्षिप्त), मेलेल्याची गढी (अनुवाद विश्राम गुप्ते) वैगेरे सुद्धा उपलब्ध असावेत. "य" वर्षांपूर्वी काम्यूच्या आउटसाईडर चे शिरीष चिंधडे आणि सरदेसाई असे दोन निरनिराळे अनुवाद तुलना करण्यासाठी वाचले होते. सरदेसाइंनी केलेला अनुवाद चांगला होता एवढ आठवत. सार्त्र च्या लहानपणीच्या आठवणी वरच्या पुस्तकाचा शब्द नावानं अनुवाद झालाय. हर्मन हेस्से च्या सिद्धार्थ चे किमान २ अनुवाद पाहिलेत. चिं त्र्य सरदेशमुख यांनी केलेला नदीपार नावाचा अनुवाद अप्रतिम होता हे निश्चित आठवतंय. युद्ध आणि शांती (अर्थात टोल्स्तोय) चा अनुवाद साहित्य संस्कृती मंडळाने काढला होता (अर्थात संक्षिप्तच).

काम्युच्याच रिबेल चा अनुवाद जबरदस्त विद्वत्तापूर्ण आणि तितकाच अगम्य होता. प्रस्तावनेच पहिलं वाक्य होत: "जगाचा इतिहास हा स्वातंत्र्याच्या सम्प्रेज्ञेचा इतिहास असतो - हेगेल (ऋतंभरा प्रज्ञा ही समाहितचितस्य प्रज्ञा होय - पतंजली )" ते ३०० पानी पुस्तक वाचायला मला २ वर्षं लागली होती. नंतर अनेक वर्षांनी इंग्रजी पुस्तक वाचताना मला जबरी मजा आलेली. ते इंग्रजी पुस्तक कसलं सोप्प वाटलं. आणखी एक असाच जड अनुवाद म्हणजे - बर्ट्रांड रसेलच्या ७५ पानी प्रोब्लेम्स ऑफ फिलोसोफी चा मे पु रेग्यांनी केलेला अनुवाद. त्या पुस्तकाची प्रस्तावनाच २०० पानी होती. मी तोपर्यंत नाद सोडला होता. रेग्यांच्या तुलनेत रसेल किस झाड कि पत्ती झालाय त्या पुस्तकात. काफ्काच्या ट्रायल चा उत्तम अनुवाद शकू. नी. कनयाळकर अश्या आगळ्या नावाच्या लेखिकेने केलाय. थोडाबहुत काफ्का असं त्याचं नाव. प्रकाशक थोडासा ऑड असल्याने आत्ता नाव आठवत नाहीये (मार्सेल प्रुस्त चं ६०० पानी चरित्र ही ह्याचं प्रकाशकांनी लिहिलंय आणि छापलंय.) नित्शे च्या झरतृष्ट्र चा अनुवाद विश्वास पाटलांनी केलाय. (ते महानायक वाले नाहीत, हे दुसरे. झुन्डीचे मानस शास्त्र नावाने दोन फ्रेंच पुस्तकांचा अनुवाद सुद्धा त्यांनी केलाय) श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात त्यांच आगामी पुस्तक म्हणून नित्शे च्या अनुवादाचा उल्लेख आढळतो. पुस्तक आल्याचं काही पाहिलं नाही. एक खूप आवडलेला अनुवाद म्हणजे गौरी देशपांडेंनी केलेला १६ खंडी अरेबियन नाईटस चा अनुवाद. कसलं भन्नाट प्रकरण आहे ते! विदर्भ मराठवाडा बुक कंपनीने काढलेली १२ खंडी महाभारताची मराठी आवृत्ती पण मस्त आहे.

कुठल्याश्या यक्ष का चेटकिणीच्या शापाने मी माझ्या पुस्तकांपासून सध्या शेकडो मैल लांब असल्याने अजून कित्येक पुस्तकांचे संदर्भ देता येत नाहीत, नाहीतर माझ्या वाचाळीला अंत नव्हता

தநுஷ்

मंगळवार, 23/09/2014 - 14:00 | 'रेबेल' (Score: 3 रोचक)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

>> चिं त्र्य सरदेशमुख यांनी केलेला नदीपार नावाचा अनुवाद अप्रतिम होता हे निश्चित आठवतंय. <<

एक दुरुस्ती - हे त्र्यं.वि. सरदेशमुख.

>> काम्युच्याच रिबेल चा अनुवाद जबरदस्त विद्वत्तापूर्ण आणि तितकाच अगम्य होता. प्रस्तावनेच पहिलं वाक्य होत: "जगाचा इतिहास हा स्वातंत्र्याच्या सम्प्रेज्ञेचा इतिहास असतो - हेगेल (ऋतंभरा प्रज्ञा ही समाहितचितस्य प्रज्ञा होय - पतंजली )" ते ३०० पानी पुस्तक वाचायला मला २ वर्षं लागली होती. नंतर अनेक वर्षांनी इंग्रजी पुस्तक वाचताना मला जबरी मजा आलेली. ते इंग्रजी पुस्तक कसलं सोप्प वाटलं. <<

मी हे मूळ फ्रेंचमध्ये वाचलंय, पण त्यावरून इंग्रजीची कल्पना करता येते. माझ्या मते अशा प्रकारचं तत्त्वचिंतनात्मक पुस्तक मराठीत भाषांतरित करायचं, तर तशी परिभाषा मराठीत अस्तित्वातच नाही, किंवा प्रतिशब्द असलेच, तरी ते भल्याभल्या वाचकांच्याही परिचयाचे नाहीत. त्यामुळे ही 'विद्वत्तापूर्ण पण अगम्य'ची अडचण येते. 'रेबेल'मधल्या एका अंशाचं मराठीत भाषांतर करण्याचा एकदा प्रयत्न केला होता, पण काम्यूला काय म्हणायचं आहे त्याचा सारांश माझ्या शब्दांत देण्यावाचून अखेर पर्याय उरला नाही, कारण नाही तर वाचकांनी शिव्या दिल्या असत्या.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुधवार, 24/09/2014 - 00:05 | बरोब्बर. त्र्य. वि. सरदेशमुख. (Score: 2)

धनुष

पुण्य: 3

बरोब्बर. त्र्य. वि. सरदेशमुख. सॉरी.

परिभाषेचा प्रश्न खरंच फार क्रिटीकल आहे. आणि सत्तरीच्या दशकात विद्यापिठीय स्तरावर आणि रेगे, बारलिंगे, मालशे, स मा गर्गे वैगेरे लोकांचे प्रयत्न असे तुरळक अपवाद सोडले तर ह्या दिशेने फारसा गंभीर प्रयत्न झालेला नाही. आणि इथून पुढे काही फार प्रयत्न होतील असं दिसत नाही. मराठी परिभाषा एक तर संस्कृत शरण आहे किंवा इंग्रजी शरण. देशी (वर्न्यक्युलर) भाषांना तात्विक लिखाण करण्यासाठी मार्गी (कॉस्मोपॉलिटन) भाषांचा सहारा घ्यावा लागतो. मराठीचं स्वतःच ज्ञानशास्त्र आहे का हा एक त्रासदायक प्रश्न आहे.

मराठीत तात्विक लिखाण करताना, सत्ता हा शब्द "असणे" अश्या अर्थी येतो त्यानं लिखाण अनेकांसाठी अगम्य होऊन जाते. उदाहरणार्थ,नामदेव ढसाळांच्या ह्या सत्तेत जीव रमत नाही ह्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी, काही पत्रकारांनी, जीव रमण्यासाठी तुमच्या कडे सत्ता आहेच कुठे, अश्या अर्थाचा प्रश्न विचारला होता. त्यावर वैतागून ढसाळांना हे सांगावं लागलं होते कि सत्ता हा शब्द सत (असणे = बीईंग) ह्या अर्थाने वापरलाय.

