'शिस'पेन्सिलीची कुळकथा

'शिस'पेन्सिलीची कुळकथा

लेखक - प्रभाकर नानावटी

रोजच्या वापरातली कवडीमोलाची ती शिसपेन्सिल; तिच्याबद्दल काय विशेष वाचायचे, असे म्हणत तुम्ही हा लेख भरभर स्क्रोल कराल. परंतु हे उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे एक उत्पादन आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही. सामान्यपणे ४०-४५ किलोमीटर लांबीची रेघ ओढू शकणारी, ४५००० शब्द लिहू शकणारी, १७ वेळा टोक करून घेणारी व जगातील कुठल्याही तालवाद्यावर अनंत काळ वाजवण्याची क्षमता असलेली शिसपेन्सिल, ही आधुनिक जगातील खरडायचे एक अविभाज्य साधन म्हणून मिरवत आहे. दर वर्षी सुमारे १४०० कोटी पेन्सिलींचा खप होत असून जगातील लाखो कलाकारांना, लेखकांना शिसपेन्सिलीने मोहिनी घातली होती व अजूनही घालत आहे.

पेन्सिल
अगदी लहानपणापासून लिहिण्यासाठी वा रेखाटनासाठी म्हणून आपण वापरत असलेल्या शिसपेन्सिलीचा शोध नेपोलियनच्या दरबारातील निकोलास्-जॅक्स कोन्ते (Nicolas-Jacques Conté) या वैज्ञानिकाने १७९५ मध्ये लावला. खरे पाहता शिसपेन्सिलीमध्ये शिसे या धातूचा वापर होत नसतानासुद्धा आपण तिला अजूनही या चुकीच्या नावानेच ओळखतो. पेन्सिलीचे लिहिणे मुख्यतः तिच्या गाभ्यात असलेल्या ग्राफाइटमुळे होते. ग्राफाइट हे कार्बन या मूलद्रव्याचे एक रूप आहे. १५ व्या शतकात जर्मनीतील बव्हेरिआ (Bavaria) या ठिकाणी ग्राफाइटच्या खाणी सापडल्या. प्रारंभीच्या काळात ग्राफाइटलाच शिसे समजून कारागीर ते पाण्याच्या पाइपच्या दुरुस्तीसाठी वापरत होते. ग्राफाइटला त्या वेळी ’plumabago’ उर्फ ’काळे शिसे’ या नावाने ओळखत असत. त्यावरूनच plumber हा शब्द व्यवहारात रूढ झाला.

ग्राफाइट हा ग्रीक भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘लिहिणे’ असा होतो. पुरातन काळातील अझ्टेक संस्कृतीच्या काळीसुद्धा ग्राफाइटने लिहिले जात होते. पेन्सिलीसारखेच लिहिण्याचे साधन म्हणून रोमन्स कोरलेखणीचा (स्टायलस) वापर करत असत. स्टायलसच्या गाभ्यात शिसे भरत असत. कागदासारख्या असलेल्या पपायरसवर (papyrus) स्टायलसने लिहिल्यानंतर अक्षरे वा चित्रे उमटत असत. परंतु शिसे विषारी असल्यामुळे फार काळजी घ्यावी लागत असे. ग्राफाइटच्या शोधानंतर ते शिशापेक्षा मऊ व जास्त काळसर असल्याचे कळल्यामुळे त्याच्या कांडीने लिहिण्याचा प्रयत्न होऊ लागला. परंतु ही कांडी लिहिताना वरचेवर मोडत होती. म्हणून त्या ग्राफाइटच्या कांडीला दोरीत गुंडाळून लिहिण्यात येऊ लागले. त्यानंतर लाकडी नळीच्या आवरणात घट्ट बसवलेल्या पेन्सिली बाजारात आल्या व त्यांत अजूनही बदल झालेला नाही. (लिहिताना 'लेड' पकडून ठेवण्यासाठी यांत्रिक [क्लच] पेन्सिलीत लाकडी आवरणाऐवजी वेगळी यंत्रणा असते. यात टोक करण्याची गरज नसते; फक्त लेड बदलावे लागते.) ‘पेन्सिल’ हा शब्दसुद्धा शेकडो वर्षांपूर्वीपासून वापरात होता. त्याचा अर्थ ‘लांब शेपूट’ असा होतो व हे नाव मध्ययुगात रंगचित्रांसाठी वापरत असलेल्या कुंचल्यामधील लांब केसांवरून पडले होते.

