स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला गोबरा चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती.
आपल्या इवल्याशा जगात खुश होती.
वातावरण नेहमीचं ऑगस्टचं... चिंब श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह.
वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान-मोठे, डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज.
अशाच वेळी जाताना मनोबाला दिसलं कुणीसं रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षाखाली बसलेलं....
एक शांतचित्त , प्रसन्नमुख, दाढीधारी शुभ्र व्यक्तिमत्त्व. मनोबा सहजच तिकडं ओढला गेला.
त्यानं मनोबाला गंभीर, पण प्रसन्न आवाजात विचारलं "कुठं चाललात मनोबा? कुठून येताय? "
"झेंडावंदनाहून येतोय. " लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानंच तोंडात टाकत मनोबा पुढं म्हणाला:-
"आज भारताचा पन्नासावा स्वातंत्र्यदिन. "
"म्हणजे नक्की काय? " नीट मनोबाकडं निरखत योग्यानं विचारलं.
"म्हणजे.. म्हणजे बरोबर पन्नास वर्षापूर्वी....
१)ह्याच दिवशी परकीय राज्यकर्ते देश सोडून गेले. आणि-----
२)देश स्वतंत्र झाला. " चुणचुणीत मनोबानं फटकन आत्ताच ऐकलेल्या भाषणातलं उत्तर दिलं.
"ह्यातलं पहिलं पूर्णं अचूक. पण........ "--योगी
"पण काय? "-- डाव्या बाहीनं नाक पुसत, गोड शेंबूड गिळत निरागस पोर विचारतं झालं.
"दुसरं तितकसं बरोबर नाही. "-- मोठ्ठे डोळे आकाशात लावत, आपल्याच तंद्रीत योगी बोलला.
"म्हणजे? " मनोबा.
योगी काहीच न बोलता चालू लागला. आणि त्याच्या मागोमाग मनोबा!
थोडंसं पुढं जाताच एक मोकळी जागा, छोटंसं मैदान लागलं. एक मोकळा बैल तिथं फिरत होता.
"अरेच्चा! हा मोकळा असूनही गोल गोल का फिरतोय? "--चकित मनोबा.
"हा पूर्वी पासूनच घाण्याला जुंपला होता. नुकताच सोडवून कुणीतरी आणलाय इथं.
सध्या त्याच्यावरची साखळी, दोरी घाणा ही बाह्य बंधनं काढून टाकण्यात आली आहेत. "
"आणि म्हणूनच हा स्वतंत्र झालाय... बरोब्बर?? "खूश होत मनोबा वदला.
"तुच ठरव ते. " गंभीर आवाजात योगी बोलला.
अखंड तेज सर्वत्र आसपास पसरलं. योग्याऐवजी तेजोगोल प्रकटलं. आणि हळुहळु अंतर्धान होउ लागलं.
मनोबा दिङ मूढ होत (मट्ठ बैलाबद्दल कुतूहलानं विचार करत)लुप्त होणाऱ्या तेजाकडं बघू लागला....
बंधनं खरचं त्या दोरात होती????
इतरत्र पूर्वप्रकाशित
थीम
थीम रंजक वाटते आहे. ती सिरिअल "चेकॉव्ह की कथाएं" तर नसावी? त्यात भाषांतरित कथा दाखवल्या जात्.चेकॉव्ह हे नाव लघुकथांमध्ये जागतिक दर्जाचं मानलं जातं.
मागच्या आठवड्यापर्यंत डी डी लोकसभा इथे ती सिरिअल पुनःप्रक्षेपित होत होती. त्यातील प्रोफेसरची गोष्ट, मित्राच्या बायकोवर लाइन मारनार्या मजनूची गोष्ट हे एपिसोड पाहिले; भयंकर आवडले. काही गाजलेल्या बक्षीस विजेत्या मराठी एकांकिकांनीही सात्-आठ वर्षांपूर्वी कथा बीज तिथूनच उचललय ह्याची खात्री झाली.
"दोन शूर" हा रंगमंचावरचा एक भन्न्नाट प्रयोग होता. पण त्यांनी पडदा वर जाण्यापूर्वीच "आमची प्रेरणा चेकॉव्हची एक कथा आहे" हे निदान जाहीर तरी केलं होतं.
