ऑब्सोलीट...
हा विषय किती जणांना किती महत्वाचा वाटेल याविषयी माझ्या मनात कुळीथपिठल्याइतपत दाट शंका आहे. पण सहज येताजाता मोकळ्या वेळात विचार करताना मन ऑपॉप मागे जाणं आणि नॉस्टाल्जिया नामक भरपूर उत्पादन असलेलं पीक उगवून येणं ही घटना घडतेच. यातून मग जुन्या जाहिराती, जुन्या मुली, जुन्या काळातली गावं आणि कायकाय निघतंच. त्याचा आता आंजावर बर्याचजणांना कंटाळाही येतो.
तरीपण, माझ्या स्मृतीतून जाऊ न शकणार्या बर्याच वस्तू इथे नोंदवायची इच्छा आहे. याचं कारण असं की, उदा. मी माझ्या लहानपणी अस्तित्वात असलेलं कॅम्पको चॉकलेट अनेकदा उल्लेखून उसासे टाकायचो. पुढच्या पिढीतल्या एका लहान मुलाने एक दिवस मला हाताला धरुन टीव्हीपुढे ओढत नेलं आणि जाहिरातरुपात पुराव्याने दाखवलं की हे कॅम्पको चॉकलेट पुन्हा अस्तित्वात आलेलं आहे.
बर्याच गोष्टी ज्या ऑब्सोलीट, कालबाह्य, आउट ऑफ मॅन्युफॅक्चर झाल्यात असा आपला समज असतो, आणि कुठेतरी कानाकोपर्यात, तालुकाखेड्याच्या जत्रेत, ईशान्य भारतात, परदेशात वगैरे या गोष्टी कदाचित अजूनही जिवंत असतात.
काही चिजा अत्यंत निरर्थकही वाटू शकतील, पण त्या होत्या. चांगल्याच अस्तित्वात होत्या. ही मुख्यतः खेळणीच आहेत.
पहिली.. एका चौकोनी काचेच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी लाल किंवा तत्सम कागद चिकटवलेले आणि त्यावर वेगवेगळ्या चित्रांचा मॅट्रिक्स (मोटारी, प्राणी,आगबोट, रेल्वे इत्यादि). त्या वस्तूला वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड करुन हवे ते चित्र त्या काचेच्या चौकटीत आणणे आणि बाकीचे कागद त्यावर फोल्ड होऊन फोटोफ्रेमप्रमाणे ते चित्र काचेत दिसणे. प्रचंड जादू अशी काही नसूनही ही वस्तू विकत मिळायची.
दुसरी.. एक दुहेरी वळलेली लोखंडी चकचकीत जाड तार, विशिष्ट आकाराची, आणि त्यावर न पडता पूर्ण उलटसुलट चक्कर मारुन फिरणारे मॅग्नेटचा पिव्हॉट असलेले चाक,
तिसरी... कापूर जाळून ज्यात ठेवला आणि पाण्यात सोडली की जी पुटपुटपुटपुट असा आवाज करत पुढे जाते अशी पत्र्याची पुटपुटलाँच. यात पाणी एका नळीतून आत शोषून दुसरीतून वाफ बाहेर सोडणे हे तत्व होतं बहुधा. त्यामुळे ती गोलगोल फिरायची.
चौथी... पत्र्याचीच बोटाने दाबून ट्टॉक ट्टॉक असा मोठा आवाज करणारी "बेडकी".
पाचवी... थम्सपच्या झाकणाला (पत्र्याचे) चेपून बनवलेल्या चकतीला मधे भोके पाडून त्यात दोरी ओवून ती खेचून दोन्ही हातांनी भर्रर्रर्रर्र भर्रर्रर्रर्र करुन उलटसुलट फिरवणे. (याला काय नाव होतं ते विसरलो. चक्री की कायतरी)
सहावी.. लाल रंगाचे ज्यात फुंकले की शिट्टी वाजते असे लॉलीपॉप.
सातवी... तीन चाकांचे एक वाहन. याचे पुढचे चाक मोठे असून एकूण तोंड निमुळते पण डुकरासारखे असायचे.
आठवी... फ्रंट इंजिन रिक्षा
नववी.. येझदी, राजदूत आणि जावा
दहावी.. एन पी आणि डबल बबल गम
सर्वांच्याच मनात असे काहीतरी असेल. हे सर्व ऑब्सोलीट नसेलही, किंवा ते ऑब्सोलीट होणं जस्टिफायेबल असेल..पण निदान कुठेतरी नोंद असावी म्हणून इथे.
युरोपॉप्स.. दूरदर्शनवरचा
युरोपॉप्स.. दूरदर्शनवरचा वेस्टर्न पॉप गाण्यांचा कार्यक्रम (फिलर). यात चकमकते लोलक आणि आरसे यांच्या प्रकाशयोजनेत पाश्चात्य गायकगायिकांचे स्टेजवर गातानाचे क्लोज आणि लॉंग शॉट्स. त्यात मिरर इमेजेस, प्रिझम इफेक्ट (सातसात प्रतिमा), पान उलटल्याचा स्पेशल इफेक्ट असे त्यावेळचे लेटेस्ट व्हिज्युअल एडिटिंगचे नमुने असायचे.
बादवे या प्रिझम आणि प्रतिबिंबादि इफेक्ट्सना आम्ही का कोण जाणे पण शिवाजी फुलसुंदर इफेक्ट म्हणायचो.
जगी दुमवा रे
'जिंकू किं॑वा मरू', 'आता उठवू सारे रान', 'जय जय महाराष्ट्र माझा' ही या कार्यक्रमातली पेटंट गाणी.
सहमत. ही ओजस्वी गाणी इस्त्री केलेल्या मख्ख चेहर्याने कायम म्हटली जात.
नाही म्हणायला 'जगी दुमवा रे, दुमदुमवा रे भारत गौरवगान'मध्ये एक ओळ पहिल्या रांगेतले पुंगव उच्चारत (कुठे पर्वतराजी विशाल), तर त्यापुढची हिरव्या रानांची ओळ ललना म्हणत इतकाच काय तो बदल. (तोदेखील अंडर शेक्रेटरीकडून संमत करून आणला असावा).
'हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे' हेही असेच एक हेडबँगिंग चैतन्याचे गीत!
आपल्या हयातीत काहीतरी होते
आपल्या हयातीत काहीतरी होते आणि आता इतक्यातच लोपले त्याची नोंद आणि आठवण काढणे असा उद्देश आहे.
हजारो लाखो वर्षात आक्खी भाषाच बदलून वेगळी होते.. आणि हा वेग अनिष्ट किंवा अयोग्य आहे असे काहीही नाही.
हे सर्व बदलणारच.. इथे फक्त आपल्यासारखे कोणाला काही आठवते का याचा आनंद.. बस्स.
जत्रा
पहिल्या तीन चार वस्तू अजूनही जत्रेच्या ठिकाणी मिळतात.
तिसरी... कापूर जाळून ज्यात ठेवला आणि पाण्यात सोडली की जी पुटपुटपुटपुट असा आवाज करत पुढे जाते अशी पत्र्याची पुटपुटलाँच. यात पाणी एका नळीतून आत शोषून दुसरीतून वाफ बाहेर सोडणे हे तत्व होतं बहुधा. त्यामुळे ती गोलगोल फिरायची.
हे मी मागच्याच वर्षी आणलं. पुण्याला जाणं झालं होतं तेव्हा तुळशीबागेत वीस रुपयात हाती लागलं.
फक्त इंधन म्हणून कापूर न वापरता तेलाचा इलुसा दिवा वापरत होतो.
ह्याशिवाय एक साधसं हेलिकॉप्टर सारखं खेळणं खेळायला लै आवडतं.
दोन चार रुपयात आजही दुकानात मिळतं.
