स्वखुशीने गृहिणीपण
चेतन भगतला थोर समजणारे लोक इथे फार लिहीत असतील असं वाटत नाही. पण त्याच्या लिखाणावर टीका करणारा हा मजेशीर लेख सापडला; तो दाखवण्यालायक वाटला. रिचा झा नामक ब्लॉगरने लिहीलेला आहे.
या लेखासंदर्भात माझे काही विचार:
१. चेतन भगत सुमार लेखक/विचारांचा आहे.
२. या लेखनात हाऊसवाईफ असण्याचं समर्थन आहे.
पहिल्या भागाबद्दल फारसे वाद नसावेत म्हणून तो भाग आपण सोडून देऊ. दुसर्या भागाबद्दलः
लिंग समानता नाही, येण्यासाठी त्रास होतो आहे याचं कारण जेवढं सामाजिक आहे तेवढंच आर्थिक आणि मानसिक जडणघडणीतही आहे. नोकरी/व्यवसाय न करणार्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही कारण त्या आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात. बहुसंख्य घरांमधली वस्तुस्थिती अशीच असेल. पण सुशिक्षित उच्चमध्यमवर्गात, विशेषतः जो वर्ग चेतन भगतचा वाचक आहे, त्याच वर्गातले पुरुष स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत असं दिसत नाही का? आपली बायको/गर्लफ्रेंड बाहेरून पैसे कमावून आणत नसेल पण घराची जबाबदारी घेत असेल, एक स्वतंत्र आणि हुशार व्यक्ती असेल, तर तिला या प्रकारची कष्ट-विभागणी पुरुषही आनंदाने मान्य करत नाहीत का? जी कारणं देऊन चेतन भगत म्हणतो, की नोकरी करणार्या स्त्रीशी लग्न करा, त्यातला आर्थिक भार वगळता बाकी सगळ्या गोष्टी जर या (आणि अशा) हाऊसवाईव्ह्जकडे असतील तर मग नोकरी करण्याची आवश्यकता काय? तिने "निरुपयोगी" माहिती (उदा: बहारीनमधे सध्या काय गडबड सुरू आहे) जमा केली तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?
या लेखनावरून सरळच दिसतंय की ही स्त्री स्वतंत्र विचार करणारी आहे, पुस्तकं खाऊन पचवणारी आहे, तिची स्वतःची मतं आहेत, ही मतं व्यक्त करताना तिला कुठलीही "स्त्री-सुलभ लज्जा" नाही; मग अशी स्त्री आणि तिचा/तिची पार्टनर यांनी परस्परसामंजस्याने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला तर यात स्टीरीओटाईप मोडत नाही का?
स्टीरीओटाईप असा आहे "मी पुरेसं कमावतो, हिला नोकरी करायची काय गरज?". स्त्रियांनी नोकरी करून तो मोडला. पण यात दुसरा स्टीरीओटाईप बनतो आहे; मुक्त स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी नोकरी केलीच पाहिजे (पैसा कमावलाच पाहिजे). ही ब्लॉगर हा पुढचा स्टीरीओटाईप मोडते आहे.
स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी करायची म्हणजे युद्ध, वसाहतवाद, बलात्कार असा मॅडनेस सुरू ठेवणं असं थोडंच आहे? युद्धामुळे सर्वात जास्त होरपळ स्त्रिया आणि त्यांच्या मुलांची होते. पुरुष तर जातात 'शत्रू'प्रदेशात हिंसा करायला!
स्वतंत्र स्त्री समाज तो असेल जो पुरुषप्रधान व्यवस्थेमधली मूल्य मोडून काढेल. या हाऊसवाईफने निदान स्वत:च्या घरात ते केल्याचं एका लेखातून दिसतंच आहे. पैसे मिळवणं, न मिळवणं अगदीच क्षुल्लक तपशील आहे.
(ही बातमी समजली का? या धाग्यातले प्रतिसाद या धाग्यात चर्चाविषय म्हणून हलवले आहेत.)
पूर्णवेळ गृहिणी/आईचा पगार
पूर्णवेळ घरी असणाऱ्या गृहिणीच्या compensation बाबत हा लेख रोचक आहे.
http://communities.washingtontimes.com/neighborhood/life-lines-where-re…
स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी
स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी करायची म्हणजे युद्ध, वसाहतवाद, बलात्कार असा मॅडनेस सुरू ठेवणं असं थोडंच आहे? युद्धामुळे सर्वात जास्त होरपळ स्त्रिया आणि त्यांच्या मुलांची होते. पुरुष तर जातात 'शत्रू'प्रदेशात हिंसा करायला!
अधोरेखित वाक्य हा अजून एक स्टीरिओटाईप. स्टीरिओभञ्जनाच्या नावाखाली अजून एक स्टीरिओ कसा काय मंडिला गेला बरे? शिवाय युद्ध इ. पुरुषांचीच मक्तेदारी असे मांडिले गेलेले चित्रही चूक आहे. कोरिलेशन आणि कॉजेशनची क्लासिक गल्लत त्यात आहे.
स्टीरीओटाईप असा आहे "मी पुरेसं कमावतो, हिला नोकरी करायची काय गरज?". स्त्रियांनी नोकरी करून तो मोडला. पण यात दुसरा स्टीरीओटाईप बनतो आहे; मुक्त स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी नोकरी केलीच पाहिजे (पैसा कमावलाच पाहिजे). ही ब्लॉगर हा पुढचा स्टीरीओटाईप मोडते आहे.
मुळात अधोरेखित वाक्य हा स्टीरिओटाईप कसा आहे तेही स्पष्ट करावे. ब्लॉगलेखिकेने चेतन भगतला खोडण्यासाठी लेख लिहिलेला आहे. त्याने एखादे मत व्यक्त केले म्हणून तो स्टीरिओटाईप झाला असे काही आहे का? गृहिणी माठ आणि गरीब बिचार्या नसतात हे सिद्ध करणारी बरीच उदाहरणे आसपास पाहिली आहेत. काहीजणी अर्थार्जन करतात, काही करत नाहीत.
