ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-३ (F-H)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z

===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षरे F ते H ने सुरू होणाऱ्या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात तलवारबाजी (Fencing), फुटबॉल (Football), जिमनॅस्टिक्स (Gymnastics- Artistic आणि Rhythmic), हॅन्डबॉल (Handball) आणि हॉकी (Hockey) अश्या ८ खेळांची माहिती करून घेणार आहोत. जिमनॅस्टिक्स च्या दोन प्रकारांना वेगवेगळे क्रीडाप्रकार समजले जाते मात्र इथे सोयीसाठी एकाच शीर्षकाखाली माहिती देत आहे. चला तर सुरू करूयात
-------

तलवारबाजी (Fencing)

या क्रीडाप्रकारात तीन उपप्रकार असतीलः फॉईल, एपी आणि साब्रे (Foil, Epée, Sabre). यातील फॉईल व साब्रे प्रकारात महिला व पुरुष गटांत वैयक्तिक व सांघिक स्पर्शा खेळवल्या जातात तर एपी प्रकारात दोन्ही गटात केवळ वैयक्तिक स्पर्धा होतात. म्हणजे या प्रकारातही तब्बल १० सुवर्णपदके मिळण्याची शक्यता असते.
हे प्रकार अर्थातच तलवारीच्या प्रकारावरून आले आहे. यापैकी फॉईल आणि त्याहून जराशी जड असणाऱ्या एपी प्रकारात तलवारीचे टोक समोरच्याला स्पर्श करून पॉइंट कमावला जातो. तर साब्रेमध्ये सामान्यतः तलवारीची धार वापरली जाते. 'एपी'मध्ये दोन्ही तलवारबाजांना एकावेळी गुण मिळू शकतात, अन्य प्रकारात एक गुण मिळाल्यानंतर पुन्हा दूर जावे लागते व एकावेळी एकच प्रतिस्पर्धी गुण मिळवू शकतो. एक सेट ३ मिनिटे किंवा एकाच स्पर्धकाविरुद्ध १५ वार होईपर्यंत चालतो. असे तीन सेट खेळले जातात.

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व शेवटचे पदक ५ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी इटली, फ्रान्स, जर्मनीने प्रत्येकी २ सुवर्णपदके जिंकली होती. तर अमेरिका, चीन व रशिया यांनी प्रत्येकी १ सुवर्णपदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

फुटबॉल (Football)

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या या खेळाविषयी, त्याच्या नियमांविषयी वगैरे अधिक लिहायची आवश्यकता नाही. मात्र तरीही एक उल्लेख करण्यासारखा वेगळा नियम म्हणजे प्रत्येक पात्र संघाच्या बहुतांश खेळाडूंचे वय हे २३ च्या वर असू शकत नाही. एका पुरूष संघात केवळ ३ खेळाडूंचे वय २३ च्या वरचे असण्यास अनुमती आहे.स्त्रियांच्या संघाला वयाचे बंधन नाही. शिवाय प्रत्येक खंडासाठी स्वतंत्र निवड फेऱ्या असल्याने जगभरातून अनेक प्रसिद्ध देशांना पात्रही होता येत नाही (जसे यंदा फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना इत्यादी प्रसिद्ध पुरूष संघांना पात्र होता आले नाही)

पुरुषांची स्पर्धा चार गटात तर स्त्रियांची तीन गटात खेळवली जाईलः
पुरुषः
गट अ: ग्रेट ब्रिटन, सेनेगल, युएई, उरुग्वे
गट बः मेक्सिको, साऊथ कोरिया, गबॉन, स्वित्झर्लंड
गट कः ब्राझील, इजिप्त, बेलारूस, न्यूझीलंड
गट ड स्पेन, जपान, होन्डूरास, मोरोक्को
स्त्रिया
गट इ: ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, कॅमरून, ब्राझील
गट फः जपान, कॅनडा, स्वीडन, दक्षिण आफ्रिका
गट गः अमेरिका, फ्रान्स, कोलंबिया, उत्तर कोरिया

