Skip to main content

"जीएं"चे "हिरवे रावे"

हिरवे रावे

जी. ए. कुलकर्णी यांचे "हिरवे रावे" वाचायला घेतलंय. पहिलीच कथा गिधाडे वाचून संपवली. जीएंचा आवाका आणि निरीक्षण भयंकर दांडगं आहे, हे जाणवलं. पालिकेतल्या साध्या कारकुनाची ही कथा. कॅशिअर लवकर निघून जातो, म्हणून दिवसभराचा गल्ला या कारकुनाकडे राहतो. हा पैसा घेऊन तो घराकडे निघतो. मात्र, स्टेशनवर एक टंच मुलगी टाक, टाक सँडल वाजवत जाताना दिसते. तो तिच्या मागे गाडीत चढतो. आणि त्याच्या आयुष्याचा ट्रॅकच बदलतो. ती मध्येच कुठल्याशा स्टेशनवर उतरते हे त्याला कळतही नाही. पुढे तो मुंबईसारख्या शहरात पोहोचतो. पालिकेचा पैसा खर्च करून टाकतो. मारून टाकलेल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतो. पैसा संपल्यानंतर घरी परत येतो. त्यानंतरचे त्याचे आयुष्य म्हणजे ही कथा. त्याच्या आयुष्याला काही अर्थच राहत नाही. पालिकेचा पैसा फेडताना त्याची होलपट होते. बायको नोकरी करते. नोकरीच्या निमित्ताने दुस-या पुरुषासोबत फिरते. त्याला एक मुलगी आहे. या मुलीचे अत्यंत करूण चित्र जीएंनी उभे केले आहे. ते वाचले की, काळीज पिळवटून निघते.

कथेचा शेवट खास जीएंचा आहे. हा कारकून ज्या कारखान्यात आश्रितासारखी नोकरी करीत असतो, त्याच कारखान्यात एक लंगडा मनुष्य त्याच्याच सारखा असतो. हा दुसरा मनुष्य मनानेही लुळा झालेला आहे. कारण त्याचा भूतकाळ या कारकुनासारखाच आहे. त्याचा हा भूतकाळ कळल्यानंतर कारकुनाच्या मनावरची सारी मरगळ दूर होते. त्याला जबरदस्त हुरहुरी वाटू लागते. तो आता लंगड्याला त्याच्या भूतकाळाबाबत प्रश्न विचारून विचारून छळणार असतो. त्याच्या रक्ताळलेल्या भूतकाळात गिधाडासारख्या चोची मारणार असतो.

माणसाच्या मानसिकतेचे असे हे अत्यंत दणकट चित्र जीएंनी उभे केले आहे. इतर कथा वाचतो आहे. वाचून झाल्या की, ऐसीवर टाकतोच.

समीक्षेचा विषय निवडा

सुशेगाद Thu, 10/04/2014 - 20:30

खूप छान. मी सध्या जी ए नि अनुवाद केलेलं रानातील प्रकाश हे पुस्तक वाचत आहे.
मूळ नाव द लाईट इन फोरेस्ट-कोनरोड रिक्टर.

ऋषिकेश Sat, 12/04/2014 - 13:15

In reply to by सुशेगाद

एक सल्ला. मुळ पुस्तक वाचा!
मागे अजानुकर्णाने सुचवल्यानुसार वाचले नी या रिक्टरसायबांचा फ्यानच झालो

भाषांतर बरेच कृत्रिम आहे असे माझे मत

अतिशहाणा Thu, 10/04/2014 - 23:16

इतर कथा कशा वाटतात तेही लिहा. जीएंचे काजळमाया आणि पिंगळावेळ हे दोन कथासंग्रह मला सर्वात जास्त आवडतात.

ऐसि पाहुणा Sat, 12/04/2014 - 08:19

In reply to by अतिशहाणा

पिंगळावेळ हा संग्रह आणि त्यातहि 'कैरी' हि कथा मला विलक्षण आवडतात. कैरिचा सत्यानाश केल्यामुळे मला अमोल पालेकर या गृहस्थाचा फारच राग येतो. असो.

तेजा Sun, 13/04/2014 - 16:48

In reply to by ऐसि पाहुणा

कैरिचा सत्यानाश केल्यामुळे मला अमोल पालेकर या गृहस्थाचा फारच राग येतो

अमोल पालेकर यांचे नाव समोर आले की, का कोणास ठाऊक पण मला पाल आठवते. त्यांचा पालीशी काही संबंध आहे किंवा कसे न कळे? पालेकरांचे हावभाव आणि हालचाली पालीसारख्याच थंड असल्यामुळे असे होत असावे, अशी मी माझी समजूत करून घेत असतो.

