ह्या कन्नडीगांना आलाय माज
ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||
लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||
अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्या दुकानांना नावं आमची
सार्या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||
आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||
या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||
-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.
-पाषाणभेद
अगदी
अगदी बरोबर आहे. पण हा पॅरेडॉक्स झाला.. एक निश्चित तत्व त्यातून बनवता येत नाही.
तसंही तात्विकदृष्ट्या योग्य असतं ते सगळंच आचरणात आणता येत नाही.
तेव्हा एका कोणत्यातरी कुंपणात राहिलंच पाहिजे. अशा वेळी सर्वात मोठं "कंपेलिंग" छत्र म्हणजे देश.. हे युनिट अस्मिता आदिंसाठी घ्यायला जास्त चांगलं.
देश हे कंपेलिंग युनिट अशासाठी की त्याच्या बाहेर संचार करायला कागदपत्रं आणि बंधनं आहेत म्हणून.
एरवी जिल्हा, भाषा, राज्य, जात, गल्ली, वॉर्ड नंबर, गणेशोत्सव मंडळ, लिंग, वयोगट -जनरेशन ग्याप, क्लब - रोटरी मिडटाऊन व्हर्सेस रोटरी साऊथ सिटी, अशा अनेक युनिट्सनी संघर्ष जन्माला घालून पेटत ठेवता येतो.
त्यातल्यात्यात देश ही मर्यादा बरी, लेसर नंबर ऑफ वरीज टू हँडल फॉर सिस्टीम (इफ एनी)..
सापेक्ष
सर्वसाधारणपणे तुमच्या प्रतिसादाशी सहमत,
>>तेव्हा एका कोणत्यातरी कुंपणात राहिलंच पाहिजे.
म्हणजे समजाला अमुक एका दिशेला हाकत राहिलं पाहिजे असं काय? श्रद्धेशी निगडीत गोष्टी ह्याबहूदा समाजाला कुंपणात बाधायला बर्या पडतात म्हणूनच वापरल्या जातात, पण ह्याविरुद्ध विचार केल्यास निर्गुणाकडे/आदर्शवादाकडे झुकणारे विचार कधी-कधी प्रत्येक गोष्टीत अर्थहिनता शोधतात व त्यातून क्रियाशून्यता निर्माण होते असं वाटतं, त्यामुळे तत्वं ही नेहमी सापेक्ष असणंच उत्तम.
तसं नाही.
नाही.. कुंपण हा शब्द मानसिक कुंपण म्हणून वापरलेला नाही. भौगोलिक कुंपण म्हणूनच.. जिथपर्यंत मुक्त संचार आहे तिथपर्यंतची जमिनीने आखलेली मर्यादा म्हणून कुंपण. त्यात हाकण्याचा भाग नसून कुठल्यातरी पातळीवर एकत्र येण्याची (नेसेसरी इव्हिल अशी) गरज आहे.
हे विश्वचि माझे घर म्हणून अराजक माजण्याची भीती आहे.. भीती कसली.. खात्रीच आहे. जर "देश" हे युनिटही मानायचं नाही असं ठरवलं तर मग विश्वबंधुत्वाने सैनिक नावाचा फोर्स एकत्र आणून घडवताच येणार नाही. अस्तित्वासाठी "आपला" आणि "परका" हा भाव कोणत्यातरी सुवर्णमध्य अशा पातळीवर अस्तित्वात ठेवायलाच लागतो दुर्दैवाने.. किंवा दैवाने..
सारी पृथ्वी एक देश झाला तर हा भाव नाहीसा करता येईल (अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न सध्या बाजूला ठेवून) ग्रहावरचे सर्व देश एकछत्र झाले तरी मग बाहेरुन येणार्या "परक्या" संकटांपासून आणि जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवली पाहिजे.. असा भाव तरी राहणारच..
दास्यत्वाच्या संकटापासून
दास्यत्वाच्या संकटापासून वाचण्यासाठी ह्या भावनेची गरज आहे पण कदाचित प्रगतीसाठी ती भावना गैरलागू आहे.
अत्यंत बरोबर बोलताय. ..अस्मिता हे आवश्यक संकट मुळात "बाह्य" संकटापासून वाचण्यासाठीच केवळ... एरवी *प्रगतीसाठी अस्मिता ही भावना दुरितच आहे.. शत्रूच आहे असं वाटतं.
(*प्रगती सर्वांगीण आणि सर्वांची असं धरलं आहे.. नपेक्षा पुन्हा "प्रगती" कोणाची / कोणत्या समूहाची ? एकाची प्रगती म्हणजे दुसर्याचं नुकसान का? असे प्रश्न उभे राहू शकतात..)
सहमत
गविंशी सहमत आहे.
सारी पृथ्वी एक देश झाला तर हा भाव नाहीसा करता येईल (अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न सध्या बाजूला ठेवून) ग्रहावरचे सर्व देश एकछत्र झाले तरी मग बाहेरुन येणार्या "परक्या" संकटांपासून आणि जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवली पाहिजे.. असा भाव तरी राहणारच..