चेतन भगतवर खरेतर दुर्लक्षाचे अमोघ अस्त्रच वापरले गेले पाहिजे. त्याच्या मतांना स्टीरिओटाईप म्हणून धरण्याइतपतही त्याची लायकी नाहीये. असो.
त्या ब्लॉगमधलं हे वाक्य आवडलं
त्या ब्लॉगमधलं हे वाक्य आवडलं "you stereotyped all housewives as someone who cooks, cleans and is submissive, and all career-oriented women as capable and independent."
पण तरीही 'माझ्या लिमीटेड सँपलनुसार' रिचा ज्या housewives बद्दल बोलत आहे त्यांची संख्या चेतन ज्या careerwomen बद्दल बोलत आहे त्यांच्यापेक्षा फार कमी आहे. खरंतर त्या housewives देखील नीट शिकलेल्या आणि किमान काही काळ तरी नोकरी केलेल्या आहेत. कधीच नोकरी/स्वतः पैसे कमवणे न केलेल्या स्त्रिया capable and independent मला तरी दिसल्या नाहीत. खरंतर careerwomen मधेपण who cooks, cleans and is submissive अशाच जास्त दिसल्या.
त्यामुळे मी रिचापेक्षा चेतनला जास्त सपोर्ट करेन.
चेतन भगत आणि त्याचे लोणचे!
चेपुवर वगैरे कोणीतरी काहीतरी टाकलं होतं म्हणून भगतचा तो पोरकट लेख वाचला होता आणि माझ्याही भयंकर डोक्यात गेला होता. हा इतका उथळ, सरसकटीकरण (अंडरस्टेटमेंट!) केलेला भयाण लेख वाचून त्यात वाया गेलेल्या माझ्या वेळाबद्दल माझा भयंकर संताप झाला होता. त्यात हा गडी गरमागरम केलेल्या फुलक्यावर घसरला तेंव्हातर माझा कडेलोटच झाला होता! म्हणजे चांगला स्वयंपाक घरीच करून आपल्या कुटुंबियांना प्रेमाने खाऊ घालणारे स्त्रीपुरुष मठ्ठ किंवा परावलंबी किंवा स्वतंत्र अस्तित्व नसलेले किंवा इतर गोष्टींत रस किंवा गती नसलेलेच असायलाच हवेत का? नोकरी ़करणार्या स्त्रीया खर्या अर्थाने स्वतंत्र असतातच का? आर्थिक, सामाजिक घडामोडींवर नवर्याबरोबर चर्चा करू शकणार्या आणि सल्लामसलत करू शकणार्या स्त्रीया नोकरी ़करणार्याच असतात का? वगैरे वगैरे. खरेतर लेख कोणीतरी आजच्या मुलींसाठी लिहायला हवा, तो अशासाठी की राजकारण आणि खेळ याच्यावर वरवरच्या टिप्पण्यांपलिकडे इतर कोणत्याही विषयांवर सखोल भाष्य न करू शकणारे, आईबहिणींनी लाडावल्यामुळे इतर घरगुती बाबींतही बिलकुल गती नसलेले हे असले तथाकथित 'स्वतंत्र' नवरे घेऊन मुलींना (नोकरी करणार्या असोत वा नसोत) त्यांचे व्यवस्थित 'लोणचे'ही घालता येत नाही जे फुलक्यांबरोबर फार मस्तं लागते. ;-)
आर्थिकदृष्ट्या डिपेन्डन्ट स्त्रिया मुक्त कशा?
लेख ब्लॉग वाचलेला नाही. पण..
पण यात दुसरा स्टीरीओटाईप बनतो आहे; मुक्त स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी नोकरी केलीच पाहिजे (पैसा कमावलाच पाहिजे).
याचे टोक गाथणे वाइट असले तरी या मतात फार मोठे स्टिरीयोटिपिकलपणा वाटत नाही. नोकरीच केली पाहिजे असे नाही पण आर्थिक दृष्ट्या स्वायत्त असलेच पाहिजे. आर्थिकदृष्ट्या डिपेन्डन्ट स्त्रिया मुक्त कशा होतील? हे समजत नाही.
पगार $१००,०००
तुझा हा लेख वाचला आणि आज एका मॉर्निंग शोवरही हा विषय होता.
http://www.investopedia.com/financial-edge/0112/how-much-is-a-homemaker… हा एक अॅनॅलिसिस रोचक आहे.
आर्थिक दृष्ट्या स्वायत्त
आर्थिक दृष्ट्या स्वायत्त असलेच पाहिजे. आर्थिकदृष्ट्या डिपेन्डन्ट स्त्रिया मुक्त कशा होतील? हे समजत नाही.
वास्तवात हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
मुक्तसुनीत यांनी मुद्दा मांडलेला आहे; अतिशहाणा आणि सेरेपीने दोन दुवे दिलेले आहेत. नोकरी न करणार्या स्त्रियांमुळे किती पैसा वाचतो आणि पैसा वगळता अन्य फायदा किती होतो, उदा: स्वच्छ-नीटनेटकं घर, सगळ्यांना ताजं, पौष्टिक अन्न मिळणे, हा फायदा यात मोजला जात नाही. घरातले सगळेच वयस्क लोक नोकरी/व्यवसाय करत असतील तर या गोष्टी होतच नाहीत असंही नाही, पण गृहिणींचे हे कष्ट कधीच बचत/उत्पन्न रूपात मोजले जात नाहीत. एखाद्या घरात अशा प्रकारे उत्पन्न मोजलं जात असेल तर त्या स्त्रिया अर्थार्जन करतात असं समजावं लागेल.
