Skip to main content

मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?

नुकत्याच एका मराठी पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. साधारण लाखभर पुस्तके प्रदर्शनात होती. फेर्‍या मारता मारता असे लक्षात येत होते की एकूणात कादंबर्‍यांची संख्या खूपच कमी आहे. बरीचशी पुस्तके ज्योतिष, आरोग्य, ललित, प्रवास, कविता, स्पर्धा परिक्षा, विज्ञान इ. विषयांचीच संबंधित होती. संयोजकांशी या विषयावर बोललो असता ते म्हणाले की हल्ली लोक कादंबर्‍या खूपच कमी वाचतात. कदाचित मराठीत समर्थ कादंबरीकारांची घटती संख्या याचाही हा परीणाम असावा.

संयोजकांचे म्हणणे खरेही असावे. हल्ली मराठीत एखाद दुसरा अपवाद वगळता कोणी समर्थ कादंबरीकार दिसत नाहीच. शिवाजी सावंत, श्री.ना. पेंडसे, गोनिदा, जयंत दळवी, रणजित देसाई, वि. स. खांडेकर इं थोर कादंबरीकार तर आज आपल्यात नाहीतच. शिवाय ज्यांच्यात क्षमता आहे असे मधु मंगेश कर्णिक, विश्वास पाटील इ. लेखक खूपच कमी लिखाण करताना दिसतात किंवा कादंबरीप्रकारावरून त्यांचे लिखाण वेगळ्या विषयांवर गेल्याचेही आपणास आढळून येते. (उदा. नॉट गॉन विथ द विंड-विश्वास पाटील)

तर वाचकांची आवड बदलली आहे का? असल्यास का? बदलत्या जीवनशैलीशी जुळवून नविन पिढी फिक्शन वाचण्याचे सोडून वास्तविकतेकडे (नॉन फिक्शन) जास्त वळत आहे का?

शिल्पा बडवे Thu, 24/11/2011 - 10:17

जग जवळ आल्याने बरंच काही अन कधीकधी कैच्या कै वाचायला मिळतयं म्हणुन थोडा बदल होणारच...पण या जुन्याच लोकांनी लिहिलेलं चांगल अन नव्यांनी लिहिलेलं नाही असं थोडंच आहे? मायबोलीवर बर्‍यापैकी कादंबर्‍या असतात त्या मी वाचते.

अर्धवट Sat, 26/11/2011 - 08:59

In reply to by शिल्पा बडवे

>>बर्‍यापैकी कादंबर्‍या असतात त्या मी वाचते.

अच्छा!! केवळ तुम्ही वाचता म्हणून त्या बर्‍यापैकी असतात असा तुमचा समज तर नाही ना झाला?

( हॅ हॅ हॅ, कधितरी तुमच्या मोड मधे लिहून बघावं म्हणलं, जमतंय का? )

राजन बापट Thu, 24/11/2011 - 10:38

चांगला चर्चाविषय. दिवाळी अंकाच्या धाग्यातही मी याच ट्रेंड बद्दल लिहिलेलं आहे.
हाच चर्चाविषय भारतातल्या इतर भाषांच्या संदर्भात आणि एकंदरीतच जागतिक पातळीवर विचारण्यासारखा आहे. आजही जेव्हा जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात उत्तम प्रतीचं साहित्य काय ? ते कुठे लिहिलं जातं ? मुख्य म्हणजे , गेल्या शतकातल्या उत्तम प्रतीच्या साहित्याशी (आणि अर्थातच त्या आधीच्या शतकांतल्या क्लासिक्सशी ) तुलना करता त्याची लोकप्रियता , लोकांच्या मनावर परिणाम करण्याची क्षमता या संदर्भात ते कितपत पाण्यांत उभं रहातं ? या प्रश्नांची चर्चा रोचक ठरेल.

गवि Thu, 24/11/2011 - 10:47

नवीन पिढी फिक्शन वाचण्याचे सोडून वास्तविकतेकडे (नॉन फिक्शन) जास्त वळत आहे का?

हो तसं वाटतं खरं.

शिवाय कादंबरी म्हणजे बरेच सलग वाचन. ते करण्याची मानसिक सुशेगाद अवस्था , मन का सुकून, मूड वगैरे आताच्या लाईफस्टाईलमधे राहिला नसावा. वेळ नाही हे मुख्य.. आणि अगदी टेक्निकली रात्री वेळ काढताही येत असला तरी नुसता "वेळ" हा आस्वाद घेण्यासाठी बास नसतो. माझ्याकडे रोज एक तास मोकळा उरणं याचा अर्थ मी त्या एक तासात वाचून आस्वाद घेण्याच्या किंवा शांतपणे गझलमधे बुडून जाण्याच्या मनःस्थितीत आणि देहस्थितीत असीनच असं नव्हे..

