सतीश आळेकरां च मिकी आणि मेमसाहेब नाटक- सुन्न करणारा अनुभव
डिस्क्लेमर – खालील लेखाने नाटकाचा बराच भाग समजु शकतो त्यामुळे जर व्हर्जीन अनुभव घ्यायचा असेल तर खालील लेख वाचु नये.
सतीश आळेकर मराठीतील एक असामान्य नाटककार ! जागतीक रंगभुमीच्या कुठल्याहि अभिजात कलाकृती ला टक्कर देईल अशी समर्थ नाटक देणारा विलक्षण प्रतिभाशाली नाटककार. मी त्यांच एकहि नाटकं प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, फ़क्त वाचलेलं आहे. तरी मला अस प्रामाणिक पणे वाटतं. त्यांच मिकी आणि मेमसाहेब हे नाटक जेव्हा पहिल्यांदा वाचल तेव्हा सुन्न च झालो.
यातील मुख्य पात्र एक प्रोफ़ेसर आहे, हा मोलेक्युलर बाय़ोलॉजी डिपार्टमेंट चा हेड आहे. इंटेलेक्च्युअल आहे, मेमसाहेब ( याची याच्या मानाने तरुण पत्नी त्याच्याच हाताखाली लेक्चरर), गुळवणी नावाचा एक रीसर्च स्टुडंट याच्या घरी नेहमी येत असतो, त्याचा रीसर्च अनेक वर्ष रेंगाळलेला, प्रोफ़ेसरच्या घरी एक पिंजरा आहे त्यात एक पांढरा ऊंदिर मिकी ठेवलेला ज्यावर प्रोफ़ेसर कसलासा प्रयोग करतोय. गुळवणी व मिकी हे प्रोफ़ेसर चे दोनच हमराज म्हणता येतील असे. हा त्यांच्याशी (स्वगताला समोर कोणी नाममात्र असलं तरी बोलणारयाला चालत जस,) त्याच्या वेदना शेअर करत असतो. ( म्हणजे नुसताच एकतर्फ़ी बडबडतो), गुळवणी पीएचडी, लवकर मिळावी म्हणुन काकुळतीला आलेला, प्रोफ़ेसर बहुधा नंतर हा घरी त्या निमीत्ताने येणार नाही ( शेअरींग संपणार ) म्हणुन त्याला जाणुन बुजुन उशीर लावतोय. (गुळवणी तसा मुद्दाम निगलेक्टेड केलेला पात्र वाटतो मात्र तो हि काहि ट्विस्ट घेतो की काय असे वाचतांना वाटत होते)
प्रोफ़ेसर ला मेमसाहब ने नेमुन दिलेली एक दिनचर्या आहे. जी तो अनेक वर्षांपासुन नियमीत फ़ॉलो करत आहे. यात अनेक कामांबरोबर च एक मोठा हौद ( जो मेमसाहेब ने मुद्दाम लीक केलेला आहे.) त्यात प्रोफ़ेसर रोज अनेक कळशी भरुन पाणी ओततो, एक क्रुर डेली रीच्युअल हळुहळु लक्षात येउ लागतं. (या वेळेस चर्चबेल मध्ये ग्रेस चा एक लेख आहे तांदुळ मोजणारया मुली ज्यात एक बाप त्या मुलींना रोजच्या रोज ढिगाने तांदळाचे दाणे मोजायला लावतो त्याची आठवण येते, माझ्या कॉलेजमध्ये एक रॅगिंग होती माचिस च्या काडिने ग्राउंड मोजण्याची ) सुरुवातीला नॉर्मल वाटणारी बाब एका मोठ्या दिर्घकाळापासुन चालु असलेल्या एका आखीवरेखीव डिझाइन केलेल्या टॉर्चर चा भाग असतो., अस लक्षात येऊ लागतं, या नाटकातल क्रौर्य सोफ़ेस्टीकेटॆड आहे, वाचकाला आळेकर अत्यंत विलक्षण शैलीने कमालीच्या संवाद-स्वगता तील नुसत्या वापराने अतिशय परीणामकारकरीत्या केवळ अप्रत्यक्षपणे प्रोफ़ेसर च भोगणं वेदना दाखवुन देतात. त्याचा इफ़ेक्ट होऊन अक्षरश: घुसमटायला होत.. आश्चर्य म्हणजे रुढ नाटकात असलेली धक्कातंत्र, ते क्वचितच वापरतात. कुठलाहि उपदेश आदि करत नाहीत. नैतिक भुमिका घेत नाही, केवळ त्या पात्रांच्या मनाच्या तळात उमटत असलेल्या भाव भावनांचा, त्यांच्या सिच्युएशन चा, त्यांच्यात चालु असलेल्या क्रौर्य-सत्तासंघर्षाचा प्रखर प्रत्यय प्रेक्षकाला देतात.
प्रोफ़ेसर हा मेमसाहेब चा गुलाम च आहे, एक बेल आहे जी वाजताच प्रोफ़ेसर प्रतिक्षिप्त क्रीया केल्यासारखा उठतो, कामाला लागतो, विवीध प्रकारची नेमुन दिलेली, सर्व काम करतो, त्याला लेखी ऑर्डर्स नियमीत येतात, प्रोफ़ेसर चा विरंगुळा असलेली बाग मेमसाहेब ने उजाड केलेली आहे, प्रोफ़ेसर च्या संवादातुन येणारे मोरपिसाचे उल्लेख दाम्पत्यामधील अबनॉर्मल लैंगिक संबधाचे सुचन करतात, क्लास मध्ये प्रोफ़ेसर लेक्चर घेउ लागला की मेमसाहेब व्यत्यय यावा यासाठी शिपायाला मध्येच खराटा घेउन क्लास सफ़ाई साठी पाठवते, मेमसाहेब चे पुरुष मित्र आल्यावर प्रोफ़ेसरने निमुटपणे बाहेर जायचं असत, सर्व ऑर्डर्स काटेकोर पाळायच्यात, त्याच फ़िजीकल आणि सेक्शुअल टॉर्चर हि रेग्युलर होतय हे आळेकर सर्व फ़ार तरलतेने दर्शवतात कुठेही भडक वा सरळसोट न हॊऊ देता, प्रोफ़ेसरचा एकुलता एक कंम्पॅनियन मिकी पुढे मेमसाहेब मारुन टाकतात, त्यानंतर च स्वगत जबरदस्त आहे, नाटकाच्या टायटल चा मिकी आणि मेमसाहेब मधल्या प्रतिकाचा उलगडा हळुहळु होऊ लागतो. प्रोफ़ेसर हा मिकी आहे मेमसाहेब च्या ताब्यातला, मिकी प्रोफ़ेसर च्या ताब्यातला एक चेन ऑफ़ सटल एक्सप्लॉयटेशन, अगदि मुलगामी स्वरुपातली पॉवर प्ले, सॅडिझम कमालीच्या ताकदिने आळेकरांच्या नाटकात अनफ़ोल्ड होत जाते.
एका एका वाक्यात अशा कलाकृतींची वर्णन करण हा मोठा अन्याय होतो व फ़ार मर्यादित अर्थाचा शिक्का मारल्यासारखा होत. म्हणुन जमेल तस काही मुद्दे माझ्या कुवतीनुसार अशी मांडतो. अर्थातच हे माझ माझ्यापुरत मर्यादित आकलन या नाटकाविषयी आहे.
१- एकदम बेसिक बोलयच तर हे नाटकं एक अत्यंत सुक्ष्मतम स्तरावरचा सॅडिझम ( मराठी प्रतिशब्द माहित नाही व वापरण्याची इच्छा हि नाही ) दाखवतो. जो एका सॅडिस्ट लेक्चरर स्त्री कडुन तिच्या नवरयावर जो एक इंटेलेक्च्युअल सायंटिस्ट प्रोफ़ेसर आहे केलेला दाखवलेला आहे.
२- हे नाटक कुठेहि जरादेखील तोल न ढळु देता आपली प्रतिकात्मकता जपतं, यात आळेकर कुठेहि सरळ सरळ विधान करण कटाक्षाने टाळतातं, अतिशय कलात्मक कुशलतेने हळुहळु प्रेक्षक त्या भयाण अनुभवाला प्रोफ़ेसर च्या ट्रॅजेडि ला सामोरा जातो.
३- मानवी मनाच्या अगदि नेणीवेच्या तळाशी असलेली हिंस्त्रता, जी एरवी वरकरणी अगदि सुशिक्षीत, सुसंस्कृत जीवन जगत असलेल्या व्यक्ती मध्ये कशी दडुन असते, तिचा अतिशय खोलवर असा वेध आळेकर या नाटकातुन घेतात.
४- आळेकर स्ट्रीट कार नेम्ड डिझायर मध्ये जसा नाटकाच्या क्लायमॅक्स ला सीक्रेट ओपन करुन टेनेसी विल्यम आपल्याला परत एकदा पुर्ण नाटक रीव्हाइज करुन त्या वेड्या बाईच्या अगोदर दाखवलेल्या एकेका वागण्याचा अर्थ लावायला भाग पाडतो व धक्का देतो तसे ते करत नाहीत. आळेकर याच्या अगदि उलट प्रोफ़ेसर ची ट्रॅजेडी हळुहळु इम्प्रोव्हाइज करत नेतात. मात्र हे करतांना कलात्मक सांकेतिकता अत्युच्य पातळीवर नेतात
५- प्रोफ़ेसर च्या स्वगतातुन, त्याला होत असलेल्या भासातुन, गुळवणी शी असंबद्ध बोलतांना आपल्याला त्याच्या मनाची अवस्था उलगडत जाते. एक तुलना वा फ़ाटा फ़ोडावासा वाटतो. मारीया व्हर्गास च्या ऑट ज्युलीया अंड स्क्रीप्टरायटर या सुंदर कादंबरीत हि अशीच आर्टीस्टीक ट्रीक थोड्या फ़रकाने वापरलेली आहे. त्यामध्ये नायक असलेल्या स्क्रीप्टरायटरची मनोवस्था सरळ न मांडता त्याने लिहीलेल्या एका एका एपिसोड मधुन त्या कथेत होत असलेल्या वर्णनांच्या बदलामधुन स्क्रीप्टरायटरची बदलती ढासळती मानसिकता वाचकाच्या लक्षात आणुन दिली जाते.. प्रोफ़ेसरच्या स्वगतातुन प्रोफ़ेसर अनाथालयात वाढलेला, मेमसाहेब त्याची पत्नी त्याच्यापेक्षा तरुण, त्यानेच बनवुन दिलेल्या थिसीस ने लेक्चरर झालेली. इ. बाबी कळतात.
६- प्रोफ़ेसर ची होणारी घुसमट कुचंबणा वेदना संताप व सर्वात महत्वाच म्हणजे वांझ विद्रोह, मेमसाहेब ला धडा शिकवण्याची वांझ फ़ॅटसी आदि आळेकर अत्यंत प्रभावी अशा स्वगत-संवादातुन परीणामकारकरीत्या दाखवतात.( उदा. एकदा व्हाइस चॅन्सेलर ला काल्पनिक कंम्प्लेंट प्रोफ़ेसर करतोय असा सीन येतो.)
७- वाचक (मी फ़क्त वाचलेल आहे म्हणुन) प्रोफ़ेसर च्या ट्रॅजेडिशी मेमसाहेब च्या गुढ. अनाकलनीय व्यक्तीमत्वाशी पुर्ण जोडला जातो. संपुर्ण नाटक हे मानसिक पातळीवर ची आंदोलने दाखवत ते क्वचितच फ़िजीकल होत क्लायमॅक्स चा भाग सोडुन. तरीही आळेकरांना जो अनुभव संक्रमित करायचा आहे त्यात ते पुर्ण यशस्वी होतात हे आळेकरांच मोठ यश आहे
नाटक आळेकरांनी एम.एस्सी च शिक्षण घेत असतांना १९७३ मध्ये लिहीलय म्हणजे साधारण वय २४ - २५ असतांना अंदाजे, इतक्या कमी वयात इतकी असामान्य प्रतिभा ! ओ माय गॉड ! त्यानंतर इतक्या वर्षातहि फ़ारच कमी नाटक लिहीलेली आहेत. त्यांची मला अतिशय आवडलेली दुसरी असामान्य नाटके म्हणजे महानिर्वाण आणि बेगम बर्वे ती देखील ग्रेट च आहेत असामान्यच. एक आश्चर्य वाटत ४१ वर्षापुर्वी मराठीत अस नाटक आल होत. एक इच्छा अपुर्ण आहे मराठी रंगभुमीच्या तीस रात्री मध्ये मकरंद साठे नी आळेकरांच्या नाटकावर सुंदर लिहीलेल आहे ते काय आहे वाचण्याची पण त्या पुस्तकाची पृष्ठसंख्या आणि किंमत दोन्ही मुळे ते अजुन घेण होत नाही. कोणी वाचलेल असल्यास जरुर शेअर कराव आणि बेगमबर्वे नाटकावर मकरंद साठेंच एक स्वतंत्र पुस्तक आहे का ? ते नेमक कुठल त्याची माहीती द्यावी हि विनंती, या निमीत्ताने सतीश आळेकरांच्या नाटकांवर चर्चा व्हावी असे वाटते.
शेवटी एक नमुना म्हणुन खालील संवाद द्यायचा मोह आवरत नाही. नाटकात एका प्रसंगात मेमसाहब कडुन प्रोफ़ेसरला भोंडला घालण्याची ऑर्डर येते, मेमसाहेब च्या मैत्रीणी जमा होतात, प्रोफ़ेसर भोंडल्याची गाणी पाठ करतो, सर्व तयारी करतो, मध्ये हत्तीच चित्र ठेवण्याएवजी मिकी चा पिंजरा ( कापडाने झाकुन ठेवतो) बायका येतात हा सर्वच भाग अत्यंत विलक्षण जमवलेला आहे, यात आलेल्या बायकांना खिरापत ओळखता येत नाही मग प्रोफ़ेसर ती सांगतो, ( इथपर्यंत अनेक वर्षांपासुन फ़ुटका हौद कळशी कळशी ने भरण्याच टॉर्चर भोगणारया प्रोफ़ेसर ची पार्श्वभुमी एव्हाना उघड झालेली असते) प्रोफ़ेसर बोलु लागतो....
“आजच्या भोंडल्याची खिरापत आहे निर्मळ जल, शुद्ध पाणी, वाळा विरहित, फ़िजमधल नाही, तसचं कच्च,
(बायका: अय्या,वंडरफ़ुल म्हणत पाणी पितात )
पाण्याच महात्म्य फ़ार महान आहे. अन्न, वस्त्र निवारा ह्यांचे बेसीस पाणी हेच आहे, पाणी हे परब्रह्म आहे, पाण्याने अर्ध्य देतात, त्याने आंघोळ करतात, चुळसुद्धा भरतात, पाण्यानेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी अस जे म्हटल आहे ते काय उगीच ? शिवाय पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, म्हणुन तर हा प्रपंच, शिवाय पाणी ओंजळीत राहत नाही त्याला हौदच लागतो. तो भरावा लागतो. कळशी लागते. हेलपाटे लागतात, पॅन्ट ओली करावी लागते किंवा अर्धी चड्डी घालावी लागते. पाण्यात बुडुन हात स्वच्छ राहतात पण अकाली सुरकुततात. तेव्हा भोंडल्याच्या या मंगलप्रसंगी पाणी हि खिरापत प्रसंगाला अनुरुप अशीच आहे. त्यामुळे भोंडलेश्वराला देखील समाधान वाटेल. निदान पक्षी ते वाटावे व प्रकोप होऊ नये हि सदिच्छा अस्तु, “
समीक्षेचा विषय निवडा
मिकी आणि मेमसाहिब- सतीश आळेकर
आळेकरांची सर्व नाटके पुण्याच्या नीलकंठ प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्यांचा पत्ता-
नीलकंठ प्रकाशन, टिळक रोड, पुणे
संपर्क-०२०-२४३३३०६५
वेळ- सकाळी ११ ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ७
इथे न मिळाल्यास 'मिकी आणि मेमसाहिब' हे पुस्तक ई-रसिकवर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे. तिथून मागवता येईल. ही लिंक
धनंजय जी बुकगंगा चा अनुभव चांगला आहे
मी पुस्तके बुकगंगा वरुन घेतली या साइटचा अनुभव चांगला आहे.
आळेकरांची सर्वच पुस्तके नाटकांची येथे उपलब्ध आहेत.
खास करुन आणखी दोन महानिर्वाण आणि बेगम बर्वे मी माझ्याकडुन सजेस्ट करतो एकदा अवश्य वाचुन बघा.
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5213085514709311073
नाटकांच्या संहिता उपलब्ध?
पुण्यात कुठे मिळू शकतील का?