आपल्या देशातील ग्राफाइटच उच्च प्रतीचे आहे अशी अफवा इंग्रजांनी पसरवल्यामुळे १६ व्या शतकात ग्राफाइटची तस्करी होऊ लागली. त्यातून काळा पैसा तयार होऊ लागला. तस्करी रोखण्यासाठी खाणीवर रात्रंदिवस पहारा ठेवला जाऊ लागला. पेन्सिलीच्या उत्पादनासाठी जेवढे हवे तेवढेच ग्राफाइट खाणीतून काढले जात असे व नंतर कुणीही खाणीत प्रवेश करू नये म्हणून खाणीत पाणी भरून ठेवले जात होते. नंतरच्या काळात खाणींच्या भोवती मोठ्या प्रमाणात पेन्सिलींचे कारखाने उभे राहू लागले. पेन्सिल उत्पादनाचा फार मोठा उद्योग १८ व्या व १९ व्या शतकांत होता. १८३२ साली सुरू झालेल्या कंबरलँड पेन्सिल कंपनीने १७५ वर्षे पूर्ण केली. आता जरी इंग्लंडमधील खाणी बंद पडल्या असल्या, तरी श्रीलंका व इतर देशांतून ग्राफाइटची खरेदी केली जाते व पेन्सिलीचे उत्पादन होत असते.

१६६२ मध्ये जर्मनीत पेन्सिलीच्या उत्पादनाला सुरुवात झाली. पुढील काळात Faber Castell, Lyra, Steadtler या कंपन्या नावारूपाला आल्या. १८१२ च्या सुमारास अमेरिकेत पेन्सिलींचा प्रवेश झाला व काही वर्षांत पेन्सिलींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अमेरिकेतले कारखानदार चीनमधून ग्राफाइटची खरेदी करत होते. बाजारातील तीव्र स्पर्धेमुळे, अमेरिकन पेन्सिलीच उत्तम दर्जाच्या आहेत, असे म्हणत ते चीनच्या राजघराण्याचा हवाला देत होते. चीनच्या सम्राटांचा आवडता पिवळा रंग पेन्सिलींना देण्यात येत होता. अजूनही याच रंगाच्या पेन्सिलींचा खप जास्त आहे. अमेरिकेतील उत्पादकांशी स्पर्धा करण्यासाठी युरोपमधील उत्पादक ‘कोहिनूर’ या भारतातील सम्राटांच्या हिर्‍याच्या नावाने पेन्सिलीची जाहिरात करू लागले. परंतु आता पिवळा रंग किंवा कोहिनूर नाव हे इतके सवयीचे झाले आहेत की त्यामागे राजे-महाराजांचे नाव होते हेसुद्धा आपण विसरलो आहोत.

पेन्सिलकोन्ते यांनी शोधलेल्या पेन्सिल तयार करण्याच्या प्रक्रियेतसुद्धा फार बदल झालेला नाही. कोन्ते यांच्या प्रक्रियेत १९०० डिग्री फॅरनहीट (१०४० डि. सें.) पर्यंत तापलेल्या भट्टीत पाणी, माती व ग्राफाइटचे मिश्रण काही काळ ठेवले जाते. नंतर या मिश्रणाच्या नळकांड्या करून लाकडाच्या आवरणात घट्ट बसवल्या जातात. लाकडी आवरण सामान्यत: गोल किंवा षट्कोनी आकाराचे असते. लाकडी आवरणाला योग्य प्रकारचे रंग देऊन व हव्या त्या मापात कापून टोकाला खोडरबर घट्ट बसवले जाते. (पेन्सिलीत खोडरबर वापरण्याची कल्पना १६० वर्षांपूर्वीची आहे). पेन्सिलीसाठी वापरण्यात येणारे लाकूड इन्सेन्स सीडर (incense cedar) या झाडापासून मिळते. जगभर याच झाडाचे लाकूड पेन्सिलीच्या उत्पादनासाठी वापरले जाते.