चिंतातुर जंतू Thu, 24/11/2011 - 11:54

>>नविन पिढी फिक्शन वाचण्याचे सोडून वास्तविकतेकडे (नॉन फिक्शन) जास्त वळत आहे का?

नवीन पिढी अजूनही फिक्शन वाचताना दिसते, पण त्यात (मराठीपुरतं बोलायचं झालं तर) अनुवादित पुस्तकांवर अधिक भर असतो असं दिसतं. मराठी माध्यमात शिकणार्‍या शाळकरी मुलांना 'दा विन्ची कोड' 'हॅरी पॉटर' वगैरे मराठीत वाचताना पुष्कळदा पाहिलं आहे. थोड्या मोठ्या वयाची तरुण मुलं-मुली चेतन भगत वगैरे मराठीत वाचताना दिसतात. थोडक्यात, इतर अनेकजण ज्याची चर्चा करतात असं रंजक साहित्य अधिक वाचण्याकडे नवीन पिढीचा कल असावा मला वाटतं.

तुमचा मुद्दा समर्थ कादंबरीकारांच्या घटत्या संख्येबद्दल आणि त्याच्या नवीन पिढीवर होणार्‍या परिणामांबद्दल असला, तर तो जरा गुंतागुंतीचा होतो. याचं एक कारण म्हणजे कादंबरीच्या सामर्थ्याचा लोकप्रियतेशी संबंध असेलच असं सांगता येत नाही - लोकप्रिय आणि रसिकप्रिय हे द्वैत राहणारच. याचं दुसरं कारण म्हणजे नवीन पिढीचा विचार केला तर ज्यांचं वाचन प्रामुख्यानं मराठीत असतं असा वर्ग हा मराठी माध्यमात शिकलेल्यांचा असतो आणि तरीही त्यांचा परीघ मात्र व्यापक असतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना स्टीव्ह जॉब्सच्या चरित्राविषयी जितकं आकर्षण वाटेल तितकं आकर्षण नेमाड्यांच्या 'हिंदू'बद्दल किंवा ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या कादंबर्‍या लिहिणार्‍या सदानंद देशमुख किंवा कृष्णात खोत यांच्याविषयी वाटेलच असं नाही (मग ते त्यांचं जगण्याचं वास्तव असलं तरीही). इथे मी मुद्दाम त्यातल्या त्यात बरा खप असणार्‍या कादंबर्‍यांचा उल्लेख केला आहे; श्याम मनोहर वगैरे तरुण पिढीला आकर्षित करून घेतील असा तर विचारच करता येत नाही.

रोचना Thu, 24/11/2011 - 12:59

In reply to by चिंतातुर जंतू

श्याम मनोहर वगैरे तरुण पिढीला आकर्षित करून घेतील असा तर विचारच करता येत नाही.

हे थोडे विस्तृत पणे मांडता येईल का?

नगरीनिरंजन Thu, 24/11/2011 - 12:14

उपयुक्ततावाद वाढीला लागणे हे ही एक कारण आहे असे मला वाटते. कादंबरी वाचण्यात रोजचा एक-दीड तास घालवण्यापेक्षा मी तो इतर काही उपयुक्त म्हणजे व्यक्तिमत्व विकास वगैरे वाचले तर भविष्यात त्याचा काहीतरी फायदा तरी होईल असा विचार केला जात असावा.
शिवाय गवि म्हणतात तसं आधीच आयुष्यात एवढी धावपळ, ताणतणाव वाढलेत की आणखी काल्पनिक ताणतणावांची भर त्यात नको वाटत असावी.
त्यामुळे हलकेफुलके चुटके, एसेमेस जोक्स आणि ग्राफिटी वगैरे प्रकारांना मिळणारा भरघोस प्रतिसाद गंभीर कादंबर्‍यांना मिळत नाही.
शिवाय मराठी साहित्य वाचणे 'ट्रेंडी' नाही. त्यापेक्षा चेतन भगतच्या गल्लाभरू कादंबर्‍या वाचणे कॉलेज कुमारांना 'भारी' वाटत असेल.
बाकी 'समर्थ कादंबरीकार' आता नाहीत हे कारण नसून परिणाम आहे असे वाटते. समर्थ वाचक असतील तर समर्थ कादंबरीकारही नक्कीच निर्माण होतील.
पण सध्या एकूणच वाचन आणि त्यातही मराठी वाचन डाऊन मार्केट असल्याने केवळ लेखक म्हणून उपजीविका करणे शक्य आहे का? आणि नसेल तर बाकीची व्यवधानं सांभाळून कादंबरीसारखा आव्हानात्मक प्रकार हाताळणे किती जणांना शक्य आहे? पूर्वी प्रतिभा होती आणि आता आटली असे नाही.
आणखी एक 'हुच्चभ्रू' लोकांमध्ये आढळणारा ट्रेंड म्हणजे सगळं कोळून प्याल्यासारखा भाव. हे लोक एकदम जागतिक स्तरावर वावरतात. ते मराठी कादंबर्‍या वाचत नाहीत. अन्यथा मराठीत अजूनही चांगले कादंबरीकार आहेत आणि होऊ शकतात.
थोडक्यात, मराठी वाचक बदलताहेत आणि कमीही होताहेत याला सहमती.

