इंग्लंड आणि स्कॉटलंड
सध्या स्कॉटलंडने ग्रेट ब्रिटनपासून फारकत घ्यावी काय ह्या विषयाने वृत्तपत्रांचे रकाने भरून वाहत आहेत. त्या अनुषंगाने मुळात हे दोन एकेकाळचे प्रतिस्पर्धी देश एकत्र झालेच कसे ह्याविषयीची इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्यांच्या राजघराण्यांतील गुंतागुंतीची नाती आणि संबधित व्यक्तींचा मनोरंजक इतिहास ह्याबाबतची डोक्यात असलेली बरीचशी अडगळ साफ करण्याचा हा प्रयत्न आहे.
आठव्या हेन्री टयूडरच्या (१४९१-१५४७) सहा बायका. पहिली कॅथेरिन ऑफ आरागॉन. हिला एक मुलगी - मेरी, जिला नंतर ब्लडी मेरी असे उपपद मिळाले. लग्नानंतर चौदा वर्षांमध्ये कॅथेरिन हेन्रीला राजपुत्र आणि राज्याचा वारस देऊ शकली नाही ह्या खर्या कारणासाठी तिला १५३३ मध्ये घटस्फोट देण्यात आला आणि हेन्रीचे मन जडलेली अॅन बुलीन लगेचच राणी झाली. तिची मुलगी म्हणजे एलिझाबेथ (१५३३-१६०३), जी एलिझाबेथ पहिली म्हणून नंतर राज्यावर आली. लग्नानंतर तीन वर्षांत व्यभिचाराच्या कारणासाठी अॅन बुलीनचा शिरच्छेद झाला. तिच्या लवाजम्यामधील जेन सीमोर हिच्यावर हेन्रीचे मन एव्हांना बसले होते आणि अॅन बुलीनच्या शिरच्छेदानंतर लवकरच हेन्रीने जेन सीमोरशी विवाह केला. हेन्रीला हवा असलेला राजपुत्र, जो हेन्रीनंतर सहावा एडवर्ड (१५३७-५३) म्ह्णून राज्यावर आला, तो सीमोरपासून हेन्रीला मिळाला पण लग्नानंतर सव्वा वर्षात त्या बाळंतपणामध्ये जेन परलोकी गेली. तीन वर्षानंतर गुंतागुंतीच्या राजकारणाचा परिणाम म्हणून हेन्रीने अॅन ऑफ क्लीव्ज ह्या युरोपातून आयात केलेल्या राजकन्येशी १५४० मध्ये विवाह केला पण पहिल्यापासून हेन्रीचे तिच्यावर कधीच मन बसले नाही. तिलाहि हेन्रीमध्ये काहीच स्वारस्य नव्हते म्हणून परस्परसहकार्याने हे लग्न घटस्फोटात मोडले. एव्हांना हेन्रीचे लक्ष अॅन ऑफ क्लीव्जच्या लवाजम्यातील कॅथेरिन हॉवर्डवर बसले होते आणि जुलै १५४० मध्ये हेन्री आणि कॅथेरिन हॉवर्ड विवाहबद्ध झाले. विवाहानंतर लवकरच कॅथेरिन हॉवर्डच्या विवाहबाह्य संबंधांवर कुजबूज ऐकू येऊ लागली होती, परिणामत: व्यभिचाराच्या आरोपाखाली १५४२ मध्ये तिचा शिरच्छेद करण्यात आला. १५४३ मध्ये हेन्रीने कॅथेरिन पार हिच्याशी विवाह केला पण तदनंतर हेन्री स्वत:च १५४७ मध्ये मृत्यु पावला.
त्याच्यानंतर १० वर्षे वयाचा राजपुत्र सहावा एडवर्ड राज्यावर आला पण १५५३ साली त्याचा वयाच्या १६व्या वर्षी मृत्यु झाला.
कॅथेरिन ऑफ आरागॉन हिला घटस्फोट देऊन अॅन बुलीनशी लग्न करण्याला पोपची संमति नव्हती ह्या कारणाने हेन्रीने इंग्लंडमध्ये पोपचा अंतिम अधिकार मानण्यास नकार देऊन प्रॉटेस्टंट विचाराला चालना दिली होती आणि सर्व युरोपभर प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक अशी रस्सीखेच सुरू झाली होती. कॅथेरिन ऑफ आरागॉनची मुलगी मेरी ही सहाव्या एडवर्डनंतर वारसाहक्काने राज्यावर आली. ती कट्टर कॅथलिक होती आणि तिच्या पाच वर्षांच्या राजवटीत तिने प्रॉटेस्टंटांचा जो छळ केला आणि कित्येकास यमसदनास पाठविले त्यामुळे तिला ’ब्लडी मेरी’ असे नाव मिळाले. तिच्यानंतर १५५८ मध्ये पहिली एलिझाबेथ राज्यावर आली. तिच्या यशस्वी आयुष्यामध्ये बिटनवर येऊ घातलेले स्पेनचे परचक्र उलटविणे, स्पॅनिश आर्माडा (नौदल) नष्ट करणे अशा कार्यामधून ब्रिटनमध्ये राष्ट्रीय भावना रुजविणे ह्या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. शेक्स्पीअर, फ्रान्सिस बेकन, वॉल्टर रॉलि, फ़्रन्सिस ड्रेक हे हिचे समकालीन. १६०३ मध्ये तिचा मृत्यु झाला. अखेरपर्यंत ती अविवाहितच राहिली. (ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तिच्याच कालखंडामध्ये पडते.)
