ती नक्की कोण?
भारताने वर्ल्डकप जिंकला होता आणि नागपूर नगरीमध्ये 'न भुतो न भविष्यती' अशी धम्माल सुरू होती. लक्ष्मीनगर चौकापासून ते लॉ कॉलेज चौकापर्यंत जवळजवळ सात आठ किलोमिटरचा रस्ता लोकांच्या गर्दिनी फुलून गेला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. कशीबशी एक चक्कर आजुबाजुच्या गल्लीबोळातून मार्ग काढत मारून आलो. सोबत फोटोग्राफर होता. तो त्याच्या कामात मग्न होता. एकामागोमाग एक फोटो घेत होता. लोक, मुख्यत्त्वे करून तरूणाई बेभान! निमित्तही तेवढंच भारी होतं. पोलीस रस्त्यावर उभे होते. ते सुद्धा आनंद बघत होते. काही ईलाज नव्हता. कुणाकुणाला थांबवणार? नव्वद टक्केच्या वर लोक 'प्यायलेले' होते.
निमित्त विश्वचषकाचं होतं. आनंदाचा क्षण होता. तो सगळ्यांनाच साजरा करायचा होता. विनाकारण लोकांना पकडून रंगाचा बेरंग कशाला करा? या विचाराने पोलीस आपले शांत उभे होते. ऑफीसमध्ये परत आल्यावर आपल्यालाही केवळ जल्लोषाचंच चित्रण करायचंय, असं सांगण्यात आलं. म्हटलं ठीक आहे! आनंद तर होताच! काही लोक प्यायलेले असले म्हणून काय झालं? काही राडा तर कुणीच केला नाही ना? मग झालं तर! आज अट्ठाविस वर्षानंतर आलेला हा क्षण साजरा करतांना थोडी बेपर्वाई होणारच, असा विचार केला, आणि भरपूर गर्दी असलेले फोटोस निवडून 'हिप हिप हुर्रे!' असा एक रिपोर्ट लिहून टाकला. काम रोजच्यापेक्षा लवकरच संपलं. लवकर म्हणजे रात्री दिड वाजता.
आनंदातच घरी परतलो. म्हटलं टिव्ही लावावा, आणि माहोल पहावा! जवळपास दोन अडिच चा सुमार असावा. रूमच्या खिडकीतून समोर दिसणार्र्या फाटकावर कुणीतरी गाडि ठोकल्याचा आवाज आला. खिडकी उघडून पाहिलं. समोरच्या घरात राहणारी मुलगी होती. कदाचित वर्ल्डकप चं सेलिब्रेशन मित्र-मैत्रीणींबरोबर करण्यात तीला वेळेचं भान राहिलं नसावं. घरातले लाईटस वगैरे लागलेले होते. अगदी भाडेकरूंच्या घरातले देखील. यावरून बर्र्याच वेळपासून तीच्या घरचे लोक तिची वाट पहात असतील, किंवा शोधाशोध सुरू असेल, असा अंदाज आला. तीने फाटकावर गाडी ठोकलेली पाहून सगळे चक्रावलेच! तीची आई भरकन फाटकापर्यंत धावत गेली.
"काय झालं गं!?" ती अशी अचानक पडलेली पाहून तीच्या आईने किंकाळीच फोडली. "ईंडिया ईंडिया!!!!" ती चाचपडत उठून बसत बोलली. एव्हाना त्यांच्या भाडेकरूच्या घरातून लोक फाटकाजवळ आले. गाडी उचलून घरात नेली. भाडेकरूच्या घरातील बाईला लक्षात आलं की मुलीने खूपच दारू प्यायलेली आहे. उगाच फाटकाजवळ तमाशा नको, असा विचार करून तीने माय लेकींना घरात नेण्याचा प्रयत्न सुरू केला. "चला काकू आत जाऊन बोलू. दोन वाजून गेले!" असं काहीसं बोलत ती दोघींनाही घरात नेऊ लागली. मात्र ईकडे मुलीच्या आईला खुपच मोठा धक्का बसला होता. आपली ईंजिनियरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेली पोर, मॅच बघायला म्हणून मैत्रीणीच्या रूमवर जाते काय, आणि मॅच संपल्यावरही पाच तासांनी अश्या अवस्थेत परतते काय, हे सगळं त्या बाईच्या विचारशक्तीच्या पलिकडलं होतं.