विशेष सहमत.
'माज', 'डोकी फोडणं' 'विधान
'माज', 'डोकी फोडणं' 'विधान भवन तोडू' .. ही भाषा चिंताजनक वाटली.
इतिहास माहिती आहे आणि ज्यांनी त्यासाठी कष्ट सोसले त्यांच्याबद्दल आदरही आहे.
आता नवे पर्याय शोधावे लागतील. पण ते अशा हिंसेतून मिळणार नाहीत, यातून फक्त आणखी काही डोकी फुटतील - हे आपल्याला कधी समजेल? (आपल्याला म्हणजे फक्त पाषाणभेद यांना नाही, तर आपल्या समाजाला!)
अपेक्षा (एक 'याड होमिनेम' अट्याक)
'माज', 'डोकी फोडणं' 'विधान भवन तोडू' .. ही भाषा चिंताजनक वाटली.
जाऊ द्या हो! नरभक्षकांकडून याहून वेगळी अपेक्षा ती काय करणार?
('आपलं बाळ यम्मी यम्मी'??? 'यम्मी' - खरे तर 'यमी' - हा शब्द खास करून खाद्यपदार्थांकरिता वापरला जातो, अशी आजवरची समजूत होती. नरभक्षणही एक वेळ समजू शकतो, पण स्वतःचेच मूल? 'यम्मी'? आणि तेही स्वपत्नीसमवेत जिभल्या चाटत? अरारारारा! असो.)
ओहो!
म्हणजे (त्या कवितेतले) 'आपले* बाळ' हे 'यम्मी यम्मी' म्हणजे 'यमीपेक्षा दुप्पट गोरे' असावे काय? (म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या एक तृतीयांश गोरे?)
असेलही कदाचित. तसे कवितेतले आपल्याला काही कळत नाही बुवा.
========================================================
* बोले तो, (बहुधा) प्रस्तुत कवीचे आणि (पुन्हा, बहुधा) त्याच्या पत्नीचे. सर्वश्री 'न'वी बाजू आणि नितिन थत्ते यांचे नव्हे. अनावश्यक स्पष्टीकरण समाप्त.
चालायचेच!
नरभक्षक वगैरे म्हणणं अस्थानी वाटलं. नीट न जमलेल्या का होईना, पण विनोदाने तुम्ही म्हटलेलं आहे हेही स्पष्ट होत नाही.
अहो चालायचेच. आता वरील कवितेचेच घ्या ना! त्यातील 'माज आलाय', 'विधानभवन तोडू', 'डोकी फोडू' यांसारखे उत्कृष्ट जमलेले अतिसटल विनोद हेही विनोद आहेत, हे मला जिथे स्पष्ट झाले नाही (आमची विनोदबुद्धी यथायथाच, त्याला काय करणार?), तिथे आमच्या भिकार विनोदांची काय कथा?
त्यामुळे, आमचे नीट न जमलेले विनोद हे विनोद आहेत, हे जर तुम्हाला स्पष्ट झाले नाही, तर त्याबद्दल निदान मी तरी तुम्हाला दोष देऊ शकत नाही. असो.
महाराष्ट्रात ती धमक उरलेली
महाराष्ट्रात ती धमक उरलेली नाही हेच खरे. बाकी जाऊदे, धड विदर्भाला नीट इंटिग्रेट करू शकलो का आपण? सांस्कृतिकदृष्ट्यादेखील जमलेले नाहीये आजिबात. आणि हे सगळे मराठीभाषक असूनसुद्धा. बेळगाव भागाचे काय कप्पाळ इंटिग्रेशन करणार आहोत?? सगळे साले करंटे, घाला त्यांना १२ गडगड्याच्या विहिरीत.
उपाय
स्वतःचे टाळके फुटण्याची जोवर सुतराम् शक्यता नसते, तोवर मुंबईत/पुण्यात/नाशकात बसून बरळायला छान कविता आहे.
याला एक उपाय आहे. या असल्या कविता पाडणार्यांना बेळगावात टाळके फोडून घ्यायला पाठवून देऊन, त्यानंतर मग बॉर्डर सध्या आहे त्या स्थितीत कायमची सील करणे. फिर एक आदमी उधर का इधर नहीं आएगा, और एक आदमी इधर का उधर नहीं जाएगा| निपटा लो फिर जो कुछ भी निपटा लेने का उधरइच - फिर आयंदा इधर वापस नहीं आने का|
(हे सर्व मलाही इथे अटलांटात बसून बरळायला काहीच जात नाही, हा भाग अलाहिदा.)
देवगिरीचं राज्य कर्नाटकात
देवगिरीचं राज्य कर्नाटकात पसरलेलं होतं. विजयनगरचे राजे मराठीच. शहाजीराजांची जहागिरी कर्नाटकातही होती, जिंजीपर्यंत स्वराज्य होतं, तर मग कर्नाटक परकं कसं? कर्नाटकही आपलंच आहे. त्यांना आपलंच म्हणा.
बरं या कवितेत स्यान होजे, बे एरिया आणि मुंबई या ठिकाणच्या लोकांबद्दल काहीही सहानुभूती नसल्यामुळे कविता आवडली नाही.
