महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर
मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.
एकीकडे मी बोलणे ऐकत होतो खरा. पण माझे डोळे तिथे सफाईचे काम करणाऱ्या मध्यमवयीन स्त्रीवर खिळले होते. पॉलिशलेल्या बांबूवर जमलेला प्रत्येक धुळीचा कण ती आपल्या हातातल्या सफाईवस्त्राने पुसत होती. मग जरा दूर जाऊन बदलत्या प्रकाशकोनात दुसरा एकादा कण दिसतो का ते बघत होती. दिसल्यास तो टिपत होती. एकाद्या धनुर्धारीच्या चेहऱ्यावर लक्ष्यवेध करण्यापूर्वी जी एकाग्रता दिसते तशीच एकाग्रता तिच्या चेहऱ्यावर होती.
ती प्रौढा काम बरोबर करते की नाही हे पहाणारा ‘मुकादम’ नव्हता. जपानी संस्कृतीत मुकादमाची आवश्यकता नाही. प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी हाच प्रत्येकाचा मुकादम. बाहेरून होणाऱ्या टीकेपेक्षा आत्मपरीक्षणातून येणारी टीका ही तीक्ष्ण असते. ती इतकी तीक्ष्ण असते की आत्ममूल्य गमावलेली व्यक्ती अगदी विसाव्या शतकातही आपल्या हाताने आपले पोट चिरून आत्महत्या करीत असे.
महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक नाटकछाप अभिमानावर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही. आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करताना “बाबांनो, निदान आपल्या पक्षाच्या फलकांवर लिहिलेल्या भाषेतून मराठीच्या अंगावरची फाटकी साडी फेडू नका.” असे सांगायची गरज वाटली नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ सूक्ष्मदर्शकाखाली मोठे करताना स्वतःच्या अनुयायांच्या आंधळ्या डोळ्यातली मुसळे अदृश्य करण्याची जादू करायला लागली नसती.
आमच्या इतिहासाची तीच दुर्दशा. या महाराष्ट्रात मुकुंदराजापासून भाऊ पाध्ये, अरूण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळपर्यंत किती महान साहित्यिक झालेत. आज हरी नारायण आपट्यांच्या कादंबऱ्यांचा संच मिळू शकत नाही कारण तो अस्तित्वातच नाही. बंगाल सरकारने प्रकाशित केलेला बंकिमबाबूंच्या समग्र वाङ्मयाचा उत्तम कागदावर छापलेला शिवलेल्या बांधणीचा ग्रंथ शंभर रूपयात मिळतो.
भाषेसाठी स्वत:चे प्राण गमावलेल्या दरिद्री बांगला देशातला विवर्तनमूलक (etymological) शब्दकोश इतका देखणा आहे की त्याच्या रंगांतूनच शोनार बांगला जाणवतो. पहिल्या भागाला मातीचा रंग आहे, दुसऱ्याला नद्यांच्या पाण्याचा आणि निरभ्र आकाशाचा आणि तिसऱ्याला तरूलतातृणपल्लवांच्या अंगकांतीचा हिरवा रंग आहे. भाषेवरचे प्रेम निःशब्द रंगांतही तरंगते आहे.
आमच्या अस्मितावाल्या, स्वाभिमानवाल्या महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा सर्वोत्कृष्ट इतिहास म्हणजे वि. ल. भावे लिखित ‘महाराष्ट्र सारस्वत’. त्याची आज उत्तम स्थितीतली एक प्रत जो विकत मिळवील त्याला राज्यसरकार भालाशेलापागोटेही बहाल करू शकेल. कारण हे बक्षीस घेण्याकरता कोणी माईचा लाल येणारच नाही.
अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या कागदी डरकाळ्या फोडून छप्पन्न इंची पोकळ छाती ठोकता येते. पण त्या पडघमाच्या धडाडधुममधून ‘बकुलफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’सारखे शब्द निघणार नाहीत. कारण त्या पिंजऱ्यातल्या करुणाविरहित दगडी हृदयाचे भावदारिद्र्य हीच आमची स्वाभिमानसंपत्ती.
गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ज्या शब्दमाळा वाहिल्या आहेत त्यात त्याला ‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा’ म्हटलेच आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात काही नवीन गुण निर्माण झाले आहेत. स्वभाषेचे आणि आपल्या भावेतिहासाविषयीचे अज्ञान आणि त्याची लाज हे ते नवे कोरेकरकरीत गुण.
‘अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या निलाजऱ्या दगडांच्या देशा’
- अरुण खोपकर
ह. ना. आपटे
खरं तर, ह. ना. आपटेंचं साहित्य आता प्रताधिकारमुक्त आहे. म्हणजे कुणीही प्रकाशक ते पुनर्प्रकाशित करू शकतो. इतकंच नव्हे, तर आता मराठी विकिपीडियाच्या विकिबुक्स प्रकल्पातही त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. गूगलतर्फे आता मराठी मजकुरासाठी ओसीआर तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. म्हणजे छापील पुस्तकाची पानं स्कॅन करून त्यापासून त्याची युनिकोड आवृत्ती करणं साध्य झालं आहे. तरीही हे होत नाही, ही खेदाची बाब आहे.
अतिशय उत्तम.
फक्त मराठीच नव्हे, एकूणात आपण भारतीयांनाच हे लागू होतं.
महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक नाटकछाप अभिमानावर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही. आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते.
शतश: सहमत.
बिनबुडाचा लेख
बिनबुडाचा लेख
उचलली लेखणी अन उगाच आत्मताडन करत असल्याचा आव आणत आपण कसे कपाळ करंटे आहोत अशा रडक्या मनोवृत्तीचा सुमार लेख
हनाआपटे काय किंवा इतर विसाव्या शतकातीच्या सुरवातीचे ब्राह्मणी लेखक केवळ सुमार असल्याचे काळाच्या ओघात सिद्ध झालेले आहेच आता त्यांचे साहित्य संपले , कुणी वाचले नाही, त्यामुळे काहीही हानी होणे संभव नाही.
जी गत संस्कृत साहित्याची झाली, तीच यांची झाली
जग पुढे जात रहाते... रद्दीत फार काळ रमू नये
बाकी ही भुमिका की तुम्ही तेव्हा कुठे होता हा खेळ खेळायचा नाही याला फारसा अर्थ नाही कारण मग मजाच काय रहाणार?
