गीतरामायण ६० वर्षांचे झाले.
उद्या १ एप्रिलला आपणा सर्वांच्या सुपरिचित अशा ’गीतरामायण’ ह्या गदिमालिखित आणि सुधीर फडकेदिग्दर्शित गीतमालिकेचा हीरक महोत्सव आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या पुणे आकाशवाणी केन्द्राने १ एप्रिल १९५५ ह्या दिवशी ’स्वयें श्रीरामप्रभु ऐकती’ ह्या गाण्याने ह्या मालिकेचा प्रारंभ केला आणि एक वर्ष आणि ५६ गीतांनंतर १७ एप्रिल १९५६ ह्यादिवशी तिच्यातील शेवटचे गीत ऐकवले गेले. पुणे आकाशवाणीचा तो पहिला लक्षणीय उपक्रम होता. ह्या विषयावर आता वर्तमानपत्रांमधून दरवर्षीप्रमाणेच लेख येतील. येथे मी गीतरामायणाच्या माझ्या काही वैयक्तिक आठवणी लिहीत आहे.
पहिले गीत शुक्रवार १ एप्रिलला ऐकवले गेले हे वर लिहिलेच आहे. हे पहिले गाणे सकाळी रेडिओवर मी ऐकले आणि गाण्याचा कसलाहि कान नसलेल्या मला ते अतिशय आवडले. तदनंतर दर शुक्रवारी साडेआठला पुढचे गीत ऐकायचे हा नित्याचाच कार्यक्रम होऊन बसला. मला निश्चित आठवत नाही पण बहुधा शुक्रवारी आणि पुन: रविवारी असे आठवडयातून दोनदा एक गाणे प्रसारित केले जाई. पुण्याचा ’केसरी’ दर आठवड्याचे गीत छापत असे आणि माझे आजोबा ते गीत कापून ठेवीत असत. अशा कात्रणांची चळत पुढची कित्येक वर्षे घरात होती. पुढे ती कोठे गेली आठवत नाही.
गीतरामायणाच्या यशामध्ये कवि गदिमा, संगीतदिग्दर्शक सुधीर फडके आणि अन्य अनेक प्रथितयश गायक-वादक ह्यांचा वाटा आहेच आणि त्याचा जागोजागी उल्लेख सापडतो. माझ्या मते मालिकेने जनमानसाची पकड घेण्यामध्ये अजून एका व्यक्तीचाहि उल्लेखनीय भाग होता पण ते नाव मात्र आता पूर्ण विस्मरणात गेलेले दिसते. प्रत्येक गाण्याच्या प्रारंभी आत्तापर्यंत होऊन गेलेल्या घटना आणि पुढे काय येणार आहे असे सांगणारे सुमारे पाच मिनिटांचे निवेदन, त्यानंतर गाण्याच्या शब्दाचे गद्यमय वाचन आणि तदनंतर १५ ते २० मिनिटे संगीतबद्ध गाणे असा प्रत्येक कार्यक्रमाचा साचा होता. ह्यामध्ये प्रारंभीचे निवेदन आणि गानवाचन शरद जोशी नावाचे एक आकाशवाणीचे स्टाफ आर्टिस्ट करीत असत. त्यांचा आवाज आणि वाचण्याची शैली ह्यांचेहि खूप चाहते होते आणि तेव्हा अनेक वेळा तसे उल्लेखहि ऐकलेले आहेत. नंतर गीतरामायणाचे सार्वजनिक कार्यक्रम होऊ लागले तेव्हा शरद जोशींचा आवाज आणि त्यांचे निवेदन दोन्हींना स्थान राहिले नाही आणि ते नाव कालानुक्रमाने विसरले गेले. माझ्या मते गीतरामायणाच्या आरंभीच्या यशामध्ये शरद जोशींचा वाटा होता. तो कोठेतरी नोंदवला जावा असे वाटले म्हणून हा मुद्दाम उल्लेख. आकाशवाणीच्या अन्य काही एका कार्यक्रमाच्या संदर्भात शरद जोशी सातार्यास आले होते तेव्हा त्यांचे चाहते त्यांच्याशी बोलण्यासाठी आवर्जून तेथे आले होते अशी एक आठवण आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सुगम संगीत गायनासारखे कार्यक्रम होत असत तेव्हा पुण्याच्या अनेक चौकांतून असे कार्यक्रम मी ऐकलेले आहेत.
एक लक्षणीय वैयक्तिक संदर्भ नोंदवतो. माझे मेव्हणे डॉ गोपाळ मराठे हे गेली ४५ वर्षे कॅलिफोर्नियामध्ये फॉण्टाना नावाच्या गावात राहतात. ते व्यवसायाने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत पण त्यांना सुगम संगीत आणि तदनुषंगिक कलांमध्येहि चांगली गति आहे. गेली ३५ वर्षे ते आणि शोभा आंबेगावकर ह्या त्यांच्या सहकारी असे दोघे गीतरामायणाचे कार्यक्रम करीत आले आहेत. असे शंभराहून अधिक कार्यक्रम त्यांनी अमेरिका-कॅनडाच्या जवळजवळ सर्व शहरांमधून केले आहेत. स्वत: सुधीर फडके ह्यांनीहि हे गायन ऐकून त्याची प्रशंसा केली होती. कार्यक्रम विनामूल्य असतात पण श्रोते स्वेच्छेने काही देणग्याहि देतात. ह्या सर्व देणग्यांची रक्कम भारतामध्ये दुर्गम भागांमध्ये चालविल्या जाणार्या ’एकल’ शालाप्रकल्पाकडे पाठविली जातो.
आता ३५ वर्षानंतर ह्या मार्च-एप्रिलमध्ये शेवटचे कार्यक्रम करून डॉ गोपाळ मराठे श्रोत्यांचा निरोप घेणार आहेत. तदनंतर कार्यक्रमाची सूत्रे त्यांच्या शिकवणुकीतून तयार झालेल्या त्यांच्या पुढच्या दुसर्या आणि तिसर्या पिढीकडे जाणार आहेत.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लेखाबद्दल धन्यवाद. बाबूजींची सगळीच गाणी ही कानसेनांसाठी एक पर्वणीच आहे.
या निमित्ताने युट्यूबवरील हा दूवा