Skip to main content

घातक स्युडोमार्ग

"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!

=========

"साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव! महात्मा गांधींपासून ते डॉ आंबेडकरांपर्यंत आणि पंडीत नेहरूंपासून ते मनमोहनसिंगांपर्यंत कोणालाही काहीही विचार न करता क्षणात झाडून टाकायला हे "स्युडो" हत्यार मंडळींच्या हातात आलं आहे. विचाराचा प्रतिकार करू न शकणारी लोकं मग व्यक्तीच्या वागण्यावर घसरतात आणि मग त्याचं वागणं तसं नव्हतं ना? त्याचं वागणं असं होतं ना? मग काय बाता करता?
अरेच्या! त्याचे विचार चुक आहेत की नाहीत ते बोला! हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...

माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्‍या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या त्याच व्यक्ती असतात ज्या परंपरेने चालत आहे, संस्कारांमुळे गरजेचे आहे असल्या भुलथापांच्या पलिकडे जाऊन तर्काला, बुद्धीला जे पटेल त्यावर आपले मत बनवतात. प्रत्येकवेळी परिस्थितीमुळे, काही भावनिक कारणांमुळे कधी कायद्याच्या भितीमुळे किंवा कधी कायदा मोडायची प्रत्यक्ष धमक नसल्याने असेल ते तसे वागु शकतीलच असे नाही. पण त्यांनी दिलेला विचार हा समाजाला पुढेच घेऊन जात असतो. पुरोगाम्यांचा आवाज दाबल्यावर, त्या व्यक्तींना आउटराईट रिजेक्ट केल्यावर भुतकाळात अडकलेल्या रादर रुतलेल्या आणि लोकांच्या निव्वळ अस्मितांना चुचकारत नेतृत्त्व करू पाहणार्‍या परंपरावाद्यांच्या हातात नेतृत्त्व गेलं की देशाचा, समाजाचा फक्त पाकिस्तान होऊ शकतो इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.

पुरोगामी, लिबरल म्हणजे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही किंवा विशिष्ट काळाचीही नाही. एखादी गोष्ट निव्वळ चालत आली आहे, किंवा "हे करून कुणाचं वैट झालंय का?" किंवा "आमच्या पिढ्यान पिढ्या असं वागत आल्या आहेत" किंवा "आपल्या धर्मात, जातीत, 'लोकांत' हे असंच चालतं" असली कारणं आपली मते बनवायला पुरेशी न वाटणार्‍या कोणत्याही व्यक्तीला मी पुरोगामी म्हणेन. पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो. या वर्गाचे अस्तित्त्वच नसेल तर समाज पुढे जाईलच कसा?

समाजाला साचु न देता सतत पुढे खेचत रहायचे अतिशय महत्त्वाचे कार्य हा अभिजन वर्ग करत असतो. आजवर त्यांच्या कृतीवर असंख्यवेळा टिका झाली आहे. होत असते. आणि ती होणारच कारण ते "स्टेटस कूओ" भेदत असतात त्याला विरोध हा अध्याहृत असतो. मात्र भारतात आजवर सुदैवाने हा विरोध विचारांना व कृतीला झाला आहे. त्या व्यक्तीला मात्र समाजात आदरच मिळत आला आहे. ज्योतिबांसारख्या व्यक्तीला मोठा विरोध झाला पण तो त्यांच्या कार्याला व विचारांना झाला. त्यांना अडवण्यात आले, त्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या पण समाजाने ज्योतिबांना शेवटी गौरवलेच. त्यांना आउटराईट रिजेक्ट केले नाही. त्यांना होणारा विरोध हा त्यांना "ग्राह्य" ठरवल्यानंतरची स्टेज आहे. आता लगेच प्रतिवाद येईल की ज्योतिबांना आदर दिला गेला नाही तो त्यांनी त्यांच्या कृतीतून मिळवला आहे. अर्थातच! तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे! पण म्हणून तुलनेने कमी कृती करू शकणार्‍या / इच्छिणार्‍या किंवा वेगळ्या प्रकारे/माध्यमांतून समाजप्रबोधन घडवू पाहणार्‍या आगरकर व/वा गोखल्यांसारख्यांच्या विचारांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.

कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते. स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. त्यांचे काही विचार कित्येकदा पूर्णपणे चुकीचेही असतील पण ते त्यांना मांडु देण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारीच नाही तर अत्यावश्यक कर्तव्य आहे. आततायी वाटणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांचा प्रतिवाद करा मात्र त्या व्यक्तीला रिजेक्ट करून, कायमचे अग्राह्य ठरवून त्याच्याकडून येणार्‍या/येऊ शकणार्‍या किंवा आधीच आलेल्या इतर विषयांवरच्या संभाव्य महत्त्वाच्या विचारांनाही तुम्ही घाऊकपणे दूर लोटता आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीन आणलेल्या वेगाबरोरच भारतात हा होऊ घातलेला नवा बदल आता सामान्य लोकांमध्ये खूप वेगात रूजतो आहे याची खंत अतिशय बोचरी आहे.

या मुक्तचिंतनावरही येणार्‍या प्रतिसादांची पूर्ण कल्पना आहे. त्यावर मी प्रतिवाद करेनच, प्रतिसाद देईनच असे नाही. मात्र त्यात येणार्‍या विचारांवर पूर्ण व आदरपूर्वक विचार करेन इतके मात्र नक्की! बरेच दिवस साचले होते, एकहाती, एकटाकी टंकले आहे. प्रमाणलेखनदोष पदरात घ्याल अशी आशा!

Node read time
4 minutes
4 minutes

Nile Tue, 02/09/2014 - 00:34

In reply to by बॅटमॅन

भारीच विनोदी ब्वॉ तुम्ही!

पुरोगाम्यांचे नुस्ते विचार समाजाने नुस्तेच ऐकून सोडून दिले तर चालेल का? समाजाकडून नक्की कसली अपेक्षा आहे? आचाराची अपेक्षा आहे का?

जसं काय समाज म्हणजे एकाच विचारसरणीने चालणारा कोणता एकसंध गटच आहे. समाजात मेंढरांसारखे चालणारे अनेक असतातच, पण जे किरकोळ विचार करणारे असतात तो योग्य त्या विचारांना अन आचांराना आत्मसात करतातत. तेव्हा तुम्ही फार काळजी करू नका.

मन Mon, 01/09/2014 - 17:19

आता गप्प राहवत नाही. बोलतो आहे.
मी तुम्हाला डिस्क्रेडिट करतो (किंवा तुम्ही मला डिस्क्रेडिट करता) तेव्हा त्यात फार काही चूक आहे असं वाटत नाही.
अगणित लोकांनी अगणित विषयांवर मतप्रदर्शन सुरु केलं तर मी नक्की कुणाकुणाकडे लक्ष द्यायचं?
साहजिकच मी चाळणी वापरतो. मतप्रदर्शनकर्ता "सर्टिफाइड" असणे ही ती मुख्य गोष्ट.
म्हणजे पॉल क्रुगमन , केळकर समितीवाले केळकर किंवा रघुराम राजन ह्यांनी आपापली क्रेडेन्शिअल्स सिद्ध केलेली आहेत.
ही माणसं आर्थिक किंवा अर्थराजकीय बाबतीत काही बोलली तर मी लक्ष देइन.
किंवा एखाद्याकडे असे कागदोपत्री क्रेडेन्शिअल्स नसले पण प्रत्यक्ष प्रमाण असलं तरी मी लक्ष देइन.
(उदा :- बचतगट वगैरे चालवण्याचा अनुभव असणारी मंडळी, सिंधूताई सपकाळ ह्यांचं लौकिकार्थानं शिक्षण काय हे महत्वाचं ठरत नाही. त्यांच्या कामाचा स्केल हा त्यांच्या क्षमतेचा पुरावा असतो. तिथे कागदी पात्रता पहायची गरज नाही. किंवा महंमद युनुस ह्यांनी माइक्रो फायनान्सबद्दल प्रत्यक्ष प्रयोग करुन दाखवलेत. त्यांच्याकडे सम्जा समकक्ष
अर्थशास्त्र्यांपेक्षा दुय्यम डिग्र्या आहेत; तरी फरक पडत नाही. बांग्लादेशात दणक्यात सुरु असलेली "ग्रामीण ब्यांक" , माइक्रोफायनान्स हा कर्तृत्वाचा धडधडित पुरावा आहे.)