मिश्रणातील माती व ग्राफाइटच्या प्रमाणावर पेन्सिलीमधील शिशाचा टणक/मऊपणा अवलंबून असतो. या गुणधर्मानुसार पेन्सिलींची वर्गवारी केली जाते. ही वर्गवारी 9B ते 9H अशा सुमारे 20 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. HB ही त्यांतील मध्यवर्ती व सर्वात लोकप्रिय श्रेणी आहे. यातील H (hardness) अक्षर हे टणकपणा व B (Blackness) काळसरपणा दाखवते. B ची संख्या जास्त असल्यास कागदाला चिकटणारा ग्राफाइट जास्त प्रमाणात असतो व त्यामुळे ते अधिक ठळक दिसते. F (Fine point) श्रेणीची पेन्सिल चित्रांच्या रेखाटनापेक्षा लिहिण्यासाठी अधिक वापरली जाते.
पेन्सिलीचे काळे नक्की उमटते तरी कसे, ते आता आपण पाहू.

रेणु रचनाग्राफाइटमध्ये कार्बनचे सहा अणू एका नियमित षटकोनाच्या टोकांवर रचलेले असतात. लगतच्या षटकोनांत एक बाजू सामायिक असते. अशा असंख्य सलग षटकोनांनी बनलेल्या प्रतलांचे एकावर एक रचलेले थर म्हणजेच ग्राफाइटची संरचना होय. एकाच थरातील अणूंपेक्षा दोन लगतच्या थरांतील अणूंत अतिशय कमी आकर्षणबल असते. त्यामुळे जेव्हा बाहेरून बल लावले जाते, त्यावेळी हे थर एकमेकांना समांतर असे सहज घसरू लागतात. याच गुणधर्मामुळे पेन्सिल कागदावर फिरवताना हे थर सहज विलग होऊन कागदावर उतरतात व आपल्याला काळे उमटलेले दिसते. याच कारणामुळे वंगण (lubricant) म्हणूनही ग्राफाइट वापरले जाते. गंमत म्हणजे याच कार्बनच्या अणुरचनेची पुनर्मांडणी केल्यास त्यातून सर्व पदार्थांत कठीण असलेल्या हिर्‍याचीही रचना होऊ शकते.

पेन्सिलीने लिहिलेल्या अक्षरांवर दमट हवामान, बहुतेक रसायने वा कालौघ यांचा विपरीत परिणाम होत नाही. ग्राफाइट तोंडात गेले तरी ते घातक ठरत नाही, परंतु पेन्सिलींना दिलेल्या रंगात शिसे असल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त काळसरपणासाठी चारकोल पेन्सिल, मेणाची क्रेयॉनमिश्रित रंगीत पेन्सिल, कागदाव्यतिरिक्त इतर ठिकाणी लिहिण्यासाठी ग्रीज़ पेन्सिल, जलरंग चित्रांसाठी वॉटर कलर पेन्सिल, काही विशिष्ट कामासाठी सॉलिड ग्राफाइट पेन्सिल, असे पेन्सिलींचे वेगवेगळे प्रकार बाजारात आहेत.स्टेनो पेन्सिल या प्रकारात आतील शिसे लवकर तुटत नाही. त्यामुळे डिक्टेशन सलगपणे घेता येते. काही वेळा या पेन्सिलींना दोन्ही बाजूंनी टोके केलेली असतात. डिक्टेशन घेताना बोट दुखू नये म्हणून षट्कोनी आकारातील पेन्सिलीऐवजी गोल पेन्सिल वापरली जाते. याउलट, सुतारकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पेन्सिली षटकोनाच्या आकारात असतात. कारण सुतारकाम करताना गोल पेन्सिली घरंगळत जाऊन कुठेतरी पडून हरवण्याची शक्यता असते.

‘अल्केमिस्ट’ या गाजलेल्या कादंबरीचा लेखक - पाव्लो कोएलो – याच्या ब्लॉगवर पेन्सिलीसंबंधी एक सुंदर कथा आहे. हीच कथा व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भातही सांगितली जात असते.