या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल

स्पर्धा कुठे होणार?: सहा वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धा होणार आहे. व सारी मैदाने स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २५ जुलैपासून सुरू होतील. व पदक ११ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी अर्जेंटिना आणि अमेरिकेने एक एक पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

जिमनॅस्टिक्स (Gymnastics- Artistic आणि Rhythmic)

जिमनॅस्टिक्समध्ये दोन प्रकार असतात Artistic आणि Rhythmic. यांना वेगळा क्रीडाप्रकार म्हणून गणले जात असले तरी इथे आपण त्यांचा एकत्रच विचार करणार आहोत. हे दोन क्रीडाप्रकार मिळून तब्बल १६ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात.
आर्टिस्टिकः या प्रकारात १४ सुवर्णपदके प्रदान होतात. प्राचीन ग्रीसपासून लोकप्रिय असणार्‍या या स्पर्धांमध्ये शक्ती आणि लवचीकता या दोन्ही गुणांची पारख होते. या खेळात जजेसचा चमू गुण प्रदान करतो. गुण देतेवेळी काठिण्यपातळी, प्रदर्शित केलेल्या खेळातील प्रत, शक्ती(Strength), लवचीकता आणि बॅलन्स या कसोट्यांवर गुण दिले जातात. सर्व जजेसच्या गुणांच्या बेरजेवरून क्वालिफिकेशन आणि पदक ठरते.
रिदमिक या प्रकारात २ सुवर्णपदके प्रदान होतात. या स्पर्धांमध्ये लालित्य आणि सौंदर्याची पखरण असते. यात स्पर्धक संगीताच्या तालावर आणि हूप, बॉल, क्लब्ज आणि रिबिनीचा वापर करून आपले कसब प्रदर्शित करतात. या खेळातही जजेसचा चमू गुण प्रदान करतो. गुण देतेवेळी काठिण्यपातळी, कलात्मकता आणि प्रदर्शन (Execution) या कसोट्यांवर गुण दिले जातात. सर्व जजेसच्या गुणांच्या बेरजेवरून क्वालिफिकेशन आणि पदक ठरते.

स्पर्धा कुठे होणार?: रिदमिक स्पर्धा वेंबली अरेना येथे तर आर्टिस्टिक नॉर्थ ग्रिनिच अरेना येथे होणार आहेत. दोन्ही स्थळे स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः आर्टिस्टिक स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व ७ ऑगस्टपर्यंत चालतील तर रिदमिक स्पर्धा ९ ऑगस्टला सुरू होऊन १२ ऑगस्टपर्यंत चालतील.

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी रिदमिक स्पर्धेतील दोन्ही पदके रशियाने जिंकली होती तर आर्टिस्टिक स्पर्धेतील ९ पदके चीन तर २ अमेरिकेने जिंकली होती

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू
===========

हँडबॉल(Handball)

नावात म्हटल्याप्रमाणे बॉल हातात घेऊन खेळायचा हा खेळ आहे. इन्डोअर बॉलगेम्समधे याचे कोर्ट सगळ्यात मोठे असते. यातही फुटबॉलप्रमाणे दोन गोल असतात व गोलकीपर्स त्यांचे रक्षण करत असतात. गोलकीपर्सच केवळ गोलभोवती थांबू शकतो. तर विरुद्ध संघाचे खेळाडू हाताने (तुलनेने) लहान बॉल फेकून गोल करतात. गोल करताना जाळ्याजवळ असल्यास खेळाडूला हातातला बॉल पाय टेकायच्या आत जाळ्यात भिरकावावा लागतो. बॉल ड्रिबल करणे अथवा पास करणे अपेक्षित असते. (अमेरिकन फुटबॉलप्रमाणे)बॉल घेऊन पळण्यास प्रतिबंध असतो.
हाताने खेळल्यावर अर्थातच बरेच जास्त गोल होतात. दर मॅचमध्ये साधारण ५०हून अधिक गोल्स होतात. उत्साहाने भरलेल्या या मॅचेस ३० मिनिटांच्या दोन सत्रात खेळले जातात.