एक साधी प्लास्टिकची पोकळ दांडी --वीतभर लांबीची आणि त्याला वरती हेलिकॉप्टरला असतात तसे आडवे दांडे.
भर्र भर्र करत उडवायला ज्ब्राट मजा येते. लहान पोरं आली , की त्यांच्याशी दंगा करता करता पुन्हा हे खेळायची संधी मिळते.
दोनेक महिन्यापूर्वी माध्यमिक शाळेत शिकलो; त्याच्याजवळ जाणं झालं.
ढेरगं भरुन बोरकूट खाल्लं.
ह्या गोष्टी फार थोर असतात असं नाही, पण लहानपणापासून त्यांनी एक ग्रिप डोक्यात घेतलेली असते.
गुलाबी रंगाचा साखरेचा गोडसर कापूस जत्रेत मिळतो. तत्वतः त्याहून चविष्ट आणि गोडसर बरच काही --
अगदि पुरणपोळी ते श्रीखंड काहीही आता आपल्याला परवडू शकत असतं.
पण आपल्याला तरीही जत्रेच्या त्याच वातावरणात गुलाबी रंगाचा साखरेचा गोडसर कापूस -- बुढ्ढी के बाल चाखून पहावासा वाटतो.
आपल्याला त्याच वातावरणात तेच बालपण हवं असतं. स्वतःच्याच लहानपणाशी स्वतःचीच ईर्ष्या.
ते तंगूस खेचून भर्रकन वर
ते तंगूस खेचून भर्रकन वर उडवण्याचं हेलिकॉप्टर का? होय रे होय.
मला हे हरिद्वारच्या बाजारात रस्त्यावर मिळालं. मटेरियल जरा बदललं होतं पण तत्व तेच.
पण बुढ्ढी के बाल किंवा बर्फगोळा वगैरे हे ओब्सोलीट नाहीत. अगदी मॉल्समधेही मिळतात.
मुख्यतः जे अजिबात गायब झालंय ते आठवतोय.
तीन चाकांचे एक वाहन. याचे
तीन चाकांचे एक वाहन. याचे पुढचे चाक मोठे असून एकूण तोंड निमुळते पण डुकरासारखे असायचे.
त्याचप्रमाणे एक सायकलचं टायर असायचं, नशीब असेल तर टायर शिल्लक असायचं नाहीतर नुसती रिम असायची, त्याला ढकलायला एक तारेचा चमचा सॉर्ट ऑफ असायचा त्यानेच चाकाला गती आणि ब्रेक असं दोन्ही ऑपरेट करायचं.
नववी.. येझदी, राजदूत आणि जावा
हे १९८३ साली होतं, माझ्या लहानपणी, तुम्ही नक्की कोणत्या काळातले गवि.
कानू घोष - आकाशवाणी
'उधळीत शतकिरणा, उजळीत जनहृदया' हे ते गाणे.
(अवांतर : मा. श्रुती सडोलीकर या त्या गानवृंदातल्या मुख्य आवाज होत्या. प्रत्येक कडव्याच्या पहिल्या २ ओळी त्यांनी म्हटली आहेत.)
एक्स्प्लोरर मध्ये सध्यां
एक्स्प्लोरर मध्ये सध्यां प्रचलित असलेल्या बाईकची वैशिश्टे होती. हेडलाईटवर वायझर, पेट्रोल टँक च्या झाकणाला लॉक, स्मार्ट स्पीडोमीटर आणि मुख्य म्हणजे अॅलॉय व्हील. ती त्यावेळच्या इतर कुठल्याही गाडीत नव्हती.
सिल्वर प्लसला ही वैशिष्ठ् होती पण त्याआधी एक स्पोर्टीफ म्हणून मॉडेल आले होते त्याला बटन स्टार्ट होते. (बहुतेक १९९०-९१)
त्याकाळातली कायनेटीकची स्विफ्ट, मॅग्नम, शार्प ही मॉडेल तर प्रदर्शनात ठेवायला पण सापडणार नाहीत.
आधी हिरो मॅजेस्टीक आणि सुवेगा पण होती मोपेडमध्ये. (२ गिअरवाली)
मी ही येझ्दी मित्राकडून
मी ही येझ्दी मित्राकडून (त्याचे वडील वापरत नसल्याने) घेऊन बराच काळ वापरली.
तिची किक आणि गियर लीव्हर एकच असायची. म्हणजे किकचा दांडा किक मारुन गाडी स्टार्ट झाली की पुढे घ्यायचा (म्हणजे उडून पडायचा) आणि तोच पायाने दाबण्याची गियर लिव्हर बनायचा. अर्थातच गियर कमी करताना त्याच्या खाली पाऊल घालून वर खेचावी लागायची.
किक मारताना एकदा माझे पूर्ण नख उचकटले होते फूटरेस्टवर आपटून. अत्यंत वेदनादायक आणि दीर्घकालीन ठसठसलेली आठवण.
या येझ्दीला तत्सम एका शिवीच्या नावाने माझे मित्र संबोधत.
...
TVS 50 लूनासारखीच दिसतेय.
होय. तीच जातकुळी, म्यानुफ्याक्चरर वेगळा.
आणि राजदूत, येझ्दी वगैरे सारख्याच वाटतायत. सगळ्या आमच्या लेखी फटफटीच; फट फट आवाज करत धूर ओकत जाणार्या.
होय. येझ्दी, राजदूत, झालेच तर बुलेट वगैरे सगळ्या आमच्याअगोदरच्या पिढीत (कदाचित काही अंशी आमच्याही पिढीत) 'फटफटी' याच जेनेरिक क्याटेगरीच्या नावाने ओळखल्या जात.
पुढच्या पिढ्या मग तिला 'बाइक' वगैरे म्हणू लागल्या. (आमच्या लहानपणी 'बाइक' म्हणजे सायकल असायची, 'गे'चा अर्थ (केवळ) आनंदी असा(च) होत असे, आणि 'प्यान्सी' हे एका फुलाचे नाव होते. गेऽऽऽले ते दिवस, इ.इ.)
अनेक गोष्टी आठवतात, चुटपूट
अनेक गोष्टी आठवतात, चुटपूट लागाव्यात असे पटकन आठवले ते:
- पॅप्सीकोले नी ते चोखत रस्त्यातून पाचोळ्यासारखे बागडणे
- ट्रॅम्प कार्ड / WWF ची स्टीकर्स/पोस्टकार्ड नी आमच्या व्यापारी बुद्धीचा श्रीगणेशा ज्यानी केला ती या कार्डांची एक्सचेंज डील्स
- जी आय जो
- लाकडी भोवरे
- पतंग व मांजा (बनवणे, उडवणे, काटणे सगळेच)
- विशिष्ट वास असणारे खोडरबर
- पुस्तकात जपलेली पेन्सिलींची टरफले
असो.. यादी बरीच मोठी आहे
पेप्सीकोला, आणि ट्रंप कार्डे
पेप्सीकोला, आणि ट्रंप कार्डे हा आमच्याही परम जिव्हाळ्याचा विषय.
