चिं. त्र्यं. खानोलकर - "गणुराया" आणि "चानी"
चि.त्र्यं. खानोलकर, "गणुराया" आणि "चानी"
मौज प्रकाशन, मुंबई, प्रकाशन वर्ष १९??
चिं. त्र्यं. खानोलकरांची "गणुराया" सुरुवातीला थोडी विचित्रच वाटली. सगळी सर्वनामे, तुटक-तुटक वाक्ये, कशाची कशाला नीट लिंकच लागेना. पुस्तक ठेवून दिलं. वाचन आव्हान सुरू केल्यावर पुन्हा हाती घेतलं, या वेळेसही प्रथम (मेघनाच्या भाषेत सांगायचे तर) पुस्तकात "घुसायला" वेळ लागला. पण हळूहळू गणुराया आणि बेबीची पात्रे मनात आकार घेऊ लागली. दोघेही सरकारी हापिसात नोकरी करणारे, संध्याकाळी चौपाटीवर भेटणारे. दोघांना एकमेकांची ओढ, काही आशा. याची जाणीव होताच काहीतरी बिनसतं, आणि त्यांच्या भेटी बंद होतात - ती वाट बघत राहते, पण गणुरायाच्या मनात वेगळंच वादळ उठत जातं. त्याच्यावर घरचा एकमेव कमवणारा मुलगा असल्याचं बोजं वाढत जातं, त्याच्या वडिलांच्या लांब कोकणातून, पत्रांमार्फत, सप्रेम आशीर्वादासकट येणार्या हाका, फिर्यादी, धमक्या, विनवण्या, कानात अधिकाधिक कर्कश्श होऊ लागतात. त्यांच्या गरजा आणि गावातल्या श्रीमंत माणसाशी चाललेल्या बरोबरीचा खर्च वाढतच जातो. शेजारी नोकरीवर जाणार्या जोडप्यांनी खोलीत बंद करून ठेवलेल्या मुलांचे रडणे त्याला असह्य होते. त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या, भवितव्याच्या विचारात ते रडणे मिसळून त्याला गोंधळात टाकते. प्रेमाचा, लग्नाचा हाच का अर्थ, हेच का ध्येय? त्याला हे सगळे विचार एकीकडे हताश, तर दुसरीकडे कमालीचे बेचैन करून ठेवतात. या कोंडमार्यातून तो मार्ग काढू पाहतो, बेबीला भेटणे टाळतो. लग्न, संसार, प्रेम, कौटुंबिक जबाबदारी या सगळ्याचा मुक्त श्वासाशी सांगड घालू पाहत पाहत शेवटी स्वत:लाच अगदी सहज आणि समाजमान्य, पण अत्यंत विचित्र साखळीत जखडून घेतो. तिकडे बेबीला गणुरायाच्या दुराव्याचे दु:ख होतं; लांबून तिच्यावर केविलवाणी प्रेम करणार्या, तिला मागणी घालणार्या खोतबरोबर प्रेमाची तडजोड तिला करवता करवत नाही. चौपाटीवर गणुरायाची वाट पाहत राहते, प्रेम, लग्न, संसार, जोडीदार यावर ती ही विचार करते.
मला गणुरायाच्या गुदमरलेल्या अवस्थेच्या वर्णनाने खूपच अस्वस्थ केले. त्याच्या विवेकाशी (लहानपणीच्या आठवणींच्या, आता गायब झालेल्या मित्राच्या रूपात) आणि बेबीशी केलेल्या तडजोडीमुळे त्याची कीव येते, पण खानोलकरांना गणूरायाबद्दल इतकी माया आहे की वाचकाला कधी त्याचा तिरस्कार होऊ देत नाहीत. त्याची शेवटची तडजोड हे त्याचे प्रायश्चित्त आहे. गणुरायाबद्दल आपली माया कायम ठेवून माणसांमधल्या अगदी निकट संबंधांना पैशांनी मोजणारी पण त्याला कौटुंबिक जबाबदारीचा मुखवटा चढविणारी सिस्टिमच कशी नास्की, कुजलेली आहे हे बिंबवतात. कथा वाचताना गणुरायाचा शेवट मला काहीसा अपेक्षित होता, पण बेबीच्या मानसिक प्रवासाचा रेखाटणीने मी चकित झाले. लग्नाचा तिने लावलेला प्रथम कटू अर्थ, पण शेवटी मिळविलेला मुक्त श्वास - चौपाटीवरचा संध्याकाळचा मंद, प्रसन्न वारा - फारच भावला. तिच्या सुधारक पालकांची पात्रे आधी काहीसे कृत्रिम वाटले होते, बट दे इवेन्ज्युअली कम थ्रू फॉर देर बेबी. तिला तिच्याच अस्तित्वाची चाहूल लागते.