इतरांचे तसे नाही.
असो. अवांतर होते आहे. मला असा कुठला एपिसोड आठवत नाही; शोधून अवश्य पाहीन.
मतकरी
बहुधा मतकरींचं नाटक होतं. अर्थात मी म्हणतोय ते थोडं वेगळं कथानक होतं. एक पराभूत मनोवृत्ती असलेली स्त्री स्वतःला कोंडून घेऊन रहात असते. वाड्याच तिची एक ठरलेली खिडकी असते तिथे नि कायम बसून असायची. तिची धाकटी बहीण तिच्या प्रियकरासह एकदा वाड्यात येते. त्याच्या दर्शनानेच ती प्रफुल्लित होते, कात टाकून नव्या उत्साहाने जगू लागते. तो ही तिच्या भावनेला माफक प्रतिसाद देत असतो. पण तो सर्वस्वी तिचा होणार नाही हे लक्षात येताच त्याला कायमचा बंदिवान करायच्या हेतूने ती त्याला त्या प्रचंड वाड्याच्या तळघरात कोंडून घालते (त्याचवेळी तिच्या पूर्वीच्या प्रियकराचा अंतही असाच झालेला असतो असे दिसून येते.) धाकट्या बहिणीला आपल्या प्रियकराच्या गायब होण्याचे गूढ बर्याच काळाने उलगडते. मग ती ही युक्तीने मोठ्या बहिणीला त्याच तळघरात बंदिवान करते नि तिची त्या खिड्कीतली जागा घेते. (नाटकात बहुधा सुप्रिया मतकरींची भूमिका असावी.)
मार्मिक कसलं कप्पाळ?
पाच पाच जण "मार्मिक" रेटिंग काय देउन र्हायलेत प्रतिसादाला ह्या?
आमची कथा नक्कल आहे असं म्हणताय का राजेशराव?
असो.
ह्याची sister story ऐसीवरच उपलब्ध :- http://www.aisiakshare.com/node/1129 आहे.
छे छे
नक्कल अजिबात नाही. स्वातंत्र्य हे मनात असतं, आणि जोपर्यंत मनात पारतंत्र्य असतं तोपर्यंत बाह्य स्वातंत्र्याने फरक पडत नाही. हा विचार स्वतंत्रपणे अनेकांना सुचू शकतो. त्याचं एक वेगळं एक्स्प्रेशन तुमच्या कथेमुळे आठवलं.
मात्र ब्रिटिशांच्या राज्यात औद्योगिक आणि धोरणात्मक पारतंत्र्य होतं. प्रत्यक्ष राजकीय स्वातंत्र्यानंतर गेल्या पासष्ठ वर्षांत हळूहळू या दोहोंची वाढ झालेली आहे.
कठिण रूपक
कठिण रूपक आहे. रूपक/दाखला आहे की नाही, हाच प्रश्न आहे.
म्हणजे जर खरोखरचे बैल गोल फिरत राहात असतील, तर तो दाखला आहे.
१. कल्पना करा की खरेच बैल फिरत राहातो आहे,
२. अशी कल्पना केली तर आपण मानू ते त्याचे बिनासाखळीचे बंधन आहे
३. त्या काल्पनिक बैलाचा दाखला घेतला तर आपण असे म्हणू शकू, की साखळी सोडल्यावर बंधनात राहाण्याचा वस्तूंचा नैसर्गिक स्वभाव असतो. तद्वत देश या वस्तूची गती.
("काल्पनिक" शब्द खोडला तरच बैलावरून वस्तूंच्या नैसर्गिक स्वभावापर्यंत कसे जाता येईल. "काल्पनिक" दाखला मान्य केला तर काय होईल? बैल गोल-गोल फिरत राहिला नाही, अशी देखील कल्पना करता येते. त्यावरून विरुद्ध निर्देश मिळतो.)