दुसरं असं की ज्या स्त्रिया नोकरी/व्यवसाय करत नाहीत त्यांचा घरखर्च ज्या व्यक्तीच्या उत्पन्नातून चालतो, बहुतांशी नवरा, ती व्यक्ती या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देत नसेल हे गृहितक रिचा झा यांच्यासारख्या स्त्रियांसाठी अग्राह्य वाटतं. समानता मानणार्या नवर्यांवर हे अन्याययकारकही आहे.* याचा व्यत्यास असा की नोकरी करणार्या अनेक स्त्रियांना स्वतःच्या कमाईचे पैसे स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्चायची मुभा नसते. आणि एकाच वेळी भारतात अशा दोन्ही प्रकारचे लोक दिसतात.
"दुसरा स्टीरिओटाईप बनतो आहे" असं म्हणण्यामागचं कारण दुसर्या बाजूने अनेकदा ऐकू येणारं वाक्य "सीट फुकट घालवली". ठराविक प्रकारचं शिक्षण घेतलं की ठराविक प्रकारचंच काम केलं पाहिजे, अशी अनेकांची अपेक्षा दिसते. (मला या रिचा झाबद्दल असूया वाटली. शिकून सवरून पुन्हा बहारेनमधे काय सुरू आहे याची खडानखडा बातमी ठेवते. आणि हिला रॅटरेसमधे सहभाग घ्यावा लागत नाही; त्याशिवाय तिचं व्यवस्थित सुरू आहे.) चेतन भगत हे म्हणतो आहे एवढंच नाही तर त्याचा लेख फेसबुकावरून फिरत फिरत रिचा झा यांच्या भिंतीपर्यंत पोहोचला आहे. त्याने कितीही हास्यास्पद (श्रेयः 'न'वी बाजू) लिखाण आणि विधानं केली तरीही त्याची लोकप्रियता नजरेआड करू नये. लोकशाही आहे, numbers matter.
*अशा पुरुषांपैकी कोणी रिचा झा यांचे फॉलोअर असतील तर त्यांनी या विधानाचा समाचार घ्यावा! ;-)
:)
दुवे वाचले.
स्वच्छ-नीटनेटकं घर, सगळ्यांना ताजं, पौष्टिक अन्न मिळणे, हा फायदा यात मोजला जात नाही.
एखाद्या घरात अशा प्रकारे उत्पन्न मोजलं जात असेल तर त्या स्त्रिया अर्थार्जन करतात असं समजावं लागेल
नाही कळलं. स्त्रियानी नोकरी करून इतर काहि स्त्रियांना या कामांसाठी नोकरीवर ठेवलं तर अनेकींचा आर्थिक स्वायत्ततेचा प्रश्न यातून सुटतोही आणि यातून जो पैसा वाचणार आहे त्यापेक्षा अधिक पैसा स्त्रीच्या हातात जातो. जर "मनी सेव्ह्ड इज मनी अर्न्ड" असे म्हणायचे असले तरी इथे खरेच पैसे वाचतात का? कसे? आणि मुख्य म्हणजे किती? हे गणित करायला मंडळी तयार नाहीत.
बरं अगदी पैसे वाचतही असतील तरी त्यासाठी मोजावी लागणारी किंमत कुटुंबासाठी एकवेळ फायद्याची किंवा 'ना नफा ना तोटा' स्वरूपाची असेल पण स्त्रीसाठी ती तोट्याचीच ठरते.
शिवाय हे वाचणारे पैसे हे त्या स्त्रिचे नसतात, ते तिला मिळत नाहीत. तर ते पुरूषाला/कुटुंबाला मिळतात. स्त्रीला वैअयक्तिक गरजांसाठी, आवडींसाठी किंवा अगदी चैनीसाठी किंवा उधळण्यासाठी पैसे हवे असले तर ते या 'वाचलेल्या' पैशातून मिळू शकत नाही, ते स्वतःच कमावलेले असणे कधीही श्रेयस्कर.
ती व्यक्ती या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देत नसेल हे गृहितक रिचा झा यांच्यासारख्या स्त्रियांसाठी अग्राह्य वाटतं.
या मागचा कार्यकारणभाव कळला नाही. त्यांना काहिहि वाटलं तरी प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती काहि वेगळंच सांगते. इतकंच नव्हे तर या स्त्रियांसाठी घरकाम, घराकडे लक्ष देणं हे मँडेटरी होतं. ते न करायचं किंवा नवर्या व मुलांना काहि काम सांगायचंही स्वातंत्र्यही अनेकदा त्यांच्याकडे नसतं तर आर्थिक स्वातंत्र्याबद्दल न बोलणंच बरं.
समानता मानणार्या नवर्यांवर हे अन्याययकारकही आहे.*
प्रत्यक समानता मानणार्या नवर्यांची समानतेची व्याख्या वेगळी असल्याने त्यांच्यावर कमी-अधिक प्रमाणात अतिशय क्वचित प्रसंगी अन्याय होतही असेल हे मान्य. मात्र प्रत्यक्षात असे उदाहरण एखादेच पहाण्यात आहे.
याचा व्यत्यास असा की नोकरी करणार्या अनेक स्त्रियांना स्वतःच्या कमाईचे पैसे स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्चायची मुभा नसते.
दुर्दैवाने हे सत्य आहे. पण स्त्री कमावती असली की हाच नियम पुरूषांनाही अनेकदा लागू असावा असे वाटते. आर्थिक स्वायत्तता नसणार्या स्त्रीच्या आर्थिक धोरणांच्या मताकडे पूर्ण दूर्लक्ष होते. शिवाय नवर्याने पैसे देणे बंद केले तर ही भिती असते ती वेगळीच.
माझं याबाबतीतील मत स्वच्छ आहे आणि ते मी प्रत्यक्षातही पाळायचा प्रयत्न करतो
स्त्रियांना स्वायत्त व्हायचं असेल तर त्यांनी ते पूर्णपणे झालं पाहिजे. केवळ आपलं काम पैसे कमावून ते पुरूषाकडे (नवरा/वडील/भाऊ/मुले) देणे आहे हा दृष्टिकोन अधिक घातक आहे. शिवाय स्वायत्ततेबरोबर येणार्या जबाबदार्याही त्यांनी स्वीकारल्या + सांभाळल्या पाहिजेत (आणि त्या तशा जबाबदार्या उत्तम सांभळतात हा स्वानुभव आहे)
पुर्णवेळ गृहीणीँच्या पगारा
पुर्णवेळ गृहीणीँच्या पगारा बद्दल बरेचदा लेख येतात. ते बर्याचदा $ मधे असतात. भारतात यासगळ्या कामांसाठी (माझ्यामते) बराच कमी खर्च येतो.