தநுஷ்

बुधवार, 24/09/2014 - 14:13 | मराठीचं स्वतःच ज्ञानशास्त्र (Score: 1)

बॅटमॅन

पुण्य: 1

मराठीचं स्वतःच ज्ञानशास्त्र आहे का हा एक त्रासदायक प्रश्न आहे.

किती 'प्रादेशिक' भाषांना स्वतःचं ज्ञानशास्त्र आहे याबद्दल मीही प्रचंड साशंक आहे.

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

शनिवार, 11/02/2012 - 00:44 | अनुवदित लेख /कादम्बर्या (Score: 1)

अन्जलि अजित गद्रे

पुण्य: 1

चान्गली माहिती मिळाली .धन्यवाद !!

सकल मिळुनि हसुनि फुलुनि गोफ गुफु या ग!

गुरुवार, 09/02/2012 - 23:06 | मी वाचलेली सगळ्यात पहीली (Score: 0)
शुक्रवार, 10/02/2012 - 09:15 | गॉडफादर (Score: 3 माहितीपूर्ण)

ऋषिकेश

पुण्य: 2

गॉडफादर कोणाचं भाषांतर वाचलंत.. माझ्याकडे रविंद्र गुर्जरांनी केलेलं भाषांतर आहे. ते व्यवस्थित वाटलं.

बाकी सध्या अघाता ख्रिस्तीच्या पुस्तकांचा मधुकर तोरडमल यांनी भाषांतरीत केलेली पुस्तके मधेमधे वाचतोय. अनुवाद चांगला आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

शुक्रवार, 10/02/2012 - 21:10 | +१ सहमत आहे (Score: 1)

सागर

पुण्य: 1

गॉडफादर कोणाचं भाषांतर वाचलंत.. माझ्याकडे रविंद्र गुर्जरांनी केलेलं भाषांतर आहे.

हे भाषांतर माझे प्रचंड प्रचंड आवडते आहे. (स्माईल)

बुधवार, 08/02/2012 - 18:48 | बाराला दाहा कमी (Score: 1)

ऋता

पुण्य: 2

"बाराला दाहा कमी" हा पद्मजा फाटक आणि माधव नेरुकर यांनी केलेला "ब्रायटर दॅन अ थाउजन्ड सन्स" (रॉबर्‍ट जुंक) आणि इतर काही दुसर् या महायुद्धावर आधारित पुस्त्कांचा स्वैर अनुवाद अप्रतीम आहे. माझ्या मते हा कथा-कादंबर्यान मधे गणता येइल.

बुधवार, 08/02/2012 - 22:13 | हे पुस्तक मिळतं का? मी मागे (Score: 1)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

हे पुस्तक मिळतं का? मी मागे शोधत होते तेव्हा नवीन आवृत्ती निघालेली नाही असं विक्रेत्याने सांगितलं होतं.

गुरुवार, 09/02/2012 - 21:01 | हे पुस्तक वाचनालयातून आणून (Score: 1)

ऋता

पुण्य: 2

हे पुस्तक वाचनालयातून आणून वाचल्याचं आथवतय..सुमारे दहा वर्षांपूर्वी. विकत घ्यायला नक्कीच आवडेल.
मिळतं की नाही माहित नाही. पुण्यात विचारायला हवं. इतक्या चांगल्या पुस्तकाची नवीन आव्रुत्त्ती न निघणं म्हणजे आश्चर्य आहे....महाग असावं.

शुक्रवार, 23/12/2011 - 20:04 | मधुकर तोरडमल (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

आज टिळक स्मारकला ग्रंथ प्रदर्शन भरलेय, तेथे पद्मगंधा प्रकाशन च्या स्टॉलवर मधुकर तोरडमल यांनी अनुवादित केलेल्या अनेक अ‍ॅगथा ख्रिस्टी च्या कादंबर्‍या पाहिल्या.

रविवार, 04/12/2011 - 05:30 | उत्तम (Score: 4 रोचक)

नंदन

पुण्य: 3

चर्चेचा विषय आणि प्रतिसाद आवडले. 'पाषाण' आणि विंदांच्या किंग लिअरच्या अनुवादाची मिळवून-वाचले-पाहिजे च्या यादीत भर पडली आहे. मराठीतल्या आवडत्या अनुवादित कादंबर्‍यांची नावं वरील प्रतिसादांत येऊन गेली आहेतच. अलीकडे 'माझं चीज कोणी हलवलं'सारखी शीर्षकं वाचून अनुवादित कादंबर्‍या/पुस्तकं (काही सन्माननीय अपवाद वगळता) वाचण्याचा धीर झालेला नाही.

अनुवादात जे लॉस्ट इन ट्रान्स्लेशन(!) होतं, ते सर्वस्वी टाळणं अवघड आहे. फ्रेंच आणि इंग्लिशसारख्या जवळच्या भाषांतही Aujourd'hui, maman est morte हे वरकरणी सोपं वाटणारं कामुच्या कादंबरीतलं पहिलंच वाक्य कुठल्या प्रकारे अनुवादित करता येईल, ह्याबद्दल मतभिन्नता आहे. (लॅटिनमधून अनुवादित झालेल्या 'कॅथलिक मास'च्या नवीन अनुवादामुळे झालेला थोडा गोंधळ हे अलीकडचं उदाहरण.) पण वाचकाच्या भूमिकेतून तरी मूळ साहित्यकृतीतले सांस्कृतिक संदर्भ अनुवादांत निसटण्याची शक्यता किमान व्हावी म्हणून भारतीय भाषांतल्या कादंबर्‍या मराठीतून आणि युरोपियन/लॅटिन अमेरिकन/जपानी इ. इंग्रजीतून ही विभागणी त्यातल्या त्यात श्रेयस्कर ठरावी. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर, गीतांजलीतल्या ’देशे देशे दिशे दिशे कोर्मोधारा धाय, ओजोस्रो सोहोस्रोबिधो चोरितार्थाय; जेथॉ तुच्छ आचारेर मोरुबालुराशि, बिचारेर स्रोतोपथ फेले नाय ग्राशी’मधल्या जोश आणि नादमयतेपुढे ’व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर’ अगदीच कोमट वाटतं. याच कवितेचा पाडगावकरांनी केलेला समश्लोकी/छंदी अनुवाद त्याहून नक्कीच सरस.

किंचित अवांतर: प्रत्येक भाषेच्या वेगळेपणावरून हे स्फुट आठवलं - http://2x3x7.blogspot.com/2010/05/small-narcissisms.html

रविवार, 04/12/2011 - 00:14 | अनुवाद सहसा आवडत नाहीत ( lost (Score: 1)

अज्ञात

पुण्य: 1

अनुवाद सहसा आवडत नाहीत ( lost in translation म्हणुन ). याला अपवाद म्हणजे ' एक होता कार्व्हर' आणि ' देरसु उझाला'. माझे सर्वात आवडते अनुवाद आहेत फॅन्टम ( वेताळ ) आणि मॅन्ड्रेक .. पण त्यांना कथा किंवा कादंबरी कसे म्हणावे?

रविवार, 04/12/2011 - 00:54 | एक्झॅक्टली. (Score: 1)

आडकित्ता

पुण्य: 2

हेच म्हणतो.
वेताळ अन मँड्रेक शी नक्कीच सहमती. (हॅरी पॉटरच्या सिक्रेट चेंबरमधला बॅसिलिस्क सर्वप्रथम मी मॅण्ड्रेकमधे वाचला.)
अनुवाद वाचण्यापेक्षा मूळ कृती वाचावी, किमान प्रयत्न करावा हे माझे प्रांजळ मत.

