ऍनालॉग मुक्ती
मुक्ती ही एक काळीपांढरी संकल्पना असल्याप्रमाणे कधीकधी तिचा विचार होतो. म्हणजे आपण कुठच्यातरी भिंतींच्या आड आहोत, आणि त्या मोडून पडल्या की अनंत विश्व उघडं. बंधनं किंवा मुक्ती अशा बायनरी विचार करण्याच्या पद्धतीमुळे या विषयावरची चर्चा योग्य दिशेला जात नाही. त्यातही 'मुक्ती' या शब्दाचा 'मोक्ष'शी असलेल्या अर्थसाधर्म्यामुळे आणखीनच गोंधळ होतो. मोक्ष हे एक ध्येय आहे. तो मिळतो किंवा मिळत नाही. मात्र मुक्ती ही एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची स्थिती आहे. ते एक गाठायचं ठिकाण नाही. इतर बहुतांश गोष्टींप्रमाणेच मुक्ततादेखील एक श्रेणींमध्ये बदलणारी राशी (analog variable) आहे, फक्त हे टोक किंवा ते टोक असलेली राशी (digital variable) नाही. मोक्ष डिजिटल आहे, तर मुक्ती ऍनालॉग आहे. काही परिस्थिती बदलली की ती वाढू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता, एखाद्या परिस्थितीत उपलब्ध असणारे पर्याय यावरून मुक्तीचं प्रमाण ठरतं. बंधनं कमी असली की मुक्ती अधिक.
मुक्ती म्हणजे बंधनांना नकार नाही. उदाहरणार्थ, गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य म्हणजे सिग्नल तोडण्याचं स्वातंत्र्य नाही. विशिष्ट रस्त्यांवरून, विशिष्ट नियम पाळत का होईना, पण चालण्यापेक्षा अधिक वेगाने इच्छित स्थळी पोचण्याचं ते स्वातंत्र्य आहे. ज्या व्यक्तीला गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य नाही, व त्यामुळे केवळ नाईलाज म्हणून चालावं लागतं त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य दोन्ही करू शकणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी. प्रवासाच्या बाबतीत ती व्यक्ती कमी मुक्त आहे. हे मुक्तीचं प्रमाण तुमच्या स्वातंत्र्याचा वापर करून कुठचा मार्ग निवडता यावर मात्र अवलंबून नाही. ज्या व्यक्तीला गाडी चालवण्याचं पुरेपूर स्वातंत्र्य आहे, तरीही ती आवड म्हणून चालत जाते ती व्यक्ती अधिक मुक्त आहे असंच म्हणावं लागेल.
'कुठच्या क्षेत्रातले नियम पाळायचे याची निवड करण्याच्या स्वातंत्र्याचं प्रमाण' याला मी मुक्ती या राशीची किंमत म्हणेन. ही व्याख्या जनरलाइज्ड आहे, स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ती लागू होते. किंबहुना समाजांनाही ती लागू करता येते. जसजसा काळ बदलतो, नवीन क्षेत्रं निर्माण होतात, तसतशी मुक्ती वाढत जाते. म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी गाड्याच नव्हत्या, त्यामुळे एकंदरीतच समाज आजच्या समाजापेक्षा कमी मुक्त होता. पोलिओपासून बचाव करण्याचा पूर्वी काहीच मार्ग नव्हता. आता आहे.
मग या दृष्टीकोनातून स्त्री-मुक्तीकडे कसं पहाता येईल? अर्थातच गेली अनेक शतकं स्त्रीसाठी बहुतांश कार्यक्षेत्रं खुली नव्हती. अजूनही सगळी नाहीत. पण म्हणून 'स्त्रियांनी अमुक अमुक क्षेत्रांत सामील झालं किंवा या या प्रकारची वागणूक केली म्हणजे त्या मुक्त झाल्या' हा विचार फारच उथळ वाटतो. 'घरकाम करायचं की नोकरी?' या प्रश्नाचं स्वतःसाठी उत्तर निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणं हे मुक्ती वाढल्याचं चिह्न आहे. नवराबायको दोघांनीही नोकरी करायची, की बायकोने फक्त घरकाम आणि संगोपन करायचं, किंवा दोघांनीही नोकरी करायची पण बायकोने दोन मुलांच्या संगोपनासाठी पाच-सात वर्षं नोकरीपासून दूर रहायचं... अशी लवचिकता वाढणं म्हणजेच मुक्ती वाढणं.