असो. दाखला खरा मानू. पण रूपकाचा बाकी अर्थ लागत नाही. इंग्रजांचा "घाणा" आणि "गोल फिरणे" म्हणजे काय? आणि "घाण्याशिवाय गोल फिरणे" म्हणजे काय? आता इंग्रजांच्या काळात बनवलेले बहुतेक कायदे (भारतीय दंडसंहितेचा मोठा भाग, वगैरे), इंग्रज गेल्यानंतर कायम राहिले. कंत्राटे वगैरे कायम राहिली. एखाद्या जोडप्याचे लग्न इंग्रजांच्या राज्यात लागलेले असले, तर लग्नाचा करारही १५ ऑगस्ट १९४७ नंतर कायम राहिला. जगात जे-जे कुठले देश स्वतंत्र झालेले आहेत, त्या सर्वांमध्ये असे दिसते, की पूर्वीची कित्येक बंधने (कायदे) कायम राहातात. बैलाच्या दाखल्याची गरज नाही. पण तरी गडबड होते. कुठलेतरी कायदे किंवा कंत्राटे टिकणार, यावेगळी परिस्थिती असू तरी काय शकते? काहीच कायम राहाता कामा नये, असे म्हटले, तर "देशाचे स्वातंत्र्य" हा शब्द अवघ्या जगात रद्द होते. खुद्द इंग्लंडात पूर्वीच्या रोमन कायद्यांचे अवशेष आहेत, नॉर्मन राजवटीचे मोठाले भाग आहेत. प्राचीन रोममध्ये रोमपूर्व संस्कृतींची काही बंधने अवशिष्ट होती...
अर्थातच लेखकाचा मथितार्थ असा नसावा. इंग्रजांचे राज्य गेल्यावरती निघून जायला हवी होती, अशी काही बंधने आहेत, ती गेलेली नाहीत, असा मथितार्थ असावा. काही बंधने राहाण्यायोग्य आहेत, त्यांचा विचार या ठिकाणी मनात येता कामा नये. पण दोन प्रकारची बंधने कुठली, ते रूपककथेतून स्पष्ट होत नाही.
- - -
भगतसिंगने अधिक स्पष्ट निर्देश दिला होता : "बहुजनांचे/बहुसंख्यांचे शोषण करणारे लोक देशी असले किंवा विदेशी असले, तरी ते पारतंत्र्यच" असे काहीसे त्याने लिहिले होते. (अ) बहुजनांचे/बहुसंख्यांचे शोषण करणारे कायदे आणि (आ) बहुजनांचे/बहुसंख्यांचे शोषण न-करणारे कायदे हा निकष वापरता येतो. प्रकार (अ)चे कायदे हटायला पाहिजेत, तर प्रकार (आ)चे कायदे टिकले तरी "स्वातंत्र्य" अर्थवान राहाते. लेखकाने भगतसिंगाचेच वर्गीकरण द्यायला हवे होते, असे नाही. मला वाटते, की रूपककथेतून योग्याने मनोबाला कुठलेतरी वर्गीकरण द्यायला हवे होते.
सविस्तर
सविस्तर प्रतिसाद पाहून बरं वाटलं.
कथा अर्थातच लेखकाचा मथितार्थ असा नसावा. इंग्रजांचे राज्य गेल्यावरती निघून जायला हवी होती, अशी काही बंधने आहेत, ती गेलेली नाहीत, असा मथितार्थ असावा. काही बंधने राहाण्यायोग्य आहेत, त्यांचा विचार या ठिकाणी मनात येता कामा नये.
होय.+१
फक्त "इंग्रजांचे राज्य गेल्यावरती निघून जायला हवी होती" ह्याऐवजी मी "बंधनं संपताच जायला हवी होती" असा बदल करीन.
पण दोन प्रकारची बंधने कुठली, ते रूपककथेतून स्पष्ट होत नाही.
अगदि एकास एणेअसे उदाहरण बसवणे कठीण आहे. दोन वेगळी बंधने दाखवू शकलो नाही.
कथा केवळ इंग्रज राजवटीबद्दलची नाही. बंधनातील ऑब्जेक्टची आहे. कूळ कायदे लागू झाल्यावर कागदोपत्री मालक झालेले काही पूर्वीचे मजूर प्रत्यक्षात आयुष्यही मजूर म्हणूनच घालनाही.; असे किस्से ऐकलेत. त्यांच्या पुढच्या एका पिढीनही तेच कले; कागदोपत्री मालक्,नि प्रत्यक्षात जमीनदारांचे चाकर. कागदोपत्री एखादी गोष्ट झाली म्हणजे प्रत्यक्षात उतरले असे नाही.
