Skip to main content

ऑब्सोलीट...

हा विषय किती जणांना किती महत्वाचा वाटेल याविषयी माझ्या मनात कुळीथपिठल्याइतपत दाट शंका आहे. पण सहज येताजाता मोकळ्या वेळात विचार करताना मन ऑपॉप मागे जाणं आणि नॉस्टाल्जिया नामक भरपूर उत्पादन असलेलं पीक उगवून येणं ही घटना घडतेच. यातून मग जुन्या जाहिराती, जुन्या मुली, जुन्या काळातली गावं आणि कायकाय निघतंच. त्याचा आता आंजावर बर्‍याचजणांना कंटाळाही येतो.

तरीपण, माझ्या स्मृतीतून जाऊ न शकणार्‍या बर्‍याच वस्तू इथे नोंदवायची इच्छा आहे. याचं कारण असं की, उदा. मी माझ्या लहानपणी अस्तित्वात असलेलं कॅम्पको चॉकलेट अनेकदा उल्लेखून उसासे टाकायचो. पुढच्या पिढीतल्या एका लहान मुलाने एक दिवस मला हाताला धरुन टीव्हीपुढे ओढत नेलं आणि जाहिरातरुपात पुराव्याने दाखवलं की हे कॅम्पको चॉकलेट पुन्हा अस्तित्वात आलेलं आहे.

बर्‍याच गोष्टी ज्या ऑब्सोलीट, कालबाह्य, आउट ऑफ मॅन्युफॅक्चर झाल्यात असा आपला समज असतो, आणि कुठेतरी कानाकोपर्‍यात, तालुकाखेड्याच्या जत्रेत, ईशान्य भारतात, परदेशात वगैरे या गोष्टी कदाचित अजूनही जिवंत असतात.

काही चिजा अत्यंत निरर्थकही वाटू शकतील, पण त्या होत्या. चांगल्याच अस्तित्वात होत्या. ही मुख्यतः खेळणीच आहेत.

पहिली.. एका चौकोनी काचेच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी लाल किंवा तत्सम कागद चिकटवलेले आणि त्यावर वेगवेगळ्या चित्रांचा मॅट्रिक्स (मोटारी, प्राणी,आगबोट, रेल्वे इत्यादि). त्या वस्तूला वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड करुन हवे ते चित्र त्या काचेच्या चौकटीत आणणे आणि बाकीचे कागद त्यावर फोल्ड होऊन फोटोफ्रेमप्रमाणे ते चित्र काचेत दिसणे. प्रचंड जादू अशी काही नसूनही ही वस्तू विकत मिळायची.

दुसरी.. एक दुहेरी वळलेली लोखंडी चकचकीत जाड तार, विशिष्ट आकाराची, आणि त्यावर न पडता पूर्ण उलटसुलट चक्कर मारुन फिरणारे मॅग्नेटचा पिव्हॉट असलेले चाक,

तिसरी... कापूर जाळून ज्यात ठेवला आणि पाण्यात सोडली की जी पुटपुटपुटपुट असा आवाज करत पुढे जाते अशी पत्र्याची पुटपुटलाँच. यात पाणी एका नळीतून आत शोषून दुसरीतून वाफ बाहेर सोडणे हे तत्व होतं बहुधा. त्यामुळे ती गोलगोल फिरायची.

चौथी... पत्र्याचीच बोटाने दाबून ट्टॉक ट्टॉक असा मोठा आवाज करणारी "बेडकी".

पाचवी... थम्सपच्या झाकणाला (पत्र्याचे) चेपून बनवलेल्या चकतीला मधे भोके पाडून त्यात दोरी ओवून ती खेचून दोन्ही हातांनी भर्रर्रर्रर्र भर्रर्रर्रर्र करुन उलटसुलट फिरवणे. (याला काय नाव होतं ते विसरलो. चक्री की कायतरी)

सहावी.. लाल रंगाचे ज्यात फुंकले की शिट्टी वाजते असे लॉलीपॉप.

सातवी... तीन चाकांचे एक वाहन. याचे पुढचे चाक मोठे असून एकूण तोंड निमुळते पण डुकरासारखे असायचे.