असे रडके लेख खरं तर मला आवडत
असे रडके लेख खरं तर मला आवडत नाहीत (त्यातील मेसेजशी सहमत असून सुद्धा).
लेखाच्या शेवटी परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल काहीतरी लिहिले असते तर लेखाचा काही उपयोग झाला असता.
जसे की ..
* इतर लोक करत असलेले प्रयत्न, त्यात त्यांना कितपत यश मिळाले आहे
* स्वतः ला सुचलेल्या काही प्रॅक्टिकल कल्पना
उदाहरण - आपल्या कडे असलेली खूप जुनी पुस्तके (जी आता बाजारात उपलब्ध नाहीत), ती स्कॅन करून archive.org किंवा https://openlibrary.org वर टाकणे
महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन
महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक नाटकछाप अभिमानावर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही. आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते.
.
हे खरं आहे ?
महाराष्ट्रात आत्मपरिक्षणाची लाट/फॅशन आली नाही ? खरंच ?
भारतातल्या इतर कोणत्या राज्याच्या तुलनेत असं म्हणता येईल - की महाराष्ट्रात आत्मपरिक्षण कमी होतं ? प. बंगाल ?
आत्मपरिक्षण म्हंजे व्यक्तीने स्वत:चं करायचं ते की व्यक्तीने स्वत:बरोबर स्वत:च्या समाजाचं सुद्धा करायचं ते ?
.
परखड आत्मपरीक्षण?
महाराष्ट्रात आत्मपरिक्षणाची लाट/फॅशन आली नाही ? खरंच ?
अजून स्मरणरंजनात बरेचसे लोक जिथे मग्न असतात, जरा कुठे एखाद्या अस्मितागटाच्या श्रद्धास्थानावर शंका उपस्थित केल्या केल्या लोक जिथे चवताळतात, आणि अमक्यावर बंदी घाला आणि तमक्याला ढमक्या ठिकाणावरून हद्दपार करा असल्याच गोष्टी जिथे चालू असतात, तिथे परखड आत्मपरीक्षण होतं असं कसं म्हणता येईल?
समजा
आत्मपरीक्षणात भारतीय आघाडीवर नाहीत हे मान्यच आहे. परंतु यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांचा तौलनिक अभ्यास केल्यावर मगच म्हणता येईल ना की बॉ महाराष्ट्रात कमी किंवा जास्त आत्मपरीक्षण होईल, ॲज कंपेअर्ड टु नॅशनल ॲवरेज?
आतापुरतं समजा असं धरू, की तौलनिक अभ्यास करता असं आढळलं की आत्मपरीक्षणाच्या भारतीय सरासरीइतकंच आत्मपरीक्षण महाराष्ट्रात आहे. तर मग काय? त्यात आपण समाधान मानायचं, की आहे ती परिस्थिती भूषणावह नाही, हे मान्य करून आपल्यापेक्षा वरच्या पातळीच्या आत्मपरीक्षणाची इर्ष्या बाळगायची?
व्यापक मुद्दा
मला जे आहे ते समजून घेण्यात इंटरेस्ट आहे.
त्याबाबत मी सहमतच आहे. पण इथे मुद्दा माझ्या मताचा नाही, किंवा खरं तर मराठीपुरता मर्यादितही नाही, तर अधिक व्यापक आहे : कोणत्याही भाषेत किंवा संस्कृतीत जर पुरेसं परखड आत्मपरीक्षण होण्यासाठी अवकाश उपलब्ध नसेल, तर ती एक काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आताच्या टोकदार अस्मिता पाहता तो अवकाश पुरेसा नाही असं वाटतं.
प्रश्न स्टँडर्डचा आहे.
विदाविज्ञानातलं भरतवाक्य किंवा पहिलं सुभाषित आहे, garbage in garbage out. आत्मपरीक्षणाचं डिस्ट्रीब्यूशन शोधताना ते फक्त अन्य भारतीय भाषा वा भाषिकांपुरतं मर्यादित ठेवायचं असेल तर त्यावर, ठरावीक निष्कर्षच हवे आहेत म्हणून मर्यादित विदा वापरली, असा हेत्वारोप सहज करता येतो.
अजून स्मरणरंजनात बरेचसे लोक
अजून स्मरणरंजनात बरेचसे लोक जिथे मग्न असतात, जरा कुठे एखाद्या अस्मितागटाच्या श्रद्धास्थानावर शंका उपस्थित केल्या केल्या लोक जिथे चवताळतात, आणि अमक्यावर बंदी घाला आणि तमक्याला ढमक्या ठिकाणावरून हद्दपार करा असल्याच गोष्टी जिथे चालू असतात, तिथे परखड आत्मपरीक्षण होतं असं कसं म्हणता येईल?
.
याच्या नेमकी उलट परिस्थिती आज असती तर आत्मपरिक्षण परखड झाले असं म्हणता येईल ?
.
म्हंजे दुसऱ्या शब्दात - अस्मितागटांच्या श्रद्धास्थानावर शंका उपस्थित केल्या केल्या लोक चवताळले नसते तर आत्मपरिक्षण परखड झाले आहे व त्याचा परिणामस्वरूप एक इष्ट पातळीचे आत्मभान आले आहे व मर्यादांची व जबाबदारीची जाणीव झालेली आहे असं म्हणता येईल ?
.
सापेक्षता
म्हंजे दुसऱ्या शब्दात - अस्मितागटांच्या श्रद्धास्थानावर शंका उपस्थित केल्या केल्या लोक चवताळले नसते तर आत्मपरिक्षण परखड झाले आहे व त्याचा परिणामस्वरूप एक इष्ट पातळीचे आत्मभान आले आहे व मर्यादांची व जबाबदारीची जाणीव झालेली आहे असं म्हणता येईल ?
