Skip to main content

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!

2 minutes

“जनाब, मुंबई कि फ़ैशन और कश्मीर का मौसम, बदलने देर नही लगती”. आमच्या गाडीने जवाहर टनेल ओलांडला आणि काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला. तापमान ३० डिग्री वरून थेट १० डिग्री वर घसरलं होतं. काश्मीर मध्ये पोचल्याचा आनंद आमच्या चेह्ऱ्यावर पसरला आणि ड्रायवरने तो अचूक टिपला. जम्मू ते श्रीनगर प्रवास तसा लांबचा पण नेत्रसुखद. “ये हसीं वादियाँ , ये खुला आसमाँ ” अक्ख्या प्रवासभर मनात वाजत असतं. नेत्रसुखद प्रवास आणि गप्पिष्ट ड्रायवर यापेक्षा अजून काय हवं. त्यातून आम्ही मुंबईचे म्हणजे बच्चन आणि खान यांच्या गावचे. त्यामुळे त्याला आमचं अप्रूप जास्त. संभाषणाची गाडी वेगवेगळ्या रुळांवरून भरधाव जात होती. “तुम्हारा समुंदर तो हमारे पहाड , तुम्हारे आम तो हमारे सेब, तुम्हारी ट्रेन तो हमारा शिकारा, तुम्हारी कटिंग चाय तो हमारा कावा असं बोलता बोलता गाडी एका चेकपोस्टपाशी थांबली तो उद्गारला “लो आ गयी ‘तुम्हारी’ मिलिटरी!!!”. मी चपापलो. गाडी पुढे निघाली. मिलिटरीचा विषय आला आणि त्याच्या शब्दांना धार चढली. त्याच्या लेखी मिलिटरी होती, वेळी-अवेळी गावात घुसून घरादाराची झाडाझडत घेणारी, तरण्याबांड पोरांना संशयाखाली उचलून नेणारी, त्याच्या रोजच्या जगण्यावर लक्ष ठेवून असलेली, त्याची “आझादी” संपवणारी , “तुम्हारी मिलिटरी”. आपल्यासाठी हे सारं नवीन असतं. मिलिटरीचं वर्णन पण आणि त्याचं दुःक्ख पण. त्यालाही ते कळलेलं असतं तो एवढंच म्हणतो, “जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो”.

तो पुन्हा पुन्हा भेटत राहतो काश्मीरच्या अक्ख्या प्रवासात. कधी कावा पिताना, कधी सफरचंद खाताना. ‘अमन कि आशा’ त्यालाही असते पण त्यामागची किंमत गेली अनेक वर्षं तो चुकवत असतो. पर्यटन वाढतं, त्याला रोजगार मिळतो, नवीन संधी मिळतात पण तरीही जुन्या, खोलवर झालेल्या जखमांचे घाव भळभळत राहतात.

गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगरावर उभं राहून जेव्हा तो दाखवतो “वो है पाकिस्तान दाये तरफ और बायें तरफ उस पार आझाद कश्मीर!!” आपल्याला कसनुसं होतं. पाकव्याप्त काश्मीर आपण शिकलेलो असतो ते अचानक आझाद कश्मीर बनून समोर येतं. वर्षानुवर्षं शिकलेला इतिहास, भूगोल सगळं उलटसुलट होऊन समोर येत राहतं. पोम्पोरेचं केशर घेऊन, सोपोरे ची सफरचंद खात, गुलमर्गमध्ये काढलेले बर्फाळ ‘slefies’ बघत आपण परतीच्या प्रवासाला लागतो. मनात मात्र त्याचं वाक्य घुमत असतं, “जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो”. खास काश्मीरचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा यायला आपण काही दिलीप पाडगावकर नसतो. आपल्यापुरता आपण काश्मीरचा प्रश्न संपवलेला असतो. त्यासाठीच तर आपल्याला शिकवलेला असतं, “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दूध मंगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे”

-अभिषेक राऊत

Node read time
2 minutes

मिसळपाव Mon, 20/04/2015 - 21:14

“जनाब , आप तो कश्मीर देखनेको ....

....या चालीवर सांगायचा मोह आवरत नाहीये - "मित्रा, तू ईथे लेखन करायला येतोस, कधी कोणाला प्रतिक्रीया द्यायला पण येत जा" !!

Abhishek_Ramesh_Raut Mon, 20/04/2015 - 21:20

@ मिसळ्पाव हाहाहा आवडलंय हे आपल्याला. अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं तर ऐसी वर प्रतिक्रिया देण्याचे 'शास्त्र' मला अजून उमगलं नाहीये. इथे लेखन करणे हे प्रतिक्रिया देण्यापेक्षा सोप्पे आहे असं एकंदर मत आहे माझं :D :D

रेड बुल Tue, 21/04/2015 - 15:21

In reply to by Abhishek_Ramesh_Raut

इथे लेखन करणे हे प्रतिक्रिया देण्यापेक्षा सोप्पे आहे असं एकंदर मत आहे

स्वगतः- अजुन मारमीक श्रेणी कशी देली गेली नाही आपल्या॑ प्रतिसादाला :)

रेड बुल Tue, 21/04/2015 - 17:39

In reply to by बॅटमॅन

=))

मला राउत भाउंचे म्हणने खरंच पटले. अक्षरश: कसलेही लिखाण घेउन धागा काढता येउ शकतो कारण धाग्याच्या श्रेणीकडे कोणीच लक्ष देत नाही. पण प्रतिसादांचे मात्र तसं नाही... त्याचे अत्यंत हिरीहीरीने फटाफट श्रेणीकरण घडुन कधी ते श्रंक होतील सांगता येत नाही. हे ऐसीचे वास्तव आहे. थोडक्यात राउत भाउंना मर्म कळाले आहे.

बघा हा प्रतिसाद श्रंक झालाच. हेच विचार मी धागा म्हणून लिहले असते तर अनाकलनीय लोकांकडुन उगा पांचट प्रतिक्रीया सोडल्या तर एकुणच साधक-बाधक चर्चा झडली असती. पण मी प्रतीसाद लिहला असल्याने लगेच तो निरर्थक, भडकौ, अवांतर क्याटेगोराइज होतो. :) थोडक्यात राउत भाउ म्हणतात त्याप्रमाणे ऐसी वर प्रतिक्रिया देण्याचे 'शास्त्र' उमगणं फार महत्वाचे आहे.

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 17:46

In reply to by रेड बुल

अगदी अगदी...फक्त एक दुरुस्ती करेन ती म्हणजे अशी की "ऐसी-कंप्लायंट प्रतिक्रिया देण्याचे शास्त्र उमगणे आवश्यक आहे."

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 15:31

In reply to by आदूबाळ

हाहाहा, वसाहतीकरण करूनच्या करून मीक म्हणवून घेतले की झाले. ;) वैसेभी त्यांनी अर्थ तूर्त तरी इनहेरिटवली आहे ती आहेच.