आठवी... फ्रंट इंजिन रिक्षा

नववी.. येझदी, राजदूत आणि जावा

दहावी.. एन पी आणि डबल बबल गम

सर्वांच्याच मनात असे काहीतरी असेल. हे सर्व ऑब्सोलीट नसेलही, किंवा ते ऑब्सोलीट होणं जस्टिफायेबल असेल..पण निदान कुठेतरी नोंद असावी म्हणून इथे.

आदूबाळ Fri, 12/09/2014 - 14:02

In reply to by अनुप ढेरे

इंग्रजी टाईपरायटरची आठवण क्वेर्टी कीबोर्डच्या रूपात कायम राहील. मराठी टाईपरायटर मात्र नामशेष झाला आहे. कोर्टाबिर्टाच्या बाहेर दिसतो आता फक्त.

गवि Fri, 12/09/2014 - 14:10

In reply to by आदूबाळ

टाईपरायटरला पहिल्यांदा धक्का देणारी प्रिंटर्सची जी जनरेशन होती त्यातलेही डॉट मॅट्रिक्स आणि डेझी व्हील प्रिंटर्स आता नामशेष झाले असावेत. (डॉट मॅट्रिक्स काही सरकारी हपीसात शेवटचे आचके देत असू शकतील)

अभ्या.. Fri, 12/09/2014 - 15:21

In reply to by गवि

डॉट मॅट्रिक्स चे ४० पिनचे मॉडेल अजून खपतात इप्सनचे. हॉटेलात बिले काढायला त्याशिवाय पर्याय नाही. कन्टीन्युअस कॉम्पुटर स्टेशनरी वाले पण तोच वापरतात. जुना आवाज आता बराचसा कमी झालाय. स्मार्ट झालेत ते पण. :)

अजो१२३ Fri, 12/09/2014 - 14:15

In reply to by अनुप ढेरे

तस्सं नाही. मराठवाडा भारतातच आहे.
-----------------
रामायण सिरियलचा मी एकच भाग बघितला, महाभारताचे ४-५. ते ही ते लै फेमस होते म्हणून.

मन Fri, 12/09/2014 - 16:08

In reply to by अजो१२३

संपूर्ण महाभारत सिरियल यूट्यूबवर उपलब्ध आहे. विविध ठिकाणी अधिकृत सीडीज् सुद्धा उपलब्ध आहेत.
अजोंनी निदान महाभारत तरी पहावं.

नितिन थत्ते Sat, 13/09/2014 - 09:18

दूरचित्रवाणी - दूरदर्शनवरील साप्ताहिकी नामक (मोष्ट पापुलर) कार्यक्रम गायबला.

आणखी एक गोष्ट गायबली. फडफडणारी चित्रे दाखवणारे टीव्ही.

ॲमी Sat, 13/09/2014 - 10:13

In reply to by नितिन थत्ते

फडफडणारी चित्रे म्हणजे?

'रूकावट के लिए खेद है' दिसतं का कुठे आजकाल?
आणि बातम्या सांगताना हकलाव्या लागणार्या माशा?

नितिन थत्ते Sat, 13/09/2014 - 12:21

In reply to by ॲमी

काळ्या-पांढर्‍या टिव्हीच्या जमान्यात जवळुन स्कूटर-मोटरसायकल गेली तर स्पार्कप्लगमुळे इंटरफरन्स होऊन चित्र फडफडत असे.

किंवा बर्‍याचदा चित्र रोल होऊ लागे. त्यासाठी टिव्हीला व्हर्टिकल होल्ड आणि हॉरिझॉण्टल होल्डची बटणे असत.

http://www.mikanet.com/museum/item.php?item=110

इथे दुसर्‍या ओळीतली फडफडणारी चित्रे पहा.

'न'वी बाजू Sat, 13/09/2014 - 18:19

In reply to by ॲमी

...वरून आठवले. याची एक 'इण्टरफेरन्स बाय फॉरेन टेलेविजन ष्टेशन' नावाची एक पुणे-स्पेसिफिक आवृत्तीसुद्धा ('आमच्या काळी') असे.