ह्या सगळ्याऐवजी उद्या बॅट्या येउन फंडे मारायला लागला की " रघुराम राजन येडा आहे. त्याने नोटा छापत सुटले पाहिजे. " किंवा "प्रगत देशात एखाद दोन टक्केच व्याजदर मध्यवर्ती ब्यांका आकारतात; भारतातही तेच करावे." तर मी त्याला विशेष महत्व देणार नाही.
त्यासाठी बॅट्याला प्रत्यक्ष अनुभव हवा. किंवा त्याचे अधिक क्रेडेन्शिअल्स हवे. किंवा निदान त्यातली अक्कल बॅट्याला निदान माझ्याहून अधिक आहे ; निदान त्याला काही एक त्या क्षेत्रातली काहीएक अक्कल असं मला वाटायला हवं.
(आता इतरांना शहाणपणाची सर्टिफिकेट वाटत सुटणारा मी कोण टिको़जीराव? हा स्वाभाविक प्रश्न. पण शेवटी "ऑब्झर्वर" मीच ना! शिवाय मला सदैव उपलब्ध असलेली अशी व्यक्ती/सर्टिफिकेशन यंत्रणाही मीच आहे. त्याला नाइलाज आहे साहेब.)

आता हे स्वतःच्या नकळतपणे implicitly आपण सगळेच करतो. अगणित माहितीचा मारा मर्यादित विश्लेषण व ग्रहण क्षमता असलेल्या मानवी मेंदूवर आदळायला लागला की हा अल्गोरिदम वापरला जातो.
सॉरी, ६०० कोटी लोकांतील प्रत्येकाचं ६०० विविध विषयावरच म्हण्णं ऐकणं,त्यावर विचार करणं माझ्या कुवतीबाहेर आहे.

डिस्क्लेमर : -
ऐसीवर मागील काही दिवस तोंड गप्प ठेवून अज्ञान झाकायचा लै प्रयत्न केला. आता राहवले नाही.
शिवाय इतक्या चांगल्या पद्धतीनं मांडलेल्या विषयावर प्रतिकूल मत देत विरजण घालणंही नको वाटत होतं.
पण चर्चा वाचून उचकलो.

बॅटमॅन Mon, 01/09/2014 - 17:43

In reply to by मन

सॉरी, ६०० कोटी लोकांतील प्रत्येकाचं ६०० विविध विषयावरच म्हण्णं ऐकणं,त्यावर विचार करणं माझ्या कुवतीबाहेर आहे.

असं कसं असं कसं असं कसं?

आता हे स्वतःच्या नकळतपणे implicitly आपण सगळेच करतो. अगणित माहितीचा मारा मर्यादित विश्लेषण व ग्रहण क्षमता असलेल्या मानवी मेंदूवर आदळायला लागला की हा अल्गोरिदम वापरला जातो.

लिबरलांनी केलं तर ऑप्टिमल स्ट्रॅटेजी, बाकीच्यांनी केलं की वैयक्तिक द्वेष!

चिंतातुर जंतू Mon, 01/09/2014 - 18:48

In reply to by मन

>> सॉरी, ६०० कोटी लोकांतील प्रत्येकाचं ६०० विविध विषयावरच म्हण्णं ऐकणं,त्यावर विचार करणं माझ्या कुवतीबाहेर आहे.