राजन बापट Thu, 24/11/2011 - 12:17

प्रस्तुत धाग्याचा विषय व्यापक आहे हे मी वर म्हण्टलंच आहे. परंतु मराठीपुरताजरी विचार करायचा झाला तरी अनेक प्रश्नोपप्रश्न निर्माण होतात.

वाढती लोकसंख्या , शिक्षणाचा वाढता प्रसार , दळणवळणाच्या , संप्रेषणांच्या साधनांची वाढती परिणामकारकता, शहरीकरणाची वाढती कक्षा या सार्‍यामुळे वाचनव्यवहाराचा "जीडीपी" वाढला आहे का ? याचं उत्तर देण्याइतपत स्टॅटिस्टीक्स माझ्याकडे नाही. पण प्रथमदर्शनी याचं उत्तर "होय, वाढला असला पाहिजे" असं देता येईल. १०-२०-३० वर्षांपूर्वीपेक्षा निश्चितच अधिक लोकांना वाचायला येत असावं , वाचायला मिळत असावं , पुस्तकांचा अ‍ॅक्सेस असावा, पुस्तकं परवडत असावी.

मग हा नवा वाचकवर्ग कशाकडे वळत असला पाहिजे ? याचं देखील अंदाजावरून बांधलेलं उत्तर म्हणजे, पॉप्युलर साहित्य. जंतूंच्या प्रतिसादामधे वर आलेली "फिक्शन" विभागातली पुस्तकं आहेतच. पण , विज्ञान , तंत्रज्ञान , माहिती, इतिहास , देशप्रदेशांची माहिती, प्रवासवर्णने यांच्याकडे फिक्शनपेक्षा अधिक लोक वळत असावेत असं मानायला निश्चित वाव आहे. याखेरीज मला "सेल्फ हेल्प" पुस्तकांचा टक्का लक्षणीय दृष्ट्या वाढलेला दिसतो. शिवराज गोर्ले , शिव खेरा (हे बहुदा अनुवादित पुस्तक असावं ) , "द मंक हू सोल्ड हिज फेरारी" अशा धर्तीची पुस्तकं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. "सेल्फ हेल्प" ची पुस्तकं हा काही नवा प्रकार नाही; परंतु मराठीत गेल्या दशकात या प्रकाराची मागणी जोरात झालेली दिसते आहे.

असं म्हणणं नाट्यपूर्ण ठरेल , परंतु पु.ल. देशपांडे या एका नावाने पॉप्युलर साहित्याचा प्रचंड मोठा टक्का व्यापलेला असायचा. ज्यांना जेमतेम एखाद दोन पुस्तकं खरेदी करता यायची त्यांनी कधी पुस्तकखरेदी केलीच तर ती पुलंच्या पुस्तकांची असायची. पु लंच्या मृत्यूनंतरच्या पाच वर्षांत त्यांच्या साहित्याच्या खरेदीला पुन्हा मोठा पूर आला असावा असा माझा अंदाज आहे. त्यानंतर मात्र , पुलं नव्वदीच्या दशकात पडद्याआड गेल्यानंतर जन्माला आलेली/वाचकवर्गात गणना करता येईल अशी पिढी पुस्तकांच्या ग्राहकपेठेत उतरल्यानंतर , पुलंचा पूर हळुहळू ओसरत चाललेला असला पाहिजे. अजूनही पुलंचं गुणगान गाणारी पिढी पॉप्युलर साहित्याच्या मध्यवर्ती चौकात आहे; परंतु त्यांच्या "दैवता"चा प्रभाव कमी झालेला त्यांनाच जाणवत असणार. मर्ढेकर म्हणतात तसं , "अशीच जावी वर्षे काही, आणि महात्मा यावा पुढचा" अशा स्थितीत या प्रकारचा वाचकवर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही.