जेलबाहेरचा माणूस एखादी सामान्य गोष्ट करण्यापुर्वीही कुणाचे भय बाळगत असेल्,तर तो पारतंत्र्यात आहे. त्याच्या हालचाली त्याच्या नियंत्रणात नाहीत.
जेलमध्ये साखळदंडाने बांधून ठेवलेला माणूसही मरेस्तोवर ( एक्झिंस्टेंशिआलिझमच्या प्राथमिक उदाहरणानुसार अयशस्वी का असेना) सुटायची धडपड करत असेल नि निर्भयतेने सत्ता झुगारुन देत असेल तर तो मनाने स्वतंत्र झालेलाच आहे. साखळदंड काही अगणित काळ टिकणार नाहीत. ह्या किम्वा पुढच्या कोणत्याही पिढित ते उतरले धडपड्या मनुष्य खरेखुरे स्वातंत्र्य अनुभवू शकतो.
(क्रांतीचा जयजयकार मधील कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवतात)
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
असं आवेशाने म्हणणारा बंधनात दिसला तरी पारतंत्र्यात आहे काय? किंबहुना तो नाही, म्हणूनच त्याला बांधून ठेवलय.
जे बाहेर मोकळे आहेत, ते बंधनात(साखळीने बांधलेले) नाहीत; पण पारतंत्र्यात आहेत!
आंदोलन हा बंधन घालवण्याचा लढा असेल तर स्वातंत्र्य ही मानसिक स्थितीच अधिक आहे.
.
.
बायबलच्या पहिल्या करारात(old testament) मध्ये एक कथा आहे.(तुम्हांस इथेमाझ्याहून चांगली ठाउक आहेच. इथे इतरांसाठी सांगतोय.) इजिप्त मध्ये बंदिवासात असलेले काही लाख ज्यू गुलाम्/दुय्यम नागरिक घेउन, इजिप्तच्या प्रखर सैन्यशक्तीशी लढा उभारून मसीहा मोझेस हा देवाने आश्वस्त केलेल्या भू-स्वर्गाच्या दिशेने निघाला.(towards the land promised by God) तो अदोम , सदोम ही राज्ये पार करत आयुष्याच्या शेवटी शेवटी यार्देन नदीच्या खोर्यात पोचला.(आकाळ्याजॉर्डन देशात.) तिथून ती त्यांची नवभूमी(बहुदा माउंट सिनाय च्या आसपासची इस्राइअल्मधली जागा; नक्की ठाउक नाही) अगदि समीप होती. नजरेच्या टप्प्यात लक्ष होते. पण त्यांच्यापैकी कुणीही कधीच तिथे पोचू शकले नाही. चाळीस वर्षे ते तिथे पोचू शकणार नव्हते. बहुतांश लोकांनी जॉर्डन मध्येच अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुले मात्र इस्राइलला पोचली. त्यांनी राज्य स्थापले. त्यांची बह्रभराट वगैरे झाली.
आता, ही "चाळिस वर्षे" काय भानगड आहे? तर एका पिढित पूर्वीचे गुलाम ते आता जिम्मेदार, स्वतंत्र नागरिक हा प्रवास होणे त्या काळच्या ज्यूं पुढार्यांना शक्य वाटले नसावे. ते त्यांनी प्रतीकात्मक रितीने सांगितले असावे. (आम्ही स्वातंत्र्यकडे निघालो. पण खर्या अर्थाने अंतिम मुक्कामी आमची पिढिच पोचली. आम्ही राजसत्तेतून बाहेर पडलो तरी चारेकशे वर्षे सतत तसेच राहिल्याने "समाजव्यवस्था म्हणजे काय" , "कुणीही(मालकाने) काहीच करायची आज्ञा दिली नसेल तर रिकाम्या वेळेत नक्की काय करायचे" ,"स्वतंत्र, जिम्मेदार नागरिक म्हणून जगायचे ते नक्की कसे" असे अनेकानेक प्रश्न त्यांच्यापुढे त्याकाळात असावेत. इस पू दोन हजार वर्षे ह्याकाळाचा विचार करा. असे विचार असणे अशक्य नाही.