काही तरी गोंधळ होतो आहे असं वाटतंय. मूळ धाग्यात ज्या 'आउटराइट रिजेक्शन'बद्दल बोललं गेलंय ते माझ्या मते बहुमतात नसलेल्या, पण बहुसंख्यांहून किंवा रूढ परंपरेहून वेगळं काही तरी मांडत असलेल्या लोकांबद्दल आहे. अशी माणसं कोणत्याही काळात आणि कोणत्याही समाजात फार थोडी असणार. उदा : मूळ धागा वाचून मला लोकहितवादी पटकन आठवले. त्यांच्याविषयी अशी टीका झाली होती (तपशीलातली चूभूद्याघ्या) -

  • त्यांनी इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीवर टीका वगैरे केली, पण ते आयुष्यभर इंग्रजांच्या चाकरीत राहिले. शिवाय, त्यांच्याकडे मूळची देशमुखी. घरचं सगळं सुस्थितीत असताना लोकांना उपदेश करायला कुणाचं काय जातं?
  • त्यांनी धर्मावर, जातिभेदावर टीका केली, पण घरात धर्माचार पाळला.

वगैरे. आज त्यांच्यावरची टीका कुणाच्या लक्षात आहे? पण त्यांचे विचार प्रतिष्ठित होऊन कित्येक वर्षं लोटली. असो.

'आउटराइट रिजेक्शन' हे क्रेडेन्शिअल्स तपासण्याचं सबसेट ठरवता यावं असं म्हणतो आहे.
किंवा एखाद्याकडे असे कागदोपत्री क्रेडेन्शिअल्स नसले पण प्रत्यक्ष प्रमाण असलं तरी मी लक्ष देइन.
असं मी म्हणतो तेव्हा विधान करणार्‍या व्यक्तीची स्वतःची वागणूक हा एक "प्रत्यक्ष प्रमाणा"चा सबसेट धरता यावा असं म्हणणं आहे.
(म्हणजे समोरच्याकडे किमान काही क्रेडिबिलिटी आहे असे मला वाटेल, तो/ती दखलपात्र वाटेल. )

"माणसानं घर खरेदी करण्याची विशेष गरज नाही. भाड्याच्या घरात आख्खं आयुष्य काढणं वाटतं तितकं कठीण नाही" हे विधान गृहखरेदी परवडत असतानाही
खरोखर भाड्याच्या राहणार्‍या माणसानं म्हटलं तर पुढं चर्चा करणं सोपं जात. एज इन -- "बाबा रे, त्या अमुक तमुक अडचणी भाड्याच्या घरात येतात, त्या तू कशा सोडवल्यास"
, "स्वतःच्या व आप्तांच्या भावनिक हिंदोळ्यांना कसे हॅण्डल केलेस, असे करता येते का" हे विचारत चर्चा पुढे सुरु ठेवणे सोपे जाते.
स्वतः चांगल्यापैकी घरात राहणार्‍यानं " असल्या घराची गरज नाही " म्हटलं चर्चेत त्यानंतर येणार्‍या शंका नेमक्या उपस्थित कशा कराव्यात हेच समजत नाही.

चिंतातुर जंतू Mon, 01/09/2014 - 19:01

In reply to by मन

>> विधान करणार्‍या व्यक्तीची स्वतःची वागणूक हा एक "प्रत्यक्ष प्रमाणा"चा सबसेट धरता यावा असं म्हणणं आहे.
(म्हणजे समोरच्याकडे किमान काही क्रेडिबिलिटी आहे असे मला वाटेल, तो/ती दखलपात्र वाटेल. )

असं म्हणून आपण लोकहितवादींना आउटराइट रिजेक्ट केलं असतं का, ते आपणच तपासून पाहा. बाकी तत्त्वतः वगैरे ठीकच आहे.

मन Mon, 01/09/2014 - 19:10

In reply to by चिंतातुर जंतू

लोकहितवादी ह्यांचे आचरण विसंगत असले तरी मुळात एकोणिसाव्या शतकातील ते एक सर्टिफाइड शहाणी व्यक्ती आहेत.
(चांगला शिकलासवरलेला व अधिकारपदावरील व्यक्ती. स्वतः पॉलिसी मेकर नसला तरी पॉलिसी अ‍ॅनालिसिस करु शकणारा व मोठ्या हुद्द्यावर असणारा व्यक्ती.)
थोडक्यात , किंवा एखाद्याकडे असे कागदोपत्री क्रेडेन्शिअल्स नसले पण प्रत्यक्ष प्रमाण असलं तरी मी लक्ष देइन.
असं मी म्हणतो तेव्हा कागदोपत्री क्रेडेन्शिअल्स असणारा विद्वान ह्या व्याख्येत लोकहितवादींना बसवता यावं.
(त्यांच्याबद्दल किंवा एकूणातच इतिहासाबद्दल(किंबहुना जगातील बहुतांश विषयांबाबत) आमचे ज्ञान व आकलन यथातथाच आहे. तुम्ही दिलेल्या मजकूरातील ऐतिहासिक तथ्ये
योग्य आहेत असे मानून पुढचा प्रतिसाद दिला आहे. )
थोडक्यात आचरण तरी सुसंगत हवं (किंवा " प्रत्यक्ष प्रमाण " हवं) किंवा " कागदोपत्री क्रेडेन्शिअल्स "(सर्टिफिकिटे) तरी हवीत.