१. पाल या शब्दाचा अर्थ आंग्ल भाषेतल्या प्रमाणे House Lizard असा घ्यावा.

(श्री. ब्यट्म्यान यांच्याकडून स्फुर्ति घेउन तळ्टीप दिली आहे. ग्वाड मानुन घ्यावी.)

राजेश घासकडवी Fri, 11/04/2014 - 17:31

या कथेतलं मरीन ड्राइव्हवर नवीन कोरे बूट घेऊन टॉक टॉक करत फिरल्याची नशा आयुष्यभर त्याच्या डोक्यात राहते. त्या एका क्षणाभोवती त्याचं आयुष्य गर्रकन फिरतं आणि फिरत राहतंही.

समीक्षा लिहिताना संपूर्ण कथा व तिचा शेवट सांगण्याची गरज नाही. सांगणार असाल तर 'स्पॉयलर अॅलर्ट' द्यावा म्हणजे ज्यांना ते वाचायची इच्छा नाही त्यांना ते टाळता येईल.

तेजा Fri, 11/04/2014 - 19:38

In reply to by राजेश घासकडवी

समीक्षा लिहिताना संपूर्ण कथा व तिचा शेवट सांगण्याची गरज नाही. सांगणार असाल तर 'स्पॉयलर अॅलर्ट' द्यावा म्हणजे ज्यांना ते वाचायची इच्छा नाही त्यांना ते टाळता येईल.

जीएंच्या कथांना हा नियम लागू आहे, असे मला वाटत नाही. कारण जीएंच्या कथा एकदा वाचून सोडून द्यायच्या वर्गातील नाहीत. त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. त्याच त्याच कथा माणूस वर्षानुवर्षे वाचत राहतो. ज्या कथा एकदाच वाचून सोडून द्यायच्या असतात त्यांचा शेवट न सांगणे योग्य.

राजेश घासकडवी Fri, 11/04/2014 - 20:00

In reply to by तेजा

माझ्या मते हा नियम सर्वच कथांना लागू आहे. प्रथम वाचनाचा अनुभव विशेष असतो. त्याआधी सगळी कथाच माहीत झाल्याने बहुतेक लोकांचा रसभंग होऊ शकतो. समीक्षेत कथा सांगण्याऐवजी कथेची आणि लेखकाची बलस्थानं अशा पद्धतीने सांगणं अपेक्षित आहे की वाचकाला ती वाचण्याची उत्सुकता वाटत रहावी. समीक्षा वाचून पहिल्या वाचनाचा आनंद वाढावा.

आणि हा नियम मोडण्याची इच्छा असलेल्यांनी केवळ 'नियम मोडला आहे' अशी सूचना द्यावी इतकीच माफक अपेक्षा आहे.

रमताराम Fri, 11/04/2014 - 21:15

In reply to by राजेश घासकडवी

घासुगुर्जींशी प्रथमच असहमत. कथे मधे काय की चित्रपटात काय, शेवटाला इतकं महत्व का द्यावं असा माझ्यासमोर प्रश्न आहे. पुरे चित्र पहायचे तर कॅनव्हासची खालची बाजू आधी दाखवू नका म्हणणे कितपत सयुक्तिक आहे. मुळात हा प्रकार शिंच्या त्या 'ट्विस्ट इन द टेल' सारख्या कथा किंवा 'शेवट सांगू नका' टैप झैराती करणार्‍या मर्डर मिस्टरी चित्रपटांमुळे रूढ झालेला दिसतो. कथा म्हणा वा चित्रपट तो पूर्णत्वाने अनुभवायचा असतो (गोदार तर म्हणतो चित्रपटाला सुरवात-शेवट असे काही असूच नये... जौ दे इतक्या टोकाला जायचीही गरज नाही.) अनेक कथांमधे - विशेषतः जीएंच्या कथांमधे - शेवट असा नसतोच, असतात त्या शेवटाच्या शक्यता. तेव्हा तिथे शेवट सांगितला म्हणजे मुळीच काही बिघडायचे कारण नाही. सारी कथा एकदा वाचलेले पुनर्वाचनाचा आनंदही घेतातच की.

जयदीप चिपलकट्टी Sat, 12/04/2014 - 08:05

In reply to by राजेश घासकडवी

एकदा ससा आणि कासव यांची शर्यत लागते. बाकीची कथा इसापनीतीत वाचावी. रसभंग होऊ नये म्हणून शेवट सांगत नाही, पण काही वाचकांना तो अनपेक्षित वाटेल आणि इतरांना प्रेडिक्टेबल वाटेल इतकंच नमूद करतो.

सुचिता Tue, 15/04/2014 - 20:58

रमताराम यांच्यांशी पूर्ण पणे सहमत. शेवट सांगीतल्या मुळे निदान समिक्षेचा आंनद घेता आला.