घंटासूर Thu, 24/11/2011 - 13:43

In reply to by राजन बापट

उत्तम प्रतिसाद.
वाचकवर्ग निश्चितच वाढलेला आहे. पण आवड मात्र बदलली आहे.
वर मुक्तसुनितांनी पु. ल. देशपांडे यांचे उदाहरण दिले आहे. अगदी हेच स्टीव्ह जॉब्स संदर्भातही दिसून येते. जॉब्स च्या हयातीत जर त्याचे चरित्र प्रसिद्ध झाले असते तर ते किती मराठी वाचकांनी वाचले असते? पण तेच चरित्र आज मराठीतील एक बेस्ट सेलर आहे.

शिवाय नॉन फिक्शनकडे वाढणारा वाचकांचा ओढा म्हणजे झटपट वाचण्याची प्रवृत्तीपण असेल कदाचित. आज किती लोक एखादी कादंबरी वाचण्यासाठी दीर्घ बैठक मारतील किंवा ७/८ दिवस घालवतील. त्यापेक्षा ही बाकीची पुस्तके एकतर लहान असतात किंवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये असतात. अर्थात सलगता नसल्याने वाचक ती झटपट वाचून संपवू शकतो.
मराठी कादंबर्‍यांच्या वाढत्या किंमती तसेच कादंबरीला फारशी रिपीट व्हॅल्यु नसल्यामुळेही वाचक सेल्फ हेल्प पुस्तकांकडे वळत असावा.

मी Thu, 24/11/2011 - 17:37

In reply to by राजन बापट

असं म्हणणं नाट्यपूर्ण ठरेल , परंतु पु.ल. देशपांडे या एका नावाने पॉप्युलर साहित्याचा प्रचंड मोठा टक्का व्यापलेला असायचा. ज्यांना जेमतेम एखाद दोन पुस्तकं खरेदी करता यायची त्यांनी कधी पुस्तकखरेदी केलीच तर ती पुलंच्या पुस्तकांची असायची.

पु.ल. च्या समकालिन लेखकांची पुस्तके तेवढिच लोकप्रिय असल्याचे दिसते, टक्केवारित जाण्यात रस नाही पण लोकप्रियता हा निकष लावलात तर ते गैर ठरेल.
किंवा, त्याकाळीच असलेली लोकांची आवड आता बदलत आहे असा विषय आहे नं?

मेघना भुस्कुटे Thu, 24/11/2011 - 12:53

वर चिंजंनी म्हटल्याप्रमाणे भाषांतरित पुस्तकं मोठ्ठ्या प्रमाणावर दिसतात. दुकानांमधे तर दिसतातच, पण वाचनालयांमधेही त्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं दिसतं. त्यांच्या गुणवत्तेबद्दल वाद होऊ शकेल. पण 'हिंदू'मधलं नेमाड्यांचं एक वाक्य उद्धृत करायचं तर 'पुस्तके मुळातल्या भाषेतून वाचावीत हे खरे आहे. पण इंग्रजी चांगले नसेल, तर एकूण सारखेच पडते.' हे मला अगदी पटतं. त्यामुळे भाषांतराला माझी अगदी ना नाही, पण भाषांतरित पुस्तकांतही बेस्ट सेलर्सचा भरणा असतो. शिवाय, टिपिकल अफगाण स्त्रियांच्या छळाबद्दलच्या कादंबर्‍या आणि भारतीय वंशाच्या लेखकांच्या इंग्रजीतल्या कादंबर्‍या मुख्यत्वेकरून असतात. हे प्रमाण बदललं, तर बहार येईल असं वाटतं.

मी Thu, 24/11/2011 - 16:19

सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' किंवा चेतन भगतचे 'टू स्टेट्स्' हे एकाच जातकु़ळीतिल आहेत, पण आजचे वाचक ज्या गोष्टींशी समरस(आयडेन्टिफाय) होतात ती पुस्तके चालतात, ऑफकोर्स त्यात मीडिया/फ्रेंड सर्कल/पीअर प्रेशर खूपच मोठी भुमिका बजावतात, जसे इथे काहिंना सेल्फ-हेल्प पुस्तकांचा खप वाढल्यासारखा वाटतो त्याचप्रमाणे मला नित्य निघणार्‍या मासिकांमधून राजनैतिक/सामाजिक/वैचारिक लेखन अलिकडे खूप जास्त वाढले आहे असे वाटते,त्याचा दर्जा कदाचित चर्चेचा मुद्दा असू शकेल.

इथे किंवा उपक्रम वर गेल्या वर्षभरात होणार्‍या चर्चांमध्येदेखिल जुन्याच पुस्तकांचा समावेश अधिक असतो, नविन पुस्तके आढळल्यास ती बहुतेक वेळा चौकट मोडणारीच असतात, अर्थात तेही वाचनियच असते.