बोले तो, पुण्याचे दूरदर्शन केंद्र हे मुंबईकरिता सहक्षेपण (रीले) केंद्र होते. (ऐकीव माहितीप्रमाणे) सिंहगडावर उंचावर एक मनोरा होता, तो वरळीच्या मनोर्‍याशी लाइन-ऑफ-साइटमध्ये होता, वरळीचे सिग्नल उचलून वेगळ्या च्यानेलवरून पुण्याकरिता पुनःप्रक्षेपित करीत असे. (याहून अधिक तांत्रिक तपशील मला ठाऊक नाहीत.)

आता, गंमत अशी, की मुंबई च्यानेल ४, कराचीसुद्धा च्यानेल ४, आणि पुण्यापासून मुंबईची दिशा आणि कराचीची दिशा यांच्यात फार फरक नसावा. मात्र, कराची त्या मानाने पुण्यापासून बर्‍यापैकी दूर असल्याने कराचीचे सिग्नल सिंहगडापर्यंत पोहोचत नसत, आणि सामान्यतः अडचण येत नसे.

मात्र, वर्षाच्या एका ठराविक काळात (साधारणतः पावसाळ्याच्या आसपास) वातावरणातील काही बदलांमुळे कराचीचे सिग्नल क्वचित अत्यंत क्षीण स्वरूपात का होईना, सिंहगडापर्यंत पोहोचू लागत. त्यामुळे अशा वेळी सिंहगडावरचे केंद्र जे सिग्नल उचलून पुनःप्रक्षेपित करत असे, ते मुंबई आणि कराचीचे मिश्र सिग्नल असत. (कराचीचे सिग्नल तेथील कार्यक्रम दिसू लागण्याइतके सक्षम सहसा नसत, परंतु मुंबईचे चित्र खराब करण्याकरिता पुरेसे असत. मात्र, एकदा मुंबईच्या चालू असलेल्या कार्यक्रमावर कराचीवर चालू असलेल्या वॉटर हीटरच्या जाहिरातीची धूसर औटलैन सुपरइंपोज़ होऊन आलेली पाहिल्याचे आठवते.)

हा त्रास फारच होऊ लागल्यास सिंहगड केंद्र मुंबईचे सहक्षेपण बंद करून फिल्म अँड टेलेविजन इन्स्टिट्यूटच्या संग्रही असलेल्या टेपा वाजवू लागे. अनेकदा त्या मुंबईवर त्या वेळी चाललेल्या रटाळ कार्यक्रमाहून कैक पटींनी सरस असत, त्यामुळे नोबडी रिअली यूज़्ड टू मैण्ड.

(ऐकीव माहितीप्रमाणे) पुढे कधीतरी दूरदर्शनने मुंबई आणि पुणे केंद्रांत मैक्रोवेव लिंक नावाचा काहीतरी प्रकार (अधिक तांत्रिक तपशील मला ठाऊक नाहीत; चूभूद्याघ्या.) प्रस्थापित करून हा त्रास कायमचा बंद केला.

धनुष Sat, 13/09/2014 - 21:37

माझ्या लहानपणी आमच्याकडे वासुदेव आयचा. त्याची ती मोरपिसं लावलेली टोपी आणि कुठलसं वाद्य (तुणतूण बहुतेक!) मला फार मोहक वाटत असे. गेल्या अनेक वर्षात पुन्हा वादुदेव पाहिल्याचं आठवत नाही. ते जुन्या शैलीचे कपडे ही पुन्हा पाहिले नाहीत फारसे. आता वासुदेवांच काय झालं असेल?

एक रिमझिम नावाचं थंड पेय सुद्धा बहुतेक गायब झालय आता. इतर कोल्यांपेक्ष्या त्याची चव वेगळी होती इतकं लक्ष्यात आहे. खूप मासिकं बंद झाली ह्याची फार हळहळ आहे. कुमार, अमृत, ठकठक, चांदोबा, किशोर, षटकार .. माझे आजोबा ह्या सगळ्या मासिकांचे वर्षाखेरीस जाड पुत्ठ्याच बाईंडिंग करायचे. मग पुन्हा जुनी मासिकं वाचण्याची फार मजा यायची.

नितिन थत्ते Sat, 13/09/2014 - 23:18

In reply to by धनुष

१. वासुदेव आमच्याइथे ठाण्यात अजून दिसतो.
२. रिमझिम हे पेय कोल्याच्या चवीचे नसून जलजीर्‍याच्या चवीचे होते. ते बंद झाले आहे की नाही ते ठाऊक नाही. एक सोस्यो नामक पेय सुद्धा मिळत असे. त्याची चव कालाखट्टासारखी असे.

