सध्या काय वाचताय? - भाग ३

दुसरा भागही लांबल्याने सगळ्यांच्या सोयीसाठी तिसरा भाग सुरू करतोय.
या धाग्याचा पहिला भाग इथे वाचता येईल, तर दुसरा भाग इथे वाचता येईल. पहिल्या भागात रोचना यांनी म्हटल्याप्रमाणे,
बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे.

गेल्या दोन धाग्यांतून उत्तमोत्तम माहिती मिळत आहेच. अनेक नवी पुस्तके अनेकांना समजली आहेत, त्यावर थोडक्यात असली तरी माहितीपूर्ण चर्चा होत आहे. काही पुस्तकांवरच्या मतांतरातून त्या त्या पुस्तकाचे वेगवेगळे आयाम समजून घेणे शक्य होत आहे. थोडक्यात मला या धाग्यामुळे बराच फायदा होतो आहे आणि खात्री आहे की अनेकांना होत असेल.

असो. मी सुरवात करतो:
आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे सध्या मी Hello, I love you, Good Bye नावाचे इंग्रजी पुस्तक वाचतो आहे. सातव्या गेल्या शतकाच्या दशकात 'वर्ल्ड टूर' करणार्‍या एकांड्या शिलेदाराचे हे प्रवास वर्णन आहे. काही बारीक निरीक्षणे अत्यंत रोचक आहेत. लेखन शैली सामान्य असली, तरी विविध देशांतील पद्धती, सामान्य लोक यांचे यथार्थ चित्रण आहे. 'बजेट' प्रवास असल्याने त्या त्या देशांतील स्वस्त हॉटेल, सहप्रवासी, स्वस्त खानावळी, तत्कालीन कम्युनिझमचा प्रभाव, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगैरेंची माहिती मिळतेच. शिवाय शीर्षकात म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या भेटलेल्या मुली, त्यांच्यात गुंतलेली मने आणि तुटलेले/तोडलेले किंवा सोडलेले संबंध यांचे वर्णन खुमासदार आहे. विविध देशांतील मुलींच्या तत्कालीन 'अ‍ॅप्रोचेबिलिटि'बद्दल हे पुस्तक उत्तम संकलन ठरावे (डोळा मारत) याव्यतिरिक्त लेखक काही देशांतील वेश्यांनाही भेट देतो तर काही ठिकाणच्या वैश्यांच्या उघड पृच्छेने आलेली किळसही दाखवतो. एकूणच वेगळे पुस्तक आहे.

चला तर तुम्हीही सांगा सध्या काय वाचताय?

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मुसाफिर - अच्युत गोडबोले

संपादकः
वाचकांच्या सोयीसाठी संपादकीय अधिकारात या प्रतिसादालाया नव्या धाग्यावर या इथे हलविले आहे.
यापुढील नव्या वाचनासाठी / प्रतिसादांसाठी पुढील भागाचा वापर करावा ही विनंती.

यापुढील नव्या पुस्तकाच्या

यापुढील नव्या पुस्तकाच्या प्रतिसादाचा नवा धागा तयार होईल याची नोंद घ्यावी (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इलियटचा निबंध

इलियटचा 'Tradition and Individual Talent' हा निबंध वाचतो आहे. मला समजले त्याप्रमाणे काही मुद्दे :

- कवीची आपली जाणीव भूतकाळापासून घेत असतो, पण ही जाणीव निरंतर विकसित होत राहिली पाहिजे
- कलाकाराची प्रगती म्हणजे स्व-त्याग आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विलय करण्याची निरंतर प्रक्रिया आहे.प्लुटोनियमची तार सल्फ्युरिक अम्ल तयार होण्याच्या प्रकियेत उत्प्रेरकाचे काम करते, या संपुर्ण प्रक्रियेत प्लुटोनियमवर कुठलाही परीणाम होत नाही.याच प्रमाणे - कवीचे/कलाकाराचे मस्तिष्क मानवी अनुभवावर पुर्णतः/ अंशतः काम करून आपली निर्मीती करत असते - मात्र त्याच्या अंतरातला दु:ख सहन करणारा माणूस आणि कविता लिहिणारं/निर्मीती करणारं त्याचं 'मस्तिष्क' या दोन गोष्टी वेगवेगळ्याच राहतात (किंबहुना चांगले कवी/कलाकार हे साधतात ).

- कविता म्हणजे भावनेचा बांध फोडणं नसून भावनेपासून दूर जाणं होय,कविता ही व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती नसून व्यक्तिमत्वापासून केलेलं पलायन (दूर जाणं) आहे.( माझ्या मते याचा अर्थ(काहीसा) असा होतो - तुम्ही ज्या भावनेवर/ संवेदनेवर लिहीता आहात - तिच्यापासून दूर जाऊन निरिक्षकाच्या तटस्थ भूमिकेतून लिहीणं/ भावनेचं निर्वैयक्तिकीकरण करणं)

हा निबंध http://www.poets.org/viewmedia.php/prmMID/20489# इथे वाचता येईल

"दि बुध्दा अँड हिज धम्मा "

"दि बुध्दा अँड हिज धम्मा " लेखक डॉक्टरेट बाबासाहेब आंबेडकर ,पृष्ठे सहाशे. पुस्तकाचा प्रकार :वैचारिक आणि संदर्भग्रंथ . प्रकाशन :बुध्दभूमि पब्लिकेशन ,नागपूर . महाबोधि सोसायटि कडून विनामूल्य वाटप होते . ठाण्याच्या गुरुकृपा बुकडेपोत हे फिकट हिरव्या रंगाचे पुस्तक मिळाले . आंबेडकरांनी लिहिलेले म्हणजे यामध्ये माहितीचा खजिना असणारच .त्यांचा स्वत:चा संस्कृत ,पालि ,अर्धमागधि भाषांचा सखोल अभ्यास होता .पूर्वग्रह न ठेवता विचार मांडले आहेत .बुध्दाच्या आयुष्याबरोबरच बुध्द धम्म आणि इतर धर्माचीही तुलना आहे .सोपी इंग्रजी आहे .हे पुस्तक मराठीतही आहे असे कळले . लेण्यांना भेट दिल्यावर तिथली चित्रे आणि शिल्पे कळण्यासही उपयोग होतो .

सध्या

नुकतीच दोन पुस्तके हातावेगळी केली. पहिले म्हणजे अनिल अवचट यांचे "शिकविले ज्यांनी" वेगवेगळ्या व्यक्तीचित्रांचा हा संग्रह. यात गांधी, फुले, पुल आणि लोहिया तर आहेतच पण जिऑलॉजीचे करमरकर सर , शेतीवाले धोंडे सर(यांचे नायजेरियात धोंडे पाटील म्हणून एक पुस्तकही भन्नाट आहे) ही स्वतःच्या विषय जगलेली व्यक्तीमत्वेही आहेत. दुसरे म्हणजे The music room अशा इंग्रजी नावाची महाराष्ट्रीय पार्श्वभूमीवरची सुंदर कादंबरी. गुरू धोंडूताई कुलकर्णींकडून शास्त्रीय गायन शिकतानाचा प्रवास सुंदरपणे अक्षरबद्ध झालाय.

आयझॅक बाशेविस सिंगर

बोलोन्या मध्ये 'साला बोर्सा' म्हणून एक पब्लिक वाचनालय आहे. बहुतेक सर्व विषयांवर पुस्तकं आहेत...पण अर्थातच मुख्यत्त्वे इटालियन भाषेत. तरी बर्याच पुस्तकांच्या इंग्रजी प्रतीसुद्धा कधीकधी शोधून सापडतात. इथे एखादं पुस्तक वाचावं वाटलं तर इंग्रजीत मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे मी असेच पुस्तकांचे शेल्फ चाळत फिरते. अचानक काही अनपेक्षित रित्या वाचनीय सापडतं.
मी दोन आठवड्यांपूर्वी 'आयझॅक बाशेविस सिंगर' ह्या नोबेल पारितोषक विजेत्या लेखकाचा कथासंग्रह आणला. मूळ 'यिडिश' भाषेत या लेखकाच साहित्य आहे. त्याच्या कथा त्यानीच मदतनीस घेऊन इंग्रजीत भाषांतरित केल्या आहेत. पहिल्या, दुसर्या महायुद्धाचा व त्यानंतरचा थोडा काळ त्याच्या कथांमध्ये आहे. सामान्य ज्यूंच्या चालीरीतींविषयी/आयुष्यांविषयी कुणाला जाणून घ्यायचे असल्यास त्याच्या कथांमधून माहिती मिळेल. पोलंडमधल्या खेड्यांमध्ये, अमेरिकेत, इस्राएल मध्ये कथा घडतात.
मला या कथा खूप आवडल्या. जरूर वाचायला आग्रह करेन.

कथासंग्रहाचं नाव काय आहे?