- मृतांमधून उठणारा, सातवेळेस मरून जिवंत झालेला आणि त्या एका कुपीत जीव असलेला 'अमदाडेकर' ऊर्फ अंडरटेकर, त्याचे ते चर्चची घंटा वाजते तसले धीरगंभीर म्युझिक आणि एकूणच अॅटिट्यूड तसेच 'मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस',
- सर्वांत जास्ती 'फाईट्स फॉट' वाला, हुकमी शैलीत बनियन फाडणारा हल्क होगन,
- चिक्कार श्या देत बीअर पिणारा आणि सगळ्यांना आपल्या स्टनरने स्टन करणारा टकल्या स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन,
- भुवई उडवणारा आणि भल्याभल्यांना आपल्या रॉक बॉटमने गार करणारा द रॉक,
- 'श्रोणिमल्ल' रिकिषी,
- चोकस्लॅमप्रेमी आणि अंडरटेकरचा 'सावत्र' भाऊ केन,
- सर्वांत उंच पैकी- अँड्रे द जायंट, पॉल वाईट ऊर्फ बिग शो आणि आता खली,
- मिक फोली ऊर्फ मॅनकाईंड ('सॉको' फेम),
- ट्रिपल एच आणि त्याची ती चूळ हवेत उडवायची जबर्या स्टाईल आणि एकूणच हरामीपणा, कैक साथीदार,
- बेरकी, हरामी बुढ्ढा रिक फ्लेअर,
- बटिस्टा, गोल्डबर्ग,
- ब्रॉक लेस्नर आणि त्याने बिग शोला सुप्लॅक्स दिलेला ती फाईट, कर्ट अँगल आणि त्याचे अँकल लॉक, आत्महत्या केलेला क्रिपलर क्रॉस फेसवाला वट्ट ५ फूटउंचीचा क्रिस बेनवा,
- डब्ल्यू डब्ल्यू एफचा मालक व्हिन्स मॅकमोहन (उच्चारी 'मिकमॅन') आणि त्याचा अतिघोगरा आवाज आणि कायम इतरांकडून मार खाणे,
- रॉयल रंबल, रेसलमेनिया, किंग ऑफ द रिंग, इ. इव्हेंट्स, रॉ आणि स्मॅकडाउन हे कार्यक्रम,
- द रॉक विरुद्ध स्टोनकोल्ड ही सर्वांत आवडणारी म्याच,
- हेल इन अ सेल, हार्डकोर चँपियनषिप, हेवीवेट चँपियनशिप,
- जाड्याशिरोमणी योकोझुना आणि अंड्याने (अंडरटेकर) त्याला तरुणपणी दिलेला जबरदस्त सुप्लॅक्स,
- जिम रॉस ऊर्फ जे.आर. आणि जेरी द किंग लॉलर हे कमेंटरीद्वय (गोर्यांचे स्पोकन इंग्लिष आपल्याला समजू शकते हा आत्मविश्वास देणारे),
- म्हैलांमध्ये सेबल, चायना, टोरी विल्सन, डेब्रा आणि सर्वांत भारी 'ट्रिष स्ट्रॅटस' यांच्या म्याचेस,
छ्या:! कल्प कल्प आठवून गेलं. यत्ता २-३ पासून ते ११-१२ पर्यंत हे पाहिलेले आहे.
-
पिटपिटे उर्फ 'टिकटिक'...
...अजून कोठे मिळते काय? मला हवे आहे. (अॅन एक्ष्ट्रीमली शिंपल येट एक्ष्ट्रीमली इफेक्टिवली इरिटेटिंग डिव्हाइस. म्हणूनच पाहिजे. किंबहुना, दोन पाहिजेत. एक माझ्यासाठी, आणि एक पोराला देऊन एखाद्या वीकांतास दोघेजण मिळून दिवसभर बायकोचे डोके उठवू म्हणतो.)
पूर्वी - बोले तो, माझ्या लहानपणी - फेरीवाल्यांकडे मिळायचे. बहुधा पाच नव्या पैशांना. (हो, तेव्हाही त्यांना 'नवे पैसे'च म्हणत. तोपर्यंत बर्यापैकी जुने झालेले असले, तरी.)
फेरीवाले अजून कोठे मिळतात काय? फॉर द्याट म्याटर, पाच नवे पैसे अजून कोठे मिळतात काय?
आणि, व्हाइल वी आर अॅट इट, माझे लहानपण अजून कोठे मिळेल काय?
(अतिअवांतरः एक, दोन आणि तीन नव्या पैशांची नाणी अजूनही आठवतात. एवढेच कशाला, 'आमच्या वेळची' एक नव्या पैशाची नाणी अॅल्युमिनियमची चौकोनी असायची. पण 'फार पूर्वीची'/'सुरुवातीसुरुवातीची' एका नव्या पैशाची तांब्याची छोटीशी नाणीही अगदी क्वचित कोणाच्या संग्रही वगैरे पाहिल्याचे आठवते. असो. गेऽऽऽऽऽऽले ते दिवस!)
(बाकी, ऑब्सोलीट गोष्टींच्या यादीत आमचा ज़िक्र न झालेला पाहून मोठे वैषम्य वगैरे वाटले. असो चालायचेच!)
एका टोकाला पत्र्याचे पोकळ
एका टोकाला पत्र्याचे पोकळ वाटीसारखा आकार आणि त्यावर अर्धवट येईल अशी त्या वाटीच्या दुस-या टोकाला जोडलेली पत्र्याची जाड पट्टी!
ती पट्टी वाटित अंगठ्याने दाबली की टिक आवाज होतो, सोडले की पत्रा सरळ होताना दुसरा टिक. अतिशय इरिटेटिंग आवाज आहे!
बरोबर ना नवी बाजू?
(बाकी, ऑब्सोलीट गोष्टींच्या
(बाकी, ऑब्सोलीट गोष्टींच्या यादीत आमचा ज़िक्र न झालेला पाहून मोठे वैषम्य वगैरे वाटले. असो चालायचेच!)
जाऊ द्या हो, कुठे मनास लावून घेता? आता असे बघा, गिलोटीन, वेताची छडी, इन्क्विझिशची उपकरणे हे सर्व ओब्सोलीट झाले आहे, पण तुमच्याप्रमाणेच त्यांचा तरी जिक्र कोण करतो?
शाळेतील गोष्टी
शाळकरी आयुष्यातल्या काही गोष्टी आता बघायला सुद्धा मिळत नाहीत. त्यांची ही छोटी यादी:
बोरू, टाक आणि त्याला लावायची 'निफे' - मराठी अक्षर गोलसर आणि पिळदार यावे म्हणूनचे एक आणि इंग्रजी अक्षर सायबासारखे तिरके आणि लांबट यावे म्हणून दुसरे, बदामी ह्या नावाचे, - नाना आकारांच्या दौती आणि नाना रंगांच्या शाया, कायम गळणारी फाउंटन पेने, पुस्तीचा तास, मोडी लेखन, रेघी अंकगणित आणि त्यांतील रुपये आणे पैचे हिशेब, नवयुग, मंगल अशा पाठयपुस्तकांच्या माला, संध्याकाळचा परवचा, 'पूरक अन्न पिकवा' प्रकारच्या सरकारी घोषणा देत करायच्या सक्तीच्या प्रभातफेर्या, शाळांची वार्षिक गॅदरिंगे आणि त्यातील जेवणावळी, दोन आणे वर्गणी घेऊन शाळेने भरवलेले आकंठ रसपान इ.इ.
अगदी अगदी!!!!!!नवरात्रात
अगदी अगदी!!!!!!
नवरात्रात मिरजेतल्या अंबाबाईच्या देवळाजवळच्या मिनिजत्रेत हे सर्व मिळायचे - अजूनही मिळत असेल कदाचित, पाहिले पाहिजे. तेव्हा गाड्यांवर भेळ खाऊन पुढे मग चकचकीत कागदाचे म्यान असलेली लाकडी तलवार किंवा तसेच धनुष्यबाण घेण्याविषयी कायम हट्ट करीत असू (यत्ता १-५) ते आठवले.
पण मिरजेतला मोठा इव्हेंट म्हणजे मिरासाहेब दर्ग्याचा उरूस! तेव्हा पार मार्केटातल्या पोलीस स्टेषनापासनं दर्ग्यापरेंत दुकानंच दुकानं. भेळपाणीपुरीवाल्यांची अख्खी लाईन, त्यानंतर बंदुकीने फुगे फोडणे, 'द व्हील', कपडे, दागिने, इ.इ. असंख्य गोष्टी विकणारे ष्टॉल असत. दर्ग्याच्या आत तेव्हा कधीही गेलो नाही, पण बाकी खादाडी आणि नेमबाजी कायमच असायची. तेव्हा सगळीकडे रायफलींनी मारायचे, पण क्वचित एखाद्या ठिकाणी पिस्तूल असले की लय आनंद व्हायचा.
आईस्क्रीनचा पॉट आणून
आईस्क्रीमचा पॉट आणून आईस्क्रीम करणे आणि त्यासाठी सगळी गल्ली जमा करणे.
थोडंस खारट पाणी झिरपलेल्या त्या रवाळ आईस्क्रीम इतकं चवदार आईस्क्रीम परत मिळालं नाही.
किंवा
पौर्णिमेच्या रात्री गल्लीतल्या पटांगणात पडदा उभारून प्रोजेक्टर वापरून सगळ्या गल्लीने पाहिलेला "स्वामी" आणि मध्यरात्रीनंतरच्या शांततेत ऐकलेलं आणि आता कधीही ऐकलं तरी त्या पटांगणगल्लीत घेऊन जाणारं "का करु सजनी".
छे! आईस्क्रीम पॉट किंवा प्रोजेक्टर ऑब्सोलिट झालेले नाहीत. ती गल्ली ऑब्सोलिट झालीय. तो साधा आनंद ऑब्सोलिट झालाय.
पडदा उभारून प्रोजेक्टर
पडदा उभारून प्रोजेक्टर ....
हा प्रकार अगदि नामशेष व्हायच्या मार्गावर असताना मीही अनुभवला.
त्यानिमित्तानं लोकांची जी केमिस्ट्री बनत असे, जे वातावरण असे ते वैशिष्ट्य पूर्ण असे.
थेट्रातलं वातावरण वेगळं. तिथे पब्लिक माहित नसते. शिवाय तुम्ही तिथे बोलायचे नसते. डोक्यावर छप्पर असते.
इथे सगळं खुल्या मैदानात. त्यामुळे वेगळी वातावरणनिर्मिती होइ.
हा पडदा नेहमीच भिंतीच्या
हा पडदा नेहमीच भिंतीच्या आधाराने असेलच असे नव्हते. त्यामुळे रत्नांग्रीस अश्याच सार्वजनिक प्रोजेक्टर-पडदा सिनेमात ताणून चार दो-यानी बांधलेला पडदा अन त्यात शिडाप्रमाणे हवा भरुन फुगलेला. दोन्ही बाजूना आडियन्स.. एकीकडे अंतर्वक्र चिंचोळा अमिताभ तर दुस-या बाजूने बहिर्वक्र किंचित जाड्या अमिताभ..
अमिताभ आपल्या चपलेचा नंबर कोणालातरी दाखवत असल्याचा सीन आठवतो.
खाऊ
आमच्या घरी पाहुणे आले, की सर्रास एकच खाऊ - चुरमुरे + फुटाणे + खारे शेंगदाणे. मग शेंगदाणे जास्त आले, की फारच लकी वाटायचे. बर्याचदा वेगळे वाटे नसत, अन मग काही आगाऊ पोरे शेंगदाणे तेवढे वेचून आधी खात. त्यावर उपाय म्हणजे कापडी पिशवीत खाऊ देणे व हात घालून बचक मारणे. हे अजूनही सहज मिळते, पण आत्ताच्या पोरांना तो खाऊच वाटत नाही.
* चुरमुरे पण आमच्या सांगली कोल्हापुरातले बरं का. पुण्यातले थोडे लांबट आहेत अन तेवढे कुरकुरीत नाहीत. पंढरपूरलाही प्रसाद हाच, पण ते खाण्यात मजा नाही.
-स्वधर्म
हाहाहा, खरंय. बाकी,
हाहाहा, खरंय.
बाकी, बेळगाव-लोंढा साईडचे चिरमुरे अजून लांबट असतात. त्यांची भेळ खाण्यात जी मजा असते वाह! मिरजेहून धारवाडास हरिप्रिया एक्स्प्रेसने (कोल्लापूर-तिरुपती) जाताना ही भेळ नेहमी खात असू. लय मज्जा! धारवाडास सुक्या भेळीचा एक अवतार असतो तोही मस्त. त्याला बहुधा लोकली 'गिरमिट'१ अशी संज्ञा आहे.
१का, तर भेळवाला भेळीचे सर्व घटक घेऊन फायनल प्रोसेसिंग जेव्हा करतो (द्याटिज ढवळतो) ती प्रोसेस जणू सुताराच्या गिरमिटागत दिसते म्हणून.
मिरज बेळगांव रेल्वेतली भेळ
म्हणजे भारीच जिन्नस. त्यात तिखट, कांदा, लिंबू तर मारायचेच, पण कैर्यांच्या दिवसात बारीक कैर्याच्या फोडी घातल्यावर सॉलीडच चव यायची. भेळवाल्याची बांबूची भली मोठ्ठी शिगोशिग भरलेली दुरडी डोळ्यांसमोर आली. प्रश्न पडायचा की चालत्या रेल्वेत, देमार गर्दीत तो माणूस माल जराही न सांडता एका डब्यातून दुसर्याच नव्हे, तर समांतर रेल्वेतही सहज कसंकाय जायचा...
- स्वधर्म
धागा
धागा आवडला. याचा व्यत्यास सुद्धा मजेशीर होऊ शकेल. कुठच्या अशा नव्या गोष्टी आपण वापरायला/अनुभवायला लागलो ज्यांचा आपल्याला छंद जडला ? यातलं छंद जडणं हा कळीचा भाग. कारण नव्या गोष्टी म्हणायला गेलं तर असंख्यच निघतील. तर मी माझ्या एंट्रिज् सांगतो काही.
१. अमेरिकन फूटबॉल : अमेरिकेतल्या पहिल्या दोन वर्षांमधे या खेळाशी काहीही नातं नव्हतं. मग एका मित्राच्या घरी एका रविवारी हा खेळ पाहिला. त्यातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या. त्यानंतरच्या वर्षांमधे याची गोडी लागली. आता सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या महिन्यांमधे रविवारच्या दिवशी सुस्त अजगरासारखा पडून हा खेळ बघायला मिळणं म्हणजे रविवारच्या आनंदाची परमावधी वाटते. अनेक कारणांमुळे हे जमत नाही. पण जेव्हा केव्हा जमतं तेव्हा मजा येते. आणि हो रविवारी आणि सोमवारी रात्री हे खेळ असतात. तेव्हा बहुदा काही अडसर येत नाही.
वेळेअभावी अन्य काही लिहिता येत नाही. जमल्यास परत येऊन लिहीन.
(१) ह्म्म व्यत्यासात "इंग्रजी
(१) ह्म्म व्यत्यासात "इंग्रजी गाणी" नमूद करता येईल. इथे आल्यावर इंग्रजी गाणी आवडू लागली.
(२) ड्राइव्ह ला जाण्यातली गंमत कळाली. भारतात लोणावळा/कोकण वगैरे ड्राइव्ह होत असत पण वेळखाऊ काम होते. आता तसे नाही.
(२-अ) अन खूप खूप लांबच लांब म्हणजे ६००-८०० माइल्स च्या ड्राइव्ह्स ना कार भाड्याने घेऊन वगैरे जाण्याचे इथेच सुरु झाले. भाड्याची का होईना नवी लक्झरियस कार चालवायची मजा खरच औरच असते. :)
मागच्या वेळेस ठाण्यात होते
मागच्या वेळेस ठाण्यात होते तेव्हा भय्याच्या गाडीवरची थोर पाणीपुरी, अन्य चाट आयटेम असूनही ऑब्सोलीट झाल्यासारखे झाले होते. कोणा एका भय्याने म्हणे पुरेसं हायजीन बाळगलं नाही, त्याचं रेकॉर्डींग एका मुलीने केलं म्हणून घरच्यांनी फार काळजीपोटी ते काही खाऊ दिलं नाही. गेले ते दिन गेले. ठाण्या-मुंबईतल्या भय्यांच्या हातची पाणीपुरी, भेळपुरी आणि अन्य चाट आयटम्सला काहीही तुलना नाही. अगदी फ्रेंचांनीही त्यासमोर नाक घासावं असा तो अप्रतिम स्वाद असतो.
-पेजर्स. मी चार हजाराचा
-पेजर्स. मी चार हजाराचा मोटोरोलाचा छोटा सुबक पेजर हौसेने घेतला होता. त्यावर फोन लावून ऑपरेटरमार्फत संदेश द्यावा लागायचा.
-कॅडबरी डबल डेकर बार (अर्धा कडक, अर्धा मऊ)- अत्यंत आवडायचा. १९८० दशकाच्या सुरुवातीला भारतातून गायब.
-कॅडबरी श्वेप की तत्सम काहीतरी कोल्ड्रिंक,डबल कोला, कॅम्पा कोला, सिट्रा, रिमझिम (उत्तर भारतात नुकतेच पाहिले पुन्हा), Triumph की काहीतरी.
-बजाज चेतक, सुझुकी सामुराई, शोगन, यामाहा RX100, अवंती, हीरो पुक. बहुधा टू स्ट्रोक गाड्यांचा अस्त हा एकच इव्हेंट असावा.
-टाईपरायटर
-फिल्मवाला स्टिल कॅमेरा (कोनिका, कोडॅक, आगफा गेवर्ट इ)
-रोला कोला ("कोला का गोला" गोळ्या),फँटम मिंट सिगरेट्स(अद्याप असाव्यात), एक्स्ट्राँग पेपरमिंट गोळ्यांचे स्टॅक पाकीट(गोळ्या गुलाबी किंवा पांढर्या खोलगट आयताकृती)
!
क्यासेटींबद्दल बोलताय...
स्पूल टेपा - आणि त्या वाजवणारे / त्यांवर रेकॉर्ड करणारे भले मोठे टेपरेकॉर्डर - पाहिलेत कधी?
आणि ग्रामोफोन तबकड्यांचे काय??
चावीचा ग्रामोफोन???
व्हॅक्यूम ट्यूबवाले रेडियो????
(या गोष्टी नाही, आम्हीच औट-ऑफ-डेट झालो आहोत. कालाय वगैरे.)
स्पूल टेप पाहिलाय. ऐकलासुद्धा
स्पूल टेप पाहिलाय. ऐकलासुद्धा आहे. पण तो सुद्धा एका साठीपुढच्या काकांकडे एक अँटिक पीस म्हणूनच. व्हॅक्यूम ट्यूबचा रेडियो माझ्या लहानपणी माझ्या आजोबांकडे होता. आणि ग्रामोफोनही (चावीचा नाही) पाहिलेला/ऐकलेला आहे. पण माझं नशीब चांगलं म्हणून मला या गोष्टी पाहायला मिळाल्या. नाहीतर माझ्या लहानपणीसुद्धा या गोष्टी ऑब्सोलीट म्हणूनच गणल्या जात होत्या. माझी पिढी (पक्षी: ज्यांच्या लहानपणाचा मुख्य कालावधी नव्वदच्या दशकात गेला) क्यासेटी (व्हिडीओ क्यासेट आणि व्हीसीआर/पी ही पण अशीच एक गोष्ट) ऐकत/पाहातच मोठी झालेली आहे.
फॅमिली डॉक्टर
एखाद्या कुटुंबाचे स्वास्थ्यविषयक तपशील, पूर्वेतिहास ठाउक असणारे आणि त्याबरहुकूम इलाज करणारे फ्यामिली डॉक्टर पूर्वी बरेच होते, आता संख्या कमी होत आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर.स्पेशालिस्ट लोकं वाढताहेत.
सतत चालणर्या तरुणांच्या विविध चळवळी, त्यांचं भारावलेपण.
हे अजूनही असेल, पण एकूणात स्केल १९९२नंतर कमी झालाय.
निळू फुले काय किंवा अभय बंग काय ह्यांची एक मानसिक बैठक होती.
राष्ट्र सेवा दल किंवा तत्सम चळवळींत (विनोबांची आंदोलनं) ह्यांचा सक्रिय सहभाग होता.
थोडक्यात, "पूर्णवेळ कार्यकर्ता" नावाची जमात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (केडरबेस)
कार्यकर्ते खरोखरच कार्यकर्ते असत. पुढच्या निवडणुकीत कुठून तिकीट मिळवायचं एवढा एकच विचार त्यांचा चाल्लाय ; असे चित्र नसे.
चळवळीत सक्रिय. किमान काही एक प्रामाणिकपणा (भाबडा आशावाद, किम्वा प्रसंगी अव्यवहारीपणाही असेल, पण प्रामाणिकपणा होता.)
हे नामशेष झालेलं नाहिये, पण परिस्थिती पाहून असं वाटतं की हे होउ शकतं नामशेश.
किंवा कदाचित माझ्या पहाण्याची,दृष्टीचीही ही मर्यादा असू शकेल.
जुने मध्यमवर्गीय विचार नामशेष होउ घातलेत. व्यक्तीवाद बराच पुढे आलाय.
"त्याग" ह्या गोष्टीला तितकं ग्लॅमर राहिलेलं नाही. त्याची जागा कर्तबगारी, स्वावलंबित्व ह्यांनी घेतलिये.
पूर्वी कुटुंबातील एकानं कर्तबगार असणं आणि इतरांनी त्यागी असणं पुरेसं होतं.
आता सगळ्यांनीच कर्तबगार बनावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे.
(संभाव्य आक्षेप :- मनोबा सरसकटीकरण करतोय.)
केडरबेस
नुकतीच १६ मे च्या आसपास - नमो उदयाच्या आसपास संघ शाखांची संख्या वाढल्याची बातमी वाचली. एकूणात मागील पंधरा वर्षे सतत ती संख्या घटत होती असं त्या बातमीत म्हटलं होतं. संघाचा केडर असा स्टॅग्नेशनला गेलेला असताना समाजवाद्यांकडे काय, कम्युनिस्टांकडे काय किंवा इतर सामाजिक चळवळीत काय जोमानं सुरु असणारी राष्ट्रव्यापी कोणती चळवळ दिसते?
संप होत नाहित ते चांगलच आहे. पण कामगार संघटना दुर्बळ झाल्याचंही ते लक्षण आहे.
विदा -- बर्डन ऑफ प्रूफ माझ्यावर टाकण्यापेक्षा सध्या जोरात असलेल्या आघाडीच्या पाच सात चळवळींची नावं तुम्हीच सांगितलीत तर आभारी असेन.
(आता प्लीझ अण्णा हजारे - सिव्हिल सोसायटी - केजरीवाल ही नावे घेउ नका. ती एक घटना होती, इव्हेंट होता. तात्कालिक/क्षणिक होतं ते.
शिस्तीनं दीर्घकाळ सातत्याने चाललेलं असं त्यात काय होतं? कोणता विचार होता ?
कोनती महत्वाची मूल्यं/एकसमान कृती होती?
)
'एचएमटी'च्या टिकटिकला पूर्णविराम!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/hmt-loses-race-against-time-to…
.
.
.
'एचएमटी'च्या टिकटिकला पूर्णविराम!
लाखो भारतीयांना वेळेचे भान करून देणारी आणि एकेकाळी सर्वसामान्यांच्या हातातील 'ताईत' बनलेली एचएमटी ही सार्वजनिक क्षेत्रातील घड्याळ उत्पादक कंपनी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २००० पासून या कंपनीच्या तोट्यात वाढच होत गेली असून, आता कर्मचाऱयांचे पगार देणेही मुश्किल झाल्यामुळे कंपनीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१२-१३ या आर्थिक वर्षात कंपनीचा तोटा २४२.४७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर या कंपनीची टिकटिक थांबणार हे जवळपास निश्चित झाले होते.
जपानमधील सिटीझन वॉच या कंपनीच्या साथीने १९६१ मध्ये एचएमटी कंपनीची सुरुवात झाली. ७० ते ९० या दशकांमध्ये या कंपनीने अनेक भारतीयांचा विश्वास संपादन केला होता. घड्याळांच्या बाजारातील मोठा हिस्सा याच कंपनीकडे होता. बाजारातील खासगी कंपन्यांना एचएमटीने चांगली टक्कर दिली होती. मात्र, २००० नंतर कंपनी हळूहळू मागे पडत गेली आणि तोट्यातही वाढ होत गेली. मार्च २०१२ मध्ये कंपनीने कर्मचाऱयांचे पगार आणि इतर आवश्यक खर्चांसाठी सरकारकडून ६९४.५२ कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते.
केंद्र सरकारने एचएमटी वॉचेस आणि एचएमटी चिनार वॉचेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुनर्निर्माण मंडळाने त्या स्वरुपाची शिफारस केली असून, त्याला संचालक मंडळाने मान्यताही दिली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले. ३१ मार्च २०१३ अखेर कंपनीमध्ये ११०५ कर्मचारी आहेत.
'एचएमटी'च्या टिकटिकला
'एचएमटी'च्या टिकटिकला पूर्णविराम!
शाळकरी वयात जेव्हा मला मनगटी घड्याळ हवे होते , तेव्हा ते 'एच एम टी' चेच पाहीजे होते. मिळाले नाही :-(
काकांकडे होते, त्यांचा हेवा वाटत असे.
एक फिरता मनुष्य कसलेतरी उपकरण
एक फिरता मनुष्य कसलेतरी उपकरण आणायचा. त्याला दोनचार बाजूंनी डोळे लावण्यासाठी नळकांडी असायची. पैसे देऊन त्यात पहायचे आणि त्याचवेळी तो मनुष्य कसलेतरी हँडल फिरवायचा. त्याच्या आत बहुधा हलती चित्रे दिसत असावीत. मी स्वतः त्यात का कोण जाणे पण कधीच पाहिलं नाही. त्यात काय असतं हे कळलंच नाही.
गवि : नळकांडेवाले यंत्र : बाइस्कोप
त्या उपकरणाला बाइस्कोप म्हणतात.
'आशीर्वाद' चित्रपटातले हरिंद्रनाथ चटोपाध्यायांनी लिहिलेले आणि अशोक कुमारने गायलेले 'नानी की नाँव चली' हे गाणे पाहा.
प्र. ना. संतांच्या लंपनच्या एका गोष्टीतही 'देहल्ली का कुतुबमिनार देखो, आगरे का ताजमहाल देखो' वगैरे ओरडणारा बाइस्कोपवाला आहे.
बाबाजी का बाईस्कोप अशी सिरियल
बाबाजी का बाईस्कोप अशी सिरियल डीडी वर येत असे.
दुष्मन नामक चित्रपटात देखो देखो देखो बाईस्कोप देखो! असं एक गाणं या बाइस्कोपवर आहे.
आजोबा खादीचं जाकीट घालून
आजोबा खादीचं जाकीट घालून फिरत. त्यांच्या मित्रांकडे खादीचं जाकीट तर असेच, पण टोपीदेखील असे. अपवाद म्हणजे मर्चंट नेव्हीत आयुष्य काढलेल्या आबा नावाच्या मित्राचा.
आजोबांची मूर्ती डोळ्यांसमोर आणली आणि ऑबसोलीटत्वाला गेलेल्या अनेक गोष्टी आठवल्या.
- गांधी टोपी (सभा-सणा-समारंभांना वापरण्यासाठी. एरवी चकचकीत टक्कल.)
- लेंगा (पायजमा नव्हे.) यात पायाच्या नळ्या पूर्ण समांतर असतात.
- सायकलमध्ये लेंगा अडकू नये म्हणून अर्धवर्तुळकार क्लिपा
- खादीचं जाकीट
- तंबाखूची डबी - त्यात एका बाजूला तंबाखू ठेवण्याचा खोल कप्पा, दुसर्या बाजूला चुन्यासाठी उथळ कप्पा
- दाढी करायचं खोरं, तुरटी, गोल साबण, ब्लेडस
- नक्षीदार काठी (यात गुप्ती असावी असा गल्लीतल्या मित्रमंडळींना संशय होता.)
दाढी करायचं खोरं, तुरटी, गोल
दाढी करायचं खोरं, तुरटी, गोल साबण, ब्लेडस
नै ओ. अजूनही हे सगळं आहे. फक्त तुरटी इ. अलीकडे महाराष्ट्रातून गायब झाल्यागत वाटले तरी बंगालमध्ये इ. अजूनही आहे. खोर्यात ब्लेड घालून दाढी मीही करत असतो. 'एमारार' अर्थात मट्रियल रिमूव्हल रेट त्यामुळे जसा मिळतो तसा ते जिलेट अन फिलेट मध्ये मिळत नाय. केसं लग्गेच अडकून बसतात जरा जरी दाढी वाढली की. यात मात्र तुलनेने बरीच दाढी एका दमात उतरवता येते.
तीन ब्लेडवाले जिलेट (MACH 3)
तीन ब्लेडवाले जिलेट (MACH 3) अत्यंत महागडे असल्याने आधी वापरत नव्हतो पण एकदा भेट म्हणून मिळाल्यावर लक्षात आले की या उपकरणाने बर्यापैकी म्हणजे आठवड्याभराची खुंटेही सफाचट होतात, विशेष न अडकता. अडकली तरी जरा झटकले किंवा पाण्याखाली सेकंदभर धरले तरी काम झाले.
त्या आजोबाटाईप रेझरच्या वापराने रक्तपात फार जास्त होतो. साध्या रेझरने दाढीदेखील करता येत नाही असे कितीजणांनी हिणवले तरी..
पण ब्लेड षार्प असेल तर मग
पण ब्लेड षार्प असेल तर मग त्याच्यासारखी मजा नाय.
मुळात आम्हाला स्वतः दाढी करण्यात मजा आहे हेच पटत नाही! :(
काय करणार दर दाढीला सलून परवडत नाही ना! महिना-पंधरवड्याला मात्र अजूनही सलूनमध्ये जाऊन दाढी करून येतो. वेड्या वाकड्या माना करून नी वाकडे तिकडे हात करून दाढीचे दिव्य करणे माझे नावडते काम आहे. त्यामुळे गविं म्हणतात तसेच मीही ३-४ ब्लेडचे पाते वापरून "सटासट" ते कंटाळवाणे काम उरकतो.
त्यापेक्षा सलूनमध्ये नंबर लावावा, एखाद्या टुकार चित्रपटमासिकातील देखण्या हिरवणी बघाव्यात, जोडीला इतर गिर्हाईकांसोबत नुकतीच झालेली म्याच ते राजकारण अश्या गफ्फा हाकाव्यात, त्या गप्पांतल्या एखाद्या सांगोवागींच्या चमचमीत (चावट) कथेवर न्हाव्याच्या इरसाल कमेंटची पिंक ऐकून खो-खो हसावे, आपला लंबर आल्यावर खोल जाणार्या आरश्यासमोर बसावे, पार्श्वसंगीत म्हणून छायागीत किंवा एखाद्या उंच किनर्या आवाजातील जुनी बंदीश असावी, न्हाव्यानेही न कंटाळता दाढी करावी, शिवाय मिशीला मापात आणावे, जरा डोके नी पाठ मळून द्यावी नी आपण पीसासारखे हलके डोके, फ्रेश चेहरा आणि मन घेऊन घरी परतावे!! अहाहा!!!