ब्रिटनकडून आपली नजर आता स्कॉटलंडकडे आणि स्कॉटलंडची tragic heroine मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिच्याकडे वळवू. इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्या दोन शेजार्यांमधील परस्परद्वेषाला आणि चुरशीला २००० वर्षांचा इतिहास आहे. ’Braveheart’ ह्या अलीकडे बर्याच गाजलेल्या चित्रपटात त्याची चुणूक आपल्याला दिसते. १४व्या-१५व्या शतकांपर्यंत युरोपात फ्रेंच आणि स्पॅनिश राष्ट्रांचा वरचष्मा अधिक असे आणि इंग्लंड हे त्यांच्या समोर दुय्यम महत्त्वाचा देश होता. विशेषेकरून फ्रेंच लोक इंग्लंड आणि स्कॉटलंडमधल्या वादात स्कॉटलंडची बाजू उचलून धरून इंग्लंडची कोंडी करण्याचा प्रयत्न सतत करीत असत. फ्रेंच आणि स्कॉट्स ह्यांच्यामधील ह्या जुन्या मैत्रीच्या संबंधांना Auld Alliance (Auld - Old चे स्कॉटिश रूप) असे म्हणतात.
इंग्लंडचा आठवा हेन्री आणि फ्रान्सचा बारावा लुई ह्यांच्यामधील झगडयात फ्रान्सला मदत म्हणून उत्तरेकडून स्कॉटलंडचा राजा चौथा जेम्स ह्याने इंग्लंडवर आक्रमण केले. परिणामत: १५१३ साली फ्लॉडेन फील्डच्या लढाईत स्कॉटिश बाजूचा पराभव होऊन चौथा जेम्स स्वत: लढाईत मारला गेला.
आठव्या हेन्रीची थोरली बहीण मार्गारेट टयूडर हिचे लग्न स्कॉटलंडच्या चौथ्या जेम्सबरोबर झाले होते. त्यांचा मुलगा पाचवा जेम्स (जन्म १५१२) हा एक वर्षाचा असतांना बापानंतर राज्यावर आला. Auld Alliance खाली त्याचे पहिले लग्न फ्रेंच राजा फ़्रान्सिस पहिला ह्याची मुलगी मॅडेलीन हिच्याबरोबर १५३६ मध्ये झाले. लग्नानंतर सहा महिन्यात ती क्षयरोगामुळे वारली आणि जेम्सने मेरी ऑफ गीज (Mary of Guise) ह्या फ्रेंच उमराव घराण्यातील मुलीशी दुसरे लग्न केले. त्यांचे जगलेले एकुलते एक अपत्य म्हणजे मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स् (जन्म १८४२.) तिच्या जन्मानंतर आठवडयामध्येच तिचा बाप जेम्स पाचवा ह्याचा मृत्यु झाला आणि मेरी स्कॉटलंडची राणी बनली.
तिच्या अल्पवयामध्ये स्कॉटलंडचे राज्य तिच्या नावाने तिची आई अणि अन्य राज्यपालक चालवॊत होते आणि मेरीचे बहुतेक बालपण फ्रान्समध्येच गेले. वयाच्या पाचव्या वर्षी तिचा विवाह फ्रेंच राजा हेन्री दुसरा ह्याचा मुलगा राजपुत्र (Dauphin - दोफॅं) फ्रान्सिस ह्याच्याबरोबर ठरविण्यात आला. ह्यापूर्वी आठव्या हेन्रीने तिचा विवाह त्याचा मुलगा एडवर्ड ह्याच्या करण्याचा घाट घातला होता आणि मेरीच्या वयाच्या दहाव्या वर्षी हा विवाह होईल असा करारहि करण्यात आला होता पण एव्हांना प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक हा झगडा स्कॉटलंडमध्येहि पोहोचला होता आणि स्कॉटलंडमध्ये कॅथलिक पक्षाची सरशी होऊन मेरीचे प्यादे फ्रेंच बाजूकडे गेले. वयाचे सहावे वर्ष चालू असतांना १५४८ सालात मेरीची रवानगी फ्रन्समध्ये झाली. पुढची १३ वर्षे ती फ्रान्समध्येच राहिली आणि एप्रिल १५५८ मध्ये राजपुत्र फ्रान्सिसबरोबर तिचा विवाह झाला.
त्यानंतर काही महिन्यांतच जुलै १५५९ मध्ये जाउस्टिंगच्या खेळात डोळ्यामध्ये भाला शिरून हेन्री दुसरा ह्याचा मृत्यु झाला आणि फ्रान्सिस हा फ्रान्सिस दुसरा म्हणून फ़्रान्सचा राजा होऊन मेरी राणी बनली.
दुसरा फ्रान्सिस अल्पायुषी ठरला. त्याच्या कानामध्ये त्याला काही विकार होऊन तो विकार मेंदूपर्यंत पसरला आणि डिसेंबर १५६० मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात येऊन Queen Mary ही Dowager Queen Mary झाली. तदनंतर नऊ महिन्यांनी ती स्कॉटलंडला परतली. जॉन नॉक्सच्या नेतृत्वाखाली प्रोटेस्टंट पंथाने तेथे चांगलाच जम बसविला होता आणि मेरी कॅथलिक असल्यामुळे तिला विरोध सुरू झाला. दरम्यान आपली आजी मेरी टयूडर हिच्या संबंधातून आपण पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्याचे वारस आहोत असे जाहीर करून घेण्याचा अयशस्वी प्रयत्नहि तिने केला.
१५६५ मध्ये मेरी टयूडर संबंधातून तिच्या नात्यात असलेल्या हेन्री स्टयुअर्ट, लॉर्ड डार्न्ली ह्याच्याशी तिचा विवाह झाला. दोघेहि कॅथलिक असल्यामुळे ह्या लग्नाकडे स्कॉटिश जनता संशयानेच पाहात होती. प्रेमविवाह म्हणून सुरू झालेला हा संबंध लवकरच तणावाखाली आला कारण मेरीचे आपला इटालियन सेक्रेटरी रिझिओ ह्याच्याशी अनैतिक संबंध असावेत अशी शंका लॉर्ड डार्न्लीच्या मनामध्ये होती आणि त्यातून मेरीच्या समोरच रिझिओचा खून करणात आला. ह्यावेळी लॉर्ड डार्न्लीचे मूल - भावी जेम्स सहावा - मेरीच्या पोटात होते.
सहाव्या जेम्सचा जन्म जून १५६६ मध्ये झाला. मेरी आणि लॉर्ड डार्न्ली ह्यांच्यामधील ताणतणावाची वार्ता सार्वत्रिक झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून की काय लॉर्ड डार्न्लीचा निवास असलेल्या राजवाडयात मोठा स्फोट होऊन फेब्रुवारी १५६७ मध्ये त्याचे आयुष्य संपले.
एव्हांना मेरी कॅथलिक स्कॉटिश लॉर्ड बॉथवेल ह्याच्या प्रभावाखाली आली होती आणि लॉर्ड डार्न्लीच्या खुनामध्ये त्या दोघांचाहि हात आहे अशी शंका बर्याच जणांना येऊ लागली होती. मे १५६७ मध्ये आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन बॉथवेलने मेरीशी लग्न केले. त्याचा पहिल्या बायकोशी घटस्फोट मान्य नाही म्हणून कॅथलिक आणि ते कॅथलिक आहेत म्हणून प्रॉटेस्टंट अशा दोन्ही गटांचा त्यांना विरोध होता. पाठलाग करणार्यांपासून स्वत:चा बचाव करीत दोघे इतस्तत: पळत असतांना बॉथवेल डेन्मार्कला निघून गेला आणि मेरी बंदी झाली. स्कॉटलंडच्या राज्यावरील आपला हक्क सोडण्यास तिला भाग पाडण्यात आले आणि तिच्या जागी तिचा अज्ञान मुलगा जेम्स सहावा १ वर्ष आणि १ महिना इतक्या वयाचा असतांना राज्यावर आरूढ झाला. पुढची काही वर्षे त्याच्या राजपालकांनी त्याचे राज्य चालविले.
१५६८ मध्ये बंधनामधून पळून जाण्यात मेरी यशस्वी झाली आणि सीमेपलीकडे इंग्लंडत तिने आश्रय घेतला. ह्यानंतर २० वर्षांचे उरलेले आयुष्य मेरीने इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नजरकैदेतच काढली.
मेरीचे इंग्लंडात असणे हे बर्याच जणांना मान्य नव्हते. ती कॅथलिक असून पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्यावर ती हक्क सांगत आहे म्हणजे इंग्लंडमध्ये पुन: कॅथलिक सत्ता बसविण्याचा हा प्रयत्न आहे अशी शंका ह्याच्या मुळाशी होती.
१५८६ साली ’बॅबिंग्टन कट’ उघडकीस आला. ह्यामध्ये सांकेतिक भाषेमधला मेरी आणि तिच्या कॅथलिक पाठीराख्यांची पत्रे सापडली. एलिझाबेथ राणीला नष्ट करून मेरीची सुटका करायची आणि त्ला इंग्लंडचे राज्य मिळवून द्यायचे असा तो कट होता. ह्या कटामागे स्पेनचाहि हात होता. ह्या तथाकथित कटाबद्दल बर्याच शंका आहेत पण त्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबर १५८६ मध्ये मेरीची ३६ उमरावांच्या कोर्टापुढे चौकशी होऊन तिला मृत्युदंड सुनावण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्याचा हुकूम देण्यास एलिझाबेथने काही काळ खळखळ केली पण १ फेब्रुवारी १५८७ ह्या दिवशी हुकूम निघाला आणि ७ फेब्रुवारीला संध्याकाळी मेरीचे शीर धडापासून वेगळे करून शिक्षेची अंमलबजावणी झाली. तिचा मुलगा स्कॉटलंडचा राजा जेम्स सहावा ह्याने आपल्या आईचे प्राण वाचविण्यासाठी करंगळीहि उचलली नाही.
अनेक वळणे घेतलेल्या ह्या गोष्टीची अखेर आता जवळ आली आहे. १६०३ मध्ये पहिली एलिझाबेथ जग सोडून गेली. तिच्यानंतर उर्वरित वारस म्हणून जेम्सने ’इंग्लंडचा पहिला जेम्स आणि स्कॉटलंडचा सहावा जेम्स’ अशा बिरुदाने १६२५ पर्यंत राज्य केले. ह्या काळात राजा जरी एक असला तरी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही अलग राज्येच होती. १७०७ मध्ये Act of Union दोन्ही पार्लमेंटांनी मंजूर करेपर्यंत ही स्थिति टिकून राहिली. १७०७ पासून चालत आलेली ही स्थिति अशीच राहते किंवा कसे हे लवकरच कळेल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
उत्तम
लेख अतिशय आवडला.
[शेक्सपिअरची नाटकं लोकप्रिय होण्यामागे आणि मुख्य म्हणजे आजपर्यंत टिकून राहण्यामागे प्रथम एलिझाबेथ आणि मग जेम्स (पहिला) यांच्या दीर्घ आणि तुलनेने शांततापूर्ण राजवटींचा मोठा वाटा आहे (अपवादः 'गनपावडर प्लॉट'चा). शिवाय ज्या 'किंग जेम्स बायबल'मुळे इंग्लिशमधल्या स्पेलिंग्जना (आणि पर्यायाने उच्चार व एकंदरीतच भाषेला) काहीएक प्रमाणबद्धता आली, तेही जेम्सच्याच कारकीर्दीत रचले गेले. राजव्यवस्थेचा भाषेवर पडणारा प्रभाव दर्शवणार्या ह्या दोन घटना.]
अवांतरः
थोडा छिद्रान्वेषीपणा. "त्यांचे जगलेले एकुलते एक अपत्य म्हणजे मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स् (जन्म १८४२.)" - येथे १५४२ असे हवे. (अर्थात पुढील वाक्यांत संदर्भाने ते स्पष्ट होतेच म्हणा).
http://www.theguardian.com/po
http://www.theguardian.com/politics/2014/sep/19/scotland-independence-n…
नाही होणार स्वतंत्र असं दिसतयं.
अरे आप लोग बबण णहीं जाणते?
अरे आप लोग बबण णहीं जाणते?
(बबन मुक्तपीठातला एक नेहेमीचा प्रतिसादक आहे. विषय कोणताही असला तरी बबन्या "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" अशी प्रतिक्रिया देतो. त्यावर मुपि परंपरेला अनुसरून विदर्भ या आयडीवरून "वेगळा बबन झालाच पाहिजे" असल्या प्रतिक्रियाही येतात.)
निर्णय लागला.
सार्वमताचा निर्णय लागून 'स्कॉट्लंड स्वतन्त्र' पक्ष हरला हे वाचून मला तरी बरे वाटले.
तसा माझा ह्या प्रश्नाशी काय संबंध आणि मला बरे का वाटावे? अगदी व्यवहारी असे कारण म्हणजे स्कॉटलंडचा विजय हा सर्व प्रकारच्या फुटीर चळवळींना उत्तेजन देणारा ठरला असता. उदा. भारतातले खलिस्तानी, कॅनडातले क्युबेक स्वतन्त्रवाले, स्पेनमधले बास्क इत्यादि. ह्यांपैकी पहिल्या दोन प्रश्नामध्ये मला वैयक्तिक स्वारस्य आहे.
ह्या पलीकडे जाऊन अजूनहि एक कारण आहे आणि ते म्हणजे ब्रिटिश-हिंदी संबंधांच्या गेल्या २-३शे वर्षांच्या इतिहासाचा 'नॉस्टाल्जिया'. (हा नोस्टाल्जिया काही जणांना, विशेषतः 'नव-सनातन्यांना' मान्य व्हायचा नाही कारण एकेकाळचा 'सुजलाम् सुफलाम्'(sic) भारत इंग्रजांनी गुलामगिरीत टाकला, त्याचे अन्यायी शोषण केले, मेकॉलेने इंग्रजी भाषा हिंदुस्तानावर लादून कारकुनांच्या फौजा उभ्या केल्या कारण आपल्या 'मिनिटामागे' त्याचा त्याचा हाच कुटिल डाव होता, इंग्रजांच्या पूर्वी इथे सर्व आबादीआबाद होते, इ.इ. कारणे ते पुढे करू शकतात.)
पण हा नॉस्टाल्जिया समजायला कठीण नाही. पुढे सुस्थितीला पोहोचलेला एखादा आपल्या विद्यार्थिदिवसातल्या दारिद्र्याच्या अशाच 'नॉस्टाल्जिक' आठवणी काढत असतो आणि वेळीअवेळी त्या इतरांना सांगून त्यांना 'बोर'हि करत असतो. जुन्या हिंदी सिनेमातल्या 'जुळे भाऊ जत्रेत हरवणे आणि मोठेपणी योगायोगाने पुनः एकत्र येणे', 'बागेतली झाडासभोवतीची पळापळ', 'नुसती खोटी दाढी लावल्यामुळे हीरॉइनला हीरो अजिबात न ओळखता येणे' असल्या कथानकांची, जॉनी वॉकर-ओमप्रकाशच्या बटबटीत अभिनयाची आणि डायलॉगांची यथेच्छ टिंगल एकेकाळी करणारा प्रेक्षक आज जुना हिंदी सिनेमा टीवीवर लागलाच तर कौतुकाने पाहतो कारण कारण हाहि एक नॉस्टाल्जियाच. आपले जुने मित्र बर्याच दिवसांनी भेटल्यासारखे त्याला वाटते.
असाच हिंदुस्थानच्या ब्रिटिश काळाचा नॉस्टल्जिया बर्याच भारतीयांना असतो असे मला वाटते. शाळेपासूनचे इंग्रजी वाचन, ब्रिटिशांची भारतसंबंधी बरीवाईट कृत्ये ह्यांची ज्ञान, ब्रिटिशांनीच 'kicking and screaming' भारताला आधुनिक जगात आणून सोडले ह्याची जाण ही सर्व विचारी भारतीयांना आहे आणि त्यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ पासून ब्रिटन-भारत संबंध प्रेमाचेच राहिले आहेत.
अशा ब्रिटनची आता दोन शकले व्हावीत हा विचार अस्वस्थ करणारा होता. ब्रिटनच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या जगभराच्या उभारणीमध्ये स्कॉटिश वाटा मोठा आहे. हिंदुस्थानातहि शिक्षण, व्यापार, शासन अशा क्षेत्रांमध्ये स्कॉटिश उपस्थिति मोठया प्रमाणात होती. मुंबईतील अनेक प्रसिद्ध पेढया, कलकत्त्यातील जवळजवळ सगळा ज्यूट उत्पादनाचा व्यवसाय स्कॉटिश मालकीचा होता. ब्रिटनमधील ज्यूट व्यापार स्कॉट्लंडमधील डंडी शहरात केन्द्रित होता. माउंटस्टयुअर्ट एल्फिन्स्टन, ग्रँट डफपासून अनेक नावे हिंदुस्तानच्या इतिहासाशी संबंधित आहेत.
ह्या आठवणीतल्या ग्रेट ब्रिटनवरचा मोठा धोका टळला हे वाचून बरे वाटले.
ब्रिटीश काळच्या नॉस्टॅल्जिया
ब्रिटीश काळच्या नॉस्टॅल्जिया बद्दल साशंक आहे. पण
तसा माझा ह्या प्रश्नाशी काय संबंध आणि मला बरे का वाटावे? अगदी व्यवहारी असे कारण म्हणजे स्कॉटलंडचा विजय हा सर्व प्रकारच्या फुटीर चळवळींना उत्तेजन देणारा ठरला असता. उदा. भारतातले खलिस्तानी, कॅनडातले क्युबेक स्वतन्त्रवाले, स्पेनमधले बास्क इत्यादि. ह्यांपैकी पहिल्या दोन प्रश्नामध्ये मला वैयक्तिक स्वारस्य आहे.
हे पटलं.
या प्रतिसादाच्या निमित्ताने
या प्रतिसादाच्या निमित्ताने मनात बरेच दिवस घोळत असलेला एक मुद्दा इथे मांडणे अवश्य वाटले म्हणून तो मांडतो आहे.
ज्या दृष्टिकोनातून 'नवसनातन्यां' वर टीका केली आहे तो दृष्टिकोनही तितकाच टोकाचा आहे. गेली २०० वर्षे भारत = वाईट आणि युरोप = चांगला हे एकच समीकरण घोकत घोकत भारतीयांच्या कैक पिढ्या वाढल्या. याला जरा जरी कोणी विरोध केला की प्रतिगामी, बिनबुडाचा, इ.इ. आहेर ठरलेलेच आहेत. 'इतकी चांगली होती तुमची संस्कृती तर ब्रिटिशांनी कसे काय राज्य केले तुमच्यावर?' या तुच्छतायुक्त प्रश्नाला उत्तर देणेच या दृष्टिकोनामुळे अवघड ठरले. एरवी हिंदू परंपरेतल्या सर्व मान्यता या 'जेत्यांचा इतिहास' म्हणून निकालात काढताना तोच न्याय भारताच्या माथी मारल्या गेलेल्या ब्रिटिश जाणिवांना मात्र लावला जात नाही. अव्वल इंग्रजीत भारत बराच मागे पडला होता, पण तेव्हा मागे होता म्हणून भारताच्या पूर्ण भूतकाळासाठी तोच ब्याकवर्ड न्याय किती पिढ्या लावत बसणार आहोत आपण?