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Coca-Cola-to…
http://en.wikipedia.org/wiki/Sosyo

अनुप ढेरे Sat, 13/09/2014 - 21:45

आपला सगळ्यांचा लाडका पक्ष, कॉग्रेस, ओब्सोलीट होइल असं वाटतय का को़णाला? सध्याचे नवीण आरोप पहाता हे शक्य आहे का? शक्य असेल तर ते टाळण्यासाठी आपण काय कारू शकू?

मन Sat, 13/09/2014 - 23:14

In reply to by अनुप ढेरे

ओब्सोलीट होइल असं वाटतय का को़णाला?
किती टाइमफ्रेम डोळ्यासमोर आहे प्रश्न विचारताना?

म्हंजे प्रश्न असा वाचायचा का ? :-
पाचेक वर्षात ऑब्सोलीट होइल का?
की असा वाचायचा :-
पाचेक दशकात ऑब्सोलीट होइल का?
की अजून काही

नितिन थत्ते Sun, 14/09/2014 - 08:55

In reply to by अनुप ढेरे

पक्ष कदाचित होईलही ऑब्सोलीट.

पण तो ज्या गोष्टींचं प्रतिनिधित्व* करतो असं त्या पक्षाच्या समर्थकांना वाटतं त्या गोष्टी राहतीलच आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलातरी पक्ष राहीलच.

दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले यांची काँग्रेस १९१० च्या आसपास ऑबसोलीट झाली.
नंतरची टिळक, गांधींची काँग्रेस आणि नेहरू पटेल यांची काँग्रेस वेगळी होती. इंदिरा गांधींची/राजीवची काँग्रेस वेगळी होती. ती काँग्रेस नव्वदीच्या दशकात संपली.
.
.
.
.
हिंदुमहासभा पन्नासच्या दशकात निष्प्रभ झाली. पण हिंदुत्ववादाचा विचार जनसंघाने उचलला. पुढे भाजपच्या अवतारात तो चालू राहिला. लौकिकदृष्ट्या हिंदुमहासभा संपली तरी हिंदुत्ववादाचा विचार चालू राहिला. वेगळ्या नावांनी पक्ष निर्माण झाले.

*सध्या सत्तेत असलेला भाजप जर आम्हीसुद्धा त्या गोष्टींचं समर्थन आणि प्रतिनिधित्व करतो असं दाखवू/पटवू शकला तर काँग्रेस नावाच्या पक्षाची गरज राहणार नाही. [पण मग इन अ वे भाजप हा काँग्रेसच असेल].

मन Sun, 14/09/2014 - 09:23

In reply to by नितिन थत्ते

२००४च्या आसपास (किंवा त्याच्या एखाद दोन वर्षे आधी) मध्यप्रदेश निवडणुकांत उमा भारतींच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश भाजपानं तत्कालीन कॉंग्रेस मुख्यमंत्री दिगिव्जयसिंग ह्यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरु केला होता. हिंदुत्वासोबतच भाजपनं मध्यप्रदेशात निकडिचं असलेलं BSP बिजली - सडक - पानी हा प्रमुख मुद्दा बनवला. दिग्गीराजा तेव्हा कोणत्यातरी मुलाखतीत म्हणाले "हिंदुंनो , त्यांच्यामागे जाउ नका. आम्हीही मवाळ हिंदुत्ववादीच आहोत."
भाजपनं त्यावेळी अल्पकाळ हिंदुत्व साइडला टाकलं होतं आणि कॉंग्रेस "मवाळ हिंदुत्ववादी"पणाचा दावा करीत होता.
२०व्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेत डेमोक्रॅट व रिपब्लिक ह्यांची बरोब्बर १८० अंश विरुद्ध दिशेने भूमिकांची अदलाबदल झाली काही मुद्द्यांबद्दल.
त्यांच्या त्या बदललेल्या भूमिका आजही कायम आहेत. (ह्याबद्दल माह्तिई ऐसीवरच राघांनी दिलेली होती.)

अमुक Sun, 14/09/2014 - 11:36

१. फॅन्टम् खायच्या (पेपरमिन्ट) सिगारेट्स.