"दारू प्यायलीस? दारू?!" तीच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले होते. "डार्रू नाई मॉम... रम्म! रम्म प्यायले! वि वॉन बेबी!! ईंडिया!!!" मुलगी तर बेभानच झाली होती. तीचं हे रूप तीच्या आईने स्वप्नातदेखील कल्पीलेलं नसावं. शेवटी भाडेकरूंनी दोघींनाही घरात नेलं आणि वाद तेवढ्यापूरता मिटला. नंतर भाडेकरूंच्या घरातले लाईटस बंद झाले. मुलगी पण झिंग येऊन झोपली असावी. आई मात्र गॅलरीतच उभी होती. कदाचित रात्रभर. मग मी देखील खिडकी बंद करून घेतली.
रवीवारी सकाळी मला जाग आली तीच नेमकी माय-लेकींच्या भांडणाने! रात्री तमाशा करणारी लेक असली, तरी सकाळी (ती शुद्धीवर आल्यावर) आईने तीला फैलावर घेतलं असांवं. घराण्याची ईज्जत, माझी ईज्जत, वडिलांचं नाव, सोसायटीत, समाजात छी थू, ईत्यादी विषय बोलून झाले. ती आपली 'सॉरी मम्मी, सॉरी मम्मी' म्हणत होती. शेवटी रागाचा कडेलोट होउन आईने देव्हार्र्यासमोर डोकं आपटून घेतलं. मुलीने आणि वेळेवर घरात आलेल्या शेजार्र्यानी तीला थांबवलं नसतं तर काहीही घडू शकलं असतं. मात्र त्यानंतर सगळं शांत झालं.
सोमवारी गुढीपाडवा होता. मी पहाटे उठून प्यायचं पाणी भरत होतो. काही लोक 'पाडवा पहाट' वगैरे सारखे कार्यक्रम ऐकायला निघालेले दिसले. जरिकाठीच्या साड्या घातलेल्या काही मुलीही होत्या. आश्चर्य वाटलं. या मुलींमध्ये ती देखील होती. नउवारी साडी नेसलेली. गजरा, नथ, बांगड्या घालून अगदी छानसं गंध लावून. घरामागच्याच मैदानातच 'पाडवा पहाट' होती. औत्सुक्यापोटी तीथे गेलो. हो. तीच होती. व्यासपिठावर बसली होती. "आणि आता आपल्यासमोर गीत सादर करत आहे -- अमुक तमुक! (नाव नको लिहायला) -- " घोषणा झाली. तीने गाणं सुरू केलं. "गगन सदन, तेजोमय! तीमिर हरून करूणाकर! दे प्रकाश देइ अभय!" खुप सुरात म्हटलं. टाळ्या पडल्या. एक काका आपल्या पत्नीला हळूच म्हणाले "मुलगी किती घरंदाज आहे! सोज्ज्वळ आहे!" -- "सुंदरही आहे! अगदि साजेशी आहे अवीला!": काकुंनी सरळ मुद्यालाच हात घातला. दोघेही सुचक हसले. नंतरही बरिच गाणी झाली. तीनेही चार-पाच गाणी म्हटली. एकापेक्षा एक सुरात!
तशी ती सुरातच गाते. घरात दिवसभर गातच तर असते काही ना काही. मला ऐकू येतं. तीच्या आईला या गोष्टीचा अभिमान आहे. मुलगी छान गाते म्हणून. तीच्याबरोबर तिची आईपण एखादी ओळ म्हणून पाहते. तीचा कुठे गाण्याचा कार्यक्रम असला, की आई आवर्जुन जाते. आज मात्र तिची आई घरी होती. डोक्याला खुप जखम झाली होती. पट्टी बांधून कार्यक्रमाला गेलो, तर लोकांनी विचारलं असतं -- "काय हो काय झालं??" "हे असं कसं लागलं?!" -- मग काय सांगितलं असतं?
मध्यमवर्गिय घरातील एक मुलगी. आपली संस्कृती, आपलं संगित हे लहानपणापासून मनावर रूजवलेलं! पण कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला गेल्यावर एकदम रम पिऊन तमाशा करण्याची लहर आणि हिम्मत कशीकाय होते? ती खरी कोणती? शनिवारी रात्री दोन वाजताची की सोमवारी सकाळी साडेसहावाजताची? "मी रम्म प्यायल्लीय!!" असं आईला ओरडून सांगणारी, की "दे प्रकाश देई अभय" ही ओळ सुरात म्हणणारी? आपल्या थ्री फोर्थ जिन्स आणि तोकड्या टिशर्टचंही भान नसलेली की नऊवारी साडित नथ सांभाळत गाण्याच्या कार्यक्रमाला जाणारी? ती रात्री दोन वाजेपर्यंत मित्र-मैत्रीणींबरोबर मद्यधुंद सेलिब्रेशन करणारी की घरंदाज, सोज्ज्वळ आणि अवीला साजेशी असणारी?
ती नक्की कोण?
ऋषिकेशशी सहमत.
ती एकच. एरवी प्रयत्नपूर्वक सोज्ज्वळ अवीला साजेशी राहणारी, कदाचित समाजाच्या दबावामुळे, अपेक्षेच्या ओझ्यामुळे, घरच्यांच्या इभ्रतीच्या भितीमुळे आणि समाजाने ठरवलेल्या 'व्हॅल्यूज'च्या व्याखेत गुरफटल्यामुळे. दारू पिऊन मित्रांबरोबर मजा करणारीही तिच, फक्त जल्लोषात थोडीशी (जास्तच) वाहून गेलेली. बहूदा, सर्व अपेक्षांच्या ओझ्याला काहीकाळ का होईना डोक्यावरून बाजूला ठेवावसं वाटणारी एक 'टीनएजर'. टीनएज शेवटी शिकायचंच वय, काही उघड्या डोळ्यांनं पाहून तर काही स्वानुभवानं.
हत्ती आणि आंधळे
सर्वप्रथम, ऐसी अक्षरे वर स्वागत. अगदी रोजच्या सामान्य अनुभवांतून पडणारा प्रश्न छान रंगवून लिहिलेला आहे.
हत्तीला बहुतेकवेळा स्पर्श केला की त्याच्या पायाला हात लागतो. मग हत्ती खांबासारखा आहे असं वाटायला लागतं. हत्ती म्हणजे खांब हे एक समीकरण तयार होतं. त्यानंतर मग कधीकाळी हत्तीची शेपटी हाताला लागली की चक्रावून जायला होतं. अरे, इतके दिवस ज्याला खांब समजत होतो तो दोरीसारखा कसा काय झाला? खरा हत्ती म्हणजे नक्की काय?
यावरून एक लहानपणी वाचलेली कथा आठवली. एक तरुण आणि तरुणी पुण्याहून मुंबईला जात असतात. शेजारी बसलेले असतात. एकमेकांकडे आकर्षित होतात. फ्लर्ट करतात. बोगद्यात अंधार झाल्यावर तो तिचं चुंबन घेतो, तीही प्रतिसाद देते. हा घरी जात असतो ते मुलगी बघायला. अर्थातच हीच मुलगी त्याला दाखवायला येते. एवढ्या चटकन केमिस्ट्री जुळलेली असताना, कागदोपत्री एकमेकांना साजेसे असतानाही दोघेही एकमेकांना नकार देतात.
'घरंदाज, सोज्वळ आणि अवीला साजेशी' हे असंच हत्तीचे पाय पाहून भक्कम खांबासारखं दिसलेलं चित्र असतं. कधीकाळी बेभानपणे वागणाऱ्या चंचल दोरीचं स्वरूप हाताला लागलेलं नसतं. थोडक्यात काय सत्य स्वरूपाबद्दलच्या अपेक्षा वरवर दिसणाऱ्या गोष्टींनी ठरतात. आणि खोलवर बघून वेगळा पैलू दिसला की आश्चर्य व्हायला होतं.
लेख छान, विचार गैर
लेख म्हणून उत्तम.