आजमितीला आपल्याकडे अनेक लोकांविषयी परखड परीक्षण करण्यासारखी परिस्थिती नाही. शिवाजी, आंबेडकर, तुकाराम वगैरेंशी संबंधित झालेल्या वादांची किंवा हिंसेची उदाहरणं सहज सापडतील. आता अशी कल्पना करून पाहा की यांपैकी किंवा इतरही कुणाची समीक्षा करायची झाली, तर कुणालाही भीती वाटणार नाही आणि खुल्या मनानं संशोधनापासून व्यंगचित्र-विनोद वगैरे सर्व काही करता येत असतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात असती. तुमच्या मते अशी परिस्थिती आतापेक्षा अधिक बरी की वाईट?
>>>आता अशी कल्पना करून पाहा
>>>आता अशी कल्पना करून पाहा की यांपैकी किंवा इतरही कुणाची समीक्षा करायची झाली, तर कुणालाही भीती वाटणार नाही आणि खुल्या मनानं संशोधनापासून व्यंगचित्र-विनोद वगैरे सर्व काही करता येत असतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात असती.
कोण म्हणतं अशी परिस्थिती नाही? सावरकरांविषयी डॉ कोरडे (विख्यात गांधीवादी) यांचे परखड मत
सावरकर माफीवीर - https://rightangles.in/2018/05/15/no-comparison-with-bhagat-singh/
यात ते काय म्हणतात ते पहा - पण सावरकर तुरुंगामध्ये मातृभूमीच्या ओढीने एवढे व्याकूळ झाले होते की त्यांनी तिथे बसल्या बसल्या ‘सागरी प्राण तळमळला’ ही कविता केली. पण त्याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी ५४ दिवसांतच ब्रिटीश सरकारला माफीपत्रांद्वारे “मला हिंदुस्थानात परत पाठवा मी तुम्हाला सर्व ती मदत करीन” असे माफीनामे पाठवायला सुरुवात केली आणि ५० वर्षांची शिक्षा दहा वर्षांतच संपली. त्यानंतर ते ब्रिटिशांचे ६० रुपये पेन्शन घेऊन हिंदू-मुसलमान वितुष्ट वाढवून ब्रिटिशांना मदत करत राहिले. हा इतिहास नागपूर आवृत्तीत शिकवत नसल्याने कदाचित प्रदान प्रचारकांना माहित नसावा.
एवढी खुल्या मनाने महत्वाची समीक्षा / इतिहास संशोधन / परिक्षणे झाली की महाराष्ट्रात !! कुठे काय खुट्ट झालं?
अजुन हवी का प्रगल्भतेची उदाहरणे?
आजमितीला आपल्याकडे अनेक
आजमितीला आपल्याकडे अनेक लोकांविषयी परखड परीक्षण करण्यासारखी परिस्थिती नाही. शिवाजी, आंबेडकर, तुकाराम वगैरेंशी संबंधित झालेल्या वादांची किंवा हिंसेची उदाहरणं सहज सापडतील. आता अशी कल्पना करून पाहा की यांपैकी किंवा इतरही कुणाची समीक्षा करायची झाली, तर कुणालाही भीती वाटणार नाही आणि खुल्या मनानं संशोधनापासून व्यंगचित्र-विनोद वगैरे सर्व काही करता येत असतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात असती. तुमच्या मते अशी परिस्थिती आतापेक्षा अधिक बरी की वाईट?
.
अशी परिस्थिती नक्कीच बरी. मान्य.
आता प्रश्न -
आजची परिस्थिती ही आत्मपरिक्षणातून आलेली नाही हे कशावरून ? We have so many identities in Maharashtra. Identities based on caste, religion, language, and ideologies etc. Individuals and groups have developed a sense of identity around historical personalities or ideologies. Diversity results when individuals and groups steadfastly adhere to their identities and assert their identities. If they do not stick to their identities and do not assert those identities then the society will become unitary. Will such unitary society be desirable or better than the current one ?
My point is that - आजची परिस्थिती ही आत्मपरिक्षणातूनच आलेली आहे. गेली अनेक दशके महाराष्ट्रात आत्मपरिक्षण झाले की "मी कोण आहे ?", "आपण कोण आहोत ?" वगैरे. व नंतर अस्मितागट जन्माला आले व आज आता ते अस्मितागट हे स्वत:चे अस्तित्व ठामपणे व्यक्त करत आहेत. व त्याचा भाग म्हणून हमरीतुमरीवर येत आहेत.
.
.
हमरीतुमरी
आजची परिस्थिती ही आत्मपरिक्षणातूनच आलेली आहे. गेली अनेक दशके महाराष्ट्रात आत्मपरिक्षण झाले की "मी कोण आहे ?", "आपण कोण आहोत ?" वगैरे. व नंतर अस्मितागट जन्माला आले व आज आता ते अस्मितागट हे स्वत:चे अस्तित्व ठामपणे व्यक्त करत आहेत. व त्याचा भाग म्हणून हमरीतुमरीवर येत आहेत.
आपल्याहून वेगळ्या अस्मितेच्या लोकांशी हमरीतुमरीवर येणं ही ज्या आत्मपरीक्षणाची परिणती असेल, त्याला परखड आत्मपरीक्षण म्हणावं का?
+११
आत्मपरिक्षण झाले की "मी कोण आहे ?", "आपण कोण आहोत ?" वगैरे.
हे जे काही आहे ते 'आत्मपरिक्षणा'त नक्कीच मोडत नाही इतकं मला माहित आहे.
स्वत:च्या कृती/आचरणाचं, त्रयस्थपणे, पण स्वत:च केलेलं परिक्षण हे आत्मपरिक्षण असं मला वाटतं. आपण कोण आहोत हे म्हणजे आत्म'शोध' वगैरे शब्दच्छल करता येईल, उदाहरणं दोन्ही बाजूंकडून फेकता येतील, पण हे परिक्षण नक्कीच नव्हे. एखाद्या परिक्षणात कुठल्यातरी 'आदर्श' गोष्टींशी किंवा मूलभूत संकेतांशी केलेली तुलना अभिप्रेत असते.
--
आपल्याहून वेगळ्या अस्मितेच्या लोकांशी हमरीतुमरीवर येणं ही ज्या आत्मपरीक्षणाची परिणती असेल, त्याला परखड आत्मपरीक्षण म्हणावं का?
अत्यंत मार्मिक प्रश्न. दुसऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं, म्हणजेच एकप्रकारे दुसऱ्याला कमी लेखणं हे ज्यातून येत असेल ते आत्मपरिक्षण परखड जाऊदे, फार 'कोतं', आणि स्वपक्षपाती होय.
