Skip to main content

गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर

Gurudutt Cover Page

अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही काळापूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता. पण त्यापुढे जाऊन ‘गुरुदत्तच्या चित्रपटांनी नक्की काय साध्य केलं?’, ‘भारतीय चित्रपटांत गुरुदत्तचं नक्की स्थान काय?’ आणि ‘गुरुदत्तच्या चित्रपटांत जागतिक आणि भारतीय कलाविचार कसे दृग्गोचर होतात?’ अशा काही मूलगामी प्रश्नांविषयीचे मूलगामी विचार मराठीमध्ये काही दशकांपूर्वी अतिशय प्रभावी विश्लेषणाच्या माध्यमातून अरुण खोपकर या चित्रपट दिग्दर्शक-शिक्षक-लेखकानं मांडले होते. आता मात्र त्या पुस्तकाचं विस्मरण झालेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. ‘नव्या आवृत्तीच्या ताज्या निमित्तानं मराठीतल्या या अभिजात पुस्तकाची मराठी आंतरजालावर आठवण काढावी यासाठीचा हा धागा.

‘गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकात खोपकर ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब, बीबी और गुलाम’ या तीन रसिकप्रिय चित्रपटांविषयी विवेचन आणि विश्लेषण करतात. इतर समाजांप्रमाणे मराठी समाजातदेखील एका काळापर्यंत चित्रपट ही कमी दर्जाची कला समजली जायची. त्यामुळे अनेक प्रकारची हानी झाली. साहित्याचं गांभीर्यानं विश्लेषण करण्याची, म्हणजे समीक्षेची, जशी परंपरा अस्तित्वात होती, तशी चित्रपटाच्या समीक्षेची किंवा रसग्रहणाची परंपरा मराठीत त्यामुळे निर्माण झाली नाही. पण आपल्याला ते करायचं आहे, असं खोपकर प्रस्तावनेतच सांगतात आणि पुढे दाखवूनसुद्धा देतात. त्यांच्या विश्लेषणपद्धतीला मात्र एक जागतिक वळण आणि परंपरा आहे हेही ते कबूल करतात. सिनेमाविषयी सकस लिहिण्यासाठी मुळात इतर कला, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याशीच भिडावं लागतं हे ते सांगतात. ‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

प्रत्यक्ष विश्लेषण करताना खोपकर अनेकविध संकल्पना आणि परंपरांचा अगदी लीलया फेरफटका मारत या तीनही चित्रपटांची वेगवेगळी अंगं उलगडतात. त्यात ‘रोमँटिसिझम’ या युरोपिअन परंपरेत गुरुदत्त कसा बसतो याचं विवेचन आहे. पात्रं, प्रसंग यांच्याद्वारे चित्रपटांचं रसग्रहण आहे. त्या बरोबरच चित्रपट या माध्यमाची जाण आणि तीमधून गुरुदत्त या व्यक्तित्वाची उकलही केलेली आहे. त्यात ‘जिनिअस’ आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाची ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ मधली मांडणी आणि ‘साहिब, बीबी...’ मधली छोटी बहू यांचा संबंध कसा लागतो हेही दाखवलं आहे.

क्षोभनाट्य (मेलोड्रामा) हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. भारतीय कलापरंपरेचा प्रवाह क्षोभनाट्याच्या आधारानं जातो. गुरुदत्तचे चित्रपट या पठडीतले असल्यामुळे सत्यजित रायसारख्या अधिक वास्तववादी दिग्दर्शकाच्या तुलनेत कधीकधी गुरुदत्तला कमअस्सल मानलं जातं. पण पारंपरिक मेलोड्रामा आणि गुरुदत्तचे चित्रपट यांत फरक काय आहे हे खोपकर विशद करतात. तसंच योगायोग, गाणी वगैरे आपल्या बाजारू चित्रपटांमध्ये वापरले जाणारे घटक गुरुदत्त कशा ताकदीनं वापरतो याचंही त्यात विश्लेषण केलेलं आहे.

काळोख आणि प्रकाश हा चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमातला एक अतिशय प्रभावी घटक आहे. त्याचा प्रसंगानुरुप वापर आणि चित्रपटाच्या एकंदर रचनेशी असलेलं त्याचं नातं खोपकर उलगडून दाखवतात. अवकाशाचा चित्रपटीय वापर आणि त्यातून उभा राहणारा ऱ्हास यांचंही असंच विश्लेषण ते करतात.

असं सगळं उलगडून दाखवत असताना विवेचनातल्या प्रत्येक घटकाचा पाश्चिमात्य परंपरेतला वापर आणि गुरुदत्तनं केलेला वापर यांतली साम्यस्थळं खोपकर दाखवतात आणि त्याचं वेगळेपणसुद्धा दाखवतात. त्यामुळे वाचकाला आपोआप एक सखोल आणि व्यापक ज्ञान मिळत जातं.

र.कृ. जोशी यांचं रचित मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि एकंदर मांडणी ही देखणी आणि तरीही आशयाला साजेशी आहे. पानोपानी असणारी छायाचित्रं ही पुस्तकाचा आशय उलगडून दाखवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. त्यामुळे १९८५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची निर्मितीमूल्यं काळाच्या पुढची आहेत. (नव्या आवृत्तीचं डिझाइन विकास गायतोंडे यांनी केलं आहे आणि ते पूर्वीहून अधिक देखणं आहे.)