खरं तर "ती कोण" ही पारख करणंच चुकीचं आहे, ती असं का वागली ह्यामागे तिचा काय विचार होता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर असं जजमेंट करणं हे गैर आहे, मुळात तुमचे तिच्या वागण्याने नुकसान होत नसेल तर असे कुठलेच जजमेंट करणे गैर आहे.
भावनांचा योग्य वेळी निचरा झाला नाही की काही वेळा टोकाची परिस्थिती उद्भवते असे अनेकदा आढळते, आणि टोकाच्या परिस्थितीमुळे भावना समजून न घेता समाज जजमेंटल झाला तर भावना अजूनच दडपल्या जातात, नशेच्या अमलाखाली केलेले कृत्य हा अनेक काळ असणार्या भावनिक न सुटलेल्या गुंतागुंतीचा परिणाम आहे, तिचा हा गुंता न सुटल्यास पुढल्यावेळी ती नशेच्या अमलाखाली चुका होउ नये ह्यासाठी प्रयत्न करेल मग ती वेगळीच असेल, मुद्दा असा की "ती कशी" ह्या प्रश्नापेक्षा "ती अशी का" हा प्रश्न एकवेळ विचारणं ठीक आहे ते देखील तिच्या आप्तांनी.
तसेच नउवारी नेसणं ही फॅशन आहे किंवा आई म्हणते म्हणून नउवारी नेसत असेल, तसेच गाणं म्हणण्याबद्दल म्हणता येइल, तीच्या ह्या कृती ती कोण हे ठरविण्यासाठी अपुर्या आहेत.
ती नक्की कशी हे जाणण्यासाठी तिची ही वागणूक-माहिती पुरेशी नाही, नशेत केलेल्या कृत्यानंतर आणि नउवारी नेसुन केलेला कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला ती किती प्रगल्भरित्या हताळते हे कदाचित ती कशी आहे ह्याबद्दल माहिती देईल ज्याबद्दल ह्या लेखात फार माहिती नाही, त्यामुळे ह्या लेखाचा उत्तरार्ध म्हणून दुसरा लेख देउन त्यात मुलीची मानसिकता मांडावी असे मी लेखकाला अथवा येथील समस्त स्त्रिवर्गाला विनंती करतो.
अर्थात हे एक काल्पनिक उदाहरण आहे पण ही पारख करण्याची वृत्ती मात्र खरी आहे, ती फार चुकीचीच आहे.
ह्या लेखाचा उत्तरार्ध म्हणून
ह्या लेखाचा उत्तरार्ध म्हणून दुसरा लेख देउन त्यात मुलीची मानसिकता मांडावी असे मी लेखकाला अथवा येथील समस्त स्त्रिवर्गाला विनंती करतो.
त्याची फार आवश्यकता नाही असं वाटतं.
परीक्षेत पहिला नंबर मिळवणारा, बोर्डात येणारा, इंजिनियर नाहीतर डॉक्टर असणारा मुलगा नाक्यावर उभा राहून इतर चारचौघांसारखा मित्रांबरोबर नाक्यावर उभा राहून पोरींकडे पहाणे, कमेंटा करणे असे प्रकार करतो. घासू, चष्मिष्ट दिसणारी नर्डी पोरंही असे प्रकार करत नाहीत यावर माझातरी विश्वास नाही. धागालेखकाचं अस्संच मत आहे असं नाही पण, संस्कृती जपण्याचा मक्ता एकदा पोरीबाळींकडे सोपवला की मग "मुलगी शिकली प्रगती झाली" टाईप्स शॉव्हनिस्ट चित्रं फेसबुकावर फिरतात किंवा "केवढी ही विसंगती!" अशी मतप्रदर्शनंही दिसतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे, स्त्रीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्या मुली-बायकांना स्वयंपाक येतच नसेल, घरातल्या समस्त पुरूषांशी, विशेषतः (असल्यास) बॉयफ्रेंड वा नवर्याशी त्या कडाकडा भांडतच असतील अशाच कल्पना डोक्यात असतात.
