Skip to main content

सध्या काय वाचताय? - भाग ५

याआधीचे भागः | | |

प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले होते:
बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे.
***************

'अ‍ॅण्ड दी माउंटन्स एकोड्' हे खालिद हुसैनीचं नवीन पुस्तक वाचलं.

लोकप्रिय असला तरी आणि तालिबानी अफगाणिस्तानची पार्श्वभूमी वापरून गोष्टी लिहीत असला - तरीही - मला खालिद हुसैनी आवडतो. त्याच्या गोष्टीतली माणसं भावनिकतेची अ‍ॅलर्जी असल्यासारखी वागत नाहीत. मेलोड्रामाला लाजत नाहीत. ती काळी किंवा पांढरी नसतात. चुकतात, सुधारू बघतात, कधी क्रूरपणेही वागतात, शरमतात. नि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांची गोष्ट स्वच्छपणे रंजक असते. ओपन एण्डेड शेवट आणि वाचकाला दुर्बोधतेत गटांगळ्या घ्यायला लावणे, या दोहोंतली सीमारेषा त्या गोष्टीवरून मापून घ्यावी, इतकी सुस्पष्ट दिसते.

या पार्श्वभूमीवर, दोन मरणाची चाललेली पुस्तकं पाठीवर असताना, तिसरं पुस्तक वाचायची थोडी भीती वाटत होती. गोष्टीत (अर्थातच)अफगाणिस्तान नि अमेरिका आहे. पण या गोष्टीत तालिबान नाहीय. गोष्ट काहीशी पसरट आहे. शेवटाकडची काही पात्रं वाचताना थोडं कंटाळल्यासारखंही होतं. काही वर्षांपूर्वी आलेला 'क्रॅश' नावाचा सिनेमा आठवतो? अनेक लहानसहान पात्रं, आपापसात गुंतलेल्या, त्यांच्या स्वतंत्र, एपिसोडिक गोष्टी आणि या सगळ्यातून गेलेला गोष्टीचा धागा... असा काहीतरी फॉरमॅट होता त्याचा. या पुस्तकाचा फॉरमॅट अनुभवताना त्याची जाम आठवण झाली. पुस्तकात निरनिराळ्या कथनशैली येतात. पात्रं आत्मनिवेदन करतात. कधी मुलाखत असते. कधी कुणी कुणालातरी गोष्ट सांगत असतं. कधी त्रयस्थ निवेदक गोष्ट सांगत असतो. मध्यवर्ती पात्रं, त्यांच्याशी दूरचा-योगायोगाचा-रक्तानात्याचा संबंध असलेली अनेक पात्रं आणि त्यांची आयुष्य यांतून गोष्ट संथपणे वाहत राहते.

मला फार आवडलं हे पुस्तक.

मिहिर Thu, 30/05/2013 - 16:12

लोकप्रिय असला तरी आणि तालिबानी अफगाणिस्तानची पार्श्वभूमी वापरून गोष्टी लिहीत असला - तरीही - मला खालिद हुसैनी आवडतो.

ह्या तरी आणि तरीहीचा नक्की अर्थ काय? लोकप्रिय असणारा किंवा तालिबानी अफगाणिस्तानची पार्श्वभूमी वापरून लिहिणारा आवडणार नाही, अशा प्रकारचा पूर्वग्रह आहे का?

मेघना भुस्कुटे Fri, 31/05/2013 - 09:03

In reply to by मिहिर

अमुक एक लेखक लोकप्रिय असला, की उगाच एक स्नॉबिश मत तयार होतं त्याच्याबद्दल. असून असून किती बरा असणार हा लेखक... अशा थाटाचं. काही कारणं आहेत त्याला, नाही असं नाही. पण पूर्वग्रहाइतपतच किंमत त्या मताला.
नि अफगाणी-इराणी-बांग्लादेशी वगैरे लेखि(/ख)कांनी लिहिलेली 'बंडखोर, हृदयद्रावक' इत्यादी पुस्तक मी जरा जास्तच वाचलीयेत. अर्थातच अपवाद आहेत, पण - मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना झोडा, बायकांच्या मुस्कटदाबीबद्दल लिहा, पुस्तक हमखास गाजवा / खपवा... असा फॉर्म्युला असल्यासारखा झालाय. तेच तेच वाचून मला तरी मरणाचा कंटाळा आलाय. म्हणून दुसरा 'तरीही'.

दोन्ही 'तरी' पूर्वग्रहातून आलेले, पण आवडीनिवडींमधे पूर्वग्रह महत्त्वाचे असतात.

रुची Fri, 31/05/2013 - 00:28

मेघना, तुझी ही प्रतिक्रिया वाचेपर्यंत खालिद हुसैनीबद्दल माझं फार म्हणजे फारच प्रतिकूल मत होतं आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याच्या पुस्तकावर आधारित एक चित्रपट, त्याची पुस्तके विकणारी दुकाने आणि ज्यांच्या हातात त्याची पुस्तके दिसतात त्या व्यक्तींबद्दलचं मत ;) केवळ या मठ्ठ टोकताळ्यांवर मी त्याला जोखत होते..त्यातले सरसकटीकरण आणि माझा स्नॉबिशपणा याचा पुनर्विचार करावासा वाटतोय.

मेघना भुस्कुटे Fri, 31/05/2013 - 09:04

In reply to by रुची

:) मला समजू शकतं हे सरसकटीकरण. असल्या स्नॉबिशपणापायीच मी कित्तीतरी दिवस हॅरी पॉटरही वाचायचं टाळलं होतं, आता बोल!
शिवाय कदाचित वाचून तुला नाहीही आवडायचा हुसैनी, कुणी सांगावं? पण एकदा तरी वाचून पहाच.

ॲमी Fri, 31/05/2013 - 09:33

In reply to by मेघना भुस्कुटे

असल्या स्नॉबिशपणापायीच मी कित्तीतरी दिवस हॅरी पॉटरही वाचायचं टाळलं होतं >> +१. गेल्या वर्षीच वाचलं...

रोचना Fri, 31/05/2013 - 10:52

In reply to by रुची

रुची, होसेनी ठीका आहे गं, पण सावधान! पुनर्विचाराच्या उत्साहात पॉलो कोएल्हो किंवा चेतन भगत पर्यंत जाऊ नकोस! :-)

मेघना भुस्कुटे Fri, 31/05/2013 - 14:45

In reply to by रोचना

:) वाटलंच! बायदीवे - ह्याला कबुली समजा हवं तर - पण मला 'फाइव्ह पॉइंट समवन' आवडतं. ते वाचताना 'दिल चाहता है' मधल्या नॉव्हेल्टीची आठवण येते हमखास.

Nile Wed, 05/06/2013 - 04:14

In reply to by मेघना भुस्कुटे

तुम्हा नाश्त्याला पुस्तकं खाण्यार्‍यांचे पुर्वग्रह जाऊद्या, पण हुसैनीच्या काईट रनरमध्ये आलेल्या पतंगाच्या संस्कृतीचे वर्णन लाजवाब आहे!! त्या करता तरी काईट रनर वाचाच असे म्हणतो.

(बाकी इतकी पुस्तकं वाचून पुर्वग्रहांचे अपचन होत असेल तर जरा वाचायचे डायट का नाही पाळत?) ;-)

ऋषिकेश Mon, 03/06/2013 - 12:06

बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेला "नो कमबॅक्स" हा अत्यंत आवडता कथासंग्रह पुन्हा वाचायला घेतला आहे. फेडरिक फॉर्सेथचा दुसरा कथासंग्रह वाचनात आलेला नाहि पण हा तरी अत्यंत वाचनीय आणि रंजक आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 04/06/2013 - 10:05

किशोर आरस नावाच्या गृहस्थाचं 'रेशीमबंध' हे पुस्तक वाचलं. नावावर जाऊ नका, पुस्तक भारी आहे. (त्यांचं 'आठवणीतल्या आठवणी' हे पुस्तकही मला आवडतं.) दोन्ही पुस्तकांची नावं अगदी घासून गुळगुळीत असली, तरी लेखकाची शैली मात्र अजिबातच तसली कीर्तनी वा माजघरी नाही. उलट आरसांच्या शैलीत एक उद्धट मिश्किली आहे, स्वत:ला हसण्याचा मोकळेपणा आहे, भल्याभल्यांची तिरकस चेष्टा उडवायची जुर्रत आहे.
'रेशीमबंध'मधे निरनिराळी व्यक्तिचित्रं आहेत.
'पॉप्युलर'चे भटकळ आणि भटकळांच्या 'पॉप्युलर'वरती लेख आहे. (ही काही मासलेवाईक वाक्यं (स्वारी, मोह आवरत नाही!): 'पॉप्युलरचं ऑफीस म्हणजे प्रचंड जागेत इतस्ततः पसरलेली पुस्तकं नि त्यात अधूनमधून बेटांसारखा बसलेला कर्मचारी वर्ग... त्यात फोनही पुस्तकांच्या एखाद्या ढीगावर ठेवलेला असे. एकदा तर वाजणारा फोन शोधायलाच मला तब्बल पाच मिनिटं लागली होती.' किंवा 'फुटलेल्या जहाजातले खलाशी कसे एकेक करून किनार्‍याला लागतात, तसे कर्मचारी आपापल्या सवडीनं ऑफिसात येऊन पोचत असत...') ठाकर्‍यांवर लेख आहे. आर. के. लक्ष्मणवरचा लेख आहे. म. वा. धोंडांवरचा भारीपैकी लेख आहे (त्यात समीक्षक धोंड न दिसता शब्दलुब्ध, तर्‍हेवाईक, लोभसवाणे धोंड दिसतात आणि त्यांच्या भाषाप्रेमाचे खतरनाक किस्सेही मिळतात).
आरसांच्या विनोदाची जातकुळी अगदी वेगळी आहे. (दिलीप प्रभावळकरांच्या 'झूम'ची आठवण करून देणारी.) खास तेवढ्याकरता हे पुस्तक वाचनीय.

नंदन Tue, 04/06/2013 - 12:29

In reply to by मेघना भुस्कुटे

दोन्ही पुस्तकं वाचायला हवीत. किशोर आरसांनी काही वर्षांपूर्वी 'अंतर्नाद' मासिकात काही लेख लिहिले होते. त्यातला मुंबईतल्या पारशांवर लिहिलेला लेख अजून लक्षात आहे. ('आठवणीतल्या आठवणी'मध्ये कदाचित समाविष्ट असू शकेल.)

रुची Tue, 04/06/2013 - 08:21

हाती घेतलेल्या एका अतिभव्य आणि अतिक्लिष्ट पुस्तकाचं ओझं दडपून टाकत होतं; कॉलेजातल्या क्लिष्ट विषयाच्या तासांना मन जसं सैरभैर बागडत असे तसं व्हायला लागलं म्हणून थोडावेळ ते बाजूला सारून फडताळावरच्या इतर पुस्तकांवर नजर टाकली आणि वाचायचं राहून गेलेलं व्हर्जिनिया वूल्फचं 'अ रूम ऑफ वन्स ओन' हे छोटंसं पुस्तक नजरेला पडलं. सहज चाळायला लागले तर पूर्ण झाल्याशिवाय खालीच ठेववेना. 'गर्टन कॉलेज' या स्त्रीयांच्या कॉलेजमध्ये 'विमेन अँड फिक्शन' या विषयावर तिने दिलेल्या भाषणांचा हा संच आहे. मी वाचलेलं हे सर्वात जुनं स्त्रीवादी पुस्तक असूनही त्यातील वैचारीक स्पष्टता, विनोदी शैली, विषद करण्याची रंजक पद्धत, त्यातील संयमित राग(कन्ट्रोल्ड अँगर) या सार्या वैशिष्ट्यांनी जराही 'जुनं' वाटत नाही. गंमत अशी की शंभरेक वर्षे मधे जाऊनही स्त्रीवादी दृष्टीकोनांत फारसा फरक पडलेला दिसत नाही, याचे कारण व्हर्जिनिया वूल्फ काळच्या फार पुढे होती की तिने केलेले भाष्य हे एक वैश्विक सत्य होते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण तिचे बरेचसे मुद्दे हे इतर कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविषयीच्या विचारप्रणालीत वापरले जाऊ शकते. परवाच मेघना पेठेंचे 'मला उमजलेला पुरुष' या विषयावरचे भाषण ऐकत होते आणि आता हे पुस्तक वाचताना त्यांच्या भाषणातले या विचारांचे प्रतिध्वनी ऐकू येताहेत :-) अजून बरंच लिहायचं आहे...पुन्हा कधीतरी.
ता.क. या पुस्तकातल्या प्रो. वॉन एक्स या काल्पनिक पात्राच्या 'Mental, Moral, and Physical inferiority of the female sex' या काल्पनिक पुस्तकाचे विश्लेषण करताना तिने वापरलेले विनोदाचे आणि 'रिडिक्यूल'चे अस्त्र फारच भारी आहे, तिच्या तल्लख बुद्धीला दाद द्यावीशी वाटते.

पुष्कर जोशी Tue, 04/06/2013 - 16:25

राजन गवस यांची नवी कादंबरी वाचत आहे.
अलीकडे मराठीमध्ये रचनेचे (एकसारखेच) प्रयोग करण्याची लाट आली असल्याने सदर कादंबरीमध्ये पण एक हरवलेला माणूस, त्याची डायरी , त्याची पत्रे , त्याने लिहीलेली पटकथा असा सगळा गुत्ताप्पा आहे. गवस यांच्या आधीच्या कृतींमध्ये आढळणारीच सुत्रे (खेड्याचे मरण , शहरांनी केलेले शोषण, कृषीजन संस्कृती, तिचे उदात्तीकरण) यात पण परत परत भेटतात.
अजून निम्म्यावर पोहोचलो आहे , पण बांधून ठेवेणारे असे काही जाणवत नाही. नितीन रींढे म्हणतात की गवस यांच्या कादंबरीने/ लेखनाने या निमीत्ताने नवीन वळण घेतले आहे, पण अजून जुन्याच वळणाने लिहीणारे कृष्णात खोत (उदा. झड्-झिम्मड) जसं डोकं गरगरून टाकतात तसं काही होत नाही. बाकी वाचून झाल्यावर मग.

ऋषिकेश Tue, 04/06/2013 - 16:38

आज पुढिल पुस्तके आली
-- अ‍ॅलिस इन वंडरलँड आणि तिचीच अजून एक जोड कादंबरी
-- अ‍ॅनिमल फार्म
-- ट्रेन टु पाकिस्तान (खुशवंत सिंग): इथेच मागे कोणीतरी रेकमेन्ड केले होते
-- माय इंडिया - जिम कॉर्बेट

अ‍ॅलिस इन वंडरलँड लगोलग वाचायला घेतली आहे. बर्‍याच लहानपणी वाचली होती. गोष्ट साफ विसरलो आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 04/06/2013 - 17:40

In reply to by ............सा…

मला त्याहून 'मुग्धाची रंगीत गोष्ट' (आणि अर्थात त्याचं जोडपुस्तक असलेलं 'बिम्मची बखर') हे जी. एं. नी केलेलं अगदी सैल रूपांतर फारच जास्त आवडतं.

अपरिमेय Fri, 14/06/2013 - 02:32

In reply to by ऋषिकेश

अ‍ॅलिस इन वंडरलँड मी नुकतेच वाचले. लहानपणी वाचले होते तेव्हा जाणवले नव्हते पण लहान मुलांसाठी म्हणून जे काही पारंपारीक साहित्य उपलब्ध आहे त्यापेक्षा हे बरेच वेगळे आहे. सामान्यतः परिकथांमध्ये बरेच stereotypes दिसतात, किंवा गोष्टीच्या आवरणाखाली एखादा नैतिक उपदेश असतो. अ‍ॅलिस इन वंडरलँड मध्ये असे काहीच जाणवले नाही. ते वाचताना आपण जणू एका लहान मुलीच्या स्वप्नाचा एक भाग आहोत असे वाटते. सारीका यांनी म्हटल्याप्रमाणे जाईची नवलकहाणी हे भाषांतर पण छान आहे. माझ्या आठवणीप्रमाणे पुस्तकाचे नाव "आरसेनगरीत जाई" असे आहे, किंवा मी दोन पुस्तकांची गल्लत करतोय.

ऋषिकेश Mon, 17/06/2013 - 13:21

In reply to by अपरिमेय

अ‍ॅलिस इन वंडरलँड मध्ये असे काहीच जाणवले नाही.

अगदी तसेही नाही. "खोटे कधी बोलू नये" छाप थेट उपदेश नाहित हे खरेच. किंबहुना तसे उपदेश करणे हा कथेचा उद्देश नाही हे मान्यच आहे. मात्र तरीही काही प्रसंग रोचक आहेत व काही मार्मिक टिपण्या करतात.
उदाहरणार्थ (पुढील संवाद आठवणीतून देत आहे, तपशीलात/वाक्यरचनेत बदल संभवतो)
"Can you tell me which road should I take?" asked Alice
"Good deal of it depends on where you want to go" said the cat.
"It does not matter" Alice started and cat promptly replied "then there is no preference which road you choose."
"As far far I reach 'somewhere'" Completed Alice
"Then for that you should start walking and in some time you will definitely reach somewhere"

अपरिमेय Thu, 20/06/2013 - 09:40

In reply to by ऋषिकेश

तुम्ही दिलेले उदाहरण रोचक आहे. पण लहान मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करता हे तितकसे मार्मिक वाटत नाही,(वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर ही टिप्प्णी मार्मिक आहे हे त्यांना समजणार नाही) . धनंजय यांनी मिपा वर लिहिलेल्या एका लेखाचा इथे संदर्भ देतो (मिपा गेल्या काही दिवसात बराचवेळ बंद असल्याने मूळ लेखातील भाग कॉपी-पेस्ट करत आहे)
... कॉपी-पेस्ट सुरु
ही पुढची "फूलवेडी" कविता मात्र तशी नाही. आता प्रौढ वयात मी ती वेगळ्या तर्‍हेने वाचतो.
फूलवेडी

एक परी
फूलवेडी
फुलासारखी
नेसते साडी.