लोचा हा असतो, की त्या कृतींचे लै कौतुक ऐकू ऐकू परेशान झालेल्या लोकांना तितका धीर नसतो. मग भाषांतर वाचतात. अन 'कित्ति मराठी कॉन्टेक्स्ट दिल्यास त्या भाषांतरास! छानच!!' असे प्रतिसाद वाचून भाषांतर करणारा देखिल वाहवत जातो.

मलाही भाषांतरे आवडत नाहीत. अगदी कार्व्हर देखिल सुमार भाषांतर आहे. मूळ कृतीच इतकी सशक्त आहे, की भाषांतरात टिकून जाते. हे माझे मत.

काही भाषांतरांनी थोडे ती भाषा शिकायची गोडी लावली इतकेच. पण त्या आवडलेल्या भाषांतरात 'मराठी काँटेक्स्ट' देण्याचा प्रयत्न अजिबात नव्हता. किम्बहुना म्हणूनच त्या कॉन्टेक्स्ट शोध्ण्यासाठी ती भाषा मुळात शिकण्याची इच्छा झाली. उदा. सुरुवाट मँड्रेक अन फँटम. किंवा हॅन्स अँडरसनच्या परिकथा. इ. ७वीत वाचलेल्या. आल्प्स पर्वतातल्या बर्फिल्या थंडीला कोणत्या प्रकारे मराठीत आणता येईल??

शेवटी भाषा ही त्या त्या मानवसमूहाच्या दैनंदिन अनुभवांचे सार असते. त्या संस्कृतिच्या, त्या जगण्याच्या अभ्यासाशिवाय त्या भाषेला तो बाज, अन तो अर्थ येतच नाही. भाषांतर करताना हा 'डायलेमा' नेहेमीच भाषांतरकारासमोर असावा. मी माझ्या मताने म्हणतो, भाषांतर 'छान् नसते'.

ता.क.
एक प्रश्न अजून.
आपल्या मायबोलीतील सर्व अनुभव्/कथा/विचार्/चिंतन इ. चे कथन आपले वाचून पचवून संपले काय? इथले अनुभवविश्व कोते पडले काय? की म्हणून आपल्याला इतर भाषांतील वाङ्मय वाचावेच लागते? व ते ही 'ट्रान्सलेटेड'???? उदा. संस्कृताची भाषांतरे वाचून कुणाशी इथे भांडु जाईन तर लोक तोंडात शेण घालतात. की अहो, हा अर्थ होत नाही. मग भाषांतरांचे इतके कौतुक व अवडंबर का??

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शनिवार, 03/12/2011 - 06:57 | पाषाण (Score: 1)

सन्जोप राव

पुण्य: 2

'पाषाण' वर वर प्रतिक्रिया आल्याच आहेत. त्यात विशेष भर घालावी असे फारसे मजजवळ नाही. ही कादंबरी कोणत्या तरी साप्ताहिकात की पाक्षिकात क्रमशः प्रकाशित होत असे. नंतर ते पुस्तक निघाले. ते विकत घेऊन किती तरी वेळा वाचल्याचे आठवते. नंतर शिरस्त्याप्रमाणे ते कुणीतरी वाचायला म्हणून नेले आणि आजतागायत परत केले नाही. हे सगळे आठवणेही त्रासदायक आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शुक्रवार, 02/12/2011 - 12:20 | देनिसच्या गोष्टी (Score: 3 माहितीपूर्ण)

मेघना भुस्कुटे

पुण्य: 2

देनिसच्या गोष्टी ('अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ देनिस' - व्हिक्तर द्रागून्स्की - रशियन) - अनिल हवालदार
हे मला खूप आवडणारे एक भाषांतर होते. पण दुर्दैवाने ते आता बाजारात मिळत नाही. श्रीनिवास कुलकर्णी नाम कुणीसे केलेले याच पुस्तकाचे भाषांतर मिळते, पण ते वाईट आहे. आशय आणि स्वरूप दोन्ही बाबतींत.

-मेघना भुस्कुटे
***********
'रेषेवरची अक्षरे': मराठी ब्लॉग्स आणि फोरम्सवरच्या निवडक ललित साहित्याचं संकलन: दिवाळी २०१५

शुक्रवार, 02/12/2011 - 13:18 | +१ (Score: 2)

ऋषिकेश

पुण्य: 2

वर म्हटल्याप्रमाणे माझ्याही अत्यंत आवडत्या पुस्तकंपैकी एक
हे पुस्तक ज्यांना दिले होते त्याच्याकडे दुर्दैवाने २६ जुलैला पाणी शिरले आणि हे पुस्तक त्यात पूर्ण भिजून गेले Sad
आठवले तरी वाईट वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

शुक्रवार, 02/12/2011 - 05:19 | वाचलेले एकच अनुवादित पुस्तक आठवते (Score: 3 माहितीपूर्ण)

धनंजय

पुण्य: 2

चर्चा नुसती वाचतोच आहे..

लहानपणी माझे इंग्रजी वाचन अधिक आणि मराठी वाचन मर्यादित होते. त्यामुळे मराठीमध्ये भाषांतरित पुस्तके फारशी आठवत नाही. आठवणारे - "एक होता कार्व्हर".

संस्कृत महाकाव्यांतील गोष्टी मराठीत वाचलेल्या आहेत, पण ती म्हणजे भाषांतरे नव्हेत. काही बंगाली कादंबर्‍या हिंदीत अनुवादित वाचलेल्या आहेत. उत्तम अनुवाद म्हणून काही आठवत नाहीत.

कित्येक वर्षांपासून राहिलेली आहे, जी ए कुलकर्णी यांनी मराठीत भाषांतरित केलेली "लॉर्ड ऑफ द फ्लाइज". हिच्याबाबत चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. ("लॉर्ड ऑफ द फ्लाइज" मला इतकी खिन्न करते, की इंग्रजीतही सलगपणे मी ती फक्त एकदाच वाचलेली आहे. त्यानंतर फक्त थोडा-थोडा भागच एका-एका वेळी वाचला आहे. भाषांतर चांगले असेल, तर उगाच कशाला स्वतःचा छळ करून घ्या? म्हणून उशीर करतो आहे, बहुतेक.)

शुक्रवार, 02/12/2011 - 10:43 | भाषांतर चांगले आहे. आणि (Score: 2)

मेघना भुस्कुटे

पुण्य: 2

भाषांतर चांगले आहे. आणि तुमच्याशी मी सहमत आहे. तो छळच आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
'रेषेवरची अक्षरे': मराठी ब्लॉग्स आणि फोरम्सवरच्या निवडक ललित साहित्याचं संकलन: दिवाळी २०१५

गुरुवार, 01/12/2011 - 14:05 | आवडता विषय (Score: 5 माहितीपूर्ण)

अदिति

पुण्य: 3

पाडस आणि चौघीजणी हे मी वाचलेले सर्वोत्कृष्ठ अनुवाद आहेत यात शंकाच नाही. त्यांच्याबद्दल वर चर्चा झालीच आहे आणि मी तिच्याशी सहमत आहे.
तोत्तोचान(चेतना सरदेशमुख - गोसावी) ,चीपर बाय द डझन(मंगला निगुडकर) , चिट्टी चिट्टी बँग बँग (बहुदा भा. रा. भागवत) हे बालदाहित्यातले काही उत्कृष्ठ अनुवाद मी वाचले आहेत.

रवींद्र गुर्जरांनी केलेला 'कॉन टिकी' हा अनुवाद अनुवाद आणि कथा या दोन्हीही दृष्टीने अफलातून आहे. मला अतिशय आवडलेला आहे.
निरंजन घाट्यांनी केलेला निसर्गप्त्र हा अनुवाद अतिशय सुरेख झालेला आहे. आवर्जून वाचावा अशी शिफारस नक्की करावीशी वाटते. निरंजन घाट्यांनीच दुसर्‍यामहायुद्धातील हवाई हल्ले, दुसर्‍या महायुद्धातील स्त्रियांचा सहभाग याबदल पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अनुवाद म्हणता येईल का ते माहीत नाही पण ती फारच सुरेख आहेत हे मात्र खरे.

अपर्णा वेलणकरांनी केलेला गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज चा अनुवाद अनुवाद म्हणून चांगला वाटला होता. मूळ पुस्तक मी वाचलेले नाही पण अनुवाद अनुवादच वाटत होता भाषांतर नाही हे छान वाटले.

जी. एंनी बिम्मची बखर आणि मुग्धाची रंगीत गोष्ट ही पुस्तकं लिहिली आहेत. ती अनुवाद आहेत का ते माहीत नाही. नसल्यास क्षमस्व.

वर उल्लेख केलेला पाषाण हा देन देअर वेअर नन चा अनुवाद फारच छान झाला आहे. मी दोन्हीही पुस्तकं वाचली आहेत. पाषाण मधे पात्रांचे आणि स्थळांचे कथेला धक्का न लागू देता भारतीयीकरण केले आहे आणि ते चांगले जमले आहे असे माझे मत आहे.

ब्रोकन यस्टरडेज नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा 'रात्र थोडी सोंगे फार' हा अनुवाद उत्तम आहे असे ऐकून आहे. अजून तो वाचायला मिळालेला नाही. वाचल्यावर अधिक तपशीलवार मत द्यायला आवडेल.

अनुवादकर्त्यांमधे मला भा. रा. भागवतांची शैली फार आवडते. शेरलॉक होम्स, कॅप्टन नेमो, शेंडेनक्षत्र इ. त्यांची अनुवादित पुस्तके खूप आवडली होती. काही होम्सकथांचा अनुवाद करत असताना मला भागवतांचे अनुवाद बरेच वेळा आठव्ले आणि उपयोगे पडले. वर फास्टर फेणे चा उल्लेख आहे. माझ्या माहितीप्रमाणे फास्टर फेणे हे नाव इंग्रजी असलं तरी तो अनुवाद नाही तर भागवतांची स्वतंत्र निर्मिती आहे.

अनंत सामंतांनी केलेला लांडगा हा 'व्हाईट फँग्स' चा (मूळ पुस्तकाच्या नावाबद्दल चूभूदेघे) अनुवाद आवर्जून वाचावा असा आहे असं ऐकून आहे.

गौरी देशपांड्यांनी केलेला अरेबियन नाईट्स च्या अनुवादाचे बरेच खंड आहेत. त्यातला एक वाचला आहे. तोही अनुवाद उत्तम झाला आहे.

सध्या मेहता प्रकाशनातर्फे अ‍ॅलिस्टर मॅक्लीनच्या पुस्तकांचे अनुवाद अनिल पाध्ये करत आहेत. मला ते चांगले वाटले. नौकानयनशास्त्र आणि नौकाबांधणीशस्त्राशी संबंधित अनेक संज्ञांना त्यांनी उत्तम मराठी संज्ञा दिलेल्या आहेत ही गोष्ट विशेष उल्लेखनीय वाटली.

बाळ सामंतांनी 'थिन एअर' या पुस्तकाचा 'स्पेस ट्रँगल' या नावाने मराठी अनुवाद केला आहे. तोही चांगला आहे असे वाटते.

शरदचंद्रांच्या श्रीकांतेर भ्रमणकथा आणि पथेर दाबी चे मराठी अनुवाद (बहुदा कालेलकरांनी केलेले) कॉलेजमधे असताना वाचले होते. त्यापैकी पथेर दाबी खूप आवडले होते असे आठवते आहे.

आजिबात न आवडलेले अनुवाद म्हणजे फाईव्ह पॉइंट समवन, अल्केमिस्ट, व्हेअर ईगल्स डेअर, फाऊंटनहेड इ. पुस्तकांचे अनुवाद. अनुवाद वाचून ९०% मूळ पुस्तक लिहून काढता येईल इतके ते शाब्दश: होते.

सध्या एवढेच आठवताहेत. आणखी पुस्तके आठवली की देईनच.

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

बुधवार, 24/09/2014 - 00:07 | होय चिट्टी चिट्टी बँग बँग - (Score: 2)

वामा१००-वाचनमात...

पुण्य: 2

होय चिट्टी चिट्टी बँग बँग - भारा भागवत च.
मी लहानपणी जाईची नवलकहाणी हा 'अ‍ॅलिस इन वंडरलँड चा" अनुवाद वाचला होता. खरच सुरेख होता.

गुरुवार, 01/12/2011 - 15:03 | भा. रा. भागवत कसे विसरलो! छ्या! (Score: 2)

ऋषिकेश

पुण्य: 2

अदितिचे ऐसीवर स्वागत (स्माईल)

मी भा रा भागवत कसे विसरलो! छ्या! अगदी ओशाळलो आहे Sad
असो. त्यांच्या ज्युल्स व्हर्न च्या कादांबर्‍यांचा थरार अतिशय बेमालुम पोचवला आहे..
रविंद्र गुर्जरांचा सत्तर दिवस (किंवा अन्य अनुवादही) चांगले आहेत. भाषांतराचा बोजडपणा फार येत नाही. जिथे चांगल शब्द सुचला नाहि तर सरळ ते इंग्रजी शब्द देवनागरीत लिहितात (डोळा मारत)

बाकी, जी.ए.कुलकर्णींचे 'गाव', 'शिवार' वगैरे कॉन्रॅड सिक्टरच्या कादंबर्‍यांचे भाषांतर मला अजिबात आवडले नाहि. मुळ कादंबर्‍या बर्‍याच सरस वाटल्या!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

गुरुवार, 01/12/2011 - 13:23 | अशोक शहाण्यांचे अनुवाद (Score: 2)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

>>शहाणेंनी नेमक्या कुठल्या लेखकांचा अनुवाद केला आहे याची संपूर्ण यादी कुठे उपलब्ध होईल का?<<

यादी संपूर्ण आहे का ते माहीत नाही, पण महाराष्ट्रातल्या निवडक सार्वजनिक ग्रंथालयांत असणार्‍या शहाण्यांच्या पुस्तकांची यादी इथे सापडेल. त्यातले जे अनुवाद आहेत ते सहज लक्षात येतील असे आहेत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुरुवार, 01/12/2011 - 14:35 | शहाणे (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

अनेक आभार - माणिक बंद्योपाध्यायांचे "साइखडयांच्या खेळाची गोष्ट" (पुतूल नाचेर इतिकॉथा) या यादीत पाहून आनंद झाला - अलिकडेच ही कादंबरीचे रंगमंचावर अगदी प्रभावी रूपांतर पाहिले - मूळ कादंबरी वाचायची इच्छा तेव्हा झाली होती.

गुरुवार, 01/12/2011 - 14:34 | प्रास (Score: 3 माहितीपूर्ण)

अशोक पाटील

पुण्य: 2

@ चिं.जं.
~ तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये 'तस्लिमा नसरीन' यांच्या कुठल्याच पुस्तकाचा उल्लेख नाही हे पाहून नवल वाटले. कारण अशोक शहाणे यानीच तस्लिमाची मराठीत ओळख करून दिली होती. [तसेच 'शंकर' या बंगाली लेखकाचा उल्लेख 'शंकरलाल' असा तिथे केलेला पाहून गप्पच बसलो.] असो.