कथासंग्रहाचं नाव काय आहे?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'आयझॅक बाशेविस सिंगर-

'आयझॅक बाशेविस सिंगर- कलेक्टेड स्टोरीज'

वाङ्मयचौर्य

खूप वर्षांपूर्वी सिंगरच्या कथा वाचल्या होत्या. तेव्हा एका कथेचं कथानक खूप ओऴखीचं वाटू लागलं. मग लक्षात आलं की दिलीप चित्रेंनी ती कथा ढापून मराठीत आणली होती. एकेकाळी कॉलेजात कंडा माल असलेल्या एका मुलीकडून तेव्हा तिच्या जवळपासही पोचू न शकलेल्या आणि आता मध्यमवयीन असलेल्या मित्रांना अचानक भेटीविषयी विचारणा होते. त्या भेटीचा वृत्तांत अशी ती कथा होती.

(अवांतर : बोलोन्यातली पुस्तकांची दुकानं अगदी प्रेमात पडावी अशी आहेत. पब्लिक लायब्ररीही तशीच आहे का?)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो

"(अवांतर : बोलोन्यातली पुस्तकांची दुकानं अगदी प्रेमात पडावी अशी आहेत. पब्लिक लायब्ररीही तशीच आहे का?)"

हो, अगदी. 'साला बोर्सा' माझं बोलोन्यातलं आवडतं ठिकाण आहे. हे शहर सोडताना, आता 'साला बोर्सात' जाता येणार नाही म्हणून खूप दु:ख होईल.

'१९८४' आणि 'अ‍ॅनिमल फार्म'

जॉर्ज ऑरवेलची '१९८४' आणि 'अ‍ॅनिमल फार्म' ही दोन पुस्तके नुकतीच वाचली. दोन्हीही आवडली. 'ॲनिमल फार्म' तुलनेने सरळसोट वाटले जरा. '१९८४' डोक्याला बरेच खाद्य देणारे आहे.

सध्या दोन पुस्तकं एकदम वाचतोय

सध्या दोन पुस्तकं एकदम वाचतोय दुर्गा भागवतांचं “आठवले तसे” आणि गो. नि. दांडेकरांचे “स्मरणगाथा”

भागवत बाईनी राजवाडे, इरावती कर्वेना फाडलयचं फाडलय.....

स्मरणगाथा मात्र एकदम वेगळा वाचन अनुभव आहे.

गो.ग.आगरकर

समन्वय प्रकाशनाने १९व्या आणि २०व्या शतकातील काहि मौलिक पुस्तके वाचकांसाठी पुनर्प्रकाशित केली आहेत. त्यातील आमच्या घराजवळ लागलेल्या तुकाराम प्रतिष्ठानच्या स्टॉलवर केवळ प्रत्येकी रू.६० (प्रत्येक पुस्तक याच दरात होते) या दराने गो.ग.आगरकरांची "डोंगरीच्या तुरूंगातील आमचे १०१ दिवस" आणि "केसरीतील निवडक लेख" ही दोन पुस्तके घेतली आहेत. दोन्ही पुस्तके विविध लेखांचे संकलन आहे.

त्यापैकी आजच 'डोंगरीच्या तुरूंगातील आमचे १०१ दिवस' वाचायला सुरवात केली आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गेल्या आठवड्यात बद्री नारायण

गेल्या आठवड्यात बद्री नारायण यांचे "विमेन हीरोज अँड दलित एसर्शन इन नॉर्थ इंडिया" वाचले. उत्तर प्रदेशात गेल्या वीस वर्षांत बहुजन समाज पार्टीच्या उदयाच्या लागोलाग दलित चळवळीतून आलेल्या विविध ऐतिहासिक कथा, चरित्र, प्रबंध, नाटके, काव्य, इत्यादींचा अभ्यास. त्यात स्त्रीचरित्रे - झलकारीबाई, उदादेवी पासी, इत्यादी, आणि मायावतींच्या प्रतिमेचा या चरित्रांशी असलेला गुंतागुंतीचा संबंध याचा विशेष अभ्यास. १८५७ चा काळ या ऐतिहासिक चित्रणांमध्ये केंद्रस्थानी का व कसा आला, हा ही प्रश्न नारायण हाताळतात.
अत्यंत रोचक पुस्तक - यातील अनेक ऐतिहासिक व्यक्तींची मला प्रथमच ओळख झाली. मूळ कथा आणि नारायणांचे विवेचन दोन्ही, "इतिहास", "सामाजिक स्मृती" आणि "मिथ" यातील फरकांवर, एकाच ढाच्यातील घटना व पात्र कधी इतिहासात, तर कधी मिथकात कशा मोडू शकतात, याचे राजकीय, सांस्कृतिक कारणं काय, इ. वर विचार करायला लावतात. महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेशातील दलित चळवळींवर ही जाता जाता नारायण विचार मांडतात, पण ते फारसे जमले नाही.

आता विजय प्रशाद यांचे "अंटचेबल फ्रीडमः सोशल हिस्टरी ऑफ अ दलित कम्यूनिटी" वाचायला घेतलंय. दिल्ली इलाख्यातील भंगी समाजाचा गेले -दीड-दोनशे वर्षांचा इतिहास आहे. आधुनिक काळात पंजाब-मेरठ वगैरे परिसरातून झालेले लोकांचे दिल्लीकडे स्थलांतर, ब्रिटिश सरकाराच्या जात-धोरणामुळे "भंगी = सफाईकाम" हे मुनिसिपालिटीच्या शासनात झालेले समीकरण, पुढे फाळणीच्या वेळेस आलेले पंजाबातून आलेली नवीन मंडळी, १९४७-ओत्तर काळात समाजातील धार्मिक चळवळी, आणि १९८४ च्या शिखांविरुद्ध झालेल्या कत्तलीत भंगी समाजाचा हातभार, अलिकडे भाजपा-हिंदुत्त्वाकडे वळणारे काही, आणि अंबेडकरी चळवळीकडे वळणारे काही विरुद्ध प्रवाह.

कोणाला हवे असल्यास दोन्ही पुस्तकं लिबजेन डॉट इन्फो वर ही उपलब्ध आहेत.

बहुत रोचक!!! पाहतोच आता वाचून

बहुत रोचक!!! पाहतोच आता वाचून (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बोकिलांचं 'गवत्या' वाचलं.

बोकिलांचं 'गवत्या' वाचलं. शेवट अंमळ प्रेडिक्टेबल आणि 'पूर्ण भाग दवडणारा' झाल्यामुळे थोडी चिडचिड झाली, पण एकुणात पुस्तक आवडलेच. 'कोसला'इतके थोर नाही, पण त्याच्या जातीचे हे पुस्तक आहे. मी 'शाळा'नंतर बोकिलांच्या वाटेस गेले नसते, पण या पोस्टमुळे गेले, आणि पश्चात्ताप झाला नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"बालकांड"

ह मो मराठे यांनी स्वत:च्या लहानपणीच्या वर्षांवर लिहिलेलं लिखाण.

ही कादंबरी नव्हे तर आठवणी आहेत. अंगावर काटा येईल अशा आठवणी. चक्रम स्वभावाच्या वडलांच्या घेतलेल्या भयंकर निर्णयांच्या मालिकेतून झालेली कुटुंबाची धूळधाण, तान्ह्या भावंडांचा ओढवलेला मृत्यू , या फरपटीच्या दरम्यानची आईची बाळंतावस्था, तिच्या प्रकृतीचे हालहाल आणि तिचाही ओढवलेला मृत्यू, एकंदर अस्तित्त्वाच्या सीमारेषेवर म्हणता येईल असं काढलेलं संपूर्णपणे कोळपलेलं लहानपण. वाचताना नको नको होतं. अज्ञान, अडाणीपणा यातून माणसं जाताना आपण पहातो पण यालाच जर का घरातल्या पुरुषाचा कमालीचा चक्रमपणा, विक्षिप्तपणा, डोक्यात राख घालून घ्यायची वृत्ती, आणि कुटुंबीयांच्या स्वास्थ्याची तर सोडा पण त्यांच्या जगण्यामरण्याचीही पर्वा नसणं या सार्‍याची जोड असेल तर जे होईल ते यात आलेलं आहे. पुस्तक संपताना मनात जे आलं त्यालाच "दाटून आलेली अपार करुणा" असं म्हणत असावेत असा मला संशय आहे.

पुस्तकातला आणखी अनोखा भाग म्हणजे लोकांची एकमेकांशी बोलण्याची भाषा. हिचं नाव "चित्पावनी" असल्याचं प्रस्तावनेत मला कळलं. ही भाषा म्हणजे गो.नी. दांडेकर किंवा श्री ना पेंडसे यांच्यासारख्यांच्या लिखाणात आलेली कोकणची मराठी बोली नव्हे. ही काहीतरी निराळीच आहे. "दक्षिण कोकण, गोवा इथल्या चित्पावन ब्राह्मणांच्या घरात बोलली जाणारी भाषा." असं मराठे तिचं वर्णन करतात. काही उदाहरणं देतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ये मरे. तुझीच वाट बघचां सां. काल निरोप धाडलो सलो नीं ? सुपारी तयारी झाली से. तागडी घेवनी ये, म्हणीं ? मिळलो नाय ?" काका विचारायचे.

किंवा

"बेडे चोरूक इलास मां ? उत्तर देवा मरे. आणिक हिंमत आसली तर खाली उतरा. तंगडी मोडतंय एकेकाची. चोरी करूक इले मायझंये -"
आई म्हणाली "दोन चार जण सत नी ? मग तुम्ही नकां त्येंच्या नादाला लागों. आता नाय चोरनी नेव्वेचे ते बेडे".
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ऐसी अक्षरे"च्या वाचकांना काही अधिक माहिती भाषेबद्दल असली तर जरूर लिहावे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे पुस्तक "बालकांड" तर

हे पुस्तक "बालकांड" तर नव्हे?