"गणुराया"तल्या तुटक-तुटक वाक्यांनंतर "चानी" मधली समृद्ध, तपशीलवार निसर्गाचे व पात्रांची वर्णने, ओव्या, दिनूच्या कोवळ्या मनातले विचार वगैरे अगदीच अनपेक्षित होते. शैलीतल्या ठळक फरकामुळेच या दोन्ही एकत्र छापल्या गेल्या का? त्यांच्यात तसे बरेच साम्य आहे, मात्र. दोन्ही कथांमधील पात्रे प्रस्थापित नियमांविरुद्ध लढा वगैरे देत नाहीत; या नियमांचा नीट बोधच त्यांना होत नाही, त्यांची आवश्यकताच त्यांना जाणवत नाही. समुद्राच्या काळोख्यात, मित्राच्या खोलीत जीवनाचा अर्थ शोधणारा गणुराया, आणि ओव्यांतून, चित्रांतून स्वत:ला व्यक्त करणार्या चानी आणि धाकटी मामी, यांच्यामधे नाते आहे असं वाटतं. तिघं ही सिस्टिम मधे कसेबसे स्वत: ला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात, आणि आपल्या परीने त्याला शरण जाऊन खपतात.
दिनूचे पुढे काय झाले याबद्दल मला खूप कुतूहल वाटते - तो ही मोठा होऊन मुंबईलाच येतो का? त्याच्यावरही संसाराचे दडपण पडते का? तो प्रेम करताना प्रेयसीला कसे वागवतो - तिचा राजपुत्र होऊ पाहतो का? एकूण "बिल्डुंग्स्रोमन" कथांमधे ही कथा सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे यात संशय नाही. दिनूशी मैत्री साधणारी, त्याला भाऊ मानणारी, गावभर मनसोक्त हिंडणारी, चित्रकार, आणि गावातली वेश्या म्हणून कलंकित असलेली, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची चानी त्याला जगाचे, माणसांतील संबंधांचे आणि त्याच्या स्वत:च्या भावविश्वाचे नव्याने ओळख करून देते. स्वत:बद्दलच्या, आपल्या परिवार, परिसराबद्दलच्या त्याच्या कल्पना कायमच्या पालटून जातात. त्याचा सुंदर, निसर्गरम्य, सभ्य आणि स्वच्छ परिसर किती हिंसक आहे याची त्याला जाणीव होते.
चानीचे खरंतर किती ही तपशीलवार वर्णन असले तरी ती नीट माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली नाही - फक्त ते हसणं नीट ऐकू आलं. तिच्याबद्दल, आजीबद्दल, आप्पा बामणाबद्दल, धाकट्या मामा-मामीबद्दल इतके प्रश्न अजून मनात आहेत - कथा पुन्हा एकदा वाचावी लागेल, मामीच्या ओव्या पुन्हा ऐकाव्या लागतील.
खानोलकरांचे मी वाचलेले हे पहिले पुस्तक. या आधी फक्त त्यांच्या काही कविता वाचल्या-ऐकल्या होत्या, त्यांच्याबद्दल फार काही माहित नव्हते; नाही. या कथांमधली स्त्री पात्रे फार आवडली. पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढणार्या स्त्रीवादी भूमिकेतून रचल्या गेल्या नसल्या तरी त्यांच्यातला स्वच्छंद पणा (मामीच्या बाबतीत थोडा बिचकत, बेबी - थोडा नाइलाजाने, चानी - अगदीच स्व-घातकी) खूपच भावला.
या नंतर खानोलकरांचे कुठले पुस्तक वाचू?