जरा डोके नी पाठ मळून द्यावी
जरा डोके नी पाठ मळून द्यावी नी आपण पीसासारखे हलके डोके, फ्रेश चेहरा आणि मन घेऊन घरी परतावे!! अहाहा!!!
अगदी अगदी.. आम्हीही नापितशस्त्रक्रियाप्रेमीच आहोत. घरी श्मश्रू म्हणजे केवळ आवश्यक संकट.
आणि डोके पाठ जराशीच का मळून घ्यावी?
फुल्ल हेड मसाज घ्यायचा.. पाठ, हात ऑपॉप इन्क्लूड होतातच. नंतर हाताला थरथराटी मशीन लावून डोके, चेहरा आणि शेवटी कानात एक बोट घातल्यावर अगदी अहाहा..
जाऊदे अति वर्णन नको.
आणि त्यासाठी दाढी संपल्यावर आपल्याला फक्त "हो" म्हणायचं असतं..इतकेच श्रम.
होऊ दे खर्च.. !! :)
...
पण ब्लेड षार्प असेल तर मग त्याच्यासारखी मजा नाय.
"अंकल, हम तुम को पप्पी नहीं देंगे, नहीं देंगे, नहीं देंगे... आप की दाढ़ी चुभती है!"
"नहीं बेटा, ऐसा नहीं कहते!"
"क्यूँ नहीं कहते? अंकल की दाढ़ी चुभती है| पप्पा की दाढ़ी तो, बिल्कुल नहीं चुभती!"
"तेरे पप्पा ज़ीरो ज़ीरो सेवन पनामा स्टेनलेस ब्लेड़ से दाढ़ी बनाते हैं ना!"
"अंकल, आप क्यूँ नहीं ज़ीरो ज़ीरो सेवन पनामा स्टेनलेस ब्लेड़ से दाढ़ी बनाते?"
"बेटे, आज मैं ने भी ज़ीरो ज़ीरो सेवन पनामा स्टेनलेस ब्लेड़ से दाढ़ी बनायी है|"
"अच्छा? तो लो पप्पी!"
---------------------------------------------------------------------------------
"आमच्या वेळच्या" विविध भारतीवरल्या रविवारच्या एका प्रायोजित कार्यक्रमातल्या प्रायोजकाच्या जाहिरातीतला संवाद!
(त्यापुढची जिंगल कोणाला आठवते का? काहीतरी "ज़ीरो ज़ीरो सेवन! पनामा स्टेनलेस ब्लेड़... अपने नाम का एक निराला ब्लेड़!१ ज़ीरो ज़ीरो सेवन! पनामा स्टेनलेस ब्लेड़... तेज़ धार, होशियार! अलबेला ब्लेड़!२" वगैरे?)
---------------------------------------------------------------------------------
१, २ म्हणजे काय की, त्या जाहिरात बनवणार्यासच ठाऊक!
अंकल-भतीजा यापेक्षा दुसरेच
=))
अंकल-भतीजा यापेक्षा दुसरेच नाते तरळून गेले. आणि पंजाब प्रांतातल्या स्त्रियांबद्दल मनात एकदम कणव वगैरे दाटून आली. ;)
पण बाकी काही असो, षार्प ब्लेडने दाढी करावी, अन घळघळीतपैकी आफ्टरषेव्ह घ्यावे अन चोपडावे. दिल एकदम 'ओस फास'१ हो जाता है.
१ ओल्ड स्पाईस चा अस्मादिकांनी केलेला उच्चार (वय वर्षे ५ किंवा कमी). त्याची ती जुनी सर्फिंग इ. करणार्याची झैरात यायची, तेव्हा घरातल्या शिवण मशीनच्या 'पायदाबी' वर तसे उभे राहण्याचा प्रेत्न करता करता एकदा धाडकन जोरात आपटून पडल्याने हे सगळे लक्षात आहे.
+१ -१ "फावड्याने" दाढी करणे
फावड्याने दाढी करताना रक्तपात होतो. पण कधी? फावडे धातूचे वापरले (स्टील, पितळ किम्वा एखादे जड मटिरिअल ) तर नक्कीच.
प्लास्टिकचे फावडे आणि आत ब्लेड ह्या कॉम्बिनेशन का कुणास ठाउक रक्तपात ना के बराबर झालेला आहे.
अर्थात मला भरपूर दाढी येत असली तरी मी फावडे काय नि जिलेट काय ब्लेडयुक्त काहिच वापरत नाही.
ट्रिमरने निघतात तेवढे काढतो दोन तीने आठवड्याला. मग एखाद दोन दिवस बरं दिसतं, नि मग लागलिच पुन्हा दाढी वाढलेली.
पण माझा आळस काही जात नाही.
अनुभव
अनुभव लिहिला. त्यामागील तर्कशास्त्र वगैरेचा विचार केलेला नाही. धातू जड असल्याने अधिक दाब वगैरे पडून ब्लेड खुपसली जात असावी वगैरे तर्क करुन पाहिला.
नेमकं सांगता येणं कठीण आहे; पण स्वानुभव आहे--कैकवेळा आलाय. घरात असलेलं धातूचं फावडं वापरणं सोडून दिलं नि सस्तीचं प्लास्टिक फावडं वापरु लागलो.
भोंगा
पुण्यात (किमानपक्षी 'गावा'त तरी) एके काळी रोज सकाळी साडेदहा वाजता जो एक जोरदार भोंगा वाजत असे, तो अजूनही वाजतो काय?
(इतक्यात निदान कोथरुडात तरी ऐकल्याचे आठवत नाही. बाकी, 'गावा'शी संबंध सुटून आता य वर्षे झाली.)
हा भोंगा (१) कधीपासून होता/आहे, आणि (२) नेमका कशासाठी होता, कोणी सांगू शकेल काय? (बहुधा इंग्रजाच्या काळापासून चालत आलेला असावा, अशी शंका येते, पण खात्री नाही.)
(नाही म्हणायला, १९७१च्या युद्धाच्या वेळी रात्रीच्या वेळी एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देण्याकरिता (ब्ल्याकौट करण्यासाठी) आणि एकदा धोका टळल्याची सूचना ('ऑल क्लिअर') देण्याकरिता असा दोनदा वाजवत, असे आठवते. परंतु त्याव्यतिरिक्त, त्याचा खरोखरीचा 'उपयुक्त वापर' झाल्याचे कधी आठवत नाही. रोज सकाळी साडेदहाला मात्र नेमाने वाजत असे.)
(हा भोंगा आता बंद झालेला असल्यास नेमका कधी बंद झाला, हेही कोणी सांगू शकेल काय?)
भोंगा
गावी अजुन सुद्धा दिवसातुन तीन वेळा भोंगा वाजतो.
सकाळी ८:३० - शेतकरी,कामगार, मजुरांच्या कामाला जाण्याची वेळ.
सायंकाळी ५ - कामावरुन परत येणेची वेळ
सायंकाळी ८:३० - या वेळी गावातील सर्व दुकाणे बंद होतात.
बाकी कुठे आग लागली की देखील भोंगा वाजवला जातो.
~यन्त्रमानव
भोंगा
पुण्यात (किमानपक्षी 'गावा'त तरी) एके काळी रोज सकाळी साडेदहा वाजता जो एक जोरदार भोंगा वाजत असे, तो अजूनही वाजतो काय?
तो वाजत नाही, पण बहूदा कंपन्यांचे वाजतात, कोथरुडात कमिन्स कंपनीचा भोंगा वाजतो नक्की वेळ किंवा रोज वाजतो का हे आठवत नाही.
हा भोंगा (१) कधीपासून होता/आहे, आणि (२) नेमका कशासाठी होता, कोणी सांगू शकेल काय? (बहुधा इंग्रजाच्या काळापासून चालत आलेला असावा, अशी शंका येते, पण खात्री नाही.)
रोज सकाळी साडेदहाला मात्र नेमाने वाजत असे
घड्याळाचे काटे अॅडजस्ट करण्यासाठी वेळ कळावी म्हणून होता असे निदान माझ्या माहितीत आहे.
(हा भोंगा आता बंद झालेला असल्यास नेमका कधी बंद झाला, हेही कोणी सांगू शकेल काय?)
ही माहिती घेऊन आपण काय करणार आहात? ;)
?
एलायसी बिल्डिंग बोले तो, न. चिं. केळकर रस्त्यावरची? 'जीवनदर्शन' की काय ती?
हम्म्म्म... तेथेही आणखी एखादा भोंगा असणे अशक्य नाही. मात्र, एस. पी. कॉलेजात एक होता, याबद्दल खात्री + अनुभव आहे.
त्या काळात नारायण पेठेत राहात असूनसुद्धा, आपल्याला ऐकू येणारा भोंगा नक्की कुठला, याची कधी चौकशी केली नाही. पुढे कधीतरी एस. पी. कॉलेजातला भोंगा प्रत्यक्ष ऐकल्यावर, हाच आपल्या भागालाही कव्हर करत असावा, अशी सोयिस्कर समजूत करून घेतली - आणि त्या बायॉलॉजी बिल्डिंगीच्याच बाजूला असलेल्या बॉइज़ हॉस्टेलात राहणार्या आणि तो भोंगा पॉइंट ब्ल्यांक रेंजमध्ये रोज सहन करणार्या विद्यार्थ्यांबद्दल कीवही वाटून घेतली. असो.
पण शक्य आहे. आमच्या घरी ऐकू येणारा भोंगा एस. पी. कॉलेजातला नसून एलायसी बिल्डिंगीतला असू शकेलही. कदाचित अधिक छोटा एरिया अधिक चांगल्या रीतीने कव्हर करण्याकरिता हे दोन भोंगे इतक्या जवळजवळ अंतरावर ठेवले असतीलही. (आणि तसेही, अनेकदा दोन भोंगे, एक मोठ्याने, आणि एक दूरवर कोठेतरी ब्याकग्राउण्डवर तुलनेने थोड्या हळू आवाजात - आणि फेज़ डिफरन्सने - असेही क्वचित ऐकल्यासारखे आठवते. तो दोन निरनिराळ्या भागांतले स्वतंत्र भोंगे औट-ऑफ-सिंक गेल्याचा इफेक्ट असू शकेलही. त्यामुळे, एलायसी बिल्डिंगवर आणखी एक भोंगा असणे शक्य आहे.)
पण मुळात हे भोंगे, रादर, ही सिटीवाइड भोंगा-शिष्टीम - होती नेमकी कशासाठी, हे खात्रीलायकरीत्या कळू शकले नाही.
भोंगे का वाजायचे?
वरती जी सर्व भोंग्यांबद्दल चर्चा चालू आहे त्यावरून हे भोंगे का वाजत असत हे बहुतेकांना माहीत नसावे असे दिसते. ह्याबद्दलची माझी माहिती - केवळ आठवणीतून - अशी आहे.
१९६५ आणि १९७१ ह्या दोन्ही युद्धांमध्ये काही दिवस तरी देशभर तणावपूर्ण वातावरण होते अणि नागरी संरक्षणाचा भाग म्हणून रात्री ब्लॅक-आउट, तसेच बाँबहल्ल्याची सूचना म्हणून भोंगे जागोजागी बसविले होते. प्रत्यक्ष बाँबहल्ल्याची वेळ पुण्यामुंबईवर कधीच आली नाही तरीपण भोंगे नीट चालू राहावेत ह्याची खात्री म्हणून दिवसा विशिष्ट वेळा ते वाजवत असत. तसेच ब्लॅक-आउट सुरू झाला ह्याची खूण म्हणून ते रात्री ९ वाजता वाजवत असत. युद्ध संपल्यावरहि हे चालूच राहिले आणि काही वर्षे तरी चालू होते. तेच भोंगे वरच्या सर्व चर्चेत असावेत असा माझा तर्क आहे.
विषय निघालाच आहे तर माझी ६५च्या ब्लॅक-आउटची आठवण सांगतो. मी तेव्हा टिळक रोडवर महाराष्ट्र मंडळ आणि मसाप ह्यांच्या साधारण मध्यावर असलेल्या गोखले वाडयामध्ये खोली घेऊन राहात होतो. त्या काळात ह्या वाडयामध्ये टिळक रोडवर अगदी लागून ४ खोल्या ओळीने होत्या. त्यातील पहिल्या खोलीत मी राहात असे आणि पलीकडच्या तीन खोल्यांमध्ये देवधर टाइपरायटिंग क्लास आणि देवधरांची राहण्याची जागा होती. माझ्या खोलीबाहेर अंगण आणि पलीकडे दोनमजली घरात वर स्वतः घरमालक गोखले आणि खाली दोन बिर्हाडे होती. त्यंपैकी एक एसेम जोशींचे होते. (माझ्या आठवणीप्रमाणे ताराबाई जोशींचे माहेर गोखलेच असावेत.)
ह्याच ब्लॅक-आउटमध्ये बसेस, ट्रक्स, गाड्या, स्कूटरी इत्यादींचे हेडलाइट्स अर्धे काळे करायचाहि नियम होता असे आठवते.
आपल्या खिडक्यांना पुठ्ठे लावून मी ब्लॅक-आउटची सोय माझ्या खोलीत केली होती. एका रात्री भोंगा झाल्यावर दारे-खिडक्या लावून मी आत बसलो होतो तोच दारावर ठोठावल्याचा आवाज आला. दार उघडतो तो समोर एसेम उभे. माझ्या एका खिडकीमधून उजेडाची तिरीप बाहेर दिसत आहे असे मला सांगण्यासाठी ते आले होते!
सिमला ऑफिसचा भोंगा
सिमला ऑफिसचा भोंगा अजूनही रोज वाजतो. बहुधा सकाळी ९:००, दुपारी १, दुपारी १:३० आणि संध्याकाळी ५:३० वाजता (बहुधा त्यांच्या ऑफिस व लंचटाईम सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळा असाव्यात). पण तो १०:३०च्या भोंग्यासारखा न वाजता विचित्र आवाजात डास गुणगुणल्यासारखा वाजतो. जाऊदे, मलाच त्याचं नीट वर्णन करता येत नाहीये. इच्छुकांनी शिवाजीनगर भागात जाऊन ऐकून पहावा.
अलीकडे पडद्याआड गेलेली मारुति
अलीकडे पडद्याआड गेलेली मारुति ८००. अनेकांची पहिली कार.
पूर्वीच खंडित झालेली पण टॅक्सीरुपात बराच काळ रिटायर्ड लाईफ काढलेली प्रीमियर पद्मिनी.
अॅम्बॅसिडर (चुभूदेघे).. दरारावाली कार एकेकाळची.
टेलिग्राम - तार.. धसका उत्पन्न करणारा कागद.
याचसोबत येत्या काही वर्षांत नक्की नामशेष होतील अश्या गोष्टीही नोंदवता येतील.
फॅक्स, पोस्टकार्ड, वह्या वगैरे?!
मस्त धागा! माझी
मस्त धागा!
माझी चुटपुटः
दूरदर्शनवर 'समूहगान' नामक कार्यक्रमात दाखवली जाणारी गाणी. यात पुरुष असतील तर ते हमखास खादीचे कुर्ते घालून आणि हाताची घडी घालून असत. स्त्रिया असल्या, तर त्या फिक्या रंगाच्या आणि गडद काठाच्या कुरकुरीत कांजी केलेल्या साड्या नेसून आणि हात पुढे बांधून उभ्या राहात. 'जिंकू किं॑वा मरू', 'आता उठवू सारे रान', 'जय जय महाराष्ट्र माझा' ही या कार्यक्रमातली पेटंट गाणी.