यक्षगान

कितीदा म्हणालो | विसरेन सारे
करेन ही दारे | सारी बंद

एकदा तुलाही | दुरून पाहेन
आणि म्हणेन | पुन्हा तेच

कुणी दिले तुला | पावसाचे डोळे
आणि हे हिवाळे | सोबतीला

कुणी उधळिला | दारी पारिजात
कुणाचे हे हात | मोसमांचे

मिटू देत सार्‍या | क्षणांच्या रांगोळ्या
आपल्या ओंजळा | सुटू देत

आपल्या सभोती | दिशांचा गराडा
आणि एक तडा | संभ्रमाचा

कशासाठी चाले | तुझी घालमेल
उगाच पडेल | पुन्हा पेच

हातांवरी माझ्या | वाळलेले रक्त
की जसे आसक्त | हाडमांस

एवढी तहान | पुढे मरूस्थळ
छातीत घायाळ | एक पक्षी

किती गोड हासे | लहानसे मूल
कुणाशी बांधील | सुख बाबा

तुझी माझी कथा | एवढीच फक्त
जराशी आरक्त | जशी संध्या

उतरून आले | पुढ्यात आभाळ
जीवाचा सांभाळ | करीजो बा

दारावरी उभे | आकाशाचे दूत
कुणास माहीत | कशासाठी

आपापल्या अटी | आपापली खंत
जराशी उसंत | नाही कोणा

जरासे वाईट | वाटेल मनाला
आणिक कुणाला | काय खेद

नेहमीच व्हावा | असा कडेलोट
फुटावेत कोट | संयमाचे

दिनरात सरो | सरो हे चरित्र
आपले विचित्र | जन्म याग

म्हणालो असेन | असेही तसेही
आणिक प्रवाही | गेलो गेलो

वाहून गेलेले | पावसाचे पाणी
दाटलीत गाणी | बोटांवर

रात्रिच्या गर्भात | आपला प्रवास
ऐकू येतो श्वास | मनोमन

अनोळखी दु:ख | ओळखीचा पोत
गवताची पात | हिरवाळी

उगाच वाटते | जाहला उशीर
पावसाचा जोर | वाढलेला

किती धूळ झाली | किती हा धुराळा
पाचोळा पाचोळा | हे चरित्र

आकाशी उडाले | उजेडाचे पक्षी
किरणांची नक्षी फडफडे

निखार्‍यांची दरी | क्षणांचा प्रवाह
शतकांचा डोह | किंवा काही

इतिहास लिहू | किंवा हे मिथक
काळाचे जातक | अनाहत

किती वेळ झाला | किती लोक आले
किती लोक गेले | या इथून

मोजून थकलो | सरेनाच गाथा
डोंगराचा माथा | सापडेना

कितीदा थांबलो | नदीतटावर
आणिक प्रहर | मोजलेले

रेघोट्या ओढल्या | किती रात्रंदिन
तरी रितेपण | राहिलेच

कितीदा थांबलो | तुझ्या सावलीला
तरी निववेना | अगा दाह

आपलाच देह | आपलेच मन
तरी राहिलो गा | उपराच

संपोनिया गेलो | मागेच कुठे मी
सरता सरेना | हा प्रवास

भेटण्याची ओढ | बोलण्याचे लाड
बंधनांची चाड | उडो गेली

असे स्मित यावे | उंच नभातून
पडावे तुटून | सारे पाश

जीभेवरी माझ्या | उधारीचा शब्द
कुणाचे प्रारब्ध | कुणापाशी

आपुलिया पंथे | चाललो अनंत
आम्हा नाही खंत कशाचीही...

अनंत ढवळे
(पुर्वप्रसिध्दी / मनोगत दिवाळी अंक ०९ )

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

यक्षगान हे नांव चुकीचे वाटते. कारण यक्षगानाचा अर्थ "कलेच्या माध्यमातून देवाला केलेली उत्कट आळवणी" असा मी वाचला होता. तुम्ही 'विरही यक्ष' हि संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे शिर्षक दिले असावे.

बाकी कविता आवडली.

एवढी तहान | पुढे मरूस्थळ
छातीत घायाळ | एक पक्षी

आपलाच देह | आपलेच मन
तरी राहिलो गा | उपराच

हि दोन कडवी विशेषकरून आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता तुकड्यातुकड्यांमध्ये खूप आवडली. विशेषतः काही पंक्ती. मात्र मला यातून नीट एकसंधता सापडली नाही. वाचताना खूप वेळा ही ओवी स्वरूपात येण्याऐवजी गजल म्हणून आली असती तर बरं झालं असतं असं वाटत राहिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवींच्या ' सुखनफहमी' ला दाद द्याविशी वाटते !

मी बरेचदा गझलांमधून ओव्या आणि हायकू लिहीले आहेत. स्वतःची कविता/ गझल कोट करने ही काही फारशी चांगली गोष्ट नाही, पण या चर्चेच्या ओघात करतो आहे :):

किती गोंधळ उडाला
पान पडले पाण्यात....
किंवा

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली....

मला गझलेचा शेर,हायकू आणि ओव्या या प्रवॄत्तीश: बर्‍यापैकी जवळ असाव्यात असं नेहमीच वाटत आलं आहे.
यक्षगानातली बरीचशी कडवी, स्वतंत्र कविता बनून आली आहेत हे खरेच. हा एक प्रदिर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा पडदा काहीसा विस्तॄत असल्याने क्वचित एखादा तुकडा' साखळी' बाहेरचा वाटण्याची निश्चीतच शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0