समीक्षेचा विषय निवडा
मला खानोलकरांच्या कविता
मला खानोलकरांच्या कविता जितक्या 'झाल्या' (एखादा कपडा अंगाला बरोबर 'होतो', त्या चालीवर), तशा त्यांच्या कादंबर्या झाल्या नाहीत. 'गणुराया नि चानी' नाही, आणि (माफ करा, पण) 'कोंडुरा'ही नाही. मध्यंतरी 'कोंडुरा' पुन्हा वाचली, तेव्हा ती मला फारच कृत्रिमरीत्या अलंकृत वाटली. त्यामुळे हा लेख मी अत्यंत कोरडेपणानं, काहीही अंगाला लावून न घेता वाचला आहे.
अवांतरः नेटानं वाचते आहेस ते भारीच. माझ्याकडे अजून पाचपन्नास पुस्तकांची हावरट भर पडलीय आणि मी हताश झालेय.
खानोलकर - आरती प्रभू
मेघना म्हणते आहे तसेच माझेही मत आहे. लेखक/कथाकार/नाटककार खानोलकर हे 'आरती प्रभू' अधिक होते.
जर तुम्ही त्यांचे कविता संग्रह 'जोगवा' - 'दिवेलागण' - 'नक्षत्रांचे देणे' या क्रमाने वाचलेत तर त्यांचा एक कवी म्हणून झालेला प्रवास त्यांतून दिसतो. कोकणात सुरू झालेल्या निसर्गाच्या कविता मुंबईत येऊन कसे वेगळे रूप धारण करत जातात याची कल्पना समांतररीत्या मिळत जाईल.
तसेच 'बाळगोपाळ' हा लहान मुलांसाठी एक कवितासंग्रह लिहीला जो आता अजिबात उपलब्ध नाही, त्याची नोंदही फारशी घेतली जात नाही.
मागे 'इरसाल म्हमईकर' यांनी 'रात्र काळी घागर काळी' या खानोलकरांच्या कादंबरीवर एक धागा काढला होता. तिथे थोडी कल्पना येईल.
मी 'राखी पाखरू' हा त्यांचा एकमेव कथासंग्रह वाचला होता पण तो तितका भावला नाही. कदाचित ज्या वयात वाचला त्याचाही परिणाम असेल. आता पुन्हा वाचून पाहायला हवा.
तुम्हांला 'चानी' आवडली असेल तर कदाचित 'कोंडुरा' आवडेल. (कोंडुरावर श्याम बेनेगलांनी चित्रपट काढला आहे.)
माझ्या आठवणीप्रमाणे ' गणुराया...'चे प्रकाशन वर्ष १९७० आहे.
लेखन वैशिष्ट्ये ?
कादंबरीतील कथेबद्दल उहापोह करणे लेखकाच्या कामाबद्दल काहि सांगते काय? कथेत काय घडते किंवा कसे घडते ह्याच बरोबर कादंबरी-लेखनाची कोणती वैशिष्ट्ये त्यात आढळतात हे जाणून घेण्यास आवडेल.
खानोलकरांच्या लेखनावर तुम्ही काहि टिप्पणी करु शकाल काय?
'रात्र काळी घागर काळी' बद्दल -
माझ्यामते खानोलकरांची कथा हि फक्त कल्पनेचे अपत्य आहे, त्यात कोकणातल्या वास्तवतेचा फारच कमी टक्का सापडतो, कथेपेक्षा त्यांची शैली/शब्दयोजना प्रवाही+रोचक आहे त्यामुळे कथेत फारसे काही घडत नसले तरी कथेचा वेग कमी होत नाही, त्यांच्या 'रात्र काळी घागर काळी' कथा-आशयला समांतर अशा श्री.नांच्या कथा जास्त रोचक असतात कारण त्यामधे घडणार्या गोष्टी अनेक आहेत त्यामुळे शैली कमी प्रवाही/रोचक असली तरी कथेचा वेग कमी होत नाही.
गणुरायावर एक मराठी सिरिअल पाहिल्याचे आठवते, गणु कोण ते आठवत नाही पण बहुदा त्याचे वडिल म्हणजे बाळ कर्वे होते.
श्री.नांच्या कथा जास्त रोचक
श्री.नांच्या कथा जास्त रोचक असतात कारण त्यामधे घडणार्या गोष्टी अनेक आहेत त्यामुळे शैली कमी प्रवाही/रोचक असली तरी कथेचा वेग कमी होत नाही.