फुलामधून
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.

बिचारीला
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.

यात लहानपणी वेडगळ किंवा फुलांच्या सौंदर्याबद्दल वेडी झालेली परीच दिसली होती. आता ते शेवटचे कडवे अतिशय करुण वाटते. कवितेचा अर्थच बदलतो. पुन्हा कविता वाचावी लागते. आणि अगदी साध्यासुध्या "बिचार्‍या" शब्दाने काळजात धस्स होते. करंदीकरांना कुठल्या भरभरलेल्या शब्दागाराचे पाठबळ लागत नाही. अगदी रोजवापरातल्या शब्दाला ते विलक्षण धार देऊन चालवत आहे. माझ्या कल्पनेत असा घरगुती प्रसंग उभा राहातो आहे. एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे आपल्या ओळखीतल्या निरागस छोट्या मुलीकडून ही कविता ऐकत आहेत. त्यातून छोटीला जाणवणारी मजा, आणि त्याच वेळी मोठ्यांच्या काळजाला लागणारे चटके - कल्पनेतही काटा येतो.
... कॉपी-पेस्ट संपले
लहान मुलांना वरील कवितेतील कारुण्य जाणवणार नाही, कविता ही मुलांसाठी लिहिलेली आहे, त्यामुळे केवळ त्याच दृष्टिकोनातून त्याचे रसग्रहण करावे आणी सोडून द्यावे असे मला वाटते. अ‍ॅलिस इन वंडरलँड किंवा इतर बालसाहित्याबाबत माझा दृष्टिकोन असाच आहे. उगाच नको ते अर्थ काढत गेलो की कलाकृतीचा आस्वाद घेण्याऐवजी खालील व्हिडिओ सारखे होते (२ मिनिटे ३५ सेकंद ते ६ मिनिटे ३० सेकंद)

धनंजय Sat, 19/10/2013 - 03:54

In reply to by अपरिमेय

लेखक लुइस कॅरलने अ‍ॅलिस पुस्तके फक्त खूप लहान मुलांकरिता लिहिली आहेत, अशी ती पुस्तके वाचता येत नाही. लहान मुलांना वाचता येईल, आणि मोठ्यांनाही वाचता येईल असे ते लेखन आहे.

मी अ‍ॅलिस पुस्तके ५वी-६वीत वाचली. (आणि त्यानंतर कितीतरी काळ दरवर्षी पुन्हा वाचली.) त्यातील तर्कट संवाद तर्कशास्त्रीय युक्तिवाद होते, ते मला तेव्हाही कळत होते. आणि दर वर्षी अधिक-अधिक कळत गेले. कितव्या वर्षीचे वाचन आणि अर्थग्रहण खोटे म्हणणार?

लुइस कॅरोलच्या ललितलेखनात गणिती तर्कशास्त्राचा गंभीर अंश कमीअधिक प्रमाणात आढळतो. "सिव्ही अँड ब्रूनो"मध्ये त्या मानाने कमी, तर "वॉट द टोर्टस सेड टु आकिलीज"मध्ये खूपच अधिक. एका टोकाला तर्कशास्त्राची जाण नगण्य लागते, तर दुसर्‍या टोकाला तर्कशास्त्राची जाण सखोल असावी लागते. अ‍ॅलिस पुस्तके या स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी येतात.

अ‍ॅलिस पुस्तकांत नुसत्या चमत्कारी कथेपेक्षा जास्त काहीतरी आहे. हा लेखकाचाच मानस होता, हा आपल्याला लुइस कॅरलनेच सांगितले आहे. त्याने पुढे "०-५ बर्षांकरिता" एक आवृत्ती काढली, "द नर्सरी अ‍ॅलिस"

ऋषिकेश यांनी वर उद्धृत केलेला दिलेला संवाद या बाळबोध आवृत्तीत असा दिसतो :
> "Cheshire Puss!" said Alice. (Wasn't that a pretty name for a Cat?)
> "Would you tell me which way I ought to go from here?"
>
> And so the Cheshire-Cat told her which way she ought to go, if she
> wanted to visit the Hatter, and which way to go, to visit the March Hare.
> "They're both mad!" said the Cat.

मूळ अ‍ॅलिसमध्ये यापेक्षा कितीतरी पदर सापडतात. पाच वर्षांपेक्षा मोठ्या लोकांनी ते ओळखूने मूळ पुस्तक वाचावे हा लेखकाचा मानस स्पष्टच आहे. लुइस कॅरलने हे आणखी उघड करून सांगावे का? आवश्यक नाही. पण तरी. "नर्सरी अ‍ॅलिसच्या" प्रस्तावनेत तो स्पष्टच सांगतो :
उद्धृत :
I HAVE reason to believe that "Alice's Adventures in Wonderland" has been read by some hundreds of English Children, aged from Five to Fifteen: also by Children, aged from Fifteen to Twenty-five: yet again by Children, aged from Twenty-five to Thirty-five: and even by Children-for there are such Children-in whom no waning of health and strength, no weariness of the solemn mockery, and the gaudy glitter, and the hopeless misery, of Life has availed to parch the pure fountain of joy that wells up in all child-like hearts-Children of a "certain" age, whose tale of years must be left untold, and buried in respectful silence.

And my ambition now is (is it a vain one?) to be read by Children aged from Nought to Five. To be read? Nay, not so! Say rather to be thumbled, to be cooed over, to be dogs'-eared, to be rumpled, to be kissed, by the illiterate, ungrammatical, dimpled Darlings, that fill your Nursery with merry uproar, and your inmost heart of hearts with a restful gladness!
: उद्धृत पूर्ण

हे सोपे पुस्तक निरक्षर लाडक्या बाळांनी "be thumbled, cooed over, to be dogs'-eared, to be rumpled, to be kissed," असे आहे. मूळ पुस्तक मात्र ५-१५ वर्षांच्या मुलांनीसुद्धा वाचावे, आणि थेट "Children of a "certain" age, whose tale of years must be left untold, and buried in respectful silence" अशा "मुलां"नी सुद्धा वाचावे.

माझ्या मते मूळ अ‍ॅलिस पुस्तकांची अंतर्गत गुंतागुंत इतकी आहे, की लुइस कॅरलची साक्ष काढायची गरजच नव्हती. त्यानी साक्ष दिली आहे, तशी साक्ष बहुतेक लेखक-कवी देत नाहीत. देण्याचा अवसर येत नाही. त्या कलाकारांचा मानसही त्यांच्या कृतीच्या अंतर्गत सापडू शकतो.

ललितकलाकाराने कलाकृतीतच "इथे पाणी मुरते आहे, बरे का" असे अती स्पष्टपणे म्हटले, तर कलाकृती प्रवाही राहात नाही. कॅरलने सुद्धा मूळ अ‍ॅलिसच्या प्रस्तावनेत काही सांगितले नाही, या "नर्सरी अ‍ॅलिस"च्या प्रस्तावनेत निर्देश केला! आणि प्रस्तावनेतच. असले काही कथेत स्पष्टपणे सांगितले, तर विरस होईल.

पाणी मुरत आहे असे भूमिगत रीतीने ध्वनित होत राहिले, तर मात्र कलाकृतीचा प्रवाह एकसंध राहातो. एखाद्या कलाकृतीत असे पुरेसे सुगावे लागले, की ते निर्देश कलाकाराने हेतुपुरस्सर दिलेले आहेत, असा निष्कर्ष निश्चित होतो.

---

विंदा करंदीकर आज जिवंत नाहीत. प्रौढांनी फुलवेडी कविता आपल्या करुण अनुभवाचा आधार घेऊन वाचू नये की कसे, याबाबत आपण त्यांना विचारू शकत नाही. करंदीकरांनी "अजबखाना" आणी "नर्सरी अजबखाना" अशा दोन आवृत्त्या सुद्धा काढल्या नाहीत. तेव्हा अंतर्गत सुगाव्यांवरून ठरवण्याशिवाय गत्यंतर नाही.

परंतु काही कवी/लेखक बाळ/प्रौढ दोन्ही स्तरांवर वेगवेगळे अर्थ लागू शकणार्‍या कलाकृती लिहितात, हे विसरून "वयानुसार खोल अर्थ शोधायलाच नको" असे सार्वत्रिक धोरण तरी ठेवू नये.

---
यावरून थोडे अवांतर आठवले. गलिव्हर्स ट्रॅव्हल्स हे मूळ पुस्तक लहान मुलांनी वाचण्यायोग्य नाही. त्यातील शब्दभांडार लहान मुलांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यातील राजकीय आणि नैतिक धागा लहान मुलांच्या नेहमीच्या विषयांपैकी नाही. तरी "गलिव्हर्स ट्रॅव्हल्स" हे पुस्तक (कठिण भाग बळेच विसरून) लहान मुलांच्या नजरेतून वाचावे असे काही लोक म्हणतात.

(प्रौढांचे मन भकास करणारे भाग सोडले, तर "लॉर्ड ऑफ द फ्लाइझ" पुस्तक म्हणजे बाळगोपाळांची साहसकथा आहे, असे म्हणणारे कोणी मला भेटले नाही, ही बाब खूपच चांगली.)

राजन बापट Wed, 05/06/2013 - 05:19

झुंपा लाहिरी लिखित २००३ साली प्रकाशित झालेली कादंबरी "द नेमसेक".

कादंबरी जुनी आणि पुरेशी परिचित आहे आणि दहा वर्षांपूर्वी आलेली होती तेव्हा "भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिकेने लिहिलेली" म्हणून गाजलेलीही होती. त्यानंतर त्यावर चित्रपटही येऊन गेलेला असल्यामुळे आता चांगलीच लोकप्रिय झालेली आहे. मात्र माझी तेव्हा वाचायची राह्यली होती ती आता वाचून झाली.

"साठीच्या दशकाच्या शेवटी भारतातून अमेरिकेत आलेल्या आईवडलांच्या मुलाची कहाणी" असं त्याचं साधारण वर्णन करता येईल. कादंबरी सुरु होते ती बंगाली आईवडलांच्या अमेरिकेत यायच्या काळात, त्यांच्या पर्स्पेक्टीव्हने. मात्र लवकरच हा पर्स्पेक्टीव्ह संपतो आणि कादंबरी १९६८ मधे अमेरिकेत जन्मलेल्या त्यांच्या मुलाच्या - गोगोलच्या - दृष्टीकोनातून पुढे जाते ती शेवटापर्यंत.

गोगोलच्या दृष्टीकोनातून त्याच्या आईवडलांची दिसलेली आयुष्ये, त्यात गोगोलला जाणवलेल्या विसंगती, गोगोलने आपल्या आजूबाजूच्या वातावरणात वावरताना आपल्या आईवडलांच्या आयुष्याची सांगड घालण्याचा प्रयत्न, मनोमन केलेल्या तुलना या गोष्टी परदेशवासाच्या, संगोपनाच्या संदर्भात समोर आरसा धरणार्‍या वाटल्या.

गोगोलच्या आईवडलांचे आपल्या बंगाली घोळक्यात वावरण्याचं, मनाने कलकत्त्यामधे असणं या सर्वाची तीव्रता, त्यांच्या मनाची ओढाताण ही, अलिकडे - म्हणजे नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात - आलेल्या लोकांच्या तुलनेने अधिक असल्याचं जाणवत होतं. गोगोलच्या नावाचा घातला गेलेला घोळ (म्हणूनच कादंबरीचं नाव "नेमसेक"), गोगोल आणि त्याच्या बहिणीला त्यांच्या लहानपणी चक्क शैक्षणिक वर्ष वाया घालवून कलकत्त्याला ठेवणं, गोगोलच्या आईने अगदी शेवटापर्यंत गोगोलच्या वडलांना नावाने हाक न मारणं, गाडीत गॅस भरता न येणं , हे सगळं सरासरी एनाराय् - अगदी सत्तरीच्या दशकात आलेल्या एनाराय् - लोकांच्या तुलनेत दूरदर्शीपणाच्या, संवेदनशीलतेच्या मोठ्या अभावाचं आहे असं जाणवलं.

पण अमेरिकेत आलेल्या लोकांच्या आयुष्याचा तुकडा , त्यातल्या विसंगती, मुख्य म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघणं हे मेनस्ट्रीम साहित्यामधे या कादंबरीमधे अतिशय जोरकसपणे आलेलं आहे याबद्दल शंका नाही.

काही गोष्टींची नोंद करावीशी वाटते : -
लाहिरी संवादाचा वापर बराच कमी करतात. संथ प्रवाहाप्रमाणे पुढे जात असलेल्या आयुष्याची वर्णनं येतात. जणु नि:शब्दपणे ही सारी वर्षं जात असल्यासारखं चित्रण वाटलं. अर्थात तीसेक वर्षांचा आवाका मापायचा तर हे आलंच. आणि अर्थातच महत्त्वाच्या प्रसंगी माणसांचे संवाद येतातच. पण किमान मला तरी संभाषणांचा वापर थोडा कमी वाटला.

खरे तर गोगोलला सोनिया नावाची बहीणही आहे. पण लाहिरीने कथानक सोनियाच्या ऐवजी गोगोलच्या पर्स्पेक्टिव्हने लिहावं हे रोचक वाटलं. सोनियाच्या वाट्याला एकही संवाद नाही. तिचा उल्लेख आहे पण फार कमी आहे. लाहिरींना सोनियाच्या दृष्टीकोनातून हे का लिहावं वाटलं नाही, मला त्याचा उलगडा अजून झाला नाही.

रोचना Thu, 06/06/2013 - 15:32

In reply to by राजन बापट

माझ्या आवडत्या कादंबर्‍यंमधील एक! मला इंटरप्रेटर ऑफ मॅलडीज एवढे आवडले नव्हते. आणि नेमसेक नंतर आलेला लघुकथांचा संच "अन-अकस्टम्ड अर्थ" थोडा कंटाळवाणी, तेच-तेच वाटला. पण नेमसेक मधे लाहिरींना कथानकाची लय अगदी नेमकी जमली. त्यांच्या लेखनात पाल्हाळ अगदी कमी असतो, फार विचारपूर्वक जेम-तेम लिहीतात, आणि वातावरण निर्मिती ही त्यांची खासियत आहे.
सोनियाच्या पात्राबद्दल मलाही कुतूहल वाटले होते. गोगोलपेक्षाही मला अशोक चे पात्र जास्त आवडले होते.
पुस्तकावर आधारित सिनेमा पाहिलायस का? मला तेवढा आवडला नव्हता, पण इर्रर्र्फान खानने अशोकची भूमिका मस्त निभावली होती.

मैत्र Fri, 07/06/2013 - 21:19

In reply to by रोचना

सिनेमा चांगला वाटला. बरेचदा संथ होतो. इरफानच्या नंतर थोडंसं कृत्रिम अवघडलेपणही येतं..
पण त्याच भागात काहीसा त्या नेमसेक गोगोलचा भाव स्पष्ट होत जातो.
इरफान फार अपील झाला आणि अर्थात ते पात्रच तसं आहे. त्याने उत्तम न्याय दिला आहे.
गोगोलसारख्यांच्या (तेच एनाराय सत्तर वगैरेच्या दशकातले) स्वतःचा शोध हा कॉलेजच्या काळातल्या घिशापिट्या घटनांनंतर जो उलगडत जातो तो चांगला.
बरेचदा जी स्वगतं आहेत ती जास्त विचार पोहोचवत राहतात आणि या सिनेमाचं वेगळेपण कुठेतरी भावतं. जेव्हा गोगोल असल्या विचित्र नावामागची इरफानची भावना जेव्हा गोगोलला खर्‍या अर्थाने समजते तेव्हा..
कलकत्याचे लाल पिवळे रंग आणि अमेरिकेतले शहरी वातावरण, नंतर कंट्रीसाईड.. हे फरक दाखवण्यासाठी चांगले वापरले आहेत.
सिनेमा आवडला. वाचनाच्या धाग्यात या नेमसेक कादंबरीमुळे थोडं अवांतर लिहिलं तरी चालेल असं वाटलं.

राजन बापट Fri, 07/06/2013 - 21:23

In reply to by मैत्र

प्रतिसाद आवडला.
>>>वाचनाच्या धाग्यात या नेमसेक कादंबरीमुळे थोडं अवांतर लिहिलं तरी चालेल असं वाटलं.
अगदी मान्य :)

ऋषिकेश Wed, 05/06/2013 - 14:12

कालचा म.टा.चा अग्रलेख "लाफ्टर क्लबच्या देशा"वाचला. बर्‍याच दिवसांनी इतकी मजा आली.. खरंच चांगला लिहिलाय.. पंचेस व्यवस्थित जमलेत.

त्यामानाने आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखातील उपहास रटाळ झाला आहे.

गोगोल Fri, 07/06/2013 - 06:27

अ सॉन्ग ऑफ आईस अ‍ॅन्ड फायर वाचायला घेईन असे म्हण्तोय. पण मला भीती हीच वाटते की नेमका मी सुरु करायचो आणि म्हतारा गोष्ट पुर्ण करायच्या आधीच खपायचा.

