"डोलचंद्रा हलकटा" ल्याटिनी नामे वनौषधी जाणा !
रोजच्या प्रभात फेरीत ,घराजवळच्या तलावाकाठी वृक्षदेवता आमच्यावर सुवर्णपुष्प किंवा धवलपुष्प वृष्टी करते, पक्षी किल्बिलून संगीत संमेलन सुरु करतात आणि सुगंधी फुलांचा परिमळ लेवून हवेच्या शीतल झुळुका आमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत करतात .(इथे आम्ही कोण म्हणून पुसून अपमान करून घेऊ नये .लक्ष्मीनारायणाच्या रुपात दर्शन देऊन आम्ही दर्शनेच्छुंना उपकृत करत असतो .) आमच्या मित्राचा पुष्पवृष्टीमुळे फार जळफळाट होतो , कारण तो कोणत्याही प्रहरी घराबाहेर निघाला तरी, ती कावळ्यांची त्याच्या शर्टावर शीटायचीच वेळ असते . असतं एकेकाचं नशीब ! त्यामुळे आमच्या 'निर्मल' आनंदात अतोनात भर पडते हे वेगळे सांगणे न लगे !
जेहत्ते काळाचे ठायी, मेळघाटाच्या जंगलातून एकदा रिमझिम पावसात गाडीतून जाताना ,तुकोबांनी वर्णिलेली आमची सोयरी वृक्षवल्ली साद घालून भेटायला बोलावीत होती .वनातल्या बहुतांश आदिम आप्तांची नावे आम्हाला ठाऊक नव्हती .रोज प्रभात फेरीत दिसणारी सगळी झाडं ओळखता यावी म्हणून अभ्यासच करावा लागेल, कारण इथं उपजत ज्ञानाचा सुद्धा आमच्याकडे तुटवडा आहे.आम्ही अज्ञानाच्या अंधःकारमय जीवनात खितपत पडून रहाणे नियतीला मंजूर नव्हते . त्यामुळे वनौषधींचा अभ्यास करण्यासाठी मेळघाटात जाणाऱ्या एका अभ्यासू गटात आमचा आपोआप समावेश झाला . आणि आम्ही वनवन फिरायला तयार जाहलो .
मधुकर वणवण फिरत करी गुंजारवाला ………।
वनौषधींच्या अभ्यासासाठी पुणे , नागपूर आणि अमरावतीच्या एकूण २५ जणांचा आमचा गट ऑक्टोबरच्या टळटळीत उन्हात मेळघाटात गेला होता . यात पुण्याच्या आयुर्वेद कॉलेजचे प्राध्यापक , संशोधक होते आणि वैद्यकी करणारी उत्साही मंडळी होती . त्यात आमच्यासारखे २/४ चुकार लोकही वनौषधी आणि वृक्ष ओळख करून घ्यायला कुतूहलाने दोन दिवस सहभागी झाले होते . आमचे मार्गदर्शक वनगुर्जी हे सफारीवेषधारी, हसतमुख,उत्साहाने ओतप्रोत आणि १४ वर्षे मेळघाटात काम केलेले जाणकार ,निवृत्त वनाधिकारी होते. मेळघाटाच्या पायथ्याशी अचलपूर आणि परतवाड्यापासुन आमच्या वृक्ष परिचयाला सुरुवात झाली . एका रस्त्यालगतच्या वृक्षाजवळ आमचे वनगुर्जी उभे ठाकले आणि त्यांनी ल्याटिन भाषेत आरोळी ठोकली .
डोलसेन्ता फलकाटा ! ( किंवा तत्सम ! ) आम्ही भयंकर दचकलो .
आमच्या सोबत असलेला शाहीद कपूर सारखा दिसणारा देखणा संशोधक हळूच मित्राला म्हणे आपण हे ल्याटिन नाव " डोलचंद्रा हलकटा " असे लक्षात ठेवू . शाहीद कपूरवर तात्काळ आमचा लोभ जडला .वनगुर्जी प्रथम ल्याटिनात आरोळी ठोकायचे मग त्या वृक्षाची संस्कृत नावं आणि स्थानिक नावं सांगत ज्ञानामृताने आमचे रिकामे मडके भरू लागले . व्याघ्रनखी ,रुद्रवंती, इंद्रवारुणी,मयुरशिखा ,सारिवा,मेषशृंगी ,नागबला, श्वेतबला अशी वृक्षांची कैक रोमांचक नावं कानात मधाचे थेंब पडावे तशी ठिपकू लागली .
वनगुर्जीकडे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत सर्वांगीण वनौषधीचा इलाज उपलब्ध आहे .कॅन्सरपासून डोक्यावरच्या चाई पर्यंत कुठलाही रोग ते चुटकीसरशी बरा करतील अशी खात्रीच थोड्यावेळाने आम्हाला होऊ लागली . आमचे पतीदेव पुटपुटले,' यांच्याकडे पोट कमी करायची कोणती वनौषधी आहे ते विचारतो आणि मग तुम्ही ती का घेत नाही असे हळूच पुसतो ' . वनगुर्जी प्रांजळ आहेत , एक वनौषधी व्यसन कमी करते पण माझ्यावर तिचा परिणाम झाला नाही असे कबूल करताना त्यांनी पानाची एक प्रदीर्घ पिचकारी मारली . संध्याकाळी सेमाडोहला मुक्काम होता . तिथे वनगुर्जींनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन देऊन एकदम माहितीचा स्फोट केला . भोजनोत्तर आणखी शंका समाधानाचा कार्यक्रम होता पण आम्ही निःशंक मनाने निद्राधीन झालो .वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या एक अवलिया गुजराथी सोबत्याला झाडांचे भरपूर ज्ञान होते ,त्याने एक अदभूत तेल तिथे आणले होते . रुमालावर तेलाचे दोन थेंब टाकून त्याचा वास घेण्यास तयार झालेल्या मंडळींना एकदम किक बसून अद्वितीय आनंदाची प्राप्ती झाल्याचे कळले . कोजागिरी निमित्त हौशी लोकांसोबत १२ वाजता दुग्धपान साजरं केल्यावरच वनगुर्जी झोपले .