अगदी अगदी! हेच लिहिता लिहिता हात आवरला होता, खानोलकरांचा धागा पेंडशांमुळे हायजॅक व्हायला नको म्हणून. पण मला खरोखरच कादंबरीकार म्हणून पेंडसे कितीतरी ग्रेट वाटले. अजुनी वाटतात.
चला. या नंतर खानोलकरांचं
चला. या नंतर खानोलकरांचं "रात्र काळी" पुस्तक तरी घेणार नाही वाचायला! मी रँडमली (आर्बिट्ररिली?) गणुराया/चानी उचललं होतं; कोंडुरा वाचीन पुढे कधीतरी. खानोलकरांना नापसंत करणारे इतके ऐसीकर आहेत हे माहित नव्हते!
मेघना - ग्रॅजुएट स्कूल मधे सेमिनारात आठवड्याला एक पुस्तक वाचायची, त्यावर रिस्पॉन्स पेपर लिहून वर्गात आणायची शिस्त होती; त्याला आता प वर्षं झाली, पण तीच पाळायचा प्रयत्न चालू आहे!
मी,
कादंबरीतील कथेबद्दल उहापोह करणे लेखकाच्या कामाबद्दल काहि सांगते काय? कथेत काय घडते किंवा कसे घडते ह्याच बरोबर कादंबरी-लेखनाची कोणती वैशिष्ट्ये त्यात आढळतात हे जाणून घेण्यास आवडेल.
खानोलकरांच्या लेखनावर तुम्ही काहि टिप्पणी करु शकाल काय?
(प्रश्न नीटसा कळला नाही, पण) - प्लॉटिंग, आणि कथेचा उलगडा आणि वेग हे लेखकाच्या हातात असतेच. कथा रोमांचकारक नसली तरी रोचक असावीच लागते. कादंबरी लंबी रेस की घोडी - मूळ कथेत आणि पात्रांत दम असावा लागतो, त्यांना डिवेलप करण्याला वेळ द्यावा लागतो. या उलट लघुकथेला एक धार, लौचिकता असावी लागते, कारण थोड्याच वेळात अनेक विळखा घेऊन, करामत करून दाखवायची असते. दोन्ही लेखनप्रकारांत फारसं काही घडत नसलं तर एक तर पात्रांच्या रेखाटणीला अधिक महत्त्व येतं, नाहीतर शैलीला. काही लेखक शैली विषयाप्रमाणे, कथानकाच्या गरजेप्रमाणे बदलू शकतात - काहींची फिक्स असते, गूढकथा असो वा प्रवासवर्णनपर, एकच. शैली आणि आशयाचा, किंवा एखाद्या पात्राच्या वागणुकीशी, चरित्राशी मेळ माझ्यापुरता मला लावता आला, तर लेखकाने यश मिळवला असं मी समजते. म्हणजे गणुरायातल्या तुटक वर्णनाचे त्याच्या मानसिक कोंडीशी मी लिंक लावला; त्यामुळे मला कथेचा अधिक आनंद घेता आला. हे थोडेफार सापेक्ष असावे. मला संथ प्रवाही, फारसं काही न घडणार्या कथा आवडतात, पण त्याबरोबर तपशीलवार वर्णनाची शैली जबरदस्त हवी - अमित चौधरी या लेखकाच्या कादंबर्या मला म्हणूनच भयानक बोर होतात.
कथेपेक्षा त्यांची शैली/शब्दयोजना प्रवाही+रोचक आहे त्यामुळे कथेत फारसे काही घडत नसले तरी कथेचा वेग कमी होत नाही.... श्री.नांच्या कथा जास्त रोचक असतात कारण त्यामधे घडणार्या गोष्टी अनेक आहेत त्यामुळे शैली कमी प्रवाही/रोचक असली तरी कथेचा वेग कमी होत नाही.
सहमत!
असे करू नका
या नंतर खानोलकरांचं "रात्र काळी" पुस्तक तरी घेणार नाही वाचायला!
..............या निष्कर्षाप्रत येण्याचे कारण कळले नाही. खानोलकरांच्या कादंबर्यांबद्दल/लेखनाबद्दल विपरीत मत एवढ्यातच बनवू नका अशी विनंती.
