सत्कारणी लागलेली वार्षिक पुणे-भेट!
दुपारी अचानकपणे हाताशी असणार्या ३ ते ४ अशा मधल्या वेळाचं काय करावं बरं?? आणि लक्षात आलं की आपण इंटरनॅशनल बुक डेपोच्या अगदी जवळ आहोत. मग हातातील ओझं, (‘चितळ्यां’कडच्या खाऊमुळे झालेलं!) सावरत पोचले तिथवर! बघते तर दुकानाचा मुख दरवाजा बंद पण काचेचे शेल्फ उघडेच दिसत होते.
फोन करून विचारावं की पुस्तकं बघता येऊ शकतील का ते? की पुणेरी वा चितळे स्टाईल काहीतरी उत्तर मिळेल?
फोननंबर जवळ नव्हता म्हणून नेहमीच्या ठरलेल्या दोन-तीन पुस्तक-विक्रेत्यांना फोन करून विचारला. त्यांच्याकडे नाही मिळाला.
लक्षात आलं, ‘काखेत कळसा...’ झालायं!
सेलफोनवरून ‘गुगल-सर्च’ केलं आणि काय ... थेट कॉलच केला.
वयस्कर आवाजात लांबलचक ‘हेल्लोऽऽऽ’ ऐकू आलं. त्यांना म्हटलं, मला गुरुदेव रानडे यांची काही पुस्तके बघायची आहेत, मी येऊ का आत?
ते म्हणाले, ‘दुकान बंद आहे, ४ वा. उघडेल.’
मी म्हटलं, ‘मी दुकानाच्या बाहेर उभी आहे. माझी ४वा. शिवनेरीची बस आहे. आत्ता दुकान उघडू शकलात तर...’
‘थांबा जरा, येतो..’
आणि दरवाजा उघडून वयस्कर काकांनी आत बोलावलं. म्हणाले, ‘आता फारशी शिल्लक नाहीत, पण जी आहेत ती दाखवतो.’
आणि मग बरीच पुस्तकं काढली त्यांनी गुरूदेवांची! मग त्यातलीच काही निवडक घेतली.
आता आलेच आहे तर विचारून बघू... तर अरुण कोलटकरांची ‘भिजकी वही’ अन त्यांचीच इतर दोन पुस्तकंही मिळाली.
एका स्टॅंडवर नजर टाकली तर प्रभाकर बरवेंचं ‘कोरा कॅनव्हास’ दिसलं. त्या पुस्तकाविषयी फेसबुकवरच मागे कधीतरी वाचलं होतं.. जास्त विचार न करता तेही घेतलं.
त्या काकांना इतर काही पुस्तकांची माहिती विचारली. त्यांनी दुकानाचे फोननंबर्स असलेलं कार्ड दिलं आणि आश्वासनही, ’बघतो, मिळाली तर शोधून ठेवेन..’
भलत्या वेळी दुकान उघडायला लावलं होतं तरीही खरेदीवर सूट दिली.
मी निघताना माझ्याकडचं उरलेलं एकमेव कीट्कॅटचं चॉकलेट त्यांना दिलं. म्हणाले, ‘काका, तुमच्यामुळे उत्तम खरेदी झाली. माझ्यातर्फे तुम्हांला हा छोटासा खाऊ!’
त्यांनी ते घेतलं व म्हणाले, ‘अहो, गुरूदेवांचं नाव घेतलंत तुम्ही! नाही म्हणणं शक्यच झालं नाही मला...’
माझं मन भरून आलं...
पुण्याची वार्षिक भेट सत्कारणी लागल्याने आणि श्रध्दामय अनुभवाने!
‘कोरा कॅनव्हास’ची प्रस्तावना वाचली... आणि एक चांगलं पुस्तक अचानकपणे हाती आल्याचा आनंद झाला.
`भिजकी वही' विषयी इथे कुणी काही लिहिलंय का? असल्यास संदर्भ मिळू शकेल का?
समीक्षेचा विषय निवडा
(तुमच्या वरील लेखात
(तुमच्या वरील लेखात विचारलेल्या प्रश्नांना हे उत्तर नसल्याने माझा हा प्रतिसाद "अवांतर" असं म्हणेन )
अवांतर - वा! पुण्यात आणि ते ही शहराच्या एवढ्या मध्यावर असलेल्या दुकानात आणि त्यातही पुणेरी आजोबांकडून अशी वागणूक मिळाली हे वाचून खूप छान वाटले :) आणि त्यांच्या एवढ्या छान वागण्याला तुम्ही जी गोड दाद दिलीत ती जास्त भावली. आपण नेहमी पुणेरी लोकांच्या खडूसपणा बद्दल बोलतो (आणि त्यात काही वावगं देखील नाहीये कारण खरंच कधीकधी अतीच होतं) पण जर कोणी चांगलं बोललं तर त्यांना तशी/तिथल्यातिथे दाद फार कमी लोक देतात, अश्या चांगल्या वागणूकीची दाद आपण देत राहिलो की सगळेच पुणेरी दुकानदार/विक्रेते सौजन्याने वागतील आणि नम्रपणे आपल्या ग्राहकांशी बोलतील अशी अपेक्षा आहे. मुळात विक्रेत्याचं ते कर्तव्यच आहे आणि त्याने साहाजिकच ग्राहकाशी तसं वागायलाच हवं पण त्याला तसं समजत नसेल तर आपण सौजन्याने ते दाखवून देऊ शकतो (म्हणजे अगदी दुकानाची बंद वेळ असतांनाही ग्राहकाच्या मागणीनुसार दुकान उघडणे एवढंही सौजन्य अपेक्षित नाहिये त्यात, but you're just 'too' lucky ). :)
उपेन्द्र दीक्षित
लेख वाचून आनंद वाटला.
वरील वर्णनातले वयस्कर काका म्हणजे माझे कॉलेजपासूनचे मित्र आणि दुकानाचे मालक उपेन्द्र दीक्षित असावेत. दुकानाचे संस्थापक विठ्ठलराव आणि जुन्या लेखिका मुक्ताबाई दीक्षित ह्यांचे हे चिरंजीव.
ते काका उपेन्द्र स्वतः नसले तर दुकानातील असेच जुने सेवक असतील कारण तेथे काम करणारे सर्वच आता 'वयस्कर काका' ह्या वर्णनात बसतात.
वर्णनात सांगितलेला आस्थेवाईकपणाहि असाच जुना आहे.
गुरुदेव रानडे
निंबाळ ?
नित्य नेमावलीतील काही भजनांची सिडी ऐकली होती.फार सुंदर चाली होत्या.
त्याच नेमावलीतील तुकारामांचे विसेक अभंग चांगले लक्षात आहेत. जन्माचे ते मूळ पासून पुढे...
असो.