हे जे काही आहे ते
हे जे काही आहे ते 'आत्मपरिक्षणा'त नक्कीच मोडत नाही इतकं मला माहित आहे. स्वत:च्या कृती/आचरणाचं, त्रयस्थपणे, पण स्वत:च केलेलं परिक्षण हे आत्मपरिक्षण असं मला वाटतं. आपण कोण आहोत हे म्हणजे आत्म'शोध' वगैरे शब्दच्छल करता येईल, .
.
स्वत:च्या कृतीचे व आचरणाचे परिक्षण करणे हा भाग दोन आहे.
भाग एक - "मी कोण आहे" व "आपण कोण आहोत".
स्वत:च्या कृतीचे त्रयस्थ नजरेतून परिक्षण करणे - हे तर निर्वाणा फॉलसीच्या जवळ जाणे आहे. त्रयस्थ हा त्याचे निर्णय (ज्याची परिणति कृतीत होते) त्याच्या व्यक्तीगत ओळखीनुसार व मूल्यांनुसार, प्रेफरन्सेसनुसार घेतो.
.
----
.
एखाद्या परिक्षणात कुठल्यातरी 'आदर्श' गोष्टींशी किंवा मूलभूत संकेतांशी केलेली तुलना अभिप्रेत असते
.
आदर्श परिस्थितीची एका व्यक्तीची व्याख्या ही दुसऱ्या व्यक्तीच्या आदर्श परिस्थितीच्या व्याख्येशी जुळेल का ?
जर जुळणार नसेल तर त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून परिक्षण करणे शक्य होईल का ?
.
हाहा
आदर्श परिस्थितीची एका व्यक्तीची व्याख्या ही दुसऱ्या व्यक्तीच्या आदर्श परिस्थितीच्या व्याख्येशी जुळेल का ?
हे मला माहितीच होतं तुम्ही म्हणणार- म्हणून मी पुढे मूलभूत संकेत टाकलेलं आहे.
मला नाही माहित ब्वॉ ते काय आहेत. पण इतिहासात जितक्या लोकांनी स्वत:च्या समाजातल्या लोकांच्या क्रियांचं 'आत्मपरिक्षण' (द्विरुक्ती, लोल) केलं ते पुढे समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध झाले. आता त्यांनी काय केलं असावं, हे ''आदर्श' गोष्टींशी किंवा मूलभूत संकेतांशी केलेली तुलना' माझं ॲप्रॉक्झिमेशन आहे.
१४टॅन व चिंजं यांना -
१४टॅन व चिंजं यांना -
तुम्ही दोघे कदाचित --- हमरीतुमरीवर येणे हे सर्वथा, कोणत्याही स्थितीत अनुचित आहे - अशा गृहितकावर आधारित युक्तिवाद करत आहात.
.
हमरीतुमरीवर येणे ही अभिव्यक्तीची परमावधी आहे.
.
----
.
दुसऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं, म्हणजेच एकप्रकारे दुसऱ्याला कमी लेखणं हे ज्यातून येत असेल ते आत्मपरिक्षण परखड जाऊदे, फार 'कोतं', आणि स्वपक्षपाती होय.
.
स्लिपरी स्लोप.
.
हमरीतुमरीवर येणं हे प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला असतंच असं नाही.
.
आणि कमी लेखणं / न लेखणं हा तर अत्यंत वास्तववादी आणि नॉर्मल बाब आहे. व्यक्ती सतत कोणाला ना कोणाला तरी कमी व जास्त लेखत असते.
.
शब्द
हमरीतुमरीवर येणे हे सर्वथा, कोणत्याही स्थितीत अनुचित आहे
शब्द बहुतेक चुकीचा संदेश पाठवत आहेत. तुम्ही म्हणता तसं हाही स्लिपरीच स्लोप आहे. हमरीतुमरी म्हणजे काय? तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखं- फक्त शेरे मारून गप्प बसणं फारच्च मवाळ प्रकार झाला. हे व्हावं. अगदी नीट भांडणं व्हावीत. अर्णब वगैरे लोकांचे डीए आणीबाणीच्या काळात वाढावेत. ऐसीवर घालतात तसे वाद घालणं हे तर व्हायलाच पाहिजे आणि ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावधी वगैरे- ह्याबाबत मी सहमत आहेच.
पण पब्लिक हमरीतुमरीवर थांबतं का?
आणि कमी लेखणं / न लेखणं हा तर अत्यंत वास्तववादी आणि नॉर्मल बाब आहे. व्यक्ती सतत कोणाला ना कोणाला तरी कमी व जास्त लेखत असते.
मनोमन तर मीच ही पृथ्वी माझ्या करंगळीवर तोलून धरली आहे असा माझा समज आहे. पण तो मी उघड बोलून दाखवला किंवा इतरांना मी तसं उघड बोललो, तशी (दमनकारक) वागणूक दिली तर ते चूक आहे. थोडक्यात म्हणजे ॲक्शन्स मॅटर मोअर दॅन थॉट्स. मी कोणाला तरी माझ्याहून कमी/जास्त लेखणार हे स्वाभाविक आहे हे १००% मान्य. म्हणून ज्यांना मी कमी लेखतो त्यांचे अधिकार/स्वातंत्र्य हिरावून घेणं हे निश्चितच चूक आहे इतकंच माझं म्हणणं आहे.
पण पब्लिक हमरीतुमरीवर थांबतं
पण पब्लिक हमरीतुमरीवर थांबतं का?
.
हा तुमचाच नव्हे तर इतरांचा सुद्धा प्रश्न असेल असा माझा अंदाज आहे.
.
इथे मर्यादा आहे. हमरीतुमरी वर आल्यानंतर तिचे पर्यावसान हिंसाचारात होणे हे मर्यादेचे उल्लंघन आहे. पण Speech is generally not violence. In some cases it can be. But in normal political, social discourse it is not. Even if that discourse involves heated dialogue.
.
पण अनेकांना ही मर्यादा समजते व बहुतांश लोक तिचे उल्लंघन करत नाही. हे आत्मपरिक्षणाशिवाय झाले असं म्हणता येईल का ?