तसे असेल तर मग प्रतिक्रियेशी शतशः सहमत आहे. करुणेपलीकडे दुसरी प्रतिक्रियाच नाही. आईचं भुंकणं असो किंवा अगदी मलमूत्र काढण्यापर्यंत केलेली तिची शुश्रूषा असो, सारखेच टचिंग आहे. अभिनिवेशरहित भावाने सगळे सांगितल्यामुळे अजूनच भिडते. किमानपक्षी दोन भावांचा तरी एकमेकांना आधार असतो तेवढाच एक दिलासेवजा आधार जाणवतो, बाकी सगळे कठीण आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

होय

"बालकांड"च.
(माझ्या प्रतिसादाच्या शीर्षकात त्याचं नाव आहे (स्माईल) )

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अर्र तेच्यामारी. तिकडे लक्षच

अर्र तेच्यामारी. तिकडे लक्षच गेले नव्हते. धन्यवाद (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

न र फाटकांनी लिहिलेले

न र फाटकांनी लिहिलेले लोकमान्यांचे चरित्र "लोकमान्य" वाचतोय. खच्चून डीटेल्स आहेत. केळकरांनी लिहिलेल्या त्रिखंडी चरित्रापेक्षा हे बरेच आवडले. डिटॅच्ड अ‍ॅनॅलिसिस हे या पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्य ठरावे. पण मजा म्हंजे पुस्तक १९७३ चे असूनही , टिळकांनी आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेल्या रिसर्चचा उल्लेख करत असताना, हडप्पाचा साधा निर्देशही करू नये हे खटकले. लेखक पुरातत्ववाला नैये हे मान्य करूनही हे जरा ऑड वाटले.

बाकी काही ठिकाणी टिळकांबद्दल अंमळ प्रतिकूलही लिहिले आहे. फारशी भीडभाड ठेवल्याचे जाणवत नाही. त्यामुळे आवडतेय.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

फाटकांची एकूणच लेखनशैली मस्त,

फाटकांची एकूणच लेखनशैली मस्त, नो-नॉनसेन्स आहे, मला फार आवडते. रामदास स्वामींवर चे पुस्तकही चांगले आहे, आणि तिथे राजवाड्यांवर अगदी कडक टीका आहे. चि. वि. वैद्यांनी गोडसे भटजींच्या "माझा प्रवास" छापताना केलेले फेरबदल ही पहिल्यांदा फाटकांनीच नजरेस आणले. ही वॉस अ गुड स्कॉलर.

न र फाटकांची अजून कुठली

न र फाटकांची अजून कुठली पुस्तके आहेत ते कृपया सांगावे. मिळतील तितकी सगळी घेऊन टाकतो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आजकाल सहज विकत मिळतील की नाही

आजकाल सहज विकत मिळतील की नाही शंका आहे, पण पुण्यात मंडळाच्या लायब्ररीत मिळावी. मी त्यांची सगळी पुस्तकं नाही वाचली, पण रामदासः वाङ्मय आणि कार्य, भारतीय राष्ट्रवादाचा विकास, आणि अनेक जुन्या पुस्तकांना लिहीलेल्या दीर्घ प्रस्तावना वाचल्या आहेत. वारकरी संतकवींवर बरेच लेखन आहे. लोकमान्यांसहित रानडे, गोखलेंवरही चरित्र लिहीले आहेत असे वाचल्याचे आठवते.

बहुत धन्यवाद पाहतो मंडळात

बहुत धन्यवाद (स्माईल) पाहतो मंडळात जाऊन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

जिलीअन फ्लिन चं शार्प

जिलीअन फ्लिन चं शार्प ऑब्जेक्टस् वाचलं. गॉन गर्ल वाचल्यानंतर मी या लेखिकेच्या प्रेमात पडलेले. शार्प ऑब्जेक्टस् वाचुन प्रेमाची गहराई अजुनच वाढली (स्माईल)
रेड ड्रेगन (हनिबल सिरीज) एवढंच हे पुस्तक देखील सायकॉलॉजिकली डिस्टर्ब करणार आहे.

Amazing Amy

विनंती

या लेखिकेच्या लिखाणाबद्दल थोडं अधिक लिहावं अशी विनंती. "सायलेन्स ऑफ द लँब्ज़" च्या धर्तीचं काही आहे काय ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सायलेन्स ऑफ द लँब्ज पेक्षा

सायलेन्स ऑफ द लँब्ज पेक्षा मला रेड ड्रेगन सारख जास्त वाटलं, कथानकाच्या दृष्टिकोनातून नाही पण एकंदर वाचकाला डिस्टर्ब करण्याच्या दृष्टिकोनातून.
या शार्प ऑब्जेक्ट्स पुस्तकात, तीशीतली, सेल्फ कटिँग टेँडन्सी घालवण्यासाठी मानसोपचार घेणारी नायिका नुकतीच रुग्णालयातून बाहेर पडलीय. शिकागोत चौथ्या क्रमांकचा खप असणार्या वृत्तपत्रात ती क्राइम रिपोर्टर म्हणुन काम करतेय. एडीटर तिला नवीन असाइनमेँट देतो, विँड गअॅप या तिच्या जन्मगावी जाण्याची. तिथे एक १० वर्षाँची मुलगी हरवली आहे. काही महीन्यांपुर्वी सिमिलर केस झाल्याने सिरीअल किलिँग असण्याची शक्यता आहे. तिथे गेल्यावर, लहान गावात चालणार्या 'गावगप्पा', डिसफंग्शनल फअॅमिली, चाइल्ड अब्युज आणि एकंदरच सायकोलॉजीकल ट्रॉमा असा सगळा प्रवास करुन शॉकिँग शेवट.
जिलीअन फ्लीन डज एवरिथिँग 'राइट'!

Amazing Amy

सहज HDR

सध्या बजेट वाचन चालू आहे

सध्या बजेट वाचन चालू आहे (डोळा मारत)

.

बॅरी ह्युगार्ट

याचे 'द ब्रिज ऑफ बर्ड्ज' हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. आता त्याचा दुसरा भाग 'द स्टोरी ऑफ द स्टोन' आता वाचायला घेतला आहे. या मालिकेत 'ली काओ' आणि 'नंबर टेन ऑक्स' या दोन पात्रांभोवती फिरणार्‍या आणि चीनमध्ये घडणार्‍या अद्भुतकथा आहेत.
मला फँटसी हा जाँर फार आवडतो. परंतु, त्याच त्याच छापाच्या ब्रिटिश आणि अमेरिकी अद्भुतकथा वाचून अलीकडे कंटाळा येऊ लागला होता. त्या पार्श्वभूमीवर ही पुस्तके बर्‍यापैकी आवडली. यांत नेहमीच्या पाश्चात्य फॉर्म्युल्याहून भिन्न कथा आहे. धाटणी थोडी आपल्याकडच्या अद्भुतकथांसारखी, म्हणजे जादूचा शंख इ. सारखी असली, तरी चिनी पार्श्वभूमीमुळे त्याला पुरेसे वेगळेपण लाभले आहे. शिवाय, अशा प्रकारची कथा असुनही, जागोजागी छान विनोद पेरले आहेत. आणि मजा म्हणजे, हे पुस्तक मुळात इंग्रजीत लिहिलेले असूनही, त्याची भाषा मात्र चिनी पुस्तकाचा अनुवाद केलेला असल्यासारखी आहे.

राधिका

प्रश्न

>>>परंतु, त्याच त्याच छापाच्या ब्रिटिश आणि अमेरिकी अद्भुतकथा <<<

याची काही उदाहरणं दिली तर वाचकांना साधारण तुम्ही काय म्हणता त्याची कल्पना येऊ शकेल...

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"वपुर्झा"...

व.पु.काळे यांचे "वपुर्झा" वाचतोय...
"अप्रतिम" आहे...

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

डेरिक जेन्सनचं "What We Leave

डेरिक जेन्सनचं "What We Leave Behind" वाचलं. मानवी कचर्‍याची विविध रुपे, त्याचा टिकाऊपणा, विल्हेवाट लावण्याचे प्रकार, 'एका प्राणिजातिचा मलोत्सर्ग हे दुसर्‍याचं अन्न' या तत्त्वाचा भंग, रिसायकलिंग-डाऊनसायकलिंग,डिझाईन्ड ऑब्सोलिसन्स, आजकालच्या सस्टेनेबिलिटीच्या कल्पना, छतावर झुडपं आणि हिरवळ लावून केलेले इको-फ्रेंडली कारखाने, समुद्रात रोज टनावारी जमा होणार्‍या मायक्रोप्लॅस्टिक पासून इराक युद्धात वापरल्या गेलेल्या DU शस्त्रांपर्यंत प्रदूषणाचा भडिमार आणि त्याचे परिणाम. ते परिणाम कमी भासवण्यासाठी कंपन्यांकडून केला जाणारा अपप्रचार, लपवाछपवी आणि त्याला, तथाकथित लोकांसाठी चालवल्या जाणार्‍या लोकांच्या, सरकारची साथ, टेक्नोटोपियाची कल्पना आणि धर्माच्या जोखडातून बाहेर पडून आता या टेक्नोपंथाच्या आहारी गेलेले लोक इत्यादी मुद्दे पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत. बर्‍याच लोकांना पुस्तकाचा टोन आक्रमक आणि अलार्मिस्ट वाटू शकेल. शेवटचा 'रेझिस्टन्स' चा भाग तर अनेक लोकांना हास्यास्पद वाटेल.
क्रॉनिक सिस्टिम जस्टिफिकेशनचा प्रॉब्लेम असणार्‍यांनी या पुस्तकापासून लांब राहिलेलेच बरे.

Hope is NOT a plan!

हे पुस्तक

या विषयात रस आहे. या पुस्तकाची ई आवृत्ती उपलब्द्ध आहे काय?

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

रोचक वाट्टेय पुस्तक.

रोचक वाट्टेय पुस्तक. बादवे

"क्रॉनिक सिस्टिम जस्टिफिकेशन" म्हंजे नेमके काय?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सिस्टिम जस्टिफिजेशन हा एका

सिस्टिम जस्टिफिजेशन हा एका पक्षपाताचा (बायस) प्रकार आहे.
System justification – the tendency to defend and bolster the status quo. Existing social, economic, and political arrangements tend to be preferred, and alternatives disparaged sometimes even at the expense of individual and collective self-interest.

Hope is NOT a plan!

ओह तसं होय. आता लक्षात आलं.

ओह तसं होय. आता लक्षात आलं. धन्यवाद (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

किम प्लोफ्कर यांचे

किम प्लोफ्कर यांचे "मॅथेमॅटिक्स इन इंडिया" हे वाचतोय. पार वैदिक काळापासून ते १६-१७व्या शतकापर्यंत भारतात गणिताचा कसा विकास झाला त्याबद्दल सांगणारे लै भारी पुस्तक आहे. मुख्य म्हंजे शुल्बसूत्र असो किंवा सूर्यसिद्धांत, त्यातले मुख्य मुख्य सिद्धांत अगदी सोप्या भाषेत आकृत्या काढून स्पष्ट केलेले आहेत. शिवाय अजून एक वैशिष्ट्य म्हंजे टनावारी रेफरन्सेस-मेनस्ट्रीम आणि रिव्हिजनिस्ट असे दोन्ही प्रकारचे. या पुस्तकाला समग्रतेचा टच देणारे अजून एक फीचर, जे अशा पुस्तकांत आढळतेच असे नाही- ते म्हंजे गणितज्ञांच्या वेळची सामाजिक परिस्थिती कशी होती, देवाणघेवाण कशी झाली असावी, इ. चा उहापोह पण मस्त केलाय.

आर्किओअ‍ॅस्ट्रॉनॉमिकल पद्धतीचा चक्क सीरियसलि उहापोह केलेला पाहून पहिल्यांदा अंमळ दचकलोच-पण मस्त मजा आहे. शिवाय ग्रंथांच्या डेटिंगसाठी म्हणून त्या लेखकांनी जी पॅरामीटर व्हॅल्यू डिराईव्ह केली त्याबरोबरसुद्धा स्टॅटिस्टिकली खेळल्यावर काय मजा होते हे दाखवायचा प्रयत्न केलाय. हा लै युनिक भाग आहे या पुस्तकाचा.

या पुस्तकाच्या निमित्ताने डेव्हिड पिंग्री नामक गणितेतिहासकाराचे नाव कळ्ळे हेही नसे थोडके.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एका डायरीची कहाणी

केट समरस्केल यांचे "मिसेस रॉबिन्सन्स डिसग्रेसः द डायरी ऑफ अ विक्टोरियन लेडी" काल वाचले. इसाबेला रॉबिन्सन या विवाहित महिलेने लिहीलेली खाजगी डायरी, ती वाचल्यावर तिच्यावर तिच्या नवर्‍याने आणलेला घटस्फोटाचा खटला, आणि त्याचा निकाल व निष्पन्न हा पुस्तकाचा मुख्य विषय आहे. पण त्या निमित्ताने लेखिका १९व्या शतकातल्या सामाजिक, वैचारिक घडामोडींचा व्यापक इतिहास उभा करतात. लग्नसंस्था व घटस्फोट याबद्दलचे तत्कालीन विचार आणि सामाजिक, धार्मिक आणि न्यायालयीन पातळीवर घडून आलेले बदल, फ्रेनॉलॉजी (माणसाच्या मेंदूच्या आकारावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा इतिहास) आणि गायनेकॉलॉजी सारख्या नवीन शास्त्रांचा उगम व त्यांच्यात स्त्रियांबद्दल - खासकरून त्यांच्या शारिरिक, लैंगिक गरजांबद्दल - बहुतेककरून उच्चवर्गीय पुरुषांनी मांडलेली मते व शास्त्रीय निष्कर्ष, हायड्रोपथी इत्यादी वैद्यकीय उपचारांचा उगम व प्रसार, खाजगी डायरीलेखन या प्रथेच्या निरनिराळ्या छटा, आधुनिक इंग्रजी समाजात या खाजगी/सार्वजनिक अवकाशांतला फरक व स्त्री-पुरुषांचे त्यांतील विषम स्थान, असे अनेक बहुविध पैलू पुस्तकात आहेत.

विक्टोरियन इंग्लंडच्या इतिहासा विषयी चांगले वाचन असलेल्याला कदाचित हे पैलू तेवढे नवीन वाटणार नाहीत. पण समरस्केल यांची लेखनशैली अप्रतिम आहे. अतिशय रोमांचकारक शैलीत त्या इसाबेलाच्या जीवनातील घटना, तिचे एडवर्ड लेन नामक डॉक्टर मित्रावर प्रेम, तिच्या आशा-निराशा, त्यांच्यातील संबंध, रेखाटतात. तिच्या पत्र-व्यवहार आणि डायरीलेखनातून तिच्या वाचनाचे, वैचारिक विश्वाचे तत्कालीन विचारविश्वाशी धागे जोडतात. व्यापक बदलांमध्येच छोटे छोटे, अत्यंत रोचक, तपशील देतात. इसाबेला ज्या हायड्रोपथी स्पा ला जात असे, तेथेच चार्ल्स डारविन येत असत - ऑरिजिन ऑफ स्पीशीज नामक पुस्तकाचे तेव्हा लेखन करत होते, व त्याबद्दल प्रचंड चिंतित होते - त्यांना गॅस चा फार त्रास होत असे, हे जाता जाता आपल्याला कळते. १८५०च्या दशकात सार्वजनिक डिवोर्स कोर्ट चालू होण्याआधी प्रत्येक घटस्फोटासाठी एक स्वतंत्र पार्लिमेंट चा अ‍ॅक्ट लागत असे - याच्या खर्च्यापायीच घटस्फोटाचे प्रमाण फार कमी होते. नवीन व्यवस्थेखाली अर्जांचा पहिल्या दशकातच प्रचंड "स्फोट" होतो, त्यातील काही अत्यंत करुण खटल्यांचा पुस्तकात आढावा आहे. नवीन, सुखवस्तू उच्च-मध्यम वर्गांनी याच काळात सकाळी नाश्ता, दुपारचे (लंच) आणि रात्रीचे (डिनर) स्वतंत्र जेवण ही व्यवस्था सुरू झाली - या आधी एकच मोठे दुपारचे डिनर, व रात्री टी अथवा सपरसाठी साधा आहार अशी प्रथा अनेक वर्गांमध्ये होती. तत्क्लालीन गर्भनिरोधक उपाय, वैद्यकीय परीक्षेच्या प्रथा.... बरेच काही आहे.

समरस्केल यांचे आधीचे पुस्तक अशाच एका केसमधून आधुनिक इंग्रज पोलीस व्यवस्थेचा आढावा घेतं. तेही अगदी रोचक, वाचनीय आहे.

डॉ. रखमाबाईंच्या गाजलेल्या खटल्यावर असाच रोचक, व्यापक इतिहास वाचायची इच्छा झाली.

अटोनमेँट वाचायला घेतलं होतं.

अटोनमेँट वाचायला घेतलं होतं. फारचं संथ आहे.. बोअर झालं म्हणुन १/४ वाचुन बाजुला ठेउन दिलं. भाषादेखील किँचीत अवघड वाटली. नेहमी मला चित्रपटापेक्षा पुस्तक वाचायला कधीही आवडतं. पण ट्रेलर पाहुन तरी असं मत झालय की या पुस्तकापेक्षा चित्रपट अधीक चांगला असावा. 'ब्रायोनीच्या मनात काय चाललय' हे चित्रपटात किती स्वच्छपणे येतय माहीत नाही, पण फक्त ट्रेलर वरुन तरी चित्रपट अधीक चांगला वाटतोय.
फ्रान्झ काफ्काच 'द ट्रायल' झालं वाचुन. झेपलं नाही मला हे पुस्तक. म्हणजे बेसिक स्टोरीलाइन कळली, 'K.' सोबत मीही चढत्या भाजणीने डिस्टर्ब होत गेले, पण बोअरदेखील झालं. कित्येकदा उगाच शब्दछल चालुय असं देखील वाटलं. कोणी सांगेल का की लेखकाला नक्की काय अभिप्रेत आहे? चिंजंनी 'पुणे-५२' बद्दल लिहीलय, तसं कोणी लिहीलय का या पुस्तकाबद्दल मराठी किँवा इंग्रजीत?

Amazing Amy

द ट्रायल बद्दल मी वर विचारलय,

द ट्रायल बद्दल मी वर विचारलय, त्याची माहीती मिळु शकेल का कोणाकडुन.

Amazing Amy

द ट्रायल चे परिक्षण

अस्मिता,
राज ने त्याच्या ब्लॉगवर 'द ट्रायल' पुस्तकाचे परिक्षण लिहिले आहे. यावरुन तुम्हाला नक्की मदत होईल

दोन पुस्तकं

नुकतीच हातावेगळी केली.
१. बेटर एंजेल्स ऑफ अवर नेचर - लेखक स्टीव्हन पिंकर. अतिशय माहितीपूर्ण पुस्तक. मानवाच्या इतिहासात सर्वच टाइमस्केल्सवरती हिंसा कशी कमी झालेली आहे हे तो आकडेवारीनिशी दाखवतो. (हजारो वर्षं - हंटर गॅदरर ते शेतकरी ते आधुनिक समाज - खुनाने किंवा हिंसेने मरण्याचं प्रमाण दहाएक टक्क्यावरून नगण्यावर आलं; गेली काही हजार वर्षं - बायबलच्या काळात दिलेली क्रौर्याची वर्णनं आता आपल्याला झेपत नाहीत, गेली काही शतकं - खुनांचं प्रमाण लाखात दरवर्षी ४० वरून २ वर आलंय, गेली काही दशकं - एकंदरीत गुन्हेगारीत घट....) तसंच आपल्याला विसावं शतक हे सर्वात युद्धग्रस्त वाटतं, पण इतर शतकंही तितकीच किंवा त्याहूनही अधिक भयंकर होती हे तो मुद्देसूदपणे मांडतो. वंशहत्या (जिनोसाइड) गेल्या काही दशकांत कसे कमी झालेले आहेत हेही सांगतो. या सगळ्यामागची वेगवेगळी सामाजिक आणि मानसिक कारणं (बळकट राज्यव्यवस्था, शिक्षण, व्यापाराचं वाढतं महत्त्व इ इ.) तो खोलात जाऊन मांडतो. अतिशय वाचनीय पुस्तक.

२. द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ - लेखक रिचर्ड डॉकिन्स. २००९ साली डार्विनच्या जन्माला २०० वर्षं पूर्ण झाली त्या निमित्ताने हे पुस्तक लिहिलं. डॉकिन्सने उत्क्रांतीवादाच्या वेगवेगळ्या अंगांवर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. उत्क्रांती कशी होते, उत्क्रांतीतून निःस्वार्थीपणा कसा येऊ शकतो, शरीरं आणि त्यापलिकडचं विश्वावर जनुकांचा परिणाम कसा होतो इ. इ. पण उत्क्रांतीवाद सिद्ध करणारे पुरावे नक्की कुठचे, यावर वेळोवेळी आलेल्या ओझरत्या उल्लेखांपलिकडे त्याने लेखन केलेलं नव्हतं. या पुस्तकात त्याने सगळे पुरावे सादर केलेले आहेत. डॉकिन्सबद्दल मला नेहेमीच आदर अशासाठी वाटतो, की तो तर्ककठोर आणि रिगरस लिखाण करत असला तरीही ते कुठेही कंटाळवाणं होत नाही. विज्ञानाचा चेहेरा हे कार्ल सेगाननंतर रिकामं झालेलं पद त्याच्याकडे चालून आलं आहे ते उगीच नाही. मात्र सेगनच्या लेखणीतून विज्ञानावर निखळ प्रेम दिसायचं. ते डॉकिन्समध्ये आहेच, मात्र त्याची भूमिका जास्त आक्रमक असते. त्यामुळे ती अधिक रंजकही होते. उत्क्रांतीवादाविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं.

भन्नाट

सोप्या कामाला महाकठीण बनवणारी १० पेटंट्स - एक भन्नाट कलेक्शन, लोक किती प्रतिभावान+कष्टाळू असू शकतात ह्याची अशक्य उदाहरणे.

१० पैकी मला आवडलेली - ७, ८ व ९(!!)

पालकनीतीचा फेब्रुवारी २०१३चा अंक

पालकनीतीचा फेब्रुवारीचा अंक वाचला. त्याच्या मुखपृष्ठावर श्री.दि.इनामदारांच्या 'ऋण' या सुंदर कवितेचे अहिरणी आणि गोरमाटि या भाषांत केलेली भाषांतरं दिलेली आहेत. आणि हे काय? याचा उलगडा 'संवादकीय' मधून होतो. तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथील कमळेवाडी नावाच्या तांद्यावर विद्यानिकेतन नावाची आश्रमशाळा आहे. तेथील मराठी भाषेचे शिक्षक 'श्री. शिवाजी आंबुलगेकर' यांच्या कार्याचा हा परिचय आहे. जेथील बोली-भाषा प्रमाणभाषेपेक्षा दूर आहे, त्या मुलांना प्रमाण भाषेतील कविता शिकवणं आणि त्यांनी ती शिकणं दोन्ही जिकीरीचं. अश्यावेळी मुलांनाच एकेक कविता आपापल्या बोली भाषेत अनुवादीत करायला प्रवृत्त करणार्‍या आंबुलगेकरांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
याच अंकात पुढे वेगवेगळ्या भाषांत भाषांतरीत प्रसिद्ध कविता भेटतात. नारायण सुर्वे, बासी मर्ढेकर वगैरेंपावगैरेंपासून, जनाबाईंचे अभंगही कही वडारी, दखनी मुसलमानी, पारशी, गोरमाटी वगैरे भाषांतील छान अनुवाद समोर येतात. या अनुवादांमुळे कविता मुलांपर्यंत कशी पोचते, त्या ऐकतामा त्यांच्या डोळ्यांतील चमक बघायला तिथेच जावं लागेल हे संवादकीय लगेच पटतं.

बाकी, The English Teacher आणि गाव-गाडा हे त्रिंबक नाराण आत्रे यांचे पुस्तक वाचत आहे. (या जुन्या मुल्यवान पुस्तची प्रत -गावगाडा ची पीडीएफ - इथे आहे. मी समन्वय प्रकाशनाने पुनर्प्रकाशित केलेली आवृत्ती विकत घेतली आहे ती वाचतो आहे)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्खनन

गौरी देशपांडे यांचे उत्खनन वाचले. अतिशय आवडले.
काही पुस्तके वाचुन एखादे 'कोलाज' बघितल्यासारखे वाटते, तर रिटा वेलिणकर सारखी पुस्तके नात्यांची वीण बांधुन सुरेख गालिचा तयार करतात. तसे हे पुस्तक मला ललितलेखनातील "क्युबिझम"सारखं वाटलं. कथा नायिका स्वतःला एका दृष्टिकोनातून बघत असतेच, पण ती स्वतःची प्रतिमा अनेकांच्या दृष्टीकोनातूनही बघते आणि या सगळ्यातून तीने स्वतःचं स्वतःपुरतं केलेलं हे उत्खनन मला अतिशय आवडलं. कथेत भरपूर पात्रे आहेत. ती आपल्याला पूर्णपणे कधीच भेटत नाहीत, जी दिसतात ती नायिकेच्या नजरेतून आणि ती ही बहुतांश वेळा नायिकेशी संबंधित घटनांतून, वक्तव्यांतून.. माणूस सतत स्वतःच्या शोधात असतो.. आपल्यातल्या 'स्व'चा शोध घेताना इतरांच्या मनातील आपल्या प्रतिमेला समजून घेत, जपत, बदलण्याचा प्रयत्न करत, कधी सोडून देत, या सार्‍यातून आपल्या मनात स्वतःची एक बहुआयामी प्रतिमा तयार होत असते. हे जे सारं होणं आहे ते या पुस्तकात अगदी ताकदीने उतरलंय!

पुस्तक विकत घेतल्याचे समाधान मिळाले..

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ब्रदर्स कारमाझॉफ

दोस्तोव्स्कीचे ब्रदर्स कारमाझॉफ वाचायला घेतले आहे - नेटाने पुर्ण करावयाचा विचार आहे...(अनुवादक - कॉन्स्टन्स गार्नेट)

:)

http://www.gutenberg.org/files/28054/28054-h/28054-h.html

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मेंदूच्या मनात

सध्या मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचतो आहे.मनोरंजक तसेच माहितीपूर्ण आहे. अंधश्रद्धा मानवी मनाचा म्हणजे मेंदुच्या रचनेतीलच एक भाग आहे हे जाणवल.त्याची उपयुक्तता आहे म्हणुन त्या टिकून आहेत.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सध्या हिरोडोटस वाचायला घेतलाय

सध्या हिरोडोटस वाचायला घेतलाय नुकताच. त्याच्या हिस्टरीजचे पहिले बुक वाचून झाले. एमायटी क्लासिक्सआर्काईव्ह हा एक लै भारी प्रकार आहे. होमर, अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो, सीझर, इ. जी जी नावे भावमारू सर्कल्समध्ये कायम ऐकण्यात येतात, त्यांचे वाङ्मय मस्त जुनाट इंग्रजीत भाषांतरित केलेले आहे. तिथे हे सगळे मिळाले.