जालावर देखिल जाणकार वाचक नविन लेखकांमध्ये मिलिंद बोकिल, कविता महाजन, मेघना पेठे, अच्युत गोडबोले ह्याशिवाय अजून वेगळी नावें फारशी घेताना दिसत नाहित.

उच्चभृंना पुलंचं वावडं आहे असं सतत जाणवतं पणं त्याना पर्याय म्हणून पुलं गेल्यापासून दुसरा कोणता मार्मिक-विनोदी-लेखक आढळतही नाही, वपू/जी.ए./श्रीं. ना. पेंडसे ह्याना रिप्लेस करणारे लेखक नाहियेत का अज्ञात आहेत हेच कळत नाही.

अनुवादित पुस्तके वाचणे म्हणजे आवड बदलणे असे म्हणणे गैर आहे, उलटपक्षी एका नविन लिखाणाची भरच मराठित पडत आहे असे म्हंटले पाहिजे.

आवड बदलते आहे म्हणण्यापेक्षा आवड विस्तारत आहे असे म्हणणे उचित राहील काय?

ऋषिकेश Thu, 24/11/2011 - 16:48

In reply to by मी

उच्चभृंना पुलंचं वावडं आहे असं सतत जाणवतं पणं त्याना पर्याय म्हणून पुलं गेल्यापासून दुसरा कोणता मार्मिक-विनोदी-लेखक आढळतही नाही

मार्मिक :)

बाकी डिट्टेलवार प्रतिसाद उद्या देतो (विषय तेव्हा शिळा झाला असेल. पण नाईलाज आहे. आजे तितका वेळ नाही :( )

आडकित्ता Fri, 25/11/2011 - 19:55

In reply to by मी

विषय निघालाच आहे म्हणून सांगतो,
आमच्या लहानपणी गुरुनाथ नाईक, बाबा कदम यांची जशी चलती होती, तितक्याच प्रमाणात इतरही उत्तम लेखक होते. अन दोन्हींना चांगला वाचकवर्गही लाभत असे. हे लाईट रिडींग अन ते वैचारिक, किंवा आशयघन लेखन वाचणारेही, तेच लोक असत. आजकाल नुसतंच लाईट वाचण्याचा ट्रेंड बळावतो आहे हेच खरे.

चिंतातुर जंतू Thu, 24/11/2011 - 17:43

>>>> श्याम मनोहर वगैरे तरुण पिढीला आकर्षित करून घेतील असा तर विचारच करता येत नाही.

>>हे थोडे विस्तृत पणे मांडता येईल का?

श्याम मनोहर हे सध्याच्या नागरी वास्तवावर त्यांच्या खुसखुशीत शैलीत टीकाटिप्पणी करतात. ही टिप्पणी बोचरी असते, पण रंजकही असते. अशी रंजकता सदानंद देशमुखांच्या लेखनात अर्थात नाही. त्या रंजकतेमुळे श्याम मनोहरांचं लिखाण आवडेल की काय, असं वाटू शकतं म्हणून त्यांचं नाव मुद्दाम वेगळं घेतलं. पण त्यांच्या लिखाणातलं वास्तव ज्यांचं आहे अशा बहुसंख्यांना मात्र स्वतःच्या वास्तवाच्या अशा पृथक्करणामध्ये (ते रंजक असलं तरीही) रस नसतो, किंवा ते रंजक वाटण्याइतपत स्वतःकडे निरखून पाहता येत नाही असं वाटतं. त्यामुळे श्याम मनोहरांना 'हुच्चभू' वगैरे विशेषणं लागतात. तरुण पिढीचा ओढा हा वास्तवाहून दूर असणार्‍या रंजकतेकडे असतो (हॅरी पॉटर वगैरे) किंवा आपल्या आसपासच्या वास्तवाविषयीच्या पण चटपटीत रंजकतेकडे झुकणार्‍या गोष्टींकडे असतो (चेतन भगत - वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर वगैरे). तसे चटपटीत श्याम मनोहर होऊ शकत नाहीत. म्हणून तरुण पिढीला त्यांचं आकर्षण वाटणार नाही.

रोचना Thu, 24/11/2011 - 21:37

In reply to by चिंतातुर जंतू

हे दुर्दैवी आणि निराशाजनक आहे, पण विवेचन अगदी शब्दांशब्द पटले.

limbutimbu Sat, 26/11/2011 - 17:43

>>>> ते म्हणाले की हल्ली लोक कादंबर्‍या खूपच कमी वाचतात. कदाचित मराठीत समर्थ कादंबरीकारांची घटती संख्या याचाही हा परीणाम असावा.