अजुन एक शंका, 'हा' पगार आणि 'हा' त्या गृहीणीवर झालेला खर्च ( अन्न, वस्त्र, निवारा, इतर) असा हिशोब कोणी मांडला आहे का?
मुलं दोघांची असतात, त्यामुळे त्यांचा खर्च दोघांना समसमान करायला सांगावा का?
उत्तम मुद्दा
उत्तम मुद्दा. शिवाय हे पगाराचे कॅल्क्युलेशन फारच तर्कदुष्ट वाटले. त्या न्यायाने मी स्वतः गाडी चालवत ऑफीसला जातो त्यामुळे कॅबवाल्याला द्यायचा पगार वाचतो. स्वतःचा चहा स्वतः करुन घेतो त्यामुळे स्टारबक्सचे पैसे वाचतात. असे करत कॅल्क्युलेशन केले तर मला निदान अर्धा मिलियन डॉलर पगार मिळायला हवा असे वाटून जाईल.
मला वाटते इथे गृहीणीचा पगार,
मला वाटते इथे गृहीणीचा पगार, म्हणजे ती घरात जी कामे करते, ती मोलाने करून घेतली तर जितका पैसा खर्च होईल तितका, इतका वरवरचा अर्थ नसावा. एकतर मोलाने काम करणार्याच्या कामात, आणि गृहीणीच्या करण्यात पुष्कळच फरक असतो यात तर कसलेच दुमत नसणार.
आणि त्या गृहीणीला, तीने पूर्णवेळ गृहीणी होण्याचे ठरविल्यामुळे, अर्थार्जनाची संधी अन्यथा तिच्यासाठी उपलब्ध झाली असती, ती गमवायला लागते, ती किंमत मोजली जात असावी.
म्हणजे उदा. एखादी स्त्री, तिच्या शिक्षण योग्यते अनुसार समजा महिना २० हजार मिळवू शकत असेल, पण तिने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच तिने आपला वेळ घरासाठी द्यावा म्हणून घराला २० हजार खर्च आला असे समजले जात असावे.
मुलं दोघांची असतात, त्यामुळे त्यांचा खर्च दोघांना समसमान करायला सांगावा का?
इतका काटेकोर विचार कुठल्या घरात होत नसावा. पण आपण चर्चेसाठी मान्य करू की प्रत्येक खर्चाची विभागणी ५०-५० % व्हायला हवी. पण यात एक मुद्दा असा की मुलांसाठी आईला द्यावा लागणारा वेळ आणि श्रम याचे प्रमाण कितीतरी जास्त असते (काही अपवाद असतील). मग हिशोब करताना याचा विचार होणे देखिल गरजेचे ठरत नाही का? तीच गोष्ट घरातील श्रमविभागणीला देखिल लागू व्हायला हरकत नाही.
आणि त्या गृहीणीला, तीने
आणि त्या गृहीणीला, तीने पूर्णवेळ गृहीणी होण्याचे ठरविल्यामुळे, अर्थार्जनाची संधी अन्यथा तिच्यासाठी उपलब्ध झाली असती,
ती गमवायला लागते, ती किंमत मोजली जात असावी.
>> मला नाही वाटत असं करतात. पण करत असतील, तरी त्यात कुटुंबाच्या इनकमच नुकसानच दिसतय. फायदा कसला?
पण यात एक
मुद्दा असा की मुलांसाठी आईला द्यावा
लागणारा वेळ आणि श्रम याचे प्रमाण
कितीतरी जास्त असते (काही अपवाद
असतील). मग हिशोब
करताना याचा विचार होणे देखिल गरजेचे ठरत नाही का? >> मी पुण्यात माझ्या भागातले सर्व घरकामांचे रेट विचारात घेतले आणि तो गृहीणीचा 'पगार' समजला (ती सगळी कामं गृहीणी करतेच असे नाही. शक्यतो झाडु फरशी, भांडी साठी बाई असतेच. कपड्यांसाठी वॉशिंग मशिन). नवरा, बायको, १लहान मुल असं कुटुंब समजुन खर्च काढला. आणि पुर्णवेळ गृहीणीच्या पगारातून तिचा स्वतःचाच खर्च निघत नाही, हे लक्षात आले. दिवसभर मुलं सांभाळण्यास ४ ते ५ हजार घेतात. यात त्याला शाळेसाठी तयार करणे, बसपाशी सोडणे, परत आल्यावर स्वच्छ करुन गरम खायला देउन थोडावेळ खेळणे वगैरे सर्व आहे. बाकी कामाचे रेट १ प्रौढ १ वेळ: स्वयंपाक (गरम गरम बरंका) ६००रु, भांडी २००रु, कपडे ३००रु, झाडु फरशी ४००रु, डस्टिँग २००रु, इतर ५००रु...
'independant, capable स्त्रियांनी पुर्णवेळ गृहीणी होण्याचा निर्णय घेतला तर तो कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कसा ठरु शकतो' हे जाणुन घ्यायला खरंच आवडेल. कृपया 'प्रेमाची किँमत' वगैरे नको प्युअर कॉस्ट आणि सर्विस असा हिशेब दिलात तर फार आभारी असेन.
बिगर पिक्चर
अस्मिता, तु/तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे ही परिमाणे अमेरिकेत वगैरे कदाचित योग्य आहेत.
आता ती भारतात लावायची असल्यास एकुणच 'मिनिमम वेजेस'/ एखाद्या कामाचे योग्य मूल्यांकन इ. सामाजिक 'बिगर पिक्चर'च्या संदर्भात विचार करावा लागेल. सध्या तरी ते होईल असे वाटत नाही आणि त्यामुळे गृहीणी/गृहस्थ (बघायला फारच कमी मिळत असला तरी) कार्याचे योग्य मूल्यांकन होऊन त्याप्रमाणे पगार मिळणे फारच दूरची गोष्ट वाटते.