--
२. तहानलेला पक्षी

--
३. बांगड्यांचा डबा


--

४. पत्र्याची पेटी (शाळेत न्यायच्या दप्तराऐवजी काही मुले ही अ‍ॅल्युमिनियमची पेटी वापरत)

--
५. बिब्बा घालणे/चरचरविणे
दाभण बिब्ब्यात घुसवून तेल बाहेर आल्यावर विस्तवावर तो बिब्बा कढत करून मग त्याचे काळे डाग त्वचेवर उमटवून शेक दिला जाई.

आडकित्ता Sun, 14/09/2014 - 23:41

खेळण्यांचं बोलायचं तर एक "टिंगरी" असे. पणतीत बांबूची कामटी ओवलेली. पणतीवर ब्राऊनपेपर चिकटवलेला. त्यावर एक तार. अन धनुकली. दो आँखे बारहब हाथ मधे आहे.

दुसरं ते एक माकड. सायकलचा स्पोक, त्यात बॉलपेनच्या रिफिलभोवती असते ती स्प्रिंग,, त्यावर ते माकड. असं टुणटुण उड्या मारत वर खाली.

बांबूच्या कामट्यांचा इंग्रजी H आकार. त्यात कार्डशीटचा तो पैलवान. खाली बोटं दाबली की पुलअप पुशअप करणारा.

म्हटलं तर घरी बनवता येणारी खेळणी.

घरी बनवलेला विटिदांडु. सायकलची जुनी ट्यूब कापून त्या रबरबँड्सचा केलेला चेंडू.

ट्यूबवरून आठवतात त्या पोहोण्यास शिकविण्याच्या ट्यूब्ज, पण त्यापेक्षा वेगळं म्हणजे डालडाच्या मोठ्या डब्याला 'झाळून' (झाकण वेल्ड करून) बनवलेला 'फ्लोट' मोठा सुका भोपळाही त्यासाठी वापरत.

डालडाच्या डब्यावरून चाळीतल्या बाल्कनीतली तुळस. देवांच्या आंघोळीचं पाणी पिणारी. गांधिलमाशी चावली तर तिच्या मुळातली माती लेपली जाणारी. चहासाठी पानं अन पूजेला मंजिर्‍या रोज खुडल्या जाऊनही खुरचटलेली का होईना, जिवंत असणारी तुळस.

तुळशीचं वृंदावन.

ते असलेलं 'अंगण' अन 'परस' हे दोघेही अ‍ॅब्सोलीट होत चाल्लेत. त्याच सोबत पडवी, ओटा.

त्यात असलेली जाती, पाटे-वरवंटे, उखळ तर कधीच गेलेत.

असो.
थांबतो. एकातून एक आठवणी अन विचार येतच रहातात.

मन Mon, 15/09/2014 - 09:59

In reply to by आडकित्ता

एकातून एक आठवणी अन विचार येतच रहातात
येउ देत की. आवडेल वाचायला.
माझे डॉक्टर होणे मालिकाही बाकी आहे. ते काय किंवा हे काय.
काहीतरी द्या बुवा वाचायला.

गवि Mon, 15/09/2014 - 10:32

In reply to by आडकित्ता

अगदी अगदी..

प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर आली.

आणखी एक.. बांबूच्या दोन पट्ट्यांमधे (बहुधा) सायकलच्या रबरी ट्यूबचा ताणून बसवलेला छोटा तुकडा सँडविच करुन त्या दोन पट्ट्या एकमेकींशी टोकांना दोर्‍याने गच्चम पॅक केलेल्या. त्या मधल्या फटीतून माउथ ऑर्गन प्रमाणे फुंकून हाय पिच पीपी पीपी पी असे वाजत असे. त्यावर पूर्ण गाण्याचे सूर फक्त विक्रेताच वाजवू शके. कसे ते त्यालाच ठाऊक. साधारण झुझूझूझूझू ऊ ऊ ऊ ऊ ऊ झुझूझूझूझू.. (यशोदा का नंद लाला, ब्रिज का उजाला है) हे गाणं वाजवत विक्रेते फिरत असायचे आणि त्यावर कोणतीही गाणी वाजवता येतील या समजुतीने ती पट्टी विकत घेतली जायची.

'न'वी बाजू Tue, 14/01/2025 - 21:19

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)