पाव्लो कोएलोच्या लेखनातून उद्धृतः

पेन्सिलकर्त्यांनी पेन्सिलीला बाहेरच्या जगात पाठवताना -

मी तुला जेव्हा बाहेरच्या जगात पाठवीन, तेव्हा तू पाच गोष्टी लक्षात ठेव. तसे केल्यास एक उत्तम पेन्सिल म्हणून तुझा नावलौकिक होईल.
तुला या बाहेरच्या जगात करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. त्यासाठी तुला तुझा स्वतंत्र बाणा विसरून कुणाचा तरी हात धरण्याचे बंधन घालून घ्यावे लागेल.
प्रत्येक वेळी टोक करताना तुला वेदना होणार. परंतु एक आदर्श पेन्सिल होण्यासाठी तुला हे सहन करावे लागेल.
तू जर चुकलीस तर ती चूक सुधारण्याची क्षमता तुझ्यात असेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू अंतर्भागी सुरक्षित असशील.
कुठलीही परिस्थिती असू दे, तू लिहीत राहिले पाहिजेस. कितीही कठिण काळ असू दे, अगदी स्वच्छ व वाचनीय असे ठसे तू मागे ठेवायला हवेस.
पेन्सिलीला या गोष्टी कळल्या व ती पेन्सिलीच्या पेटीत जाऊन बसली.

पेन्सिलीच्याऐवजी तुम्ही तेथे आहात असे समजून या गोष्टीची दखल घेतल्यास तुम्हीसुद्धा एक चांगली व्यक्ती म्हणून लौकिक कमावू शकता. तुमच्यातही अनेक गोष्टी करण्याची क्षमता आहे; त्या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी आधार हवा व त्यासाठी तुमच्या स्वत:च्या पुढाकाराची गरज आहे; आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल; त्या वेळी न डगमगता त्यांचा सामना करावा लागेल; तुम्हांला तुमच्या चुका सुधारण्याची संधी नक्कीच मिळेल; सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या अंतर्मनात डोकावून बघायला शिकायला हवे. शेवटी, आयुष्याच्या या वाटचालीत तुम्ही मागे ठेवलेल्या खुणाच तुमची ओळख ठरतील. प्रत्येक जण पेन्सिलीसारखाच असतो व जगात वावरताना काही त्याने विशिष्ट कार्याला वाहून घ्यायला हवे.

I Read पाव्लो कोएलोप्रमाणे अनेक कलाकार, लेखक, विचारवंत पेन्सिलीच्या प्रेमात पडले होते. हेन्री डेव्हिड थॉरो (Henry David Thoreau) या तत्त्वज्ञाने वाल्डेन हे पुस्तक पेन्सिलीने लिहिले होते. थॉमस एडिसन वापरत असलेल्या ईगल पेन्सिलीची लांबी फक्त ३ इंच असे व आतील ग्राफाइट नेहमीपेक्षा जास्त मऊ असे. व्लादिमिर नोबोकोव्ह हा रशियन लेखक कादंबर्‍यांचे पुनर्लेखन करता यावे म्हणून पेन्सिली वापरत असे. जॉन स्टाइनबेक (John Steinbeck) या अमेरिकन लेखकाला पेन्सिली वापरण्याचा छंद जडला होता. त्याला रोज ६० पेन्सिली लागत असत. ईस्ट ऑफ एडन ही कादंबरी लिहिण्यासाठी त्याने ३०० पेन्सिली वापरल्या होत्या म्हणे. विन्सेन्ट व्हॅन गॉफ्ह (Vincent Van Gough) हा चित्रकार फेबर कंपनीच्या पेन्सिली वापरून चित्र काढत असे. जॉनी कार्सन(Johnny Carson) हा टुनाइट शो च्या सादरीकरणाच्या वेळी सेटवर पेन्सिलीशी चाळे करत असे व सेटवर त्यामुळे काही अपघात होऊ नये म्हणून पेन्सिलीच्या दोन्ही बाजूला खोडरबर बसवून घेत असे म्हणे. लहान मुलांसाठी गोष्टी लिहिणारा रोआल्ड डाल (Ronald Dahl) हा लेखक रोज टोक केलेल्या ६ पेन्सिली जवळ बाळगत असे, कारण टोक करण्याचा त्याला कंटाळा येई म्हणे.