.
आपल्याहून वेगळ्या अस्मितेच्या
आपल्याहून वेगळ्या अस्मितेच्या लोकांशी हमरीतुमरीवर येणं ही ज्या आत्मपरीक्षणाची परिणती असेल, त्याला परखड आत्मपरीक्षण म्हणावं का?
.
परखड नसलं तरी आत्मपरिक्षण अवश्य म्हणावं.
.
स्वत:च्या ओळखीची, अस्तित्वाची जाणीव झालेली असणे व ती ठामपणे मांडणे हे आत्मपरिक्षणानंतरच होते.
स्वत्व गमावून बसलेले लोक सोडाच पण स्वत्वाची जाणीव नसलेले लोक हे कितपत आत्मपरिक्षण करू शकतील ?
ज्यांना स्वत्वाची जाणीव नाही व ज्यांना स्वत्व म्हंजे काय हे सुद्धा माही नाही ते आत्मपरिक्षणाच्या जवळपास सुद्धा जाऊ शकणार नाहीत.
.
प्रांत, समूह
भारतात किती लोक आत्मपरीक्षण करतात, हा संशोधनाचा विषय होईल. पण एखाद्या जातीची वा समूहाची प्रगती पाहिली तर त्यांच्या आत्मपरीक्षणाचा थोडाफार अंदाज येऊ शकेल. कारण अशाच लोकांची प्रगती होण्याची व्यावहारिक शक्यता जास्त आहे. जाज्वल्य अस्मिता जोपासणाऱ्यांच्या प्रगतीची शक्यता तुलनेने कमी!
>>>>आत्मपरीक्षण हे
>>>>आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Maharashtra_Legislative_Assembly_election…
हिंदुत्ववादी पक्षांना मिळालेली मते ४७.१ (यात पक्के हिंदुत्ववादी ४७.१ पेक्षा कमीच असणार कारण मोदींवर विश्वास ठेऊन (!) मत देणारे नंतर पस्तावलो असे जाहीर करणारे कमी करायला हवे)
बिगर हिंदुत्ववादी ५२.९ अधिक वरच्या कंसातले
म्हणजे अधिकांश महाराष्ट्रीयन हिंदुत्ववादी नसतांना केवळ हिंदूंना झोडायची ही कोणती पद्धत?
की बिगर हिंदूत्ववादी हे आत्मपरिक्षण वगैरे करणारे आहेत असे तुम्ही म्हणता म्हणून आम्ही समजायचे !ऑ ऽऽ !!!
???
महाराष्ट्र, आधुनिक भारत तथा हिंदुत्ववादी हे 'ब्लडीसाउदेशियन' नामक एका (भिकारचोट लोकांच्या) व्यापक गटाचे (थोडेफार ओव्हरलॅपिंग) उपगट आहेत. 'आत्मपरीक्षण करणे' - किंवा 'आत्मपरीक्षण केलेले पचणे' - हा या व्यापक गटापैकी फारशा कोणाचाच फोर्टे नसावा. (या व्यापक गटाबाहेरच्यांपैकी कितीजणांचा असावा, हा प्रश्न प्रस्तुत चर्चेकरिता गैरलागू आहे.)
सबब:
म्हणजे अधिकांश महाराष्ट्रीयन हिंदुत्ववादी नसतांना केवळ हिंदूंना झोडायची ही कोणती पद्धत?
महाराष्ट्र, आधुनिक भारत तथा हिंदुत्ववादी या तिन्ही (काहीश्या ओव्हरलॅपिंग) गटांना सारखेच झोडलेले आहे - हिंदुत्ववाद्यांना सिंगलऔट केलेले नाही - असे वाटले.
की बिगर हिंदूत्ववादी हे आत्मपरिक्षण वगैरे करणारे आहेत असे तुम्ही म्हणता म्हणून आम्ही समजायचे !ऑ ऽऽ !!!
भारत, महाराष्ट्र तथा हिंदुत्ववादी या तीन (अंशतः ओव्हरलॅपिंग) गटांपैकी 'आत्मपरीक्षण' हा कोणाचाच फोर्टे नसल्याचा दावा असताना, 'बिगरहिंदुत्ववादी तेवढेच आत्मपरीक्षण करतात' असा दावा येथे (कदाचित आपण सोडून) कोणीच केल्याचे आढळले नाही.
असो.
- (ब्लडीसाउदेशियन) 'न'वी बाजू.
महाराष्ट्र, आधुनिक भारत तथा
महाराष्ट्र, आधुनिक भारत तथा हिंदुत्ववादी हे 'ब्लडीसाउदेशियन' नामक एका (भिकारचोट लोकांच्या) व्यापक गटाचे (थोडेफार ओव्हरलॅपिंग) उपगट आहेत. 'आत्मपरीक्षण करणे' - किंवा 'आत्मपरीक्षण केलेले पचणे' - हा या व्यापक गटापैकी फारशा कोणाचाच फोर्टे नसावा.
.
(१) एखाद्या गटाने आत्मपरिक्षण केले - असा निर्णय घेण्यासाठी निकष कोणते ?
.
(२) हवे असलेले विशिष्ठ परिणाम मिळाले नाहीत म्हणुन त्यांनी आत्मपरिक्षण केले नाही असं म्हणणार का ?
.
(३) फोर्टे नसावा हा एक भाग झाला. परमावधी म्हणा हवं तर. पण आत्मपरिक्षण केलेले नाहीच१ असं म्हणणं - हे कोणत्या आधारावर योग्य वाटतं ?
.
---
.
१ तुम्ही "फोर्टे नसावा" असा नॉन डेफिनिटिव्ह सूर लावलेला आहे हे माहीती आहे मला. पण खोपकरांनी एकदम शून्य मार्क दिलेत किंवा अनुत्तीर्ण केलेय - ते मात्र अजिबात पटलं नाही.
.
(३)... (२)... (१)... (एक प्रयत्न)
(३)
पण आत्मपरिक्षण केलेले नाहीच१ असं म्हणणं - हे कोणत्या आधारावर योग्य वाटतं ?