सुप्रभाती आमच्या 'कारवी' नावाच्या कॉटेजसमोरचा सिपना नदीकाठाचा धुक्याने अवगुंठीत परिसर स्वप्नील भासला . दर सात वर्षांनी फुलणारी सुरेख ,जांभळी 'कारवी ' ची फुले मेळघाटाची शोभा वृद्धिंगत करत होती . सेमाडोह परिसरातले पर्यावरणातून विलुप्त होत असलेले अजान वृक्ष दाखवताना आमचे वनगुर्जी दुख्खी झाले . जंगलात दिशादर्शन करणारे मुंग्यांचे वारूळ कसे इंजिनिअरिंग मार्व्हल आहे ते त्यांनी दाखवले . चिखलदर्याला जाताना घाटातल्या रानभाज्या केना, कुर्डू , आघाडा पाहिल्या . केना कुर्डूची भाजी लहानपणी चातुर्मासाच्या सुफळ 'संप्रूण' कथेत वाचली होती. रान अंजीर , देवधान ( तांदूळ ) ,रान तीळ , जिरं अशी धान्ये , भुईउंबर , तोरणमाळ अशी विविध फळझाडे आणि त्यांचे औषधी गुण सांगताना वनगुर्जी थकले नाहीत . लाजाळूची वनस्पति पाहताना शाहिद कपूर जगाला विसरला आणि कुरवाळून त्याने त्या झाडाचे पान न पान लज्जित करून सोडले . चकित होऊन पहाणार्या मित्राला तो म्हणाला ,' लाजाळू वस्तूंना हात लावायला मला खूप आवडतं ' . त्याचा मोहक निरागसपणा पाहून आम्ही हसू प्रयत्नपूर्वक दाबले . पण खुसुखुसु येतचं होतं मेलं . राखीव जंगलात एक 'भुलन वेल' असून तिच्या जवळून गेले तर स्मरणशक्ती काहीवेळ काम करेनाशी होते आणि काही लोक ३६ तास भरकटतात वगैरे अदभुत कथा सांगून वनगुर्जींनी मनोरंजन केले . अनुभव घ्यायला आमचे मन उचंबळू लागले,पण राखीव जंगलात फक्त संशोधक आणि वनाधिकारीच जाऊ शकतात म्हणे . आमच्या प्रभात फेरीत सध्या फोफावून दिसणारी वनस्पति मुत्री तुळस आहे हे जाणून धन्य झालो. शेवटी त्यांनी एक गुगंध नावाची त्याच वासाची वनस्पतीही दाखवली आणि त्याचा उपयोगही सांगितला . वनगुर्जी काही झाडे ओळखण्यासाठी पाने चुरगळून त्याचा गंध घेत होते , चव घेत होते . ते जंगलात आकंठ मुरले होते .
सर्पदंश , रक्तगुल्म , मुळव्याध , शांत झोपेसाठी एवढेच नव्हे तर हेअर रिमुव्हर म्हणून उपयोगी वनौषधी सुद्धा आहेत . ज्योतिष्मती तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खाल्ले कि मती यानेकी बुद्धी चांगली होते . वनगुर्जींनी त्यांच्या मुलांना ते दिल्याने आज ते दोघेही आयुर्वेदिक डॉक्टर झाले आहेत . ( पुराव्याने शाबित ! आहात कुठ ? ) दोन दिवसात जेवढे ज्ञान प्राप्त करणे शक्य झाले तेवढे घेतले पण चेहेर्यावरच्या हलकटपणासाठी आयुर्वेदिक उपाय जाणून घ्यायचा राहिलाच ! करण थापर सारख्या काही लोकांना आम्ही स्वखर्चाने या वनौषधी पाठवल्या असत्या हो , आयशप्पथ !
भोजनोत्तर आणखी शंका समाधानाचा
भोजनोत्तर आणखी शंका समाधानाचा कार्यक्रम होता पण आम्ही निःशंक मनाने निद्राधीन झालो .
लयभारी वाक्य. झोपण्यापूर्वी सर्व प्रकारच्या शंका संपवून निःशंक होणं केव्हाही चांगलं.
पण चेहेर्यावरच्या हलकटपणासाठी आयुर्वेदिक उपाय जाणून घ्यायचा राहिलाच !
हलकटपणावर उपाय नाही हे बरं आहे, नाहीतर उसंत सखूंचं असलं भन्नाट लेखन कसं वाचायला मिळणार?
:)
:)
आमचे पतीदेव पुटपुटले,' यांच्याकडे पोट कमी करायची कोणती वनौषधी आहे ते विचारतो आणि मग तुम्ही ती का घेत नाही असे हळूच पुसतो
ह्ल्कट ;)
.
.
लाजाळूची वनस्पति पाहताना शाहिद कपूर जगाला विसरला आणि कुरवाळून त्याने त्या झाडाचे पान न पान लज्जित करून सोडले . चकित होऊन पहाणार्या मित्राला तो म्हणाला ,' लाजाळू वस्तूंना हात लावायला मला खूप आवडतं '
=))