आता यावरचा पेट्ट आक्षेप म्हणजे - कायम स्वस्तुती केल्याने आपण काँप्लेसंट बनतो, आळशी बनतो आणि प्रगतीला बाधा येते हे ठीकच आहे. अवास्तव स्वस्तुतीला तर हे अतिशय जास्त लागू पडते. पण अवास्तव स्वनिंदेमुळे प्रगती होते असेही आजिबात नाही. उलट त्याची परिणती ही विवेकशून्यता आणि वैचारिक गुलामगिरीत होते. ब्रिटिश राज्याला आणि पर्यायाने ब्रिटिशांना शिव्या घालणार्यांची संभावना 'मूर्ख' असे करणारे जुन्या पिढीतले काही लोक मी कैक वर्षे जवळून पाहिलेले आहेत. त्यांच्या ब्रिटिश प्रशस्तीत आणि 'नेटिव्ह निंदेत' पोस्ट गांधीवध काळात ब्राह्मणांचे घटलेले प्राबल्य हा एक महत्त्वाचा फ्याक्टर होता. ब्रिटिश काळात बाकी काही असले, शाहू, फुले, आंबेडकर, इ. किती समाजसुधारक असले तरी तेव्हा जातिव्यवस्था ढिम्म बदललेली नव्हती. त्यामुळे ब्राह्मणी प्राबल्याला, त्या वर्णवर्चस्ववादी मनोवृत्तीला धक्का बसला नव्हता. तो महाराष्ट्रापुरता तरी गांधीवधोत्तर काळात बसला. त्यामुळे त्यांना नंतरचा काळ अजून वाईट वाटत असे.
ब्रिटिश राज्य आल्यापासून भारतीय लोक अख्खे जग त्यांच्याच चष्म्याने पाहत आलेले आहेत. त्यात अनैसर्गिक असे काही नाही, कारण तेव्हा ब्रिटिशच जगात डॉन होते. पण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि एकमेव जागतिक महासता वगैरे नसलो तरी किमान नेबरहुडातला डॉन आणि जगातला वन ऑफ द डॉन्स होऊ पाहण्याकडे आपली औकात नक्कीच वर्धिष्णू आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर 'जिव्हाळ्याचे संबंध', 'ग्रेट ब्रिटनवरील संकट', इ.इ. विचार ब्रिटिश पेट्रनायझिंगचा वास मारणारे वाटतात.
शिवाय, हा नॉस्टॅल्जिया जुन्या पिढीतच जास्त आहे म्हटले तरी चालेल. खर्या अर्थाने विचारी भारतीय माणूस स्वतःचे परिप्रेक्ष्य फक्त गेल्या २०० वर्षांपूर्वीपर्यंत लिमिटेड का ठेवेल, हेही उमजत नाही.
असो. यामुळे जर मला कुणी नवसनातनी म्हणणार असेल तर म्हणो बापडे. हू केअर्स?????
ऐसी अक्षरी वरील एल्सवर्थ
ऐसी अक्षरी वरील एल्सवर्थ टुहे- भागवत श्री कोल्हटकर यांचा मार्मीक लेख व प्रतिसाद आवडला.
1- स्मरण रंजन या मुळ इंग्रजी शब्दाला चपखल असा मराठी शब्द नॉस्टाल्जिया / नोस्टाल्जिया चा मुबलक वापर आवडला. लेखना संदर्भात ही हा दोन वेगवेगळ्या पद्दतीने लिहीता येतो याचीही माहीती मिळाली मात्र त्यातील फरक जसे नॉस्टाल्जिया हा एक प्रकार व नोस्टाल्जिया असे वेगवेगळे लिहीतांना व्याकरणाचा कुठला मराठी गुढ नियम कार्यरत असावा याचा उलगडा झाल्यास आनंद वाटेल. शिवाय हल्ली च्या पिढीत इतका सुरेख मराठी शब्द जवळ जवळ कालबाह्य झाला असतांना त्याचा इतका समर्पक व मुबलक वापर करण्यास जमणे हीच मोठी अवघड गोष्ट आहे.
२- नायक नायिका या मुळ इंग्रजी शब्दाचा वापर टाळुन मराठी भाषेचा गोडवा जपणारा हीरो हिरॉइन हा शब्द देखील सुखावुन गेला. यात एक शंका आहे हेरॉइन असे जर लिहीले तर मुळ शब्दाचे वजन वाढेल की घटेल ?
३- तसेच संवाद हा अतिशय कीचकट असा इंग्रजी शब्द टाळुन डायलॉग हा सुरेख मराठी प्रतिशब्द ही भाषेची श्रीमंती वाढवणारा च आहे. ज्युट हा तर फारच क्युट असा मराठी शब्द या निमीत्ताने माहीत झाला.
4- लेखातील सचिव आणि संसद या मुळ इंग्रजी शब्दांना टाळुन सेक्रेटरी व पार्लमेंट ( पार्लीयामेंट ) यांचा वापर तर फार च सुंदर.
लेखातील ऐतिहासिक माहीती विषयी लिहत नाही तो एक वेगळाच विषय आहे.
खवचट या अपेक्षीत सम्मानासाठी भक्त मंडळींचे अनेक आभार .