जुई Mon, 10/06/2013 - 18:10

झिम्मा हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र वाचले . शेवटी मात्र मनात तरळत राहतो तो बाईनी सांगितलेला पिकासो चा कोट . ''सर्व कला म्हणजे धादांत खोटेपणा आहे , जी अंतिम सत्याकडे घेऊन जाते ''. बाईनी नाट्य ,कला क्षेत्रात भरपूर , जबरदस्त काम केलंय . विजु जयवंत असल्याचा पार्ट जरा कंटाळवाणा वाटतो . विजु खोटे झाल्यापासून मात्र वाचायला मजा येते. सर्वच नाटकांची छान सखोल माहिती मिळते . रंगायन चळवळीचा इतिहास कळतो . तेंडूलकर आणि एलकुंचवार असे नाटककार आणि त्यांना न्याय देणाऱ्या बाई हे कॉम्बो उत्तम आहे . आपण त्या काळात ही उत्तमोत्तम नाटक पाहायला नव्हतो याची खंत वाटते. पुस्तकामध्ये खाजगी आयुष्यावरही फोकस चांगला आहे . स्त्रीला कुठेही काही सिरिअस काम करायच असेल तर घरचा पाठींबा किती आवश्यक आहे . बाई त्याबाबतीत फारच नशीबवान . आधी दुर्गा खोटे आणि नंतर बापायजी यांचा सक्रिय आणि सकारात्मक पाठींबा त्यांना मिळाला . वैधव्याच संकट , तीन मुलं होऊनही त्यांच्या कामात कुठेही अडथळा आला नाही हे विशेष . एकूणच मराठी रंगभूमीचा महत्वाचा इतिहास हे पुस्तक सांगते . आणि एका मनस्वी कलाकाराचा आयुष्यपट उलगडते . स्वतः मधील कलेच्या प्रेमात असा , स्वतःच्या नाही हा महत्वाचा धडाही देते . http://www.bookganga.com/eBooks/Book/4826573620612812716.htm?Book=Zimma

ॲमी Wed, 12/06/2013 - 08:30

स्टिफन किँग च 'द शायनिँग' वाचलं. क्युबरिक चा चित्रपट पाहिलाच असेल सर्वाँनी, त्यामुळे कथानक सांगत नाही.
पअॅरानॉर्मल/भुताटकी पुस्तक वाचण्याचा माझा पहीलाच प्रयत्न. आता परत एखाद वर्ष तरी अशा पुस्तकांच्या वाटेला जाणार नाही :-(
बाकी काही म्हणा, माझ्यासाठी तरी, जे के रोलिँग तै नंतर किँग ने 'लोकप्रिय ते भंकस' या प्रिज्युडाईस ला धक्का दिला.

............सा… Fri, 14/06/2013 - 21:52

काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "" पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना. या १८ वर्षाच्या मुलाने २ लहान मुलींचा (वय वर्षे १२ व १३)खून करुन, नंतर त्यांच्या शवांवर बलात्कार तर केलाच तरीही त्याच्या राग शांत होईना तेव्हा बूटांनी त्यांना चिरडले.
पण हे सर्व प्रक्षोभक आणी हिंसक व भडक लिहीण्यासाठी हा प्रतिसादप्रपंच नाही तर त्या मुलाशी व त्याच्या पालकांशी बोलून या मानसोपचारतज्ञाला जी "इनसाईट" मिळाली ती मला सांगायची आहे.
या मुलाची आई जी डोक्याने थोडी अधू होती, तिला मुलाचे रडणे सहन न झाल्याने, या मुलाला तान्हे असताना अंधार्‍या खोलीत रडत ठेऊन बाहेर निघून जात असे. असे महीनोंमहीने केल्याने त्या बाळाचे रडणे तर थांबले पण मानवी संपर्कातून जी ऊब व माया मिळते ती न मिळाल्याने, हा मुलगा माणसांवर विश्वास टाकणे, त्यांच्या सकारात्मक प्रोत्साहनास प्रतिसाद देणे , त्यांच्या भावनांशी एकरुप होणे अशा काही मुलभूत "ट्रिगर्स्"पासून वंचित राहीला. त्यातून त्याच्या संतापाचा, "सहानुभूती व सहवेदनेच्या अभावाचा" जन्म झाला.
लेखकाने खूप सोप्या पण वैद्यकीय भाषेत हे उलगडून दाखविले आहे. पुस्तक खाली ठेववतच नाही. या पुस्तकातील अन्य लहान मुलांच्या कथाही अशाच विद्रावक, भयानक पण दु:खाचा कढ आणणार्‍या होत्या. एक वेगळ्याच विषयावरचे पुस्तक.
गुडी -गुडी (गोग्गोड) पुस्तकांपेक्षा फार वेगळ्या अन व्यावहारीक विषयावरचे पुस्तक असे म्हणेन.

............सा… Sun, 16/06/2013 - 22:48

In reply to by ............सा…

हे पुस्तक लायब्ररीत मिळाले. सर्वच कथा विचित्र व हृदयद्रावक वाटल्या.बालमानसोपचारतज्ञाचे काम इतके अवघड असेल याची कल्पना नव्हती.

एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ तासांनी सापडल्यावर काही महीन्यांनी तिने फोटोच्या ढीगातून त्या खून्याला ओळखले. पुढे विटनेस म्हणून तिला वापरणार होते पण त्याची पूर्वतयारी म्हणून ती ४ वर्षाची असताना बाळाला मानसोपचारतज्ञाकडे पाठविले गेले.अन मग थेरपी सुरु झाली.

की मुलगी काय करत असेल बरं थेरपीत? तर डॉ. पेरींवर विश्वास बसल्यानंतर ती हळूहळू ओपन अप झाली व "तो' सीन स्वतःची स्वतः एनॅक्ट करु लागली. ती पेरींना हात बांधल्यासारख्या कल्पित अवस्थेत झोपवत असे.थोपटत असे, मधेच जाऊन दूध आणे व देई,खेळणे आणे व देई. पेरी अर्थातच 'त्या आईची" भूमिका करत असल्याने हालचाल करत नसत.मग ती त्यांच्या अंगावर झोपून "रॉक अन हम" करत असे.कधी रडत असे/हुंदके देत असे.हे असे दर सेशनमध्ये होई.या थेरपीचा की पॉईंट हा होता की त्या मुलीला सिचुएशनचा पूर्ण "कंट्रोल" पेरींनी दिला. जो कंट्रोल तिला "तेव्हा" मिळाला नाही तो या सेशनमध्ये तिला दिला गेला. अन हीलींग सुरु झाले.

पुढे ही मुलगी खूप 'प्रॉडक्टीव्ह" आयुष्य जगली,जगते आहे. तिला उत्तम ग्रेडस मिळाल्या. तिचे स्वतःचे कुटुंब आहे. ती एक द्याळू व संतुलीत व्यक्ती आहे. शी इज जस्ट डुईंग फाईन.
___________________________________
अर्थात फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागली.क्लोनॉडीन नावाच्या औषधामुळे तिचे निद्रेविषयक बरेच प्रश्न सुटले, बेल वाजल्यावर दचकणे आदि भीती दूर झाली वगैरे. याच कथेत औषधोपचारावरती एक फार मार्मीक मिमांसा केलेली आहे. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.
पुढेही सोप्या वैद्यकीय भाषेतील खूप विश्लेषण या कथेत वाचावयास मिळते.

ही कथा व हे एकंदर पुस्तकच मानवी मेंदूची गुंतागुंत सोडविणारे वेधक वाटले.
______________________
या कथेसंबंधीत लेख - http://www.aaets.org/article196.htm

............सा… Mon, 17/06/2013 - 07:00

In reply to by ............सा…

एक शेवटची "केस" सांगते. अँबर नावाची मुलगी स्वतःच्या मनगटावर रेझर/सुरीने "कट्स" देत असे. बरेचदा असे "सेल्फ्-म्युटिलीएशन" करणार्‍या मुलामुलींचा भूतकाळ अंधारमय/यातनामय असतो आणि अँबरही याला अपवाद नव्हती.
७ वर्षाची असल्यापासून तिच्या सावत्र वडीलांनी केलेल्या लैंगिक शोषणाची ती शिकार होती. वडील दारु प्यायचे तेव्हा "तसे" वागायचे. भीतीमुळे तिने हे लपविले होतेच पण पुढेपुढे एकदाचे "ते" होऊन जाउ दे या हेतूने ती त्यांना दारु देणे/प्रव्होकेटीव्ह वागणे आदि करुन ती तो यातनामय प्रसंग हातावेगळा करत असे. पुढे २ वर्षांनी आईला ने वडीलांना तिच्याबरोबर पाहीले व हाकलून दिले. पण आईने काही मानसोपचारतज्ञाची मदत घेतली नाही.
लहानपणीच्या या स्मृती अँबरकरता इतक्या ओव्हरव्हेल्मींगली यातनामय होत्या की हळूहळू त्या स्मृतींपासून स्वतःला "डिसोसीएट" करायला ती मनगटावर "कट्स" देऊ लागली व "ट्रान्स" मध्ये जाऊ लागली. अशा प्रकारची मुले जे ड्रग्ज घेऊन साधतात ते ती स्वत:ला जखमा करुन साधू लागली.
तिला लहानपणाची लाज (शेम) व गुन्हेगार (गिल्ट) वाटे पण स्वतःला सुरक्षित करण्याची पॉवर तर हवी होती. यातून सुरु झाले एक समांतर आयुष्य!
प्रसंगी ती स्वतःला कावळा समजे. अतिशय चतुर/स्मार्ट पक्षी जो पॉवरफुल आहे, वाईटाचा पारीपत्य करणारा आहे. अन तो काळा हीडीस आहे, कोणालाही नको असलेलाही आहे. हवे तेव्हा ती त्या जगात निसटून जाई , जिथे ती कावळा असे. ती फक्त काळे कपडे घाले, शरीरावर काळे टटू रेखाटून घेत असे.
डॉ पेरींनी तिला कशी थेरपी दिली, तिला श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकविले, १ श्वास - १ पायरी- २ रा श्वास-दुसरी पायरी .... अशा १० पायर्‍या उतरुन तिला मनातल्या मनात जीन्याखालच्या अंधार्‍या पण सुरक्षित खोलीत जायला "स्मृती पासून डिसोसीएट करायला" शिकवले ज्यायोगे ती "कट्स" देईनाशी झाली.
पुढे याच थेरपीतून त्यांनी तिला हे पटवून दिले की जग "हीडीस समजून" तिला नाकारत नसून ती जगावर तिच्या शेम व गिल्टचे आरोपण करत एक सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी जगत आहे हे तिच्या लक्षात आणून दिले.
_____________
अर्थात औषधोपचारही लागलेच लागले. या औषधांचे मेंदूवर होणारे परीणाम व विश्लेषण केवळ वाचनीय आहे. या पुस्तकातून एक नक्की अर्थबोध झाला तो म्हणजे - बाळाची पहीली वर्षे फार फार नाजूक असतात अन आई -वडीलांचा रोल फार महत्त्वाचा (क्रुशिअल) ठरतो. दुसरे एक कळले ते हे की मुलांना रुटीन/एक स्ट्रक्चर (साचा) लागते. एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
________________
प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे.

बॅटमॅन Mon, 17/06/2013 - 13:15

In reply to by ............सा…

सेल्फ-म्युटिलेशन करणार्‍या सर्वांना फार त्रास होत असतो असेही नाही. बर्‍याचदा सेल्फ-इंपोज्ड मॉरल कोडमुळेही तसे होते. अर्थात म्युटिलेशनचा अतिरेक होत असेल तर सहमत आहे.

............सा… Mon, 17/06/2013 - 15:06

In reply to by बॅटमॅन

"सेल्फ इम्पोज्ड" मॉरल कोडमुळे त्रास जरुर होत असावा. पण "सेल्फ्-म्युटिलेशन" मुळे होतोच होतो. जेव्हा अँबर "डिसोसिएट" झालेली होती तेव्हा डॉ पेरींनी तिच्या मनगटावर अनेक समांतर असे ब्लेडने दिलेले "कट्स" पाहीले.
जर "सेल्फ्-म्युटीलेशन" असा शोध गुगल इमेजेस मध्ये घ्याल तर ही उदाहरणे दिसतात.

प्रत्यक्ष "ट्रॉमा" (यातना) होतेवेळी देखील "डिफेन्स सिस्टीम" म्हणून हे लोक स्वतःला स्वेच्छेने "डिसोसिएट" करुन घेतात. पण पुढे पुढे त्या स्मृती इतक्या कटू/भयानक वाटतात की कट करुन करुन असे लोक स्वतःला सुरक्षित ठेऊ लागतात. कटींगस मुळे "ओपिअड" नावाचे मेंदूतील नैसर्गिक असा "हेरॉइन" सारखे रसायन स्त्रवते. आणि एक सूदींग "डिसोसीएटीव्ह ट्रान्स" मध्ये हे लोक जातात.

ऋषिकेश Mon, 17/06/2013 - 13:48

In reply to by ............सा…

एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.

वा! मार्मिक आणि रोचक विधान आहे.

माझ्या एका मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या मैत्रिणीच्या मतानुसार एक ढोबळ फॉर्म्युला तयार करायचा तर पहिल्या वर्षानंतर, पाच वर्षांपर्यंत आई आणि वडील दोघांनी आपल्या मुलांसाठी दिवसातले किमान त्यांच्या वयाइतके तास "केवळ त्यांच्यासाठी" राखणे अनिवार्य असावा व त्यातासांपैकी त्यांच्या वयाच्या अर्धा किंमतीइतके तास दोघांनी मुलांसोबत एकत्र सोबत असावे. या वयात मुलांना बोलते करणे / त्यांना कळो वा ना कळो त्यांच्याशी गप्पा मारणे, गोष्ती सांगणे, गाणी म्हणणे, भरपूर खेळणे वगैरे करावे ज्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम रहाते.

ऋता Tue, 18/06/2013 - 00:43

पी डी जेम्स या लेखिकेची दोन क्राईम नॉव्हेल्स वाचली- 'अननॅचरल कॉझेस' आणि 'द ब्लॅक टॉवर'. पहिलं फार आवडलं नव्हतं- म्हणजे शैली आवडली- भिती , गूढता वगैरे वाचताना जाणवते- पण शेवटी 'ह्याला काय अर्थ आहे...अशी संपवायची का इतकी चांगली रंगत चाललेली गोष्ट' असं वाटलं. लेखनशैली आवडल्यामुळे, दुसरं पुस्तकही वाचलं. ते जास्त चांगलं वाटलं, प्लॉट्च्या दृष्टीकोनातून.
आणखीनही पुस्तकं मिळाली पी डी जेम्सची तर वाचीन अधून मधून.

रोचना Tue, 18/06/2013 - 10:56

In reply to by ऋता

पण शेवटी 'ह्याला काय अर्थ आहे...अशी संपवायची का इतकी चांगली रंगत चाललेली गोष्ट' असं वाटलं.

सहमत! जेम्स माझी आवडती लेखिका आहे, पण प्लॉट ही तिची जमेची बाजू नाही हे अगदी मान्य. पात्रांची अगदी सूक्ष्म, हलकेच उपहासकारक रेखाटणी, आणि एखाद्या जागेच्या डायनॅमिक्स चे (हॉस्पिटल, वकिलाचे हाफिस, वगैरे) अगदी बारीक निरीक्षण हे मात्र तिला मस्त जमतं, आणि उच्च-मध्यमवर्गीय ब्रिटिश समाजातल्या खूबींचे, विक्षिप्तपणाचे परीक्षण ही. उदा: दोघी अविवाहित नर्स बाई एकत्र राहत असताना दोघांमध्ये लहानशा क्वॉर्टरच्या जागेची विभागणी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित कशी होत जाते, हे इतके सहज, संथपणे दाखवते की आपणच पहाटे त्यांच्याबरोबर पहिला चहा घेत आहोत असे वाटते. भीती, गूढता पेक्षा हेच दैनंदिन वातावरण निर्माण करणे तिला जास्त आवडत असावे, कारण पुस्तकं त्यावरच बेतलेली असतात. तरी, प्लॉटच्या दृष्टीने "अ सर्टन जस्टिस", किंवा "अ टेस्ट फॉर डेथ" यात कथानक जास्त फोकस्ड आहे (हे मराठीत कसे म्हणायचे?) असं आठवतं.

जेम्स बद्दल नेहमी ही टीका केली जाते की ती स्वत: अ‍ॅडम डालग्लीश च्या इतकी प्रेमात पडलेली असते की बाकी पात्रांकडे, प्लॉटकडे तिचे तेवढे लक्षच जात नाही! हे अन्य पोलीस पात्रांना लागू असेल कदाचित (तरी मला केट मिस्किनचे पात्र ही फार आवडले), पण प्रत्येक पुस्तकातील पात्रांना नक्कीच नाही. पण शेवटच्या पुस्तकांत तोचतोच उच्च-मध्यमवर्गीय विक्षिप्तपणा जाणवतो हे मात्र खरं.

या संचावर आधारित टी-वी मालिका ही फार चांगली आहे - पुस्तकांसारखीच कथानकाची लय संथ आहे, आणि पात्रांची भूमिका उत्तम. रॉय मार्सडेन चा डालग्लीश अगदी पटतो.

ऋता Tue, 18/06/2013 - 17:06

In reply to by रोचना

धन्यवाद रोचना.
"अ सर्टन जस्टिस","अ टेस्ट फॉर डेथ" ही पुस्तकं मिळतात का पाहीन लायब्ररीत.
टी व्ही मालिकेच्या भागांचा जालावर शोध घेइन कधीतरी. वाचताना जाणवलंच होतं की नक्कीच ह्या गोष्टींवर चित्रपट्/मालिका असणार.
(फोकस्ड ~ नेमकं/केंद्रीत ?
अ‍ॅडम डालग्लीश: आडनाव कसं उच्चारायचं हा प्रश्नच होता मला.)

............सा… Tue, 18/06/2013 - 17:12

In reply to by रोचना

ऋता व रोचना आपल्या दोघींच्या परीक्षणामुळे पुस्तक वाचावेसे वाटत आहे विशेषतः -

दोघी अविवाहित नर्स बाई एकत्र राहत असताना दोघांमध्ये लहानशा क्वॉर्टरच्या जागेची विभागणी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित कशी होत जाते, हे इतके सहज, संथपणे दाखवते की आपणच पहाटे त्यांच्याबरोबर पहिला चहा घेत आहोत असे वाटते.