@ रोचना
मर्यादित आणि जनअरण्य - शंकर, साइखड्यांच्या खेळाची गोष्ट - माणिक बंदोपाध्याय, इसम - गौरकिशोर घोष, लज्जा, फेरा, महानगर आणि फिट्टमफाट - तस्लिमा नसरीन, नाट्यकला - शंभू मित्र, डाकघर - रवीन्द्रनाथ टागोर, अमिताभ - सौम्य बंदोपाध्याय, घरंदाज गोष्टी - निवडक बंगाली लघुकथांचे अनुवाद, माझी कहाणी - उस्ताद अल्लाऊद्दीन खाँ (मूळ बंगाली लेखक शुभमय घोष)

(एवढीतरी मला माहीत आहेतच. त्याहून अधिकची माहिती आणि पुस्तकेही तुम्हास हवी असल्यास "प्रास प्रकाशन, वृंदावन- २ बी/५, रहेजा टाउनशिप, मालाड पूर्व, मुंबई- ४०००९७. दूरध्वनी- (०२२) २८७७७५९० यांच्याशीही संपर्क साधू शकता. स्वतः अशोक शहाणे हेच "प्रास" चे प्रकाशक आणि मालक आहेत.)

अशोक पाटील

गुरुवार, 01/12/2011 - 15:34 | शहाणे + तस्लीमा नसरीन (Score: 2)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

>>@ चिं.जं. ~ तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये 'तस्लिमा नसरीन' यांच्या कुठल्याच पुस्तकाचा उल्लेख नाही हे पाहून नवल वाटले. <<

त्या यादीतलं फिटंफाट हे तस्लीमा नसरीन यांच्या एका पुस्तकाचं भाषांतर आहे. यादीची मर्यादा ही प्रकल्पात सहभागी ग्रंथालयांच्या मर्यादेनुसार आहे. म्हणूनच यादीच्या पूर्ण-अपूर्णतेविषयी खात्रीलायक सांगता येत नाही.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुरुवार, 01/12/2011 - 15:45 | तस्लिमा (Score: 2)

अशोक पाटील

पुण्य: 2

येस्स. आहे तिथे 'फिटंफाट'. स्लो नेट स्पीडमुळे त्या लिंकचे पहिलेच पान उघडायला अंमळ वेळ लागला त्यामुळे माझाही असा समज झाली की अशोक शहाणे यांच्या लेखनासंबंधी तेवढे एकच पान आहे (अर्थात त्या पानावरदेखील फिटंफाट आहेच, पण माझ्या नजरेतून हुकले खरे)

थॅन्क्स फॉर पॉईन्टिंग द फॅक्ट

अशोक पाटील

बुधवार, 30/11/2011 - 20:29 | मामा वरेरकर आणि अशोक शहाणे (Score: 3 माहितीपूर्ण)

अशोक पाटील

पुण्य: 2

बंगाली साहित्याच्या दर्जाबद्दल मराठीमध्ये अतिशय आदराने लिहिले/बोलले जाते (आज उमा कुलकर्णी यानी भैरप्पांची छानपैकी ओळख करून दिली असल्याने कन्नड साहित्याच्या प्रांतातही मराठी वाचक उत्सुकतेने डोकावत असल्याचे जाणवते. साहित्य अकादमीच्या स्थापनेमागील हादेखील एक उद्देश आहेच). मामा वरेरकरांनी जवळपास सारे 'शरद' साहित्य बंगालीतून मराठीत आणल्याने १९४० ते ६० च्या दशकातील पिढीला शरदचंद्र चट्टोपाध्याय या नावाने वेड लावले होते असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आजची पिढी 'देवदास' आणि "परिणीता" या दोन चित्रपटामुळे बंगालचे सामाजिक स्तर अनुभवत आहे. पण शरदबाबूंनी 'देवदास' सन १९०१ [११० वर्षे होऊन गेली तरी 'देवदास, पारो, चंद्रमुखी' या त्रयीची जादू तशीच आहे] मध्ये लिहीली होती हे समजले की या लेखकाची मोहिनी किती जबरदस्त वाचकाच्या मनावर राहिली असेल याची काहीशी कल्पना येऊ शकते. 'परिणीता' चे वर्ष १९३१, तर त्यांच्याच गाजलेल्या कादंबर्‍यावर हिंदीत 'स्वामी', 'अपने पराये', 'छोटी बहु' असे गाजलेले चित्रपट निघाले होते. मराठीतील अनुवादामुळे घरोघरी 'शरदबाबू' पोचले होते ही अनुवादाच्या उपयुक्ततेचे एक चांगले लक्षण मानले जावे.

जी.ए.कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे या दोघात शरदबाबूंच्या 'शेषप्रश्न' बद्दल विचाराची जी देवाणघेवाण झाली ती मुळातून ("प्रिय जी.ए.") वाचण्यायोग्य आहे.

वरेरकरानंतर 'लिटल मॅगेझिन' चळवळीचे अध्वर्यू अशोक शहाणे यांचेही बंगाली साहित्य मराठीत अनुवादित करून आणण्याचे महत्वाचे योगदान आहे. "शंकर" या नावाने लेखन करणारे मणिशंकर मुखर्जी यांच्या 'जनअरण्य' आणि 'मर्यादित' या मला व्यक्तीशः आवडलेल्या दोन अनुवादित कादंबर्‍या, ज्यांच्यावर सत्यजित रे यानी चित्रपटनिर्मिती केली होती. अशोक शहाणे यानी तसलिमा नसरीन यांचेही बरेचसे बांगला भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित करून त्या लेखिकेच्या प्रतिभेचा इथल्या वाचकाला परिचय करून दिला आहे.

(अर्थात याबरोबर हेही सांगणे गरजेचे आहे की, 'अशोक शहाणे' ही एक साहित्य चळवळीशी निगडित असलेली व्यापक अशी संस्था आहे. त्यामुळे त्याना केवळ 'अनुवादक' मानणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. श्री.अंबरिश मिश्र यानी आपल्या "सुंदर ती दुसरी दुनिया" या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हटले आहे --

अशोक शहाणेंना -
"ऐसा कहां से ले आऊं के तुझ-सा कहूं"

फार बोलकी आहे ही भावना.

अशोक पाटील

गुरुवार, 01/12/2011 - 13:15 | प्रकाशन माहिती (Score: 3 माहितीपूर्ण)

रोचना

पुण्य: 2

हो, शरदबाबूंचे सर्व मराठी अनुवाद इथे नॅशनल लायब्ररीत आहेत, आणि १९-व्या, व २०व्या शतकाच्या पूर्वाधाचे बरेच बंगाली दिग्गजही आहेत. सँपल म्हणून कॅटलॉग मधल्या काही नोंदी:

१. गौरमोहन / रवीन्द्रनाथ ठाकूर ; अनुवादक कुशाग्र, पुणे: शुरसग्रंथप्रसारक मंडळी, १९१६ (अजून बरीच पुस्तके)
२. बंदिनी / जरासंध ; अनुवादक इन्दुमती केळकर, पुणे: १९६९
३. परिनीता / शरच्चंद्र चट्टोपाध्याय ; अनुवादक बी. व्ही. वरेरकर, मुंबई: नवभारत प्रकाशन संस्था, १९५५ (बाकी सगळी आहेत)
४. श्रीकांत / शरच्चंद्र चट्टोपाध्याय ; अनुवादक बी. व्ही. वरेरकरर, मुंबई: नवभारत प्रकाशन संस्था, १९३९-१९५६
५. संपूर्ण बन्किमचंद्र / बन्किमचंद्र चट्टोपाध्याय, मुंबई: भारत गौरव ग्रंथमाला, १९२३ (सुट्या कादंबर्‍या - आनंदमठ इ - पण आहेत)
६. हेम जीवन / एन. गंगोपाध्याय ; अनुवादक वी. जी. देशपांडे, पुणे: डेसमुख, १९४७
७. महानगर / नरेन्द्रनाथ मित्र ; अनुवादक श. भ. बेदरकर, पुणे : श्रि प्रकाशन, १९७५
८. प्रियबांधवी / प्रबोधकुमार सन्याल ; अनुवादक एस. जी. गोगटे, कोल्हापुर : महारष्ट्र ग्रंथ भन्डार, १९५७
९. आरण्यक / विभूतिभूषण बंद्योपाध्याय ; अनुवादक शंकर भालाजी शास्त्री, नागपुर : साहित्य अकादमी, १९६४