खवचट ही श्रेणी अपेक्षीतच होती. कारण श्री. एल्सवर्थ टुहे- भागवत कोल्हटकर यांचा भक्त परीवार मोठा आहे. ते प.पु. व प्रात स्मरणीय आहेत. भक्तांच्या अधिक माहीतीसाठी वरील प्रतिसाद हा खालील प्रतिसादावर आधारीत होता. ( तसा दुवा दिलेलाच आहे पण असु द्या हे ही )
ह्या धाग्याचा विषय आणि विचार दोन्हीहि उत्तम आहेत आणि विचारप्रवर्तक चर्चा घडवून आणू शकेल असे त्याच्यात बरेच आहे.
तरीहि वाचतांना त्यातील अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर अतिशय खटकला. उदाहरणार्थ पहिल्या पाचच ओळी पहा:
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत. पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली. >
ह्या पाच ओळीत आठ इंग्रजी शब्द आहेत. त्यांपैकी कोठलाच असा नाही की त्याला समर्पक आणि रोजच्या वापरातला मराठी शब्द उपलब्ध नाही. असे असता हे इंग्रजी शब्द वापरायचा अट्टाहास का?
माझी खात्री आहे की तुम्ही एखाद्या पंचतारांकित जागेत गेलात तर तेथे आवर्जून तुमचे उत्तमातले उत्तम इंग्रजी तुम्हाला जमेल तितक्या ब्रिटिश/अमेरिकन उच्चारात वापरत असणार. तिथे मराठी शब्द चुकून वापरला गेला तर तुम्हास ओशाळवाणे वाटणार. आपण 'गावठी' दिसणार नाही ह्याची तुम्ही पुरेपूर काळजी घेणार. अन्य भाषिक सुशिक्षित लोक आपण आपली भाषा शंभर टक्के प्रमाणभाषा वापरतो ह्याची खात्री घेतात. आपणच मराठी आपली भाषा अशी बेवारशी का करतो? तेहि ह्या मराठी संस्थळावर जेथे त्याच्या नावातच ज्ञानेश्वरांचा मराठी अभिमान दिसून येतो?
(शुद्धलेखनाबाबत लिहीत नाही, तो एक वेगळाच विषय आहे.)
प्रकार आणि दर्जा या दोन
प्रकार आणि दर्जा या दोन निराळ्या गोष्टी आहेत हे तरी मान्य असावं. माझ्यामते खवचट, मार्मिक, रोचक आणि माहितीपूर्ण या सगळ्या श्रेण्यांचा दर्जा एकच आहे. प्रकार वेगळा. किंबहुना मी जेव्हा जेव्हा खवचट ही श्रेणी देते, तेव्हा मला त्या प्रतिसादातल्या ठेवणीतले हाणण्याच्या तिरक्या कौशल्याचं कौतुकच वाटलेलं असतं.
वर मुग्धमयुर यांना दिलेल्या अनेक खवचट श्रेणींमधली एक श्रेणी माझी आहे आणि ती त्यांचा मुद्दा आणि मुद्दा मांडण्याची पद्धत दोन्ही आवडल्यामुळे दिलेली आहे.
टीवी आणि बोर या मराठी शब्दांचा अप्रतिम वापर नोंदवायचा राहीला !
एखादा आपल्या विद्यार्थिदिवसातल्या दारिद्र्याच्या अशाच 'नॉस्टाल्जिक' आठवणी काढत असतो आणि वेळीअवेळी त्या इतरांना सांगून त्यांना 'बोर'हि करत असतो.
बोर हा एक सुरेख मराठी शब्द आहे याचा अतिशय चुकीचा अर्थ प्रचलित आहे जो म्हणजे त्याला एक फळ समजले जाते. मात्र कोल्हटकरांच्या हातात पडल्यावर त्यांनी या सुंदर शब्दाचा सोन्यासारखा वापर वरील वाक्यात करुन दाखविलेला आहे काही भाषेचा व्यासंग तोकडा असलेले लोक हा मराठी शब्द बोर मारणे असा ही करतात. पण सुयोग्य वापर वरील वाक्यात दिसुन येतो तो च बरोबर. हा सुंदर मराठी शब्द ठळक दिसावा म्हणुन त्याला त्यांनी चिन्हांकीत ही केलेले आहे.
जॉनी वॉकर-ओमप्रकाशच्या बटबटीत अभिनयाची आणि डायलॉगांची यथेच्छ टिंगल एकेकाळी करणारा प्रेक्षक आज जुना हिंदी सिनेमा टीवीवर लागलाच तर कौतुकाने पाहतो कारण कारण हाहि एक नॉस्टाल्जियाच.
वरील वाक्यात एक अप्रतिम मराठी शब्द टीवी वापरलेला आहे. पण खरी दाद देण्यासारखी बाब आहे त्याचा अचुक उच्चार. टीवी यातील संशोधन असे की मुळ मराठी शब्द टेलीवीजन असा होता यादवकालीन मराठीत टेलीवीजन असाच शब्द वापरात होता. नंतर इंग्रजी आमदानीत त्याचा चुकीचा उच्चार टेलीव्हीजन असा केला जाउ लागला. यातुन संक्षिप्त रुप आले टीव्ही जे अर्थातच चुकीचे होते. मुळ शब्द टेलीवीजन असल्याने टीवी या शब्दातच त्याचे नादमाधुर्य येते आणि अचुकता देखील.