गटफील? कदाचित आजूबाजूच्या परिस्थितीच्या निरीक्षणावरून त्या मर्यादित सँपलसेटच्या आधारावर केलेले व्यापक एक्स्ट्रापोलेशन? कदाचित - कदाचित! - त्या व्यापक एक्स्ट्रापोलेशनला इतर समाजांविषयीच्या त्रोटक ऐकीव/वाचीव माहितीचा हातभार? (अर्थात, हे माझे वाइल्ड गेसेस.)
पण खोपकरांनी एकदम शून्य मार्क दिलेत किंवा अनुत्तीर्ण केलेय - ते मात्र अजिबात पटलं नाही.
पटले पाहिजे असे आवश्यक नाहीच. आल्टर्नेटिव व्ह्यूपॉइंटला सपोर्ट करणारा एखादा विदाबिंदू पुरवू शकत असाल, तर यू आर ऑल्वेज़ वेल्कम.
(२)
हवे असलेले विशिष्ठ परिणाम मिळाले नाहीत म्हणुन त्यांनी आत्मपरिक्षण केले नाही असं म्हणणार का ?
नॉट नेसेसरिली. परंतु एक तटस्थ (किंवा नॉट-सो-तटस्थ) निरीक्षक म्हणून माझे तसे इंप्रेशन असू शकतेच. (बरोबर की चूक हा भाग अलाहिदा. बरोबर की चूक हे कोण ठरविणार, हा भाग त्याहूनही अलाहिदा.)
(१)
एखाद्या गटाने आत्मपरिक्षण केले - असा निर्णय घेण्यासाठी निकष कोणते ?
आय सपोज़ दॅट वुड बी हायली सब्जेक्टिव. म्हणजे, टू दॅट एक्स्टेंट, माझा निर्णय (किंवा माझा निकषसुद्धा) हा माझ्या विशिष्ट परिणाम मिळण्याच्या अपेक्षेने कलर झालेला असू शकतो, हे मान्य आहे.
(मग (२)चे उत्तर थेट 'हो' असे का नाही? 'नॉट नेसेसरिली' असे का? तर, मी जर प्रामाणिक ऑब्ज़र्वर असेन, किंवा माझी दुसरी बाजूही विचारात घेण्याची कुवत असेल, तर आय मे कन्सीड दॅट द ऑब्जेक्ट ऑफ माय ऑब्ज़र्वेशन्स मे हॅव अदर कन्सिडरेशन्स, अदर क्रायटीरिया, परहॅप्स अदर एक्स्पेक्टेशन्स ऑफ अ टोटली डिफरण्ट सेट ऑफ रिझल्ट्स... इन विच केस, कदाचित मी असेही म्हणू शकेन की हो बाबा, अमूकअमूक गटाने आत्मपरीक्षण केलेले आहे खरे, भले ही ते माझ्या निकषांत बसत नसले, किंवा त्यातून होणारे परिणाम हे माझ्या अपेक्षांहून पूर्णपणे वेगळे असले, तरीही.)
तशी सगळीच लिखित विधाने नसतात
तशी सगळीच लिखित विधाने नसतात काय?
.
नसतात.
.
--------
.
लेखक खोपकरांनी स्वत:च्या मुद्द्यांशीच प्रतारणा केलेली आहे.
.
खोपकरांना महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आत्मपरिक्षण केलेलं हवं आहे.
व ते सुद्धा -- एका गटाने नाही केलं असं म्हणल्याबरोबर त्या गटाने "तुमचं काय ?" हा प्रश्न विचारता कामा नये - असं सुद्धा लेखकाला वाटतं. "त्यावेळी तुम्ही कुठे होतात" चा खेळ करू नका - असं म्हणताना लेखकाला "दुसऱ्याकडे बोट दाखवू नका" असं अभिप्रेत आहे.
.
हे ठीक असू शकतं. पण ....
.
पण मग अमक्या गटाने किंवा गटांनी केलं नाही असा आरडाओरडा करण्यात हशील नाही.
.
आत्मपरिक्षणाच्या पथावर पुढे जाताना जे खेळ खेळले जाऊ नयेत असं लेखकाला वाटतं ते त्याने स्वत: खेळावेत का ?
.
पण मग अमक्या गटाने किंवा
पण मग अमक्या गटाने किंवा गटांनी केलं नाही असा आरडाओरडा करण्यात हशील नाही.
तो/ते गट 'आपला/ले' (व्हॉटेव्हर दॅट मे मीन) असला/ले, तर?
आत्मपरिक्षणाच्या पथावर पुढे जाताना जे खेळ खेळले जाऊ नयेत असं लेखकाला वाटतं ते त्याने स्वत: खेळावेत का ?
का खेळू नयेत? त्यामुळे आत्मोन्नती होत असेल तर जरूर खेळावेत; 'आपल्यां'वर टीका जरूर करावी. (ती चुकीची/अन्याय्य असेल, तर 'आपले' लोक काय गप्प बसणार नाहीत, काय द्यायचे ते उत्तर देतीलच, सो व्हाय वरी? जोवर जिवावर उठत नाहीत/मारायलाबिरायला उठत नाहीत, तोवर ठीकच आहे. अंगावर आले/जिवावर उठले, तर मात्र ते 'आपले' म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, सबब खुशाल मरू द्यावे; त्यांच्याशी पाला पडून आपले होणारे नुकसान मिनिमाइज़ करण्याच्या मागे लागावे. कोणीही इतकी फाइट मारण्याच्या वर्थ नसते, आणि जो तो आपापल्या कर्माने मरतो. मरतामरता आपल्यालाही मारून मरत नाही, एवढेच पाहायचे. तेच आत्मपरीक्षण. असो.)
का खेळू नयेत? त्यामुळे
का खेळू नयेत? त्यामुळे आत्मोन्नती होत असेल तर जरूर खेळावेत; 'आपल्यां'वर टीका जरूर करावी. (ती चुकीची/अन्याय्य असेल, तर 'आपले' लोक काय गप्प बसणार नाहीत, काय द्यायचे ते उत्तर देतीलच, सो व्हाय वरी? जोवर जिवावर उठत नाहीत/मारायलाबिरायला उठत नाहीत, तोवर ठीकच आहे. अंगावर आले/जिवावर उठले, तर मात्र ते 'आपले' म्हणण्याच्या लायकीचे नाहीत
.
ओके. ठीकाय.