भाषांतरावरून जाणवत राहते ती हिरोडोटसची अनबायस्ड आणि तर्कसंगत विचाराला प्राधान्य देणारी वृत्ती. पिसिस्ट्राटसने अथीनियन लोकांना गंडवल्याचा वृत्तांत असो किंवा जुनाटपणाबद्दलचा वाद असो, कुठेही हात राखून सांगत नाही. आता यातही मजा म्हंजे तो "सदाशिवपेठी ग्रीक" नव्हता, दक्षिण ग्रीसमधला नव्हता तर इजीअनच्या दुसर्‍या तीरावरचा होता, म्हणून तो असे लिहू शकला असेही अर्ग्युमेंट वाचलेय. अर्थात हे इतर पेठी ग्रीकांचे साहित्य वाचल्याखेरीज सांगणे अवघड आहे म्हणा. पण असो. खूप रोचक आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

प्रश्न विचारतो

एक अज्ञानमुलक की अज्ञानमुलजन्य प्रश्न विचारतो. ये हिरोडोटस क्या है?
"अरे ये हिरोडोटस नही जानता!!" याहून अधिक विस्ताराने वाचायला आवडेल (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिरोडोटस हा इसपू ५ व्या

हिरोडोटस हा इसपू ५ व्या शतकातील एक ग्रीक लेखक होता. फादर ऑफ हिस्टरी म्हणतात त्याला. कारण ऐतिहासिक घटनांची पाळेमुळे दैविक कारणांवर अवलंबून नसून माणसांच्याच कृत्यांमुळे त्या घटना घडायच्या तशा घडतात, हे सांगणारा तो पहिला ग्रीक मानला जातो. त्याचे "हिस्टरीज" हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे. ग्रीक-पर्शियन युद्धे आणि त्या अनुषंगाने विविध लोक, प्रदेशादींची चिकित्सक पद्धतीने घेतलेली माहिती हे त्या पुस्तकाचे विशेष आहेत. मी पूर्ण वाचले नाही, जस्ट सुरू केलेय.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

प्राची देशपांडे यांचे

प्राची देशपांडे यांचे "क्रिएटिव्ह पास्ट्स- हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया" हे पुस्तक वाचले नुकतेच. २१० पानांचे लहानसे पुस्तक आहे, पण मालमसाला भरपूर आहे. मराठीतील मराठा इतिहासलेखनाचा सर्वंकष मागोवा घेणारे माझ्या माहितीतले तरी हे पहिले पुस्तक आहे. काही रोचक मुद्द्यांचा आढावा घेतलाय त्यात ते मुद्दे असे:

१. बखरी, शकावल्या, इ. मधून सुरुवात करून मग ग्रँट डफपर्यंत येताना संस्थात्मक आणि लेखनाच्या शैलीसंबंधित कोणकोणते बदल झाले?

२. "मराठी", "मराठा", "महाराष्ट्र", या संकल्पना सततच्या लेखनामुळे आणि त्यांच्या प्रसारामुळे समाजात कशा आणि किती खोलवर झिरपत गेल्या?

३. जातीयवाद, हिंदुत्ववाद, स्त्रीवाद, साम्यवाद, इ. दृष्टिकोन मराठा इतिहासाला कोणी कोणी कसे लावले, त्याचा कसा उपयोग आपापली विचारसरणी पुढे दामटण्यासाठी कसा वापर करून घेतला?

४. मराठा इतिहासाचे एक विशिष्ट चित्रण जे आपण पाहतो, त्याचा उगम कुठेय? महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा इतिहास भारतभर हिंदू अभिमानाचे प्रतीक म्हणून कसाकाय मिरविला जाऊ लागला, त्याला विरोध कोणी केला?

५. ब्रिटिशांना प्रत्त्युत्तर म्हणून सुरुवातीचे इतिहासकार लिहीत, सुरुवातीच्या बहुसंख्य ब्राह्मण असलेल्या नॅशनॅलिस्ट इतिहासकारांना प्रत्त्युत्तर म्हणून ब्राह्मणेतर इतिहासकार लिहीत. त्यांचा परस्परसंबंध कसा होता? विशेषतः ब्रिटिश:बहुसंख्य ब्राह्मण इतिहासकार=बहुसंख्य ब्राह्मण इतिहासकार:बहुजन इतिहासकार हे समीकरण.

६. नाटके, सिनेमा, पोवाडे, इ. माध्यमांचा सहभाग या सर्व गोष्टींत कितपत होता, कसा होता? वेगवेगळ्या लोकांची चरित्रे खुलवून सांगण्यासाठी शिवाजीची उपमा देणे कसे चालायचे, इ.इ.

७. राजवाडे, भारत इतिहास संशोधन मंडळ, इ. चे कार्याचा उत्तम आढावा घेतला आहे.

विषयाचा आवाका अतिशय व्यापक आहे आणि पुस्तकाचा पसारा सीमित आहे. त्यामुळे अजून विस्तृत विवेचनाला लै वाव आहे. शैली म्हणाल तर टेक्श्च्युअल क्रिटिसिझम अतिशय लिबरली वापरल्यामुळे निव्वळ पुराव्यापलीकडचे विवेचन वाचायला मजा येते. काही मायनर मुद्द्यांचा कव्हरेज नसणे वगळले तर हे पुस्तक खूप काँप्रिहेन्सिव्ह आहे, मी अवश्य रिकमेंड करेन.

अवांतरः हे पुस्तक वाचताना शेल्डन पोलॉकची शैली आठवत होती पदोपदी. तो ग्रूप साधारण अशाच पद्धतीची पुस्तके लिहितो असे दिसते. मजा येते वाचायला.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धन्यवाद

प्रतिसाद अतिशय आवडला.

हे पुस्तक छापील स्वरूपात वाचलं की ई-कॉपी ? संपूर्ण पुस्तक गूगल वर उपलब्ध आहे काय ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद हे पुस्तक छापील

धन्यवाद (स्माईल)

हे पुस्तक छापील स्वरूपात वाचलं. गूगल बुक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे (माझ्या प्रतिसादात लिंक आहे), पण अर्थातच संपूर्ण नाही. पर्मनंट ब्लॅक म्हणून एक वेबसाईट आहे, तिथून हे विकत घेतलं. किंमत आहे ६५०/-, बाकी खर्च ९०/- असे मिळून ७४०/- ला पडते.

http://www.orientblackswan.com/search.asp?txt1=prachi+deshpande&list1=2&...

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धन्यवाद

धन्यवाद.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आणि...

काल सावित्री वाचले! (खरंतर इथेच थांबायला हवे, पण जित्याची खोड.. असो.)
ज्यांनी वाचले असेल त्यांना माझ्या आजच्या स्थितीचा अंदाज यावा.. काहितरी बरेच मिळाल्यासारखे तरीही काहितरी निसटतेय असे वाटते आहे.. माझ्या चिमुकल्या मेंदुवर बराच ताण आल्याने यावर अधिक लिहिणे शक्य नाही

एकूणात जर माझ्यासारखे हे पुस्तक वाचायचे बाकी असलेले अभागी जीव असतील तर विनाविलंब हे पुस्तक मिळवून वाचा! मला प्रचंड आवडले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तूही सावित्रीमय झाल्याबद्दल आनंद झाला.

तू ही सावित्रीमय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ऋ.

सावित्री नंतर पुशिंचे मातृका आणि अवलोकिता देखील जरुर वाच. पण बहुतेक अवलोकिता बाजारात कधीचे नाहिये. मातृका मात्र मिळावे.

Saphia Azzeddine

हमीद दलवाईंना काय म्हणावं, असा प्रश्न वाचून मनोरंजन झालं. त्यांच्या चळवळीचं नाव 'मुस्लिम सत्यशोधक समाज' असं आहे. तुम्ही मुस्लिम स्त्री असतात तर काय झालं असतं, ह्या प्रकारचे उपरोधिक प्रश्नसुद्धा रोचक वाटले. धागा पुस्तकांचा आहे म्हणून मी युरोपातल्या एका लाटेचा उल्लेख करेन. आपल्याकडे जशी दलित आत्मकथनाची लाट आली होती आणि तीमधून अनेक सवर्णांचे जसे डोळे उघडले, तद्वत सध्या युरोपात मुस्लिम स्त्रियांच्या आत्मकथनाची लाट आलेली आहे. त्यातलं मला विशेष आवडलेलं पुस्तक फ्रेंचमध्ये होतं. 'अल्लाशी हितगुज' (Confidences à Allah) असं त्याचं शीर्षक आहे. लेखिका साफिया अझेदीन (Saphia Azzeddine) म्हणून आहे. अधिक माहितीसाठी गूगल सर्च आणि ट्रान्स्लेट वगैरे वापरा. ते पुस्तक अल्लाला अक्षरशः शिव्या घालतं. मराठीत त्याचं भाषांतर करायला मला आवडेल्, पण (हिंदू पुरुष असूनही) भीती वाटते. (स्माईल)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या लाटेचा युरोपातील किंवा

या लाटेचा युरोपातील किंवा अजून कुठल्याही मुस्लिम समाजावर कसा परिणाम होईल किंवा होतोय, हे पाहणे लै रोचक ठरावे. याबद्दल एखादा लेख वगैरे तुमच्या पाहण्यात आहे का? मला आपले वाटते की अशी आत्मकथने वाचून युरोपियनांचा इस्लामबद्दलचा तिटकारा अजूनच वाढेल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बातमी

आताच फेसबुकवर वाचल की आयडीअल बुक डेपोत कोणतेही पुस्तक म्हणे ५० रुपयात मिळते. आता ऊद्या जाऊन बघायला हव. ईथे मुंबईत कोण राहात असेल तर कोणाला काही माहीत आहे????