कोल्हटकर अर्थातच अचुक आणि सुयोग्य वापर करुन दाखवितात. टीवी काय नादमाधुर्य आहे बघा या मराठी शब्दाचे
उदा. जोशी चि.वि. जोशी चि.वी बघतात टीवी
बोर होतो जोश्यांचा कीवी जोश्यांचा कीवी
बोर होउन कींचाळतो कीवी कींचाळतो कीवी
विचलीत चि.वि. हासडतात शिवी
विचलीत चि.वि. हासडतात शिवी
यात जर चुकीच अक्षर व्ही वापरल तर मराठी भाषेची पुरती वाट च लागते आणि मधुरता संपुष्टात येते.
म्हणुन सर्वाना विनंती आहे की दुरचित्रवाणी संच या रटाळ इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणुन आपला हक्काचा मराठमोळा टीवी हा शब्द वापरत चला
टी............वी (टीव्ही नाही.)
अर्थात कोल्हटकरांची प्रतिभा आणि प्रतिमा अथांग आहे त्यामुळे त्यांनी लिहीलेलं सर्वच मला कळेल असे शक्यच नाही पण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सध्या एक आव्हान म्हणुन खालील वाक्यातील कंसात खास करुन दाखवलेला खालील वाक्यातील शब्द काय असेल यावर विचार करतोय
ह्या पलीकडे जाऊन अजूनहि एक कारण आहे आणि ते म्हणजे ब्रिटिश-हिंदी संबंधांच्या गेल्या २-३शे वर्षांच्या इतिहासाचा 'नॉस्टाल्जिया'. (हा नोस्टाल्जिया काही जणांना, विशेषतः 'नव-सनातन्यांना' मान्य व्हायचा नाही कारण एकेकाळचा 'सुजलाम् सुफलाम्'(sic)
बहुधा आज नविन शब्द (sic) या विषयी काही माहीती मिळेल असे वाटते कारण अखेरीस मराठीतल्या अतिशय अधिकारी व्यक्तीने तो वापरलेला आहे. आणि मी तसा ही जन्माने मराठी नाही शिक्षण ही मराठी माध्यमातुन झालेले नाही विद्यार्थी च आहे या भाषेचा त्यामुळे माझा तर फायदाच आहे.
ए मला पण घे ना तुमच्या
ए मला पण घे ना तुमच्या पार्टीमधे.
मी "बाटली" व चखणा आणेन. तसेच चिकन सिक्स्टी फाइव्ह आणि गोबी मांचूरियन "पार्सल" करून आणेन. झालंच तर ... पार्टीदरम्यान दोनचार गालिब चे फर्मास शेर पण ऐकवेन. इसलिये (दोन्ही कानांच्या पाळ्या एकापाठोपाठ एक ... चिमटीत पकडत) नाचीज को महफिल मे शरीख होने की इजाजत दिजिये.
महफिल से निकाल दिया मुझे दीवाना समझकर
क्या चांद के नजदीक सितारे नही होते ???
महफिल से निकाल दिया मुझे
महफिल से निकाल दिया मुझे दीवाना समझकर
क्या चांद के नजदीक सितारे नही होते ???
आदाब अर्ज है गब्बरे आझम!!!! तुम्हांला शरीख-ए-महफिल करणार नायतर काय त्या लुत्फ-ए-मय ला महरूम असलेल्या जाहिदला?
अपि च- तुम्ही इथे स्वतःस नाचीज म्हणवून घेतले हे बाकी रोचक आहे ;)
(सांबाला माझ्यावर सोडून माझे सांबार करण्याअगोदर मी पळतो आता)
तारीफः माहितीपूर्ण लेखन आणि
तारीफः
माहितीपूर्ण लेखन आणि प्रतिसाद
आभार!
तारीफ + टोमणा:
तुम्ही माहितीचे भंडार आहात हे माहिती आहेच, (त्यामुळे इतकी छान नवी माहिती आली की उत्सुकता असते, कृतज्ञताही असते पण आश्चर्य/नाविन्य नाही). अश्या माहितीबरोबरच (किंवा त्याहून अधिक) आता तुम्ही मागे कबूल केलेल्या प्रवासवर्णनाची आस लाऊन आहे.
अन्याय
व्यभिचाराच्या कारणासाठी अॅन बुलीनचा शिरच्छेद झाला.
या आणि अशा अनेक उदाहरणांमधे स्त्रियांवर अन्याय दिसतो. बाकी सगळ्या 'राजपुत्र' लोकांनी एवढ्या भानगडी केल्या त्यातल्या एकालाही शिक्षा नाही. आणि अगदी हल्लीच्या काळातल्या डायनाला मात्र शिक्षा? (असा प्रवाद आहे)
स्कॉटलंडच्या निमित्ताने
स्कॉटलंडच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख वाचनात आला -
स्कॉटलंडच्या कौलामागचे शहाणपण
समयोचित लेख
समयोचित लेख आवडला.
या निमित्ताने ब्रिटीश पंतप्रधानांची केलेली टिंगल -
David Cameron To Scottish People: ‘I’ll Kill Myself If You Leave’