एकेरी उल्लेख आवडेल तू
एकेरी उल्लेख आवडेल :-)
तू म्हणतेस ते मान्य आहे.
खरंतर माझा आक्षेप 'कधीच नोकरी न केलेल्या गृहीणी/गृहस्थाच्या घरकामाच्या उदात्तीकरणा'ला आहे. अर्ली रीटायरमेंट, करीअर ब्रेक, पार्ट टाइम जॉब वगैरे मी समजु शकते.
माझं म्हणणं एवढच आहे की, 'आपल्या महान भारतीय संस्कृतीत' लग्न-मुलं-कुटुंब अशा दृष्टिकोनातूनच लहानपणापासून मुलगी/मुलगा यांना वाढवलं जात. त्यापेक्षा नीट शिका, बेसीक घरकामदेखील शिका, पैसे कमवा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, त्या निर्णयांच्या परीणामांना सामोर जायची तयारी ठेवा एवढंच शिकवाव. बाकी सगळं सेकंडरी आहे. आधी एक व्यक्ती म्हणुन केपेबल व्हा.
अस्मिताजी, माझ्या प्रतिसादात
अस्मिताजी,
माझ्या प्रतिसादात मी कुठेच फायदा, तोटा अथवा प्रेमाची किंमत इ. शब्दप्रयोग केल्याचे मला दिसत नाहीये.
'गरज' हाच मुद्दा मध्यवर्ती आहे. तिने नोकरी न करता घरी रहाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तिला तसे करणे जरूरीचे वाटले हा पहिला मुद्दा.
दूसरा म्हणजे तुम्ही परत मला परत तिच कामवाल्या बाईच्या पगाराची कॅल्क्युलेशन्स करून दाखवली.. ते चूकीच आहे. कारण घरची बाई ही कामवाली मोलकरणीच्या बरोबरीची कधीच नसते.
तुम्हाला प्रेमाची किम्मत वगैरे बाबी नको वाटत आहेत तर त्या आपण बाजूला ठेवूया.
पण याशिवाय इतर अनेक गोष्टी असतात, तुम्ही गृहीणी आणि आई असाल तर तुम्हाला समजायला आणखी सोपे जाईल.
मुलांच्या संगोपनाचा मुद्दा घेऊया -
कामवाली बाई मुलाला शाळेसाठी तयार करणे, नेणे आणणे, इ. सर्व करेल पण समजा ते मुल आजारी असेल, अथवा त्याच्या शाळेत जायची वेळ असेल (त्याच त्या पेरेंटस मिटिंग्ज), किंवा त्याचा आभ्यास, परीक्षेची तयारी, त्याचे वाढदिवस, गॅदरींग, मित्र्,मैत्रीणी, शाळेचे प्रोजेक्ट्स, स्क्रॅप बुक्स आणि अशा अनंत गोष्टी, हे सगळं ती करेल का?
तसच प्रत्येक कामाच्या बाबतीत आहे. घर म्हणलं की फकत दोन वेळचा स्वैपाक, साफसफाई, धुणी, भांडी एव्हढच असतं का? तसेच फक्त व्यवहारी दृष्टीकोनातून बोलायचे झाले तर पत्नी या नात्याने ती अनेक जबाबदार्या कर्तव्य पार पाडते. त्याची किंम्मत तुम्ही कशी करणार? कारण भावना बाजूला ठेवल्या तरी या सगळ्यासाठी भरपूर श्रम आणि वेळ तिला द्यावा लागतोच. जो कामवाली बाई कदापिही देणार नाही, आणि समजा काही बाबिंसाठी तिने वेळ दिलाच, उदा. पाहूणे, किंवा कुणाचे आजारपण इ. तर त्यासाठी नक्कीच एक्स्ट्रॉ चार्जेस लावेल.
आणि तरीही मी माझ्या आधीच्या प्रतिसादात हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून, फक्त तिने अर्थर्जनाची संधी घरासाठी सोडली म्हणा अथवा गमावली म्हणा असते त्याची किंमत मी मोजली.
म्हणजे ती २० हजार मिळवू शकत असेल, पण तिने पूर्णवेळ गृहीणी होण्याचे ठरवले तर तो तिचा मिळणारा पैसा तिने घरासाठी खर्च केला असे समजावे, असेच मी म्हणते आहे. आणि या उप्पर ती घराच्या सर्व जबाबदार्या सांभळणार असतेच.
अवांतरः तुम्हाला पुण्यात ६०० रु. मधे स्वैपाकाची बाई (गरम गरम जेवण करून देणारी) कुठे मिळाली ते कृपया सांगा. कारण मी १० वर्षांपूर्वी ६०० रू दिल्याचे आठवत आहे आणि फक्त ३ (खरं म्हणजे अडीचच म्हणायला पाहीजे कारण त्या वेळी माझा मुलगा खूपच लहान होता) जणांच्या स्वैपाकासाठी.
मुलं वाढवण्याच्या बाबतीत ही
मुलं वाढवण्याच्या बाबतीत ही गुंतवणूक समजावी अशा प्रकारचा मुद्दा आहे. मनीषाही हेच सांगत आहेत.
योग्य रितीने संगोपन झालेल्या मुलांचा कुटुंब, समाज, देश यांना फायदाच होतो. पुढच्या पिढीचं संगोपन योग्य प्रकारे व्हावं म्हणून स्त्रिया कष्ट घेतात, पण याचं काहीही मूल्य आहे हेच लक्षात घेतलं जात नाही. मर्यादित व्यावहारिक दृष्टीकोनातून पुढच्या पिढीचं महत्त्व बघायचं असेल तर आज काम करणारे लोक आजच्या निवृत्तीवेतन घेणार्यांना पोसत आहेत. आपण निवृत्त होऊ तेव्हा कोणीतरी कर भरेल तेव्हा आपल्याला निवृत्तीवेतन मिळेल, अर्थव्यवस्था खेळती राहील. पुढच्या पिढीसाठी कष्ट घेणं ही पण भविष्याची तरतूदच आहे; आणि हे भविष्य फक्त त्या कुटुंबापुरतंच मर्यादित आहे असं नाही. (२०२० मधे भारत सुपरपावर होणार अशी भाकितं गेल्या दशकात जोरदार होती, ती अशाच प्रकारच्या गणितांवर आधारित होती.)
या आणि अशा प्रकारच्या कष्टांची किंमत, मूल्य कसं मोजावं हा तपशीलाचा मुद्दा कठीण असल्यामुळे सोडून देते.
मी स्वतः गाडी चालवत ऑफीसला जातो त्यामुळे कॅबवाल्याला द्यायचा पगार वाचतो. स्वतःचा चहा स्वतः करुन घेतो त्यामुळे स्टारबक्सचे पैसे वाचतात. असे करत कॅल्क्युलेशन केले तर मला निदान अर्धा मिलियन डॉलर पगार मिळायला हवा असे वाटून जाईल.
एवढे पैसे मिळवणार लोकं स्वतःच घरात स्वयंपाकपाणी, साफसफाई इ करतात असं वाटतं का? (माझ्या ओ़ळखीचे अमेरिकेत रहाणारे काही तरूण, भारतीय डॉक्टर्स वर्षाला साधारण दोन-तीन लाख डॉलर्स मिळवतात. त्यांच्याकडे मुलाची देखभाल आणि स्वयंपाकपाणी यासाठी नोकर आहेत. एवढे पैसे जे लोक मिळवत नाहीत, ते लोक स्वतः घरात काम करून खर्च कमी करतात.)
भारतातही महिन्याला चाळीस-पन्नास हजार रूपये मिळवणारे घरात कामाला लोकं ठेवतात असं दिसतं.
तरीक आर्थिक परावलंबित्त्व का?
योग्य रितीने संगोपन झालेल्या मुलांचा कुटुंब, समाज, देश यांना फायदाच होतो. पुढच्या पिढीचं संगोपन योग्य प्रकारे व्हावं म्हणून स्त्रिया कष्ट घेतात, पण याचं काहीही मूल्य आहे हेच लक्षात घेतलं जात नाही.
"पण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त स्त्रीया (आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्रीयांपेक्षा) आपल्या पुढील पिढीला अधिक स्वायत्त व सक्षम बनवण्याची शक्यता अधिक आहे व पर्यायाने देशाला अधिक उपकारक ठरण्याची शक्यताही अधिक आहे" असा माझा दावा आहे असे म्हटल्यास काय चुक?
"पण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त
"पण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त स्त्रीया (आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्रीयांपेक्षा) आपल्या पुढील पिढीला अधिक स्वायत्त व सक्षम बनवण्याची शक्यता अधिक आहे व पर्यायाने देशाला अधिक उपकारक ठरण्याची शक्यताही अधिक आहे" असा माझा दावा आहे असे म्हटल्यास काय चुक?
अगदीच चूक नसले तरी सर्वतोपरी बरोबर आहे असेही म्हणता येत नाही. कारण त्यांची मुलं त्यांचे आजीआजोबा अथवा पाळणा घरातच (आजकाल डे केअर म्हणतात) असतात. त्यामुळे त्या मुलांचे व्यक्तीमत्व (चांगले/वाईट) घडविण्यात त्या स्त्रीचे योगदान किती आणि इतर घटकांचे किती असते हा वादाचा मुद्दा आहे.
तसेच इथे तुम्ही गृहीत धरता आहात की स्त्री अर्थार्जन करत असली की ती स्वतंत्र आहे, कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम आहे. पण निदान भारतात तरी अजूनही अशी परिस्थिती नाहीये. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य असे नाही.
तसेच इथे तुम्ही गृहीत धरता
तसेच इथे तुम्ही गृहीत धरता आहात की स्त्री अर्थार्जन करत असली की ती स्वतंत्र आहे, कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम आहे. पण निदान भारतात तरी अजूनही अशी परिस्थिती नाहीये.
माझे ते गृहितक नाही आणि भारतात तशी परिस्थिती नाहिये हे कबूल आहेच. पण स्त्रीला सक्षम बनवण्यासाठी'आर्थिक स्वायत्तता' ही एक अत्यावश्यक (मँडेटरी) पायरी आहे हा व्यत्यास मात्र मला योग्य वाटतो.
शिवाय तुम्ही म्हटलेले मुलांवर परिणाम करणारे इतर घटक हे आर्थिकदृष्ट्या परावलंबी स्त्रीयांच्या बाबतीतही असतातच. तेव्हा केवळ या कारणाआड त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य / स्वायत्तता हिरावणे अन्यायकारक वाटते.
"पण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त
"पण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त स्त्रीया (आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्रीयांपेक्षा) आपल्या पुढील पिढीला अधिक स्वायत्त व सक्षम बनवण्याची शक्यता अधिक आहे व पर्यायाने देशाला अधिक उपकारक ठरण्याची शक्यताही अधिक आहे" असा माझा दावा आहे असे म्हटल्यास काय चुक?
रिचा झा ज्या गटाचं प्रतिनिधित्त्व करतात* तो एक गट, 'टिपिकल' मध्यमवर्गीय लोकांचा दुसरा गट, कष्टकरी समाजाचा तिसरा गट यांच्यात असा विचार करून पहाता येईल. (यापेक्षा अधिक गटही करता येतील.)
यात रिचा झा गट स्वतः कमावतो काय आणि कमावत नाही काय, फार फरक पडत नाही. (याच रिचा झा यांच्या सोशल सर्कलमधले लोक चेतन भगतचे फॅन आहेत हे त्यांच्या लेखातून दिसतंय.) त्यांच्यावर या वाक्यामुळे अन्याय होतोय.