हे मस्तच.

फोकस्ड्=केंद्रित

............सा… Wed, 19/06/2013 - 18:08

जॅक वेल्श ( chairman and CEO of General Electric between 1981 and 2001) यांचं "Winning- Jack Welch" हे पुस्तक वाचते आहे. "बिझनेस" शी संबंधीत कमालीची बुद्धीमत्ता (इन्टेलिजन्स) तर कळूनच येते पण जॅकच्या "नेतृत्व" गुण अन "वेळप्रसंगी कठोर" पणाचीही झलक दिसते. खूप मोलाच्या टीप्स (सल्ले) मिळतातच पण पुस्तक इतकं जीवंत आहे की भारुन जाऊन, कृती करावीशी वाटते. (मी फक्त आळस झटकून व्यायाम केला :प)
जॅक यांचच "Jack: Straight from the Gut" पुस्तकही ३-४ वर्षापूर्वी चाळलं होतं. तेदेखील आवडले होते.पण तेव्हा सातत्य दाखवून फडशा पाडला नव्हता. हे पुस्तक मात्र नक्की वाचणार आहे.
सल्ले देणार्‍या पोकळ पुस्तकांपेक्षा "अनुभवातून आलेले अत्यंत यशस्वी नेत्याचे शहाणपणाचे बोल" म्हणून हे पुस्तक फार आवडतय.

पिवळा डांबिस Thu, 20/06/2013 - 10:40

कोलन कॅन्सर रोग्यांचे केसपेपर्स वाचतोय. त्यांना तोंड (खरं तर बिंड!!) द्याव्या लागणार्‍या यातना समजून घेतोय.:(
त्याचबरोबर वाईल्ड टाईप के रॅस जीन असलेल्या कोलन कॅन्सर रोग्यांवर कशा प्रकारे अत्याधुनिक उपचार केला असता त्यांच्या यातना नाहीशा होतील, त्यांचं आयुष्य वाढू शकेल, यावरचे लिटरेचर वाचतोय.....

इंन्टरेस्टिंग आहे, आशादायक आहे,
पण साला हा कॅन्सर अजूनही अनक्युरेबल आहे!!!!
:(

राजन बापट Wed, 26/06/2013 - 08:55

"अपॉकॅलिप्स नाऊ" हा सिनेमा अलिकडे पाह्यला आणि या निमित्ताने जोसेफ कॉनराड्ची पुस्तके पुन्हा वाचावी वाटू लागली. हाताशी "लॉर्ड जिम" लागलं आणि ते सध्या - अगदी कूर्मगतीनं - वाचणं सुरू केलेलं आहे.

इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटला, कारण ही कादंबरी वाचताना अगदी पहिल्या काही पानांपासून कै. जी ए कुलकर्णी यांच्या शैलीची आठवण येते. जीएंवर कॉनराडचा असणारा प्रभाव अगदी ठळकपणे जाणवतो खरा. उदा. चांदण्या रात्री बोटीवर पहाणी करतानाचं वर्णन करणार्‍या या ओळी पहा. शैलीतली चित्रमयता, लांबलचक वाक्यं, निसर्गातल्या घटनांचं, वस्तुमात्रांचं, माणसांचं प्रतिमांच्या साह्याने केलेलं वर्णन या बाबत जीएंची आठवण येणं अपरिहार्य आहे.

"A marvellous stillness pervaded the world, and the stars, together with the serenity of their rays, seemed to shed upon the earth the assurance of everlasting security. The young moon recurved, and shining low in the west, was like a slender shaving thrown up from a bar of gold, and the Arabian Sea, smooth and cool to the eye like a sheet of ice, extended its perfect level to the perfect circle of a dark horizon. The propeller turned without a check, as though its beat had been part of the scheme of a safe universe; and on each side of the Patna two deep folds of water, permanent and sombre on the unwrinkled shimmer, enclosed within their straight and diverging ridges a few white swirls of foam bursting in a low hiss, a few wavelets, a few ripples, a few undulations that, left behind, agitated the surface of the sea for an instant after the passage of the ship, subsided splashing gently, calmed down at last into the circular stillness of water and sky with the black speck of the moving hull remaining everlastingly in its centre."

चिंतातुर जंतू Fri, 28/06/2013 - 10:42

In reply to by राजन बापट

कॉनरॅडची मातृभाषा इंग्रजी नव्हती हे लक्षात घेतलं तर हे अधिकच उल्लेखनीय वाटतं.

ऋषिकेश Wed, 26/06/2013 - 09:48

सध्या जिम कॉर्बेटचे "माय इंडीया" वाचतो आहे.
कॉर्बेटच्या शिकारकथा प्रसिद्ध आहेतच पण या संग्रहात तो ज्या तत्कालीन अतिगरीब वर्गासोबत फिरला, त्यांच्या घरांत राहिला त्यांच्या जीवनमानाशी निगडीत अतिशय हृद्य कथा आहेत. कॉर्बेटचा या लेखनाचा वेगळाच पैलु निश्चितच वाचनीय आहे.

पांथस्थ Fri, 28/06/2013 - 09:03

गेल्या दोन दिवसात खालील पुस्तके मागवली आहेत. शनिवार/रविवार वाचायचा बेत आहे.

१. आत्मचरित्राऐवजी - जयवंत दळवी
२. बाईच्या कविता - किरण येले
३. झेन गार्डन - मिलिंद बोकील
४. दुर्गभ्रमणगाथा - गोनीदा
५. जैत रे जैत - गोनीदा
६. माचीवरला बुधा - गोनीदा
७. मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
८. ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी - म. वा. धोंड
९. तरीहि येतो वास फुलांना ! - म. वा. धोंड

ह्या पैकी "आत्मचरित्राऐवजी" चाळुन बघितले दळवी ष्टाईल खुशखुशीत आहे. "बाईच्या कविता" हे पुस्तक त्यातल्या एका खास कवितेकरता (सुरमई) मागवले होते. ते पण छान आहे. बाकिची वाचुन कळवतो! (जाता जाता: वाचनाची सुरवात #४, #६ अथवा #८ ने व्हायची शक्यता आहे!)

बॅटमॅन Fri, 28/06/2013 - 12:12

कालच प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकरांची "मराठी व्याक्रण-वाद आणि प्रवाद" व "मराठी व्याक्रणाचा इतिहास" ही दोन पुस्तके घेतली. वाद अन प्रवाद सध्या सुरू केलेय. अगदी स्वच्छ अन शास्त्रीय दृष्टीने लिहिलेले पुस्तक आहे.

१. मराठी व्याकरणातील बर्‍याच गोष्टींवर संस्कृत व इंग्रजीचा कसा प्रभाव पडला,
२. उसनवारी करताना बहुतेकवेळा मागचापुढचा विचार फारसा न करता होलसेल उसनवारी कशी केली गेली-विशेषतः इंग्रजीकडून,
३. व्याकरणाच्या व्याप्तीबद्दलचा व्याक्रणकारांच्या मनातील संभ्रम, व्याक्रण बोलीभाषेचे की लिखित भाषेचे असावे,
४. व्याक्रण हे प्रिस्क्रिप्टिव्ह-आदेशात्मक असावे की डिस्क्रिप्टिव्ह-वर्णनात्मक असावे याबद्दलचे त्यांचे "इति ते संशयो मा भूत्" असे स्पष्ट बोलणे,
५. मराठी व्याक्रणाचा डीटेल सर्व्हे-महानुभाव काळातील भीष्माचार्यांपासून ते शास्त्रीय व्याक्रणवाल्या मोरो केशव दामल्यांपर्यंत अन अजून पुढे,
६ मराठीचे व्याक्रण लिहिण्यासाठी अन्य भाषांचे ज्ञान आवश्यक असण्याच्या मतप्रवाहावर कडाडून टीका-हिस्टॉरिकल मेथड अन व्याक्रण यांची गल्लत न करण्याविषयी खूप कळकळीने अन सोदाहरण, विस्तारपूर्वक लिहिले आहे.

हे मुद्दे सुरुवातीच्या ६०-७० पानांत विशेष उल्लेखनीय वाटले. लेखकाची तार्किक बैठक अतिशय सुनिश्चित असल्याचे पदोपदी दिसते. लेखन आणि उच्चारातल्या द्वित्वावर टीका करणे आणि च,ज,झ च्या दोन उच्चारांसाठी वेगळी चिन्हे असावीत तसेच वर्णमालेत अ‍ॅ व ऑ चा समावेश करावा हे विशेष आवडले. पुस्तक तसे लहानसेच, २३० पानांचे आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 28/06/2013 - 12:16

In reply to by बॅटमॅन

एकाएकी श्रेणीव्यवस्था गायब दिसतेय, म्हणून प्रतिसाद. माहितीकरता धन्यवाद. श्रीस्थानकी न मिळाल्यास आपल्याशी संपर्क साधण्यात येईलच. ;-)

नगरीनिरंजन Sun, 30/06/2013 - 05:54

श्री. राजीव साने यांचा लोकसत्तातला लेख वाचला.
लेख अत्यंत मनोरंजक असल्याने फार आवडला. थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम सगळ्या जगाला लागू होतो पण दुसरा नियम मात्र फक्त पदार्थाच्या रेणूंच्या पातळीवरच लागू होतो आणि सगळे पदार्थ रेणूंनी बनलेले असले तरी एकूणात त्याचा काही परिणाम होत नाही ही नवी वैज्ञानिक माहिती मिळाली.
शिवाय
१. chaos व order यात मानवी मूल्यांचाच काय तो फरक आहे आणि order टिकवण्यासाठी अतिरिक्त उर्जेची गरज पडत नाही
आणि
२. वाढीव मूल्य मोजताना कॉस्ट externalize केली जात नाही.
अशा आणखी दोन नवीन गोष्टी कळल्या.
लेखातली शेवटची दोन वाक्ये लेखाचा अर्थ लावण्याची हिंट देतात असे वाटते. एकूण मजा आली!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/07/2013 - 23:38

In reply to by नगरीनिरंजन

हा लेख वाचला, पण फार आवडला नाही. त्यांना काय सांगायचं आहे ते लक्षात आलं, बहुतांशी पटलंही पण लेखन आवडलं नाही.

बरीच उदाहरणं देऊन मुद्दा मांडणं ठीक, पण ही उदाहरणं रोजच्या व्यवहारातली, माहितीतली असतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत एका भव्य डोममधे झालेले अन्नोत्पादनाचे प्रयोग किंवा काप्रा हे लेखक असे माहितीतले वाटत नाहीत. (काप्राचं लिखाण मी वाचलेलं नाही.) थर्मोडायनामिक्सच्या दुसर्‍या नियमाच्या गैरवापराबद्दल अधिक स्पष्टीकरणही आवडलं असतं. दुसरा नियम माहित्ये, समजला आहे पण त्याचा चुकीचा वापर कसा झाला आहे हा मुद्दा समजला नाही.

(थर्मोडायनामिक्स या विषयात मॅक्रो पातळीवर दिसणारे गुणधर्म (तापमान, उर्जा, दाब इ.) यांचा अभ्यास होतो; त्याचे नियम, सिद्धांत लिहीताना कण पातळीवर विचार होतो.)

चिंतातुर जंतू Tue, 09/07/2013 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> काप्रा हे लेखक असे माहितीतले वाटत नाहीत. (काप्राचं लिखाण मी वाचलेलं नाही.)

काप्रा मीसुद्धा वाचलेला नाही, आणि वाचायची इच्छासुद्धा नाही. पण तो माहितीतला नाही असं मात्र म्हणता येणार नाही. मराठी विद्वज्जन (त्यांपैकी अनेक तथाकथित), बुद्धिजीवी (त्यांपैकीही अनेक तथाकथित) आणि सामाजिक कार्यकर्ते (त्यांपैकीही...) यांच्या शेल्फांवर 'ताओ ऑफ फिजिक्स' नेहमी आढळतं. तशीच दुसरी दोन म्हणजे 'डान्सिंग वु लि मास्टर्स' आणि 'झेन अ‍ॅन्ड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स'. एकदा रेडिओवर अविनाश धर्माधिकारी नावाच्या तथाकथित हुशार माणसानं काप्रा आणि 'झेन...'बद्दल जे तारे तोडले होते ते ऐकून मी ही पुस्तकं आणि धर्माधिकारी दोघांनाही कायमचं वाळीत टाकलं.

बॅटमॅन Tue, 09/07/2013 - 11:37

In reply to by चिंतातुर जंतू

अविनाश धर्माधिकारी नावाच्या तथाकथित हुशार माणसानं

नै म्हंजे काप्रा अन झेन मध्ये गल्ली चुकलेही असतील धर्माधिकारी पण ते अज्जीच हुकलेले आहेत असे वाटत नाही, चूभूदेघे.

चिंतातुर जंतू Tue, 09/07/2013 - 11:49

In reply to by बॅटमॅन

पुणे आकाशवाणीवर एके काळी ह्या गृहस्थांची एक मालिका चालू होती. त्यात ते स्वतःला आवडलेल्या पुस्तकांविषयी (खरं तर स्वतःविषयीच) बोलायचे. ते कहर होतं. म्हणजे सकाळी सकाळी करमणूक करून घेण्यासाठी चांगलं होतं, पण त्यांच्याविषयी आदर वगैरे वाटू लागावा असं अजिबातच नव्हतं. आकाशवाणीकडे जाऊन विचारणा करा. कदाचित त्याचं ध्वनिमुद्रण उपलब्ध असेल.

मी Tue, 09/07/2013 - 12:29

In reply to by चिंतातुर जंतू

'झेन अ‍ॅन्ड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स'. एकदा रेडिओवर अविनाश धर्माधिकारी नावाच्या तथाकथित हुशार माणसानं काप्रा आणि 'झेन...'बद्दल जे तारे तोडले होते ते ऐकून मी ही पुस्तकं आणि धर्माधिकारी दोघांनाही कायमचं वाळीत टाकलं.

जॉर्ज स्टाइनरचं झेनचं परिक्षण झेनबद्दल वाचण्याबद्दल प्रवृत्त करु शकेल. ५००+ पानांचं झेन बर्‍याचदा कंटाळवाणं होतं, पण कुणाला काय आवडेल काय सांगावं. जेवढं समजलं तेवढं आवडलं असं सांगु इच्छितो. धर्माधिकार्‍यांचा एक लेख धडा म्हणून १०वीला(९?) होता, तो बरा होता असं आठवतं आहे, बाकी रेडिओवरचा त्यांचा कार्यक्रम कधी ऐकला नाही.

उपाशी बोका Mon, 01/07/2013 - 08:09

When Gadgets Betray Us: The Dark Side of Our Infatuation With New Technologies
अजून पूर्ण झाले नाही, पण रोचक वाटले.

बॅटमॅन Wed, 03/07/2013 - 16:29

"दिवस असे होते" हे वि.द. घाट्यांचे अप्रतिम आत्मचरित्र (प्रथमावृत्ती १९६१) पुन्हा एकदा वाचले. मराठीतल्या मला सर्वांत आवडलेल्या पुस्तकांपैकी एक. पगडींचे जीवनसेतू अन घाट्यांचे दिवस असे होते ही दोन पुस्तके हातात घेतली की फक्त आणि फक्त त्यांत हरवून जायला होते. घाट्यांची शैली फार फार भावस्पर्शी आहे. आपल्या जवळच्या नातलगांबद्दल आणि इष्टमित्रांबद्दल अशा आत्मीयतेने लिहिले आहे की वाचतच रहावेसे वाटते. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे कवी चंद्रशेखर गोर्‍हे(कवी दत्तांचे परममित्र), कवी दत्त(वडील), बया (आजी), नानी (आई), वत्सला(बायको), माधव ज्यूलियन, अशा कितीक व्यक्तींची नावे घेतली तरि ती थोडीच आहेत.

हे सगळे असूनच्या असून अजूनही चिक्कार मालमसाला भरला आहे.त्याचे रफलि ४ भाग करता येतील.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची माहिती, लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया अन मते आणि एकूणच मराठा समाजावरचे भाष्य रोचक अन तटस्थ आहे, मुख्य म्हणजे कुठेही अस्थानी अन अश्लाघ्य टीका नाहीये. [कोल्हापुरात शाहूमहाराजांनी खास मराठा तरुणांसाठी क्षात्र वैदिक पाठशाळा चालवली होती ही खत्रा माहिती मला तिथूनच पहिल्यांदा कळाली. घाट्यांचे लग्न याच पाठशाळेतून तयार झालेल्या एका तरुणाने लावून दिले होते.] भारतभरच्या समाजस्थितीचा आढावा घेऊन अँटी-ब्राह्मण भावना दक्षिणेतच का रुजली अन महाराष्ट्रात त्याला एक वेगळे विखारी रूप कसे आले त्याचा आढावा अतिशय समुचित पद्धतीने घेतला आहे. त्या निमित्ताने शाहूमहाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, इ. ची जवळून ओळख होते. लेखकाने कर्मवीरांसमवेत काही काळ घालवला असल्याने रयत शिक्षण संस्थेचे वर्णन उत्तम उतरले आहे. शाहूमहाराज, सयाजीराव गायकवाड अन माधवमहाराज शिंदे यांची व्यक्तित्वेही चांगली अभ्यासिली आहेत-विशेषतः मराठा संघटनासंदर्भात. जुन्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम असल्याचे जाणवते. जुने जाऊन नवे आले, येणारच. त्याची खंत त्यांना वाटत नाही, पण जुन्याची आठवण ते काढतात बाकी छानच, उदा. "तेव्हाची ती जुनी पिढी मला फार आवडते. पाने काटकोनात असली तरी मने सरळ रेषेत असत."

महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांवरही त्यांनी बरेच लिहिले आहे. त्यांची बरीच वर्षे गुजरात अन माळव्यात गेली. लहानपण बरेच गुजरातेत अन तारुण्य बरेचसे इंदूर अन ग्वाल्हेरात गेल्याने साहजिकच त्यांचे याबद्दलचे विचार रोचक अन मोकळे आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांनी मराठी टिकवावी, पण संख्येने फार कमी असले आजूबाजूच्या लोकांपेक्षा तर स्वतःच्या वेगळेपणाचा अट्टाहास धरू नये असे मत मला रोचक वाटले. १९३०-४० च्या सुमारास ते बिहार आणि दक्षिणेत तमिळनाडू येथे गेले असता तेथील मराठी लोकांशी झालेली संभाषणेही रोचक आहेत. पण सर्वांत उत्तम जमलेला भाग म्हंजे इंदूर अन ग्वाल्हेरातील जीवनाचा. त्याबद्दल किती लिहावे ते कमीच! इंदूरच्या होळकर कॉलेजातील जीवनाचेही वर्णन अत्त्युत्तम उतरले आहे. टेनिस कोर्ट न ओलांडण्याची शिस्त, कमीतकमी सात पोळ्या तरी खाल्ल्याच पाहिजेत असा अलिखित दंडक, कडक पण प्रेमळ असा इंग्रज सर अँड्र्यूज, तिथले सवंगडी कुलकर्णी, बारपुते, इ. लोकांची चित्रेही बहारीची उतरली आहेत. ग्वाल्हेरीस तुपात तळलेले पराठे आणि मटन चापल्यावर नंतर डाराडूर झोपी जाणारे, अगणित जिलेब्या अन रबडी फस्त करणारे, भांग पिऊन लग्नाच्या पंगतीत श्लोकाची एक ओळच चारदा म्हणणारे आणि आवडत्या नायकिणीकडे जाऊन आले की वाटेत देऊळ लागल्यावर थोबाडीत मारून घेणारे, सतराव्या-अठराव्या शतकातील मराठी विसाव्या शतकातही (१९२०-२२) तशीच बोलणारे अन वेषही तसाच करणारे आणि चिरेबंद दगडी वाड्यांत राहणारे लोक वाचता वाचता आपणही त्या ग्वाल्हेरात कधी राहू लागतो ते कळतच नाही.

बी.ए. झाल्यावर घाट्यांनी शिक्षणक्षेत्रात बरीच वर्षे काम केले. मध्यंतरी एक वर्ष इंग्लंडलाही जाऊन आले. शिक्षणक्षेत्रातले त्यांचे विचार रोचक आहेत. डायरेक्ट मेथड म्हंजे काय आणि भारतात तिची कशी वाट लावली गेली याबद्दल ते पोटतिडिकीने लिहितात. "डायरेक्ट मेथडचा अपमृत्यू मुंबैच्या ट्रेनिंग कॉलेजात झाला. दिपोटी कधीमधी शाळातपासणीच्या वेळेला बाहेर काढीत ते तिचे मढे असे." शाळातपासणीच्या वेळेस आलेले अनेक अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. एक शिक्षकी शाळा, मातृभाषेतून शिक्षण कुठपर्यंत द्यावे, इंग्रजीचा आग्रह, शिक्षणाचा दर्जा का अन कसा घसरला, संख्यावाढीबरोबर तो घसरणे अपरिहार्य होते का, असल्यास कुठवर, इ. मुद्द्यांना स्पर्श करून आपल्यापुरते एक मत ते ठामपणे मांडतात. अत्र्यांसोबत त्यांनी लिहिलेली इतिहासाची क्रमिक पुस्तके अन त्यांच्या वेळची एरंडेली कविता यांतील विरोधाभासही मस्त उकलून सांगितला आहे. ते सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

रविकिरण मंडळीचा उगम कसा झाला, त्याचे संस्थापक जोडपे नाना अन जिजी, माधवराव पटवर्धन, त्यांच्या त्या सहली, ते प्रेमविवाह, माधव ज्यूलियनांचे कौटुंबिक जीवन अन त्यांना वरदा नायडू प्रकरणात झालेला त्रास, शिवाय कवी दत्तांचे मित्र कवी चंद्रशेखर गोर्‍हे यांच्याबद्दलचे प्रकरण तर प्रेमाने नुसते भरले आहे. तेही मुळातूनच वाचायला हवे. {तरी तत्कालीन कवींच्या कविता अन त्यांचे जीवन यांतील विरोधाभासावर "कसले वल्लभ आणि कसले रमण!!त्या आठाठ दिवसाच्या दाढ्या, ते खर्जातले चिरकणे अन त्या शेंड्या! साराच मामला अशुढ्ढाळ!" अशी तिरकी कमेंटही केलेली आहेच मधून ;) }

एकुणात, फालतू अभिनिवेशरहित, भावनासंपृक्त पण भावनाबंबाळ नसलेली निखळ आत्मीयता म्हणजे काय असते याचे प्रत्यंतर म्हणजे हे पुस्तक वाचून येते. अनेक विषयांची चर्चाही ओघाने येतेच. बुद्धि-भावना या दोहोंचा संगम लेखकाने खूप सुंदररीत्या साधला आहे असे हे पुस्तक वाचल्यावर जाणवत राहते. अ मस्ट रीड-बाकी काही नसले तरी साधारण इ.स. १९००-१९५० पर्यंतच्या मराठी समाजाची अन महाराष्ट्राची ओळख करून घ्यायची असेल तरी हे वाचल्यास हरकत नाही.

पुनःप्रत्ययाचा अनंद देणारी काही एकदम मोजकी पुस्तके असतात त्यांत या पुस्तकाचा नंबर माझ्यापुरता तरी किमान फार वरती लागेल. परिचय फार लांबला, शिवाय काही अजून मुद्दे राहिले, पण म्हटले एकदा लिहून टाकावे. असो. :)

ऋषिकेश Thu, 04/07/2013 - 11:05

In reply to by बॅटमॅन

परिचय फार लांबला, शिवाय काही अजून मुद्दे राहिले, पण म्हटले एकदा लिहून टाकावे. असो

नका हो असे मुद्दे सोडू.. लिहा लिहा!!

बाकी पुस्तक नक्की वाचावे अशी खुणगाठ बांधली आहे.

सागर Wed, 10/07/2013 - 20:06

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन भाऊ

या पुस्तकातील काही भाग माझ्या शालेय जीवनात आमच्या वर्गशिक्षकांनी सांगितल्याचे मला चांगले आठवते आहे. आणि प्रेरणा कशी घ्यावी हेही त्यावेळी त्यांनी आम्हाला त्यातील प्रसंगांतून सांगितले होते. पण हे पुस्तक मात्र मी वाचले नव्हते. तुझा परिचय वाचल्यानंतर लगेच हे पुस्तक मागवले आहे.
एका सुंदर पुस्तकाची तितकीच सुंदर ओळख (आणि आठवणही) करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सागर Thu, 11/07/2013 - 13:17

In reply to by ऋषिकेश

बुकगंगावर आहे रे ऋ. हा घे दुवा : http://www.bookganga.com/eBooks/Book/5106863444016852627.htm

सध्या तरी आऊट ऑफ स्टॉक दिसते आहे. मी त्यांना ईमेल केली आहे. मी सहसा त्यांना ईमेलवरच माझी ऑर्डर कळवतो.
पण मला अजून त्यांचे कन्फर्मेशन नाही मिळाले. (उपलब्ध झाले की तुलाही सांगतो)
ऑर्डर देताना आऊट ऑफ स्टॉक आहे हे पाहिले नव्हते. :(

............सा… Wed, 03/07/2013 - 22:49

"moon is always female" हे "marge piercy" चे कवितांचे पुस्तक वाचते आहे. लक्ककन चमकून मनाचा वेध घेणार्‍या काही उपमा आवडल्याच पण अनेक कवितांतून तिने केलेले भाष्य आवडले. माझे वैयक्तिक मत म्हणाल तर मला स्वतःचे असे ठाम मत असलेल्या व्यक्ती खूप आवडतात. ती चटकन आवडून गेली. एका कवितेत तिने "झिरो फिगर च्या अट्टाहासाविरुद्ध" मांडलेले मत आवडले, गर्भपाताच्या विरोधाला विरोध करणारे एक कविता आवडली. एक कविता पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल आहे. एकंदर मत मांडायला, व स्टँड घ्यायला न कचरणारे व स्त्रीमुक्तीवादी असे तिचे साहीत्य बरेच आवडते आहे असे लक्षात आले.

बॅटमॅन Thu, 04/07/2013 - 12:08

In reply to by ............सा…

मला स्वतःचे असे ठाम मत असलेल्या व्यक्ती खूप आवडतात.

मलाही! आहिताग्नींसारखे सामाजिक बाबतींत अत्यंत प्रतिगामी लोकही त्यांच्या ठामपणामुळे आणि अर्थातच विद्वत्तेमुळे आवडतात.

उसंत सखू Tue, 09/07/2013 - 09:29

द गिफ्ट ऑफ रेन ( लेखक तान त्वान एंग ) या कादंबरीत फिलीप्स आर्मेनियस खू हटन हा ब्रिटीश बाप आणि चीनी आई
असलेला तरुण आणि त्याचा जपानी गुरु हयातो एन्डो यांची अफलातून कथा आहे .
दुसर्या महायुद्धाच्या काळात पेनांग या बेटावर मलाया , चीनी , हिंदी आणि ब्रिटीश अशा मिश्र वातावरणात वाढलेला फिलिप्स
हा एकलकोंडा तरुण, आयकीडो ही मार्शल आर्ट जपानी गुरुकडून शिकतो . दुसऱ्या महायुद्धात जपानचे पेनांग बेट
ब्रिटीश लोकांकडून जिंकून ताब्यात घेणे आणि नंतर हिंसा , क्रौर्य संशय , फितुरी यांची थैमान !
अमेझिंग फिलोसोफी आणि निसर्गवर्णने वाचून एका वेगळ्याच अदभूत विश्वात गेल्यासारखे वाटते .
समुद्र , पाऊस आणि काजवे अशी काही विलोभनीय वर्णने मंत्रमुग्ध करतात .
त्यांचे गुरु शिष्य नाते विलक्षण जगावेगळे असते . ( गे नव्हे .) त्यांच्या शेवटच्या भेटीच्या वेळी फिलिप्स म्हणतो .
मला त्यांचा प्रत्येक स्पर्श , प्रत्येक गंध साठवून घ्यायचा होता . मी प्रयत्न केला , पण फार कठीण होत ते . त्यांच्या गंधाने मी माझी
छाती भरली .त्यांचा स्पर्श साठवण्यासाठी मी माझ्या त्वचेची सर्व रंध्रे उघडली ; पण सर्व व्यर्थ होत !
माझ्या अंगावर काटा आला आणि हे अनेकदा वाचले आणि याची कल्पना करून पाहिली . यात अंतिम निरोपाची भावना व्याकूळ करते .

उसंत सखू Tue, 09/07/2013 - 09:31

द गिफ्ट ऑफ रेन ( लेखक तान त्वान एंग ) या कादंबरीत फिलीप्स आर्मेनियस खू हटन हा ब्रिटीश बाप आणि चीनी आई
असलेला तरुण आणि त्याचा जपानी गुरु हयातो एन्डो यांची अफलातून कथा आहे .
दुसर्या महायुद्धाच्या काळात पेनांग या बेटावर मलाया , चीनी , हिंदी आणि ब्रिटीश अशा मिश्र वातावरणात वाढलेला फिलिप्स
हा एकलकोंडा तरुण, आयकीडो ही मार्शल आर्ट जपानी गुरुकडून शिकतो . दुसऱ्या महायुद्धात जपानचे पेनांग बेट
ब्रिटीश लोकांकडून जिंकून ताब्यात घेणे आणि नंतर हिंसा , क्रौर्य संशय , फितुरी यांची थैमान !
अमेझिंग फिलोसोफी आणि निसर्गवर्णने वाचून एका वेगळ्याच अदभूत विश्वात गेल्यासारखे वाटते .
समुद्र , पाऊस आणि काजवे अशी काही विलोभनीय वर्णने मंत्रमुग्ध करतात .
त्यांचे गुरु शिष्य नाते विलक्षण जगावेगळे असते . ( गे नव्हे .) त्यांच्या शेवटच्या भेटीच्या वेळी फिलिप्स म्हणतो .
मला त्यांचा प्रत्येक स्पर्श , प्रत्येक गंध साठवून घ्यायचा होता . मी प्रयत्न केला , पण फार कठीण होत ते . त्यांच्या गंधाने मी माझी
छाती भरली .त्यांचा स्पर्श साठवण्यासाठी मी माझ्या त्वचेची सर्व रंध्रे उघडली ; पण सर्व व्यर्थ होत !
माझ्या अंगावर काटा आला आणि हे अनेकदा वाचले आणि याची कल्पना करून पाहिली . यात अंतिम निरोपाची भावना व्याकूळ करते .

जुई Tue, 09/07/2013 - 17:23

काळा सूर्य आणि ह्याट घातलेली बाई हे अनेक वर्ष वाचायचे राहून गेलेले पुस्तक अखेरीस वाचून झाले .
पुस्तकं तुमची वेळ आल्याशिवाय भेटत नाहीत यावर परत एकदा विश्वास बसला .

काळा सूर्य हे विलक्षण झपाटून टाकणारे लिखाण आहे . त्यातले प्रतिमा , जग , एक एक व्यक्तिरेखा.... गूढ अदभूत आहे सगळं .
काळ्या रंगासारखे आकर्षक , वेगळे . अफाट सुंदर तरीही दूर ठेवणारे, घाबरवणारे , रहस्य पोटी वागवणारे . स्वतःचा एक असा अवकाश घट्ट मिटून घेतलेले .
अंधार काळ्या पोकळीचे लिखाण आहे .

आनंद देणारे लिखाण खूप मिळते . हे लिखाण ही आनंद देते , त्याबरोबर देते सैरभैरत्व .
ग्रेसच्या कवितेची, जी . ए . कुलकर्णींच्या कथांची आठवण होते .

व्याकूळ करतो या नायिकेचा अंत .
मीरा ही नायिका . तिचे अजब अजब विचार , वेगळं बालपण , पापाचं आकर्षण , परमेश्वराला नाकारणं . तिचं कुटुंबियांशी असलेलं नातं . तिचा प्रेमभंग . तिच्या आईचा गूढ
मृत्यू , वाळीत टाकलं जाणं . , तिची बंडखोरी सगळ्याचं मानवजातीच्या दु:खाला समूळ हात घालणं सुरुंग लावून उडवणं . वरवरच्या निर्लज्ज पणा आत जपलेला कोवळा गाभा .…

काय आणि कसं लिहायचं या पुस्तकावर किंवा कदाचित लिहायचच नाही.
काळा सूर्य एखाद्या काळ्या गर्तेत आपल्याला ओढून घेऊन जातं . त्याचं आपल्याला अजब आकर्षण वाटतं .
काही काही जागा आपल्याला मोहून घेतात आणि त्यांची भीती पण वाटते. तसं काहीसं फिलिंग हे काळा सूर्य वाचताना वाचताना येतं .

हे पुस्तक खूप वर्षं मनात राहणार आणि खूप काळ बांधून ठेवणार .
~ जुई
http://www.bookganga.com/eBooks/Book/4985002011923544378.htm?Book=Kala-…

राजेश घासकडवी Sat, 06/07/2013 - 04:44

In reply to by जुई

काहीशा धूसर गूढ गर्तेत वाकून पाहून केवळ निःशब्द भीती व्यक्त करण्यासारखं हे लेखन झालेलं आहे.

काय आणि कसं लिहायचं या पुस्तकावर किंवा कदाचित लिहायचच नाही.

ही भावनाच फक्त व्यक्त झालेली दिसते. म्हणून मला वाटतं वरचं लिखाण स्वतंत्र समीक्षा होण्याऐवजी 'सध्या काय वाचलंत?' या लेखावर प्रतिसाद म्हणून अधिक शोभून दिसेल.

रोचना Thu, 18/07/2013 - 11:53

७०च्या दशकात पेर वेहलू आणि मॅय स्योवॉल या जोडप्याने स्वीडिश भाषेत "पोलीस प्रोसीजरल" ज्याला म्हणतात त्या शैलीतीदहा गूढकथा लिहील्या. त्यात केंद्रस्थानी मार्टिन बेक नावाचा पोलीस अधिकारी आहे. अतिशय मोजक्या शब्दांत, थोड्याशा तिरसटच म्हणा, शैलीत लिहीलेली ही अप्रतिम मालिका आहे. तिच्यामुळे स्वीडन मध्ये वास्तववादी, पोलीसकामावर आधारित गूढकथांची एक लाटच आली - अलिकडचे हेनिंग मँकेल वगैरे.

वेहलू-स्योवाल दोघेही मार्क्सवादी होते, आणि अशा वास्तववादी लेखनाद्वारे आधुनिक, युद्धोत्तर स्वीडिश समाजातील विषमतेवर, राजकीय-सामाजिक विषयांवर त्यांनी चर्चा करू पाहिली. पण हा राजकीय दृष्टीकोन पडद्याआडच राहतो, कथा-पात्र रोमांचकारक आणि सुरेख बांधलेले आहेत.

मी या मालिकेतली तीनच पुस्तकं वाचली होती, कालच एका स्नेहीने मला अजून तीन वाचायला दिली. पुढचे काही दिवस चांगले जाणार आहेत...