काही वर्षांपूर्वी लेनर्ड रीड (leonard reed) या लेखकाने ’I, Pencil’ या नावाने पेन्सिलीची आत्मकथा लिहिली होती व ती फार गाजली.
सीडर (cedar), लॅकर (lacquer), ग्राफाइट (graphite), फेरूल (ferrule), फॅक्टिस् (factice), पमिस् (pumice), मेण (wax), डिंक (glue) इत्यादीतून तयार होणार्‍या या उत्पादनामध्ये लाखो कामगारांचा सहभाग आहे. कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसताना व कुठलेही Master Mind नसतानासुद्धा जागतिक पातळीवरील सहकारातून एखादे उत्पादन सहजपणे कसे होऊ शकते हे सांगण्याकरता मिल्टन फ्रीडमन (Milton Friedman) या अर्थशास्त्रज्ञाने ’I, Pencil’चे उदाहरण दिले होते. पेन्सिलीच्या उत्पादनात invisible hand कसा काम करतो, यावर त्याचा रोख होता.
अशी ही आटपाटनगरीतील पेन्सिलीची कुळकथा!

संदर्भ
पेन्सिलीची नीतिकथा
’I, Pencil’
मिल्टन फ्रीडमनचे उदाहरण

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

पेन्सिलची कुळकथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

’I, Pencil’ - प्राईस सिस्टिम कशी सहकार्याचे समन्वयन (coordination) कसे करीत जाते याचे (हा लेख म्हंजे) सुंदर उदाहरण आहे. हा लेख - भांडवलवादाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांसाठी - रिक्वायर्ड रिडिंग असायला हवा.

नानावटी सायबांचे प्रचंड अभिनंदन.

समन्वयाचा(१) प्रश्न हा मूलभूत प्रश्न आहे. समाजात म्हणा, बाजारामधे म्हणा किंवा अर्थव्यवस्थेत म्हणा. स्पर्धा ही वेगवेगळी रूपे धारण करते व अनेकदा ती सहकार्य मिळवण्यासाठी सुद्धा केली जाते (competition for obtaining co-operation). काही वेळा ती स्पर्धा व सहकार्य एकत्र असे रूप ही धारण करते. पण कोणाकडे कौशल्ये, क्षमता व साधनसंपत्ती जास्त आहे याचे संदेशवहन करण्याचे काम प्राईस सिस्टिम करते. प्राईस सिस्टिम ही अशी इन्फर्मेशन सिस्टिम आहे की जी कशी वापरायची याचे ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता नसते (जसे पक्षी उडण्यापूर्वी एरोनॉटिक्स चे ट्रेनिंग घेत नाहीत तशी). ती कशी वापरायची याची जाण व्यक्तीची नकळत विकसित होत जाते. लिओनार्ड रीड ची ’I, Pencil’ ही याच संकल्पनेचे अप्रत्यक्ष विवेचन करते.

यात शिकण्यासारखा धडा हा आहे की - पेन्सिल बनवताना तिचे पार्ट्स कोणाकडून व कुठुन मिळवायचे याची माहीती कोणतेही "नियोजन आयोग" उद्योजकास देत नाही. व पेन्सिली किती बनवायच्या याची आज्ञा सुद्धा देत नाही. तरीही अब्जावधी पेन्सिली बनवल्या जातात.

--

(१) Who has the best skills, resources and incentives to fulfill a particular requirement ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. पेन्सिलचा इतिहास इंग्रजांनी केलेली जाहिरात, plumber शब्दाचं मूळ, या गोष्टी माहीत नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील चित्र जगातील सर्वात जुन्या पेन्सिलीचे आहे. ही सुताराची पेन्सिल असून १७व्या शतकातील एका जर्मन घराच्या छपरामध्ये ती सापडली. ती सध्या Faber-Castell नावाच्या खाजगी संग्रहामध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहीला भाग मला थोडा रुक्ष वाटला पण पाव्लो कोएलो वाला रोचक वाटला. एकंदर लेख वेगळाच अन छान झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर माहिती!

आजतागायत एकदाही पेन्सिल 'संपली' म्हणून दुसरी वापरायला घेतली असे झालेले नाही.

पेन्सिली एकतर हरवतात किंवा त्यांचे शिसे (ग्राफाइट) आतून तुटते, नाहीतर त्या इतक्या लहान होतात की हातात धरता येत नाहीत. पण त्या कधीही 'संपत' नाहीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेन्सिलीची कूळकथा आवडली. पेन्सिल कशी तयार होते, याबद्दल तूनळीवर माहितीपट आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)