अनेकांनी 'स्त्रियांनी आचकट विचकट कपडे घातले तर बलात्कार होणारच' अशी विधानं केलेली आहेत. याच विधानाचं अत्यंत सौम्य आणि जवळपास स्वीकारार्ह स्वरूप म्हणजे 'आपण चोऱ्या होऊ नयेत म्हणून घरांना कुलपं लावतो, तसंच बलात्कार होऊ नये म्हणून व्यवस्थित कपडे घालण्याची काळजी घ्यावी'. सद्य परिस्थितीत काळजी घ्यावी हा प्रॅक्टिकल विचार आहे. पण हा विचार 'बंधनं स्वीकारावी' या भूमिकेतून येतो. मुक्तता वाढवण्याची इच्छा ज्यांना असते त्यांना अर्थातच हा विचार पटत नाही. न आवडता देखील बहुतेक जण बंधनं स्वीकारतातच. फक्त मुक्ती वाढवण्याची इच्छा बाळगणारे बंधनांबाबत तक्रार करतात. ती जमतील तितकी ती शिथिल व्हावीत असा आग्रह धरतात. हा दृष्टिकोन प्रॅक्टिकल विचार मांडणाऱ्यांनाही पटावा. पण संघर्ष होतो तो 'कसेही कपडे घातले म्हणजे मुक्ती कशी काय मिळणार?' या प्रश्नातून. आणि हा प्रश्न निर्माण होतो कारण मुक्तीकडे डिजिटल कल्पना म्हणून बघितलं जातं. खरं तर मुक्ती ऍनालॉग आहे.
उत्तम ...
विश्लेषण आवडले.
बंधनं पुरुषांनाही असतातच. ती तोडण्याचं स्वातंत्र्य + धाडस पुरुषांनाही कधीकधी दाखवता येत नाही. एखाद्या मुद्द्यावर कुटुंबीयांविरोधात पत्नीची साथ न करण्याचं बंधन (पत्नीच्या आहारी गेलेला/बाईलवेडा म्हटले जाण्याचा सामाजिक दबाव) पतीवर असतं. ते झुगारून द्यायची ताकद बर्याचदा दाखवता* येत नाही.
>>पण संघर्ष होतो तो 'कसेही कपडे घातले म्हणजे मुक्ती कशी काय मिळणार?' या प्रश्नातून. आणि हा प्रश्न निर्माण होतो कारण मुक्तीकडे डिजिटल कल्पना म्हणून बघितलं जातं.
ऑफीसमध्ये अर्धी चड्डी घालून येऊ नये असं बंधन पुरुषांनाही असतं. आणि ते पाळलं जातं.
प्रत्येकच वेळी आम्ही काय घालावं हे कोण सांगणार? असा स्टॅण्ड घेण्यानेही संघर्ष होतो. (+रिपल्शन येऊ शकते)
बाकी ठिक. 'स्त्रियांनी आचकट
बाकी ठिक.
'स्त्रियांनी आचकट विचकट कपडे घातले तर बलात्कार होणारच' अशी विधानं केलेली आहेत. याच विधानाचं अत्यंत सौम्य आणि जवळपास स्वीकारार्ह स्वरूप म्हणजे 'आपण चोऱ्या होऊ नयेत म्हणून घरांना कुलपं लावतो, तसंच बलात्कार होऊ नये म्हणून व्यवस्थित कपडे घालण्याची काळजी घ्यावी'
हे मात्र पटले नाही. सदर प्रकारची वाक्य अजिबातच स्वीकारार्ह नाहित.