चिंतातुर जंतू Mon, 01/09/2014 - 19:36

In reply to by मन

>> लोकहितवादी ह्यांचे आचरण विसंगत असले तरी मुळात एकोणिसाव्या शतकातील ते एक सर्टिफाइड शहाणी व्यक्ती आहेत.

मूळ धाग्यातलं 'आउटराइट रिजेक्शन' त्या काळाच्या संदर्भात पाहावं लागेल. १८९२ साली लोकहितवादींचा मृत्यू झाला. हे शहाणपणाचं सर्टिफिकेट त्यांना कधी मिळालं असेल? मराठी विश्वकोशातून उद्धृत -

लोकहितवादींच्या विचारांकडे दीर्घ काळ उपेक्षेने पाहिले गेले, त्यांचे समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी तर त्यांच्यावर अत्यंत कडवड टीका केली. लोकहितवादींसारखे विद्वान इंग्रजांच्या विद्येने दिपून गेलेले असून स्वदेश व स्वधर्म ह्यांच्यावर टीका करून आमचा तेजोभंग करीत आहेत अशी विष्णुशास्त्र्यांची भूमिका होती.

बॅटमॅन Mon, 01/09/2014 - 22:52

In reply to by चिंतातुर जंतू

शेजवलकरांचे उद्धृतः विष्णुशास्त्रींनी किती जरी आगपाखड केली तरी बाजीरावाने पुण्याचा रांडवाडा करून सोडला इ. त्यांनाही कबूल करावे लागले.

सबब काहीएक सहमती त्यांना त्यांच्या हयातीतही मिळालेली होती.

चिंतातुर जंतू Tue, 02/09/2014 - 00:18

In reply to by बॅटमॅन

>> शेजवलकरांचे उद्धृतः विष्णुशास्त्रींनी किती जरी आगपाखड केली तरी बाजीरावाने पुण्याचा रांडवाडा करून सोडला इ. त्यांनाही कबूल करावे लागले.
सबब काहीएक सहमती त्यांना त्यांच्या हयातीतही मिळालेली होती.

लोकहितवादींना कोणाची साक्ष? शेजवलकरांची? शेजवलकर म्हणजे तेच ना, ज्यांचं कर्तृत्व म्हणजे (विश्वकोशातून उद्धृत) -

पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली, तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरुन त्यांनी कठोर चिकित्सा केली.

सगळे लिबरल म्हणवून घेण्यासाठी ब्राह्मणद्वेष्टे आहोत हे दाखवण्यासाठी धडपडणारे! थोडक्यात आणि तुमच्याच शब्दांत सांगायचं झालं तर -

>> सगळे स्वनामधन्य इन्ब्रीडिंग स्वयंघोषित विचारवंत
>> सगळे स्वयंघोषित लिबरल
>> स्वतःची टोळी सोडल्यास यांना कोणी लिबरल म्हणत नाहीत.
>> असे वांझोटे विचार स्वतःच्या कर्मानेच मरतील.
>> अनेक मतप्रवाह असेच आले आणि गेले. हेही दिवस जातील!

बॅटमॅन Tue, 02/09/2014 - 00:33

In reply to by चिंतातुर जंतू

उद्धृत शेजवलकरांचं असलं तरी लोकहितवादींचं म्हणणं काहीएक प्रमाणात चिपळूणकरांनाही मान्य करावं लागलं हा मुख्य मुद्दा नजरेआड करणं हे उद्बोधक आणि तितकंच रोचक इ.इ. वाटलं.