रोचना Thu, 18/07/2013 - 14:20

In reply to by मेघना भुस्कुटे

मी सध्या वाचतेय त्याचं नाव "द अबॉमिनेबल मॅन". "मॅन ऑन द बालकनी", "रोजॅना", "द लाफिंग पोलीसमन" "कॉप किलर", "मॅन हू वेंट अप इन स्मोक"... फ्लिपकार्ट वर सगळे उपलब्ध आहेत. लेखकांची नावं Maj Sjowall & Per Wahloo.

ॲमी Sun, 21/07/2013 - 10:39

In reply to by रोचना

ही लेखकजोडी माहीत नव्हती. प्लॉट ठरवल्यानंतर एकाआडएक चाप्टर लिहायचे म्हणे दोघं. रोजॅना वाचलं. रोचक आहे. मलातरी लेखनशैलीतला फरक जाणवला नाही.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 12:23

मायकेल वुडचे इन सर्च ऑफ ट्रोजन वॉर नुकतेच वाचून झाले. लहानसेच पुस्तक आहे, २१९ पानांचे-पण सारांशरूपाने फार रोचकपणे सर्व काही मांडलेय.

१. प्राचीन ग्रीक काळापासून ट्रोजन कथेबद्दल लोकांचे मत-त्याचे पुरावे-ट्रॉयच्या जागेवर नंतरही अखंडपणे होत असलेली वसाहत.
२. हाइनरिख श्लीमन, विलियम डोर्पफेल्ड, कार्ल ब्लेगन, आर्थुर ईव्हान्स या अनुक्रमे ट्रॉय, पायलॉस अन क्नॉसॉस येथील महान उत्खननकर्त्यांचे सांगोपांग कथन.
३. मायसीनिअन काळाचे चित्रण-ट्रॉयच्या भिन्न भिन्न लेव्हल्स, कुठले ट्रॉय हे होमेरिक ट्रॉय होते, मायसीनी, ट्रॉय, क्रीट, इ. ठिकाणचे अजून अवशेष, इ.इ.
४. लिनिअर बी टॅब्लेट्स, हिटाईट आर्काईव्ह्ज आणि इजिप्शियन शिलालेख यांमधून समकालीन खंडीभर लिखित पुरावे सापडले- त्यांचे विवेचन.
५. होमर कोण होता? कॅटॅलॉग ऑफ शिप्समधील निम्मी ठिकाणे तरी अस्सल ब्राँझयुगीन ग्रीसमधील असून त्याने वर्णिल्याप्रमाणेच गुणधर्म आहेत.
६. ट्रोजन युद्धाची साधारण तारीख कुठली आणि कशी ठरवली?
७. ट्रोजन युद्धाशी संबंधित कुणाचे नाव लिहिलेले सापडते का? (होय, दोघांचे सापडते) अजून काही डीटेल्स-विशेषतः पायलॉसच्या उत्खननातले.

असे असंख्य मुद्दे चर्चिले आहेत. यात रस असणार्‍यांचा वन स्टॉप रेफरन्स म्हणून हे पुस्तक नक्की कामाला येऊ शकेल. अतिशय काँप्रिहेन्सिव्ह आहे. हे पुस्तक लिबजेन.ऑर्ग वर उपलब्ध आहे.

विसुनाना Thu, 18/07/2013 - 13:20

राजेश घासकडवींनी एका प्रतिसादात केलेल्या उल्लेखावरून 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची'(लेखक - श्री. नंदा खरे) ही दोन्ही पुस्तके मागवून वाचली.
म्हटले तर उपहासात्मक कादंबर्‍या, म्हटले तर ऐतिहासिक सामान्य माणसाच्या दृष्टीने पेशवाईच्या काळच्या वर्तमानाचे (म्हणजे आजच्या इतिहासाचे) विश्लेषण.

त्या काळातल्या एका सामान्य माणसाने केलेले खरेच प्रवास वर्णन अस्तित्वात आहे.(माझा प्रवास · गोडसे भटजी). वेळोवेळी शासकांनी लिहवून घेतलेल्या बखरीही अस्तित्त्वात आहेत. पण 'अंताजी खरे' यांच्या या (सध्याच्या काळात बनवलेल्या काल्पनिक) बखरी हा त्यावेगळाच और प्रकार आहे.
कुठेकुठे गॉसिप्/अंतस्थ गोष्टींचा आणि कुठे किंवदंतींचा वापर असल्याने निखळ ऐतिहासिक महत्त्व फारसे नाही. (अर्थात, इतर 'वैभवशाली इतिहास' वगैरे साक्षीला ठेवून लिहिलेल्या 'गंभीर' कादंबर्‍याही त्या दृष्टीने फार महत्त्वाच्या नसतातच.) पण नंदा खरेंनी तळटीपांमधे अनेक घटनांचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने त्या केवळ पोकळ गफ्फाही नाहीत हे स्पष्ट होते.
एक वेगळा दृष्टीकोन ठेवून केलेली रचना (हो , रचनाच) या दृष्टीने या दोन्ही कादंबर्‍यांचे (किंवा एका कादंबरीच्या दोन भागांचे) महत्त्व आहे. मराठी वाङ्मयात असे प्रयोग मला तरी माहीत नाहीत.(असल्यास सांगावे.)

या दोन कादंबर्‍यांच्या प्रत्यक्ष लेखनकालात वीस वर्षांचे अंतर असल्याने आणि कादंबर्‍यांच्या कथानकातही तेवढेच कालांतर असल्याने कादंबरीचा प्रथम पुरुषी निवेदक / नायक स्वाभाविकपणे पोक्त/वैचारीकदृष्ट्या प्रगल्भ होताना दिसतो. हेही दोन्ही कादंबर्‍या एकत्र वाचताना जाणवते.
'नचिं केळकर प्रभृतींनी मराठी राज्याच्या र्‍हासाची केलेली कारणमिमांसा गोंधळलेली आहे' आणि 'राजा आणि सामान्य जनता - कष्टकरी समाज यांच्यात कोणताच दुवा न उरल्याने मराठी राज्याचा - किंबहुना एतद्देशीय सर्वच राजसत्तांचा र्‍हास झाला' अशी दोन महत्त्वाची विधाने नंदा खरे अंतकाळाच्या बखरीच्या परिशिष्टात करतात. स्वतंत्रपणे हा लेख कादंबरी इतकाच किंवा जास्तच महत्त्वाचा मानता येईल.

श्री. नंदा खरे यांच्या या दोन (इतर ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या मानाने)छोटेखानीच कादंबर्‍या - एकदा तरी जरूर वाचाव्या अशा आहेत.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 13:51

In reply to by विसुनाना

नचिं केळकर प्रभृतींनी मराठी राज्याच्या र्‍हासाची केलेली कारणमिमांसा गोंधळलेली आहे' आणि 'राजा आणि सामान्य जनता - कष्टकरी समाज यांच्यात कोणताच दुवा न उरल्याने मराठी राज्याचा - किंबहुना एतद्देशीय सर्वच राजसत्तांचा र्‍हास झाला' अशी दोन महत्त्वाची विधाने नंदा खरे अंतकाळाच्या बखरीच्या परिशिष्टात करतात. स्वतंत्रपणे हा लेख कादंबरी इतकाच किंवा जास्तच महत्त्वाचा मानता येईल.

हे रोचक आहे. यद्यपि लेखकाइतका किंवा त्याच्या दशांशानेही वाचन नसले तरी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो.

'राजा आणि सामान्य जनता - कष्टकरी समाज यांच्यात कोणताच दुवा न उरल्याने मराठी राज्याचा - किंबहुना एतद्देशीय सर्वच राजसत्तांचा र्‍हास झाला'

हे फारच सरसकटीकरण आहे असे वाटते. बाकी सोडा, पण अठराव्या शतकाच्या सुरुवातीस काय किंवा शेवटी काय, कुठल्या एतद्देशीय राजसत्तेत राजा आणि प्रजाजन यांच्या परस्परसंबंधांत लक्षणीय असा फरक पडला की ज्यायोगे एकदम र्‍हास झाला? जिथे जिथे भगदाड दिसेल तिथे तिथे धूर्तपणे घुसून ओसरीवरून वाड्याचा कबजा घेणे हे काम ब्रिटिशांनी फार चतुराईने केले. कमकुवत राजा हे कारण काही ठिकाणी होतेच, पण ब्रिटिशांचे चातुर्य/लबाडी इ.इ. इथे विचारात घेतल्या गेले नाही असे दिसते. तस्मात लेखकाने टाळीचा हा दुसरा हात अज्जीच दुर्लक्षिला आहे असे म्हणावे लागते.

(मी अंताजीची बखर वाचलेली आहे. बखर अंतकाळची नाही वाचली.)

विसुनाना Thu, 18/07/2013 - 14:18

In reply to by बॅटमॅन

चातुर्य/लबाडी + सुसज्ज सैन्य या दोन्ही बाबतीत मराठे (निदान बराच काळ) युरोपियनांच्या/इंग्रजांच्या समतुल्य होते असे लेखकाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही इंग्रजांनी २२-२३ वर्षात (कार्ले-वडगाव १७७९ ते असाई १८०३)मराठ्यांना हरवण्याइतके सामर्थ्य प्राप्त केले. याचे मूळ कारण जनतेला राज्यकर्त्यांविषयी नसलेली आस्था हे आहे असे आग्रही प्रतिपादन (त्यातल्या जातीय समाजकारणासह) नंदा खरे यांनी बखर अंतकाळाचीमध्ये केलेले आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 18/07/2013 - 14:20

In reply to by विसुनाना

सहमत. त्यांच्याच 'कहाणी मानवप्राण्याची' या पुस्तकात त्यांनी कोणते समाज प्रगती करतात / इतर समाजांवर कुरघोडी करतात याचा एक लेखाजोखा मांडला आहे, तो या संदर्भात वाचण्यासारखा आहे. समाजाची भौतिक प्रगती जितकी महत्त्वाची ठरते, तितकेच त्याचे एकसंध असणेही कळीचे असते असे ते प्रतिपादन. दीर्घकालीन फायदे तोटे पाहता या दोहोंपैकी कुठलेच एक कारण कमी वा जास्त महत्त्वाचे असत नाही.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 14:25

In reply to by विसुनाना

सुसज्ज सैन्यात मराठे बराच काळपर्यंत समतुल्य होते हे तर असईच्या लढाईने सिद्धच होते- संशय नाहीच. रँडॉल्फ कूपर या इतिहासकाराने एक पुस्तकच लिहिलेय त्या मोहिमेबद्दल. त्यात मराठी सैन्याचे अतिशय डीटेल्ड अन रोचक वर्णन आहे.

चातुर्य/लबाडी: याबद्दल शेजवलकरांनी एक फार रोचक मुद्दा मांडला आहे. वैयक्तिक धूर्ततेत पौर्वात्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही हे खुद्द इंग्रजांनीही कबूल केले होते. पण आपल्या राष्ट्राला उपकारक असे काही करण्यात मराठे अन अन्य राजे कमी पडले असे ते म्हणतात. हे मला जास्त ग्राह्य वाटते.

बाकी तुम्ही म्हणताहात त्याबद्दलही साशंक आहेच-म्हणजे आस्था वाटत नसेल तर नेमका त्याच वेळेस का म्हणून उद्रेक व्हावा इ.इ.

पण असो. आता बखर अंतकाळची वाचतो अन मग यावर पुन्हा मतप्रदर्शन करतो.

विसुनाना Thu, 18/07/2013 - 15:42

In reply to by बॅटमॅन

नेमका त्याच वेळेस का म्हणून उद्रेक व्हावा>>>>
हे जे फाटणे आहे ते हळूहळू झाले ... उद्रेक असा एकदमच झाला नाही.

आता बखर अंतकाळची वाचतो >>>
जरूर.

रोचना Thu, 18/07/2013 - 14:32

In reply to by विसुनाना

'अंताजी खरे' यांच्या या (सध्याच्या काळात बनवलेल्या काल्पनिक) बखरी हा त्यावेगळाच और प्रकार आहे.
....
एक वेगळा दृष्टीकोन ठेवून केलेली रचना (हो , रचनाच) या दृष्टीने या दोन्ही कादंबर्‍यांचे (किंवा एका कादंबरीच्या दोन भागांचे) महत्त्व आहे. मराठी वाङ्मयात असे प्रयोग मला तरी माहीत नाहीत.(असल्यास सांगावे.)

१००% सहमत. अंतकाळाची बखर चांगली आहेच, पण अंताजीची बखर खरोखर ग्रेट आहे. रचना म्हणून, नेमकी पात्र-रेखाटणी, रोमांचक कथानक, स्थळ-कळाला पानावर, वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत उभे करणे - कितीदा वाचली तरी कंटाळा येत नाही. उघड-उघड काही मुद्दे न मांडता मराठा, बंगालचे नवाब, आणि कंपनी राज्यांचे सूक्ष्म विश्लेषण मला सर्वात जास्त आवडले. क्लाइव्हकडे आदराने पाहणार्‍या अंताजी ला शेवटी कंपनी सरकारच्या सत्तालोभाची कल्पना कशी येते, हे फारच नाजुकपणे दाखवले आहे. आपल्याला वाटले त्याहून हा प्राणी वेगळाच आहे याची अनेक एतद्देशीय मुत्सद्द्यांना (उशीरा) झालेल्या जाणीवेला खर्‍यांनी नेमके पकडले आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 18/07/2013 - 17:43

In reply to by रोचना

एक वेगळा दृष्टीकोन ठेवून केलेली रचना (हो , रचनाच) या दृष्टीने या दोन्ही कादंबर्‍यांचे (किंवा एका कादंबरीच्या दोन भागांचे) महत्त्व आहे. मराठी वाङ्मयात असे प्रयोग मला तरी माहीत नाहीत.(असल्यास सांगावे.)

अगदी अगदी सहमत!

खर्‍यांच्याच 'नांगरल्यावीण भुई'मधे असाच एक और प्रयोग वाचायला मिळाला. ट्युरिंग त्याच्या शोधादरम्यान भारतात असता नि हे सगळे काम भारतात झाले असते, तर काय झाले असते अशी ती कल्पना नि तिला धरून खास खरे शैलीत केलेली सामाजिक निरीक्षणे. (मस्त कलंदरने प्रभाकर नानावटी यांनी पुस्तकविश्ववर याचा परिचय करून दिला आहे. कुणाला सहज मिळाल्यास दुवा द्या प्लीज.)

कविता महाजन Sun, 21/07/2013 - 19:22

मी सध्या 'दिल्ली'विषयीची पुस्तकं वाचतेय.
पहिलं अर्थातच मराठीतलं वाचलं : राजधानीतून; अशोक जैन; राजहंस प्रकाशन.
दोन भागांत विभागलेलं हे पुस्तक आता पुन्हा संग्रही घेऊन ठेवावं असं वाटलं. जैनांची भाषा गोष्टीवेल्हाळ आहे. त्यांच्याकडे किश्शांचा अमाप खजिना आहे. किस्से सांगताना दिलेली मिस्कील डूब मजा आणते. ( एका किरकोळ देहयष्टीच्या मंत्र्यांविषयी लिहिताना त्यांनी गजानन वाटवेंशी तुलना केली आणि पुढे म्हटले की हे मंत्री आता केव्हाही भावगीत गाऊ लागतील असे वाटे.) त्यांनी लिहिलेली वार्तापत्रं धमाल निर्भीड आहेत. आज इतक्या वर्षांनंतर हे पुस्तक वाचताना जाम मजा येते; कारण तेव्हाच्या नवख्या नेत्यांविषयीची भाष्ये आज चकित करतात. उदा. ममता बॅनर्जी किंवा शरद पवार किंवा सुशीलकुमार शिंदे. खेरीज काही निरीक्षणे त्रिकालाबाधित सत्य असावे तशी वाटतात. उदा. कलमाडी.
एखादा नेता दोन पत्रकारांना मुलाखत देताना ( पैकी एक अर्थात जैन ) एकाच्या मांडीवर डोके व दुसर्‍या मांडीवर पाय ठेऊन निजतो आणि केसाळ ढेरपोट खाजवत उत्तरे देतो, हे तर कल्पनातीत.
हिंदीत किस्सा हा एक वाड्मयप्रकार मानला जातो आणि किस्से स्वतंत्र लिहिले जातात, तसे मराठीत अद्याप घडलेले नाही. असते तर जैनांकडे लेखक म्हणून समीक्षकांनाही पहावे लागले असते आणि राजकीय विषय मराठी ललित साहित्यात कुणी फारसे हाताळत नाहीत ही तक्रारही राहिली नसती; हे अवांतर.

दुसरं पुस्तक खुशवंतसिंगांचं दिल्ली. ते इंग्लीशमध्ये आहे. त्याविषयी अधिक काय सांगावे? ते खुशवंतसिंगांचे आहे हेच पुरेसे.

तिसरं पुस्तक : दिल्ली दरवाजा; ज्ञानप्रकाश विवेक; वाणी प्रकाशन.
ही एक हिंदी कादंबरी आहे. एका शहरातली अनेक शहरं त्यात दिसतात. दिल्लीची अनेक जुनी-नवी व बदलती रूपं सापडतात. फार खास वाटलं नाही.

चौथं पुस्तक : शहर और सिनेमा वाया दिल्ली; मिहिर पंड्या; वाणी प्रकाशन
पुस्तकात छायाचित्रेही आहेत. पुष्कळ संदर्भ जमवलेले आहेत. 'शहर, सपने और सच' ही लेखकाची भूमिका वाचनीय आहे. अ. उत्तर औपनिवेशिक शहर और सिनेमा, ब. सत्ता का शहर, क. रोजमर्रा का शहर असे तीन विभाग आहेत. मोठी संदर्भ सूची आहे. त्यानंतर पाच जाणकारांबाबत ( शहराचे जाणकार व सिनेमाचे जाणकार ) चर्चा आहे. शेवटी ज्या सिनेमांत दिल्ली दिसते, त्या ६६ सिनेमांविषयी थोडक्यात एकेककरून लिहिले आहे आणि उर्वरीत ४० सिनेमांची यादी दिलेली आहे.
अवांतर : असे एखादे पुस्तक मुंबईविषयीही आले पाहिजे असे वाटले.