चांगली रुपककथा. मतितार्थाशी
चांगली रुपककथा.
मतितार्थाशी तितकासा सहमत नाही (काही वर्षांपूर्वी बर्यापैकी सहमत होतो.. मात्र ते चालायचेच).
कथा वाचून इथे दिलेल्या गुलाबबाईच्या मताची कितव्यांदातरी आठवण झाली:
तुम्ही इतर स्त्रियांना बळ देण्यासाठी काय करता ह्या प्रश्नांवर गुलाबबाईचं उत्तर मार्मिक तर आहेच पण अतिशय चिंतनीय आहे. ती लेखिकेलाच प्रतिप्रश्न विचारते
आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं
जीए
यावरून जीएंची आठवण होणं अपरिहार्य आहेच. 'कळसूत्र' मधील लाल गरुड जेव्हा आपण आपल्या समाजाची केलेली प्रतारणा उघड करतो तेव्हा सारं आयुष्य त्याच्यावर आंधळा विश्वास, श्रद्धा ठेवून असलेले ते लोक त्याच्यावर काडीमात्र विश्वास ठेवू इच्छित नाहीत. त्यावेळचे त्याचे विचार भारतीय मनोवृत्तीचेच काय एकुणच मानवी प्रवृत्तीबाबतचे अतिशय समर्पक विवेचन करणारे.
________________
पण एका बाबतीत मात्र मी चुकलो. मला वाटलं होतं या अदृष्य बेड्या हातावरून पडताच निदान एकाला तरी मुक्त वाटेल. मला त्याबद्दल कृतज्ञता नको होती, कारण आता मी त्यापलिकडे गेलो आहे. कृतज्ञता नव्हे तर निदान एकाला तरी मुक्त केल्याचा आनंद मला हवा होता. पण हातापायात या अवजड बेड्या शतकानुशतके घालून तुम्ही इतके अपंग झाला आहात की आता त्यांच्याशिवाय चालणं तुम्हाला अशक्यच वाटतं. तुमच्या झापडी काढून मी तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला. एकंदरीने मुक्तता अशी बाहेरून देता येत नाही हेच खरं. त्यासाठी आतूनच उकळी यावी लागते. मी तुमची प्रतारणा केली याचं खरं म्हणजे तुम्हाला दु:ख नाही, तर ती प्रतारणा आहे हे दाखवण्याचं धैर्य मी दाखवलं याचा तुम्हाला संताप आहे. तुम्ही अज्ञ आहातच पण आपण अज्ञ आहोत हे जाणण्याचं पहिलं पाऊलदेखील तुम्हाला उचलता येत नाही इतके तुम्ही अपंग, क्षुद्र होऊन बसला आहात! मी तुम्हाला काही शिकवू शकलो नाही, पण ही एक गोष्ट मात्र मी स्वत: या क्षणी शिकलो!
-कळसूत्र (काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी)
______________
नाटक
अशाच तऱ्हेचं एक नाटक खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर पाहिलं होतं. त्यात एक स्त्री बंदिवान असते. तिला दुसरी स्त्री येऊन सांगते की 'मारून टाक तुला बंदी करणाऱ्याला'. ती आधी उत्सुक नसते, पण नंतर तिला पटतं, आणि ती त्याला मारून टाकते. जी बाई तिला ही स्फूर्ती देते ती मात्र तिला पुन्हा मोकळं सोडत नाही. ती म्हणते की 'माणसाने पाळलेल्या कावळ्याच्या पिलाला कसं इतर कावळ्यांनी टोचून टोचून मारलं, तसं तुझं होईल. म्हणून तू इथेच थोडा काळ रहा.' काही दिवसांनी तिची चलाखी लक्षात आल्यावर ती बंदी स्त्री तिलाही मारते. तिच्या हातात चाव्या येतात. पण तिला बाहेर जायला भीती वाटते म्हणते. इथेच सुरक्षित वाटतं म्हणत ती कोठडीतच बसून रहाते.