ऋषिकेश Mon, 01/09/2014 - 23:03

In reply to by मन

एक मुद्दा चिंजंने मांडला आहे त्याची पुनरुक्ती करत नाही.

दुसरे असे की समजा वैयक्तिक निकषावर तुम्ही चाळण लावताय - अशी चाळण लावण्याचे भलेबुरे परिणाम भोगायची तयारी ठेवताय - अशावेळी ज्या व्यक्तींना तुम्ही ग्राह्यच धरत नाहिये त्यांच्यावर व्यक्तिगत टिका करणे मात्र योग्य ठरते?

ह्या सगळ्याऐवजी उद्या बॅट्या येउन फंडे मारायला लागला की " रघुराम राजन येडा आहे. त्याने नोटा छापत सुटले पाहिजे. " किंवा "प्रगत देशात एखाद दोन टक्केच व्याजदर मध्यवर्ती ब्यांका आकारतात; भारतातही तेच करावे." तर मी त्याला विशेष महत्व देणार नाही.
त्यासाठी बॅट्याला प्रत्यक्ष अनुभव हवा. किंवा त्याचे अधिक क्रेडेन्शिअल्स हवी काहीकिंवा निदान त्यातली अक्कल बॅट्याला निदान माझ्याहून अधिक आहे ; निदान त्याला काही एक त्या क्षेत्रातली काहीएक अक्कल असं मला वाटायला हवं.
(आता इतरांना शहाणपणाची सर्टिफिकेट वाटत सुटणारा मी कोण टिको़जीराव? हा स्वाभाविक प्रश्न. पण शेवटी "ऑब्झर्वर" मीच ना! शिवाय मला सदैव उपलब्ध असलेली अशी व्यक्ती/सर्टिफिकेशन यंत्रणाही मीच आहे. त्याला नाइलाज आहे साहेब.)

अधोरेखीत अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येकवेळी प्रत्येकाच्या प्रत्येक बोलण्याला महत्त्व द्या असे सांगणे नाहिच्चे, मात्र बॅट्या काही बोलु लागला रे लागला की हा बॅट्या ना स्युडो यंव आहे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं असं म्हणून त्याच्याशी संवादच तोड्ण्यात काय हशील? त्यापेक्षा का रे बाबा तुला असे का वाटते? तु त्यासंबंधी काही वाचले आहेस का? असा संवाद पुढे नेणे योग्य वाटते. इतरांना शहाणपणाची सर्टिफिकेटे द्यायचा अट्टाहास का? त्यापेक्षा त्याचे मत समजावून घेऊन मग त्या मताला अनुकूल/प्रतिकूल रिअ‍ॅक्ट होणे अधिक आरोग्यपूर्ण नाहि काय?

बॅटमॅन Mon, 01/09/2014 - 23:14

In reply to by ऋषिकेश

इतरांना शहाणपणाची सर्टिफिकेटे द्यायचा अट्टाहास का? त्यापेक्षा त्याचे मत समजावून घेऊन मग त्या मताला अनुकूल/प्रतिकूल रिअ‍ॅक्ट होणे अधिक आरोग्यपूर्ण नाहि काय?

रैटविंग लोकांवर मुक्ताफळे उधळत असताना ही कमांडमेंट नक्की कुठल्या ***त जाते ते पहायला आवडेल. :)

गब्बर सिंग Mon, 01/09/2014 - 23:55

In reply to by बॅटमॅन

रैटविंग लोकांवर मुक्ताफळे उधळत असताना ही कमांडमेंट नक्की कुठल्या ***त जाते ते पहायला आवडेल

पण तुम्ही लोक्स फक्त राईट विंग, लेफ्ट विंग व सेंट्रिस्ट एवढे तिनच गट अस्तित्वात असतात असे गृहित धरताय. लिबर्टेरियन्स अस्तित्वातच नाहीत (किंवा अदखलपात्र आहेत) अशा आविर्भावात का आहात तुम्ही लोक ? (आता असं म्हणू नका की लिबर्टेरियन्स हे जास्त करून रिपब्लिकन पार्टीत आहेत म्हणून ते राईटविंगर्स च आहेत.).