कन्नडा आणि मराठी या
कन्नडा आणि मराठी या वेगवेगळ्या भाषा झाल्या खूप अलिकडच्या काळामधे. ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा, "कानडाऊ विठ्ठलु" येतं आणि आता विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपुरात आहे, अनेक ठिकाणी आताच्या कन्नडात आहेत तसे उकार येतात त्यामुळे कन्नडा आणि मराठी या भाषा अतिशय आधुनिक काळात वेगळ्या झाल्या आहेत.
लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत. ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.
ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा,
ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा, "कानडाऊ विठ्ठलु" येतं
ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील कानडाऊ विठ्ठलु मधील "कानडाऊ" चा अर्थ विठ्ठल कानडी आहे असा होतो की माझ्या विठ्ठलाचे रूप चांगले आहे असा होतो? बाकी कोल्हापूरची अंबाबाई ही तिरूपतीच्या बालाजीची पत्नी आहे असे म्हणतात. म्हणजे त्या अर्थी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे कर्नाटकापेक्षा अधिक जवळचे झाले :)
लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत.
अरे वा पुस्तकाची वाट बघत आहे.
ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.
विकत घेऊन हे मुद्दामून कशाला सांगायला हवे? :)
(धडका देणारा) पिसाळलेला हत्ती
करनाटकू?
ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील कानडाऊ विठ्ठलु मधील "कानडाऊ" चा अर्थ विठ्ठल कानडी आहे असा होतो की माझ्या विठ्ठलाचे रूप चांगले आहे असा होतो?
ठीक.
मग त्यापुढील 'करनाटकू'चा अर्थ 'फार नाटके करतो बुवा!' असा घेता यावा काय?
शक्य आहे. माऊली आणि विट्ठलामधील लाडिक प्रेमाचे द्योतक असावे बहुधा ते.
कन्नडीगाही आपलेच
कन्नडीगाही आपलेच झाले की. त्यांना आपलं म्हणा!
अहो मी सगळ्या भारतीयांना आपलेच म्हणत आहे म्हणजे त्यात कन्नडिगाही आलेच.आणि अभारतीयांपैकीही आपल्याशी आपण भारतीय आहोत या कारणावरून वैर न बाळगणारेही आपलेच की!!
या कवितेत "आपण" विरूध्द "ते" हा सूर जाणवत आहे तो नक्कीच खटकतो.
कन्नडा आणि मराठी या
कन्नडा आणि मराठी या वेगवेगळ्या भाषा झाल्या खूप अलिकडच्या काळामधे.
होय, फक्त गेल्या दीडेक हजार वर्षांतच फरक पडलाय :)
लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत. ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.
विश्वास गेला पानिपतावर!!!!!!! ;)
होय, फक्त गेल्या दीडेक हजार
होय, फक्त गेल्या दीडेक हजार वर्षांतच फरक पडलाय
मग काय तर! विश्व जन्माला आलं १३ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्याचा जन्म पाच अब्ज वर्षांपूर्वीचा, पृथ्वीचा ४.५ अब्ज, आणि शेतीचा शोधही काही दशहजार वर्षांपूर्वीचा, त्या तुलनेत दीड हजार म्हणजे छाटछूटच की! आणि तुम्ही अजून भाषा आणि राज्य, देश यावरून भांडत बसा! उद्या उपमा म्हणयचं का उप्पीट, तो लसूण का ती लसूण यावरून भांडत बसाल. क्षुद्र कुठचे!!
(अवांतर: यावरून निष्कारण अनेक वर्षांपूर्वी मनातल्या मनात झालेली तुलना आठवली. बाहेरून म्हैसूरचा राजवाडा पाहिला आणि बकिंगहॅमही! म्हैसूरचा राजवाडा हा राजवाडा असेल तर बकिंगहँमला सर्व्हंट क्वार्टर म्हणायला हरकत नाही, असा विचार बाहेरून बघूनच आल्यामुळे दमडा मोजून बकिंगहॅमच्या आतमधे गेले नाही. तेव्हा तुलना करायला "आपला" रायगड आठवला नाही ना देवगिरी! )
पाळत
मी 'ऐसी अक्षरे' वर पाळत ठेवणारा कर्नाटक सरकारचा हेर अाहे, हे माझ्या अाडनावावरून सुज्ञांनी अोळखले असेलच. तदनुसार या कवितेचे (यमकांसकट) कन्नडमध्ये भाषांतर करून अात्ताच मी ते 'कर्नाटक राज्य सचिवालय, प्र. के. अत्रे मार्ग, बेंगलोर' या पत्त्यावर पाठवले अाहे. याउपर कर्नाटक सरकार जो काही निर्णय घेईल तो सिद्धीस नेणेस श्रवणबेळगोळस्थित श्री बाहुबली समर्थ अाहेत.
प्रांतिक अस्मिता
आपापल्या प्रांतिक अस्मिता जपण्याच्या प्रयत्नात राष्ट्रीयत्वाची भावना लोप होत चालली आहे.