वरवर कितीही सौम्य केले तरी अशी वाक्य "व्यनी म्हटले की संपादकांना वाचता येणारच", "घर म्हटलं की चोरी होणारच", "कमी कपड्यातली बाई म्हटली की बलात्कार होणारच" अश्या प्रकारच्या संतापजनक वाक्यांचाच फिल येतो. केवळ वाक्यरचना सौम्य केल्याने स्वीकारार्ह होऊ नये
व्यवहार्यता
'स्त्रियांनी आचकट विचकट कपडे घातले तर बलात्कार होणारच' अशी विधानं केलेली आहेत. याच विधानाचं अत्यंत सौम्य आणि जवळपास स्वीकारार्ह स्वरूप म्हणजे 'आपण चोऱ्या होऊ नयेत म्हणून घरांना कुलपं लावतो, तसंच बलात्कार होऊ नये म्हणून व्यवस्थित कपडे घालण्याची काळजी घ्यावी'हे मात्र पटले नाही. सदर प्रकारची वाक्य अजिबातच स्वीकारार्ह नाहित.
माझ्या मते यात व्यवहार्यता आहे. उद्या मी माझ्या घराला कुलूप न लावता गावी गेलो आणि चोरी झाली तर असे म्हणायचे का कि चोराने घर उघड आहे म्हणुन चोरी करावी का? चोरी करण बेकायदेशीर आहे व अनैतिकही आहे. कुलूप लावल नाही म्हणून चोराला चोरी करण्याचा अधिकार कुठून प्राप्त होतो आहे? कुलूप लावल नसताना चोरी झाली तर कायदेशीर दृष्ट्या ती चोरी होत नाही का? माझे घर हे माझ्या कष्टाच आहे, हक्काचे आहे तेथे काय ठेवावे काय नाही, कुलूप लावावे लावू नये हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. अशी चोरी होत असेल तर हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नाही.
आता कुलूप फोडून ही जिथे चोर्या होतात तिथे हा विचार आदर्शवादी नाहीत का? कुलूप खर तर चोरासाठी नाहीच आहे. ते सज्जनांना चोरीचा मोह होउ नये म्हणून आहे . कुलूप आपण आपले नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन लावतो. चोर सापडेल नाही सापडेल, मुद्देमाल मिळेल नाही मिळेल, चोराला शिक्षा होईल न होईल हा भाग नंतरचा आहे या ठिकाणी पिडीत व त्रस्त आपण होणार आहोत म्हणुन घेतलेली ती काळजी आहे. चोरी कधी करु नये, खोट कधी बोलू नये असा समाज जगाच्या पाठीवर कुठल्या कुठल्या काळात कुठे होता?
सर्वप्रथम व्यवहार्यता आणि
सर्वप्रथम व्यवहार्यता आणि स्वीकार्हता वेगळी. आधीच्या प्रतिसादावरील आक्षेप स्वीकार्हतेवर.
बाकी, असे म्हणणे माझ्यामते व्यवहार्य तोडगासुद्धा नाही. आयुष्यभर "आज मी जे कपडे घालते आहे ते कोणाला आचकट-विचकट वाटतील आणि कोणी माझ्यावर बलात्कार केला तर असल्या कारणांचा आधार घेऊन समाज तसे होणे 'काहिसे स्वीकारार्ह / व्यवहार्य' ठरवेल" अश्या दडपणाखाली दररोज राहणं मला अजिबात व्यवहार्य वाटत नाही.
+१
पूर्ण कपडे घातलेल्या मुली/स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतच नाहीत का? आपली ताकद आजमावण्याची/दाखवण्याची एखाद्या विकृत पुरुषाची इच्छा आणि त्याला मिळालेली संधीची उपलब्धता यात जी कोणी स्त्री सापडते तिच्यावर बलात्कार, अन्य लैंगिक अत्याचार होत असावेत.
---
डिजीटल विचारसरणीपासून मुक्ती हवी असंही कधीमधी वाटतं. "Either you are with us, or you are with the terrorists."या बुशसाहेबांच्या प्रसिद्ध विधानाची अशा वेळेला फार आठवण येते.
छ्या....
छ्या... कधी कधी सारखा सारखा विरोध करायचा बहाणा करीत आपण त्याच त्या गोष्टीच्या संपर्कात असतो; नि नेमकी विरोधी विचारांची लागण आपल्यालाही होते तसं काहिसं माझं झालय. मधून मधून चक्क तुमच्या इतका नसलो, तरी थोडाफार जास्तच आशावादी वगैरे बनतोय.