१) समर्थ कादम्बरीकारान्च्या घटत्या संख्येबरोबरच, टीव्हीवर उपलब्ध, कादम्बरी सदृष कथानकान्च्या खिळवुन ठेवणार्‍या व महिनोन्महिने रोजच्यारोज वाचण्याच्या कष्टाशिवाय उपलब्ध सेरियल्सचा परिणाम मूळातुनच वाचक सन्ख्या घटण्यात झाला आहे असे माझे मत.
२) या शिवाय, गेल्या वीसपन्चवीस वर्षात शाळेपासूनच सुरु झालेली मार्कान्ची चढाओढ, त्या त्या विद्यार्थ्यास अवांतर वाचनापासून पूर्णतः परावृत्त करते आहे, व हे परावृत्त करण्यात फार मोठ्या प्रमाणात पालकान्चा सहभाग आहे. हे देखिल मूळातूनच वाचक सन्ख्या घटण्याचे कारण आहे.
३) मात्र हीच मुले येव्हा युवावस्थेत येतात, तेव्हा निदान माझ्या तरी पहाण्यात असे आहे की त्यान्ना ऐतिहासिक सत्यकथा वाचण्यात जास्त रस असतो. गेलाबाजार रहस्य कथा. पण कादम्बर्‍यान्कडे पुढली पिढी फारच क्वचित वळताना दिस्ते.
४) हल्लीच्या काळी, सगळे कसे "चटपटित स्वरुपात झटपट तय्यार" हवे असते, व त्या सवईमुले हळूहळू वाचनही त्याच निकषात कधी येते ते वाचकालाही समजत नाही. दोन चार मिनिटान्ची उत्कन्ठा देखिल सहन न होणारे तयार होतात ते शे दोनशे पाने वाचुन मग कळणारे तथ्य समजुन घेण्यास कुठवर कळ काढणार? बर टीव्ही सेरियल बघताना, उत्कण्ठा वाढवायला डायरेक्टर पात्रान्चे पुतळे करुन ठेवतो... दोन दोन मिनिटे, ते चालुन जात, कारण समजा ते नाही कळल तर दुसर च्यानेल अस्त, ते नाही तिसर, जाहिराति तर अस्तातच अस्तात, इथे थाम्बुन बघत रहायला वेळ कुनाला? तसच येवढी पाने वाचायलाही वेळ कुणाला? मला तर दहावर्शापुर्वी देखिल अशाही विनन्त्या/सुचना आल्या होत्या नेटवर की अहो तुमच्या पोस्ट जरा लहान कराहो, किती ते वाचायचे? आम्ही सरळ उडी मारुन पुढे जातो. जनरल च्याटची ही गत, तर कादम्बर्‍या वगैरेची काय गत होत असेल?

रोचना Sat, 26/11/2011 - 22:39

In reply to by limbutimbu

टीव्ही, आणि त्यानंतर मुलांना वाचनाची गोडी लावण्यात "गोष्टीच्या पुस्तकां" ची घट हे मुख्य अपराधी आहेत, सहमत.

गंमत म्हणजे भारतात कादंबर्‍या आल्या तेव्हा अगदी क्वचितच एकाच पुस्तकरूपे प्रकाशित व्हायच्या - मासिकांमध्ये "सीरियलाइज" व्हायच्या. एखादी मालिका खूप गाजली तर नंतर तिचे संपादन होऊन पुस्तकरूप व्हायचे. सामुहिक लोककला, कीर्तन, मनन, पाठांतर, धार्मिक वाचनापासून हे "मनोरंजनपर" लेखन वाचकांना एकांत वाचनातून वाइट सवयी लावतंय असे कादंबर्‍यांचे अनेक तत्कालीन टीकाकार होते, त्यातल्या त्यात "चरित्र किंवा ऐतिहासिक कादंबर्‍या वाचा" म्हणणारे.
पण आजच्या टीव्ही सीरियल्स पाहून या सगळ्यांनीच कपाळाला हात मारून हार मानली असती हे नक्की!

आडकित्ता Sun, 27/11/2011 - 20:55

In reply to by रोचना

हा एक संपूर्ण वेगळा विषय व्हावा.
मुले स्वतः टीव्ही पहात नाहीत.
टी व्ही हा बेबिसिटींग साठी वापरला जातो, अन मग नंतर मुले तुमचं 'ऐकत नाहीत.'
टिव्ही हे स्पून फीडींग आहे. तुम्हाला पूर्ण शिजवलेले अनुभव जबरदस्ती भरवले जातात. वाचनात, 'इन्टरॅक्शन' आहे. असो.
टीव्ही पहाणार्‍या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी तितक्या ताकतीचे पुस्तक हाती द्यावे लागते. हे गेल्या दशकात हॅरी पॉटरने केले. पण इथे मार्केटिंगसाठी जितकी डोकी काम करीत असतात, तितकी जर आपल्या भावी पिढीसाठी करतील तर त्या पुस्तकांचा धंदा मांडला जाणार नाही.
इथे फडतुसातल्या फडतुस कल्पनेला मार्केट केले जाते. अजून फास्टरफेणे वर किंवा हॅन्स अँडरसनच्या परिकथांवर सिरियल कशी आली नाही त्याचंच नवल वाट्टय मला.