.

हो, मी जाऊन आले.

सावरकरांची नाटके, ६ सोनेरी पाने सारखी काही पुस्तके, नारायण धारप, नाथमाधव, विठ्ठल हडप, तिबिले यांची काही पुस्तके (नव्या आवृत्ती) प्रत्येकी ५० रु. या दराने विक्रीला ठेवली आहेत. प्रदर्शन खास नाही. मला आवडेलसे एकही पुस्तक नव्हते.

राधिका

स्मृतिचित्रे हे एकमात्र

स्मृतिचित्रे हे एकमात्र इंट्रेस्टिंग पुस्तक. तेही ठाण्यात नाहीच. १ तारखेनंतर येईल म्हणे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यावाद राधिका

एकदोन दिवसात जमल तरच जाऊन यीईन.

.

फेसबुकची माहितीची लिंक

जाई फेसबुकवरची ही लिंक पाहिलीत का?
https://www.facebook.com/photo.php?fbid=10200421030707609&set=a.10200140...

नसेल तर यावरुन मदत व्हावी... (स्माईल)

सागर लिंक पाहिली पण कन्टेट

सागर लिंक पाहिली पण कन्टेट नॉट अव्हेलेबेल असा मेसेज येतोय

.

लिंक आणि इमेज

जाई बहुदा लिंक डिलिट अथवा प्रायव्हेट झाली असावी

https://www.facebook.com/photo.php?fbid=331268843652279&set=a.3312688369...

ही लिंक ट्राय करा. मी स्वतः उघडून पाहिली आहे. यावरुन माहिती मिळावी

जे एम कोएट्झी

जे एम कोएट्झी या दक्षिण आफ्रिकन लेखकाची "डिसग्रेस" नावाची कादंबरी. हिला १९९९ चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.

-----स्पॉईलर अलर्ट : सुरवात-----

सुमारे सव्वादोनशे पानांची कादंबरी. केपटाऊनमधल्या डेव्हिड ल्युरी नावाच्या एका वयस्क इंग्रजी प्राध्यापकाच्या आयुष्यात सुमारे सहा महिन्यांच्या काळात घडलेल्या घटनांचा आलेख. दोनदा घटस्फोट झालेल्या या प्राध्यापकाचं आपल्या एका विद्यार्थिनीबरोबरचं प्रकरण घडतं. प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्याला राजीनामा देऊन जाणं भाग पडतं. यानंतर तो गावाकडे राहत असलेल्या आपल्या मुलीच्या फार्महाऊसवजा जागेत काही काळ घालवतो. या दरम्यान फार्महाऊसवर काही हिंसक घटना घडतात. या घटनांशी दक्षिण आफ्रिकेतल्या सद्यपरिस्थितीतल्या वर्णसंदर्भातल्या काही गोष्टींशी जवळचा संदर्भ असतो. या घटनेमुळे ल्युरी आणि संबंधित व्यक्ती यांची ढवळली गेलेली आयुष्यं असा सगळा पट.

-----स्पॉईलर अलर्ट : शेवट-----

संपूर्ण कादंबरी ल्युरीच्या पर्स्पेक्टिव्हने - परंतु तृतीय पुरुषी निवेदनामधे - लिहिली गेलेली आहे. छोटी छोटी वाक्यं. आणि हो - निवेदनात वर्तमानकाळ वापरल्यामुळे अभिप्रेत असलेला तुटकपणा अधिकच परिणामकारक रीतीने पोचवला जातो. छोटंसं उदाहरण घेऊ. "Like a leaf on a stream, like a puffball on a breeze, he has begun to float towards his end.". या वाक्यात पहा. he has begun to float हे रूप वापरल्यामुळे त्यामागचा तुटकपणा ही एक निरंतर प्रक्रिया आहे हे अधिक गडदपणे व्यक्त होते असं मला वाटलं.

"डिसग्रेस"चं माझ्या मनातलं भाषांतर आहे "लांच्छन". लांच्छनास्पद परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तीचा जगाकडे पहाण्याचा अँगल , ल्युरीचं हे असं तुटलेपण, स्त्रिया, लैंगिकता याबद्दलची त्याची मतं, एकंदरीतच आजूबाजूच्या जगाबद्दलची त्याची टोकदार मतं हा या कादंबरीचा गाभा आहे असं मला वाटलं.

ताजा कलम : नुकतंच मला कुणी सांगितलं की "कोएट्झी" चा दक्षिण अफ्रिकन उच्चार "कूट्झी " असा आहे.... धन्यवाद.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शिवरात्र

शिवरात्र वाचुन झाले. त्यातील बहुतांश प्रकरणे म्हणजे डोक्याला खाद्य आहे.
हे ही मान्य करावे लागेल की त्यांची शेवटची प्रकरणे (मुसलमानांच्या प्रश्नावरची) इतकी मुद्देसुत आणि प्रभावशाली आहेत की माझ्या काही मतांचा पुन्हा मुळातुन विचार करणे भाग पडले आहे. (समान नागरी कायदा त्यापैकीच एक)
प्रत्येकाने एकूणच वेगळा राजकीय परिप्रेक्ष्य मिळवण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक!
(शिफारसीबद्दल सागरचे आभार!)

आजच हमीद दलवाईच इंधन वाचायला घेतले आहे. कोकणातील खेड्यांमधील 'ग्राऊंड रिअ‍ॅलिटी' तीही एका (चक्क) नास्तिक मुसलमानाच्या दृष्टिकोनातून वाचायला मजा येत आहे.एखाद दिवसात संपावे असे पुस्तक आहे.

याच्या पुढे पु.शि. रेग्यांची सावित्री वाट पाहते आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंधन च्या शिफारसी बद्दल धन्यवाद ऋ

ऋ, शिवरात्र माझेही या आठवड्यांत वाचून होईल. शिवरात्र वर तू काही लिहू शकलास तर आनंद होईल. (स्माईल)
तुला कुरुंदकरांचे शिवरात्र आवडले आणि या पुस्तकाने तुझ्या मुळातच विचारी असलेल्या बैठकीला एक वेगळा पैलू मिळवून दिला याचा खरोखर आनंद झाला. आता कुरुंदकरांच्या बाकीच्या पुस्तकांच्या मागे तू लागशील याची खात्री आहे (स्माईल)

इंधनच्या शिफारसी बद्दल धन्यवाद. हे पुस्तक आजच इतर २-३ पुस्तकांबरोबर ऑर्डरवतो. वर परा ने 'नपेक्षा' बद्दल सांगितले आहे तेही घ्यायचे आहे.

पु शि रेग्यांची सावित्री तू लवकरच वाचणार आहेस हे जाणून आनंद झाला. अगदी छोटेसे पण वेगळाच आनंद देणारे असे हे पुस्तक आहे. तुझे मत ऐकायला आवडेलच. सावित्री मधील जीजीविषा (हा मूळ हिंदी शब्द जसाच्या तसा पु.शिंनी सावित्रीत वापरला आहे) शब्दाचे परिमाण ध्यानात घेऊन नक्की वाच. (स्माईल)

"नास्तिक मुसलमानाच्य" हा

"नास्तिक मुसलमानाच्य" हा शब्द्प्रयोग चुकिचा आहे. मुसलमान माणुस नास्तिक किंवा साम्यवादी असु शकत नाही. मुसलमान नास्तिक झाला की तो लगेच तो धर्माबाहेर होतो.

पण मग अश्या मुसलमान

पण मग अश्या मुसलमान धर्मियांना काय म्हणावे?
नास्तिक ऐवजी विवेकवादी म्हणावे का? (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जसे "स्वच्छ मळका" असे आपण कोणाचे वर्णन करु शकतो का?

नास्तिक म्हणा किंवा विवेकवादी, ह्या दोन्ही शब्दांबरोबर मुसलमान हा शब्द जात नाही.

जसे "स्वच्छ मळका" असे आपण कोणाचे वर्णन करु शकतो का?