पाचवं पुस्तक : जासूसों के खतूत; संपादक : शम्सुल इस्लाम.
हे अत्यंत रोचक पुस्तक आहे. यात हेरांनी पाठवलेली पत्रं आहेत. काळ आहे १८५७. ही पत्रं लेखकाला लाहौर मधील अनारकली बाजारात दर शुक्रवारी फुटपाथवर जो पुस्तकबाजार भरतो, त्यात सापडली. लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत हिंदुस्थानातील सरकारी कागदपत्रं कशी पोचली असतील आणि आजही ती इथे परत का आणली गेली नाहीत, असा सवाल लेखकाने उपस्थित केला आहे. आता हे हेर 'गद्दार' असल्याने त्यांनी इंग्रजांची बाजू घेत केलेले हे लेखन आहे; पण त्यातूनही अनेक गोष्टी समजतातच.
त्यातील 'तुराब अली' या हेराच्या २ सप्टेंबर १८५७ रोजी लिहिलेल्या पत्रातला हा भाग :

मिर्जा मुगल याने आपले प्राण वाचविण्यासाठी मिर्जा इलाही बख्श यांना बोलावणं पाठवलं. तो त्याची समजून घालून त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहाने सांगितलं की त्याला देण्यासाठी पैसे नाही आहेत. पण यानंतर सेनाधिकार्‍यांनी धमकी दिली की ते शाही परिवारातील सगळ्यांची हत्या करून महाल आणि शहर लुटून नेतील. हे ऐकून बादशहा आपल्या सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि आपल्या सिंहासनावरील गादी त्या अधिकार्‍यांसमोर फेकली. बादशहाने आदेश दिला की शाही महालातील सगळ्या बहुमोल चिजा आणि शाही परिवारातील बेगमांचे दागिने यांना देऊन टाकण्यात यावेत. यानंतर तो पश्चिम दिशेकडे पहात रडू लागला आणि म्हणू लागला की त्याला त्याच्या पापकृत्यांची शिक्षा मिळते आहे. जर इंग्रजांनी त्याची हत्या केली असती तर इतका अपमान झाला नसता. बादशहाला असं रडताना पाहून बेगमा आणि उपस्थिती दरबार्‍यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सेनाधिकारी आपली लाचारी आणि गरिबी यांमुळे काही करू शकणार नव्हते, तरी ते हे दृश्य पाहून फार ओशाळले.

अजून काही पुस्तकं आणली आहेत. वाचून होताच त्यांविषयी सांगेन.
या विषयावरील अजून काही पुस्तके कुणाला माहीत असतील तर जरूर सुचवावीत.

मिहिर Tue, 23/07/2013 - 11:35

बऱ्याच ठिकाणी ऐकल्यानंतर शेवटी लायब्रीतून आणून कोसला वाचले. आजकाल अधूनमधून कानावर पडणारी नेमाडेंची मुक्ताफळे ऐकून थोड्या पूर्वग्रहानेच वाचायला सुरुवात केली. सुरुवातीचा भाग बऱ्यापैकी आवडला आणि पुढे पुढे वाचत गेलो. शेवटची दोन प्रकरणे कंटाळवाणी वाटली आणि फार समजली देखील नाहीत. कदाचित पुन्हा वाचून समजतीलही, पण तो भाग परत वाचायची इच्छा आत्ता तरी नाही आहे.

बॅटमॅन Sat, 27/07/2013 - 03:31

आहिताग्नींचे नासदीयसूक्तभाष्य (खंड २रा) पुन्हा एकदा चाळले-थोड्या ठिकाणी डीटेलवारी वाचले.

राधिका Sat, 27/07/2013 - 13:08

डेव्हिड क्रिस्टल या भाषाशास्त्रज्ञाचे हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचले. पुस्तक फार चांगले आहे असे काही मी म्हणणार नाही, पण काही दृष्टींनी बरेच उपयुक्त आहे. विशेषतः

१. भाषाशास्त्रज्ञांचे/भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे आईवडिल/भावंडे/पती/पत्नी यांना आपली/ला बाबी/बाब्या/बहीण/भाऊ/बायको/नवरा नेमकं काय करते/तो ते जाणून घेण्यासाठी आणि
२. होतकरू भाषाशास्त्रज्ञांना या क्षेत्रात काम कसे केले जाते, पुस्तके/निबंध कसे लिहिले आणि प्रकाशित केले जातात हे जाणून घेण्यासाठी

या पुस्तकाचा उपयोग होईल.

परंतु,

या पुस्तकात प्रामुख्याने उपयोजित भाषाशास्त्राबद्दल बोलले गेले आहे. सैद्धांतिक भाषाशास्त्राबद्दल महत्त्वाचे असे काही त्यात बोलले गेलेले नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचून भाषाशास्त्राचा केवळ एकांगी परिचय होतो आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

या पुस्तकातल्या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या:

१. क्रिस्टल यांना या विषयाबद्दल वाटणारी अपार जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेपोटी एखादा प्रश्न धरून त्याचा मागोवा घेण्याची चिकाटी
२. ज्या विषयात कोणीही कधीही काम केलेले नाही अशा विषयात काम करून त्याची पायाबांधणी करतानाचे त्यांचे अनुभव

क्रिस्टल यांनी इंग्रजी भाषा, युकेमध्ये बोलल्या जाणार्‍या इंग्रजीच्या विविध बोलीभाषा, स्पीच थेरपी इ. विषयांवर काम केले आहे.

नगरीनिरंजन Wed, 14/08/2013 - 07:52

Jared Diamond यांचं "Collapse: How Societies Choose To Fail Or Succeed" वाचायला घेतलंय.
आजवर झालेल्या छोट्या-मोठ्या सिव्हिलायझेशन्सचा अभ्यास करून कोसळलेल्या का कोसळल्या आणि टिकलेल्या का टिकल्या यावर विवेचन केले आहे.
सध्या ईस्टर बेटाबद्दल वाचतोयः
I have often asked myself, "What did the Easter islander who cut down the last palm tree say while he was doing it?" Like modern loggers, did he shout, "Jobs, not trees!"? Or: "Technology will solve our problems, never fear, we will find a substitute for wood"? Or: "We don't have proof that there aren't palms somewhere else on Easter, we need more research, your proposed ban on logging is premature and driven by fear-mongering"

ॲमी Thu, 15/08/2013 - 12:22

'ककुज कॉलीँग' वाचलं. छान आहे. पण खर्या लेखीकेच नाव कळालं नसतं, तर स्वतःहुन बेस्टसेलरमधे नसतं गेलं. कथा २००० साल च्या दरम्यान घडते आहे, पण जुन्या पद्धतीने लिहीलीय. अगाथा ख्रीस्टी स्टाईलने. गोल्डन एज ऑफ डिटेक्शनचा प्रभाव जाणवत राहतो. पात्र आणि कथानक पण जुनीच वाटतात. पण कारमॉरन आणि रॉबीन आवडले. त्यांची अजुन पुस्तक वाचायला आवडेल. आणि हो, रॉलीँग तै च्या ड्राय सेन्स ऑफ ह्युमर ने मला २ ३ दा जोरात हसवलंपण.

ऋषिकेश Thu, 22/08/2013 - 17:33

एकच एक लांबलचक वाचायचा कंटाळा आला आहे
जरा चांगले मराठी कथासंग्रह सुचवा पाहु! अट एकचः प्रकाशन २००५ नंतरचे हवे :)

मेघना भुस्कुटे Thu, 22/08/2013 - 17:48

In reply to by ऋषिकेश

अटीत कितपत बसतील आत्ता पडताळून पाहणे कठीण आहे. चूकभूल देणेघेणे.

गुलाबी सरः दी पिंक हेडेड डक - संतोष शिंत्रे.
शांतवन - अंबिका सरकार
मातोश्रीवरील लांबलचक रात्र - विजय तेंडुलकर

ऋषिकेश Fri, 23/08/2013 - 10:11

In reply to by मेघना भुस्कुटे

थोडं इथे तिथे चालेल. जरा समकालीन मराठी कथा वाचाव्या म्हटलं ;)

गुलाबी सर टाकलंय कार्टात.
बाकी दोन फ्लीपकार्ट्याच्या स्टॉकात नैये! :(

अजून १-२ चांगले कथासंग्रह घ्यायचे आहेत. विकत घेण्यायोग्य

रोचना Sun, 25/08/2013 - 00:38

In reply to by ऋषिकेश

सन्जोप रावांनी गुलाबी सिर वर ऐसीवर लेख लिहीला होता - मला काही कथा आवडल्या होत्या, पण संच थोडा अन-ईवन वाटला.

सागर Thu, 22/08/2013 - 18:34

In reply to by ऋषिकेश

ऋ,

खोल खोल पाणी - प्रफुल्ल फडके (छोटेसे पुस्तक आहे पण कथा छान आहेत)

बुकगंगावर येथे झलक पाहून तू हे पुस्तक तुझ्या टेस्ट चे आहे की नाही हे ठरवू शकतोस... मला आवडले होते. तुलाही आवडेल अशी आशा आहे.

जास्त भावपूर्ण कथा आवडत असतील तर मनाच्या खोल तळातून हे डॉ. पल्लवी जोशी गायकवाड यांचेही पुस्तक अप्रतिम आहे.

रमताराम Sun, 25/08/2013 - 11:15

नॅशनल बुक ट्रस्ट ने भारतभरातील लेखकांच्या कथांच्या अनुवादांचे चार भाग परवा मिळाले. त्यातील हिंदी कथांचे अनुवाद वाचत होतो.

'तू खूपच आहेस!' (यू आर टू मच)
'मला तिच्याबरोबर पाहून तिचे दोस्त मरून जातील. (मुझे उसके साथ देखके उसके दोस्त मर जाएंगे.)
'आमची मुलाखत थोड्या तासांपूर्वी झाली होती.' (हमारी मुलाक़ात कुछ घंटो पहले(ही) हुई है.)
'तिला माहित नव्हते. मी सूड घेत होतो... तिच्या गोर्‍या कातडीबरोबर. (मैं बदला ले रहा था... उसकी गोरी के चमडी के साथ.)
(कंसातील वाक्ये म्हणजे मूळ वाक्यरचनेबाबतचे माझे तर्क आहेत.)

शब्दाशब्दागणित खडखडाट. मी संतप्त. रागाने पुस्तक मिटून अनुवादकाचे नाव पाहिले. 'प्रभाकर माचवे'(!) मी हतबुद्ध.

मिहिर Fri, 30/08/2013 - 12:07

गौरी देशपांड्यांचे 'तेरुओ आणि कांहि दूरपर्यंत' वाचले. एकूण ठीकठाक वाटले. त्यांच्या काही गोष्टी वाचताना जसे भारी वाटते उदा. 'एकेक पान गळावया' मधली 'मध्य लटपटीत' ही कथा, तसे विशेष वाटले नाही.
पहिल्या तेरुओ कथेत जपानचे, जपानी माणसांचे रंजक वर्णन आहे. पण सारखे सारखे ते मध्येच 'तेरुओ!' बघून कंटाळा आला. काही पण झाले की, पुढच्या ओळीला 'तेरुओ!'! शिवाय 'तू कित्ती सुंदर आहेस' हे पुन्हा पुन्हा वाचून कंटाळा आला.
दुसरी कांहि दूरपर्यंत ही कथा सुरुवातीला मस्त वाटली, पण शेवटी कंटाळा आला.
अवांतर: बाकी पुस्तक शुद्धलेखनाच्या नव्या नियमांनुसार लिहिले असताना हे 'कांहि' असे का लिहिले आहे हे कोणाला ठाऊक आहे का?

मी Mon, 02/09/2013 - 17:55

ग्लॅडवेलचा त्याच्या नेहमीच्या रंजक शैलीतला 'मॅन अ‍ॅन्ड सुपरमॅन' लेख मस्त आहे, ग्लॅडवेल लेखात जन्मजात जनुकीय फायदा मिळालेल्या आणि तंत्रज्ञान वापरुन जनुकीय फायदा मिळवणार्‍या खेळाडूंच्या बद्दल सांगतो, त्यात टायलर हॅमिल्टन आणि लान्स आर्मस्ट्रॉन्गच्या (कु)प्रसिद्ध फसवणूकीबद्दलही लिहिले आहे, जनुकीय फायदा मिळवुन देणारं विज्ञान चक्रावून टाकतं. लेख रंजक आहे हे नक्की.

बॅटमॅन Mon, 02/09/2013 - 18:10

In reply to by मी

लेख रंजक आहे. समारोप विचार करायला लावणारा आहे. डोपिंगचे केलेले समर्थन पाहता "डोपिंग लीगलाईझ केले तर"? असा प्रश्न मनात नव्यानेच रुंजी घालू लागला.

मी Mon, 02/09/2013 - 19:24

In reply to by बॅटमॅन

समारोप विचार करायला लावणारा आहे.

नक्कीच, त्याचबरोबर साधारण खेळाडू ह्या सोफेस्टिकेटेड जनुकीय खेळाडूं-समोर कसा परफॉर्म करणार? हे असलं तंत्रज्ञान खेळामध्ये नक्की काय साध्य करायला मदत करणार? भ्रष्ट न झालेला खेळ पहायला मिळणं दुरापास्त होत जाणार का? अशा अनेक शंका मनात येतात.

हॅमिल्टनचं "जास्त ताकद कमावण्यापेक्षा जास्त मेहनत करण्यासाठी आपण ड्रग्स घेतो" असं ड्रग्स घेण्यामागचं विश्लेषणही मला रोचक वाटलं.

पांथस्थ Mon, 02/09/2013 - 19:36

भाषेची व्युत्पत्ती, विवीध पातळ्यांवर होणार विकास ईई मुद्द्यांचा थोडक्यात समावेश घेउन पुस्तक वळते ते असभ्य म्हणी/शिव्या/वाक्प्रचार यांच्या बहुमुल्य साठ्याकडे (माझी रोजची भाषा शिवराळ असल्याने माझ्यासाठी हा ठेवा बहुमुल्य आहे ;) ) कुठे फुल्याफुल्या नाहि कि अनावश्यक काट्छाट नाहि. तरीहि पुस्तकात सवंगपणा जाणवत नाहि. जाणवते ती पुस्तकाच्या मांडणीमागची संशोधनात्मक वृत्ती. संपुर्ण वाचुन झाल्यावर एक लेख टाकायचा विचार आहे!

भाषाप्रेमींसाठी नक्कि वाचावे असे पुस्तक :)

माझेपण फेव्रिट्ट पुस्तक एकदम!!!!!! नादच नै करायचा. पुस्तकात लेखकाचा "मोबिले" दिला असल्याने वाचून झाल्यावर सरळ लेखकाला फोन लावलो आणि धन्यवाद दिलो. आमच्या मनात कधीकाळी हा प्रोजेक्ट रुंजी घालत होता तो लेखकाने पूर्ण केल्याबद्दल विशेष छान वाटलं.

सविता Tue, 03/09/2013 - 17:05

कॉलेजकाळात "कोसला" वाचले होते. सुरूवातीला छान वाटून शेवट वाचल्यावर "छ्या... हे काय पुस्तक आहे.. हा काय विषय आहे?" असे झाले होते.तेव्हा "भालचंद्र नेमाडे" आणि एकूणच "कोसला" हे काय प्रस्थ आहे हे आधी माहित नव्हते. मग नंतर सावकाश जेव्हा कळले तेव्हा आपले मत परत एकदा तपासावे असे ठरवले होते. शेवटी आत्ता तो योग आला.
मागच्या वेळी वाचताना ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा या वेळच्या अपेक्षा नक्कीच वेगळ्या होत्या. मागच्या वेळेस सारखेच सुरूवात, लिखाणाची शैली, "वगैरे", "उदाहरणार्थ" हे भयंकर आवडले. मागच्या वेळी पांडुरंग सांगवीकर मुर्ख आणि कर्तॄत्वहीन वाटला होता तसा या वेळी वाटला नाही, किंबहुना बर्‍यापैकी समजला. मनुचा मॄत्यू हेलावून टाकणारा वाटला. तरीही शेवटची ५० पाने फार कंटाळवाणी वाटली.. शेवटी शेवटी तर नुसती चाळल्यासारखी करून पुढे गेले कारण "लेखकाला काय सांगायचे आहे ते आधीच कळलेय मग तो उगाच हे पाल्हाळ का लावतोय?" हा प्रश्न पडला होता. असो..अगदी "मोस्ट्ट फेव्हरिट्ट" नसले तरी आता "कोसला" संग्रही आहे (लायब्ररीचे फुकटे दिवस गेले, विकतच घ्यावे लागले मग संग्रहीच राहणार ना, काय करता?)

जाता जाता:

येथे वाचूनच "बुकगंगा" वर काही पुस्तके विकत घेण्यात आली, पण मला ते एकूणच महाग वाटले शिवाय ते "ऑन्लाईन प्रोसेसिंग" म्हणून वेगळे चार्ज लावत्त जे अजिबातच आवडले नाही.
कालच शोधता शोधता मॅजेस्टिक ची साइट सापड्ली, मी बुकगंगा वर विशलिस्ट मध्ये टाकलेली जवळजवळ सगळी पुस्तके येथे सापडली शिवाय किंमत ही बुकगंगा, फ्लिपकार्ट पेक्षा कमी होती, ३०० च्या पुढे शिपिंग चार्जेस पण नाही. त्यामुळे कालच
- पाडस
-स्मॄतिचित्रे
- एक होता कार्व्हर

मागवण्यात आले आहे.