* उच्चशिक्षित, दुनियेची खबर ठेवणार्या, आत्मसन्मान. स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी पुरेपूर माहित असणार्या इ.
स्त्रीने स्वतः मुक्त इ. असणे
स्त्रीने स्वतः मुक्त इ. असणे आणि तो मुक्तपणा पुढच्या पिढीला उपकारक इ. ठरणे याचे कोरिलेशन नक्की असेलच असे नाही. तस्मात हृषिकेशचा दावा "स्वतःच्या मुक्तीसाठी, आनंदासाठी, इ. स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे कधीही प्रेफरेबल. त्यामुळे स्त्रियांच्या डिग्री ऑफ फ्रीडम वाढतील आणि समाजाला ते ओव्हरऑल उपकारक असेल" असा जर रिफाईन केला तर योग्य होईल असे वाटते.
रिचा झासारख्यांची मुक्ती/वातंत्र्य नवर्याच्या सपोर्ट/वृत्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी स्वयंभूपणाचा दावा करणे चूक आहे. "गृहिणी माठ आणि सबमिसिव्हच असतात असे नाही" याविधानाच्या पुष्ट्यर्थ विदा जमवायला झा सारखी उदाहरणे कामी येतात इतकाच काय तो याचा इत्यर्थ.
जरा अजून कीस पाडायचा तर वन वुमन्स मुक्ती मे बी अ बर्डन फॉर अनदर वुमन- स्वातंत्र्याबरोबर निस्तरावी लागणारी खेकटी कुणाला नकोशीही वाटू शकतात आणि यात काही तसे वाटणारीचा दोष आहे असेही नाही. त्यामुळे मुक्ती ही काही अंशी सब्जेक्टिव्ह मानली तर?
स्वातंत्र्य हे थोडं
स्वातंत्र्य हे थोडं वाहतुकीमधल्या 'राईट ऑफ वे'सारखं असतं. कागदावर राईट ऑफ वे ठराविक वहानाचा असला तरी अपघात टाळण्यासाठी अनेकदा लोकं तो अधिकार जाऊ देतात; अन्य शब्दात 'राईट ऑफ वे' द्यावा लागतो, घेता येत नाही. रिचा झा आणि अशा स्त्रियांचे नवरे 'राईट ऑफ वे' देत नाहीत असं म्हणणं या (आणि अशा) पुरुषांवरच अन्यायकारक आहे.
त्याच वेळेस या स्त्रियांनी घरी घेतलेल्या कष्टांवर घरचे अवलंबून असतात; पण त्याचं श्रेय स्त्रियांना मिळत नाही. अगदी परंपरेनुसार.
स्वतः पैसे कमावले नसले तरी घरात निर्णयस्वातंत्र्य नसेल, तर त्या आर्थिक स्वातंत्र्यालाही फार किंमत नाही. अजूनही आजूबाजूला पाहिलं तर लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या आईवडलांना आर्थिक मदत करावी का, त्यांना आवश्यकता असेल आपल्या घरी बोलावून घ्यावं का नाही अशा प्रकारच्या चर्चा होतानाही दिसतं.
स्वातंत्र्य हे थोडं
स्वातंत्र्य हे थोडं वाहतुकीमधल्या 'राईट ऑफ वे'सारखं असतं. कागदावर राईट ऑफ वे ठराविक वहानाचा असला तरी अपघात टाळण्यासाठी अनेकदा लोकं तो अधिकार जाऊ देतात; अन्य शब्दात 'राईट ऑफ वे' द्यावा लागतो, घेता येत नाही. रिचा झा आणि अशा स्त्रियांचे नवरे 'राईट ऑफ वे' देत नाहीत असं म्हणणं या (आणि अशा) पुरुषांवरच अन्यायकारक आहे.
त्याच वेळेस या स्त्रियांनी घरी घेतलेल्या कष्टांवर घरचे अवलंबून असतात; पण त्याचं श्रेय स्त्रियांना मिळत नाही. अगदी परंपरेनुसार.
या स्त्रियांचे श्रम नाकारतच नाहीये कुणी. पण यांची मुक्तीच मुळात नवर्यांच्या माईंडसेटवर अवलंबून आहे. त्यामुळे यांना निर्णयस्वातंत्र्य असले तरी याचे श्रेय त्यांच्या ऐवजी नवर्यांनाच दिले पाहिजे. कारण तुम्ही कशाही विचारांचे असा, नवर्याने ऐकलं पाहिजे ना!
स्वतः पैसे कमावले नसले तरी घरात निर्णयस्वातंत्र्य नसेल, तर त्या आर्थिक स्वातंत्र्यालाही फार किंमत नाही. अजूनही आजूबाजूला पाहिलं तर लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या आईवडलांना आर्थिक मदत करावी का, त्यांना आवश्यकता असेल आपल्या घरी बोलावून घ्यावं का नाही अशा प्रकारच्या चर्चा होतानाही दिसतं.
रैट्ट. कमावत्या परंतु निर्णयस्वातंत्र्य नसलेल्या स्त्रीची अवस्था आणि रिचा झा सारख्यांची अवस्था यात झाची अवस्था अधिक चांगली नक्कीच आहे. पण त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा निकालात निघतो असेही नाही. उलट अर्थार्जन करता येत असेल तर त्यासोबत बाईचा घरातला क्लाउट थोडा का होईना वाढतो असेच निरीक्षण आहे.
तस्मात, रिचा झाच्या नवर्यासारखे विचार करू शकणार्या पुरुषांचे कौतुक असले तरी अल्टिमेटलि उद्धरेदात्मनात्मानं हेच खरे. जिथे स्त्रिया सर्वांत जास्त मुक्त आहेत तिथेही हेच कारण त्याच्या बुडाशी असल्याचे दिसून येईल. शेवटी पैशापुढे मूल्ये टिकून टिकून टिकणार किती?