टिन Sun, 27/11/2011 - 21:19

In reply to by आडकित्ता

>>अजून फास्टरफेणे वर किंवा हॅन्स अँडरसनच्या परिकथांवर सिरियल कशी आली नाही त्याचंच नवल वाट्टय मला

फाफेवर होती सिरियल. आणि बरीच गाजलीही होती. बाकी हॅन्स अ‍ॅन्डरसनच्या गोष्टींवरच बर्यापैकी डिस्नी चित्रपट/मालिका आधारीत आहेत आणि हिंदित डबही झालेत (उदा. लिटिल मर्मेड).

आडकित्ता Sun, 27/11/2011 - 23:12

In reply to by टिन

असली तर माझ्या पहाण्यात आली नाही..
तसेही माझे टीव्ही पहाणे फारच कमी. च्यानेल सांगा. रीरन लागल्यास पहायला आवडेल.

नितिन थत्ते Mon, 28/11/2011 - 10:24

In reply to by आडकित्ता

बरीच जुनी...
चांगले कार्यक्रम सहसा दूरदर्शनवरच असत.

सुमीत राघवन (रोज डार्लिंग, हम खानेके लिये कहां गये थे?) यांनी फाफेची भूमिका केली होती.

रोचना Sun, 27/11/2011 - 22:39

In reply to by आडकित्ता

मला १) टीव्ही (त्याचा सर्वांवरच परिणाम, फक्त मुलांवर नव्हे) आणि २) अभ्यासक्रमावर भर देऊन मुलांच्या व्यापक वाचनात घट असे निराळ्या कारणांबद्दल सहमती द्यायची होती.
बाकी मुले + टीव्ही वर तुमच्या मुद्द्याशी दुमत नाही.

शिल्पा बडवे Mon, 28/11/2011 - 10:56

टी.व्ही.वर बघायला सोपं जातं अन पुस्तक वाचणं नै म्हंटलं तरी कधी कधी कंटाळवाणं वाटतं. ताकदीचे लेखक जसे पु. ल., जी.ए., गोनिदा वगैरे असतील तर गोष्ट वेगळी.

टीव्ही कसं चित्र हलताना , पात्र बोलताना दिसतात शिवाय डोक्याला ताप नै.

limbutimbu Mon, 28/11/2011 - 13:49

In reply to by शिल्पा बडवे

>>> टीव्ही कसं चित्र हलताना , पात्र बोलताना दिसतात शिवाय डोक्याला ताप नै.
एक्झॅक्टली, वाचनसंस्कृतीवरचे टीव्हीवरचे माणसास आळशी बनविणारे हे अतिक्रमण तुम्ही नेमक्या शब्दात मांडलय. म्हणूनच, मी टीव्ही हे एक कारण दिले होते.

चिंतातुर जंतू Mon, 28/11/2011 - 12:07

>>टिव्ही हे स्पून फीडींग आहे. तुम्हाला पूर्ण शिजवलेले अनुभव जबरदस्ती भरवले जातात. वाचनात, 'इन्टरॅक्शन' आहे. असो.