कॅटलॉग चाळता अनुवादांचे प्रकाशन वैयक्तिक प्रकाशकांकडून साहित्य अकादमीकडे वळताना दिसते, आणि २०व्या शतकाच्या उत्तरार्धाचे लेखक यादीत अजिबात नाहीत... लायब्ररीने ते घेणे बंद केले, की अनुवादच कमी होत गेले माहित नाही. शहाणेंनी नेमक्या कुठल्या लेखकांचा अनुवाद केला आहे याची संपूर्ण यादी कुठे उपलब्ध होईल का?

बुधवार, 30/11/2011 - 18:55 | पाडस आणि चौघीजणी (Score: 1)

मिहिर

पुण्य: 2

मला 'पाडस' आणि 'चौघीजणी' हे अनुवाद खूप म्हणजे खूप आवडले. 'ती फुलराणी' आणि वि. वा. शिरवाडकरांचे 'ऑथेल्लो'ही आवडले.
भा. रा. भागवतांचा फास्टर फेणेचा अनुवाद आवडलेला.

बुधवार, 30/11/2011 - 14:08 | मराठी अनुवाद (Score: 4 रोचक)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

मूळ पुस्तकाचा दर्जाही उत्तम आणि अनुवादही उत्तम असं मिश्रण माझ्या मते मराठीत तर विरळाच. मूळ भाषेतल्या शब्दांना अनेक वेगवेगळे अर्थ असतात; अनेक समानार्थी शब्दांपैकी लेखकानं विशिष्ट शब्द काही हेतूनं निवडलेले असतात. त्यांमागे सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक संदर्भ असू शकतात. मूळ साहित्यकृतीतल्या भाषेला एक लहेजा असू शकतो. शब्दांच्या/वाक्यांच्या रचनेतून/योजनेतून मूळ साहित्यकृतीला काही प्रवाहीपण किंवा वजन येतं. वापरलेल्या शब्दांना ध्वनी असतो; त्यांतून वाक्यांना एक प्रकारची गेयता/कोरडेपणा वगैरे येऊ शकतात. अशा अनेक गोष्टींतून मूळ लेखकाला काय परिणाम अभिप्रेत आहे, हे लक्षात न घेताच अनेकदा ढोबळ मानानं नुसती एक गोष्ट सांगितली जाते. 'साधारण अर्थ कळल्याशी मतलब' असं म्हणता म्हणता मूळ साहित्यकृतीचा आत्माच हरवून जातो. मराठीत असे अनुवाद पुष्कळ आहेत.

मोठेमोठे लेखकही या सापळ्यातून सुटत नाहीत. 'ती फुलराणी' ही शॉच्या 'पिग्मॅलिअन'पेक्षा 'माय फेअर लेडी' या अधिक लोकानुनयी कलाकृतीच्या जवळ जाणारी होती. 'तीन पैशांचा तमाशा' आणि 'थ्रीपेनी ऑपेरा'मध्ये खूप फरक होता असं आठवतं. पु.लंच्या 'एका कोळियाने'नं हेमिंग्वेच्या मूळ पुस्तकाच्या कशा चिंधड्या केल्या हे जाणून घ्यायचं असेल तर विलास सारंग यांच्या 'अक्षरांचा श्रम केला' या पुस्तकातला त्यावरचा लेख वाचायची शिफारस करेन. अशोक केळकरांनी 'मध्यमा'मध्ये भाषांतराविषयी चांगलं विवेचन केलेलं आहे. तेसुद्धा जरूर वाचावं अशी शिफारस करेन.

'मूळ पुस्तकाचा दर्जाही उत्तम आणि अनुवादही उत्तम' असं पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे 'किंग लिअर'चा विंदांनी केलेला अनुवाद. जर मूळ नाटकाशी परिचय असेल तर प्रतिभावान अनुवाद म्हणजे काय ते कळतं आणि मग या तोडीचं मराठीत दुसरं काय आहे हे सुचेनासंच होतं.

विंदांनी केलेलं तृणपर्णे (वॉल्ट व्हिटमनचं 'लीव्ह्ज ऑफ ग्रास) आणि डॉ. फाउस्ट (गथ) वाचलेले नाहीत. तेंडुलकरांनी काचेची खेळणी (टेनेसी विलिअम्सचं ग्लास मेनाजरी) आणि वासनाचक्र (स्ट्रीटकार नेम्ड डिझायर?) असे दोन अनुवाद केले आहेत. तेही वाचायचे आहेत. कवी सदानंद रेगे यांनी इडिपस, मिडीआ, मोर्निंग बिकम्स एलेक्ट्रा, डॉल्स हाउस अशा काही जगप्रसिद्ध नाटकांचे आणि स्टाइनबेकची 'पर्ल' किंवा इतर काही कादंबर्‍यांचे अनुवाद केले होते.

इतर अनुवादांमध्ये थोडा विचार करता आठवणारं एक नाव म्हणजे सॅम्युएल बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चा माधुरी पुरंदरे यांनी केलेला अनुवाद. हा अनुवाद म्हणून चांगला जमलेला आहे कारण मूळ फ्रेंच नाटकाचा गवसायला कठीण असा गाभा त्यात उतरलेला आहे. त्यांनीच केलेला 'डॉन जुआन' या मोलिएरच्या तुलनेनं कमी प्रसिद्ध पण रोचक नाटकाचा अनुवादही ('न भयं न लज्जा') चांगला वाटला होता.

अवांतर: लिअर आणि गोदो - दोन्ही नाटकांचे मराठीतले प्रयोगही चांगले झाले होते. लिअरचा प्रयोग 'प्रत्यय' या कोल्हापूरच्या संस्थेनं केला होता. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका डॉ. शरद भुताडिया यांची होती. 'गोदो' पुण्याच्या अतुल पेठे यांनी बसवलं होतं. नसीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी आणि टॉम आल्टर यांनी इंग्रजीत केलेल्या 'गोदो'वर तो प्रयोग बराचसा आधारित होता.

टीपः कथा-कादंबर्‍या म्हणताना कथनात्मक साहित्य असा अर्थ अभिप्रेत होता आणि नाटकंदेखील त्यात चालून जातील अशी आशा आहे. माझ्या उदाहरणांत नाटकंच खूप आहेत, पण काय करणार? चांगले अनुवाद नाटकांचेच अधिक प्रमाणात झाले आहेत असं मला वाटतं.

(श्रेयअव्हेरः इतरत्र प्रकाशित झालेल्या माझ्याच एका पूर्वीच्या प्रतिसादात किंचित भर घालून हा प्रतिसाद दिला आहे.)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुधवार, 30/11/2011 - 14:59 | मजकूर (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

हो, अनुवादात शैलीपेक्षा मजकूरावर (आणि उपयुक्ततेच्या वरवरच्या कल्पनेवर) जास्त भर दिला जातो असे जाणवते.

टीपः कथा-कादंबर्‍या म्हणताना कथनात्मक साहित्य असा अर्थ अभिप्रेत होता आणि नाटकंदेखील त्यात चालून जातील अशी आशा आहे. माझ्या उदाहरणांत नाटकंच खूप आहेत, पण काय करणार? चांगले अनुवाद नाटकांचेच अधिक प्रमाणात झाले आहेत असं मला वाटतं.

अगदी, अगदी. कालच नॅशनल लायब्ररीचे कॅटलॉग चाळत असता मराठी नाटकांचे अनेक बंगाली अनुवाद पाहिले - आणि श्रीपाद जोशांनी बादल सरकार यांच्या नाटकांचे केलेले मराठी अनुवादही यादीत आहेत. जोशांनी अनेक हिंदी-उर्दू कथाही अनुवादित केल्या आहेत, पण त्याबद्दल तपशील यादीत नव्हता.

बुधवार, 30/11/2011 - 13:50 | अनुवाद पाहिजेत. (Score: 2)

दिलतितली

पुण्य: 2

अनुवाद पाहिजेत. उत्तम, बरे किंवा वाइट. पाहिजेतच. आवड बदलते आहे व आवड विस्तारतही आहे.. हे दोन्ही होणे स्वाभाविक आहे असे वाटते.. वरील संपूर्ण चर्चा आवडली. महत्वाची वाटली.

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

बुधवार, 30/11/2011 - 09:51 | अ‍ॅगाथा ख्रिस्ती... (Score: 4 माहितीपूर्ण)

मन

पुण्य: 2

१.अ‍ॅगाथा ख्रिस्तींचे "पाषाण" नावाचे वेगळ्या धाटणीचे थरारक, गूढ असे एक स्वैर अनुवाद असलेले पुस्तक वाचले होते.
अनुवाद कुणी केलाय ते आठवत नाही, पण अगदि सुंदर आहे.
ह्या कथेतील कल्पना ढापून व त्या कल्पना चुथडा करून त्याचे बॉलीवूडीकृत रूपडे म्हणजे "गुमनाम" हा मनोजकुमार व मेहमूद चा सिनेमा "गुमनाम"("हम काले है तो क्या हुआ दिलवाले हाsssइन" गाणे असलेला)
पुस्तक वाचलेले असेल तर पिक्चर असह्य कंटाळ्वाणा व बिनडोक वाटतो.
हीच कथा ढापून "आहट" च्या लायनीवर असलेल्या कुठल्यातरी मालिकेने त्याचे काही एपिसोडही बनवलेत.(Dr Jackle And Mr HIde ह्याची जशी अगणित भ्रष्ट रुपे बॉलीवूड्,झी हॉरर शो,आहट ह्यातून बनली तशी)

२.मराठितले बायबल व सोळाव्या शतकातले "क्रिस्तपुराण" सुद्धा उपयुक्त वाटले.(त्यातील दुसरे फारसे वाचता आले नाही.)

३.अल्केमिस्ट मराठितही आहे, पण मूळ कथेचे इतके ढोल का वाजवताहेत.इंग्लिश व मराठी वाचूनही अखेरपर्यंत समजले नाही.
४.शेरलॉक होम्स मराठित थोडाफार वाचलाय शालेय जीवनात. लेखक आत्त आठवत नाही.

५.पुलंचे आवडते पी जी वूडहाउस हेसुद्धा मराठित फार फार पूर्वी थोडेफार वाचलेत. मला आवडले होते.
पण मूळ इंग्लिश ज्यांनी भरपूर वाचले आहे, अशा माझ्या काकांनी मत मराठित पुन्हा वाचल्यावर होते ते असे :-
"वूडहाउस मराठित उतरवता आलेला नाही.कचकड्याचे लिखाण वाटते". त्यांचेच मत वर उल्लेखलेल्या अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या
मराठितल्या "पाषाण" बद्दल अत्यंत चांगले होते.

६.इंग्लिश व बंगालीमधून स्वामी विवेकानंदांची बरीच व्याख्याने, चर्चा मराठित आली आहेत. मुळातच आध्यात्मिक अजिब्बात समजत नसल्याने दिवसेंदिवस वाचूनही कणभरही समजले नाही. "परिव्राजक" हे विवेकानंदांनी भारतभ्रमण करताना, भणंग फकीर म्हणून फिरताना जे अनुभव आले , जे समोर दिसले व थोडेफार इतिहासाबद्दल असे जे लिहिले आहे, ते उपयुक्त वातले. विशेषतः त्यांच्या भारतभ्रमणाच्या कालात "हडप्पा-मोहेंजोदडो" ह्यांचा शोध लागला नव्हता.भारताचा ज्ञात इतिहास केवळ "चंद्रगुप्त मौर्य" वगैरे कालापर्यंतच मागे जात होता.तरीही त्यांनी ज्या बर्‍याच गोष्टी लिहिल्या आहेत, त्याचे आश्चर्य वाटते.
रामकृष्ण परमहंस हयंच्याबद्द्लही आलेले आहेच.
ज्याम्णा हे वाचयचे आहे, त्यांना भारतातल्या प्रमुख शहरातील "रामकृष्ण मिशन"च्या मठात मानमात्र शुल्कात खरेदी करता येउ शकेल किंवा अल्पदराने तिथले वाचनालयही वापरता येइल.

७.आधी क्रांतिकारक, व मग तत्वज्ञ्,आध्यात्मिक गुरु असा प्रवास असणरे अरबिंदो किंवा अरविंद घोष हेही मराठित असल्याचे पुसटसे आठवते आहे. त्यांचेही मुख्यतः आध्यात्मिक अंग समोर आल्याने काहीच समजले नाही.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गुरुवार, 01/12/2011 - 13:25 | संजोपराव, पाषाण... (Score: 2)

मन

पुण्य: 2

संजोपरावांच्या पाषाण वरील भाष्याच्या प्रतिक्षेत; अत्यंत उत्सुक.
जे काही भले बुरे वाटले असेल, ते अवश्य लिहा. आम्हालाही तेच पुस्तक नव्याने समजायला मदत होइल, किंवा (आवडले नसल्यास)
का आवडू नये हे समजेल.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बुधवार, 30/11/2011 - 12:06 | पाषाण (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

मनोबा, अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद! श्रेणी देण्याची क्षमता एकाएकी नाहिशी झाली, त्यामुळे इथेच सांगत आहे.
हे "पाषाण" शोधलेच पाहिजे... ख्रिस्टी ची सगळी पुस्तके मी अनेकदा वाचली आहेत - मराठीत वाचायला मजा येईल.

बुधवार, 30/11/2011 - 19:44 | पाषाण (Score: 2 माहितीपूर्ण)

सन्जोप राव

पुण्य: 2

पाषाणच्या अनुवादकर्त्या शर्मिला गाडगीळ.
बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर....

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बुधवार, 30/11/2011 - 12:13 | माहितीपूर्ण (Score: 2)

ऋषिकेश

पुण्य: 2

तुमच्या आणि माझ्याही वतीने मनोबांच्या प्रतिसादाला 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी दिली आहे. (स्माईल)
मात्र तुमचे पुण्य २ असुनही ही सुविधा कशी काय गेली ब्वॉ!? कॉलिंग संपादक!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

बुधवार, 30/11/2011 - 12:58 | श्रेणी (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

धागा माझ्या नावाखाली सुरू झाला म्हणून या धाग्यात नाही असं दिसतंय - कारण पाटील साहेबांच्या "त्रासदायक मुली" धाग्यात श्रेणींचा "खाली-ओढ डबा") पुन्हा प्रकट झाला होता. (स्माईल)
(वर नागरीनिरंजनांनी अनुवाद-भाषांतर मध्ये केलेल्या फरकामुळे राहावले नाही)

बुधवार, 30/11/2011 - 09:27 | पूर्ण माहिती (Score: 2)

रोचना

पुण्य: 2

सर्वांचे आभार. पुस्तकांची जमेल तितकी पूर्ण माहिती दिली तर शोधायला सोपे होईल... मूळ व अनुवादित शीर्षक/लेखक, मूळ भाषा, इ.