असो. लेखाचा सारांश समजला तो असा:-
मुक्ती ही काही "घटना" नाही, event नाही. ती हळू हळू होत जाणारी प्रक्रिया/process आहे. संस्कृती अधिकाधिक विकसित होइल तसतशी अधिकाधिक मुक्ती साधली जाइल.(खरेतर खरी मुक्ती भयापासून आवश्यक. त्यातही स्वतःच्या मनाला स्वतःच घातलेली बंधनं झुगारली, तर सर्वसामान्य मुक्ती index च्या दुप्प्ट index पर्यंत तरी आपण नक्कीच पोचतो. मुक्ती ही बाहेरच्यांपासून कमी, नि स्वतःच्या भयापासून अधिक मिळवावी लागते असे मला वाटते.)
मुक्ती ही काही "घटना" नाही,
मुक्ती ही काही "घटना" नाही, event नाही. ती हळू हळू होत जाणारी प्रक्रिया/process आहे.
एक्झॅक्टली. मुक्तीच नाही, तर कुठच्याही बाबतीत लोकांना अपेक्षित असणारे बदल हे क्रांती/फेज ट्रांझिशन सारखे असतात. म्हणजे समोर बर्फ दिसतो आहे, तो क्षणार्धात पाणी झालं पाहिजे. बदल असे होत नाहीत. बदल होतात ते अंगाला सहन होणार नाही इतकं थंड पाणी हळूहळू तापत आंघोळीला योग्य इतपत होईल त्याप्रमाणे होतात. कुठच्याच प्रचंड जडतेच्या वस्तूचा वेग क्षणार्धात बदलत नाही. त्यामुळे मुक्तीकडेसुद्धा मिळवण्याची गोष्ट म्हणून बघण्याऐवजी वाढवण्याची गोष्ट म्हणून बघायला पाहिजे. 'आहे की नाही?' या प्रश्नापेक्षा ' किती आहे, आणि आणखीन कशी मिळेल?' हा प्रश्न विचारणं जास्त फायदेशीर, उपयुक्त ठरेल.
स्वतःच्या मनाला स्वतःच घातलेली बंधनं झुगारली, तर सर्वसामान्य मुक्ती index च्या दुप्प्ट index पर्यंत तरी आपण नक्कीच पोचतो.
हम्म्म.... सर्वार्थाने मुक्त असूनही स्वतःला बांधून ठेवणारे दिसतात खरे आसपास.
मुक्ती ही अॅनालॉग असते
मुक्ती ही अॅनालॉग असते याबद्दल खंप्लीट सहमती. आणि तो व्यवहार्यतेचा मुद्दादेखील तसा पटतोय. तो अॅनालॉग असल्यामुळेच तर सुचवलेला तोडगा तसा व्यवहार्य आहे. तात्विकदृष्ट्या स्वीकारार्ह नाही हे तर मान्यच आहे, पण तत्व बित्व गेलं चुलीत. बलात्कारी अडगे असतात, त्यांच्यापुढे ही गीता वाचण्यापेक्षा कायदेकौन्सिलात वाचावी आणि सॉफ्ट पॉवर वापरून पाहिजे ती मूल्ये यथास्थित समाजाच्या गळी उतरावीत, पण इन द मीनव्हाईल, आपण सद्यस्थितित व्यवहार्य तोडगा स्विकारावा यात कै गैर नै. कारण असे बदल लगेच होत नस्तात आणि माणसाचे आयुष्य मर्यादित असते.
पण तो तोडगा चुकीच्या
पण तो तोडगा चुकीच्या गृहितकावर आधारित आहे हे एव्हाना समज आणि तथ्ये धाग्यावरून स्पष्ट झाले असेलच! तेव्हा तात्त्विकदृष्ट्या चुकीचा आणि शिवाय निरुपयोगी तोडगा का बरे वापरावा?
तात्विकदृष्ट्या ते गृहीतक चूक आहे हे मी आधीच म्हटलेय, पण जर द ग्रेट मेजॉरिटी एका फटक्यात आपले म्हण्णे ऐकेल असे नाही, तर मग बहुमतापुढे मान तुकवण्याखेरीज उपाय तो कोणता? कायदेकौन्सिल, मीडिया, वैग्रेमध्ये करा की खच्चून प्रबोधन, आसपासच्या वर्तुळातदेखील करा. पण लोक येड** आहेत हे मनात कुठेतरी फिट्ट असू द्या आणि त्याप्रमाणे वागा, इतकेच माझे सांगणे आहे-तत्व बित्व गेलं चुलीत, साधी सर्व्हायवल स्ट्रॅटेजी आहे ती.