पण मग हेच आपल्यांना जसे लागू आहे तसे इतरांना का लागू नसावे ?
.
म्हंजे "त्यांची" उन्नती होत असेल तर जरूर टीका करावी. जर ती टीका त्यांच्या दृष्टिने अनाठायी असेल तर ते काय द्यायचे ते उत्तर देतीलच.
आणि जिवावर उठले तर ते अजूनही परकेच आहेत असं म्हणावं. आणि मूव्ह ऑन !
परंतु जर सुयोग्य असेल आणि जर त्यांना सुयोग्य वाटली तर ती टिका स्वीकारण्याची संधी त्यांना सुद्धा मिळेल. व कदाचित ते आपले होतील..
.
.
व्हाय वरी ?
...
परंतु जर सुयोग्य असेल आणि जर त्यांना सुयोग्य वाटली तर ती टिका स्वीकारण्याची संधी त्यांना सुद्धा मिळेल. व कदाचित ते आपले होतील..
.
.
व्हाय वरी ?
इज़ इट वर्थ द रिस्क? हा प्रश्न आहे.
(मुळात तुम्ही म्हणता तसा रिटर्न मिळवणे हे प्रामाणिक उद्दिष्ट खरोखरच असेल, आणि) तसा रिटर्न मिळण्याचे प्रॉस्पेक्ट्स बरे वाटत असतील, तर जरूर ती रिस्क घ्यावी. (अडविणारा मी कोण?)
(मुळात तुम्ही म्हणता तसा
(मुळात तुम्ही म्हणता तसा रिटर्न मिळवणे हे प्रामाणिक उद्दिष्ट खरोखरच असेल, आणि) तसा रिटर्न मिळण्याचे प्रॉस्पेक्ट्स बरे वाटत असतील, तर जरूर ती रिस्क घ्यावी. (अडविणारा मी कोण?)
.
ज्यांना ती रिस्क-रिटर्न्स रिलेशनशीप पटते, रुचते, मानवते - ते ती घेतीलच की. व डायलॉग विल कंटिन्यु. आणि अनेकजण घेतात व डायलॉग चालू राहतो.
.
पण आत्मपरिक्षण झालेलेच नाही - हे म्हणणे हे कसेकाय पटणारे आहे ??
.
आमच्या एका मित्राचे तीर्थरूप शिक्षक होते. एखाद्या विद्यार्थ्याने अपेक्षेपेक्षा थोडे कमी गुण आणले आणि अपेक्षाभंग केला (उदा. त्याच्याकडून अपेक्षा ८०% असताना जर त्याला ७५% मिळाले तर) तर ते त्याला काहीही बोलत. म्हंजे एका विद्यार्थ्याला (जो बहुतांश वेळा ८०% च्या आसपास असायचा त्याला) ते "शाळेचा लाईफमेंबर होणार तू" असं म्हणाले होते एकदा.
.
तसं वाटतं खोपकरांच्या ह्या विधानाबद्दल मला.
.
शक्य आहे
पण आत्मपरिक्षण झालेलेच नाही - हे म्हणणे हे कसेकाय पटणारे आहे ??
.
आमच्या एका मित्राचे तीर्थरूप शिक्षक होते. एखाद्या विद्यार्थ्याने अपेक्षेपेक्षा थोडे कमी गुण आणले आणि अपेक्षाभंग केला (उदा. त्याच्याकडून अपेक्षा ८०% असताना जर त्याला ७५% मिळाले तर) तर ते त्याला काहीही बोलत. म्हंजे एका विद्यार्थ्याला (जो बहुतांश वेळा ८०% च्या आसपास असायचा त्याला) ते "शाळेचा लाईफमेंबर होणार तू" असं म्हणाले होते एकदा.
.
तसं वाटतं खोपकरांच्या ह्या विधानाबद्दल मला.
शक्य आहे.
शेवटी, खोपकरांचे विधान हे खोपकरांच्या विचारसरणी आणि अनुभवांतून आलेले खोपकरांचे एक मत आहे. ते बरोबर असू शकते किंवा चूकही असू शकते. (किंवा रादर, ते मला - किंवा तुम्हाला - बरोबर वाटू शकते, किंवा चूकही वाटू शकते.)
ॲज़ आय सेड एल्सव्हेअर, खोपकरांचे मत तुम्हाला - किंवा फॉर्दॅट्मॅटर मलासुद्धा - पटलेच पाहिजे, असे आवश्यक नाही.
तपशील
पण आत्मपरिक्षण झालेलेच नाही - हे म्हणणे हे कसेकाय पटणारे आहे ??
'आत्मपरीक्षण रुजले नाही', असं ते विधान आहे. म्हणजे, काही अपवाद आहेत, पण ते तुरळक; त्याची टिकाऊ परंपरा निर्माण झाली नाही. त्याचे परिणाम आज दिसत असतात. इतिहासातल्या कित्येक गोष्टींविषयी आणि व्यक्तींविषयी जनमानसाला अप्रिय असं काही बोलता येत नाही, मग त्यामागे कितीही अभ्यास असला तरीही.
अंजली कीर्तनेंची प्रतिक्रिया
व्हॉट्सॅपावर मम जननीने धाडिली होती. (म्हणूनच) इतके दिवस दुर्लक्षिण्यात आली.
http://www.thinkmaharashtra.com/node/2910
संपा: जाम मार्मिक आहे. मी एरवी खूप आरडाओरडा करुन आणि जुन्या लोकांची अक्कल काढून जे लिहीलं अस्तं ते ह्यांनी व्यवस्थित लिहीलेलं आहे.
मार्मिक! त्याव्यतिरिक्त... (अवांतर)
...त्याच 'थिंक' महाराष्ट्रात 'सावरकर आणि कानडी' अशा कायशाशा शीर्षकाचा एक लेख आहे, तो वाचून, सावरकर नावाचा इसम (ब्रिटिशांचे पैसे खाऊन किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही, परंतु) केवळ हिंदू-मुसलमानांतीलच नव्हे, परंतु कानडी१ आणि इतर हिंदुस्थानी यांच्यातीलही वितुष्ट२ वाढविण्याचे उपद्व्याप करीत होता, अशी धारणा झाली.
..........