आपल्याकडचे टी.व्ही.वरचे कार्यक्रम कसदार नसतात याविषयी सहमती, पण एक माध्यम म्हणूनच टीव्हीला अशी काही मर्यादा आहे असं आपलं म्हणणं असेल तर असहमती. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेत पुष्कळ दर्जेदार आणि विचारप्रवर्तक कार्यक्रम पाहिलेले आहेत. अमेरिकेत पीबीएस-निर्मित अनेक चांगले माहितीपट पाहिलेले आहेत. ब्रिटनमध्ये बीबीसीनं गेल्या काही वर्षांत खूप लोकानुनयी धोरणं स्वीकारली, तरीही बीबीसी ४वर गंभीर आणि दर्जेदार कार्यक्रम अजूनही असतात. 'इंडिपेंडंट' या उच्चभ्रू दैनिकात आलेला त्याविषयीचा एक लेख इथे वाचता येईल. युरोपात आपल्यासारखे किंवा त्याहून उथळ कार्यक्रम एकीकडे सादर केले जातातच, पण आर्तेसारख्या रसिकप्रिय वाहिन्याही आहेत. फ्रान्समध्ये तर लोकप्रिय कार्यक्रमांमध्येदेखील वैचारिकतेचं प्रमाण उल्लेखनीय असतं. गेल्या दहा-पंधरा दिवसांतली गोष्ट - एका फ्रेंच वाहिनीवरचा एक लोकप्रिय टॉक शो आहे. त्यात त्यांनी बर्नार्ड हेन्री लेव्हीला बोलावलं होतं. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्याच्या लिबियावरच्या पुस्तकासंबंधी आणि त्या अनुषंगानं मध्यपूर्व आणि फ्रेंच परराष्ट्रधोरण यावर त्यात गंभीर चर्चा झाली. बर्नार्ड हेन्री लेव्ही हा तिथला अत्यंत आदरणीय समजला जाणारा विचारवंत आहे. त्याचं पुस्तक काळजीपूर्वक वाचून आलेल्या तरुण लोकांनी त्याला अनेक मुद्द्यांवर सखोल आणि भेदक प्रश्न विचारले. अशी टीव्हीसंस्कृती आपल्याकडे का रुजली नाही हा अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे, पण आपल्या मर्यादांमुळे माध्यमाची सरसकट नालस्ती करू नये अशी विनंती.

Nile Mon, 28/11/2011 - 13:00

In reply to by चिंतातुर जंतू

पण एक माध्यम म्हणूनच टीव्हीला अशी काही मर्यादा आहे असं आपलं म्हणणं असेल तर असहमती.

असेच म्हणतो.

वाचनातही(पुस्तकांमध्येही) आणि टीव्हीवरही तुम्हाला इतरांचे अनुभव भरवलेच जात असतात. टीव्हीचा उपयोग मात्र हेच अनुभव पुस्तकांपेक्षा जास्त प्रभावीपणे पोहोचवण्यात करता येऊ शकेल असे वाटते. पुस्तकातून एखादा अनूभव घेण्यापेक्षा तो टीव्हीवर घेण्यात जास्त प्रभावाबरोबरच वेळेची फार बचतही होते. वाचनाचा आनंद वेगळा असला तरी टीव्हीवर स्पून फिडींग होते हा मुद्दा पटत नाही.

आडकित्ता Mon, 28/11/2011 - 13:36

In reply to by Nile

वाचनाला पर्याय या अर्थाने टीव्हीचा उल्लेख आला, व तिथून हे सुरू झालं.
अ‍ॅडमिन ना विनंती, की हा पुस्तकांचा धागा टिव्ही मुळे हायजॅक होण्याआधी या विषयाचा वेगळा धागा काढावा.

घंटासूर Mon, 28/11/2011 - 19:48

In reply to by आडकित्ता

अगदी अगदी.
धागा मूळ विषयावरून चांगलाच भरकटलेला दिसतोय. सदस्यांना विनंती की कृपया धागा भरकटू न देता वेगळा धागा काढून त्यावर चर्चा करावी.
असो. सदस्यांच्या चर्चेवरून काही मुद्दे मांडत आहे.
१. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामुळे, गळेकापू स्पर्धेमुळे वाचकांना सलग बैठका मारून कादंबरी वाचणे अवघड झाले आहे.
२. टिव्ही, इंटरनेट आदी दृकश्राव्य माध्यमांमुळे कादंबरी वाचण्यास वेळ मिळेनासा झाला आहे.
३. मराठी कादंबर्‍या वाचणे हे काहीसे कमीपणाचे वाटू लागले आहे (चेतन भगत, अरुंधती रॉय, विक्रम मेहता आदींची पुस्तके वाचणे हे उच्चभ्रूपणाचे लक्षण असल्यामुळेही कदाचित)
४. बदलत्या काळाची सुसंगत राहाण्याची इच्छा असल्यानेही नॉन फिक्शन पुस्तके वाचण्याकडे वाढत असलेला ओढा.
५.गतकाळच्या तुलनेने आजच्या समर्थ कादंबरीकारांचा असलेला अभाव (किंवा एकूणच कादंबर्‍यांकडे असलेला ओढा कमी झाल्याने कमीच दिसत असलेले कादंबरीकार)
६. अनुवादीत पुस्तकांकडे वाढता कल.

एका महत्वाच्या मुद्द्याला वरील चर्चेत स्पर्श करायचा राहून गेलाय. तो म्हणजे प्रकाशक. मराठी लेखक आजही बर्‍याच प्रमाणात प्रकाशकांवरच अवलंबून आहे. काही सेलेबल लेखक सोडले असता प्रकाशक जे म्हणेल तसेच लेखकाला लिहावे लागते. अर्थात लेखक-प्रकाश्क हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय.