Skip to main content

वैचारिक वगैरे

प्रस्तावना -
एका खुशालचेंडू ऐसी-वाचकाने करमणूकीसाठी म्हणून हा धागा (अनावधानानेच अर्थात) उघडला.
त्यानंतरची मनस्थिती वर्णन करणारे हे करूण काव्य आम्हाला आमच्या गुहेबाहेर सापडले.
ते इथे देतो आहे.

=======================

कोण उन्हाळा भण्ण दुपारी
चालू होता फुल्लटू एसी-
टंकत टंकत कामावरती
वाचत बसलो होतो ऐसी!

लेखामागून लेख आडवे
धाग्यांनाही फुटती धागे
नव्या नव्या त्या श्रेणी येती
रोचकवांतर आगे मागे.

धागे कसले धगधगते हे
वैचारिकसे अग्निकुंड
टंकत त्वेषे अपुली प्रतिमा
हर एकाचे नवेच बंड

'विंदा' समजुनि वाचू गेलो
हाय! तो असा 'विदा' निघावा?
छंद कोणसा बाळगितसे जो
आलेखांचा भुगा पडावा?

टीपा अन् तळटीपांनाही
कमी न येथे पानोपानी
डोळे करती आर्त विनवणी
होता अक्षर वरती-खाली

वा़क्यामागुनि वाक्य चालली
प्यारेसुद्धा संपत येति!
इतुके सारे होउनिसुद्धा
दिग्गज म्हणति "नेति नेति"

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा
तुंबत जाते वाचनीयता
वाहत जातो विचार धागा...

............सा… Fri, 25/07/2014 - 23:53

आयला कसली गेय अन चपखल कविता आहे. बाकी खुशालचेंडू संकल्पने बद्दल एक वाक्य मला अति प्रिय आहे -

“You show me a lazy prick who's lying in bed all day, watching TV, only occasionally getting up to piss, and I'll show you a guy who's not causing any trouble.”

― George Carlin, Brain Droppings

............सा… Fri, 25/07/2014 - 23:57

In reply to by अस्वल

होय त्याची २-३ पुस्तके वाचली आहेत. व एक इतकं आवडलं की माझ्या एका मित्राला पुण्यात पाठविले होते. टवाळ गिरी, मिष्किलपणा, तिरकसपणा, बुद्धेमत्ता सगळच थोर आहे.

इतुके सारे होउनिसुद्धा
दिग्गज म्हणति "नेति नेति"

__/\__

बॅटमॅन Sat, 26/07/2014 - 00:16

In reply to by अस्वल

हाहाहा. ते आहेच म्हणा.

पण तिथे नुस्तीच गेयता, तुझ्या कवितेच्या गेयतेमुळे शरदिनी आठवली इतकेच. हिकडं आशयही जबराट.

नंदन Sat, 26/07/2014 - 00:24

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा
तुंबत जाते वाचनीयता
वाहत जातो विचार धागा...

हाहा, मस्त! :)

वा़क्यामागुनि वाक्य चालली
प्यारेसुद्धा संपत येति!

बॅटमॅन आणि इतरसंस्थळविहारी मंडळींना यात एक अपघाती कोटी सापडावी ;)

अमुक Sat, 26/07/2014 - 01:14

In reply to by नंदन

प्यारेसुद्धा संपत येति!
........हो ना ! एकदा जीभ जड झाली की 'र' काय 'ल' काय सारखेच..

.......बॅटमॅन आणि इतरसंस्थळविहारी मंडळींना यात एक अपघाती कोटी सापडावी
........या नंदनशेठना अपघातातही कोट्या सापडतात ! काही दिवस थालेपारट म्हणून अक्कलकोटला पाठवून द्यायला हवे. ;)
----------------
अस्वलभाऊ कविता मस्त. कवितेचे नांव 'फुल्लटू एसी' ऐसे ठेवायला हरकत नाही. :)
बाकी दिवसभर/रात्री काय चरता हो तुम्ही ?

अस्वल Sat, 26/07/2014 - 01:25

In reply to by अमुक

तुम्हाला फुल्लटू ऐसी म्हणायचं होतं का ? J)

बाकी दिवसभर/रात्री काय चरता हो तुम्ही ?

मदारी दरवेशी देईल ते खातो झालं...

अमुक Sat, 26/07/2014 - 01:29

In reply to by अस्वल

नव्हे.
खूप झाले वैचारिक, आता कवितेवाटे थोडी 'ठंडी हवा आन्दे' म्हणत 'एसी'च.

बॅटमॅन Sat, 26/07/2014 - 02:19

In reply to by अमुक

हो ना ! एकदा जीभ जड झाली की 'र' काय 'ल' काय सारखेच..

"तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्" चे उदा. सांगताना खुद्द कात्यायनसाहेबांनी "ऋलृवर्णयोर्मिथ: सावर्ण्यं वाच्यम्" असे सांगितले आहे, तस्मात र-ल च्या सारखेपणासाठी फक्त जीभ जड होणे जरूर नाही. :)

पण नंदनशेठना अक्कलकोटला पाठवले तर ते नव्या अकलेने अजून कडे'कोट' सोडतील आपल्यावर, तेव्हा ते नकोच. ;)

............सा… Sat, 26/07/2014 - 00:35
Somewhere in the world a woman gives birth to a child every minute. We have to find this woman and stop her.

च्या चालीवर -

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा

- कोण आहे तो, आवरा त्याला!!! ;)

Nile Sat, 26/07/2014 - 01:21

च्यायला, इथे आमचा जीव जातो टंकून अन बॉसच्या नजरा चुकवून आणि याना थट्टा सुचताहेत.

आदूबाळ Sat, 26/07/2014 - 02:03

काय जबरदस्त कविता आहे! दंडवत!

डुडूळगावच्या गोलंदाजाची आठवण मलाही झाली. शर्दिनीदादांना परत कविता पाडायला प्रवृत्त केलं पाहिजे.

धनंजय Sat, 26/07/2014 - 03:35

वा!
("अग्निकुंड"मध्ये एका मात्रेची समिधा कमी पडली. म्हणून दिग्गज सुद्धा चुकार मात्रा इकडेतिकडे शोधत "नेति नेति" म्हणत असावेत का?)

राजेश घासकडवी Sat, 26/07/2014 - 22:26

अरेच्च्या, ही कविता वाचायचीच राहिली होती. त्यावरून 'आम्ही कोण' ही कैफियत आठवली. त्याहीपलिकडे जाऊन आम्हाला असले प्रश्न विचारण्याची जुर्रत करणारे तुम्ही कोण? असाही प्रश्न विचारलेला दिसला. पण सध्या तरी तसा प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही म्हणून आम्ही कोण एवढंच सांगतो.

आम्ही कोण म्हणून काय पुसता आयाळ पिंजारल्या?
ब्लॉगी, आंतरजालि लेख न तुम्ही का अामुचा वाचिला?
धागा संस्थळि ज्या ज्वलंत समिधा-काड्यांमुळे पेटला,
आम्ही होत तयांस सारत तरी का ना तवे देखिल्या?

ते आम्ही - नवबाजु दावुन तुम्हा विस्फारवू लोचने
ते आम्ही - करु प्रश्न सूतसरळा - मल्टीवेरीएटरी
डोळ्यादेखत घालुनी दरवडा आम्ही गुगालाघरी
त्याचे विद्धन वापरून सजवू ऐसी सदा अक्षरे

वीद्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू काढुनि ग्राफ तळ्टिपा आम्हीच लेखांमधे,
सत्याचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
ना-सत्त्यावर एकटेच तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होती विदावादळे!
आम्हाला वगळा-खलास चर्चा - बाकी मुकी अक्षरे!