सविता Tue, 03/09/2013 - 17:10

अजून एक:

पुस्तकविश्व ची साइट बंद पडली का?

काही नवीन पुस्तके वाचण्या आधी त्यावर ची वाचकांची परिक्षणे वाचावीत असे मनात होते.

हा धागा आहे, पण पुस्तकाच्या नावानुसार एक किंवा अनेक परिक्षणे वाचणे या धाग्यांवर शक्य नाही.

काही माहिती? किंवा अजून एखादा पर्यायी स्त्रोत?

पूर्ण विजार Sat, 19/10/2013 - 07:11

ऑर्कुटवर असे ( सध्या काय वाचताय ) काही धागे होते पूर्वी. एकाने लिहीले होते भारताचा अर्थसंकल्प ! त्या वेळी अक्षरशः डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसू आलं होतं. पण आता असं वाटतं, कि अरे यात हसण्यासारखं काय आहे. भारताचा अर्थसंकल्प, राज्यघटना वाचणं हे कर्तव्य तर आहेच, शिवाय आपल्या फायद्याचं देखील आहे ते.. मग काय वाचताय अशा धाग्यावर यापैकी एखादा उल्लेख का नसावा ?

कुमारकौस्तुभ Mon, 23/12/2013 - 19:47

अ‍ॅनी हेलर या लेखिकेन लिहीलेली अ‍ॅन रँड या लेखिकेची सुंदर बायोग्राफी नुकतीच वाचुन पुर्ण केली. रँड च्या लेखनाने कॉलेज मध्ये असतांना भारावुन गेलो होतो. बरेच दिवस रँड ने वेडावुन टाकल होतं. तिच एका वेडाच्या भरात जवळ जवळ सगळं साहीत्य वाचुन काढल्याच आठवत. नंतर वाचन प्रवासात दुसरे लेखक आले आणि रँड कायमची मागे पडली. तिचा प्रभावही पुसला गेला तरी अजुनही तिच्या काही संकल्पना जबरदस्त आवडतात. पण तिच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी फारशी माहीती नव्हती. या पुस्तकाने अनेक नविन गोष्टी रॅंड विषयी कळल्या. आणि बायोग्राफी कीती शिस्तबद रीतीने संशोधनाने लिहीली जाउ शकते त्याचा एक नमुना पहावयास मिळाला. लेखिका रँड ची शिष्या नसल्याने बायोग्राफी क्रिटीकली लिहिलेली आहे. अतिशय इंटरेस्टींग अशी रँड ची स्टोरी आहे. यात रँड च्या आयुष्यातील नॅथनियल ब्रँडन चा एपिसोड अतिशय गुंतागुंतीचा व आय ओपनर आहे.यात रँड आणि ब्रँडन चा आठवड्यातुन दोन दिवस पाळावयाचा सेक्स चा करार, त्याला दोघांनी घेतलेली आपापल्या पार्टनर्स ची( सँक्शन ऑफ व्हिक्टीम) संमती., ब्रँडन चे हीरोइन वॉर्शीप, रँड ची आक्रमक व त्याचबरोबर समर्पण शोधणारी सॅडोमॅसोचिसम च्या अंगाने जाणारी सेक्स्युअ‍ॅलिटी, ब्रँडन दुसरया एका तरुणीच्या प्रेमात पडल्यानंरचा ऑब्जेक्टीव्हीस्ट रँड चा वास्तव नाकारणारा सब्जेक्टीव्ह स्टँड, रँड च्या आयुष्यातील अनेक गोष्टी यात आहेत मला वरील एपिसोड जास्त इंटरेस्टींग वाटला इतकचं. या लेखिकेच्या वर्तुळात असलेले तेव्हाचे शिष्यांपैकी एक पुढे अ‍ॅलन ग्रीनस्पॅन अमेरीकेच्या फेडरल रीजव्ह चा चेअरमन झाला. ब्रॅडन शी रँड ने सर्व संबध तोडल्यावर त्याने स्वतःची एक नविन ओळख निर्माण केली तो सेल्फ एस्टीम या संकल्पने वरील संशोधनासाठी पुढे फेमस झाला. एकुण रॅड प्रेमींसाठी यात खच्चुन भरलेली आणि सुंदर शैलीने लिहीलेली माहीती आहे. लेखिके ला अ‍ॅन रँड ओफीशीयल इन्स्टीट्युट ने रँड ची मुळ पत्रे वाचण्यास इतर मटेरीयल देण्यास नकार दिला. अ‍ॅन रँड चे जर फॅन असाल तर एकदा ही बायोग्राफी जरुर वाचा.

रुची Mon, 23/12/2013 - 21:45

In reply to by कुमारकौस्तुभ

'पॅशन ऑफ अ‍ॅन रँड' हा सिनेमाही जरूर पहा असे सुचवेन. रँडच्या विचारप्रवाहातल्या तृटी तपासायच्या असतील तर तिची नॉनफिक्शन पुस्तकेही वाचावी लागतील. 'द रोमँटिक मॅनिफेस्टो' वाचून माझे डोळे खाड्कन उघडले होते, तिच्या न्यायाने जी.ए. सारख्यांची पुस्तके कचर्यातच फेकण्याजोगी होती.

बॅटमॅन Mon, 23/12/2013 - 23:32

In reply to by रुची

आयला रँडबाई धारवाडकरांना रद्दीत काढू पाहते काय? संजोपरावांच्या अगोदर मीच तिचा निषेध करतो.

निषेध! निषेध!! निषेध!!!

कान्होजी पार्थसारथी Sat, 08/02/2014 - 00:26

In reply to by रुची

मुळातच जी ए तिची प्रॉफेटेसचा आव आणणारी बुडबुडा बाई म्हणून वासलात लावतात. आणि तुम्ही चक्क तिच्या पुस्तकावरुन जी एंची पुस्तके फेकताय? तिचे
बाकी काहीही असो, जी एंचा literary genius आणि लेखक म्हणून integrity अमान्य करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

रुची Tue, 11/02/2014 - 05:01

In reply to by कान्होजी पार्थसारथी

तुम्ही चक्क तिच्या पुस्तकावरुन जी एंची पुस्तके फेकताय?

आँ? मी कधी म्हटले की मी जीएंची पुस्तके फेकतेय? मी उलटे म्हणतेय की तिची नॉनफिक्शन पुस्तके वाचून तिच्या पोकळ तत्वज्ञानातल्या तृटी समजल्या. डोळे खाड्कन उघडले...म्हणजे तिच्या लिखाणाबद्दल, जीएंच्या नव्हे!
जी.ए. मला आवडतातच पण समजा ते आवडत नसते तरी ते माझ्या आवडीच्या निकषांवर...कोणी म्हणते म्हणून एखाद्याचा literary genius मी मान्य किंवा अमान्य करत नाही :-)

बॅटमॅन Tue, 11/02/2014 - 12:19

In reply to by रुची

रँडबाईंची नॉनफिक्शन पुस्तके कुठली??? वाचावयास आवडतील.

काये ना, सुरुवातीला फौण्टनहेड अन अ‍ॅटलास श्रग्ड दोन्ही वाचली अन भारून गेलो. नंतर त्यातून बाहेर आलो खरा पण "असं झालं तर & असं का होत नै?" हे प्रश्न मनात रुंजी घालत होते. पार्शली उत्तरे मिळाली पण पूर्ण नै. तुम्ही म्हणता ती पुस्तके वाचून काही प्रकाश पडला तर बरे म्हणून इच्यारतोय.

रुची Tue, 11/02/2014 - 21:39

In reply to by बॅटमॅन

The Romantic Manifesto आणि The Virtue of Selfishness ही दोन पुस्तके मी वाचली आहेत, त्यापेक्षा जास्त काही वाचायची हिंमत झाली नाही. म्हणजे तिच्या विधानांतली, तर्कातली सुटी-सुटी सूत्रे ठीक वाटतात पण त्याचे उभे-आडवे संदर्भ जोडून बाई जी काही फिलॉसॉफी वगैरे मांडतात ती डोक्यात जायला लागते. रोमँटिक मॅनिफेस्टो वाचायला रोचक वाटले...म्हणजे पटले नाही तरी आपण जे वाचतो त्याकडे अधिक डोळसपणे पहाणे आणि आपल्या नीतीमूल्यांशी त्याचा संबंध जोडून त्याप्रमाणे त्याचे मूल्यमापन करणे रोचक वाटले. अर्थात ही वाचून बारा-पंधरा वर्षे उलटली आहेत आता काय वाटेल माहीत नाही.

कान्होजी पार्थसारथी Tue, 11/02/2014 - 21:53

In reply to by रुची

मी भलताच अर्थ लावला! गैरसमज झाल्याबद्दल स्वारी.

कुमारकौस्तुभ Tue, 24/12/2013 - 13:09

brainpickings चॅ २०१३ साली चे रेकमंडेशन आलेले आहे एकदा नजर मारुन घ्या या साइट ने सुचविलेली पुस्तके सहसा फेल जात नाहीत. फार सुंदर वेबसाइट आहे अवश्य सभासद बना. वाचकांसाठी एक खजिना च आहे.अत्यंत सुंदर रीतीने पुस्तक परीचय करुन दिला जातो आणि साइट च विशेष म्हणजे जाहीरात मुक्त वन वुमन शो असलेल काम आहे. अजुनही अतिशय सुंदर अभिजात अस मटेरीयल या साइट वर नेहमीच सापडत. विशेषतः लहान मुलांची चित्र असलेल्या पुस्तकांच परीक्षण तर भलतच खास असत.

http://www.brainpickings.org/index.php/2013/12/23/best-books-of-2013

नगरीनिरंजन Sun, 02/02/2014 - 18:28

इ. एम. फोर्स्टरची The Machine Stops ही लघुकादंबरी वाचली.
टीपिकल फ्युचरिस्टिक डीस्टोपियन कथा आहे. मशिनच्या आधाराने राहणारी माणसं वगैरे. काहींना रोचक वाटेल आणि काहींना हास्यास्पद.

The Central Committee announced the developments, it is true, but they were no more the cause of them than were the kings of the imperialistic period the cause of war. Rather did they yield to some invincible pressure, which came no one knew whither, and which, when gratified, was succeeded by some new pressure equally invincible. To such a state of affairs it is convenient to give the name of progress. No one confessed the Machine was out of hand. Year by year it was served with increased efficiency and decreased intelligence. The better a man knew his own duties upon it, the less he understood the duties of his neighbour, and in all the world there was not one who understood the monster as a whole. Those master brains had perished. They had left full directions, it is true, and their successors had each of them mastered a portion of those directions. But Humanity, in its desire for comfort, had over-reached itself. It had exploited the riches of nature too far. Quietly and complacently, it was sinking into decadence, and progress had come to mean the progress of the Machine.

मन Sat, 08/02/2014 - 00:02

कल्पना करा "आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान" ह्या पु ना ओकीय नावाचं पुस्तक कुणी वाचण्यास सुचवलं तर ते वाचायची छाती होइल का ?
पण कधी कधी आश्चर्याचे धक्के बसू शकतात. हे पुस्तक पु ना ओकांचं नाही. निरंजन घाट्यांचं आहे; माहितीपूर्ण तरीही रंजक आहे.
थोडक्यात पाच्-सात वर्षापूर्वी उपक्रम हे संकेतस्थळ मला सापडलं म्हणून खूपच चांगलं माहितीपूर्ण व वैचारिक लेखन
आटोपशीर्,थोडक्या जागेत, झेपेल इतपत वाचायला मिळालं.त्यापूर्वी माझ्या आयुष्यातलं उपक्रमाचं काम अशा काही पुस्तकांनी केलं.
माहिती खच्चून भरलेली,तरी कुठीही कंटाळवाणी होत नाही. एखादा डिस्कवरी च्यानेलचा सुंदर माहितीपट पहावा, तसं वाटतं.
(bbc ची rise & fall of roman empire ही मालिका कंटाळवाणी होत नाही, तसच.)
तपशीलवार्,अस्सल ऐतिहासिक माहिती दिलेली आहे. कल्पना, तर्क व "श्रद्धा" ह्यांच्या उत्तुंग भरार्‍या ह्यात नाहित.
प्रुथ्वीवर माणूस उपरा, chariots of God वगैरे छाप वर्णनाबाहेरही आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल कौतुक
वाटावं असं खरच काही होतं, हे ह्यातून समजतं.मध्ययुगीन व प्राचीन जगात काय काय ज्ञात होतं, ह्याचा मस्त उहापोह केला आहे.
उदा :-
जेम्स वॅट ह्यानं आधुनिक काळात वाफेचं इंजिन शोधलं आणि अक्षरशः नवीन युग अवतरलं आख्ख्या मानवतेसाठी.
पन असच वाफेचं एक इंजिन आजपासून पार दोन हजार वर्षापूर्वी, हो, दोन हजार वर्शापूर्वी ; म्हणजे ज्ञानेशरांच्या काळाच्याही हजार बाराशे वर्षे आधी बनवलं गेलं होतं.
रोमन काळात! पण निर्मात्याला त्याचं महत्व न जाणवल्यानं म्हणा किंवा योग्य वेळ आली नव्हती म्हणा, नियतीच्य अमनात नसेल म्हणा, जे काय असेल, ते बनून तसच पडून राहिल!
तर ह्या व अशा लहान लहान घटना, किस्से त्यात आहेत.
सुवेझ कालवा मागील शंभर दीडशे वर्षापासून चर्चेत दिसतो. तो चक्क फेरो रामसेस(इस पू १४००! वगैरे चु भू द्या घ्या) ,
पर्शियन सम्राट दारियस (इस पू ५००!!) ह्या सर्वांच्या काळात वापरात होता. इसवीसनाच्या सुरुवातीच्या कालात तो ब्म्द पडत चालला.
marine engineering च्या काठिण्यापातळीची कल्पना असेल त्यांना हा प्रकार त्या काळाच्या मानाच्या किती पुढे होता ह्याचा अंदाज आलाच असेल.
अशीच कित्येक उदाहरणे आहेत. रोमन हेरॉन्/हेरॉद पासून ते अरबी बानु मुसा वगैरे पर्यंतचे अभियता त्यात आहेत.
आगीचा चटका दिला, की गोल गोल हलणारा इवलासा रंगमंच खेळणी म्हणून हेरॉननं त्याकाळात बनवला होता.

ह्या खेळणी,वस्तू, यंत्रे जहाजे पूर्वीही एखाद दुसर्‍याने का असेना बनवली होतीच. आधुनिक जग ज्या अवस्थेत जगते आहे, त्याच्या अगदि
जवळ मानवाचे पूर्वज कैकदा पोचलेही होते. ह्या ना त्या कारणाने ती य्म्त्रे मागे पडली.(उदा:- इजिप्तमध्ये इसपू चौदाशे मध्ये वापरात असलेले बारा तास अचूक मोजनारे जलघड्याळ, विविध चायनिज चुंबकाधारित उपकरणे वगैरे.)
राहून राहून ह्या सागळ्या उपकरण वगैरेंचा आणि आजचा आधुनिक काळाचा फरक राहतो, तो फक्त इतकाच की आज ह्या गोष्टींचं mass production, घाउक उत्पादन होतं, होउ शकतं. ह्यातल्या कुठल्याच वस्तू कुणा एकाच्याच ताब्यात्/माहितीत आहेत असे नाही. बहुतांश सर्व गोष्टी आज आपण आराखडा पाहून पुनःनिर्मित करु शकतो.
आधुनिक काळ घडवणार्‍या युरोपियन प्रबोधन युगाबद्दल मग माझा आदर शतगुणित होतो.

बॅटमॅन Tue, 11/02/2014 - 16:08

महाभारत- इट्स जेनेसिस & ग्रोथ- अ स्टॅटिस्टिकल स्टडी हे एम.आर.यार्दी यांचे पुस्तक नुकतेच विकत घेतलेय.

अफाट प्रकार आहे. स्टॅटिस्टिक्स (अ‍ॅनोव्हा ऊर्फ अ‍ॅनॅलिसिस ऑफ व्हॅरियन्स) वापरून महाभारतात वेळोवेळी अ‍ॅडिशन कशी झाली असेल याचा तर्क मांडलाय अन तो मस्त आहे एकदम. अन सर्वांत भारी प्रकार म्हणजे कौरव-पांडव सेनेचा रिअलिस्टिक साईझ दिलाय. पांडव साधारण २५ हजार तर कौरव साधारण ३५ हजार.

व्यास, मग वैशंपायन अन मग सौती असा जो प्रवास आहे त्यांपैकी वैशंपायनांचे २४००० श्लोकांचे महाभारत कुठले असावे याचा अंदाज त्यांनी केला आहे. अठरा पर्वांपैकी तेरा पर्वांतील काही अध्याय त्यात फिट बसतात. त्यात मुख्यत्वेकरून युद्धाचीच कहाणी जास्त आहे, बाकी पसारा तुलनेने कमी असून पांडवांची आजिबात भलामण केलेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. जी तशी पांडवांची भलामण आहे ती सौतीने केलेली आहे असे ते म्हणतात.

या सर्व अभ्यासासाठी भांडारकरची क्रिटिकल एडिशन आधारभूत धरलेली आहे.

मुळात, अनुष्टुप् वृत्ताचा स्टॅटिस्टिकल अ‍ॅनॅलिसिस करण्याची कल्पनाच मस्त आवडली. त्या काळात (१९८६ साली) त्यांना हे करायला किती वेळ लागला असेल त्याची कल्पनाच केलेली बरी!!!!

मन Tue, 11/02/2014 - 16:11

In reply to by बॅटमॅन

ह्या पुस्तकाचा उल्लेख ऐसीवरच एका धाग्यात किंवा खरडित पाहिल्यासारखा वाटातो.
बहुतेक कोल्हटक्रांचय प्रतिसादात असावा.