हिंदू धर्मात विवेकवादी काही

हिंदू धर्मात विवेकवादी काही आकाशातून पडले नाहीत. हिंदू धर्ममार्तंडांनी अशा लोकांचे जिणे सुकर केल्याच्याही कथा ऐकिवात नाहीत. असे विरोध पचवून अनेकानेक विवेकवादी, नास्तिक, सुधारक जेव्हा धर्मात होऊन गेले, तेव्हाच हिंदू धर्म आजच्या अवस्थेला येऊन पोचला आहे.
उगाच 'स्वच्छ-मळका' वगैरे धर्माधारित चिखलफेक करण्याचे काम नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

@ मेघना - मी काय म्हणतो आहे

@ मेघना - मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला कळले नाही. मला इतकेच म्हणायचे होते की हिंदु नास्तिक असु शकतो, आस्तिक असु शकतो, साम्यवादी असु शकतो. पण मुसलमान नास्तिक असु शकत नाही. जर एखादा मुसलमान नास्तिक झाला तर त्याला मुस्लिम धर्मात गणले जात नाही ( मुसलमानांकडुन ). ऱोटी बेटी व्यवहारातील बेटी व्यवहार पुर्ण पणे थांबतो. म्हणुन "नास्तिक मुसलमान" असु शकत नाही. तो एकतर नास्तिक असतो किंवा मुसलमान. दोन्ही एकाच वेळी नाही.

तुम्ही फक्त हिंदु कींवा क्रिस्चन धर्मावर आणि त्यांच्या so called धर्ममार्तंडांवरच टिका करु शकता हे लक्षात घ्या आणि नशिबाचे आभार माना. मेघनाच्या अ‍ॅवजी मुमताज म्हणुन जन्माला आला असता तर बुरखा घालुन बसावे लागले असते.

@प्रसादमी काय म्हणते आहे ते

@प्रसाद
मी काय म्हणते आहे ते तुम्हांला कळलेले दिसत नाही.
जगातल्या सगळ्याच धर्मातले बडवे (त्यांची नावे निरनिराळी असतात) नास्तिक, विवेकवादी, धर्मसुधारक माणसांना धर्मबाह्य ठरवण्यासाठी अहमहमिकेने पुढे सरसावत असतात, कारण अशी माणसे धर्मात असणे त्यांच्या स्वार्थासाठी हिताचे नसते. तशी तर आगरकरांचीही जिवंतपणी प्रेतयात्रा काढलीच होती अशा लोकांनी. ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले होते. तुकारामांना वह्या बुडवायला लावल्या होत्या. हमीद दलवाईंना मुस्लिम मानायला नकार दिला होता.
पण हे लोक नाही ठरवत आपला धर्म. आपले धर्माचरण ठरवण्याचा हक्क वा नाकारण्याचाही हक्क या देशाची घटना आपल्याला देते. म्हणून कुठल्याही धर्माचा माणूस तो निवडेल तेव्हा नास्तिक, विवेकवादी, सुधारणावादी वर्तन करू शकतो आणि तरीही धर्मात असण्याचा हक्क बजावू शकतो.
राहता राहिला प्रश्न मी मुमताज असते तर हे बोलू शकले असते की नाही, मला बुरखा घालावा लागला असता की नाही - याचा. तो मी योग्य प्रकारे आणि माझ्या अधिकारांचे रक्षण करून खंबीरपणे सोडवला असता, याची खातरी बाळगा. माझ्या धर्मातल्या संकुचित विचारांच्या लोकांचा प्रतिवाद करतेच आहे की ठामपणे. काळजी नसावी.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

राहता राहिला प्रश्न मी मुमताज असते तर हे बोलू शकले असते की नाही, मला बुरखा घालावा लागला असता की नाही - याचा. तो मी योग्य प्रकारे आणि माझ्या अधिकारांचे रक्षण करून खंबीरपणे सोडवला असता, याची खातरी बाळगा. माझ्या धर्मातल्या संकुचित विचारांच्या लोकांचा प्रतिवाद करतेच आहे की ठामपणे. काळजी नसावी.

सोहेला अब्दुलाली या नावाने ५०-५२ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या एका (जन्माने) भारतीय स्त्रीचे दोन लेख वाचल्यानंतर याची खात्री पटली आहे.

भारत हा सेक्यूलर देश आहे. त्यामुळे भारत देशात प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचं आचरण, आपापल्या पद्धतीने करण्याची मुभा आहे. हमीद दलवाई यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मुस्लिम धर्माचं आचरण करण्याचा हक्क आहे. त्याबद्दल अन्य कोणतीही व्यक्ती त्यांना धर्माबाहेर काढू शकत नाही. रोटी-बेटी या समाजव्यवहारांबद्दलच म्हणत असाल तर तुम्ही जात मानता का?: विश्लेषण या धाग्याकडे निर्देश करत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आहे. यावरून का कोण जाणे

सहमत आहे. यावरून का कोण जाणे "मैत्र" मधील हमीद दलावाईंचं व्यक्तिचित्र आठवलं. (बहुदा त्याच्याही सुरवातीला वरच्यासारखीच वाक्य आहेत म्हणून असेल कदाचित. मुसलमान धर्मात राहुन नास्तिक राहण्याचे पराक्रम करणारेही काही आहेत हे नक्की आणि अश्याच लोकांमुळे समाज बदलत असतो हे ही खरंच)

बाकी ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी मैत्र मधील हे चित्र जरूर वाचा!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे वस्तुस्थितीला धरुन नाही.

मुसलमान धर्मात राहुन नास्तिक राहण्याचे पराक्रम करणारेही काही आहेत हे नक्की>>> हे वस्तुस्थितीला धरुन नाही.मुसलमान लोक दलवाईंना मुस्लिम मानत नव्हते. आत्ता त्यांच्या घरापासुन साहित्य दिंडी काढायला स्थानिक मुसलमानांचाच विरोध होता.

जर तुम्ही मुसलमान म्हणुन जन्माला आले असाल तर तुम्ही एक तर नास्तिक म्हणुन तरी राहु शकता किंवा मुसलमान म्हणुन.

मुसलमान लोक दलवाईंना मुस्लिम

मुसलमान लोक दलवाईंना मुस्लिम मानत नव्हते.

हे असत्य आहे. त्यांचा उल्लेख अजूनही A Muslim social reformer, thinker, activist असाच सर्वत्र केलेला मी बघितला, वाचला आहे. त्यांनी मुस्लिम स्त्रियांना संघटित करून केलेले समाजकार्य लाजवाब आहे. त्यांना मुस्लिम धर्ममार्तंडांकडून पाठिंबा नसेलही (तो हिंदु धर्मसुधारकंनाही नसतो) सामान्य मुस्लिम स्त्रीयांनी तरी नक्कीच पाठिंबा दिलेला आहे.

काही लेख वाचनीय आहेतः
Remebering Hamid Dalwai
Double Defeat

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

A Muslim social reformer, thinker, activist असाच सर्वत्र केलेला

A Muslim social reformer, thinker, activist असाच सर्वत्र केलेला >> हे कोण म्हणते आहे? सर्वत्र म्हणजे non-मुस्लिम लोकांकडुन.

म्हणजे दलवाईंची अवस्था त्रिशंकू सारखी झाली.

नुकतेच

'नपेक्षा' हे अशोक शहाणे ह्यांचे पुस्तक वाचून पूर्ण केले (धन्स टू नंदन). सामाजीक विचारांना एक वेगळी दिशा तर मिळालीच, पण आपले काही विचार किती एकांगी आहेत ह्याची देखील जाणीव झाली.

लेखन वाचून झपाटल्याने, अशोक शहाणेंच्या इतर लेखनाचा शोध आंतरजालावरती घेतला. त्यावेळी त्यांचा हा ब्लॉग हाताला लागला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

रोचक

रोचक माहिती आहे परा. लवकरच वाचेन हे पुस्तक

ब्लॉगच्या दुव्याबद्दल धन्यवाद

ब्लॉगच्या पत्त्याबद्दल आभार..

ब्लॉगच्या पत्त्याबद्दल आभार.. काहि लेखनाची शीर्षके रोचक दिसताहेत..
'नपेक्षा' यादीत अ‍ॅडवत आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नपेक्षा हे पुस्तक सहजपणे

नपेक्षा हे पुस्तक सहजपणे उपलब्ध आहे का? असल्यास घेऊन टाकतो. लै कौतुक ऐकलंय काही व्युत्पन्न लोकांकडून याचं.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रसिक वरती तर दिसते

रसिक वरती तर दिसते आहे.

बुकगंगावरती देखील आहे.

आणि हा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद, कारण बुकगांगावरती बर्‍याच दिवसांनी गेलो आणि चक्क तिकडे माझे पुस्तक पण विकायला ठेवलेले दिसले. (जीभ दाखवत) आंतरजालाची अधोगती..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हा हा हा. सहीये धन्यवाद. आता

हा हा हा. सहीये (स्माईल)

धन्यवाद. आता जाऊन घेऊन येतो पुस्तक लौकरच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नातीचरामी वाचले आणि आवडले

नातीचरामी वाचले आणि बर्‍यापैकी आवडले. मेघना पेठेची आधीची पुस्तके आवडली नव्हती म्हणुन इतके दिवस वाचायचे टाळले होते.

आश्चर्य वाटलं.

आश्चर्य वाटलं.

मला 'नातिचरामि' अजिबात आवडली नाही. (तीसेक पानं वाचून पुस्तक बंद करून टाकलं.) मेघना भुस्कुटे आणि चिंतातुर जंतूने रेकमेंडेशन दिलं म्हणून 'हंस अकेला' वाचलं, आणि ते मात्र चिकार आवडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.