मन Tue, 02/09/2014 - 00:22

In reply to by गब्बर सिंग

इथे वेड्यांच्या इस्पितळाबाहेर असलेल्या लोकांचं वर्गीकरण सुरु आहे. लिबर्टिअन्सनी मध्ये यायचं काहीही कारण नाही ;)

गब्बर सिंग Tue, 02/09/2014 - 04:56

In reply to by मन

लिबर्टिअन्सनी मध्ये यायचं काहीही कारण नाही

आयला कमाल आहे !!!

लिबर्टेरियन्स ची ही अवस्था ... तर मग अनार्किस्ट्स, अनार्को कॅपिटलिस्ट्स, मिनार्किस्ट्स इत्यादींनी काय करावे ???

गब्बर सिंग Mon, 01/09/2014 - 23:56

In reply to by मन

अगणित लोकांनी अगणित विषयांवर मतप्रदर्शन सुरु केलं तर मी नक्की कुणाकुणाकडे लक्ष द्यायचं?

Wealth of knowledge creates poverty of attention ____ Herbert Simon.

घाटावरचे भट Tue, 02/09/2014 - 10:31

In reply to by मन

१) मनोबांशी अतिशय सहमत.
२) मनोबा इथे बर्‍याचदा अतिशय विचारपूर्ण प्रतिसाद देतात. त्यामुळे ते विचार वगैरे करण्याची चांगल्यापैकी कुवत राखून आहेत हे सिद्ध होतं.
३) मग मनोबांनी वर्णिलेल्या अनेक मतांच्या टेपा आजूबाजूला वाजत असतानाच्या परिस्थितीत आमच्या सारख्या मठ्ठ लोकांनी काय करायचं? साहाजिकच आमचा फिल्टर अधिकच कडक असणार.
४) त्याहीपेक्षा, आम्ही 'नवीन विचार सोयीचा तर वाटतोय पण परंपरा इतकी खोलवर रुतलेली आहे की ती सोडताही येत नाही' अशा स्थितीत कायम असल्याने आम्ही सदैव जो विचार आस्ते आस्ते बदलाकडे नेईल त्याच्याकडे जास्त झुकणार. त्यातही तो साधारण परंपरा/श्रद्धा वगैरेंच्या आवरणात गुंडाळून आला तर अधिकच उत्तम.
५) अशा वेळी तो विचारांपेक्षा विचार मांडणार्‍याचा काँडिसेंडिंग अ‍ॅटिट्यूड जास्त डोक्यात जातो. आणि मग आम्ही त्यांच्या वागण्यातली आणि बोलण्यातली विसंगती शोधायला लागतो.

अतिशहाणा Tue, 02/09/2014 - 21:02

In reply to by आदूबाळ

काहीच कळले नाही याच्याशी सहमत...

सुरुवातीला दहा वीस तीस चाळीस.... साई सुट्ट्यो (किंवा स्युड्यो) अशी 'घातक स्युडोमार्गाची' प्रस्तावना करुन नंतर ऋषिकेश आणि बॅटमॅन हे पकडापकडी खेळत आहेत असे वाटले.

अजो१२३ Wed, 03/09/2014 - 11:05

"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट!

अगदी अगदी. व्यक्तिशः मला तरी हे विचार प्रचंड कामाला आले आहेत. मी कित्ती प्रतिगामी माणूस ! मेरा बस चलता तो जमाने को उस निओकॉर्टेक्स वाले म्यूटेशन के जमाने के उस पार ले चलता। पण तरीही मला बिचारे किती पुरोगामी वागावे लागते. कधी कधी मी हून पुरोगामी वागतो. हे फूटीश तत्त्वज्ञान नसतं तर जगणं किती कठीण झालं असतं.

adam Mon, 16/05/2016 - 10:38

धागा पुन्हा एकदा वाचला. पुन्हा विचार करावा लागला.
अवांतर --
अजोंची नवी स्वाक्षरी आताच प्रथम नजरेस पडली.