सहमत आहे
>>स्वातंत्र्याबरोबर निस्तरावी लागणारी खेकटी कुणाला नकोशीही वाटू शकतात आणि यात काही तसे वाटणारीचा दोष आहे असेही नाही. त्यामुळे मुक्ती ही काही अंशी सब्जेक्टिव्ह मानली तर?
नवरा नसताना स्त्रिया जवाबदारी घेतात+ उत्तमरीत्या निभावतात असे दिसते पण नवरा असताना काही जवाबदार्या घ्यायला स्त्रिया टाळतात असेही दिसते.
मी तरी उलट जास्त सामान घेते
मी तरी उलट जास्त सामान घेते मग तो भांडतो मग मी भांडते असा गोड मामला असतो. पण इथे माझी काही गृहीतकं आहेत - (१) सामान जड आहे (२) जड सामानाने नवर्याला हर्निया होऊ शकतो (३) बायकांना हर्निया कधीच होत नाही.
पण तुम्हा अभिप्रेत असणार्या स्वार्थीपणाबद्दल बोलायचं झालं तर - (१) नवर्याला खिडकी जवळ बसू न देता तिथे नेहमी स्वतः बसणे (२)घरात वस्तू बिघडल्यास आपण स्वतः माठासारखे काही न करता, दुरुस्तीची नवर्याकडून अपेक्षा करणे. - या गोष्टी मी करते ;)
कन्व्हिन्स्ड नाही
अजूनही मी कन्व्हिन्स्ड नाही की आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्री मुक्त अन् तिच्या मर्जीची मालक असु शकते. मग तो वर्ग कोणताही असुदेत.
असो. यात अजून नवे मांडण्यासारखे सध्यातरी माझ्याकडे काहि नाही. तेव्हा या धाग्यावर इथेच थांबतो. कधी मत बदलले तर (आपोआप) कळेलच :)
+
>>अजूनही मी कन्व्हिन्स्ड नाही की आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्री मुक्त अन् तिच्या मर्जीची मालक असु शकते.
स्रीच कशाला परावलंबी पुरुषही मर्जीचा मालक असत नाही. (कमावते वडील-फारसे कर्तृत्व नसलेला मुलगा). एकत्र कुटुंबाचे म्हणून जे तोटे दिसतात त्यातल्या काहींचे कारण असे परावलंबित्व असते (बहुतेकवेळा एकत्र कुटुंबच अशा परावलंबित्वमुळे अस्तित्वात असते).
रिचा चा ब्लॉग वाचल्यापासून
रिचा चा ब्लॉग वाचल्यापासून विचार करतेय. आजुबाजुला बर्याचजणी स्वतः कमावतो/नाही याचा फार फरक न पडणार्या, उच्चशिक्षित दिसल्यात. पण त्यातल्या कोणीच दुनियेची खबर ठेवणार्या, आत्मसन्मान, स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी पुरेपूर माहित असणार्या वाटल्या नाहीत.
आणि आज पेज ३ मधलं संध्या मृदुलच केरेक्टर आठवलं. '२करोड की फरारी से उतरुंगी तो कौन क्या बोलेगा' म्हणणारं (मला फार आवडलेलं ते :-D )
तर आता मला कोणीतरी सांगा, रिचाला संध्याचा मध्यमवर्गिय अवतार म्हणावा का? बेसिकली ट्रॉफी वाईफ.
उत्तर 'नाही' असेल तर दोघांतला फरक सांगा.
अस्मिता यांनी दुवा दिलेला लेख
अस्मिता यांनी दुवा दिलेला लेख वाचला.
त्यात रिचा झा यांनी आरोपित केलेला स्टिरिओटाइप भगत यांनी पुरस्कारला असल्याचे वाटत नाही.
(नवा स्टिरिओटाइप बनवण्याचा प्रश्नच नाही. जुनाच स्टिरिओटाइप इतका घट्ट आहे की त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला ते स्त्री-पुरुषांना देत आहेत).
अवांतर: चेतन भगत नेहमी क्रॆप लिहितात असे वाटत नाही.
प्रतिक्रिया
चेतन भगत यांचा मूळ लेख वाचला नाही. झा यांचे ब्लॉगपोस्ट वाचले. माझं इथे नोंदलेलं मत त्यावरच अवलंबून आहे.
माझं आकलन : भगत यांनी "भारतीय पुरुषांना आवाहन" करताना, गृहिणींची निवड करण्याऐवजी करीयर-ओरिएंटेड स्त्रियांना संधी द्यावी असा उपदेश केलेला आहे.
भगत यांनी काही गृहितके वापरलेली दिसत आहेत :
अ. सर्व भारतीय पुरुष लग्न करताना करीयर-ओरिएंटेड स्त्रियांऐवजी गृहिणींची निवड करतात.
आ. गृहिणी असणार्या व्यक्तींपैकी कुणीही स्वतःच्या निवडीनुसार गृहिणी असू शकत नाही.
इ. गृहिणी असणार्या व्यक्तींच्या वर्गाने आपापल्या कुटुंबाला लावलेला हातभार हा, करियर-ओरिएंटेड स्त्रियांच्या सहभागाच्या तुलनेत निम्नस्तरीय/नगण्य असतो.
ई. गृहिणी असलेली व्यक्ती करीयरसंदर्भात आपल्या नवर्याशी काहीही अर्थपूर्ण संवाद करू शकत नाही.
इत्यादि इत्यादि.
असो. झा यांनी घेतलेल्या समाचारानंतर कदाचित हे अधोरेखित व्हायला हरकत नाही की, विधानं करताना आपण विधानं नक्की कशासंदर्भात, कुणाला उद्देशून, कोणत्या उद्देशाने करतो आहोत, आपली काही गृहितकं आहेत का , ज्या आर्ग्युमेंट्च्या विरोधात आपण विधानं करतो आहोत त्यामधे काही खाचाखोचा आहेत की नाही, या सर्वाचं पुरेसं भान भगत यांनी राखलेलं दिसलं नाही. या सुटलेल्या भानामुळे जे लिहिलं गेलं त्यावर ही अशी प्रतिक्रिया आलेली आहे.