ऋता म्हणतात त्याप्रमाणे 'सनई आणि देवाची आई' वाचण्याची शिफारस मीही करेन (बहुधा हे पुस्तक सध्या उपलब्ध नाही त्यामुळे मी आधी सुचविले नव्हते) आणि 'चानी', 'कोंडुरा' चित्रपट पाहण्यात गम्य नाही असे चिंजंप्रमाणे मीही सुचवेन.
आता इतरांचे मत आजमावतच आहात तर त्यांच्या 'एक शून्य बाजीराव' या पहिल्या नाटकाबद्दल विजया मेहता आणि श्रीराम लागू यांचे म्हणणे इथे ३:३५ ते ८:१५ ऐका. 'गुरू महाराज गुरू'बद्दलची फीत मी आधीच तुम्हाम्ला खरडीत दिली होती.
"रात्र काळी" वाचल्यावर
"रात्र काळी" वाचल्यावर खानोलकर वाचणार नाही असं काही प्रतिसादात वाचलं, तेव्हा गंमत म्हणून बापरे ते नको, हे कोंडुराच बरं असं म्हटलं - वाक्याला कदाचित एक ;-) जोडायला हवा होता. असो. मला गणुराया-चानी खूपच आवडले; त्यामुळे मी त्यांच्या मिळतील तितक्या कथा-कादंबर्या वाचीनच.
शैली
या नंतर खानोलकरांचं "रात्र काळी" पुस्तक तरी घेणार नाही वाचायला!
मी वाचा असं सुचवेन.
(प्रश्न नीटसा कळला नाही, पण) - प्लॉटिंग, आणि कथेचा उलगडा आणि वेग हे लेखकाच्या हातात असतेच.
बहुदा मी निटसे विचारले नाही. खानोलकरांच्या लेखनात मला भावलेली गोष्ट म्हणजे एखादं पात्र घेऊन त्याच्या व्यवच्छेदक लक्षणाबाबत ते बरच काही अगदी सहजपणे सांगतात कि डोळ्यासमोर ते पात्र अगदी लख्ख उभं रहातं(उदा. झेल्या), इतरही लेखक पात्र-उभारणी करतात पण ती एवढी नेमकी असल्याचे फारच विरळपणे आढळते, त्याचबरोबर त्यांची कथा बहुतेकवेळा सवर्णाच्या अवती-भवतीच फिरते उदाहरणार्थ कथेत एखादाच वेडा किंवा उस्मानभाई असतो किंवा अभावानेच खालच्या जातीतला असतो,एवढे अवलोकन/चिंतर करणार्या माणासाच्या कथेचा अवाका मात्र फारच कमी वाटतो.
अगदी अगदी! हेच लिहिता लिहिता हात आवरला होता, खानोलकरांचा धागा पेंडशांमुळे हायजॅक व्हायला नको म्हणून. पण मला खरोखरच कादंबरीकार म्हणून पेंडसे कितीतरी ग्रेट वाटले. अजुनी वाटतात.
बहुदा मला खानोलकर किंचित पेंडशांपेक्षा ग्रेट होते असे सुचवायचे होते, म्हणजे शैली/शब्दयोजना भारी असल्यामुळे कंटेट फार नसले तरी पुस्तक सोडवत नाही, पण पेंडशांकडे कंटेंट फार आहे आणि शैली एखाद्या फास्ट थ्रिलरची आहे, त्यामुळे पुस्तक सोडवत नाही.
बहुदा मला खानोलकर किंचित
बहुदा मला खानोलकर किंचित पेंडशांपेक्षा ग्रेट होते असे सुचवायचे होते, म्हणजे शैली/शब्दयोजना भारी असल्यामुळे कंटेट फार नसले तरी पुस्तक सोडवत नाही, पण पेंडशांकडे कंटेंट फार आहे आणि शैली एखाद्या फास्ट थ्रिलरची आहे, त्यामुळे पुस्तक सोडवत नाही.
काय की. ही खानोलकरी शैली कवितेला पूरक. कादंबरी मात्र वाचावी तर पेंडशांचीच असं मला अजूनही वाटतं. पण ठीक. टू इच हिज ओन.
खानोलकर
मला स्वतःला 'आरती प्रभू' खानोलकरांपेक्षा अधिक आवडतात, पण खानोलकरांचं गद्य लेखनदेखील आवडतं. 'गणुराया' आणि 'चानी' दोन्ही आवडले होते. शिवाय 'अजगर', 'एक शून्य बाजीराव', 'अवध्य'सुद्धा आवडले होते आणि काही सुट्या कथाही आवडल्या होत्या. शहरी आणि खेड्यातल्या अशा दोन्ही व्यक्तिरेखांची नाळ त्यांना सापडलेली दिसते. कादंबरीत घटना किती घडतात वगैरेंमुळे मला फारसा फरक पडत नाही. विशेषतः जगताना आलेला परात्मभाव (एलिअनेशन) मराठीत प्रभावीपणे आणणारं असं त्यांचं लेखन मला वाटतं. त्यांनी लहान मुलांसाठी पद्य नाटिकाही लिहिल्या आहेत पण त्या उपलब्ध नसाव्यात. 'किशोर'मासिकात पुष्कळ वर्षांपूर्वी काळ्या कावळ्यांत एक पांढरा कावळा प्रोटॅगनिस्ट असलेली नाटिका वाचल्याचं (आणि आवडल्याचं) आठवतं आणि त्यातलंदेखील एलिअनेशन जाणवलं आणि आवडलं होतं.
(जाता जाता : सिनेमे वाईट आहेत. अजिबात त्यांच्या वाटेला जाऊ नका)
पांढरा कावळा!!! (युरेका!)
'किशोर'मासिकात पुष्कळ वर्षांपूर्वी काळ्या कावळ्यांत एक पांढरा कावळा प्रोटॅगनिस्ट असलेली नाटिका वाचल्याचं (आणि आवडल्याचं) आठवतं आणि त्यातलंदेखील एलिअनेशन जाणवलं आणि आवडलं होतं.
खानोलकरांचे/आरती प्रभूंचे फारसे काही वाचलेले नाही, पण लहानपणी अशी एक नाटिका - तीही 'किशोर' मासिकात (येस्स्स्स्स!) - वाचल्याचे (आणि त्याबरोबर बहुधा 'चिं. त्र्यं. खानोलकर' असे नाव वाचल्याचेही) अंधुकसे आठवत होते - परवाच कोठेतरी मनोबांनी 'कावळा काळाच असतो असे आपल्याला ठाऊक असते' वगैरे काहीतरी विधान केले होते, तेव्हा तोंडावर फेकण्याची खुमखुमी अनावर झाली होती - पण खात्री नव्हती. आणि खात्री करणार कशी? इथे विचारून पाहावेसे वाटले होते एकदा, पण मग नको म्हटले. काय आहे, 'खानोलकरांनी पांढर्या कावळ्यावर काहीतरी नाटक लिहिले होते, त्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का?' म्हणून इथे विचारायचे, आणि नेमके ते कोणतेसे नाटक खानोलकरांनी लिहिलेले नसून भलत्याच कोठल्यातरी (तुलनेने अप्रसिद्ध) सोम्यागोम्याने लिहिलेले असायचे (नाटक लहानपणी वाचलेले असल्याने त्या काळात भलतीच नावे भलत्याच कशाच्या संदर्भात लक्षात राहिलेली असण्याची शक्यता भरपूर!), की मग आमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल इथे ब्लँक, क्लूलेस स्टेअर्स मिळायच्या, की इथल्या वाङ्मयीन (म्हणजे वाङ्मयवाचक, दिसले-छापलेले-की-कुरतडून-पाडला-फडशा-टैप) दिग्गजांपुढे आमच्या (मुळात नसलेल्या) इज्जतीचा कचरा व्हायचा. त्यापेक्षा, नकोच ते!
दस इट रिमेन्ड समथिंग द्याट आय ह्याव आल्वेज़ वाण्टेड टू नो अबौट (बट वाज़ अफ्रेड टू आस्क)!
त्यामुळे, चिंतातुर जंतूंनीसुद्धा जेव्हा त्या नाटिकेचा (आणि तीसुद्धा 'किशोर' मासिकात वाचल्याचा - पुन्हा येस्स्स्स्स!) उल्लेख केला, तेव्हा आपले इतकेही काही चुकलेले नसणार, हे जाणवून हायसे वाटले. मिष्टर चिंतातुर जंतू, थ्यांक्यू व्हेरी मच! यू मेड माय डे!१
असो. आता ज़िक्र केलेलाच आहे, तर थोडे तपशीलसुद्धा देणार काय, मालक? नाही म्हणजे, असेच पुढेमागे कधीतरी कामी येऊ शकतील, म्हणून विचारले. जास्त तपशील नकोत; जुजबीच: नाटिकेचे नाव काय होते, साधारण ष्टोरीलाईन, वगैरे. (मला जे अतिधूसरसे आठवते, त्याप्रमाणे त्या सगळ्या काळ्या कावळ्यांमध्ये हा आमचा एकटा पांढरा कावळा (पांढरेपणामुळे) गौरविला तर जात नाहीच, उलट सर्वांपेक्षा वेगळा (नॉन-कन्फॉर्मिष्ट?) म्हणून प्रचंड हेटाळला जातो. (मोअर सो - इफ आय रिमेंबर राइट - बिकॉज़ ही इन्सिस्ट्स अपॉन बीइंग अ नॉन-कन्फॉर्मिष्ट - विच ही क्यानॉट हेल्प, इन एनी केस - अॅण्ड अपॉन जष्टिफाइंग हिज़ नॉन-कन्फॉर्मिटी.) नि, आमची आठवण चुकून आम्हांस दगा देत नसेलच, तर शेवटी ('एलिएनेशन' फारच सौम्य शब्द झाला बुवा!) बहुतेक ते सर्व काळे कावळे मिळून आमच्या पांढर्या कावळ्याला मारून टाकतात, नाही काय? (चूभूद्याघ्या.))
(करेक्ट मी इफ आय अॅम राँग. अॅण्ड फिल मी इन, ईदर वेज़.)
(अतिअवांतर: अशीच काहीशी - किंवा काहीशी समांतर - थीम एच.जी.वेल्ससाहेबाच्या 'द कण्ट्री ऑफ द ब्लाइण्ड'मध्ये जाणवते, नाही?)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ त्याबद्दल एक 'भडकाऊ'१अ श्रेणी आमच्याकडून आपणांस सादर अर्पण! हा प्रतिसाद लिहावयास आम्हांस उद्युक्त केल्याबद्दल१ब.
१अ आमची सर्वात आवडती श्रेणी!
१ब बोले तो, भडकावल्याबद्दल. अगदी, ष्टोला एकीकडून पिन नि दुसरीकडून पंप मारल्यावर कसा भडकतो ना, तसे भडकावल्याबद्दल. आपल्या अजाणतेपणी का होईना, पण आपली ही प्रतिक्रिया आम्हांकरिता पिन-आणि-पंप जोडगोळीसमान झाली, याचे श्रेय आम्ही आपल्या वरील प्रतिक्रियेस देऊ इच्छितो.
हैला! आरती प्रभू म्हणजेच
हैला! आरती प्रभू म्हणजेच खानोलकर हे माहित नव्हते! (म्हणजे मला कविता फार कळतात अशातला भाग नाही पण आरती प्रभू हे गाजलेलं नाव आहे हे नक्की माहित आहे)
श्या श्या श्या....... माझे ’अ’ज्ञान अगाध असल्या़चा साक्षात्कार झाला!
आणि चानी हा चित्रपट गणुराया आणि चानी वर आधारित आहे हे पण माहित नव्हते. मी चित्रपट पाहिला नाही पण वडीलांकडून त्या चित्रपटाची तारिफ ऐकली आहे. नामसार्धम्य लक्षात आले होते पण मला तो योगायोग वाटला होता! (अगाध.... वगैरे)
आता परत एकदा या दॄष्टीने एकूणच त्यांच्या कादंबर्यांकडे बघायला हवे.
एकदा भला थोरला प्रतिसाद
एकदा भला थोरला प्रतिसाद लिहिला होता, तो अपघाताने नेट कनेक्शन जाऊन हरवला, आता पुन्हा टंकणे दुस्तर आहे. सारांश लिहितो
गणुराया नी चानी काल वाचले. रोचना म्हणतात तसे सुरवातीला वाचुन बाजुला ठेवले होते पण नंतर नेटाने वाचले नी बरेच काही चांगले गवसले!
मला दोन्ही कथा अतिशय आवडल्या. दोन्ही कथा म्हटल्या तर वेगळ्या आहे म्हटले तर "अस्वस्थ करून सोडणार्या" आहेत. दोन्ही कथांमध्ये वाचकाला शेवटाचा अंदाज असतो आनि तसा शेवट होणार नाही या आशेने तो वाचत राहतो आणि प्रवास त्याच दिशेने होताना बघुन अस्वस्थ होत जातो
===स्पॉयलर अॅलर्ट सुरू===
गणुराया हा दोन जगण्याच्या पद्धतीत बदलताना एका सांध्यात अडकला आहे. मात्र मला या कथेत गणुरायापेक्षा इतर काही गोष्टी अधिक वेधक वाटल्या. एक तर बेबीचे पात्र. लेखक सुरवातीला तीचा थांग लागु देत नाही. हळुहळू ती आकळायला लागते. तिच्या मनाची, घरच्यांची होलपट दिसू लागते. नी नंतर एक वेगळीच बेबी अनपेक्षितरित्या समोर येते नी एकदम आवडून जाते. गणुरायाचे वडील हा दुसरा वेधक प्रकार. ते नेहमी पत्रातूनच भेटतात. पण तरी त्यांचा स्वभाव, त्यांच्यात भरलेला न्यूनगंड आपल्याला दिसतच नाही तर टोचत रहातो. आणि सर्वात वेधक वाटली ते "लखु" गणुरायाच्या निघुन गेलेल्या मित्राची पात्रयोजना. हे पात्र कथेत गैरहजर आहे. माझ्या मते हे निव्वळ पात्र नसून गणुरायाच्या इच्छेचे, आकांक्षांचं किंवा खरंतर त्याच्या हरवलेल्या 'स्व'चं प्रतीक आहे. तो त्याला शोधु पाहतोय, खरंतर शोधत नाहीये पण तशी इच्छा आहे, त्याच्या बद्दल प्रेम आहे पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. ज्या क्षणी गणुराया परिस्थितीपूढे शरण जातो, आपल्या आशा-आकांक्षापेक्षा ऐहिक गरजांकडे निर्णायक पाऊल टाकतो त्या क्षणी लखु मरतो!
चानीची तर रीतच न्यारी आहे. ती मनस्वी आहे पण ती शारीर रुपाने डोळ्यापुढे उभी राहत नाही हे रोचना यांचे मत मलाही मान्य आहे. तिच्या रुपापेक्षा तीच्या लकबीच अधिक दिसतात एखाद्या कल्पनेतल्या चित्राप्रमाणे ती आहे. या कथेत "निर्मळतेची' म्हणा "अश्रापतेची" म्हणा विविध रूपे दाखवली आहे. दिनुचे निर्व्याज प्रेम, धाकट्या मामींचे अश्राप पण शरणागत भाव, नी चानीचे अवखळ, लौकीकार्थाने पापी तरीही भोळे मन. ही तीनही पात्रे एकमेकांत गुंतलेली आहेत. गावाला नादी लावणारी चानी दिनुपुढे - आणि म्हणून वाचकापुढे- वेगळ्या रुपात येते. एरवी इतरांना ती कधी/कशी भेटते याची झलक मिळते पण तपशील समजत नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला अंदाजाने समजतात त्यात लेखक शिरत नाहीत. एखाद्या हलत्या प्रतिबिंबावरून मुळ वस्तुची कल्पना करत राहवं ना तसं चानी वाचताना होतं. प्रत्यक्ष चानी गवसतच नाही तरी तीच्याबद्दलची पूर्ण कल्पना येते.
==स्पॉयलर अॅलर्ट समाप्त===
ज्यांनी हे पुस्तक/कादंबरी वाचलेले नाही त्यांनी जरूर मिळवून वाचा. मी खानोलकरांचे वाचलेले हे पहिलेच गद्य.. मला आवडले.. अतिशय काव्यात्म वाटले.
सध्या नेमकं हेच पुस्तक वाचतोय
सध्या नेमकं हेच पुस्तक वाचतोय त्यामुळे हे लेखन वाचलं नाही. तुर्तास ही फक्त पोच