१ खरे तर कन्नडिग. कन्नडिगांना 'कानडी' म्हणून संबोधणाऱ्यांनी मुंबईला कोणी 'बॉम्बे' (किंवा हिंजवडीला 'हिंजेवाडी') म्हणून संबोधले, तर बोम्बलू नये. (आणि तसे संबोधणाऱ्यास रस्त्यात - किंवा अन्यत्र कोठेही - बदडू तर नयेच नये.)
२ आणि तेही, 'आमच्यात, झालेच तर त्या बंगाल्यांत, पंजाब्यांत नि आणखी कोणाकोणांत, कित्तीकित्ती क्रांतिकारक झाले, तुमच्यांत नाऽऽऽऽऽही! टुक टुक! (सबब तुम्ही लोक देशभक्त नव्हेत.)' असल्या काहीतरी फतरूड, फालतू, फिज़ूल कारणावरून. सरळसरळ 'मला कन्नड येत नाही - कन्नड माताड्लिके बरुदिल्ला! - सबब मी कन्नडमध्ये भाषण करू शकणार नाही, क्षमस्व' असे सांगता आले नसते? त्यासाठी वाकड्यात शिरण्याची काय गरज होती?
दुवा?
कोल्हटकरांशी सहमत; आणि कन्नडिगा-कानडी यासंदर्भात नबांशीही सहमत.
मात्र त्या 'थिंक महाराष्ट्रा'वर सगळ्यात खाली एका खोक्यात, 'महत्त्वाची मराठी संकेतस्थळे', या शीर्षकाखाली पुढचे दुवे दिसले. तेव्हा कृपया त्यांना नावं ठेवू नयेत. ;-)
साने गुरूजी : saneguruji.net
पु. ल. देशपांडे : puladeshpande.net
मराठी विश्वकोष : marathivishwakosh.in
ऐसी अक्षरे : aisiakshare.com
दुवा
मात्र त्या 'थिंक महाराष्ट्रा'वर सगळ्यात खाली एका खोक्यात, 'महत्त्वाची मराठी संकेतस्थळे', या शीर्षकाखाली पुढचे दुवे दिसले. तेव्हा कृपया त्यांना नावं ठेवू नयेत. Wink
साने गुरूजी : saneguruji.net
पु. ल. देशपांडे : puladeshpande.net
मराठी विश्वकोष : marathivishwakosh.in
ऐसी अक्षरे : aisiakshare.com
मालकबाई लाचलुचपतीस ससेप्टिबल असू शकतील, असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते१. पण काय करणार! अखेर त्याही माणूसच.
.........
१ असे म्हणण्याचा प्रघात आहे. नाही, मालकबाई माझ्या स्वप्नात येत नाहीत२, हे आधीच स्पष्ट करतो. उगाच गैरसमज नकोत!
२ मला नाइटमेअर्स (मराठीत: दुःस्वप्ने?२अ) पडत नाहीत सहसा.
२अ 'रात्रीची घोडी' असे शब्दांतर गेला बाजार कैच्याकै (आणि कदाचित अश्लीलसुद्धा) व्हावे बहुधा.
विदा आणि मासला
हा मासला आहे, पण विदा नाही.
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मालकबाई लाचलुचपतीस ससेप्टिबल असू शकतील, असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते१. पण काय करणार! अखेर त्याही माणूसच.
मी कां माणूस नाहीं! (शुद्धलेखनाच्या चुका काढू नये. भावना आणि हेल समजून घेणे.) :प
परस्परविरोधाचा वर्ग
ज्यावरून एवढं रामायण झालंय अगदी तशा आशयाचीच, पण मूळ लेखकाचीच पोष्ट ह्याच thinkमहाराष्ट्रवर प्रकाशित झालीए (जिचा दुवा प्रतिक्रियेत आहेेच) आणि अंकींची प्रतिक्रिया ही त्यालाच आहे ह्याचीही नोंद घ्यावी. मला फक्त तिच्यातला आशय आवडला म्हणून इथे डकवली.
अवांतर:
मग त्या आशयाबाबत चर्चा न करता हे जे चाल्लंय त्यायोगे मग हे कोणी, कोणाची अक्कल काढायचा मासला/दाखला/उदाहरण/विदा आहे ह्याची चर्चा करू.
:)
एक्सेसिवली बेसिक शंका
मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना.
हेच सांगायचे होते, तर पुढचे एवढे सगळे पाल्हाळ लावण्याची काय गरज होती?
(उपप्रश्न: लोकांना विद्वत्ता सुचते ती हिंदुस्थानचा किनारा सोडल्यावरच का सुचते? मग भले ते जपानला जाण्याकरिता असो, नाहीतर अमेरिकेला जाण्याकरिता असो.)
- (अमेरिकन) 'न'वी बाजू.
(उपप्रश्न: लोकांना विद्वत्ता
(उपप्रश्न: लोकांना विद्वत्ता सुचते ती हिंदुस्थानचा किनारा सोडल्यावरच का सुचते? मग भले ते जपानला जाण्याकरिता असो, नाहीतर अमेरिकेला जाण्याकरिता असो.)
कारण देश सोडल्याखेरीज, देशाबाहेर काहीएक काळ काढल्याखेरीज (तोही फर्स्ट वर्ल्डातच) तुम्हांला देशात भाव मिळत नाही.
बोचरे सत्य
बोचरे सत्य.
पुस्तकांच्या उपलब्धतेच्या मुद्याबद्दल दोन बाबी - आर्यभूषण छापखाना बंद झाला तेव्हा त्यांनी सगळी पुस्तकं विकायला काढली. तेव्हा माझ्या वडिलांनी (मराठीचे प्राध्यापक कै. डॉ. गं. ना. जोगळेकर) बरीच पुस्तकं घेतली होती, त्यात ह.ना. आपटे यांची 32 पुस्तकंही होती (संकीर्ण, संक्षिप्त, सर्व प्रकारची). असणार अजून भावाच्या घरी.
दुसरं म्हणजे अलीकडे 200-250 किंवा कमी संख्येने प्रसिद्ध होणा-या आवृत्त्या लुप्त होतात, अनेकदा ती पुस्तकं दखलपात्र होती की नाही हे ठरवण्यासाठीही ती उपलब्ध नसतात.