या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल

स्पर्धा कुठे होणार?: सुरवातीच्या स्पर्धा या ऑलिंपिक पार्कच्या कॉपर बॉक्स येथे होतील तर सेमी फायनल्स व फायनल्स याच पार्कच्या बास्केटबॉल अरेना येथे होतील. ही दोन्ही मैदाने स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व पदक १२ ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी फ्रान्स आणि नॉर्वेने प्रत्येकी एक पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

=====================

हॉकी (Field Hockey)

एकेकाळी भारताला हुकमी सुवर्णपदक मिळवून देणार्‍या व भारताचा राष्ट्रीय खेळ असणार्‍या हॉकीविषयी, त्याच्या नियमांविषयी वगैरे अधिक लिहायची आवश्यकता नाही. यातही विविध खंडांतील स्पर्धांमधून पात्रता मिळते. जसे पाकिस्तान २०१०च्या आशिया कपच्या विजनामुळे थेट पात्र झाला. भारताला मात्र खास पात्रता लढती खेळून पात्र व्हावे लागले आहे
पुरुषांची व महिलांची स्पर्धा दोन-दोन गटात खेळवली जाईलः
पुरुषः
गट अ: ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन,स्पेन, पाकिस्तान, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका
गट बः जर्मनी, नेदरलँड्स, कोरिया,न्यूझीलंड, भारत, बेल्जियम
महिला
गट अ: नेदरलँड्स, ग्रेट ब्रिटन, चीन,कोरिया,जपान, बेल्जियम
गट ब: अर्जेंटिना, जर्मनी, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका

या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल

स्पर्धा कुठे होणार?: रिवरबँक रेना या नव्याकोर्‍या फील्डवर या स्पर्धा होणार आहेत. व हे मैदान स्पर्धेसाठी सज्ज घोषित झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २९ जुलैपासून सुरू होतील व ११ ऑगस्टला पदक प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी जर्मनी आणि नेदरलँडने एक एक पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
भारताचा पुरुष संघ यावेळी पात्र आहे. संघातील खेळाडू:
भारत चेत्री (कॅ, गोकी)
सरदार सिंग (उपकप्तान)
पी.आर. श्रीजेश (गोकी)
संदीप सिंग
व्ही.आर.रघुनाथ
इग्नेस तिर्की
मनप्रीत सिंग
बिरेन्द्र लाक्रा
गुरबज सिंग
समर्पित(?) सुनील
दनिश मुजतबा
शिवेन्द्र सिंग
तुषार खांडेकर
गुरविंदर सिंग चन्डी
धरमवीर सिंग
एस्.के.उथप्पा

रीझर्व्ह:
सर्वणजीत सिंग
कोथाजित सिंग

यावेळी भारताला पदकाची आशा?
भारतीय हॉकी हळू हळू बहरत आहे. नुकत्याच झालेल्या फ्रान्सबरोबरच्या मॅचमध्ये ४-०ने भारत जिंकला असला तरी १४ ते १८ च्या ग्रेट-ब्रिटन व स्पेन बरोबरच्या सिरीजमध्ये अधिक कसोटी आहे. भारताकडे पदक जिंकण्याची क्षमता कागदावर तरी दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागेल. (यावर ऐसीच्या वाचकांच्या मतमतांतरांच्या प्रतीक्षेत आहे)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फेन्सिंग बद्द्ल माहित नव्ह्तं काहीच... मागे एकदा टीव्हीवर हा खेळ थोडावेळ पाहिला होता..पण नक्की काय झाल्यामुळे गूण मिळाले हे काहीच कळलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0