अॅज फॉर निरुपयोगी-वेल, यू नेव्हर नो. बेटर कॉशस दॅन व्हिक्टिमाईझ्ड.
निरुपाय गृहित
तर मग बहुमतापुढे मान तुकवण्याखेरीज उपाय तो कोणता?
ह्म्म.. निरुपाय गृहित धरला आहे मग बोलणंच खुटलं :(
बाकी, अश्याच धारणेतून अश्या प्रकारची वक्तव्ये (या वक्तव्यात स्त्री म्हटलेले नाही व्यक्ती म्हटले आहे वगैरे सगळे आधीच कबूल आहे म्हणून "हे" वक्तव्य न म्हणता "अश्या प्रकारची" म्हटले आहे)जन्मास येत असतात, आणि अश्या गैरसमजांचा उपयोग करून स्त्रियांवर विनाकरण बंधने आणायला त्याचा उपयोग केला जातो याचा अतिशय खेद वाटतो म्हणून तरी मी माझ्या भुमिकेपासून हटायला नकार देतो.(अर्थातच इतर भुमिकांचा आदर आहेच, फक्त सहमती नाही)
हर्कत नै. अगतिकता आणि
हर्कत नै. अगतिकता आणि अपरिहार्यतेतून निर्माण होणारी ही कटु वास्तवता आहे असे मला वाट्टे इतकेच. तुमच्या भूमिकेचा आदर आहेच, फक्त मला माझी भूमिका किञ्चित जास्ती व्यवहार्य वाट्टे. इथे अर्थात तोकडे/तंग कपडे आजिबात कधीही घालूच नयेत असेही नै-फक्त जरा कॉन्शसलि जे करणे ते करावे, इतकीच धारणा आहे.
+१
स्त्रियांनी आपणहून काळजी घेणं निराळं. ती कोणीही कोणालाही घ्यायला सांगतं. आठवा, आपण अनेकदा चॅटींग संपताना take care असं म्हणतो. पण भूमिका म्हणून स्त्रियांनी काळजी घेतली नाही तर दुष्परिणाम होतील असं म्हणणं योग्य वाटत नाही. ट्रेनमधे कोणी पाकीट मारू नये म्हणून काळजी घ्या असं सांगणं ठीक आहे, कारण त्यातूनही पाकीट मारलं गेलंच तर तुझंच चारित्र्य वाईट, तूच काहीतरी आगळीक केली असणार अशा प्रकारचे आरोप होत नाहीत.
(त्यातून दोन-चार हजार वर्षांपूर्वीची उदाहरणं देऊन ती आजच्या काळातही बघा कशी लागू पडतात असं म्हणणं हास्यास्पदही आहे हे निराळं.)
ज्यांच्यावर बलात्कार होतो
ज्यांच्यावर बलात्कार होतो किंवा अन्य प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्या मुली/स्त्रिया "चला, आज आचरट वर्तन करू या" किंवा "चला, आज काळजीच नको घेऊ या" असं म्हणतात/वागतात असं वाटत नाही. लोकल ट्रेनमधून उतरताना बहुसंख्य मुली हातातली सॅक, पर्स शरीराच्या पुढच्या बाजूला धरतात ते फक्त पाकीटमारांपासून बचाव म्हणून नाही. घरातून अशा प्रकारचा सूचनांचा भडीमार (होय, मला भडीमारच म्हणायचं आहे.) वयात येणार्या प्रत्येक मुलीवर होत असावा (स्वानुभव आणि परहस्ते अनुभवही!).
काही लोक म्हणतात, "काळजी घ्या, एवढंच आम्ही म्हणतोय, यात काय गैर आहे?" त्याच्यापुढे एकच पायरी चढून काही लोक म्हणतात, "काळजी घेतली नाहीत, योग्य वागला नाहीत तर भोगा आपल्या कर्माची फळं!" आणि ही भूमिका अयोग्य आहे. मुली काळजी घेत नाहीत म्हणूनच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात हा कार्यकारणभाव चूक असल्याचं अनेक अभ्यासांमधे दिसलेलं आहे. जिथे सुसंगतीच नाही, जे कारणच नाही त्याचं निवारण करण्याच्या सूचना देऊन काय साध्य होणार आहे?
पोट दुखत असेल तर पोटात काय बिघडलंय ते बघायचं सोडून काल सिनेमा बघितला म्हणून आज पोट बिघडलं म्हणण्यासारखं हे आहे. बलात्कारः (गैर)समज आणि तथ्ये यातला पहिलाच मुद्दा वाचावा ही विनंती.
समंजसता
पुण्यात १-२ वर्षापूर्वी एका अनिवासी भारतीय महिलेवर झालेल्या प्रकरणात* असं दिसलं की महिला तिच्या सुरक्षिततेविषयी निष्काळजी होती, तिने साधारण सुरक्षा-उपाय योजले असता तो प्रसंग टळला असता असं नोंदवलेल्या प्रसंगावरुन दिसतं.
समाज-प्रबोधन करण्यासोबतच महिलांना(पुरुषांनाही) सबल(वैचारिक दृष्ट्या) बना असं सांगण्यात चूक आहे असं मला वाटत नाही.
*असे प्रसंग पुरुषांबाबतही घडले, फक्त त्यांची अब्रू न जाता अब्रू गेली किंवा अब्रू गेल्याचे प्रसंग वर्तमानपत्रात आले नाहीत, सबब समंजसपणा दाखवल्यास स्वातंत्र्य मिळेल असा विचार घासकडवींच्या ह्या लेखाचा वाटला ज्याचाशी मी सहमत आहे.
'गुवाहाटी आणि बागपत' या
'गुवाहाटी आणि बागपत' या मिसळपाववरच्या धाग्यावरच्या स्त्री-आयडींच्या प्रतिक्रिया* वाचा असं सुचवेन. एखादी परदेशी महिला निष्काळजी असते तेव्हा किती सामान्य भारतीय मुली अब्रू मुठीत धरून रोजच्या रोज, भीतीच्या छत्राखाली असतात याची कल्पना असे प्रतिसाद वाचून निश्चितच यावी. त्या प्रतिक्रियांमधे ज्या प्रकारची वर्णनं आहेत तसा एकही अनुभव मला व्यक्तिशः आलेला नाही. पण म्हणून घरून 'काळजी घे' या प्रकारातलं घरातून बाहेर पडतानाचं लेक्चर शाळकरी वयात चुकलं नाही. अलिकडे मोबाईल हा जसा आयुष्याचा एक भाग झालेला आहे, तसा मुलींसाठी ही एक्स्ट्रा 'काळजी घेणं' हा आयुष्याचाच एक भाग होऊन जातो.
सबल बना, काळजी घ्या याबद्दल शंकाच नाही. पण मग त्यासाठी बलात्कार हीच आपत्ती कशाला? प्रिय व्यक्तीचा मृत्यु झाला तरीही मागे उरणार्यांबद्दल हीच इच्छा असते.
*सध्या मला ज्या प्रतिक्रियांकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्यातल्या बहुतांशी गायब आहेत.
सहमत आहे. पण गंमत म्हणजे,
सहमत आहे.
पण गंमत म्हणजे, यावेळी पुण्यात एअरपोर्ट परिसरात मारहाण करून लुटण्याचा प्रकार झाला, त्यावर चर्चा करताना त्याचीच कशी रात्री फिरण्याची चूक आहे वगैरे मतं ऐकायला मिळाली.
दिल्लीचा माझा एक कलिग सांगत होता की त्याच्या गाडीला दुसर्या गाडीने ठोकरले तरी तो काहीही बोलत नाही उलट शिव्या खाऊन घेतो. न जाणो समोरच्याकडे बंदूक वगैरे निघायची म्हणून.
लोकांनी अगतिकता स्वीकारली आहे याचेच हे लक्षण आहे.
अवांतर आणि जाहिरात
वैधानिक इशारा :- खालील परिच्छेद माझ्याच धाग्यांची जाहिरात वाटू शकतो.
.
मुक्ती/स्वातंत्र्य्/बंधन ह्या संकल्पनांबद्दल मला काही सुचलेलं मी खालील धाग्यात लिहिलय.
स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा) (http://www.aisiakshare.com/node/1129)
सुटका (एक लघुकथा) (http://www.aisiakshare.com/node/1131)
.
माझ्या ह्या धाग्यातील आधीच्या प्रतिसादात मला
स्वतःच्या मनाला स्वतःच घातलेली बंधनं झुगारली, तर सर्वसामान्य मुक्ती index च्या दुप्प्ट index पर्यंत तरी आपण नक्कीच पोचतो असं म्हणण्या मागची भूमिका माझ्या त्या दोन गोष्टींत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय.
नाक
"तुला स्वतःचा हात फिरवायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझं नाक सुरु होतं तिथे तुझं ते स्वातंत्र्य संपतं" असा कोणतातरी लिंकनसाहेबांचा quote वाचला होता.
एकाची मुक्ती कमी/जास्त झाल्यास दुसर्याची त्या प्रमाणात जास्त/कमी होते का'
ह्यामधून तेच म्हणाचय का?
किंवा अजून एक :- जगातल्या कुठल्याही हुकूमशहाचा व्यक्तीस्वातंत्र्यावर प्रगाढ विश्वास असतो; स्वतःच्या!!
एकाची मुक्ती कमी/जास्त
एकाची मुक्ती कमी/जास्त झाल्यास दुसर्याची त्या प्रमाणात जास्त/कमी होते का
अर्थातच. हे जागोजागी होताना दिसतं. म्हणूनच मुक्ती वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे बंधनांना नकार नाही असं म्हटलं आहे. एका व्यक्तीच्या मुक्ततेसाठी दुसऱ्या व्यक्तीवर जर बंधनं येत असतील ती मुक्ती 'अतिरेकी' म्हणावी लागेल. उदा. पुरुषांना घरचं काम न करण्याचं स्वातंत्र्य बाळगता यावं यासाठी स्त्रियांवर बाहेरचं काम न करण्याचं बंधन येतं. त्यामुळे रास्त बंधनं कुठची आणि कुठची तोडण्याजोगी हे ठरवावं लागतं. मात्र मुक्ती हा झीरो सम गेम नाही याची खात्री आहे. उदाहरणार्थ, पूर्वी पापड, लोणची, मुरांबे घरीच बनवले जात. हे काम करण्यापासून मुक्ती स्वीकारून स्त्रियांनी नोकरी केली आणि त्या गोष्टी बाजारातून आणल्या तर एकंदरीत समाजाची मुक्ती वाढते.
संपूर्ण लेखच वेगळा दृष्टीकोन
संपूर्ण लेखच वेगळा दृष्टीकोन मांडून जातो. लेख आवडला. अॅनॅलॉग्/बायनरी असा मुक्तीबद्दल विचारच केला नव्हता. ट्प्प्याट्प्य्याने(अॅनॅलोगसली) वाढत जाणारे "स्वातंत्र्य" म्हणजे मुक्ती बरोबर?
अजून एक म्हणजे घासकडवी यांनी कुठेही असे म्हटलेले आढळले नाही की "अचकट, विचकट कपडे घालणे" इक्वलस स्वीकरार्ह. त्यांनी फक्त २ विचारसरणीचे दाखले दिलेले आढळले.
जे लोक खरं पाहता "असे कपडे घालू नयेत" म्हणतात ते लोक बायनरी थिंकिंग करतात असेच मत मला तरी आढळले. आणि बरोब्बर त्या विरुद्धच लेखकाने भूमिका घेतलेली आहे.
लक्षपूर्वक वाचल्यास हे कळून यावे.
यातून पुढील नीरीक्षणे मांडायचे धाडस करते
(१) काही लोक लक्षपूर्वक वाचत नाहीत.
(२) बरे लक्षपूर्वक समजा वाचले नाही तरी लेखकाच्या साहीत्याचा पूर्वेतिहास पहाता लेखक अशी भूमिका घेणार नाहीत/घेतील असा योग्य तो कयास करुन ते परतही लिखाण वाचत नाहीत.
फट् म्हणता ब्रह्महत्या
या विषयावरचे विचारही अॅनालॉगच मांडावे लागतात. ;)