बुधवार, 30/11/2011 - 09:16 | तुर्तास केवळ यादी (Score: 2)

ऋषिकेश

पुण्य: 2

अनुवाद म्हटलं की पटवर्धनांच्या 'पाडस' या पुस्तकाचा उल्लेख होण क्रमप्राप्त आहे. सर्वांगसुंदर अनुवाद कसा असावा याचं हे पुस्तक म्हणजे वस्तुपाठ. अनेक अनुवादीत पुस्तकं माझी आवडती आहेत.. पण पाडस हा त्यातील शिरोमणी! (इथे पुवि वर अदितीने केलेले सुंदर परिक्षण आनि त्यावरची चर्चा वाचता यावी)
इतर आवडत्या पुस्तकांबद्दल नंतर वेळ काढून विस्ताराने लिहेन! तुर्तास काहि अतिशय आवडते अनुवाद इथे देतो:
-- तोत्तोचान
-- चिपर बाय द डझन
-- देनिसच्या गोष्टी
-- सत्तर दिवस
-- एका कोळीयाने
-- मधुकर तोरडमलांनी केलेले अघाता ख्रिस्तीच्या पायरोच्या डिटेक्टीव्ह कथांच्या मालिकेचे भाषांतर
-- ज्ञानेश्वरी (याला स्वतंत्र रचना मानावे की संस्कृत ते तत्कालिन मराठी भावानुवाद हा ज्याचा त्याचा प्रश्न)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

बुधवार, 30/11/2011 - 08:18 | लुईसा मे अल्कॉटच्या "Little (Score: 1)

नगरीनिरंजन

पुण्य: 2

लुईसा मे अल्कॉटच्या "Little Women" चा शांता शेळकेंनी केलेला "चौघीजणी" हा मी वाचलेल्यांपैकी सर्वोत्कृष्ट अनुवाद आहे.
शिवाय "डेझर्टर" नावाची एका गंथर बान्हमान नावाच्या जर्मन सैनिकाच्या पलायनाची कहाणी विजय देवधरांनी अनुवादित केली होती. ती वाचली तेव्हा खूपच छान वाटली होती.
भैरप्पांच्या पर्वचा अनुवादही छान वाटला, मूळ कादंबरी वाचणे शक्य नसल्याने तो त्या तुलनेत कसा आहे ते ठरवू शकलो नाही.
बाकी पुलंनी केलेल्या कलाकृतींना अनुवाद म्हणता येणार नाही.

Hope is NOT a plan!

बुधवार, 30/11/2011 - 11:51 | लुईसा मे अल्कॉटच्या "Little (Score: 2 रोचक)

सविता

पुण्य: 2

लुईसा मे अल्कॉटच्या "Little Women" चा शांता शेळकेंनी केलेला "चौघीजणी" हा मी वाचलेल्यांपैकी सर्वोत्कृष्ट अनुवाद आहे.

- १००% सहमत.

"डेझर्टर" नावाची एका गंथर बान्हमान नावाच्या जर्मन सैनिकाच्या पलायनाची कहाणी विजय देवधरांनी अनुवादित केली होती. ती वाचली तेव्हा खूपच छान वाटली होती

- परत एकदा सहमत. विजय देवधरांनी अनुवादित केलेली बरीचशी पुस्तके मला वाचायला आवडली आहे.

आता नाव आठवत नाही अनुवादकाचे, पण डॅन ब्राउन किंवा सिडने शिल्डन चे एक पुस्तक ( जी सहसा मला एकदा पुर्ण वाचायला नक्की आवड्तात) मी घाणेरड्या अनुवादाला कंटाळून ठेऊन दिले. भात खाताना दर दुसर्‍या घासाला दाताखाली खडा आल्यावर जसे वाटते तसे...व्हाईट हाऊस ला "श्वेत भवन".... व्हिस्परिंग ला "फुसफुसणॅ" असे भयंकर अनुवादित शब्द वाचताना होत होते!!!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बुधवार, 30/11/2011 - 12:29 | व्हाईट हाऊस ला "श्वेत (Score: 3 रोचक)

नगरीनिरंजन

पुण्य: 2

व्हाईट हाऊस ला "श्वेत भवन".... व्हिस्परिंग ला "फुसफुसणॅ" असे भयंकर अनुवादित शब्द वाचताना होत होते!!!

होय. मी वाचलेल्या अनुवादांपैकी बहुसंख्य टुकारच निघाले आहेत. बहुसंख्य अनुवादक अनुवाद म्हणजे भाषांतरच समजतात.
कहर म्हणजे नुकताच इथे कलाउत्सवम् नावाच्या उत्सवात गुलजारच्या मूळ कविता गुलजारच्या तोंडून आणि पवन वर्मांनी केलेल्या त्या कवितांचा इंग्रजी भावानुवाद ऐकायला मिळाला. मूळ कर्त्यासमोर भावानुवादाच्या नावाखाली भाषांतर केलेली त्या कवितांची निष्प्राण रुपं ऐकून वाईट वाटले.

Hope is NOT a plan!

बुधवार, 30/11/2011 - 12:54 | भाषांतर (Score: 3 रोचक)

अशोक पाटील

पुण्य: 2

"बहुसंख्य अनुवादक अनुवाद म्हणजे भाषांतरच समजतात."

~ अगदी सहमत. आणि विशेष म्हणजे असे बटबटीत भाषांतर (रूपांतर नव्हे) करणारे लेखकू हे नवखेच असतील असेही नसते, तर ज्यानी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मराठी लेखकांच्या पंक्तीत नाव नोंदिविले आहे अशांचाही समावेश आहे.

उदा. भा.द.खेर यानी मनोहर माळगावकर यांच्या 'प्रिन्सेस' कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद. या कादंबरीत राजकुमार अभय याने एक छोटे मेंढरू पाळलेले असते, त्याचे नाव ठेवले जाते "कॅननबॉल". आता या नावानेच "मराठी" अनुवादात उल्लेख आला असता तर काय बिघडले असते ? पण नाही, खेरांनी या मेंढराचे मराठीकरण केले "तोफगोळा". म्हणजे इंग्लिशमध्ये माळगावकर त्या मेंढराचा टक्करीत मृत्यु होतो त्याबद्दल लिहितात : "They were taking Canonball from ground" - याचे खेर-मराठीकरण "मग तोफगोळ्याचं कलेवर ओढून नेण्यात आलं."

(तरी बरं, पुढे प्रिन्स अभयराजे जेव्हा दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या 'डेक्कन हॉर्स' तुकडीत सामील होतात त्याचे वर्णन करताना खेरांनी "नंतर अभयराजे 'दक्षिण घोडा' फलटणीत भरती झाले" असे भाषांतर केले नाही.)

अशोक पाटील

बुधवार, 30/11/2011 - 13:37 | ठ्ठो... (Score: 2)

मन

पुण्य: 2

"मग तोफगोळ्याचं कलेवर ओढून नेण्यात आलं."

ह्यावरून आमच्या शालेय जीवनातला एक भाषांतराचा जरासा घाण वाटेल असा संवाद आथवला.
"primary education, final year" ह्या शब्दांचे भाषांतर एका शहाण्याने अनुक्रमे "प्रातर्विधी" व "अंत्यविधी" असे करून दाखवले होते.
भाषांतराच्या कधी कधी अट्टहासाने असेच विनोद हॉलीवूडच्या डब झालेल्या चित्रपटात पहायला मिळतात.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars