आइस्क्रीमच्या अद्भुत जगात!
आपल्याला आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली की आपण जवळच्या दुकानात जातो आणि आपल्याला हवे त्या प्रकारची आइस्क्रीम विकत घेऊन खातो. आजकाल अनेकांच्या घरात फ्रीजमध्ये आइस्क्रीम साठवून ठेवलेलं असतं. कधीही इच्छा झाली की ते काढून खाता येतं. ही गोष्ट आपल्याला आता ऐकायला फारच सोपी वाटत असेल. परंतु ही सगळी अन्न-प्रक्रिया-तंत्रज्ञानाची कमाल आहे, हे लक्षात येत नाही. एक काळ असा होता की आपल्याला हव्या असलेल्या अन्नपदार्थांसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत होते. आइस्क्रीमही त्याला अपवाद नाही.

माझ्या मते आइस्क्रीम न आवडणारा माणूस जगभर शोधला तरी सापडणार नाही. जर एखादा सापडला तरी कदाचित त्यानं आइस्क्रीमची चव अजूनपर्यंत चाखली नसेल; किंवा आपण चुकीचा शब्द वापरून प्रश्न विचारला असेल; किंवा आइस्क्रीम परवडत नाही म्हणून तो कदाचित खोटं बोलत असेल. परंतु एकदा जिभेवर आइस्क्रीमची चव रेंगाळल्यास मनुष्य आइस्क्रीमच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही. आइस्क्रीम ही खरंतर सुखाची परमावधी! लहानपणी कोनमधलं आइस्क्रीम वितळून त्याचा ‘मिल्कशेक’ व्हायच्या आत ते संपवण्यासाठी केलेली घाई आपल्याला नक्कीच आठवत असेल.
६०-७० वर्षापूर्वी आइस्क्रीमचा पॉट भाड्यानं मिळत होता. अख्खं कुटुंब (आणि चाळीतली/वाड्यातली पोरं) त्यांच्या भोवती उभं राहून आइस्क्रीम तयार होण्याच्या प्रक्रियेकडे टक लावून पाहात असत. आइस्क्रीम तयार झाल्यानंतर प्रत्येक जण ताटली, वाटी अशा भांड्यांमधून आपल्या वाट्याचं आइस्क्रीम चाटूनपुसून खात संपवत होते. पॉट एकदम स्वच्छ. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ. पण याचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
पॉट आइस्क्रीम आजही प्रचलित आहे. यामध्ये लाकडाच्या पॉटमध्ये लोखंडाचा गोल डबा ठेवून त्याच्या आजूबाजूला मीठ आणि बर्फ यांचे संमिश्रण लावतात. त्या पॉटमध्ये आटवलेले दूध, आमरस इत्यादी घालून तो पॉट फिरवतात. हे आइस्क्रीमसुद्धा चविष्ट लागतं.
इतिहास
इ. स. पू. ५००च्या आसपास पर्शियन लोक त्यांच्या शाही दरबारातल्या सरदारांना उन्हाळ्यात मिष्टान्न म्हणून आइस्क्रीमसदृश पदार्थ देत असत. ते केशर आणि फळांनी भरलेलं बर्फ असायचं. प्राचीन रोममध्ये सम्राट नीरो आपल्या नोकरांना बर्फ गोळा करण्यासाठी पर्वतांवर पाठवायचा; नंतर मध आणि फळं मिसळून गोड पदार्थ तयार करून खायचा ते इसवी सनाच्या पहिल्या शतकात. रोमन पाककृतींच्या पुस्तकांमध्ये मिष्टान्नावर बर्फाचे बारीक तुकडे पसरून खाल्ले जात होते, असे उल्लेख सापडतात. इ. स. दुसऱ्या शतकात पर्शियात गोड पेयांत बर्फ टाकून पीत होते. आठव्या शतकातल्या जपानच्या इतिहासात काकिगोरी या नावाच्या चविष्ट सरबतचे उल्लेख सापडतात. त्यासाठी हिवाळ्यातल्या हिमवर्षावात झालेल्या बर्फाचे तुकडे गोळा करून ठेवले जात होते. तेराव्या शतकात सिरियामध्ये थंडगार पेये पीत होते.
भारतात आइस्क्रीमसदृश कुल्फी सोळाव्या शतकात मुघल काळात आली. मुघल बादशहा हिंदुकुश पर्वतावळीतून दिल्लीपर्यंत घोड्यावरून बर्फ आणण्याची व्यवस्था करत होते. बर्फ वापरून मातीच्या भांडीत कुल्फी तयार करून खाल्ली जात होती.
युरोपमध्येही सोळाव्या शतकार्यंत गोठवण्याच्या प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नव्हती. या शतकात बर्फामध्ये मीठ टाकल्यास बर्फ जास्त काळ गोठून राहतो हे लक्षात आले. सतराव्या शतकात सरबतं आणि आइस्क्रीमं या पद्धतीनं, मीठ वापरून तयार करायला सुरुवात झाली.
काही तज्ज्ञांच्या मते युरोपमध्ये मार्को पोलोच्या काळात (तेरावं शतक) मूरमधल्या व्यापाऱ्यांमुळे आइस्क्रीमचा जास्त प्रचार झाला. मार्को पोलो यानं चीनमध्ये थंडगार सरबतची चव चाखली होती. नंतरच्या काळात तो मिष्टान्न म्हणून सरबत घेत होता.
१६६५च्या सुमारास प्रकाशित झालेल्या Catalogue des Marchandises rares या जीन फार्गेनान या फ्रेच लेखकाच्या पुस्तकात अनेक प्रकारच्या गोठविलेल्या सरबतची माहिती आहे. मीठ आणि बर्फ टाकून तयार केलेली सरबतं भांड्यांमधून विकली जात होती, असा उल्लेख या पुस्तकात आहे.
१७७०मध्ये उल्लेख केलेल्या एल्डरफ्लॉवर व लेमन कर्ड आइस्क्रीमच्या पाककृतीवरून तयार केलेलं आइस्क्रीम एडिंबरामधल्या एका आइस्क्रीमच्या दुकानात १९०४पासून विकत होते. एकविसाव्या शतकात भोजनप्रेमींना आणि व्यायामप्रेमींनाही ह्या आइस्क्रीमनं वेड लावलं आहे.
अमेरिकेत आइस्क्रीमची ओळख क्वेकर या ख्रिश्चन पंथानं करून दिली. त्यांनी अमेरिकेत येताना विविध प्रकारच्या आइस्क्रीम पाककृती आणल्या होत्या. न्यूयॉर्क आणि इतर शहरांमधल्या मिठायांच्या दुकानांत आइस्क्रीमची विक्री होत होती. बेन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन हे राष्ट्राध्यक्ष नियमितपणे आइस्क्रीम खात होते, अशा नोंदी सापडतात.
आइस्क्रीमचं उत्पादन
उष्णताशोषक (endothermic) प्रक्रियेबद्दल जसजशी माहिती मिळायला लागली तसतशा आइस्क्रीम गोठविण्याच्या प्रक्रियेत सुधारणा व्हायला लागल्या. त्यापूर्वी गोठवण्याऐवजी केवळ थंड करून पदार्थ तयार केले जात होते. मिठाच्या वापरामुळे बर्फाचा शीतबिंदू (melting point) आणखी खाली आणता येतो; आणि सायीची उष्णता शोषून घेऊन ती गोठवता येते, हे लक्षात आलं.
एकोणिसाव्या शतकातील ॲग्नेस बर्था मार्शल या नावाजलेल्या शेफनं आइसेस (Ices – १८८५) व फॅन्सी आइसेस (Fancy Ices –१९८४) अशी दोन पाकपुस्तकं लिहली. त्यांत वेगवेगळे रंग, आकार, साचे वापरून तयार केलेल्या कपातल्या आइस्क्रीमची ओळख त्या काळच्या उच्चभ्रू वर्गाला करून दिली. तिच्या एका पाककृतीत वूस्टर सॉस, मसाला पावडरमध्ये बुडवलेलं चिकन, अंडी, ग्रेव्ही, जिलेटिन, साय इत्यादी जिन्नस वापरून तयार केलेल्या आइस्क्रीमांची वर्णनं आहेत. ते आइस्क्रीम सजावट केलेल्या कपांमधून वाढलं जात होतं. शाही जेवणांमध्ये या आइस्क्रीमला महत्त्वाचं स्थान होतं. या पुस्तकांमध्ये आणखी भन्नाट प्रकारच्या गोड आइस्क्रीमच्या पाककृत्या आहेत.

१७६८च्या एमी या फ्रेंच शेफच्या पाकपुस्तकामध्ये ट्रफल, केशर आणि तऱ्हेतऱ्हेची चीजं वापरून केलेल्या आइस्क्रीमचे प्रकार दिलेले आहेत.
मार्शली पाकपुस्तकं प्रकाशित होण्यापूर्वीची अनेक शतकं आइस्क्रीम सामान्यांच्या आवाक्यात नव्हतं. मोठमोठ्या बंगल्यात राहणाऱ्या उमरावांकडेच बंगल्याभोवती भरपूर मोकळी जागा असायची आणि त्यांनाच तळघर (आइस हाउस - ice house) राखणं शक्य होतं. तळ्यातलावांमधलं बर्फ या तळघरांमध्ये थंड राखलं जात असे. ही गोष्ट १८००च्या सुमाराची.
१८२०च्या सुमारास ब्रिटनमध्ये युरोप व अमेरिकेतून गोठलेल्या बर्फची आयात होऊ लागली. हे बर्फ दीर्घकाळ टिकवण्यासाठी ठिकठिकाणी आइस हाउस बांधण्यात आली. बर्फाची आयात होऊ लागली तशी त्याची किंमतही सामान्यांना परवडायला लागली. त्याच सुमारास नवउद्योजकांनी यांत्रिकरीत्या पाणी गोठवून बर्फ तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. ते वापरून बर्फाची विक्री व्हायला लागली. तरीसुद्धा घरगुती आइस्क्रीम उपलब्ध होण्यासाठी आणखी ५०-६० वर्षं लागली. मार्शलनं गोठविलेल्या बर्फाचा वापर करून आइस्क्रीम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रीझरच्या (आइस्क्रीम पॉटच्या) तंत्रज्ञानाचं पेटंट १८८५मध्ये घेतलं.
बर्फ आणि मीठाचं मिश्रण एका भांड्यात ठेवून संपूर्ण मिश्रण गोठेस्तोवर फिरवायचं. भांड्याचा पृष्ठभाग पसरट असल्यामुळे ते गोठवायला फार वेळ लागणार नाही. भांडं फिरवायलासुद्धा जास्त कष्ट पडत नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गातील स्त्रियासुद्धा आपल्या स्वयंपाकघरात आइस्क्रीम तयार करून घरातल्या सगळ्यांना खायला घालायला लागल्या.
आइस्क्रीमचे विविध फ्लेवर
गंमत अशी आहे की आइस्क्रीमचे उत्पादक काही ना काही तरी नवीन शक्कल लढवून आपल्या आइस्क्रीमांची जाहिरात करतात. त्यातून आइस्क्रिमप्रेमींना आकर्षित करून आइस्क्रीमचा खप वाढवत असतात. उदाहरणार्थ, एका ब्रिटिश उत्पादकानं ब्राउन ब्रेड आइस्क्रीम बाजारात आणलं. बघता बघता हे आइस्क्रीम प्रसिद्धीच्या झोतात आलं. खरं पाहता या आइस्क्रीमच्या पाककृतीमध्येसुद्धा नवीन काहीही नव्हते. जॉर्जिया या देशाच्या परंपरेमध्ये या पाककृतीचं मूळ शोधता येईल. याच्याही अगोदर काकडी आइस्क्रीमचे दिवस होते. त्याचप्रमाणे कोरडं पार्मेजान चीज वापरून तयार केलेल्या आइस्क्रीमलाही प्रचंड मागणी होती.
ब्राउन ब्रेड आइस्क्रीमला त्यातल्या कॅराममुळे एक वेगळाच खमंगपणा येतो. नेहमीच्या स्वादिष्ट आयस्क्रीमची चव आवडणाऱ्यांनाही या ऐतिहासिक, स्वादिष्ट आइस्क्रीम जातकुळी फार वेगळ्याच प्रकारची वाटत असेल. तशी प्रत्येक देशात आइस्क्रीमच्या पाककृतींचं भांडार असू शकेल.
कुठल्याही सण-समारंभात आलेल्या पाहुण्यांना आइस्क्रीम खायला घालणं ही आता नित्याची बाब झाली. त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबच प्रवासाच्या ठिकाणी गेल्यास कुटुंब प्रमुखाकडून आइस्क्रीमची पार्टी उकळण्यातील मजा और असते. आइस्क्रीमला सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आलेलं होते. आइस्क्रीम खाणे हा एक आनंदाचा भाग समजला जात होता. आताच नव्हे तर या पूर्वीही आइस्क्रीम हा मिष्टान्नाचा प्रकार समजला जात होता.
एकोणिसाव्या शतमानात ब्रिटनमध्ये हातगाडीवरून पेनी लिक आणि हॉकी-पॉकी या नावांची स्वस्त आइस्क्रीमची विक्री सुरू झाली. आइस्क्रीमची गाडी आली की मुलं त्याभोवती गोळा होऊन एका पेनीला ग्लास भरून मिळणारी आइस्क्रीमं चोखत होती. हे पेले दिसायला उंच दिसले तरी प्रत्यक्षात त्याचा तळ बराच वर उचललेला असायचा. त्यामुळे मिळणारं आइस्क्रीम फारच कमी असायचं. यातलं आइस्क्रीम खाताना ते चाटून खायची पद्धत होती. मार्शलच्या पाकपुस्तकानुसार हे आइस्क्रीम साच्यांच्या कपातलं नव्हतं. कारण तसलं आइस्क्रीम करण्यासाठी भरपूर गोष्टी लागत होत्या.

आपल्याकडेसुद्धा बर्फाच्या मोठ्या लादीतला एक तुकडा किसून, तो किस काडीवर गोळा करून त्यावर रंगीत, गोड पाणी टाकून स्वस्तात विकलं जात होतं. मुलं हा थंडगार गोळा चवीने खायची. तसाच लाकडी पट्टीभोवती मिळणारा बर्फाचा गोळा (popsicle) मुलांसकट सर्वांना आवडणारा प्रकार होता.
पेनीलिक खाऊन झाल्यानंतर रिकामे काचेचे पेले गाडीवाल्याला पुनर्वापरासाठी परत दिले जायचे. चाटूनपुसून ग्लास साफ करायचा आणि परत द्यायचा अशी रीत त्या काळी होती. मात्र हे पेले नीट स्वच्छ न केले गेल्यामुळे त्या काळात कॉलरा, टीबी अशा रोगांच्या साथी पसरल्याचा आरोप झाला; लवकरच हे पेले इतिहासजमा झाले. त्यांची जागा कोनांनी घेतली. ते आजही लोकप्रिय आहेत.
चैनीच्या सुविधा पुरविणाऱ्या उद्योगाच्या उत्कर्षाच्या त्या काळात समुद्राच्या किनारी असलेल्या हॉटेल/रिसॉर्टपाशी आइस्क्रीमचा खप मोट्या प्रमाणात होत होता. कुठल्याही जाहीर समारंभात, जत्रेच्या ठिकाणी, घरगुती कार्यक्रमात आइस्क्रीम खाण्याला अग्रक्रम दिले जात होते.
आइस्क्रीमचा स्वाद, त्याच्या नेण्या-आणण्यातील सुलभता व कुठेही एकाच हाताने खाता येण्याची शक्यता यामुळे हा जिन्नस सगळ्या थरांत, वयोगटांत लोकप्रिय झाला. व्हिक्टोरिया आणि जॉर्ज या ब्रिटिश राणी-राजांच्या काळातल्या आइस्क्रीमच्या पाककृती पुन्हापुन्हा बाजारात दिसतात. अगदी आजही फक्त नव्या वेष्टनात दिसतात.
कित्येक पिढ्यांपूर्वी, त्या काळच्या अस्वच्छतेची आठवण न काढता आइस्क्रीमचा स्वाद घेत असल्यास आपण भूतकाळात पोचतो. आइस्क्रीमच्या इतिहासाची पानं उलटली तर त्या काळच्या समाजाच्या सुखसमाधानाच्या, तंत्रज्ञानाच्या, स्वच्छतेबद्दलच्या, प्रवास करण्याच्या, फॅशनच्या कल्पना लगेच लक्षात येऊ शकतात.
दूध किंवा दुधावरची साय, जोडीला साखर, किंवा मध यांसारखे गोड पदार्थ, आणि त्यात स्टेबिलायझर मिसळून ते मिश्रण गोठवून आइस्क्रिम बनवतात. काही आइस्क्रीममध्ये स्वादासाठी कोको, व्हनिला, फळं, खाण्याचे रंग असे पदार्थही वापरले जातात. अतीशीत तापमानात (२ अंश सेल्सियस) हे मिश्रण थंड केलं जातं. या तापमानात मिश्रण सतत ढवळत गेल्यावर बर्फाचे गोळे राहत नाहीत. सगळं मिश्रण एकजीव होतं. कधी तापमान कमी ठेवण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन वापरला जातो.
तयार झालेलं आइस्क्रीम प्लेटमधून चमच्यानं खाण्यासाठी वा आइस्क्रीमच्या कोनमधून चाटून खाण्यासाठी दिलं जातं. आइस्क्रीमचा वापर मिल्कशेक, सन्डे (sundae), आइस्क्रीम केक इत्यादी स्वरूपांत केला जातो. अर्धे-कच्चे भाजलेले पदार्थ वापरून बेक्ड अलास्का आइस्क्रीम तयार केलं जातं. इटलीतील जिलाटो आणि फ्रोजन कस्टर्ड हे उच्च प्रतीचं आइस्क्रीम समजलं जातं. आपल्याकडच्या सॉफ्टी आइस्क्रीमसारखं सॉफ्ट आइस्क्रीम अमेरिकेतील खूप ठिकाणी मिळतं.
भारतातली कुल्फी वेगवेगळ्या स्वादांमध्ये बनवता येते. मलई, गुलाब, आंबा, वेलदोडे, केशर, पिस्ता, सफरचंद, स्ट्रॉबेरी, शेंगदाणे असे कुल्फीचे खूप प्रकार आहेत. कुल्फीच्या घनतेमुळे, कुल्फी वितळायला आइस्क्रिमपेक्षा जास्त वेळ घेते.
आइस्क्रीम गायीच्या, म्हशीच्या, बकरीच्या, मेंढीच्या दुधापासून बनवता येतं. ज्यांना लॅक्टोजची ॲलर्जी आहे किंवा व्हिगन असतील तर त्यांच्यासाठी सोया, ओट, नारळ, टोफू किंवा बदामाचं दूध वापरूनही आइस्क्रीम तयार करता येतं. दही थंड करून फ्रोजन योगट बनवतात, हेसुद्धा आइस्क्रीमचाच प्रकार. त्यात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण कमी असतं. फ्रुटी शरबत आइस्क्रीमच्या दुकानांत मिळतं पण ते काही आइस्क्रीमच्या प्रकारात बसत नाही.
आइस्क्रीमचं लोण जगभर पसरलं. त्याची लोकप्रियताही वाढली. सध्या आइस्क्रीम कितीतरी स्वादांमध्ये उपलब्ध आहे. आंबा, स्ट्रॉबेरी, सीताफळ, चिकू, अंजीर, अननस, ब्लॅक करंट, ड्रायफ्रूट, कोकोनट कूलर, खजूर शेक विथ आइस्क्रीम, फालुदा असे अनेक प्रकार आइस्क्रीममध्ये उपलब्ध आहेत. त्याचसोबत हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे, खासकरून व्हनिला आइस्क्रीमसोबत चॉकलेट सॉस, फ्रूट सॉस, फळांचे तुकडे, हनी नुडल्स, गाजर हलवा, शाही हलवा, खीर, काला जामून, बुंदी असे पदार्थही देतात. त्याला ‘ठंडा गरम स्वीट’ संबोधलं जातं.
ग्राहकांच्या राहणीमानाप्रमाणे त्यांच्या आहारातही बदल होत गेला. या स्पर्धेत आइस्क्रीम कसे काय मागे राहील? फ्राईड, स्टोनक्रश आणि पॉट आईस्क्रीमची मागणी वाढायला लागली. आजकाल तळलेलं आइस्क्रीमही बऱ्यापैकी प्रचलित आहे. १८९३मध्ये शिकागोच्या वर्ल्ड फेअरमध्ये हा प्रकार पहिल्यांदा दिसला. त्याच्या वेगळेपणामुळे तो जगप्रसिद्ध झाला. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती १९७०च्या दशकामध्ये. नंतर त्यात अनेक बदल होऊन ते जगभरात प्रचलित झालं. नंतर तो गॅस्ट्रोनॉमिकल पदार्थांचा ट्रेंड आला. त्यामध्ये आइस्क्रीमचा समावेश झाला. लिक्विड नायट्रोजन आणि दुधावरची साय फळांच्या रसात मिसळून आइस्क्रीम बनवण्याची प्रथा सुरू झाली.
स्टोनक्रश आइस्क्रीम प्रथम १९८८मध्ये डोनाल्ड आणि सुझन सदरलंड यांनी अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात तयार केल्याची नोंद आहे. यामध्ये दगड थंड करून, त्यावर साय ओतून किंवा बेसिक आइस्क्रीम घालून त्यात वेगवेगळी फळं घालतात; आणि ते सुशोभित करून वाढतात.
आता आइस्क्रीममध्येही आयुर्वेदाचा दिसायला लागला आहे. ब्राह्मी, शतावरी, ज्येष्ठमध, दालचिनी, बडीशेप, गूळ, गुलाबाच्या पाकळ्या आदींचा वापर करून आइस्क्रीम बनविण्याचं तंत्रही विकसित झालं. त्यासोबतच मधुमेहामुळे ज्यांना आइस्क्रीमचा आनंद लुटता येत नाही, अशा व्यक्तींसाठीही खास शुगर फ्री आइस्क्रीमं बाजारपेठेत आली आहेत.
आइस्क्रीमचं क्षेत्र आता इतकं विस्तारले आहे, की तो आता केवळ मोसमी व्यवसाय राहिलेला नाही, तर बारमाही, चांगला उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगानं आणि त्या संदर्भातील संशोधन-तंत्रज्ञानानं इतकी प्रगती केलीय, की नित्यनवीन चवींची, आकारा-प्रकारांची आइस्क्रीमं, छानछान रंगीबेरंगी वेष्टनांमधून आपल्याला जणू बोलावीत असतात.
मस्तानी आइस्क्रीम
पुण्यात १९२३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ गुजर कोल्ड्रिंक्सने 'बाजीराव मस्तानी' सुरू केली. पूर्वी दुधात वेगवेगळी सरबतं घालून 'मस्तानी' तयार केली जायची. कालांतराने मस्तानी बनवताना दुधात बर्फ घालण्याचा प्रकार बंद झाला. त्याऐवजी दूध आटवून घट्ट केलं जातं. त्यामुळे दूध एकजिनसी होतं. त्यात सरबत न घालता फळांचा रस वापरतात. त्यामुळे 'मस्तानी'ची चव अगदी ताज्या फळांसारखी लागते. पूर्वी फक्त दोन प्रकारांत बनणाऱ्या 'मस्तानी'चे आता वीस प्रकार झालेत. मुंबई-पुण्याप्रमाणे आता महाराष्ट्राभर 'मस्तानी'चे शौकिन आढळतात.
अगदी रस्त्यावरचा मटका कुल्फीवाला, वडाच्या पानावर रंगीबेरंगी आणि विविध स्वादांच्या आइस्क्रीमची सरमिसळ मांडणारा आइस्क्रीमवाला भैया, लहान शहरांत नाक्यानाक्यांवर उभी असणारी आइस्क्रीम दुकानं, ते पार बास्किन रॉबिन्स आणि जिलाटो इटालियानोसारखे मोठे कार्पोरेट – या सगळ्यांनीच या पदार्थाला आपापलं व्यक्तिमत्त्व दिलं असलं तरी आवडीनं आइस्क्रीम खाणाऱ्यांनी या सर्वांना फार उदार आश्रय दिला. त्या मागचं खरं कारण आइस्क्रीमची चव आणि त्याचा पोत यांवरच्या प्रेमातून.
आइस्क्रीमच नव्हे तर इतर अन्नपदार्थांचा इतिहास – कपाटातल्या डब्यांतला खाऊ, कपांमधून पिणाचे चहा-कॉफी, आणि समुद्रकिनारी जिभेनं चाटलेलं आइस्क्रीम – आपल्या आताच्या आणि त्या वेळच्या अनेक गोष्टींची आठवण नक्कीच करून देतील.
हेच लिहायला आले होते.
संध्याकाळी, ऑफिसचं दुकान बंद केल्यावर मी लेख वाचायला घेत होते. त्यामुळे हा लेख वाचून, मुशो-संपादन वगैरे करायला मला दोन-तीन दिवस लागले. रोज मी 'आइस्क्रीम खावंसं वाटतंय', असं म्हणत होते. शेवटी बरा अर्धाही माझ्या जाळ्यात अडकला, "तू फार आइस्क्रीम-आइस्क्रीम करत्येस." मग त्यालाही लेखाबद्दल सांगितलं. वर सांगितलं की जवळच्या वाण्याकडून आइस्क्रीम आण; थोड्या लांबच्या दुकानातलं मेक्सिकन व्हनिला मला जरा जास्त आवडतं; पण ते यायला वेळ लागेल. म्हणून जवळच्या दुकानातूनच आणलेलं बरं.
आता ही प्रतिक्रिया लिहिताना मला पुन्हा आइस्क्रीमची भूक लागली आहे.
तुम्ही भारतात मिसिसिपी मड…
तुम्ही भारतात मिसिसिपी मड खाल्लंत ? भारतात मिसिसिपी मड नावाचं आईसक्रीम का असावं ?
कुठल्या कुंपणीचं आहे हे मिसिसिपी मड ?सगळा पैसा परदेशी पाठवणारी कुठलीतरी कुंपणी असणार.
याला सडेतोड उत्तर म्हणून अमूलने छोटा रण ऑफ कच्छ मधल्या पाणथळ प्रदेशातील फ्लेमिंगो कॉलनीमधील मड फ्लॅट्स वरून अग्निपंख मड(फ्लॅट) असा देशप्रेमी फ्लेवर काढायला हवा. रंगही छान देता येईल त्याला.
ब्रँडनेम सांगा या मिसिसिपी मडचा , ... आस्वाद घेईन म्हणतो.
अरेच्या , हा तर आमचा क्लायंट…
अरेच्या , हा तर आमचा क्लायंट !! बघतोच आता.
मिसिसिपी मडला निदान तिथल्या संगीतगंगोत्रीला जागून निळा रंग असेल असं उगाचच वाटलं होतं पण चॉकलेट ? अरारा
इष्ट लान्सिंगमध्ये तेव्हा डायबेटीस नव्हता,तरीही मी कधीही आईस क्रीम (तिथल्या टबचा आकार बघूनच) घेतलंच नाही. (अवांतर: माझ्यातला ममव जागृत ठेवून चौकातल्या तेलगू माणसाच्या इंडियन स्टोर मधून चितळ्यांची बाकरवडी मात्र आणली,तिथल्या सहकाऱ्याला भेट द्यायला)
टीप : तुमचं ते डेरी स्टोर मात्र चांगलं होतं .
.
या लेखाचं वाचन आणि संपादन करत असताना संपादक मंडळातील २ सदस्यांनी आवर्जून आइस्क्रीम आणून खाल्लं. :D