मित्रमंडळाबरोबर असणारं वर्तन, वडीलधार्यांबरोबर असणार्या वर्तनापेक्षा बरंच वेगळं असायचंच; एवढंच काय, आपल्याच वयोगटातल्या भावंडांशी असणारे संबंधही वेगळे असू शकतात. वेगवेगळ्या वयांत आपले वडीलधार्यांशी असणारे संबंध बदलतात. नऊवारी नेसणे म्हणजे सुसंस्कृतपणाचा कळस नाही आणि कधीतरी दारू जास्त झाली म्हणजे बाईचं काचेसारखं असणारं (हा पण एक मजेशीरच भाग) शील मोडलं अशातला भाग नाही. ठसठशीत मंगळसूत्र हे पातिव्रत्याचं लक्षण नाही आणि इतर पुरूषांशी बोलणं म्हणजे एकपतीव्रत तोडणंही नाही.
धाग्यात वर्णन केल्याप्रमाणे वागणार्या मुलीही (खरंतर अशाच मुली असं म्हणण्याचा मोह होतो आहे) नॉर्मलच आहेत. त्यांना आपलंच म्हणा!
फरक
त्यांना आपलंच म्हणा!
हे वाक्य वाचुन एकदम शासनाची दुर्लक्षित(नक्की आठवत नाही)/एड्सग्रस्त मुलांबद्दलची जाहिरात आठवली, आपलं वगैरे म्हणण्यामधे त्या मुली रस्त्यावर आहेत असं वाटतं, असो तुम्हाला ते म्हणायचं नव्हतं हे लक्षात येतं पण ते वाक्य खटकलं.
धाग्यात वर्णन केल्याप्रमाणे वागणार्या मुलीही (खरंतर अशाच मुली असं म्हणण्याचा मोह होतो आहे) नॉर्मलच आहेत.
असं असल्यास, नॉर्मलची व्याख्या करावी लागेल(उपक्रम!!), धाग्यात वर्णन केलेल्या मुलीचे वागणे थोडे विक्षिप्त आहे, ते कायमच तसे असते तर ही चर्चाच झाली नसती, कायमच वेगळ्या वागणार्या मुलींचे वागणे अशाप्रकारे जज केले जात नाही(त्यांच्यावर 'ती तशीच आहे' असा शिक्काच बसतो), त्यामुळे ती नॉर्मल नाही तर ती नॉर्मल व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे, आकर्षणातून/दबावातून गोष्टी करुन (सापेक्ष) चूक/बरोबर काय हे शिकणे नेहमीच योग्य नाही, विचार करुन केलं आहे तर ते तसचं ठाम ठेवा, नसेल तर विचार करायला हवा एवढचं माझं मत आहे.
खरंतर अशाच मुली असं म्हणण्याचा मोह होतो आहे
त्या मुलीची भुमिका कळेपर्यंत ती नॉर्मल आहे असे म्हणणं खूपच सापेक्ष आहे.
परीक्षेत पहिला नंबर मिळवणारा, बोर्डात येणारा, इंजिनियर नाहीतर डॉक्टर असणारा मुलगा नाक्यावर उभा राहून इतर चारचौघांसारखा मित्रांबरोबर नाक्यावर उभा राहून पोरींकडे पहाणे, कमेंटा करणे असे प्रकार करतो. घासू, चष्मिष्ट दिसणारी नर्डी पोरंही असे प्रकार करत नाहीत यावर माझातरी विश्वास नाही. धागालेखकाचं अस्संच मत आहे असं नाही पण, संस्कृती जपण्याचा मक्ता एकदा पोरीबाळींकडे सोपवला की मग "मुलगी शिकली प्रगती झाली" टाईप्स शॉव्हनिस्ट चित्रं फेसबुकावर फिरतात किंवा "केवढी ही विसंगती!" अशी मतप्रदर्शनंही दिसतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे, स्त्रीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्या मुली-बायकांना स्वयंपाक येतच नसेल, घरातल्या समस्त पुरूषांशी, विशेषतः (असल्यास) बॉयफ्रेंड वा नवर्याशी त्या कडाकडा भांडतच असतील अशाच कल्पना डोक्यात असतात.
खरयं :) स्टिरीओटाईप्ड समाज, पण शहरी मध्यमवर्गीय भागात अशी मतं हल्ली कमी आढळतात.
आपली बरीचशी सहमती दिसते
आपली बरीचशी सहमती दिसते आहेच.
हे वाक्य वाचुन एकदम शासनाची दुर्लक्षित(नक्की आठवत नाही)/एड्सग्रस्त मुलांबद्दलची जाहिरात आठवली, आपलं वगैरे म्हणण्यामधे त्या मुली रस्त्यावर आहेत असं वाटतं, असो तुम्हाला ते म्हणायचं नव्हतं हे लक्षात येतं पण ते वाक्य खटकलं.
कुष्ठरोग्यांबद्दलचा माहितीपट होता, त्यात हे वाक्य होतं, "त्यांना ... आपलं म्हणा!"
रस्त्यावर आहे असं नाही, पण कुचेष्टेचा विषय होऊ शकणारी असं वर्णन निश्चित करता येईल. ही मुलगी आणि माझ्यात तपशीलात फरक आहे, पण हा एकप्रकारे मी स्वतःवरच केलेला विनोद आहे.
या मुलीला मी नॉर्मल समजते कारण कॉलेजच्या वयात ती मित्र-मैत्रिणींबरोबर मजा करते आहे, सणासुदीच्या दिवशी हौस-मौज करते आहे; मजा करताना ती संस्कृतीरक्षण करत नाहीये आणि सणासुदीच्या दिवशी मूर्तीभंजन करण्यासाठीच्च जीन्स-टीशर्ट घालत नाहीये. थोडक्यात ती मन मारून (अनेक मुली असायच्या) तशी रहाताना दिसत नाहीये. इतर चारचौघांसारखीच मजा करते आहे.
पण शहरी मध्यमवर्गीय भागात अशी मतं हल्ली कमी आढळतात.
सकारात्मक बदल होत आहे यात शंका नसली तरीही, प्रॉपगंडा म्हणता यावा असे फोटो, कमेंट्स आणि स्टेटस अपडेट फेसबुकावर पाहून तुम्ही-आम्ही अल्पमतात आहोत असं अनेकदा वाटतं.
नॉर्मल...
स्थल कालानुरुप गोष्टी नॉर्मल आहेत की नाहित हे साम्गता येइल. सरसकट सांगने कठीण वाटते.
सध्या भारतात(मेट्रो शहरे, अतिश्रीमंत आणि अतिगरिब समाज) सोडल्यास स्त्रीने तोल जाइस्तोवर दारु पिणे नॉर्मल समजले जात नाही.
भरपूर मुली भरपूर दारु पितील व पुढे आपल्या मुलींनाही उजळ माथ्याने (तोल जोइस्तोवर) पिउ देतील, शुद्धीवर आल्यावर आपण दारु पितो हे सांगायची लाज वाटणार नाही, तेव्हा हेच वागणे नॉर्मल ठरेल.
सध्या तरी प्रत्यक्षात, चारचौघात, जाहिर ठिकाणी "मी दारु पिते" हे भारतातल्या बहुतांश मद्यप्रेमी,मद्य सेवनकर्त्या नाकारतीलच.
म्हणजेच ह्या समाजात ते नॉर्मल नाही.
स्त्रीचे मद्यप्राशन हा जसा अगदि लपवून ठेवावासा लज्जास्पद डाग वगैरे नाही, तद्वतच फार मोठा गौरवाने, उच्चारवात पुरस्कार करावा,समर्थन द्यावे असा दागिनाही हे जेव्हा समाजमान्य होइल, तेव्हा ते नॉर्मल गणले जाइल.
विचारवंतांच्या आणि पुढारलेल्यांच्या संकेतस्थळांवर आमच्यासरख्यांना "मी नाही पीत" हे सांगणे जसे सांगणार्यास विचित्र्, केविलवाणे,लाजिरवाणे करुन सोडते तद्वतच ह्या हस्तिदंती मनोर्याबाहेर "मी पिणार्यांपैकी आहे" हे सांगणेही विकतची डोकेदुखी ठरेल.
संपूर्ण प्रतिसाद स्त्रीचे मद्यप्राशन ह्याभोवतीच घुटमळतो आहे, तिच्या त्या दोन दर्शनी व्यक्तिमत्वांबद्दल नाही ह्याची कल्पना आहे. म्हणूनच हा उपप्रतिसाद म्हणून दिला आहे, मूळ धाग्यास प्रतिसाद म्हणून नाही.
न पिणारा
सध्या तरी प्रत्यक्षात,
सध्या तरी प्रत्यक्षात, चारचौघात, जाहिर ठिकाणी "मी दारु पिते" हे भारतातल्या बहुतांश मद्यप्रेमी,मद्य सेवनकर्त्या नाकारतीलच.
ग्रामीण भागातल्या कित्येक स्त्रिया हे अगदी सहजतेने सांगतात. शहरी भागातल्या, घरकाम वगैरे करणार्या स्त्रियाही मद्यपान करत असतील तर लपवताना दिसत नाहीत. आमच्या घरी कामाला येणार्या दोन मावश्या अगदी झोकात हे सांगायच्या.
दहा वर्षांपूर्वी मी मुंबई विद्यापीठात शिकत होते तेव्हा तिथल्या अनेक विद्यार्थिनी अगदी मोकळेपणी दारू प्यायच्या, आणि त्याबद्दल बोलायच्या. मी आणि माझ्या समव्यावसायिक मैत्रिणी आवडीने दारूबद्दल, दारू पीत चर्चा करतो. एकीने तर "तू गुजराथमधे नोकरी करशील का?" हा प्रश्न ते राज्य 'कोरडं' आहे या पार्श्वभूमीवर, जवळच्या चार-सहा मित्रमैत्रिणींना विचारला होता. अगदी घरातल्या मोठ्यांसमोर, त्यांच्या बरोबरीने दारू पिणार्या मुली, स्त्रिया माझ्या ओळखीत आहेत. बरं हे ओळखीचे लोकं तसे माझ्यासारखे देव-धर्म, रूढी-परंपरा सोडलेलेही नाहीत. सोकाजीच्या 'गाथे'वर प्रतिसाद देणारे स्त्री-आयडी आहेत.
सहसा दारू पिणे म्हणजे तोल जाईस्तोवर पिणे नाहीच. कॉलेजं संपेस्तोवर तेवढी अक्कल बहुतेक पिवय्यांना (खवय्यांसारखे पिवय्या) येतेच. 'तपशीलांत फरक' असा जो मी उल्लेख केला तो त्याच कारणाकरता! खालच्या प्रतिसादात धनंजयने त्याचं कारणही व्यवस्थित सांगितलेलं आहे.
आवडते म्हणून दारू पिणारे बहुतेकसे लोकं 'न पिणार्यां'ना केविलवाणे वगैरे करून सोडतात असा माझा अनुभव नाही. अनेक भारतीय आणि पाश्चात्य पिणार्या, न पिणार्यांसोबत असाच चांगला अनुभव आहे. किंबहुना अमका एक दारू पित नाही त्यासाठी काही इतर सोय आधीच करून ठेवणे वगैरे प्रकारही होतात.
फॅशन म्हणून पिणारे तापदायक असतात. पण तसं असेल तर फॅशन म्हणून मांसाहार (किंवा क्वचित शाकाहारही फॅशनेबल असतो) करणारेही तेवढेच तापदायक असतात. फॅशन म्हणून देवदेवस्की करणारे तर मला त्याहून अधिक तापदायक वाटतात. ते पारच जीव खातात.
सहमत
आपली बरीचशी सहमती दिसते आहेच.
सहमत.
या मुलीला मी नॉर्मल समजते कारण कॉलेजच्या वयात ती मित्र-मैत्रिणींबरोबर मजा करते आहे, सणासुदीच्या दिवशी हौस-मौज करते आहे; मजा करताना ती संस्कृतीरक्षण करत नाहीये आणि सणासुदीच्या दिवशी मूर्तीभंजन करण्यासाठीच्च जीन्स-टीशर्ट घालत नाहीये. थोडक्यात ती मन मारून (अनेक मुली असायच्या) तशी रहाताना दिसत नाहीये. इतर चारचौघांसारखीच मजा करते आहे.
इथल्या कथेत ती अपघात वगैरे करण्याइतपत पिते आहे म्हणून थोडसं अब-नॉर्मल वाटलं, नॉर्मल बद्दल असहमती पण तो मुद्दा इथे नाही.
सकारात्मक बदल होत आहे यात शंका नसली तरीही, प्रॉपगंडा म्हणता यावा असे फोटो, कमेंट्स आणि स्टेटस अपडेट फेसबुकावर पाहून तुम्ही-आम्ही अल्पमतात आहोत असं अनेकदा वाटतं.
बहुतेक वेळा ज्ञान आणि विवेकाचं प्रमाण व्यस्त असतं :)
आवडते म्हणून दारू पिणारे बहुतेकसे लोकं 'न पिणार्यां'ना केविलवाणे वगैरे करून सोडतात असा माझा अनुभव नाही. अनेक भारतीय आणि पाश्चात्य पिणार्या, न पिणार्यांसोबत असाच चांगला अनुभव आहे. किंबहुना अमका एक दारू पित नाही त्यासाठी काही इतर सोय आधीच करून ठेवणे वगैरे प्रकारही होतात.
फॅशन म्हणून पिणारे तापदायक असतात. पण तसं असेल तर फॅशन म्हणून मांसाहार (किंवा क्वचित शाकाहारही फॅशनेबल असतो) करणारेही तेवढेच तापदायक असतात.
सहमत.
फॅशन म्हणून देवदेवस्की करणारे तर मला त्याहून अधिक तापदायक वाटतात. ते पारच जीव खातात.
हाहाहा !!
अवी अधूनमधून दारू पितो काय?
अवी कितपत दारू पितो, हे सांगितलेल्या कथेवरून कळत नाही.
अवीला मुलींनी केलेला पारंपरिक नट्टाफट्टा आणि म्हटलेली पारंपरिक गाणी आवडत असतील, आणि अधूनमधून* तोसुद्धा दारू पीत असेल, तर या दोन बाबतीत जोडा साजेसा आहे. पुढे अवी आणि ही मुलगी एकत्र राहाणार असतील, तर शक्यतोवर त्यांच्यापैकी एका व्यक्तीने दारू पिऊ नये - न प्यालेल्या व्यक्तीने गाडी चालवावी ("डेसिग्नेटेड ड्रायव्हर"). अशा प्रकारे अपघात टळतील.
*पिऊन देहभान विसरणारी, बरळणारी मुलगी ही अधूनमधून नव्हे, तर फार क्वचित पिणारी असेल, ही शक्यता मनात ठेवली पाहिजे. जे लोक नियमित दारू पितात, त्यांच्यापैकी पुष्कळ लोकांना (१) किती प्याल्यावर थांबायचे ते कळते, अथवा (२) चिकार पिऊनसुद्धा दारू तितकी चढत नाही.
स्वागत
सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत! :)
विषय मांडलाय चांगला.. केवळ चर्चा सुरू करण्यापेक्षा एखाद्या घटनेतून-मुळे जन्माला आलेले प्रश्न मांडण्याची पद्धत आवडली.
आता मुळ चर्चेबाबतः
मात्र माझ्या मते दोन्हि रूपे खरि आहेत.. रात्री (किंवा कधिहि) रम - किंवा कोणतीही दारू - पिणे आणि सकाळी दिवसानुरूप साजेसा पोशाख करून जाणे, उत्तम गायन करणे यात विसंगती अजिबात वाटत नाहि
माझे कित्येक मित्र उत्तम पदांवर आहेत, चांगले कलाकार काहि कलासक्त आहेत.. मात्र त्यातील बहुतांश दारु पितात, क्वचित कधीतरी त्यांचा जास्त मद्यसेवनाने तोल गेला नसेलच असे नाही.
त्यामुळे वरील मुलीवरचा आक्षेप नीटसा समजु शकलो नाही
(हा! ती केवळ मुलगी आहे म्हणून तीने हे केल्याने हा आक्षेप असेल तर तो अमान्य आहे हे वे सां न)