हे पुस्तक म्हणजे निव्वळ गुरुदत्तची स्तुती नाही. त्याला नीट न जमलेल्या गोष्टींचं विवेचनही त्यात आहे. त्याशिवाय अतिशय हृद्य वाटावी अशी एक तुलना त्यात आहे. ती ऋत्विक घटक यांच्याशी केलेली आहे. शोकनाट्य (ट्रॅजेडी) हा गुरुदत्तच्या तीनही चित्रपटांचा गुणविशेष आहे. तोच क्षोभनाट्याच्या घाटातून मांडणारे ऋत्विक घटक हे गुरुदत्तव्यतिरिक्त अजून एक भारतीय दिग्दर्शक आहेत. या दोघांची कलात्मक तुलना आणि आपापल्या कलाकृतीतून महाकाव्य (एपिक) साकारण्याचे दोघांचे प्रयत्न यांविषयीचं सखोल आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण पुस्तकात आहे.

गुरुदत्तच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा घेणं पुस्तकात अभिप्रेत नाही. पण त्याची कला आणि त्याची जीवनदृष्टी यांचं नातं सांगता सांगता गुरुदत्तचा करुण अंत टळण्यासाठी काय व्हायला हवं होतं याचाही थोडा अंदाज खोपकर देतात. आत्मनाशाच्या प्रेरणेविषयी फ्रॉईडनं जे मनोविश्लेषणात्मक विवेचन केलं आहे त्याचाही आधार ते घेतात, आणि आपल्या अंतर्मनाला गुरुदत्त का स्पर्श करू शकतो हेही सांगतात.

सरतेशेवटी हेही नोंदलं पाहिजे की निव्वळ गुरुदत्तचे सिनेमे कळण्यासाठी पुस्तक उपयोगी नाही तर त्याचं मूल्य त्याहून खूप अधिक आहे. आंतरजालावर आणि बाहेरही आज अनेक जण चित्रपट किंवा पुस्तक यांचं रसग्रहण करणारे लेख लिहीत असतात. त्यांना पुष्कळ स्तुतीही अनुभवायला मिळते. पण तीमुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याऐवजी ज्यांना सखोल आणि सघन रसग्रहणात्मक लिखाण कसं करावं याचे धडे हवे असतील, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ आहे. असं लिखाण करण्यासाठी जो चौफेर अभ्यास लागतो तो कसा हवा, हेसुद्धा त्यात दिसेल. निव्वळ ‘टाईमपास’ करण्यासाठी पुष्कळ चित्रपट/पुस्तकं जगात असताना गंभीर चित्रपट/पुस्तकं यांच्याकडे का वळावं, याचंही उत्तर कदाचित त्यात मिळू शकेल.

पुन्हापुन्हा वाचावंसं वाटणारं, प्रत्येक वाचनात एखादा सुहृद भेटल्याचा अनुभव देणारं आणि काहीतरी नवीनही उलगडून दाखवणारं हे पुस्तक अभिजात मराठी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट करण्याला मला तरी काही पर्याय दिसत नाही.

गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका
लेखक : अरुण खोपकर
प्रकाशक : लोकवाङमय गृह
बुकगंगाचा दुवा

समीक्षेचा विषय निवडा

मस्त कलंदर Thu, 30/07/2015 - 19:03

लेख आवडला. पण सुरूवात होताहोताच संपल्यासारखा वाटला. कदाचित मी त्या अपेक्षेने वाचायला घेतला असल्यानेही तसं वाटलं असेल.

घाटावरचे भट Fri, 31/07/2015 - 11:25

In reply to by मस्त कलंदर

>>लेख आवडला.
सहमत.

>>पण सुरूवात होताहोताच संपल्यासारखा वाटला. कदाचित मी त्या अपेक्षेने वाचायला घेतला असल्यानेही तसं वाटलं असेल.
लेखाने पुस्तकाबद्दलच्या अपेक्षा वाढवण्याचे काम चोख केलेले आहे. किंबहुना हा लेख कुठल्याही अपेक्षेने वाचण्यापेक्षा लेख वाचल्यानंतर वाचकाने पुस्तक वाचणे लेखकास अपेक्षित असावे असे दिसते.

राजेश घासकडवी Sat, 01/08/2015 - 11:06

लेख आवडला. खोपकरांच्या लेखनाचा मी चाहता आहे. चित्रव्यूह आणि चलत्-चित्रव्यूह ही दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकाची मांडणी पाहूनही चित्रभाषेची जाण ठेवून हे पुस्तक तयार केलेेलं आहे हे जाणवतं. त्या दोन पुस्तकांचीही तोंडओळख, थोडी ऐसपैसपणे, करून द्यावी ही विनंती.

चिंतातुर जंतू Mon, 03/08/2015 - 11:48

In reply to by राजेश घासकडवी

>> त्या दोन पुस्तकांचीही तोंडओळख, थोडी ऐसपैसपणे, करून द्यावी ही विनंती.

म्हणजे ह्यापेक्षा अधिक ऐसपैसपणे?
अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण